अणू आहेत की नाहीत? - अणुवादाचे प्राचीन मंडन (भाग ३)

अणुवादाच्या खंडनाच्या ऐवजी यावेळी अणुवादाचे एक प्राचीन समर्थन आहे ते देत आहे.

मागील भागांचे दुवे
अणू आहेत की नाहीत? - अणुवादाचे प्राचीन खंडन (भाग १): ब्रह्मसूत्र २.२.१२ वरचे शांकरभाष्य
अणू आहेत की नाहीत? - अणुवादाचे प्राचीन खंडन (भाग २): ब्रह्मसूत्र २.२.१३ आणि २.२.१४ वरचे शांकरभाष्य

मागच्या दोन भागांत जी खंडने दिली होती त्यांच्याशी पुढील समर्थने पडताळावीत. हा उतारा न्यायसूत्रातील वात्स्यायनभाष्याचा आहे. त्यात अणुवादाविरुद्ध दोन वेगवेगळे मुद्दे (त्यांच्या दृष्टीने) पराजित केलेले आहेत.

"काहीच नाही असे मानणारा" अणूंविरुद्ध हे मुद्दे मांडतो.

पहिला मुद्दा मागील भागांशी संबंधित नाही, पण रोचक आहे. दुसरा मुद्दा शंकरांनीही मांडलेला आहे. (न्यायसूत्रे शंकरांच्या पूर्वीची होत. त्यामुळे हा मुद्दा शंकरांचा म्हणून खंडित केलेला नाही, तर "काहीही नाही असे मानणार्‍याचा" म्हणून खंडित केलेला आहे.)

शंकरांनी भाग १ मध्ये केलेले खंडन तर्कशुद्ध होते, पण अपूर्ण होते, असे मत मी तिथे मांडले होते. त्या अपूर्णतेचा पुरेपूर फायदा येथे घेतलेला आहे. भाग २ मध्ये शंकरांनी "अनवस्थिती"चा मुद्दा उपस्थित केला होता. (म्हणजे जर अणू एकमेकांना जोडायचे असतील तर कुठलातरी संबंध कल्पावा लागतो, तो संबंध अणूशी जोडायला आणखी एक संबंध कल्पावा लागतो, ... आणि अशा तर्‍हेने तार्किक कल्पना एकमागे एक वाढतच जातात, त्यांचा अंतच होत नाही.) ही तर्कातून तर्क निघून "अनवस्थिती" होते, म्हणून अणूंचा समूह जोडला जाणारच नाही, वगैरे वगैरे.

"अनवस्थिती"चा मुद्दा घेऊन न्यायसूत्रे शंकरांचे प्रथम खंडन हाणून पाडतात. हेच शंकरांच्या प्रथम खंडनातील अपूर्णत्व, आणि त्यामुळेच त्यांचा तर्क "सिद्ध" होत नाही. कारणांपाठीमागे कारणे शोधणार्‍या सर्वांचीच अनवस्थिती होते. कणाद-नैयायिक कुठल्या एका कल्पनेपाशी येऊन "ही शेवटची तार्किक कल्पना, हेच अंतिम कारण" म्हणून थांबतात. शंकर "त्या विशिष्ट ठिकाणी थांबू शकत नाही", इतकेच खंडन देतात. ते कारण-शोधनात अनवस्थेचा उल्लेख करत नाहीत, हे आश्चर्यकारक आहे, पण त्यांच्या दृष्टीने आवश्यकही आहे : ते वेगळ्या कुठल्या ठिकाणी, वेगळ्या कुठल्या मार्गाने जातात, आणि "ही कल्पना शेवटची, हे अंतिम कारण" म्हणून थांबतात.

अनवस्थेचा न उल्लेख करण्याची त्रुटी सोडल्याने, शंकरांच्या उत्तम वादात भगदाड पडते. कारण-शृंखलेत अंत केला नाही तर सर्वांनाच अनवस्था प्रसंग येतो, हे नैयायिक सांगतात. मग कोणीच काही बोलू शकणार नाही. तर अनवस्था टाळायची असेल तर कारण-शृंखला अणूंपाशी थांबवली तर काय वाईट?

न्यायसूत्रभाष्य आणखी एक प्राचीन कोड्याचा उल्लेख करते, ते अगणित संख्यांच्या बेरजेबद्दल आहे. गणिताच्या दृष्टीने हा फार विचारवंतांना पडलेला विचार आहे. ते गणित हल्लीहल्ली १९व्या शतकात सोडले गेले.

