अणू आहेत की नाहीत? - अणुवादाचे प्राचीन खंडन (भाग २)

पुढील दोन सूत्रांचे भाष्य येथे देत आहे. पण मागच्या भागात असे लक्षात आले की वाचकांचे काही गैरसमज होते. त्याचे काही प्रमाणात सुरुवातीलाच निराकरण व्हावे.

काही उपक्रमींना वाटले की वैशेषिकांच्या अणुवादात नास्तिकत्व होते, ज्याचा शंकराचार्य विरोध करत होते. हे लक्षात असू द्यावे, की वैशेषिक हे नास्तिक नव्हेत. वैशेषिक हे एक आस्तिक तत्त्वज्ञान आहे. कणाद-संप्रदायाचे लोक वैदिक धर्म मोडू इच्छित होते, असा काही गैरसमज मागील लेखाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत जाणवला. तो विचार बरोबर नाही. वैशेषिक हे वैदिक धर्माचे समर्थक होते. "शंकराचार्यांनी वैदिक धर्म वाचवला" असा इतिहास आपण वाचला असल्यामुळे हा गैरसमज होत असेल का? पण त्या इतिहासाचा हा अर्थ घेऊ नये की शंकराचार्यांनी ज्यांचे-ज्यांचे खंडत केले, ते सर्व वैदिक धर्म बुडवायला निघाले होते. या लेखमालेत जे अधिकरण दिले आहे, त्याच्या आधीच्या एका अधिकरणात शंकरांनी सांख्य मताचे सांगोपांग खंडन केले आहे. आणि भगवद्गीता वाचलेल्यांना हे ठाऊक आहे, की त्यात सांख्ययोगाचे मंडन केले आहे, खंडन नव्हे. म्हणूनच शक्यतोवर शंकरांच्या म्हणण्याला कुठलाही वैदिक-धर्म-रक्षक अर्थ जोडू नये. या अधिकरणात वादविवाद करणारे दोन्ही पक्ष वैदिकच आहेत.

अनेक वाचकांना शंकराचार्यांची भूमिका "ऊर्जे"शी संबंधित वाटली, आणि वैशेषिकांची भूमिका ऊर्जा नकारणारी होती, असे वाटले. या गैरसमजाचे मूळ मला नेमके समजू शकले नाही. काही वाचक "ऊर्जा" शब्दाचा आधुनिक अर्थ लावत असल्याची शंका येत आहे. या आधुनिक कल्पनेचा ओढूनताणून संबंध लावायचाच असेल तर तो वैशेषिकांना सहज लागतो. आधुनिक "ऊर्जा" म्हणजे कार्याची राशी. क्रिया, क्रियाशीलता या गोष्टी वैशेषिकांना मान्य होत्या. प्रलयकाळात ही क्रियाशीलता "अदृष्ट" नामक तत्त्वात असते. त्यातील "क्रिये"शी संबंध येऊनच अणूंचे समूह एकत्र येतात. या कल्पनेत "आधुनिक" "ऊर्जा" कल्पनेचा संदर्भ लावायचाच तर लागतो. शंकरांची चेतना ही वेगळी. शंकरच तो वेगळा अर्थ समजावून सांगतात : "...आत्म्याचा गुण असलेला "प्रयत्न" संभव नाही. शरिरात मन असते, त्या मनाचा आत्म्याशी संयोग होतो, आणि आत्म्याच्या गुणाने प्रयत्न जन्मतो. ... चेतना... टक्करमध्ये नाही..." (मागच्या भागात.)

आधुनिक "ऊर्जा" टक्करेमध्ये असते. त्याचा "चेतने"शी संबंध लावणे म्हणजे शंकराचार्यांचे स्वतःचे मत आव्हेरणे होय. शक्यतोवर आधुनिक कल्पना शंकरांच्या किंवा कणादांच्या तोंडी घुसडण्याचा मोह आपण टाळला पाहिजे.

"भावानुवाद" म्हणून माझी मते घुसडली न जावी, अशी काळजी घेतली आहे. पण पल्लेदार वाक्ये तोडताना पूर्वीचे संदर्भाचे शब्द प्रत्येक छोट्या वाक्यात पुन्हा-पुन्हा घालावे लागलेत. त्यामुळे अनुवाद शब्दशः राहिलेला नाही, म्हणून त्याला "भावानुवाद" म्हटले आहे. संस्कृत पाठ्य येथे उपलब्ध आहे :
डीएलआय दुवा (Alterna Tiff पाने २३९ पासून पुढे. विसुनाना यांस धन्यवाद.)
एक इंग्रजी भाषांतर येथे दिसते :
इंग्रजी दुवा
काही लोकांना ते सोपे जावे. पण हे लक्षात असू देणे, की कधीकधी संस्कृतातला शब्द जसाच्यातसा मराठीत अनुवाद म्हणून येऊ शकतो, इंग्रजीत मात्र अर्थ कधीकधी थोडासा ढोबळ असतो.

भावानुवाद पुढे चालू.

--------
२.२.१३
(समूह-भाव मानला तर त्याच्याशी समान "अनवस्थिती" होते. )
समूह-भाव मानला तरी त्यांचा अभाव होतो, या अणुवादाच्या निराकरणाबद्दल हे आहे. तुम्ही (वैशेषिक) असे मानता : "दोन अणूंचे द्वि-अणुक जेव्हा निर्माण होते, ते दोन अणूंपेक्षा अत्यंत वेगळे असते - द्वि-अणुक म्हणजे अणूंचा समावेश करणारा समूह असते." अणूंना कारण मानून ही अशी कल्पना केली जाऊ शकत नाही. ते कसे? त्या कल्पनेचे आदल्या एका कल्पनेशी साम्य होते. एका कल्पनेतून दुसरी कल्पना निघत राहिल्यामुळे तर्काची अवस्था स्थिर होत नाही (अनवस्थिती होते).

