अणू आहेत की नाहीत? - अणुवादाचे प्राचीन खंडन (भाग १)

शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकात आपण शिकलो की प्राचीन काळात भारतातले कणाद ऋषी अणु-वादी होते. त्यावेळी अशी शंका माझ्या मनात आली, की मग त्यानंतर त्या ज्ञानाची प्रगती का नाही झाली? त्या अणुवादाचे सांगोपांग खंडन झाले, हेच त्याचे कारण. खंडन करणार्‍यांपैकी प्रखर बुद्धिमत्तेचे शंकराचार्य हे अग्रणी होते.

प्राचीन अणुवादाचे स्वरूप काय होते? त्याचे आद्यशंकराचार्यांनी कसे खंडन केले? ते खंडन आज आपल्याला पटण्यासारखे आहे का? हे सर्व विचार मनात येऊ शकतात. म्हणून मूळ स्रोताकडे जाऊन बघणे उपयोगी ठरावे. ब्रह्मसूत्रांच्या शांकरभाष्यात हे विवेचन सापडते. दुसर्‍या अध्यायातली काही सूत्रे, आणि त्यावरील भाष्य या कार्याला वाहिलेली आहेत. याला "परमाणु-जगद्-अकारणत्व-अधिकरण", म्हणजे "परमाणू हे जगाचे कारण नसल्याचे प्रकरण" असे म्हणतात (ब्रह्मसूत्रभाष्य २.२.१२-२.२.१७). प्राचीन विचारवंतांचे वादविवाद आणि विचार अभ्यास करण्यासारखे असतात. केवळ "प्राचीन" म्हणून त्यांचा नवीन विचारांशी घटस्फोट होऊ नये. शिवाय प्राचीन विचारांच्या आह्वानाला पुरला, तरच नवीन विचार स्वीकार करावा. या कारणासाठी प्राचीन अणुवाद, आणि त्याचे खंडन आजही विचारात घेण्यालायक ठरावे.

यात जुन्या काळच्या वादांचे एक चांगले वैशिष्ट्य सांगितल्यावाचून राहात नाही - सुरुवातीला शंकराचार्य थोडक्यात कणादांचे मत थोडेफार पटेल अशा पद्धतीने देतात, आणि मगच त्याचे खंडन करतात. दुसर्‍याचे म्हणणे निरर्थक आहे, अशा रीतीने चर्चा सुरू करत नाहीत. (तसा शेवट करतात ते महत्त्वाचे नाही, कारण त्यांच्या मते त्यांनी उत्तम वाद मांडला आहे, पूर्ण खंडन झाले आहे.) दुसर्‍याचे म्हणणे जवळजवळ पटेल असे सुरुवातीला मांडण्याची ही स्तुत्य पद्धत अंगीकारली तर आजचेही अनेक वादविवाद अधिक प्रगतिशील होऊ शकतील.

त्या अधिकरणाचा भावानुवाद येथे देत आहे.

-----------------------------------------
(२.२.१२)
आता परमाणु-कारण-वादाचे निराकरण होईल. तो वाद अशा प्रकारे मांडतात - कपडा वगैरे वस्तूंचे भाग असतात, त्या वस्तू स-अवयव असतात. त्या वस्तू मुळ अवयव असलेल्या धाग्यांनी वगैरे सुरू होतात. धागे वगैरे मूळ अवयव जोडून मग वस्तू तयार होते. त्याच प्रमाणे सामान्यनियम करता येतो. जे जे काही स-अवयव दिसते, ते ते त्याच्या त्याच्या संबंधित भागांनी सुरू होते, आणि ते भाग जोडून बनते. अवयवी-वस्तूचा अवयवांमध्ये विभाग जिथे थांबतो, त्याहून लहान भाग करता येत नाही ती मर्यादा पोचते, तोच परमाणू. हा जगातले सर्वकाही - डोंगर, समुद्र - स-अवयव आहे, आणि त्यामुळे त्याला सुरुवात आहे, आणि शेवट आहे. कारण नसले तर कार्य होऊ शकत नाही, म्हणून परमाणू हे जगाचे कारण आहे, असा कणाद-संप्रदायाचा अभिप्राय आहे. महाभूतांपैकी चार भूते स-अवयव आहेत - पृथ्वी, आप (पाणी), तेज, वायू. त्यामुळे चार प्रकारच्या परमाणूंची कल्पना होते. ती भूते विभागत-विभागत जातात, आणि परमाणूंपर्यंत विभाग होतो, तोच प्रलयकाळ. तेव्हा सृष्टिकाळात वायूच्या अणूंमध्ये अदृष्टामुळे कर्म उत्पन्न होते. ते कर्म ज्या अणूत आहे त्याचा दुसर्‍या अणूशी संयोग होतो. अशा प्रकारे हे सर्व जग अणूंपासून संभव होते. धाग्यांपासून जसे कापड बनते, त्याच प्रमाणे अणूंचे जे काही स्वरूप आहे, त्यापासून द्वि-अणुकांचे स्वरूप संभवते, असे कणाद-संप्रदायातले लोक मानतात.

त्याबाबत असे म्हणतो - अणू जेव्हा विभागलेल्या अवस्थेत असतात, तेव्हा अणूंचा संयोग कर्मामुळे होतो, असे जाणले पाहिजे. कर्माने युक्त झालेले धागे एकत्र आलेले दिसतात. कर्म हे कशाचेतरी कार्य आहे, त्याचे निमित्त म्हणून काहीतरी जाणले पाहिजे. असे जाणले नाही, तर निमित्त नसल्यामुळे अणूंमध्ये पहिले कर्म होणार नाही. असे जाणले, समजा, आणि जसे निमित्त नेहमी दिसते तसे, म्हणजे प्रयत्न किंवा आघात-टक्कर ते निमित्त मानले म्हणा, तर ते असंभव आहेत, म्हणून अणूंमध्ये पहिले कर्म उत्पन्न होणार नाही. त्या अवस्थेत शरीरच नाही, तर आत्म्याचा गुण असलेला "प्रयत्न" संभव नाही. शरिरात मन असते, त्या मनाचा आत्म्याशी संयोग होतो, आणि आत्म्याच्या गुणाने प्रयत्न जन्मतो. याचमुळे टक्कर हे सुद्धा दृष्ट निमित्त नकारावे लागते. कारण या सर्व गोष्टी सृष्टीनंतरच्या आहेत, आणि त्या पहिल्या कर्माचे निमित्त होऊ शकत नाहीत. आता असे मानले की अदृष्ट हे कर्माचे निमित्त आहे, तर विचारू की हे अदृष्ट आत्म्याशी संबंधित आहे, की अणूंशी? दोन्ही पर्यायांत अदृष्ट हे अचेतन असल्यामुळे अणूंमध्ये कर्माचे निमित्त असू शकत नाही. जे अचेतन आहे, ते चेतनेचे अधिष्ठान असल्याशिवाय स्वतंत्र काही करू शकत नाही आणि काही करवू शकत नाही हे सांख्यांचे खंडन करताना सांगितलेच आहे. त्या अवस्थेत आत्मा उत्पन्न झालेला नाही, त्यामुळे आत्म्याचे चैतन्य नाही. जर असे म्हटले की अदृष्ट आत्म्याशी संबंधित असते, तरीही ते अणूंच्या कर्माचे निमित्त होऊ शकत नाही, कारण त्याचा अणूंशी संबंध येत नाही. अदृष्टाने युक्त आत्म-पुरुषाचा अणूंशी संबंध येतो, असे जर म्हटले तर तसा संबंध नेहमीच येणार, आणि कर्मही नेहमीच होणार, त्याला काहीच आडथळा नाही. अशा प्रकारे कर्माचे कुठले ठराविक निमित्त नसले तर अणूंमध्ये पहिले कर्म होणार नाही. कर्म झाले नाही तर त्यायोगे होणारा संयोग होणार नाही. संयोग झाला नाही तर त्यामुळे होणारी द्वि-अणुके होणार नाहीत.