---------------------------------------------------------------------

(अणूबद्दल) "काहीच नाही" असे मानणारा आता म्हणतो :

(सूत्र) त्याच्या आतमध्ये आकाश/अवकाश भिनले असल्याकारणाने तो उत्पन्न होणार नाही. न्या. सू. ४.२.१८
तुम्ही म्हणता तसा कुठला अवयव नसलेला, शाश्वत अणू उत्पन्नच होणार नाही. का? आकाशाने भिनल्यामुळे. आत-बाहेर अणूमध्ये आकाश=अवकाश समाविष्ट असते, म्हणजे भिनलेले असते. आकाश त्यामध्ये शिरल्यामुळे तो अणू स-अवयव असतो. स-अवयव असतो म्हणून शश्वत नसतो.

(सूत्र) नाहीतर आकाश=अवकाश सर्वत्र नाही. न्या. सू. ४.२.१९
"आकाश अणूत भिनले नाही" असे म्हणावे तर आकाश सर्वत्र नाही असे मानण्याचा प्रसंग येईल.

(टीप : आक्षेपाचे उत्तर)
(सूत्र) आत आणि बाहेर, हे कार्यद्रव्याबद्दल (बनवलेल्या वस्तूबद्दल) कुठल्यातरी अन्य कारणाच्या (बनवणार्‍या वस्तूच्या) संदर्भात असते. ही बनवलेली वस्तू नसल्यामुळे, आत-बाहेर या कल्पनाच नाहीत. न्या. सू. ४.२.२०
"आत" म्हटले की कारण (घटक) द्रव्याने झाकलेला कुठला अन्य घटक, असा अर्थ निघतो. तो अर्थ बनवलेल्या वस्तूंबाबतच संभवतो. अणू हा घटकांनी बनवला नसल्यामुळे, त्याच्या बाबतीत "आत" संभवत नाही. बनवलेली वस्तू नसल्यामुळे परमाणूच्या "आत" आणि "बाहेर" या कल्पनाच नसतात. अणूंनी बनवलेल्या वस्तूंनाच ही कल्पना लागू आहे. ज्याच्याहून लहान असे काही नाही, त्याला परमाणू म्हणतात.

(टीप : या मुद्द्याचे आणखी सखोल खंडन करता यावे, म्हणून "आकाश म्हणजे काय" याविषयी थोडक्यात माहिती देतात, आणि त्या माहितीच्या जोरावर तपशीलवार खंडन करतात. -धनंजय)
(सूत्र) ध्वनी भिनणे, संयोग होणे, यामुळे ते सर्वगामी आहे. न्या. सू. ४.२.२१
ध्वनी जिथे कुठे का उत्पन्न होवो, तो आकाशात भरून जातो, आणि त्याच्या सहार्‍याने राहातो. मने, परमाणू, त्यांच्यापासून बनलेली कार्यद्रव्ये आकाशातच निष्पन्न होतात. आकाशापासून वेगळे झालेले कुठलेही मूर्त द्रव्य उपलब्ध नाही. म्हणून "सर्वत्र नसलेले" असे आकाश असूच शकत नाही.

(सूत्र) ढवळले न जाणे, आडथळा न होणे, आणि सर्वत्र भिनलेले असणे, हे आकाशाचे गुणधर्म आहेत. न्या. सू. ४.२.२२
काठीने पाणी ढवळले जाते, आणि काठी पाण्यावर मारली तर आडथळा जाणवतो. पण आकाशातून हलणार्‍या वस्तूने ते ढवळले जात नाही, आणि त्याला आपटणार्‍या वस्तूसाठी ते आडथळा होत नाही. असे कसे? कारण त्याला अवयव नाहीत. हलणार्‍या किंवा आदळणार्‍या वस्तूला रोखत नाही, आणि ती क्रिया करणारा जो गुण आहे, त्याचा प्रतिबंध करत नाही. असे का? कारण आकाशाला "स्पर्शण्या"चा गुणधर्म नसतो. स-अवयव, स्पर्श-गुण असलेल्या पदार्थांमध्येच आडथळा जाणवतो. ते गुणधर्म नसल्यास अशी काही कल्पना केली जाऊ शकत नाही.
"अणूचे अवयव 'अणूंपेक्षाही अणू' असल्याचा प्रसंग येईल म्हणून अणू हे बनवलेले द्र्व्य असू शकत नाही."
अणू स-अवयव आहे असे म्हटले, तर अणूचे अवयव 'अणूपेक्षाही अणू' असल्याचा प्रसंग येईल. असे का? बनवणार्‍या घटकांच्या आणि बनवलेल्या वस्तूच्या आकारमानामध्ये फरक दिसल्यामुळे. म्हणून अणू हे बनवलेले कार्य-पदार्थ असू शकत नाहीत. बनवणार्‍या घटकांच्या विभाजनामुळे बनवलेल्या कार्य-वस्तू शाश्वत नसतत. आकाश भिनल्यामुळे नव्हे. मातीचे ढेकूळ भाग वेगवेळे पडल्यामुळे अशाश्वत असते, त्यात आकाशाचा समावेश असल्यामुळे नव्हे.