अनवस्था या प्रकारे होते : अणूंपेक्षा अत्यंत वेगळे असलेले हे द्वि-अणुक समूह-भावाच्या खास गुणधर्मांमुळे उत्पन्न होते. त्याच्या आदल्या पायरीशी हे साम्य बघावे - "समूह-जोडणारा-संबंध" याचे गुणधर्म अणूंपेक्षा खूप वेगळे असतात, त्या "संबंधा"ला अणूशी जोडण्यासाठी आणखी एक वेगळा "अणूंशी-संबंध-जोडणारा-संबंध" मानावा लागेल. मग ते संबंध एकमेकांशी जोडण्यासाठी आणखी संबंध मानावा लागेल. ही "अनवस्था" आहे, म्हणजे एकापाठीमागे एक करत तर्क स्थिर होऊच शकणार नाही. पण (वैशेषिक म्हणतात) "अणू एकासारखे एक असतात. फक्त समसमान असलेल्या वस्तू एकत्र येतात समूह-भाव आम्ही मानतो. समूहात असा भाव नित्यच असतो. असंबद्ध गोष्टींना किंवा संबंधांना एकमेकांशी जोडणारा असा कुठला वेगळाच प्रकार इथे नाही. म्हणजे तर्काच्या समानतेने एकापाठीमागे एक तर्क जात नाहीत. कुठलाच स्थिर तर्क नाही अशी अनवस्थाही येत नाही." तर तसे नाही म्हणता येत. नाहीतर कुठल्याही दोन वस्तूंमधला संयोगही असलाच म्हणावा लागेल. तिथेही संयोग नित्य आहे, संबंधाची गरज नाही, असे मानावे लागेल. जसा वस्तूंमधला संयोग कुठल्या संबंधामुळे होतो, तो वेगळा "संबंध" मानावा लागतो, तसा समूहसुद्धा कुठल्या वेगळ्या "संबंधा"मुळे होतो. वैशेषिक म्हणतील की "दोन वस्तूंतला संयोग हा एक वेगळा गुण आहे, तिथे कुठलातरी वेगळा संबंध लागतो. समूह होणे हा काही वेगळा गुण नव्हे, म्हणून त्याला वेगळा संबंध लागत नाही." असे म्हणणे योग्य नाही. गुण असल्याचा मुद्दा येथे प्रस्तुत नाही. म्हणून "समूह" असा काही आहे, असे म्हणणार्‍यांना अनवस्थाप्रसंग येतोच. अनवस्था जर होणार असेल तर सगळे काही असिद्ध होते, आणि दोन अणूंचे द्वि-अणुक उत्पन्न होणारच नाही. म्हणूनसुद्धा परमाणु-कारण वाद उपपन्न होत नाही.

२.२.१४
(नित्यत्वामुळे)
अणू हे चार वेगवेगळ्या प्रकारे असू शकतात. (१) त्यांचा स्वभाव "प्रवृत्ती"चा असू शकतो (म्हणजे ते स्वगुणधर्मानेच क्रियाशील असतात), (२) त्यांचा स्वभाव "निवृत्ती"चा असतो (म्हणजे ते स्वगुणधर्माने निष्क्रिय असतात), (३) त्यांचा स्वभाव दोन्ही क्रियाशील-निष्क्रिय असा असू शकतो, किंवा (४) त्यांचा स्वभावात दोन्हीपैकी काहीच नाही, असे असू शकते. या चार पर्यायांवेगळा कुठलाच पर्याय राहात नाही. आणि चारही प्रकार चालणार नाहीत. अणू स्वभावतःच क्रियाशील असतील, तर नित्यच क्रियाशील राहातील आणि प्रलय होऊच शकणार नाही, असा प्रसंग येईल. अणू स्वभावतःच निष्क्रिय असतील, तर नित्यच निष्क्रिय राहातील, आणि सृष्टीच होऊ शकणार नाही. त्यांचा सक्रिय आणि निष्क्रिय असा दुहेरी स्वभाव अंतर्गत विरोधामुळे शक्य नाही. सक्रिय-निष्कियपैकी कुठलेच नाही, असे मानले तर प्रवृत्ती आणि निवृत्ती "अदृष्टा"त आहेत असे मानावे लागेल. निमित्त म्हणून अदृष्ट अणूंच्या नेहमीच जवळ असेल, म्हणजे अणू नेहमीच सक्रिय असतील. अदृष्ट नेहमी जवळ नसेल तर अणू अधीच सक्रिय असणार नाही असा प्रसंग येईल.म्हणूनही परमाणु-कारणवाद चालणार नाही.
------------

चर्चेस मुद्दे :
१. येथे शंकराचार्य "अनवस्था" ही कल्पना उपस्थित करतात. "अनवस्था" म्हणजे तोच तर्क एक पायरी मागेही लागू होणे, अशा पायर्‍या मागेमागे जात तर्क कधीच स्थिर न होणे. या कल्पनेला इंग्रजीत "इन्फिनिट रिग्रेस" असे म्हणतात. अनवस्था उत्पन्न करणारे तर्क आपल्या अनुभवातले आहेत. ४-५ वर्षांच्या लहान मुलांचा तो खेळ असतो - "आई-बाबा, आकाश निळे का असते?" आई-बाबा काही "अमुक" उत्तर देतात. मग बाळ पुन्हा "मग 'अमुक' का असते?" असे जेव्हा प्रत्येक पायरीवर करायला लागते, तेव्हा लवकरच आपल्याला लक्षात येते, या बाळाचे "पण ही पुढची पायरी का?" म्हणजे अनवस्था आहे.

अनवस्थेचा मुद्दा सांगून करून अणू-समूह=द्वि-अणुक होऊच शकत नाही, असे शंकर म्हणतात. त्यांचे म्हणणे तुम्हाला पटते का?

२. (वैशेषिकांचे अणू, किंवा अदृष्ट सक्रिय असतील-नसतील वगैरे शंकर म्हणतात. म्हणजे कोणा वाचकाला असे वाटत असेल की वैशेषिकांच्या पाशी "ऊर्जा" नाही, शंकर "ऊर्जा" असावी म्हणून खंडन करत आहेत, तर त्यांनी शंकरांचे शब्द नीट समजावून घ्यावेत.) शंकरांनी सक्रिय-निष्क्रिय वगैरे चार पर्याय दिले आहेत. पण "कधीकधी सक्रिय आणि कधीकधी निष्क्रिय" हा पर्याय दिलेला नाही. हा पर्याय द्यायला हवा होता काय? जे काही सक्रिय किंवा निष्क्रिय असेल ते नेहमीच असेल, नित्यच असेल, असे ते म्हणतात. हे सूत्र पटल्यास-न पटल्यास त्याची चर्चा करावी.

------
पहिल्या भागाचा दुवा

Comments

एक शंका

धत् तेरे की! मधेमधे 'कॅन नॉट फाईंड सर्वर' एरर येऊन दिलेला प्रतिसाद साफ होतो.
असो.

या प्रतिसादाचा मूळ मुद्दा (जो 'कणाद वि. शंकर' मूळ चर्चेत थोडा अवांतर आहे) असा की -
वेदान्त अर्थात (कठ, ईशावास्य, तैत्तरीय इ.) उपनिषदे यांचे प्रथम उपलब्ध (हस्त-) लिखित कोणत्या काळातले आहे?
त्यावर काही आकृती रेखाटल्या आहेत काय? नव्या कल्पना प्रथमतः मांडताना त्या रेखांकित करण्याची प्रथा फार जुनी आहे. अनेक लिपी अशा चित्रलिपी होत्या/आहेत.
की उपनिषदे ही केवळ मनात बांधलेले मनोरे होते? कितीही इमले चढवा, प्रत्यक्षात उपयोग शून्य असे त्याचे स्वरूप होते काय?