अणूंचा दुसर्‍या अणूंशी संबंध होतो तो पूर्ण अणूशी होतो की एका भागाशी होतो? जर पूर्ण अणूशी सर्वात्मक संबंध होत असेल तर जोडून वाढ होणार नाही, आणि अणुमात्रच राहील, हे दिसते त्याच्या विपरीत आहे. अणूच्या एका भागाशीच दुसर्‍या अणूचा संबंध येतो असे म्हटले, तर अणूला भाग असतात असे म्हणावे लागेल. परमाणूंना भाग केवळ आपल्या कल्पनेत आहेत असेच म्हणू. तर या केवळ कल्पित भागांशी खर्‍याखरच्या "संयोग" वस्तूचे कार्य होऊ शकणार नाही. संयोग होऊ शकला नाही तर द्वि-अणुके ही घडवलेली द्र्व्ये उत्पन्न होणार नाहीत. जसे सुरुवातीच्या सृष्टीच्या काळात निमित्त नसल्यामुळे संयोगकर्म संभवत नाही, त्याच प्रकारे, महाप्रलयाच्या वेळेला निमित्त नसल्यामुळे अणूंचा विभाग होण्याचे कर्म संभवत नाही. त्याही ठिकाणी कुठलेही नियत किंवा अनियत दृष्ट असत नाही. अदृष्टही भोग घेता यावा यासाठी आहे, प्रलय व्हावा याकरिता नाही - निमित्त नसल्यामुळे संयोग होण्यासाठी किंवा वियोग होण्यासाठी अणूंचे कर्म संभवत नाही. संयोग आणि वियोग संभवणार नाही म्हणून सृष्टी आणि प्रलयही होऊ शकणार नाही. म्हणून परमाणू-कारण-वाद चालणार नाही.
(क्रमशः)
-----------
या लेखाबद्दल करण्यासारखी चर्चा ही :
१. कणादांनी अणू असल्याचे मत मांडले आहे. ते मत पटण्यासारखे आहे का?
२. शंकराचार्यांनी अणू नाहीत म्हणून खंडन दिले आहे. ते तुम्हाला तार्किकदृष्ट्या पटते का?
३. शक्यतोवर प्राचीन ग्रंथ वाचताना आपण त्याच्यानंतर लागलेले शोध मनात आणत नाही - मन त्या दृष्टीने स्वच्छ केले तर कणाद आणि शंकर यांच्यापैकी कोणाचे पटते?
४. आता आपल्याला जे काही शाळेत भौतिक-रसायनशास्त्र शिकवले आहे, ते माहीत आहे, असे समजा. कणादांच्या आणि शंकरांच्या विचारांचा आपण काय अर्थ लावू शकतो?

(शंकराचार्यांनी अणू नसल्याची अन्य प्रकारची खंडने सूत्र १३-१७ च्या भाष्यात केली आहेत. ती अनियतकाळाने क्रमशः देत राहीन.)

Comments

थक्क झालो.

धनंजयाच्या वाचनाचा आवाका पाहून थक्क झालो. (मराठीकरणाबद्दल धनंजयाचे असंख्य धन्यवाद.)
पण त्याहीपेक्षा जास्त थक्क अशासाठी झालो की कोणतेही 'आधुनिक' साधने उपलब्ध नसताना केवळ तर्काच्या जोरावर कणादांनी अणूच्या अस्तित्वाचे प्रमेय मांडले आणि त्याहीपेक्षा ते प्रमेय मूलभूत रितीने समजावून घेऊन शंकरांनी त्याचे खंडन केले. धन्य आहे!

१. कणादांनी अणू असल्याचे मत मांडले आहे. ते मत पटण्यासारखे आहे का?
- प्रत्येक वस्तू लहान अवयवांनी बनलेली आहे. त्या अवयवाचेही आणखी लहान अवयव बनतात. असे होत होत शेवटी सर्वात लहान अवयव असेल तो एखाद्या सूक्ष्म कणासारखा असेल हे बालबुद्धीलाही पटण्यासारखे आहे.

२. शंकराचार्यांनी अणू नाहीत म्हणून खंडन दिले आहे. ते तुम्हाला तार्किकदृष्ट्या पटते का?
- यापुढील इतर खंडने वाचायला हवीत. येथे दिलेले खंडन दोन प्रकारे आहे -
अ.अणूंचा संयोग कोणत्या कर्माने होतो? असे कर्म जडत्वामुळे आपोआप होणे अशक्य आहे. परिणामतयः अणूंचा संयोग अशक्य आहे. म्हणून अणू नाहीत.
ब. अणूंचा संयोग होतो हे एकवेळ मानले तर तो पूर्ण संयोग होतो की फक्त अवयवांचा? पूर्ण संयोग झाला तर वस्तूची वाढ होणार नाही आणि केवळ अवयवांचा संयोग होतो म्हटले तर अणूंनाही अवयव असतात त्यामुळे तो मूलभूत नाही. त्याचेही अवयव आहेत. पर्यायाने मुळात अणूच नाही.

हे खंडन 'आज' पटत नसले तरी त्याकाळात बुद्धीमत्तेच्या आणि अभ्यासाच्या अत्त्युच्च टोकाशी बनवलेले हे विचार खोडून काढणे फारच अवघड होते.

३. शक्यतोवर प्राचीन ग्रंथ वाचताना आपण त्याच्यानंतर लागलेले शोध मनात आणत नाही - मन त्या दृष्टीने स्वच्छ केले तर कणाद आणि शंकर यांच्यापैकी कोणाचे पटते?
- एखादा विचार एखाद्या व्यक्तीला 'पटण्या'मागे अत्यंत गुंतागुंतीची मानसिक प्रक्रिया असते. त्यात त्या व्यक्तीचे तात्कालिक,सामाजिक, भौगोलिक, वैचारिक इ.इ. स्थान या सर्व बाबी महत्वाच्या ठरतात.
शंकरांच्या काळात मी असतो आणि प्रखर कणदवादी नसतो तर मला शंकरांचे मत पटले असते. या उलट कणादांच्या काळात मी असतो आणि .... वगैरे शक्यता संभवतात.

४. आता आपल्याला जे काही शाळेत भौतिक-रसायनशास्त्र शिकवले आहे, ते माहीत आहे, असे समजा. कणादांच्या आणि शंकरांच्या विचारांचा आपण काय अर्थ लावू शकतो?
- आजच्या भाषेत सांगायचे तर अणू हा विश्वाचा मूलभूत घटक नसून ऊर्जा (चैतन्य) हा आहे. या ऊर्जेचे नेमके स्वरूप काय आहे? , तिच्यापासून वस्तुमान कसे गोचर होते? असे प्रश्न आजही पडतात. हेच प्रश्न शंकरांना पडले होते पण त्यांची उत्तरे त्यांना मिळाली नाहीत.

अवांतर -
खरेतर या खंडनाचे खंडन करणारा शंकरांच्या तोडीचा कणादशिष्य हवा होता. त्याने 'हा संयोग निसर्गतयः कसा होतो? आणि अणुचेही अवयव असण्याची शक्यता कशी आहे ?' या विषयांवर आपले विचार केंद्रित केले असते आणि कदाचित त्याला त्याचे उत्तर मिळाले असते.
शिवाय अध्यात्म आणि विज्ञान यांमधली गल्लत म्हणा किंवा परस्परपूरकता म्हणा, जास्त प्रकर्षाने पुढे आली असती आणि कदाचित आजच्या विज्ञानाचे स्वरूप काही वेगळेच दिसले असते. (भौतिक आणि आध्यात्मिक विज्ञानाची सांगड घातली गेल्याने विज्ञान हा विषय 'चैतन्य' आणि 'पर्यावरण' यांच्या अधिक जवळ गेला असता.)

ता.क. : पुढचे या विषयावरील अनियतकालिक लेखन लवकर यावे.