(पुढची दोन सूत्रे आक्षेपकर्त्याची आहेत.)
(सूत्र) मूर्त वस्तूंना आकार असतो, म्हणून त्यांना अवयव असतात. न्या. सू. ४.२.२३
मर्यादित, स्पर्शगुण असलेल्या वस्तूंनाच आकार असतो - म्हणजे त्रिकोण, चौरस, गोळा, वगैरे. अवयवांच्या रचनेने आकार प्राप्त होतो. अणू गोलाकार असतात, म्हणून त्यांना अवयव असतात.

(सूत्र) आणि संयोग झाल्यामुळेही. न्या. सू. ४.२.२४
आगल्या-मागल्या अणूंच्या मध्ये असलेला अणू त्या अलीकडच्या-पलिकडच्या अणूंच्या मध्ये आडथळा बनून असतो. त्यावरुन असे अनुमान करता येते, की तो अलीकडच्या भागाने अलीकडच्या अणूशी संपर्क करतो, आणि पलीकडच्या भागाने पलीकडच्या अणूशी संपर्क करतो. अलीकडचा भाग आणि पलीकडचा भाग म्हणजे अवयवच होत. त्याच प्रकारे सर्व दिशांनी अणूचा कशाकशाशी संपर्क येतो, ते सर्व दिशांचे भाग अवयवच.

(पुढचे न्यायसूत्र सांगण्यापूर्वीच वात्स्यायन आक्षेपाचे खंडन करणारे भाष्य सुरू करतात.)
"मूर्त वस्तूंना आकार असतो, म्हणून त्यांना अवयव असतात" याबद्दल बोललो आहोत. ते काय? विभाग करता-करता आणखी लहान भाग करता येत नाहीत, त्या ठिकाणी अणू प्राप्त होतो. अणूचे अवयव 'अणूंपेक्षाही अणू' असल्याचा प्रसंग येईल म्हणून अणू हे बनवलेले द्रव्य असू शकत नाही.

आणि पुन्हा इथे जे म्हटले आहे, की अणू संयोग करतात, तेव्हा स्पर्श-करून आडथळा बनतात, तो स्पर्श पूर्ण अणूला व्यापक नसल्यामुळे अणूचे भाग विभागता येतात, त्याच्याबद्दल हे बघा. येथे म्हटले आहे, की स्पर्श-गुण असलेला अणू अन्य स्पर्शगुण असलेल्या अणूंच्या मध्ये येत असल्यामुळे तो आडथळा बनतो, भाग असल्यमुळे नव्हे. विभाग करता-करता आणखी लहान भाग करता येत नाहीत, त्या ठिकाणी अणू प्राप्त होतो. अणूचे अवयव 'अणूंपेक्षाही अणू' असल्याचा प्रसंग येईल म्हणून अणू हे बनवलेले द्रव्य असू शकत नाही.

मूर्त वस्तूंना आकार असतो, आणि स्पर्श-गुण असलेल्या वस्तू संयोग करू शकतात, या कल्पनांना लक्ष्य बनते ते पुढील सूत्र -

(सूत्र) अनवस्था निर्माण होते, आणि अनवस्था निर्माण करणारे वाद योग्य नव्हेत, म्हणून हा अणूवादाचा प्रतिषेध नव्हे. न्या. सू. ४.२.२५
जे काही मूर्त आहे, आणि जे काही संयोगक्षम आहे, ते सर्व स-अवयव आहे असे म्हटले तर अवयव पडतच राहातील, आणि तर्काला स्थिर स्थिती कधीच येणार नाही, अशी अनवस्था उत्पन्न करणार्‍या या कुशंका आहेत. अनवस्था हीच खरोखर असेल, तरच हे दोन तर्क खरे असतील. (आणि हे ठीक नाही.) त्यामुळे अणूंना अवयव नाहीत, या गोष्टीचा वरील दोन तर्कांनी प्रतिषेध होत नाही. वस्तूचा विभाग करता-करता विभागाची प्रक्रिया संपणारच नाही, आणि प्रलयकाळच येऊ शकणार नाही, असे होईल. अनवस्था होऊ दिली, तर हरेक प्रकारच्या वस्तूचे अनंत अवयव होतील, आणि त्यांची वेगवेगळी मोजमापे मानता येणार नाहीत, त्यांचे वेगवेगळे गुरुत्व मानता येणार नाही. परमाणूंच्या अवयवांच्या विभागानंतर स-अवयव वस्तू आणि त्याच्या अवयवाचे समान मोजमाप होऊ लागेल.

---------------------------------------------------------------------

चर्चेसाठी विषय :
१. जाता जाता सूत्रांनी अणूंची व्याख्या दिली आहे :
"ज्याच्याहून लहान असे काही नाही, त्याला परमाणू म्हणतात."
"आत/बाहेर...कारण (घटक)..."
शंकरांनी कणादांची म्हणून जी अणूची व्याख्या दिली आहे, ती नैयायिकांशी मिळतीजुळती आहे का? दोन मुद्दे : १. भाग पाडण्याची परिसीमा. २. कारण (घटक) या अर्थी (आठवा: शंकरांनी कपडा-धागे हा दाखला वापरला होता.)