उपनिषदांचा काळ अनिश्चित इ.स. पूर्व असल्याने केवळ मौखिक स्वरुपातील उपनिषदे हे त्यावर भाष्य करणार्‍यांच्या वैचारिक अस्पष्टतेचे कारण असू शकेल काय? अदृष्ट म्हणजे काय? चेतना म्हणजे काय? याबद्दल वेदान्त्तात मूळ उल्लेख कसे आहेत?
कणादांना अभिप्रेत असलेली द्विणुके/चतुर्णुके कशी दिसत होती?

लिओनार्दो-दा-विन्चि च्या उपलब्ध हस्तलिखित वह्यांमध्ये ठिकठिकाणी अशी चित्रे/रेखाटने आढळतात. त्यांशिवाय त्याला नक्की काय म्हणायचे आहे ते स्पष्ट होत नाही. केवळ मजकूर वाचला तर असाच गुह्यज्ञान स्वरूपाचा वाटू शकतो. (सुप्रसिद्ध स्क्रू-हेलिकॉप्टरचे उदाहरण घ्या.) आकृतींशिवाय वाचले तर हे सारे केवळ कल्पनेचा खेळ वाटल्याशिवाय रहात नाही.

तर, उपनिषदांच्या मूळ लिखित स्वरूपाबद्दल धनंजय अथवा इतर ज्ञानी मंडळी यांनी काही अधिक माहिती द्यावी.

मूळ विषयावर मत पुढे.

अतिअतिअवांतर -
देव हे परग्रहावरून आलेले बुद्धीमान जीव होते. (संस्कृत ही भाषा 'दिव्यागीर्वाणभारती' आहे.) त्यांनी येथील सर्वात प्रगत जीवाला ज्ञानी करून संस्कृती निर्माण केल्या. त्यांनी दिलेले ज्ञान आजच्या विज्ञानाच्या बरोबरीचे आणि तंत्रज्ञानाला काही बाबतीत मागे टाकणारे होते इत्यादी आणि वगैरे मते आकर्षक आहेत. त्यावर एक स्वतंत्र (कदाचित अंतहीन) चर्चा होऊ शकेल. याबाबतीत माझे मत 'लाखात एक' शक्यता आहे असे आहे.
या दृष्टीने प्रस्तुत चर्चेत काही रंग आले तर बरे.

कणादांचे अणू कसे दिसत?

याची चित्रे नाहीत. चित्रे सोयीची असतात हे खरे, पण चित्रांशिवाय वर्णन चालत नाही, हे म्हणणे ठीक नाही. भूमितीची, खगोलशास्त्राची उत्तम चित्र-हीन पुस्तके आहेत, आणि ती गुह्य वाटत नाहीत. हा वाचनाच्या, शिकवणीच्या, सवयीचा प्रश्न आहे.

आपली पठन-पाठन मौखिकी संस्कृती आहे. सर्वात जुने लिखित ग्रंथ केवळ १५०० वर्षांपूर्वीचे (थोडेसेच) सापडतात. (त्याआधीचे शिलालेख अस्तित्वात आहेत.) कुठल्याही आर्यभाषेची चित्रलिपी माहीत नाही.

कणादांना अणूंचा आकार काय अभिप्रेत होता ते आपल्याला माहीत आहे. अणूचा आकार "परिमंडल"="गोळा"=स्फियर असा अभिप्रेत होता, आणि द्वि-अणुके लांबट होती. (तुम्ही मागच्या लेखात "महद्दीर्घ" ब्रह्मसूत्र उद्धृत केले होते, त्यात शंकराचार्यांनी या वर्णनांचा उल्लेख केला आहे.) पण आपण वाचत आहोत ती सूत्रे समजण्यासाठी तो आकार मनात आणणे जरुरीचे नाही. मागच्या लेखातले सूत्र म्हणा, वरील सूत्रे म्हणा: अणू गोल, त्रिकोणी, चौकोनी, कसेहीका असेनात, ही सूत्रे तर्काच्या दृष्टीने तितकीच सशक्त आहेत. (दहावी-बारावीच्या भूमितीत कधीकधी चित्र काढल्याने घात होतो, विचार त्या चित्रापुरताच मर्यादित राहातो, असा वाईट अनुभव माझ्यासारखा तुम्हलाही निश्चितच आला असेल.)

अदृष्ट आणि चेतना वगैरे शब्दांचे मूळ उल्लेख येथे दिसतात तसेच आहेत. या सूत्रांमध्ये व्याख्या-वर्णने दिली आहेत. ही ब्रह्मसूत्रेच वेदान्तसूत्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. (वेदमंत्रांत या बाबतीत काहीच उल्लेख नाही, हे सांगणे नलगे. उपनिषदे वेगवेगळी आहेत. शंकरांनी उपनिषदांचेही भाष्य लिहिले आहे. पण त्यात विचार असा सूत्रबद्ध [आणि व्याख्या-परिभाषा असा सुसूत्र] नाही.)

(भाष्य करणार्‍यांची वैचारिक अस्पष्टता काय ते नीट कळले नाही. भाष्यातील विचार बर्‍यापैकी स्पष्ट वाटतात. विचार पटतीलच असे नाही, पण त्याचा स्पष्ट-अस्पष्टतेशी थेट संबंध लागत नाही.)

मुक्तचिंतन किंवा फापटपसारा

मूळ वैदिक वाङ्मयाची निर्मिती इ.स. पूर्व ७०० या कालखंडाजवळ समाप्त झाली असे म्हणायला हरकत नसावी.
- अलेक्झांडर भारतात आला त्यावेळी (इ.स. पूर्व ३०६) बौद्ध धर्म स्थापनेला जवळजवळ २०० वर्षे पूर्ण झाली होती. म्हणजे इ.स. पूर्व ५०० पूर्वीच मूळ वैदिक वाङ्मयाचे अखेरचे भाग लिहिले गेले होते.
मुख्य उपनिषदे - सूत्रे - अरण्यके - ब्राह्मणे - वेदसंहिता (उपवेद - अथर्व - यजु: - साम - ऋग्वेद) या उलट क्रमाने पाहिल्यास ऋग्वेद इ.स.पूर्व. १४०० पूर्वी कधीतरी लिहिला गेला असावा. उपनिषदे पूर्वीच्या सर्व वाङ्मयाची 'अपडेटेड ऍन्ड इम्प्रूव्हड व्हर्जन' म्हणता येईल.
म्हणूनच उपनिषदांना वेदान्त म्हटले जाते.

वेदांगे नंतरच्या काळात रचली गेली. जैन-बौद्ध काळात (आजीवीका सुद्धा) भारतीय तत्वज्ञान काही वेगळ्या (नास्तिक)मार्गाने गेले. त्यांच्या काळात एकूणच वैदिक वाङ्मयाकडे दुर्लक्ष झाले. ना त्यात काही मोलाची भर पडली - ना त्यावर महत्त्वाचे भाष्य झाले. केवळ राजपरंपरा कोण्या देवापर्यंत पोचवणार्‍या (आजच्या भाषेत 'बखरी' म्हणजे) पुराणांची उत्पत्ती या काळात झाली. त्यात आढळणारे बरेचसे लेखन हे केवळ मिथक स्वरुपाचे मानावे लागते.