उत्तम लेख

आमच्या सारख्या जन सामान्यांना अशा विषयात् ऋची असली तरी गती नाही.
त्यामुळे मत नोंदवु इच्छित नाही.
बाकी लेख भन्नाट आहे.
पुढचे भाग वाचण्याची उत्सुकता आहे.

जन सामान्यांचे मन

वाहवा

धनंजय,
आपले अतिशय कौतूक वाटते. आपल्या बद्दल वरील प्रतिसादात विसुनाना म्हणतात त्याच्याशी सहमत आहे.

विसुनाना यांच्या प्रतिसादामुळे विषय समजण्यास अजून सोपा झाला. त्यांचे आभार.

१. कणादांनी अणू असल्याचे मत मांडले आहे. ते मत पटण्यासारखे आहे का?
हो. खरेतर तो योग्य दिशेने केलेला (पण अर्धवट सोडलेला?) तर्क आहे. तो पटण्यासारखाच आहे.

२. शंकराचार्यांनी अणू नाहीत म्हणून खंडन दिले आहे. ते तुम्हाला तार्किकदृष्ट्या पटते का?
अणू नाहित असे शंकराचार्यांचे मत होते की अणू हे विश्वाचे अंतीम सूक्ष्म घटक नाहीत असे त्यांचे मत होते ते मला अजून स्पष्ट झाले नाही. कृपया यावर प्रकाश टाकावा ही विनंती.

३. शक्यतोवर प्राचीन ग्रंथ वाचताना आपण त्याच्यानंतर लागलेले शोध मनात आणत नाही - मन त्या दृष्टीने स्वच्छ केले तर कणाद आणि शंकर यांच्यापैकी कोणाचे पटते?
त्यावर विचार करण्याइतका बुद्धीचा आवाका नाही.
पण तदेजती नन्नैजती अश्या बह्मापासून आजच्या माझ्या जड देहापर्यंत असलेल्या अनेक दृष्य अदृष्य वस्तूंमध्ये एका पायरीवर मी देव अथवा देह नसलेल्या इतर कोणाचे अस्त्तित्व गृहित धरतो तसे उर्जा आणि जड वस्तू यांमध्ये अणूचे अस्तित्व गृहित धरायला मला अडचण पडत नाही. (म्हणजे कौल शंकराचार्यांकडेच जातो. पण अणू चे अस्तित्व मान्य. तो अंतीम घटक हे अमान्य.)

४. आता आपल्याला जे काही शाळेत भौतिक-रसायनशास्त्र शिकवले आहे, ते माहीत आहे, असे समजा. कणादांच्या आणि शंकरांच्या विचारांचा आपण काय अर्थ लावू शकतो?
वर जे लिहिले आहे तसेच.

चर्चा विषय, अनुवाद उपक्रम फार जबरदस्त. पुढील भागांची वाट पाहत आहे.
-- (जड) लिखाळ.

वाहवा + १

लिखाळ तसेच इतरांच्या प्रतिसादाशी सहमत. कौतुकास्पद लेख आवडला. त्याला उत्तर देण्यासाठी १-२ दा वाचावा लागेल आणि सावकाशीने द्यावे लागेल.

फक्त लेखासंदर्भात काही प्रश्नः (कृपया हे माहीती साठी विचारत आहे, कुठल्याही बा़जूने लिहिण्याच्या उद्देशाने नाही)

  1. आपण उल्लेख केल्याप्रमाणे (आदी) शंकराचार्य कणादांचा उल्लेख करतात का?
  2. कणादांनी जे काही ज्ञानोत्पत्ती केली ती भौतिक विषयासंदर्भात होती. श़ंकराचार्यांचे जीवनध्येय हे अध्यात्मिक अर्थातच भौतिकविश्वाशी निगडीत नव्हते. ह्याचा अर्थ, ते (शंकराचार्य) जे काही म्हणत आहेत ते कणादांच्या संकल्पनेचा अध्यात्मातील संदर्भ या संदर्भात नसेल ना?
  3. असल्यास मग त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अणू संकल्पना आणि अध्यात्मिक/पारमार्थिक विश्व यांचा संबंध अथवा संबंधाचा अभाव हा कणादांच्या विरुद्ध नसावा तर कणादांचे भौतिक प्रमेय हे पारमार्थिक क्षेत्रात वापरण्यासाठी असावा.
  4. थोडक्यात एकाची ऍपल्स आणि दुसर्‍याची ऑरेंजेस... आणि आपण केवळ त्या दोहोत बीज हा शब्द येणार म्हणून ऍपल्स ची तुलना ऑरेंजेसशी करणार, असे तर नाही ना?

हे केवळ प्रश्न आहेत. मला हा लेख लिहीण्याआधी आपण केलेल्या "घरच्या अभ्यासाबद्दल" खात्री आहे तरी देखील विषय आणि अनुवाद आवडल्याने विचारत आहे, इतकेच!

काही उत्तरे

1. आपण उल्लेख केल्याप्रमाणे (आदी) शंकराचार्य कणादांचा उल्लेख करतात का?
होय. वरील परिच्छेद भावानुवाद आहे, पण बहुतेक शब्दशः अनुवाद आहे. लांब वाक्ये तोडली आहेत त्यामुळे कधीकधी शब्दशः ठेवता आला नाही.

2. कणादांनी जे काही ज्ञानोत्पत्ती केली ती भौतिक विषयासंदर्भात होती. श़ंकराचार्यांचे जीवनध्येय हे अध्यात्मिक अर्थातच भौतिकविश्वाशी निगडीत नव्हते. ह्याचा अर्थ, ते (शंकराचार्य) जे काही म्हणत आहेत ते कणादांच्या संकल्पनेचा अध्यात्मातील संदर्भ या संदर्भात नसेल ना?
आता शंकराचार्यच म्हणत आहेत की त्यांचे आणि कणादांशी त्यांचा काही संवाद आहे. शंकराचार्यांचे मत भौतिक किंवा आध्यात्मिक संदर्भात आहे ते त्यांच्या शब्दांवरूनच आपण ठरवावे. मला असे दिसते आहे, की शंकराचार्य विश्वाचे भौतिक आणि आध्यात्मिक असे दोन विभाग करत नाहीत. असे विभाग करण्याची पद्धत पुढच्या काळाची असावी.

3. असल्यास मग त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अणू संकल्पना आणि अध्यात्मिक/पारमार्थिक विश्व यांचा संबंध अथवा संबंधाचा अभाव हा कणादांच्या विरुद्ध नसावा तर कणादांचे भौतिक प्रमेय हे पारमार्थिक क्षेत्रात वापरण्यासाठी असावा.
भाष्य वाचताना तसे दिसत नाही. एक अणू दुसर्‍याला जोडताना संपूर्णच जोडला जातो, की एका भागाला जोडला जातो, यावरून दाखवलेला तर्कदोष बघावा. शंकराचार्य भौतिक किंवा पारमार्थिक असा फरक कुठेच सांगत नाही. पण तुमच्या मते हा तर्कदोष भौतिक आहे की पारमार्थिक?

4. थोडक्यात एकाची ऍपल्स आणि दुसर्‍याची ऑरेंजेस... आणि आपण केवळ त्या दोहोत बीज हा शब्द येणार म्हणून ऍपल्स ची तुलना ऑरेंजेसशी करणार, असे तर नाही ना?
बहुतेक ऍपल-ऑरेंजची तुलना नसावी. तसे असते तर शंकराचार्यांनी तसे सांगितले असते. तर्कशास्त्राच्या बाबतीत ते बहुतेक फार मोठ्या चुका करणार नाहीत. सुरुवातीला शंकराचार्यांनीच कणादांचे मत सारांशाने सांगितले आहे. त्याच संदर्भात ते खंडन करत आहेत. त्यामुळे त्या संदर्भात ऍपल-ऑरेंजची तुलना नाही असे शंकराचार्यच म्हणतात, असे आपण मानू शकतो.

उत्तम लेख

१. कणादांनी अणू असल्याचे मत मांडले आहे. ते मत पटण्यासारखे आहे का?