२. आकाश=अवकाशाचे भागच नाहीत. ते सर्वत्र असले तरीते कशाला छेद देत नाही. छेद देत नाही, म्हणून भाग पाडत नाही. न्यायसूत्र म्हणत आहे, की अणूपेक्षा लहान अवकाश आपल्या कल्पनेत येऊ शकले, म्हणजे काही अणूला छेद देऊन भाग पडत नाही. हे तुम्हाला पटते का?

३. अनवस्था उत्पन्न करणारे वाद योग्य नसतात, कारण कुठलीतरी स्थिती कधीतरी झालेली असते (उदाहरणार्थ : प्रलय). म्हणून अनवस्था हीच अव्यवस्थित आहे. अनवस्था उत्पन्न करणारा वादच ग्राह्य नाही. म्हणून कुठेतरी भाग पाडणे थांबवता येते. तोच अणू/परमाणू. हा वाद पटण्यासारखा आहे का?

४. अणूंचे भाग हा मुद्दा शंकरांनी जवळजवळ सुरू करून अनवस्थेपर्यंत नेला नाही (भाग १ मध्ये). न्यायसूत्रात शंकरांचा तो वाद अनवस्थेपाशी पोचतो हे दाखवले. शंकरांनी तो तिथपर्यंत का पोचवला नाही?

५. मात्र "समुह-भाव/संबंध/अनवस्था" हा वाद (भाग २ मधला) हा शंकरांनी अनवस्थेपर्यंत का पोचवला? न्यायसूत्रांनी अनवस्था-गामी वादांविरुद्ध प्रतिपादन केले आहे. त्या विचाराने शंकरांचा (भाग २ मधील) अनवस्था मुद्दाही निपटतो का?

६. अनवस्थित वाद तुमच्या व्यवहारात जेव्हा होतात तेव्हा तुम्ही काय करता? जर मूल "आई, अमुक का?" "मग तुझे कारण का?" "तुझ्या कारणाचे कारण का?"... अशी अनवस्था असलेली कारणे विचारत राहातात, तर तुमचे शेवटचे उत्तर काय असते?

७. "हरेक प्रकारच्या वस्तूचे अनंत अवयव होतील, तर त्यांची वेगवेगळी मोजमापे मानता येणार नाहीत, त्यांचे वेगवेगळे गुरुत्व मानता येणार नाही. परमाणूंच्या अवयवांच्या विभागानंतर स-अवयव वस्तू आणि त्याच्या अवयवाचे समान मोजमाप होऊ लागेल." हे विधान तुम्हाला पटते का? गणिताच्या दृष्टीने?

Comments

येत नाय बॉ

हे विधान तुम्हाला पटते का? गणिताच्या दृष्टीने?

आपल्याला गणितच येत नाय बॉ!

आमच्या गणिताच्या मास्तरांनाही
आमची कोणतीच उत्तरे कधी पटली नाही हो!

आमचे कायम स्वरूपी फक्त त्या उत्तरपत्रिकेवरच्या शून्याशी पटले बरं का!

आपला
गुंडोपंत अगणिती

प्रयत्न

एक कळले नाही - नैयायिक हे कणाद - नैयायिक असे मी वाचले त्यामुळे नैयायिक म्हणजे कणादवादी असे समजते. बरोबर आहे का?
दुसरे - सर्व प्रश्नांची चर्चा करायला वेळ लागेल. पण हा पहिला प्रयत्न..

१. जाता जाता सूत्रांनी अणूंची व्याख्या दिली आहे :
"ज्याच्याहून लहान असे काही नाही, त्याला परमाणू म्हणतात."
"आत/बाहेर...कारण (घटक)..."
शंकरांनी कणादांची म्हणून जी अणूची व्याख्या दिली आहे, ती नैयायिकांशी मिळतीजुळती आहे का? दोन मुद्दे : १. भाग पाडण्याची परिसीमा. २. कारण (घटक) या अर्थी (आठवा: शंकरांनी कपडा-धागे हा दाखला वापरला होता.)

नाही. "अवयवी-वस्तूचा अवयवांमध्ये विभाग जिथे थांबतो, त्याहून लहान भाग करता येत नाही ती मर्यादा पोचते, तोच परमाणू. " ही शंकरांनी कणादांची म्हणून दिलेली परमाणूची व्याख्या. यात वस्तूच्या गुणधर्मांचा धागा अणूंपर्यंत पोचत असावा असे वाटते. "ज्याच्याहून लहान असे काही नाही" ह्या व्याख्येत "ठराविक" वस्तूचे विभाजित सर्वाधिक लहान असे भाग हा मुद्दा येत नाही, ही व्याख्या त्या अर्थाने ढोबळ वाटली. पण बहुदा तेच म्हणायचे असावे.