आदि शंकराचार्य (इ.स.७५०) , रामानुज आणि मध्व (इ.स. ११०० नंतर) या तीन विचारवंतांनी इ.स. ७०० नंतर पुन्हा एकदा या जुन्या ग्रंथांचा अभ्यास करून नव्याने वैदिक तत्त्वज्ञानाला उजाळा दिला. कारण वैदिक विचारांना इतके फाटे फुटले होते की त्यांची एकछत्री विचारधारा निर्माण होणे गरजेचे होते. अन्यथा ते क्षीण होऊन कालौघात नष्ट झाले असते. धनंजय यांना या 'पोस्ट-बुद्धीझम' भाष्यांना वेदान्त म्हणावे असे अभिप्रेत आहे असे दिसते. बर्‍याच वेळेला तसे म्हटले जाते. पण माझ्या दृष्टीने तो वेदान्त नव्हे. ती केवळ भाष्ये आहेत.

म्हणजेच मूळ वैदिक तत्त्वज्ञान - वेदान्त आणि नंतर शंकररामानुजादिंनी त्यावर केलेले भाष्य यांच्यात जवळजवळ १४०० वर्षांचा काळ गेला. मूळ वेद मौखिक स्वरूपाचे होते असे अनेकांचे म्हणणे आहे. सामवेदात 'ऋग्वेद कसा गावा ?' यावर प्रामुख्याने विचार केलेला दिसतो. त्यावरून तसे असावे असे मानता येते. परंतु वेद, ब्राह्मणे, आरण्यके, सूत्रे आणि उपनिषदे यांच्या मूळ लिखित संहिता नसतीलच असे म्हणता येणार नाही. आज छापलेले एखादे पुस्तक अत्यंत 'तैलाद्रक्षेत् जलाद्रक्षेत् रक्षेत् शिथिलबंधनात्..' असे जपले तरी ते न वाचता ठेऊनही पाचशे वर्षे तरी टिकेल याची खात्री देता येत नाही. मग भूर्जपत्रांवर बोरू अथवा तत्सम लेखणीने आणि नैसर्गिक शाईने लिहिलेली पुस्तके १४०० वर्षे टिकतीलच याची काय शाश्वती? शिवाय तक्षशीलेवर हुणांनी केलेल्या हल्ल्यात लाखो ग्रंथ आगीच्या भक्षस्थानी पडले असे म्हटले जाते. त्यात या संहितांचा अथवा त्यांच्या 'ऑथेंटिक रीप्रॉडक्शन्स्' चा संहार झाला असेल असे मानायला जागा आहे.
दुर्दैवाने शंकराचार्यांच्या जन्मापर्यंत तक्षशीलेच्या ज्ञानपीठाची राख झालेली होती. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोचलेले वैदिक ज्ञान हे प्रामुख्याने मौखिक स्वरुपाचे होते. याबाबत उपक्रमावर पूर्वी सांगोपांग चर्चा झालेली आहेच.

ही सारी विचारसंपदा इतकी प्रचंड आहे की एकाच व्यक्तीला निर्माण झालेले सर्वच्या सर्व वैदिक वाङ्मय पूर्णपणे मुखोद्गत असणे अशक्य भासते. मध्ययुगीन साधने वापरून पूर्ण भारतात फिरणे आणि तेथील मौखिक ज्ञानसंपदा मौखिक स्वरुपातच गोळा करणे हे केवळ अशक्य वाटते. त्यामुळे काही महत्त्वाची माहिती नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शंकराचार्यांचे भाष्य हे प्रामुख्याने बादरायणाने इ.स. १०० च्या आसपास लिहिलेल्या (?) ब्रह्मसूत्रांवर आहे. त्यांचा वैचारिक दृष्टीकोन जगप्रसिद्ध आहे. (अद्वैत!). त्यामुळे त्याऐवजी इतर जे काही विचारप्रवाह होते (सांख्य, वैशेषिक) ते खोडणे त्यांना क्रमप्राप्तच होते.
(इतरत्र लिहिल्याप्रमाणे इतिहास संशोधक आणि इतिहास समिक्षक यांच्यातली सीमारेषा पुसट असते. तसे - ) त्यांना इतर तत्त्वज्ञानातले त्यांच्या दृष्टीने जे कच्चे दुवे दिसले त्यांवर त्यांनी हल्ला चढवला.

परंतु जी मुळातच मौखिक होती, (ज्यात मांडलेले विचार सर्वांगीण नसण्याची शक्यता असते) त्या माहितीच्या आधारावर तो विचार कसा अपूर्ण आणि कुचकामी आहे ते जगापुढे मांडणे हा साखळीतल्या दुबळ्या कडीवर प्रहार झाला.

आज उपलब्ध असलेल्या सर्व संहिता मौखिक परंपरेचे लिखित रूपांतर आहे. त्यामुळे त्यात आकृती असणे अशक्य! पण (जर मूळ लिखित ग्रंथ कधीकाळी अस्तित्वात असतील तर-) वैशेषिकांच्या मूळ ग्रंथात आकृती नसतीलच असे छातीठोकपणे सांगणे बरोबर नाही असे माझे मत आहे. शतपथ ब्राह्मणात जर यज्ञवेदी किती अंगुले असावी याचे शाब्दिक वर्णन आढळते तर/म्हणून ते आकृतीबद्ध केले नसावे असा निष्कर्ष कसा काढता येईल?

उपरोक्त चर्चेत आलेले मुद्दे - शंकर आणि कणाद - शंकरांनी केलेले कणादाचे खंडन हे सर्व या 'माहितीची उपलब्धता' या निकषावर लावले पाहिजेत. कणादवाद पूर्णपणे माहित असणारा, त्यावर विश्वास असणारा, त्यावर पुढे संशोधन करणारा आणि शंकरांच्या तोडीच्या बुद्धीमत्तेचा माणूसच शंकराचार्यांना योग्य उत्तर देऊ शकला असता. (अद्वैतवादी शंकराचार्यांची कणादवादातली प्रतिमा.)
परंतु तसे झाले नाही हे ऐतिहासिक सत्य आहे.

आधुनिक विज्ञानाला अभिप्रेत असलेले शब्दांचे अर्थ आणि वैदिक वाङ्मयात वापरल्या गेलेल्या शब्दांचे अर्थ यात तफावत आहे. त्याबरोबरच त्यांचा मानवी जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोनही वेगळा आहे. मानवी बुद्धीच्या आकलनापलिकडे काहीतरी आहे हे गृहित धरून मानवी व्यवहार आणि बाह्य जग यांची सांगड घालण्याचा उघड प्रयत्न जुन्या तत्वज्ञानात दिसतो. आधुनिक विज्ञान लांबच्या मार्गाने तसेच काहीतरी शोधण्याच्या मागे आहे असे दिसते. फक्त त्यांचे गृहितक वेगळे आहे.