विसुनानांनी म्हटल्याप्रमाणे माझ्या बालबुद्धीला पटते. ;-) परंतु चारच स-अवयव भूते का? पाचवे आकाशही स-अवयव नाही का अशी शंका वाटल्याने याबाबत आताच http:/ मदत घेतली.

२. शंकराचार्यांनी अणू नाहीत म्हणून खंडन दिले आहे. ते तुम्हाला तार्किकदृष्ट्या पटते का?

याभागात तरी शंकराचार्यांनी अणू नाहीत असे म्हटलेले आढळले नाही. तेव्हा पुढील भाग वाचण्यास उत्सुक.

३. शक्यतोवर प्राचीन ग्रंथ वाचताना आपण त्याच्यानंतर लागलेले शोध मनात आणत नाही - मन त्या दृष्टीने स्वच्छ केले तर कणाद आणि शंकर यांच्यापैकी कोणाचे पटते?

हे आताच सांगणे कठिण वाटते. परंतु हा मूलभूत प्रश्न असावा. बरेचदा, श्रेष्ठींनी सांगितलेली एखादी गोष्ट प्रमाण मानायची ठरवली की आपण विचारांच्या आणि प्रगतीच्या गाडीला खीळ घालतो असे वाटते.

४. आता आपल्याला जे काही शाळेत भौतिक-रसायनशास्त्र शिकवले आहे, ते माहीत आहे, असे समजा. कणादांच्या आणि शंकरांच्या विचारांचा आपण काय अर्थ लावू शकतो?

शाळेतील भौतिक रसायनशास्त्रावरून कणाद आणि शंकरांच्या विचारांचा अर्थ लावणे तसे बर्‍यापैकी कठीण काम वाटते. ते धनंजयच करू जाणे.
:-)

"अणू नाहीत" असे थोड्या तिरकस रीतीने म्हटले आहे

हे शेवटच्या परिच्छेदात येते.

अणू जर एकमेकांच्या एकाच भागाला जोडले जात असतील, तर अणूंना भाग असतात असे मानावे लागेल (म्हणजे भाग केले जाऊ शकत नाहीत असे कणाद-संप्रदाय कसे म्हणू शकतो?).
जर अणूंचे भाग नुसते कल्पनेतच आहे (खरे नाहीत) असे कणाद-संप्रदायाने मानले तर या कल्पित संबंधाने खरीखरची द्वि-अणुके असू शकत नाहीत.
म्हणजे कणाद संप्रदायाचे कुठल्याच प्रकारे शिजत नाही. अणूंना भाग असतात असे तरी मानावे लागते - मग ते भागाकाराचे शेवटचा टप्पा कसे? नाहीतर भाग नाहीत असे मानावे, तर द्वि-अणुके तयारच होऊ शकत नाहीत, मोठ्या वस्तू तयारच होऊ शकत नाहीत - म्हणजे पुन्हा त्रांगडे.

अशा प्रकारे कणाद म्हणतात तसे अणू असूच शकत नाहीत. (असे शंकराचार्य म्हणतात.)

धन्यवाद,

भाषांतराबद्दल धन्यवाद. संस्कृत येत नसल्याने कुठचे ज्ञान लुप्त झाले एवढा विचार केल्यास संस्कृत का शिकावे असा प्रश्न पडणार नाही :-)

माझी मते -

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कारण नसले तर कार्य होऊ शकत नाही (हे तर भौतिकशास्त्रातील बल (फोर्स) आणि कार्य (वर्क) या संकल्पनांप्रमाणे वाटले), अणूचे भाग आहेत का, संयोग पावताना अणूचा पूर्ण भाग संयोगित होतो की अंशतः असे प्रश्न पडणे आणि त्यांची उत्तरे केवळ विचारांच्या बळावर शोधणे मोठे काम आहे. ते कणाद किंवा शंकर यांनी त्या काळात कसे केले असेल?

१. कणादांनी अणू असल्याचे मत मांडले आहे. ते मत पटण्यासारखे आहे का?
हो, पटते. एखाद्या वस्तूचे छोटे भाग मिळून ती वस्तू होते हे पटण्यासारखे आहे.

२. शंकराचार्यांनी अणू नाहीत म्हणून खंडन दिले आहे. ते तुम्हाला तार्किकदृष्ट्या पटते का?
हम्म! अणू नाहीत असे म्हटले आहे असे वाटले नाही. जगाचे कारण अणू नाहीत असे म्हटले आहे असे वाटते.
अणू एकत्र येण्याच्या चैतन्यविरहित कारणाने/ क्रियेने जगाची उत्पत्ती होते, हे शंकरांना खोडून काढायचे आहे असे वाटले. सॄष्टीची निर्मिती किंवा प्रलय ह्या दोन्हीसाठी "निमित्त" जे काही आहे ते अचेतन असू शकत नाही असे त्यांना म्हणायचे आहे. ( ते म्हणतात - "जे अचेतन आहे, ते चेतनेचे अधिष्ठान असल्याशिवाय स्वतंत्र काही करू शकत नाही आणि काही करवू शकत नाही हे सांख्यांचे खंडन करताना सांगितलेच आहे". अवांतर प्रश्नः -हे प्रमेय कसे सिद्ध केले आहे?)

३. शक्यतोवर प्राचीन ग्रंथ वाचताना आपण त्याच्यानंतर लागलेले शोध मनात आणत नाही - मन त्या दृष्टीने स्वच्छ केले तर कणाद आणि शंकर यांच्यापैकी कोणाचे पटते?
मन स्वच्छ करता आले नाही :-)

४. आता आपल्याला जे काही शाळेत भौतिक-रसायनशास्त्र शिकवले आहे, ते माहीत आहे, असे समजा. कणादांच्या आणि शंकरांच्या विचारांचा आपण काय अर्थ लावू शकतो?

असा अर्थ लावू शकतो की कणाद परमाणू हा लघुत्तम घटक आणि जगाची उपपत्ती त्यातून झाली असे मानत होते. तर शंकर हे परमाणू हे जगाचे कारण नाही असे मानत होते. बाकी विसूनानांची याबाबतीत वाक्यरचना आहे ती पटली.

बाप रे !!

डॉ. धनंजय,
लेख चाळला. लेख समजून घेण्यासाठी दोन-तीनदा तरी वाचावाच लागेल.
वरील प्रतिसादांवरुन भावानुवादाचा थोडा थोडा अंदाज येत आहे, ही आमची प्रगती.

आपल्या अभ्यासाला नमस्कार आहे राव !!!

"अणुरेणु या थोकडा, तुका आकाशाएवढा" - संत तुकाराम

प्रोटेस्टंट - ऑर्थोडॉक्स

१. कणादांनी अणू असल्याचे मत मांडले आहे. ते मत पटण्यासारखे आहे का?

हो.

२. शंकराचार्यांनी अणू नाहीत म्हणून खंडन दिले आहे. ते तुम्हाला तार्किकदृष्ट्या पटते का?

नाही पटले, कारण हे वाक्य -अवस्थेत शरीरच नाही, तर आत्म्याचा गुण असलेला "प्रयत्न" संभव नाही.
असेच मानुन चाललो तर सजिवांच्या हालचाली सोडुन बाकी उर्वरीत चराचरातल्या सगळ्या हालचाली कश्या जस्टिफाय करणार ?
विरुद्धपक्षी ज्यामुळे उर्वरीत चराचरातल्या सगळ्या हालचाली कश्या जस्टिफाय होतात -- त्यामुळे तत्कालिन अणुवाद सिद्ध होतो.

३. शक्यतोवर प्राचीन ग्रंथ वाचताना आपण त्याच्यानंतर लागलेले शोध मनात आणत नाही - मन त्या दृष्टीने स्वच्छ केले तर कणाद आणि शंकर यांच्यापैकी कोणाचे पटते?

माझी विचारसरणी आधीसारखी आध्यात्मिक (किंवा आध्यात्मातल्या फंड्यांमुळे भारावुन जाणारी) असली असती तर कदाचित शंकराचार्यांचे म्हणने पटले असते. सद्य स्थितीत आजचे शोध विसरुनही कणांदाचेच म्हणने सशर्त पटते. शर्त अशी की अणु हाच अंतिम अन अविभाज्य घटक असे कणांदांचे म्हणने नसावे.