दुसरे असे कापड हे धाग्यांपासून बनते, तसे अणूंपासून वस्तू अशी काहीशी शंकरांनी सांगितलेली कणादांची व्याख्या. त्याप्रमाणे अणू धाग्यांस्वरूप मानले तरी ते धागे एकत्र येण्यास कारण (कदाचित चैतन्यपूर्ण) पाहिजे. नैयायिक "स्पर्शगुण" हे कारण समजतात. त्यांच्या दृष्टीने चैतन्यपूर्ण प्रेरणेची काही गरज नाही असे वाटले.

तुम्ही म्हणता शंकर अनवस्थेच्या बाबतीत कारणाचा उल्लेख करत नाहीत. पण मला ते कारण शोधतात असे वाटले. संदर्भ -"सक्रिय-निष्कियपैकी कुठलेच नाही, असे मानले तर प्रवृत्ती आणि निवृत्ती "अदृष्टा"त आहेत असे मानावे लागेल. निमित्त म्हणून अदृष्ट अणूंच्या नेहमीच जवळ असेल, म्हणजे अणू नेहमीच सक्रिय असतील. अदृष्ट नेहमी जवळ नसेल तर अणू अधीच सक्रिय असणार नाही असा प्रसंग येईल."

तुम्ही मागच्या लेखात विचारलेत "कधीकधी सक्रिय आणि कधीकधी निष्क्रिय" हा पर्याय दिलेला नाही. हा पर्याय द्यायला हवा होता काय? "
मला वाटते असा पर्याय त्यांनी बाद केला आहे. संदर्भ -"अंतर्गत विरोध". आणि दिला असता तरी त्याने त्यांच्या निर्णयात फारसा फरक पडला नसता. कारण सक्रियता किंवा निष्क्रियता या त्यांच्या दृष्टीने "manifestation" किंवा दर्शनी गुण आहे, अंगीभूत नाही असे वाटले. त्यामुळे त्या महत्त्वाच्या नसून त्यामागच्या प्रेरणा काय हे शंकर शोधत आहेत असे मला वाटले.

अजून एक - माझी आधी समजण्यात जरा चूक झाली आहे. - तुमच्या आधीच्या लेखातल्या - "जे काही सक्रिय किंवा निष्क्रिय असेल ते नेहमीच असेल, नित्यच असेल, असे ते म्हणतात." याचा अर्थ मी आधी विचार केल्याप्रमाणे अणू नित्य/अनित्य असे नसून अणूंमध्ये सक्रियता किंवा निष्क्रियता ह्यापैकी एकच शक्यता गृहित धरलेली असावी असे आज वाचताना वाटले.

२. आकाश=अवकाशाचे भागच नाहीत. ते सर्वत्र असले तरीते कशाला छेद देत नाही. छेद देत नाही, म्हणून भाग पाडत नाही. न्यायसूत्र म्हणत आहे, की अणूपेक्षा लहान अवकाश आपल्या कल्पनेत येऊ शकले, म्हणजे काही अणूला छेद देऊन भाग पडत नाही. हे तुम्हाला पटते का?
भाग पडतात ते वस्तूच्या विभाजनामुळे, अवकाशामुळे नाही. पण विभाजनाचे कारण न्यायसूत्र शोधत नाही (असे आत्तापर्यंतच्या वाचनावरून मत झाले आहे).

३. अनवस्था उत्पन्न करणारे वाद योग्य नसतात, कारण कुठलीतरी स्थिती कधीतरी झालेली असते (उदाहरणार्थ : प्रलय). म्हणून अनवस्था हीच अव्यवस्थित आहे. अनवस्था उत्पन्न करणारा वादच ग्राह्य नाही. म्हणून कुठेतरी भाग पाडणे थांबवता येते. तोच अणू/परमाणू. हा वाद पटण्यासारखा आहे का?
वस्तूचे विशिष्ट आकारमान, वस्तुमानापर्यंत भाग पाडले तर तिचे मोजमाप करता येते. उद्देश असा असल्यास मापन करता येईपर्यंत भाग पाडले तरी चालतील. पण त्यापुढे जाऊन वस्तू अमूक एका पद्धतीनेच का, तर त्याच्या कारणपरंपरेत जावे लागते. त्यामुळे अनवस्था होत असली तरी कारणपरंपरा शक्य तेवढी मागे नेणे हे शात्रीय दृष्ट्या योग्यच समजले पाहिजे. "

बाकी नंतर..

चर्चा पुढे चालू

नैयायिक म्हणजे कणाद-शिष्य नव्हेत. पण अणूंच्या बाबतीत, आणि तसे पाहता अनेक बाबतीत कणाद-संप्रदायातल्या वैशेषिकांचे आणि नैयायिकांचे मत जुळते. म्हणून इथे नैयायिकांचे मत दिले आहे. नैयायिकांची पठन-पाठन परंपरा त्या मानाने अव्यवहत आहे.