पण तर्कशास्त्राच्या बाबतीत जुनी तत्वज्ञाने आधुनिक विज्ञानापेक्षा कुठेच कमी नाहीत हे नमूद केले पाहिजे.

चित्रांचा हव्यास का?

चित्रे असतील किंवा नसतील. पण जिथे शब्द नेमके असतात, तिथे चित्रे फसवी असतात. बालानां सुखबोधाय शाळेच्या पाठ्यपुस्तकात चित्रे असतात. शिक्षिका उत्तम असली तर त्या चित्राची सुरुवातीला विद्यार्थ्याच्या मनोरंजनासाठी मदत घेते. आणि विद्यार्थ्याचे मन अभ्यासात रमल्यानंतर ते चित्र जवळजवळ पूर्णपणे चूक आहे, असे सांगण्यास विसरत नाही.

उदाहरणार्थ निल्स बोहर याच्या हायड्रोजन अणूचे असे काही चित्र पाठ्यपुस्तकात काढतात :

निल्स बोहर - हायड्रोजन अणूचे मानचित्र

यात काहीतरी लक्षात ठेवण्यासारखे आहे, असे मानतो. पण फसव्या गोष्टीच फार आहेत. हे तर सूर्यमालेसारखे काहीतरी दिसते, तसे बोहरचे शब्द मुळीच नाहीत, आणि कल्पनाही पुष्कळ वेगळी आहे. यात बोहरच्या अणूच्या मधल्या न्यूक्लियसचा आणि इलेक्ट्रॉनच्या आकारमानाचा, ढोबळ "आकृतीचा" काही ठसा मनात बिंबतो. तो चूक आहे. प्रकाशकिरणाचे एक चित्र मनात बिंबते. ते तर केवळ कार्टून आहे.

विद्यार्थ्याने या चित्राची मदत घेऊन मनात विषयाबद्दल रस उत्पन्न करावा, मग लवकरात लवकर ते चित्र मनातून पुसून टाकावे. त्यातल्या तपशिलवार चुकांचा मनात लवलेश राहायला नको. बोहरचे हे व्यापक शब्द समजून घ्यावेत :
"assumptions:
(1) That the dynamical equilibrium of the systems in the stationary states can be discussed by help of the ordinary mechanics, while the passing of the systems between different stationary states cannot be treated on that basis.
(2) That the latter process is followed by the emission of a homogeneous radiation, for which the relation between the frequency and the amount of energy emitted is the one given by Planck's theory."

गृहीतके:
(१) समन्वित वस्तुसमूहांचा गतिमान समतोल स्थिरस्थितीत सामान्य मेकॅनिक्स-भौतिकीने वर्णन केला जाऊ शकतो. पण वेगवेगळ्या स्थिरस्थितींमध्ये सिस्टिमचे प्रवास करण्याची या प्रकारे व्यवस्था लावता येत नाही.
(२) या प्रवासाच्या प्रक्रियेतून एक-गुण असलेले किरणोत्सर्जन होते. त्या किरणोत्सर्जनाच्या फ्रिक्वेन्सी आणि ऊर्जेच्या राशीमध्ये जो संबंध असतो, तो प्लँकच्या थियरीनुसार असतो.

या वाक्यांचा अर्थ त्या फसव्या चित्रापेक्षा खूपच व्यापक आहे. कुठल्या चित्रकाराच्या (मग तो बोहरच का असेना!) क्षणिक कल्पनाशक्तीच्या आणि चित्रकारीच्या मर्यादेत तो अर्थ अडकलेला नाही. अर्थ व्यापक आहे, तितकाच नेमकाही आहे.

आपल्या तत्त्ववेत्त्यांनी (शंकर, कणाद वगैरे लोकांनी) इतक्या नेमक्या आणि अर्थपूर्ण शब्दांत सांगायचे ते सांगितले आहे. मग त्या मानाने लंगड्या चित्रांच्या हव्यास करू नये. त्यांच्या काळात त्या गुरुवर्यांनी बालकांना शिकवण्यासाठी चित्रे काढली असतीलही. पण मग ती चित्रे कितपत खोटी आहेत तेही सांगितले असेल. ती चित्रे आपल्यापाशी नाहीत. पण त्यांचे त्याहून नेमके शब्द आहेत. त्यांच्या तर्क-अर्थपूर्ण वर्णनांना "निरुपयोगी इमले" म्हणून हीन मानू नये. ते शब्दवैभव असताना बाळबोध चित्रांची गरज पडू नये.

प्राचीन अणूवादाच्या बाजूने वाद प्रस्तुत करणारी गौतमांची न्यायसूत्रे, आणि त्यावरचे वात्स्यायनांचे भाष्य माझ्यापाशी आहे. त्याचा भावानुवाद सवडीने मी देईन. (गौतमांची न्यायसूत्रे आणि कणादांची वैशेषिकसूत्रे अणूंच्या बाबतीत एकाच मताची आहेत.)

कुठे

प्राचीन अणूवादाच्या बाजूने वाद प्रस्तुत करणारी गौतमांची न्यायसूत्रे, आणि त्यावरचे वात्स्यायनांचे भाष्य माझ्यापाशी आहे.

ही कुठे मिळाली हो? जालावर की छापील स्वरूपात?
छापील असल्यास प्रकाशन, कुठून घेतली वगैरे माहीती द्या की राव.

या शिवायही कणादांचे, शंकराचार्यांचे तसेच असे प्राचीन विवेचन करणारे वाङमय मराठीतून कुणी आणले असल्यास त्याचाही काही थांग पत्ता द्या बुवा.

विसुनाना आपला प्रतिसाद जर थोडा विस्तृत केला तर एक उत्तम लेख बनु शकेल असा आहे.

एकुणच आवडले!
आपला
गुंडोपंत

संस्कृत डॉक्युमेंट्स संकेतस्थळावर

दुवा
येथे सापडला. (म्हणजे मला शोधून सापडला नाही - ते संकेतस्थळ चालवणार्‍या नंदू अभ्यंकरांनी मित्रत्वाने दुवा दिला.)
इंग्रजी अर्थ (झा यांचा अनुवाद) भाग १
इंग्रजी अर्थ (झा यांचा अनुवाद) भाग २
माझ्यापाशी मृणालकांति गंगोपाध्याय यांचा इंग्रजी अनुवाद छापील आहे (प्रकाशक - इंडियन स्टडीज, कलकत्ता)

का?

अनेक वाचकांना शंकराचार्यांची भूमिका "ऊर्जे"शी संबंधित वाटली, आणि वैशेषिकांची भूमिका ऊर्जा नकारणारी होती, असे वाटले.