४. आता आपल्याला जे काही शाळेत भौतिक-रसायनशास्त्र शिकवले आहे, ते माहीत आहे, असे समजा. कणादांच्या आणि शंकरांच्या विचारांचा आपण काय अर्थ लावू शकतो?

कणाद प्रोटेस्टंट वाटतात अन शंकराचार्य बुद्धीमान ऑर्थोडॉक्स पोप.
तरीही शंकराचार्यांच्या लिखाणात कोणताही धार्मिक अभिनिवेष जाणवला नाही फक्त त्यांचा अध्यात्मावर प्रगाढ विश्वास असावा !

(चु.भु.द्या घ्या ;) )

पुढे चालू-

खरेतर या खंडनाचे खंडन करणारा शंकरांच्या तोडीचा कणादशिष्य हवा होता. त्याने 'हा संयोग निसर्गतयः कसा होतो? आणि अणुचेही अवयव असण्याची शक्यता कशी आहे ?' या विषयांवर आपले विचार केंद्रित केले असते आणि कदाचित त्याला त्याचे उत्तर मिळाले असते.
शिवाय अध्यात्म आणि विज्ञान यांमधली गल्लत म्हणा किंवा परस्परपूरकता म्हणा, जास्त प्रकर्षाने पुढे आली असती आणि कदाचित आजच्या विज्ञानाचे स्वरूप काही वेगळेच दिसले असते. (भौतिक आणि आध्यात्मिक विज्ञानाची सांगड घातली गेल्याने विज्ञान हा विषय 'चैतन्य' आणि 'पर्यावरण' यांच्या अधिक जवळ गेला असता.)

-विसुनाना(दस्तुरखुद्द)

अणू नाहित असे शंकराचार्यांचे मत होते की अणू हे विश्वाचे अंतीम सूक्ष्म घटक नाहीत असे त्यांचे मत होते ते मला अजून स्पष्ट झाले नाही. पण तदेजती नन्नैजती अश्या बह्मापासून आजच्या माझ्या जड देहापर्यंत असलेल्या अनेक दृष्य अदृष्य वस्तूंमध्ये एका पायरीवर मी देव अथवा देह नसलेल्या इतर कोणाचे अस्त्तित्व गृहित धरतो तसे उर्जा आणि जड वस्तू यांमध्ये अणूचे अस्तित्व गृहित धरायला मला अडचण पडत नाही. (म्हणजे कौल शंकराचार्यांकडेच जातो. पण अणू चे अस्तित्व मान्य. तो अंतीम घटक हे अमान्य.)

-लिखाळ

बरेचदा, श्रेष्ठींनी सांगितलेली एखादी गोष्ट प्रमाण मानायची ठरवली की आपण विचारांच्या आणि प्रगतीच्या गाडीला खीळ घालतो असे वाटते.

-प्रियाली

असा अर्थ लावू शकतो की कणाद परमाणू हा लघुत्तम घटक आणि जगाची उपपत्ती त्यातून झाली असे मानत होते. तर शंकर हे परमाणू हे जगाचे कारण नाही असे मानत होते.

-चित्रा

हे वाचले.

तसेच - http://www.swami-krishnananda.org/bs_2/bs_2-2-02.html हे

आणि
http://dli.iiit.ac.in/cgi-bin/Browse/scripts/use_scripts/advnew/aui/book...
येथे असलेले वासुदेव लक्ष्मणशास्त्री पणशीकर यांचे ब्रह्मसूत्रभाष्य पाहिले. (Alterna Tiff पाने २३९ पासून पुढे.संस्कृताचा अर्थ समजत नाही.)

यावरून माझातरी असा ग्रह झाला की -"कणाद परमाणू हा लघुत्तम घटक आणि जगाची उपपत्ती त्यातून झाली असे मानत होते. तर शंकर हे परमाणू हे जगाचे कारण नाही असे मानत होते." हे चित्रा यांचे मत बरोबर आहे.

कणाद हे आत्मा, परमात्मा, ईश्वर, निर्मिक या जगाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या अवस्थांना कारणीभूत असणार्‍या पारलौकिक कल्पनांपासून फारकत घेत होते तर शंकर या अवस्थांना कारणीभूत असणार्‍या चैतन्य अथवा ऊर्जेचे गूढ स्वरूप आध्यात्मिक आहे असे मानत होते.

पुढे जाऊन मी पुन्हा असे म्हणेन की जर एखाद्या कणादशिष्याने दोन भिन्न गुणधर्माच्या पदार्थांचा/जीवांचा संयोग करून तिसर्‍याच गुणधर्माचा पदार्थ/जीव अस्तित्वात येतो यावर विचारमंथन केले असते तर कणादसंप्रदाय भौतिकशास्त्राच्या आणखी जवळ गेला असता.
(जसे लाकूड जाळले असता त्यातून ऊर्जा आणि कोळसा/राख मिळते.)

तरीही आजही विश्वाची उत्पत्ती कशी झाली याबाबत एकमत नाही. प्रचंड स्फोटाच्या आधी काय होते आणि कसे होते? सर्व विश्व पूर्ण थंड झाल्यावर (प्रसरण पावल्यावर) काय होणार? असे प्रश्न अजूनही शांकरमताकडे घेऊन जातात.

हे खंडन करताना शंकरांनी आपल्या मताचा विपर्यास होऊन कणादसंप्रदाय नामशेष होईल आणि आर्यावर्त अभौतिक/पारलौकिक अंधारात खितपत पडेल अशी कल्पना केली नसावी.

"अध्यात्म आणि भौतिक हे वेगळे" असे शंकर मानतात का?

अध्यात्म आणि विज्ञान यांमधली गल्लत म्हणा ...
कणाद हे आत्मा, परमात्मा, ईश्वर, निर्मिक या जगाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या अवस्थांना कारणीभूत असणार्‍या पारलौकिक कल्पनांपासून फारकत घेत होते तर शंकर या अवस्थांना कारणीभूत असणार्‍या चैतन्य अथवा ऊर्जेचे गूढ स्वरूप आध्यात्मिक आहे असे मानत होते.

लौकिक आणि पारलौकिक कल्पना वेगवेगळ्या आहेत आणि त्यांची गल्लत होते/होऊ नये, असे तुम्हाला ब्रह्मसूत्रभाष्यावरून का वाटते? भौतिक/आध्यात्मिक ही दुही-द्वैत शंकराचार्यांच्या शब्दांत दिसत नाही. ही दुही-द्वैत करणे हे पुढच्या काळातले विचार आहेत. शंकराचार्यांना तसे द्वैत करायचे असते, तर त्यांनी केले असते - ते अत्यंत तर्कशुद्ध आहेत.

तुम्ही २.२.११ हे सूत्र आणि त्यावरचे भाष्य बघितले. या भावानुवादाची तिथपासून सुरुवात करावी की नाही हा माझ्यासाठी कठिण पर्याय होता. मी भावानुवाद २.२.१२ पासून सुरू केला आहे.
२.२.११ हे सूत्र वैशेषिकांच्या ब्रह्मवादाविरुद्धच्या एका खंडनाचे प्रतिखंडन आहे. त्यानंतर २.२.१२ ते २.२.१७ हे वैशेषिकांच्या मूळ विचारांचेच खंडन आहे. त्यामुळे २.२.११ हे सूत्रभाष्य "महद्दीर्घवत् ब्रह्म कारण आहे" अशा सारांशाचे आहे. त्याने अणुवादावर विशेष प्रकाश पडत नाही. म्हणून भावार्थाची २.२.१२ पासून सुरुवात केली. २.२.११ ते २.२.१२ मध्ये विषय बदलतो हे फक्त माझेच मत नाही. खुद्द भाष्यातच २.२.१२ पासून वेगळे अधिकरण सुरू होते.