या ठिकाणी केवळ अणू-विरोधी मतच न देता, प्राचीन काळातले अणू-वादी मतसुद्धा द्यायचे होते. त्यामुळे नैयायिकांचे मत दिले आहे. त्यांची मते बहुशः एकसारखी होती म्हणून वैशेषिक-नैयायिक असा जोड-वापर केलेला आहे.

प्रश्न १ मध्ये माझी अशी पृच्छा होती की शंकराचार्यांनी कणादांची (किंवा या ठिकाणी त्यांच्यासारखा विचार करणार्‍या नैयायिकांची) व्याख्या सारांशाने योग्य दिली आहे का? (ते पुढे खंडन करतील ते निराळे.)
माझ्या मते होय, शंकराचार्यांचा सारांश योग्य आहे. शंकराचार्यांनी वैशेषिक-नैयायिकांच्या मताचा विपर्यास केल्यासारखा वाटत नाही.

नाही. "अवयवी-वस्तूचा अवयवांमध्ये विभाग जिथे थांबतो, त्याहून लहान भाग करता येत नाही ती मर्यादा पोचते, तोच परमाणू. " ही शंकरांनी कणादांची म्हणून दिलेली परमाणूची व्याख्या. यात वस्तूच्या गुणधर्मांचा धागा अणूंपर्यंत पोचत असावा असे वाटते. "ज्याच्याहून लहान असे काही नाही" ह्या व्याख्येत "ठराविक" वस्तूचे विभाजित सर्वाधिक लहान असे भाग हा मुद्दा येत नाही, ही व्याख्या त्या अर्थाने ढोबळ वाटली. पण बहुदा तेच म्हणायचे असावे.

इथे नेमके का नाही ते समजले नाही. बाकीच्या प्रश्न-उत्तरांत न्यायसूत्रात अवयव-अवयवी वगैरे बरेच संदर्भ येतात. शिवाय शेवटच्या परिच्छेदात वस्तूंचे अवयव पाडण्याचे थेट वर्णन होतेच.

नैयायिक "स्पर्शगुण" हे कारण समजतात.

इथे कदाचित काही गैरसमज होतो आहे. जेव्हा अणू "आडथळा" बनतात, तो व्यत्यय स्पर्शगुणामुळे होतो. ते स्पर्शगुणामुळे एकत्र येत नाहीत. (कमीतकमी नैयायिकांचे तसे मत अस्ल्याचे दिसत नाही.)

त्यांच्या दृष्टीने चैतन्यपूर्ण प्रेरणेची काही गरज नाही असे वाटले.

हे या वरील उतार्‍यात आले नसले, तरी तुमचे म्हणणे बरोबर आहे. नैयायिकांच्या मते अणू "अदृष्टा"मुळे एकत्र येतात. हे अदृष्ट क्रियाशील असले, तरी "चैतन्य"पूर्ण नाही. "अदृष्ट" म्हणजे अमुक क्रिया करायचा, किंवा न करायचा वस्तूचा गुणधर्म. यालाच वस्तूचा "धर्म-अधर्म" किंवा "कर्म" (किंवा "पूर्वकर्म") असे म्हणतात.

तुम्ही म्हणता शंकर अनवस्थेच्या बाबतीत कारणाचा उल्लेख करत नाहीत.

नेमके असे नव्हे. माझे म्हणणे आहे, की कारणाच्या बाबतीत शंकर अनवस्थेच्या उल्लेख करत नाहीत. येथे शब्दांची आलटापालट झाल्यामुळे वेगळा अर्थ पोचला असे दिसते. (कारणाविषयी युक्तिवाद भाग १हध्ये आलेला आहे.)

तुम्ही म्हणता शंकर अनवस्थेच्या बाबतीत कारणाचा उल्लेख करत नाहीत. पण मला ते कारण शोधतात असे वाटले. संदर्भ -"सक्रिय-निष्कियपैकी कुठलेच नाही, असे मानले तर प्रवृत्ती आणि निवृत्ती "अदृष्टा"त आहेत असे मानावे लागेल. निमित्त म्हणून अदृष्ट अणूंच्या नेहमीच जवळ असेल, म्हणजे अणू नेहमीच सक्रिय असतील. अदृष्ट नेहमी जवळ नसेल तर अणू अधीच सक्रिय असणार नाही असा प्रसंग येईल."

हे २.२.१४ ब्रह्मसूत्रातल्या युक्तिवादातून आहे ना - यात अनवस्थेचा उल्लेख नाही. अनवस्थेचा मुद्दा केवळ संबंधांवर संबंधांचे इमले चढवतानाच दिसतो, म्हणजे २.२.१३ ब्रह्मसूत्राच्या भाष्यात.