आणि वैशेषिकांची भूमिका ऊर्जा नकारणारी होती असे मला तरी म्हणायचे नव्हते... किंवा तसे काही मनात नव्हते.
काही वाचक "ऊर्जा" शब्दाचा आधुनिक अर्थ लावत असल्याची शंका येत आहे. टक्कर आणि चेतने विषयी सगळेच पटले नाही. उर्जेचा टक्कर असाच विचार का? असाही विचार आलाच.
(क्षमस्व, वेळेअभावी संक्षिप्त प्रतिसाद दिला आहे. पुढील अनुवादही अजून शांतपणे वाचणे झाले नाहीये.)
आपला
गुंडोपंत

अंतिम मत

धनंजय यांनी सुरू केलेल्या चर्चा प्रस्तावामुळे मला माझ्याच काही मतांचा नव्याने विचार करावा लागला. म्हटले तर पूर्वीच्या ऐकीव (पण तज्ञ) माहितीवर आधारलेली ती मते होती. इतरांची होती. पण मला पटलेली होती. त्यांना पुन्हा एकदा चक्षुर्वैसत्यम् शब्दांशी ताडून पाहिले. (ब्रह्मसूत्रे , शांकरभाष्य, रामानुजभाष्य , वैशेषिक दर्शन, आठ प्रमुख उपनिषदे,(छांदोग्य मिळाले नाही पण मिळेल!), धर्म आणि बुद्धीवाद वगैरे) त्यांना खोटे ठरायचे असेल तर मला उपलब्ध झालेल्या ग्रंथाहूनही आणखी स्पष्ट प्रमाण लागेल.

या विषयाची जी संगती लागली ती अशी -

१. वेदसंहिता मोठ्या प्रमाणावर मानवाच्या प्राथमिक ज्ञानावर आधारित आहेत. (पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश - स्वर्ग - गोधन - घोडे - युद्ध - स्त्रीपुरुष संबंध - यजन इ.)

२. बराच काळ स्थिरावलेल्या संस्कृतींमध्ये जसा विचारांचा विकास होतो तसा तो वैदिक संस्कृतीत होत होता.

३. त्यातूनच ईश, ईशावास्य, कठ, छांदोग्य, बृहदारण्यक, मंडुक, ऐतरेय, तैत्तरेय आदि उपनिषदांचा जन्म झाला.

४. पूर्वासुरींनी सांगितलेले विचार सहसा नाकारले जात नाहीत. ते नाकारण्यासाठी वैचारिक क्रांती व्हावी लागते. 'वेद' पूर्वापार चालत आलेले असल्याने त्यांना पूर्णपणे न नाकारता वेदांमधील विचारांना आपापल्या परीने आणि मताप्रमाणे 'स्वयोग्य' वळण लावण्याचा प्रयत्न या उपनिषदांत दिसतो. परंतु काही उपनिषदे त्याही पुढे जाऊन ज्याला आजच्या भाषेत आधुनिक म्हणता येईल असे विचार मांडताना दिसतात. (ब्राह्मणे ही या उपनिषदांचा भाग म्हणून होती असेही दिसते.)(इ.स.पूर्व ८०० ते इ.स. पू. ५००)

५. न्याय-सांख्य-वैशेषिक-बौद्ध या मूळ वेदातून निर्माण झालेल्या विचारधारांचाच तत्कालीन आधुनिक अवतार होता. अनेक उपनिषदांमध्ये या मतांचा उल्लेख आढळतो. या विचारपरंपरा टप्प्याटप्प्याने अधिकाधिक निरीश्वरवादाकडे प्रवास करताना दिसतात.

६. ज्याला पूर्वमिमांसा म्हणतात ते कट्टर कर्मकांडी आणि यज्ञाधारित तत्वज्ञान एका बाजूला तर दृष्टीगोचर जगात ईश्वराची आवश्यकताच पूर्णपणे नाकारणारे बौद्ध तत्वज्ञान दुसर्‍या बाजूला असा एक प्रखर संघर्ष गौतम बुद्धाच्या हयातीत आणि पुढे बौद्ध मतप्रसाराच्या काळात झालेला दिसतो. (इ.स. पू. ५०० ते इ.स. १००)
याच काळात वैदिक धर्म अधोगतीला लागून त्या काळातली सूज्ञ माणसे ईश्वराच्या अस्तित्वाविषयी द्विधा मनःस्थितीत पोचली असावीत. (उदा. अर्जुन - पुढे पहा.)
त्यांना पुनः वैदिक धर्माकडे खेचण्यासाठी कर्मकांडाला बाजूला सारणारे पण ईश्वराला मानणारे असे नवे तत्त्वज्ञान (ज्यात बुद्धीच्या उपयोगाला, ज्ञानाला आणि चिकित्सेला स्थान होते) असे एक 'ब्रह्म' तत्त्वज्ञान निर्माण झाले. 'अथा तो ब्रह्मजिज्ञासा' ही त्या तत्त्वज्ञानाची नांदी म्हणता येईल. बादरायण व्यासांनी* आपल्या ब्रह्मसूत्रात न्याय-सांख्य-वैशेषिक-बौद्ध या सर्व विचारप्रणालींचे खंडन करण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला. हीच ती उत्तरमिमांसा विचारधारा.( *बादरायण = व्यास हे समिकरण अजून नक्की नाही.)
या तत्त्वज्ञानाप्रमाणे ईश्वर आहे, तोच सर्व विश्वाचा निर्माता आहे, तो विश्वव्यापक आहे, त्यालाच ब्रह्म असे म्हणतात. तो सर्व प्राणीमात्रात प्राण म्हणून वास करतो. तो निर्जिवांत पदार्थ आहे. ( परंतु ब्रह्म कशापासून निर्माण होते ते मला तरी समजलेले नाही. अशा प्रकारच्या अनुत्तरित शंकांना मूर्खांच्या शंका, अश्रद्धांच्या शंका म्हणून बाजूला सारलेले आहे. )
हे तत्त्वज्ञान त्याकाली बौद्धमत बाजूला सारायला पूर्णपणे यशस्वी ठरले नसले तरी निदान वैदिक विचारांचे संपूर्ण उच्छेदन थांबवण्यात यशस्वी ठरले. याचे कारण बौद्धमताला मिळालेला राजाश्रय आणि तरीही ब्राह्मणांचे समाजावर असलेले वैचारिक वर्चस्व हे असावे.
बौद्ध मतांचा पूर्ण पराभव झाला नाही तरी इतर वैदिक विचारपरंपरा ( न्याय-सांख्य-वैशेषिक)मात्र लयाला गेल्या. त्यांचा पुढे कसलाही उत्कर्ष झाला नाही. उलट त्याही विपर्यस्त स्वरुपात उत्तरमिमांसेत विलीन झाल्या.