विसुनाना, चित्रा म्हणतात

असा अर्थ लावू शकतो की कणाद परमाणू हा लघुत्तम घटक आणि जगाची उपपत्ती त्यातून झाली असे मानत होते. तर शंकर हे परमाणू हे जगाचे कारण नाही असे मानत होते.

आणि असे काही

शंकराचार्य अणू नाहीत असे म्हणत नाहीत, फक्त अणू कारण नाहीत असे म्हणतात.

मला वाटते की शंकराचार्यांनी दिलेला गोषवारा पुन्हा नीट बघूया. वर चित्रा यांनी सांगितल्याप्रमाणे कणाद परमाणू लघुतम तर मानतात हे नेमके बरोबर नाही. कणाद म्हणतात, की आपण लघुतम मर्यादेला जेव्हा पोचतो, तेव्हा त्याला अणू/परमाणू म्हणतो. जेव्हा शंकराचार्य दाखवतात की अणूला अणू जोडण्यासाठी त्या अणूचे भाग जाणावे लागतात, ते असे दाखवतात की लघुतम मर्यादाच नाही. कारण मर्यादेखाली भागही पाडता येऊ नयेत, आणि इथे तर भाग पडतात. ज्या अर्थी लघुतम मर्यादाच नाही, तर मग कणादांचे अणू कुठून येणार आहेत? आणि जर लघुतम मर्यादा असेल, तर अणूला अणू जोडलाच जाऊ शकणार नाही, असे शंकराचार्य दाखवतात.
कणाद तरी लघुतम मर्यादा का मानतात? कार्यकारणभावामुळे.
शंकराचार्यांचा "अणू कारण नाही" याही प्रकारे कणादांच्या विचाराच्या मुळावरच घाव घालतात.

शंकराचार्य दाखवतात की (१) "कारण" नाही, आणि (२) "लघुतम मर्यादा" नाही, तर कणादांच्या मतात पटण्यासारखे काय राहिले आहे? या दोन पायांवरच कणादांनी "अणू आहेत" असे म्हटले आहे.

अजूनही

पटले नाही.

"परमाणू हे जगाचे कारण आहे, असा कणाद-संप्रदायाचा अभिप्राय आहे."

याचे खंडन चालले आहे असे मला अजूनही वाटते (पाटी कोरी करता आली नाही, म्हणूनही असे असू शकेल!) विरोध अणूंना किंवा त्यांच्या एकत्र येण्याला नसून त्याचे "निमित्त" काय त्याला आहे (चला, हाही एक प्राचीन वाद हे कळले!) असे वाटते.. पण अजून काही लिहीण्याआधी तुमचा याबद्दलचा पुढचा लेख वाचायला आवडेल.

अवांतर - शंकरांनी वाद घालताना योग्य दिशेनेच विचार केला आहे असे वाटते. कणादांच्या शिष्यांनाही (संप्रदाय) कदाचित सुचले नसेल त्याला शंकर स्पर्श करून जातात असे वाटले (कणादांच्या संप्रदायाचे नक्की पुढचे काम कसे झाले असावे?) अणूचे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आदी "अवयव" यांचा विचार कोणी करू शकला असता का?

अति अवांतर -
ओम्‌ पूर्णमदः पूर्णमिदम्‌, पूर्णात्पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥'

यासंबंधी शंकरांचे काही भाष्य आहे का? याचा वरील विषयाशी काही संबंध आहे का?

अणुरणीया थोकडा!

सुरुवातीला शंकराचार्य थोडक्यात कणादांचे मत थोडेफार पटेल अशा पद्धतीने देतात, आणि मगच त्याचे खंडन करतात. दुसर्‍याचे म्हणणे निरर्थक आहे, अशा रीतीने चर्चा सुरू करत नाहीत.

ह्याला आम्ही डिप्लोमसी म्हणतो! :)

(तसा शेवट करतात ते महत्त्वाचे नाही, कारण त्यांच्या मते त्यांनी उत्तम वाद मांडला आहे, पूर्ण खंडन झाले आहे.)

हा हा हा!

दुसर्‍याचे म्हणणे जवळजवळ पटेल असे सुरुवातीला मांडण्याची ही स्तुत्य पद्धत अंगीकारली तर आजचेही अनेक वादविवाद अधिक प्रगतिशील होऊ शकतील.

असहमत आहे. पटलं तर सुरवातीलाच सरळ पटलं असं म्हणावं, न पटल्यास तसं सांगून मोकळं व्हावं असं आमचं मत आहे आणि या पद्धतीनेदेखील वादविवाद अप्रगत न राहता प्रगतीशील होऊ शकतील असंही आमचं मत आहे.

असो.. बाकी लेख मुळीच समजला नाही व वाचूनच गरगरायला लागले!

आम्हाला अणूरेणूबाबत काहीच ज्ञान नाही व आकलनशक्तिही नाही! आम्हाला फक्त 'अणुरणीया थोकडा, तुका आकाशाएवढा' या अभंगातला मालकंस थोडाफार कळतो. अणुरेणुचं विज्ञान जिथे संपत असावं तिथे मालकंस सुरू होत असावा असा आमचा अंदाज आहे.. !

अवांतर - शंकराचार्य किंवा कणाद किंवा अश्या अन्य काही जुन्या माणसांनी हिंदुस्थानी रागदारी संगीतावर काही भाष्य केले आहे काय? केले असल्यास वाचायला आवडेल..

आपला,
(अणूरणीया थोकडा!) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

भरत यांचे संगीतावरचे विचार

हे भरताच्या नाट्यशास्त्रात येतात.
या विचारांचा हिंदुस्थानी रागदारी संगीताशी काही पूर्वज-संबंध येतो. हिंदुस्तानी आणि कर्नाटक दोन्ही प्रकारांशी या पूर्वशास्त्राचा समसमान संबंध येतो - या नवीन संगीतपद्धती गेल्या २००० वर्षांत वेगवेगळ्या मार्गांवर बदलत चाललेल्या आहेत.

नरहर कुरुंदकरांनी भरतांच्या लेखनाचा या प्रकारचा अभ्यास केला आहे. त्यांचा अभ्यासपूर्ण लेख मी अनेक वर्षांपूर्वी वाचला आहे, पण लेखाचे नाव आठवत नाही. लेखसंग्रह मी अप्पा बळवंत चौकात शोधायचा मागच्या वर्षी प्रयत्न केला, पण सापडला नाही. :-(

मला फक्त काही थोडा भागच आठवतो : षड्जापासून तार षड्जापर्यंत २२ श्रुती असतात, त्यातल्या प्रत्येक श्रुतीमध्ये अंतर किती असते? दोन वीणा एकमेकांशी षड्ज-पंचम भावात लावत-लावत, २२ टप्प्‍यांत १-१ करत २२ श्रुती मिळतात, वगैरे.

(पायथागोरास या ग्रीक गणितज्ञाचे असे मत होते की १२ टप्प्यांत १२ श्रुती या प्रकारे मिळतात, तितक्या पुरे. पण या १२चा षड्ज ते तार षड्ज हिशोब तंतोतंत लागत नाही. त्या हिशोबातल्या त्रुटीला "पायथागोरियन त्रुटी" असे पाश्चिमात्त्य संगीतशास्त्रात नाव आहे. १२ ऐवजी २२ टप्पे = २२ श्रुती केल्या तर हिशोब जवळजवळ बरोबर लागतो. ही माहिती कुरुंदकरांच्या लेखात नव्हती.)

कुरुंदकरांचा तो लेख कोणाला सापडला, आणि मला पुन्हा वाचायला मिळाला तर फार आनंद होईल.

२२ श्रृती

२२श्रृतीहार्मोनियम
इथे त्याबद्दल काही तांत्रिक माहिती मिळेल असे वाटते.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

असहमती नेमकी कशाबद्दल?