तुम्ही मागच्या लेखात विचारलेत "कधीकधी सक्रिय आणि कधीकधी निष्क्रिय" हा पर्याय दिलेला नाही. हा पर्याय द्यायला हवा होता काय? " मला वाटते असा पर्याय त्यांनी बाद केला आहे. संदर्भ -"अंतर्गत विरोध". आणि दिला असता तरी त्याने त्यांच्या निर्णयात फारसा फरक पडला नसता.

हे शक्य आहे. पण एखादी वस्तू कधीकधी सक्रिय आणि कधीकधी निष्क्रिय असण्यात काय अंतर्गत विरोध आहे? म्हणजे या क्षणी माझी कार (बहुधा) निष्क्रिय आहे, पण काही तासांपूर्वी सक्रिय होती - मला तर फारसा अंतर्गत विरोध दिसत नाही. हां - आता एकाच वेळी वस्तू सक्रिय आणि निष्क्रिय असली तर तो अंतर्गत विरोध होऊ शकेल. पण तुमचा हा पुढील मुद्दा या बाबतीत महत्त्वाचा असावा -

कारण सक्रियता किंवा निष्क्रियता या त्यांच्या दृष्टीने "manifestation" किंवा दर्शनी गुण आहे, अंगीभूत नाही असे वाटले.

उलट "नित्यत्वामुळे" असे म्हटल्याने हा गुण जर असला तर नित्य=अंगीभूतच असणार असे शंकरांचे मत असावे, असे वाटते.

"जे काही सक्रिय किंवा निष्क्रिय असेल ते नेहमीच असेल, नित्यच असेल, असे ते म्हणतात." याचा अर्थ मी आधी विचार केल्याप्रमाणे अणू नित्य/अनित्य असे नसून अणूंमध्ये सक्रियता किंवा निष्क्रियता ह्यापैकी एकच शक्यता गृहित धरलेली असावी असे आज वाचताना वाटले.

बरोबर. हाच अर्थ ठीक आहे, आणि सक्रिय-निष्क्रियतेच्या संदर्भात अर्थवाही आहे.

भाग पडतात ते वस्तूच्या विभाजनामुळे, अवकाशामुळे नाही.

बरोबर आहे. न्यायसूत्र याच निष्कर्षापाशी पोचतात. पण त्यांच्या प्रतिवादीने मुद्दा उपस्थित का केला? कारण पाणी कशाततरी भिनले, (किंवा सुया त्याच्या मधून घातल्या), तर ते पाणी त्या वस्तूमधील वेगवेगळ्या भागांच्या मधून झिरपते. (पाणी खडकाच्या भेगांमध्ये भिनते, त्याच भेगांनी खडकाचे अवयव पाडले जाऊ शकतात.) "काहीच नाही" असे मानणारा म्हणतो, की आकाश अणूंमध्ये त्याच प्रकारे भिनते... इ.इ.

पण विभाजनाचे कारण न्यायसूत्र शोधत नाही (असे आत्तापर्यंतच्या वाचनावरून मत झाले आहे).

विभाजनाचे कारण म्हणजे जरा शब्द कठिण होतात. नैयायिक म्हणतात, की अवयव हे कारण आहेत. कारणे शोधण्यासाठी विचारवंत विभाजन करत असतो. (विभाजन हे विचारवंताच्या मनात होत असते, त्याला कारण जिज्ञासा.) शिवाय वस्तू सारख्या तुटत असतातच - तुटून अणूएवढे भाग झाले, की त्या स्थितीला प्रलय म्हणतात. (येथे "कारण" आणि "हेतू" शब्दाच्या अर्थांमधील फरकाची गल्लत करून गडबड होऊ शकते.)

त्यामुळे अनवस्था होत असली तरी कारणपरंपरा शक्य तेवढी मागे नेणे हे शात्रीय दृष्ट्या योग्यच समजले पाहिजे.

मला तुमचे हे म्हणणे पटते. अधिक विचार करण्यासाठी मुद्दा : "शक्य तेवढी मागे" म्हणजे "मला शक्य वाटेल तेवढी मागे" म्हणून चालेल का? की "शक्यता संपली, आता बस्स्..." असे म्हणण्यासाठी काही विज्ञानात निकष असावेत?

स्पष्टीकरण

प्रतिसाद चुकीच्या समजुतीवर आधारित असल्याने तात्पुरता काढलेला आहे.

पुढची उत्तरे

४. अणूंचे भाग हा मुद्दा शंकरांनी जवळजवळ सुरू करून अनवस्थेपर्यंत नेला नाही (भाग १ मध्ये). न्यायसूत्रात शंकरांचा तो वाद अनवस्थेपाशी पोचतो हे दाखवले. शंकरांनी तो तिथपर्यंत का पोचवला नाही?
५. मात्र "समुह-भाव/संबंध/अनवस्था" हा वाद (भाग २ मधला) हा शंकरांनी अनवस्थेपर्यंत का पोचवला? न्यायसूत्रांनी अनवस्था-गामी वादांविरुद्ध प्रतिपादन केले आहे. त्या विचाराने शंकरांचा (भाग २ मधील) अनवस्था मुद्दाही निपटतो का?