इथे बरेच मोठे विषयांतर -
'धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे|' ही स्थिती उत्पन्न झाली की ईश्वर पुन्हा अवतार घेतो - तो केवळ शारिर रूपात नव्हे तर विचारांच्या रूपातसुद्धा! महाभारतकार बादरायण 'व्यास' उत्तरमिमांसेचे खंदे पुरस्कर्ते होते. (कदाचित उद्गाते होते.)गीता हे एक उपनिषद आहे असे म्हटले जाते. ते व्यासांनी लिहिले आहे. पर्यायाने त्यात व्यक्त झालेली धर्ममते व्यासांची आहेत.पण श्रीकृष्ण या महान विभुतीच्या तोंडून ते बाहेर पडलेले दाखवल्याने आणि श्रीकृष्ण परमेश्वराचा पूर्णावतार असल्याने प्रत्यक्ष परमेश्वरच - भगवान ते सांगतो (गातो?) आहे ('श्रीमद्भगवद्गीता') असा आभास निर्माण होतो. मग त्यावर अपील नाही.
स्वमतप्रचार-प्रसारासाठी प्रत्यक्ष ईश्वराची साक्ष काढणार्‍या व्यासांना मानले पाहिजे.
पण असे करूनही बौद्धमताचा संपूर्ण पराभव न झाल्याने गौतम बुद्धालाही ईश्वरी अवतार बनवून त्यात गोवले गेले.

असो. परंतु एकीकडे कर्मकांडाचे खरे स्वरूप (दानधर्म, समाजकल्याण, पर्जन्याची निर्मिती यांसाठी यज्ञ करावा - इति व्यास) सांगताना त्याचा त्याग करावा असेही व्यास सांगतात. गीतेच्या दुसर्‍या अध्यायात त्यांनी सांख्य विचारधारेची किंवा बुद्धीवादाची भलावण केलेली दिसते. याचाच अर्थ सांख्य तत्त्वज्ञान सहजासहजी बाजूला सारण्याइतके क्षीण नव्हते. म्हणूनच गीतेत पदोपदी विरोधाभास दिसतो. अर्जुन हे पात्र ('याच काळात वैदिक धर्म अधोगतीला लागून त्या काळातली सूज्ञ माणसे ईश्वराच्या अस्तित्वाविषयी द्विधा मनःस्थितीत पोचली असावीत') अशाच एका द्विधा माणसाचे प्रतिक आहे. त्याची मते समजावून घेत, त्याच्या कलाकलाने त्याला 'अद्वैत' किंवा 'ब्रह्म' संकल्पना सांगितलेली दिसते. एकीकडे स्वर्गप्राप्तीसाठी यज्ञ करणारी माणसे मूर्ख आहेत आणि ऐहिक विषयभोग व्यर्थ आहेत असे म्हणताना मध्येच श्रीकृष्ण -'हतो वा प्राप्स्यसि स्वर्गंम् | जितं वा भोक्ष्यसे महीम्| ' असे प्रलोभन अर्जुनाला का दाखवतो?- हे मला न सुटलेले कोडे आहे. म्हणून हा सुप्रसिद्ध श्लोक 'प्रक्षिप्त' असावा असे मी मानतो.

पुन्हा मूळ विषयाकडे -
७. पुढे इ.स. ३०० नंतर दोन गोष्टी घडल्या - पश्चिमेकडील साम्राज्य रचनेचा अकस्मात अंत झाला. भारताचे परराष्ट्रव्यापार थंडावले आणि आर्थिक मंदी येऊ लागली. गुप्त काळात सुवर्णयुगातला भारत मध्ययुगीन अवकळेकडे वाटचाल करू लागला.
इ.स. ५०० नंतर गुप्त साम्राज्याचा अंत झाला आणि संस्कृतीच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारी शांती अणि राजाश्रय नष्ट झाला. अनेक लहान लहान राज्ये उदयाला आली. सतत युद्धे झाल्याने पिकांची, अर्थव्यवहारची नासाडी होऊन सामान्य जनतेची वाताहात झाली. (कदाचित दुष्काळही पडले असावेत.)
याचे खापर (बौद्ध विचार नीट न समजल्याने ईश्वराची भीती नष्ट झाली, जनता अनिर्बंध, अनैतिक वर्तन करू लागली इ. ) बौद्ध धर्मावर फोडण्यात आले.

८. येथे (इ.स. ७५० नंतर)आदिशंकराचार्यांचा धर्मतत्त्वज्ञानाच्या क्षितिजावर उदय झाला. वीरराघवाचार्यांनी संपादलेल्या 'वैशेषिकदर्शन' ग्रंथाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे कणाद(, काश्यप अथवा उल्लुक या तिन्ही नावांच्या एकाच) ऋषीने वैशेषिक सूत्रे लिहिली असावीत. (ज्यात अणू हाच विश्वाचा कारक आहे हा विचार आहे.) परंतु "owing to various reasons, the traditional interpretations of Kanada-sutras were lost." "... Sankaramisra, the auther of Upaskaraadmits that he was not having any sutra- commentary before him to help him in his task.""Udayana mentions that Kanada's Vaisheshikadarsana was not held high in esteem by some in his days."
याचाच अर्थ असा की 'वैशेषिक दर्शन' हा कणादाचा ग्रंथ मुख्य विचारधारेपासून अनेक शतके (इ.स. पूर्व ३०० ते इ.स. ७५० - ते इ.स. २००८!) बाजूला पडला होता. कदाचित तो मौखिक ज्ञान परंपरेचा भागही राहिला नसावा. त्यातील अनेक महत्त्वाचे मुद्दे अथवा सूत्रे भ्रष्ट अथवा नष्ट झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. काही वैदिक परंपरा जपणार्‍या पंडितांकडे तो अभ्यासाविना आला असेल.
त्या विपर्यस्त रूपाचा अभ्यास करण्याचे खरेतर शंकरांना काहीच कारण नव्हते. कारण त्यांच्या काळापर्यंत कणादवाद नष्टप्रायच झाला होता. मुख्य शत्रू होता तो बौद्ध धर्म तत्त्वज्ञान!
परंतु अद्वैतवादाचे पुनरुत्थान करताना पुन्हा एकदा बादरायणाच्या ब्रह्मसूत्रांवर भाष्य करणे क्रमप्राप्त होते आणि त्यात वैशेषिक तत्त्वज्ञानावर सूत्रे असल्याने वैशेषिक तत्वज्ञानाचा अभ्यास करणे आलेच! शंकरांनी केलेले कणादाचे खंडन हे खरेतर बादरायणाने केलेले कणदाचे खंडन आहे. शंकराचार्यांनी आपल्या (कदाचित अर्धवट माहितीवर आधारलेल्या) अभ्यासाप्रमाणे त्यावर भाष्य केले इतकेच! शंकरांनंतर रामानुजांनी त्याच ग्रंथावर केलेले भाष्य पाहिले तर या दोन प्रतिभावान व्यक्तींची मुळत 'ब्रह्मसूत्रे' समजावून घेण्यातली तफावत दिसते. तशीच त्यांची वैशेषिक विचारांची समजही वेगेवेगळी होती हेही कळते.