असहमत आहे. पटलं तर सुरवातीलाच सरळ पटलं असं म्हणावं, न पटल्यास तसं सांगून मोकळं व्हावं असं आमचं मत आहे आणि या पद्धतीनेदेखील वादविवाद अप्रगत न राहता प्रगतीशील होऊ शकतील असंही आमचं मत आहे.
सुरुवातीलाच शंकराचार्य "खंडन करणार" असे सांगून मोकळे होतात - म्हणजे तुम्ही म्हणता तसे...
पण मग नेमके कशाचे खंडन करणार आहेत, ते सांगतात. ते जर सांगितले नसते, तर पुढचा वाद अशा प्रकारे वांझ झाला असता :
शंकर : कणादांचे मत चुकले आहे
कणादशिष्य : तुम्हाला कणादांचे मत समजले नाही
शंकर (पुन्हा): कणादांचे मत चुकले आहे
कणादशिष्य (पुन्हा): तुम्हाला कणादांचे मत समजले नाही
...
इ.इ.
सुरुवातीला कणादांचे मत बर्‍यापैकी नीट मांडून शंकराचार्यांनी हे दाखवले आहे, की आपल्याला कणादांचे विचार कळलेले आहेत.

धनंजय, एका गहन परंतु सुंदर विषयाला सुरुवात केल्याबद्दल

प्रथमतः धन्यवाद!
१. कणादांनी अणू असल्याचे मत मांडले आहे. ते मत पटण्यासारखे आहे का?
पदार्थांचे मूलभूत कण म्हणजे अणू हे आपण शाळेत शिकलो तेव्हापासून आतापर्यंत ते पटत आले आहे. कारण निर्मितीस कारण काय ह्या त्यापुढील प्रश्नाचा विचार करण्याची वेळ कधी आलेली नव्हती हे असावे. आता शंकराचा वाद वाचताना त्या गृहितकांना छेद जाईल असे वाटते.

२. शंकराचार्यांनी अणू नाहीत म्हणून खंडन दिले आहे. ते तुम्हाला तार्किकदृष्ट्या पटते का?
हो. कारण "लघुतम भाग" आणि असे "लघुतम भाग जोडले जाऊन" मोठी वस्तू तयार होणे ह्या दोन्ही परस्परविरोधी संकल्पना असल्याचे जाणवते. शिवाय "कार्यकारण भाव" तत्त्वातही लघुतम भागाचे जोडले जाणे हे कशाने घडते/घडले ह्याचा संबंध लागत नाही.

३. शक्यतोवर प्राचीन ग्रंथ वाचताना आपण त्याच्यानंतर लागलेले शोध मनात आणत नाही - मन त्या दृष्टीने स्वच्छ केले तर कणाद आणि शंकर यांच्यापैकी कोणाचे पटते?
प्राचीन ग्रंथांचे माझे वाचन नाही. पण "त्याच्यानंतर लागलेले शोध" ह्या गृहितावर माझे एक मत आहे.
शंकराच्या गृहितानंतर लागलेले शोध हे त्याच्या गृहिताच्या पुढे प्रगती करणारे असण्याऐवजी कदाचित असेही असू शकते की गेल्या १०० वर्षात लागलेल्या शोधांच्या पायर्‍या आपल्याला शंकराच्या गृहितकाकडे घेऊन जात असाव्यात! आईनस्टाईनने सापेक्षतावाद स्थापित करताना जसे थॉट एक्सपेरिमेंट्स् केले होते तसेच शंकराने अणुवादाचे खंडन करताना केले असावे. सद्य स्थितीत त्यातल्या काही प्रयोगांचे मूर्त रुप आपल्याला तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे बघता येते ते त्याकाळी शक्य नसेलही.
त्या पार्श्वभूमीवर मला शंकराचे म्हणणे पटते. आजही प्रकाश हा तरंग की कण ह्याबद्दल शास्त्रज्ञात मतभेद आहेत. नवीन गृहितानुसार प्रकाश हा दोन्ही नसून फक्त ऊर्जा आहे असे मानले जाते. हे सर्व द्योतक ह्याचेच आहे की शास्त्रज्ञ आता कणवादाच्या पलीकडे डोकावण्याचा प्रयत्न करीत आहेत.

४. आता आपल्याला जे काही शाळेत भौतिक-रसायनशास्त्र शिकवले आहे, ते माहीत आहे, असे समजा. कणादांच्या आणि शंकरांच्या विचारांचा आपण काय अर्थ लावू शकतो?
शंकराच्या विचारावरुन असे वाटते की प्रत्येक पदार्थ हा फक्त ऊर्जेचा साठा आहे. काळाच्या मितीत ऊर्जा (चार महाभूते) एका विशिष्ठ अवकाशात (पाचवे महाभूत) बंदिस्त झाली की विशिष्ठ पदार्थ तयार होतो. काळाच्या मितीत जसजसा प्रवास होईल तसतसे त्या वस्तूच्या अवकाशात बदल होत जातात आणि पर्यायाने वस्तूच्या स्वरुपात बदल होत जातात. जसे प्राणी जन्मापासून मरेपर्यंत म्हातारा होत जातो. किंवा खरेतर म्हातारा होत गेल्यामुळे मरतो! (कारण जर प्रकाशाच्या वेगाने आपण प्रवास करत राहिलो तर काळ ह्या मितीतून आपली सुटका होईल आपण म्हातारे होणार नाही आणी आपण अमर होऊ!!)

चतुरंग

धन्यवाद

विसुनाना, मन, लिखाळ, विकास, प्रियाली, चित्रा, प्राडॉ, आनंदयात्री, चतुरंग, यांस प्रतिसादांबद्दल धन्यवाद. अनेकांनी चर्चेच्या प्रश्नांवर विचार केला आहे, आणि उत्तरे दिली आहेत.

विसोबा खेचर आणि प्रमोद देव यांनी संगीताबद्दलच्या उपचर्चेत रंग भरला आहे, दिल खुष करणारे दुवे दिले आहेत.

गोषवारा आणि प्रश्नांविषयी माझे मत देण्यापूर्वी पुनश्च धन्यवाद!

माझी उत्तरे

(येथे माझी स्वतःची मते देत आहे. वरच्या मतांशी समन्वय साधत नाही. तो साधण्यासाठी जोड्या लावत लावत विचार करावा लागेल... तो नंतर कधी.)

१. कणादांनी अणू असल्याचे मत मांडले आहे. ते मत पटण्यासारखे आहे का?
नाही. अणू असण्याबद्दल ते पुढचे तर्क वापरतात.
(१अ) वस्तूंचे भाग पाडले जाऊ शकतात. भाग हे घटक=कारण असतात.
(१आ) कारणांच्या साखळीला अंत असलाच पाहिजे.
(१इ) म्हणून भाग पाडण्याला अंत असलाच पाहिजे. हा अंत म्हणजे अणू=परमाणू

यात मला केवळ (१अ) पर्यंतच पटते. (१आ) पटत नाही. मग (१इ)ला अर्थच राहात नाही. शंकरांच्या खंडनापेक्षा हे थोडे वेगळे आहे. शंकरांना (१अ), आणि (१आ) मान्य आहे. ते फक्त (१इ) अमान्य करतात.

२. शंकराचार्यांनी अणू नाहीत म्हणून खंडन दिले आहे. ते तुम्हाला तार्किकदृष्ट्या पटते का?
या सूत्रात शंकरांनी दोन खंडने दिली आहेत.
(२अ) "अदृष्ट" तत्त्वाची ऐशी-तैशी. "चेतना" हेच तत्त्व मानले पाहिजे, नाहीतर अणू जोडलेही जाणार नाहीत आणि द्वि-अणुके तोडलीही जाणार नाहीत.
(२आ) तर्क केला तर असे दिसते : एक तर अणूचे भाग पाडले जाणार, नाहीतर अणूला अणू जोडताच येणार नाहीत.