मला वाटते ह्या दोन प्रश्नांचे एकत्र उत्तर दिले पाहिजे. प्रश्न आहेत ते एक म्हणजे अणूचे भाग आणि अणूचा दुसर्‍याशी संबंध या दोन विषयांशी संबंधित. संबंधांमागे प्रेरणा असते. भाग होण्यामागेही काही एक प्रेरणा असते असे समजू. मला असे वाटते की या दोन्हीसाठी कारण एवढीच एक गोष्ट महत्त्वाची आहे (शंकरांच्या दृष्टीने), बाकी सर्व जे आहे ते दर्शनीय किंवा प्रयोग करून अनुभवता येण्याजोगे. संबंधांचे जे कारण त्यावर वरील सूत्रांमध्ये विचार झाल्याचे दिसले नाही, यावर ही टीका आहे का?

६. अनवस्थित वाद तुमच्या व्यवहारात जेव्हा होतात तेव्हा तुम्ही काय करता? जर मूल "आई, अमुक का?" "मग तुझे कारण का?" "तुझ्या कारणाचे कारण का?"... अशी अनवस्था असलेली कारणे विचारत राहातात, तर तुमचे शेवटचे उत्तर काय असते?
लहान मुलांसाठी माझे उत्तर असे की - हे इतके मला माहिती आहे, त्यापुढचे मला माहिती नाही (जसे घरातल्या पणज्यांच्या पलिकडच्या कुटुंबियांविषयी मला काही खात्रीलायक माहिती नाही तसे किंवा खूपच शक्यता आहेत असे). अशा वेळी देण्यासाठी उत्तरे नसतात/द्यायची नसतात तेव्हा एकतर गप्प बसवले जाते किंवा दुसरा माझ्या मते योग्य असा मार्ग म्हणजे जितपत उत्तरे देता येतात तितके देऊन मला त्यापुढचे माहिती नाही असे सांगता येते. मोठ्यांचे हे असे प्रश्न उत्तर द्यायला अवघड आणि "आपल्याला माहिती नाही" अशी कबुली द्यायला लाज वाटायला लावणारे. ही अशी अनवस्था असलेली गोष्ट मला वाटते गार्गी/ याज्ञवल्याची आहे. गार्गीच्या शेवटच्या प्रश्नाला उत्तर देता आले नाही किंवा द्यायचे नव्हते अशी. या लेखाच्या संदर्भात - अनवस्थितीचे वाद योग्य नाहीत असे नव्हे, तर आपल्याला आत्ता उत्तरे माहिती नाहीत एवढाच त्याचा अर्थ.

७. "हरेक प्रकारच्या वस्तूचे अनंत अवयव होतील, तर त्यांची वेगवेगळी मोजमापे मानता येणार नाहीत, त्यांचे वेगवेगळे गुरुत्व मानता येणार नाही. परमाणूंच्या अवयवांच्या विभागानंतर स-अवयव वस्तू आणि त्याच्या अवयवाचे समान मोजमाप होऊ लागेल." हे विधान तुम्हाला पटते का? गणिताच्या दृष्टीने?
सगळ्या पदार्थाचे मूळ एकच असे काही इथे धरलेले आहे का? पण मग हे चार प्रकारच्या परमाणूंविरूद्ध होईल. नीट कळले नाही (माझी त्रुटी).

नेहमीप्रमाणे विचारांना चालना देणारा लेख. अजून सुचेल तसे लिहीन.

अजूनही

अणूचे अवयव 'अणूंपेक्षाही अणू' असल्याचा प्रसंग येईल म्हणून अणू हे बनवलेले द्रव्य असू शकत नाही.

इ. स. पूर्व आठव्या शतकात हा किती मोठा विचार होता, हा विचार माझ्या मनातून अजूनही जात नाहीये.

ही वैचारिक परंपरा पुढे पुर्ण विकसित होत गेली असती तर...?

आपला
गुंडोपंत

कणांचा संयोग

सुश्रुताने अव्यक्त हे सर्व भूतांचे कारण आहे असे सांगून स्रुष्ट्योत्पत्तीची ६ कारणे सांगितली आहेत :

स्वभावमीश्वरं कालं यदृच्छां नियतिं तथा / परिणामं च मन्यन्ते प्रकृतिं पृथुदर्शिनः ( शारीर स्थान अध्याय १/१५ )

स्वभाव -ईश्वर -काल- यदृच्छा - नियति -परिणाम

कणांचा संयोग हा उपरोक्त कारणांनी होऊ शकतो काय असा विचार आला.

 
^ वर