यावेळी मुख्य वैचारिक हल्ला मोडकळीला आलेल्या बौद्धधर्मावर असल्याने आणि या विचारांना सामाजिक अनागोंदीची जोड मिळाल्याने शंकर बौद्ध तत्त्वज्ञानाचा पाडाव करण्यात यशस्वी झाले.(संभवामि युगे युगे!)
परंतु भौतिक विज्ञानाची हाकालपट्टी पूर्वीच झाली होती.

९. कणादाने केलेले अणूचे वर्णन परिपूर्ण होते असे नव्हे. परंतु तो एक 'हायपोथेसिस' होता असे म्हणता येईल. जसे - 'यज्ञ केल्याने पाऊस पडतो' किंवा 'आत्मा हृदयात वास करतो' किंवा 'वर्महोलमधून कालप्रवास करता येतो' इ. त्यावर पुढे संशोधन होण्याइतके त्याकाळचे भौतिक विज्ञान - ज्याला त्या काळी 'अविद्या' म्हटले जात असे - पुढे गेले होते काय? याचे उत्तर मिळत नाही. (छांदोग्य उपनिषदात सूक्ष्मदर्शक यंत्राचा उल्लेख (इतरत्र संदर्भात) आढळला पण ते नक्की कसे होते ते कळत नाही.) परंतु कणांना रूप होते असे त्याने म्हटले आहे. कण किंवा अणू म्हणजे 'विश्वाचे उत्पत्तीपूर्वीचे सूक्ष्मरूप' असे त्याला म्हणायचे असावे असेही वाटते. अणू म्हणजे शुक्रजंतू असेही वाटते.
"अत्यंत सूक्ष्म घनगोल (परिमंडल) असे रूप असलेले कण काही न समजण्यासारख्या कारणाने (अदृष्ट) एकत्र येतात आणि त्यापासून विश्वातील पदार्थांची उत्पत्ती होते" असे काही त्याने म्हटले असावे. हे प्राथमिक विज्ञान आहे.
भारतात वैशेषिक विचारधारा पुढे चालू राहिली असती तर... वगैरे विचार मनात येतात.

१०. ब्रह्मवादाने भक्ती मार्गाची द्वाही फिरवल्याने समाजाच्या चौकसबुद्धीची आणि पर्यायाने भविष्यात होऊ शकणार्‍या भौतिक विकासाची हानी झाली. कारण बादरायणाने ब्रह्मसूत्रात किंवा शंकर-रामानुजांनी भाष्य करताना भौतिक विकासावर उघड हल्ला चढवलेला नसला तरी ब्रह्मवादिनांचा अध्याहृत संदेश 'मोक्ष'- बंधनातून मुक्ती - वासनांतून मुक्ती - इंद्रीय दमन - सुखोपभोग, विषयवासना, जिव्हालौल्य यांचा त्याग हाच आहे. असे तत्त्वज्ञान रूढ झाले म्हणजे भौतिक विकास थंडावणार हे निश्चित!
(उदा. इंटरनेटवर जाणे हे घोर पाप आहे, तसे केल्याने मनुष्य नरकात जातो/ मोक्षपदी जात नाही असे जर जगातील समस्त धर्मांनी १९८० मध्ये जाहीर केले असते आणि त्यांचे असे म्हणणे लोकांनी मान्य केले असते तर ...?)

परंतु या र्‍हासाला कोणी जबाबदार असेल तर बादरायण होता असे फारतर म्हणता येईल. शंकर-रामानुजांना दोषी धरण्यात अर्थ नाही.(समाजाची आणि पर्यावरणाची अवनती अनिर्बंधित भौतिक विकासामुळे होते हे त्यांचे मत सर्वथैव चुकीचे होते असे म्हणता येईल काय? आजच्या परिस्थितीत जागतिक अन्नटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग इ.इ. प्रश्न भौतिक विकासाचेच पैलू आहेत असे वाटते काय? -असे प्रश्न पडू शकतात.)

या विषयावर इत्यलम्!

अवांतर -
विज्ञानात चित्रे असावीत की नसावीत? याबाबतीत धनंजयांशी सहमत झालो आहे. :)
पण ते मूळ विषयाशी संबंधित नाही.

हे खंडन देतानाच त्याआधी कणादाचा अणूसिद्धांत धनंजयांनी दिला असता तर बरे झाले असते.

मांसभक्षण करणार्‍या परंतु त्याचे वैदिक समर्थ शोधणार्‍यांसाठी खूषखबर-
वाचन करत असता -
"वेदसंपन्न,सभा गाजवणारा, विद्वान मुलगा आपल्या घरी जन्माला यावा अशी इच्छा असेल तर भातात तरण्या बैलाचे कोवळे मांस कालवून त्यावर तूप घालून पुत्रेच्छा करणार्‍या जोडप्याने भक्षण करावे" - असा नुस्खा सापडला. (बृहदारण्यक उपनिषद ? :? :?)

मस्त!

कसून केलेल्या अभ्यासाची परिणती असलेला निबंध आहे हा.

हा स्वतंत्र लेख म्हणून द्यावा.

(आणि इत्यलम् म्हणू नका - या अभ्यासात कित्येक लेखांची माला दडलेली आहे!)

वैशेषिका ऐवजी न्यायसूत्रातले अणु-समर्थन एका लेखात देणार आहे - या बाबतीत माझे वाचन अगदी हळूहळू चालत आहे, आणि लेखन खूपच धडाक्यात! न्यायसूत्रातले अणुसमर्थन मुख्यत्वे वर उल्लेखलेल्या "अनवस्था" कल्पनेतून येते. ती कल्पना आधी ब्रह्मसूत्रातून वाचून मग त्याच कल्पनेचा न्यायसूत्रातील उपयोग बघण्यात काही मनोरंजन, समजण्यात सुलभता जाणवावी. लेखांचा क्रम वेगळा असावा, याबाबत तुमचे मत समजण्यासारखे आहे.

पूर्वमीमांसकांची तुम्ही जरा जास्तच खरडपट्टी केली की! कर्मकांडांचे निमित्त करून पूर्वमीमांसक "ज्ञान म्हणजे काय?" "अर्थ समजतो म्हणजे नेमके काय समजते?" अशा मूलभूत प्रश्नांवर मौलिक चर्चा करतात. या विचार त्या चर्चिलेल्या कर्मकांडाच्या पार पलिकडे ज्ञान-विज्ञानाच्या मुळाशी जातो. पूर्वमीमांसकांचा पुढे कधी अभ्यास होईल तसे त्यांच्या दर्शनातील काही गमतीजमती सांगेन.

 
^ वर