मला खंडन (२आ) पटते. पण शंकरांनी हे (१इ)चे खंडन म्हणून दिले आहे. मला तर हे (१आ)चे खंडन म्हणूनही चालते. कारण कुठल्याही "अंताचे" असे विश्लेषण करता येते, आणि मग तो "अंत" राहात नाही, ते आदिम कारण राहात नाही.
खंडन (२अ) म्हणजे येथपर्यंत शाब्दिक खेळ होय. कणादांचे "अदृष्ट" अणूंना जवळ येण्याला चालत नाही, "चेतना" हाच शब्द वापरला पाहिजे... हे काही पटत नाही. (येथे मी कणादांचे मूळ लेखन दिले नाही, पण वैशेषिक-नैयायिकांना "अदृष्ट" क्रियाशक्ती मोठी महत्त्वाची असते. मग तिची ऐशी-तैशी कशी करून चालेल? २अ बद्दल आणखी गंभीर विचार शंकर पुढील सूत्राच्या भाष्यात करतात. म्हणून "येथपर्यंत शाब्दिक खेळ" असे म्हटले आहे.)

३. शक्यतोवर प्राचीन ग्रंथ वाचताना आपण त्याच्यानंतर लागलेले शोध मनात आणत नाही - मन त्या दृष्टीने स्वच्छ केले तर कणाद आणि शंकर यांच्यापैकी कोणाचे पटते?
नवीन इंग्रजी "ऍटम" शब्दाला आजकाल आपण "अणू" प्रतिशब्द वापरतो. ती नवीन व्याख्या मनातून काढून टाकावी. (या संदर्भात तरी.) कणादांना आणि शंकरांना ती अभिप्रेत नाही. त्यांच्या शब्दांना मान द्यावा.

कणादांचे चार प्रकारचे अणू होते - पृथ्वीचे अणू, आप् चे अणू, तेजस् चे अणू आणि वायूचे अणू. त्यांना हायड्रोजनचे अणू, ऑक्सिजनचे अणू, इ.इ. १००+ प्रकारचे अणू मुळीच अभिप्रेत नव्हते. या आधुनिक अर्थाशी गल्लत टाळावी. कणादांच्या आणि शंकरांच्या शब्दांना त्यांनी सांगितलेल्या अर्थाने अर्थपूर्ण असल्याचा मान आपण दिला पाहिजे.

गल्लत करायचीच असेल तर असे का न म्हणा: कणादांना चार प्रकारचे अणू/परमाणू म्हणजे "प्रोटॉन", "न्यूट्रॉन", "इलेक्ट्रॉन" आणि "फोटॉन" म्हणायचे असेल. किंवा "क्वार्क" "लेप्टॉन" "म्युऑन"आणि "फोटॉन" असे म्हणायचे असेल...(हेही हास्यास्पदच आहे. पण चुकीच्या काळातला शब्दार्थ लावण्याने गडबड होते ते दाखवायचे आहे.)

काहीही का असेना, त्यापेक्षा कणादांच्या व्याख्येकडे नीट लक्ष द्यावे. "ज्यांना भाग पडत नाहीत ती मर्यादा" आणि "कारण असल्यामुळे जी मर्यादा येते" तेच अणू.

वर सांगितल्याप्रमाणे अणू नामक अंतिम भाग असल्याचे पटत नाही. साधारणपणे शंकर म्हणतात त्यांच्यापैकी एका तर्कामुळे. पण शंकर दाखवतात त्या तर्काने (१आ) हे गृहीतकच माझ्या दृष्टीने बाद होते, शंकर मात्र ते गृहीतक बाद करण्याऐवजी केवळ (१इ) हा निष्कर्ष बाद करतात.

४. आता आपल्याला जे काही शाळेत भौतिक-रसायनशास्त्र शिकवले आहे, ते माहीत आहे, असे समजा. कणादांच्या आणि शंकरांच्या विचारांचा आपण काय अर्थ लावू शकतो?
शाळेत भौतिक-रसायनात शिकलेले "अणू" आणि कणाद-शंकर बोलत आहेत ती अणु-कल्पना खूप वेगळी आहे. शाळेत शिकलेल्या अणूंचे भाग पाडले जाऊ शकतात, आणि ते अंतिम कारण नाहीत, हेसुद्धा आपण शाळेतच शिकलो आहोत. त्यांच्या संदर्भात कणाद-शंकरांचे तर्क आणि वाद न वापरण्याची आपण काळजी घेतली पाहिजे. आजच्या संदर्भात अर्थ लावायचा तर असा - वस्तूचे भाग पाडताना आपण कुठल्या अंतापाशी पोचू का? याबाबत आपला अनुभव आहे की "मी भाजी चिरता-चिरता, चटणी वाटता-वाटता, दाणे कुटता-कुटता, कधीतरी थांबतो. नेहमीच." त्या सर्व भागाकार-क्रियांचे अंत असतात, पण ते वेगवेगळे असतात. भागाकार करता-करता कुठल्या तरी बारकाईत वस्तूचे थोडे गुणधर्म बदलतात, बाकी तसेच राहातात. आणखी चिरल्यानंतर दुसरा कुठला गुणधर्म बदलतो, बाकी तसेच राहातात. जेव्हा आपल्याला हवा असलेला गुण राहातो, तिथपर्यंतच मी भाजी चिरतो, दाणे कुटतो, चटणी वाटतो. त्या-त्या "तथाकथित अंतिम" ठिकाणाला काही-काही नाव देणे फार सोयीचे असते - भाजीच्या फोडी, कीस, दाण्याचे कूट, पूड, वस्त्रगाळ... वगैरे. पैकी कुठलेही ठिकाण "खरोखरचे अंतिम" मानायची काहीच तार्किक गरज नाही. भाजीचा लगदा चवीला चांगला लागत नाही, म्हणून आपण आणखी बारीक चिरत नाही. ही सोय, आणि त्यामुळे "फोडी" हे नाव वापरून स्वयंपाक शिकवणे योग्यच आहे. (१आ) हे एवढे मोठे गृहीतक मानण्यापेक्षा, हे सोपे अनुभवजन्य तत्त्व मानावे : "अमुक कुठलातरी हवाहवासा गुणधर्म नाहिसा झाला, म्हणून व्यवहारात आपण वस्तूचा भागाकार थांबवतो." कणादांचे (१अ) तत्त्व आजही वापरण्यासारखे आहे.
मेकॅनिक्स-भौतिकात "रिजिड बॉडी" मिळेपर्यंत आपण वस्तूंचा भागाकार करत राहातो. त्यापेक्षा छोटे भाग केले तर आधी एकत्र हलणारे पिंड एकत्र हलायचे थांबते - आपल्याला हवा असलेला एक गुणधर्म हरवतो. म्हणून भागाकार त्याठिकाणी थांबवायचा. हेच या शास्त्रातले "अणू".
सामान्य रसायनशास्त्रात रासायनिक "अणू=इंग्रजी ऍटम" मिळेपर्यंत आपण भागाकार करतो. त्याहून अधिक भाग केलेत तर रासायनिक प्रक्रिया होणे थांबते, तो हवा असलेला गुणधर्म नाहिसा होतो. म्हणून भागाकार त्याठिकाणी थांबवायचा. हेच या शास्त्रातले "अणू".
अशाच प्रकारे हाय-एनर्जी फिजिक्समध्ये क्वार्क-लेप्टॉन पर्यंत भागाकार करतो, आणि तिथे सोयीसाठी भागाकार थांबवतो. हेच या शास्त्रातले "अणू".

अशा प्रकारे माझ्या मते, गृहीतक (१आ) बाद केले पाहिजे. या गृहीतकाने प्रगती अडते. एखादे तत्त्व अनुभवाबाहेरच्या चौरंगावर "गृहीतक" म्हणून स्थापल्यामुळे प्रगती अडते - असे आइन्स्टाइनचे मत आपण उपक्रमावर मागे चर्चिलेले आहे (दुवा).

भले

धनंजयाचे विचार आवडले. पटले असे म्हणत नाही. (ती गुंतागुंतीची प्रक्रिया आहे... वगैरे!)
त्यातून योग्य ते निवडण्याचा प्रयत्न सुरू आहे.

शिवाय यावेळी त्याची उदाहरणे सहज-सोपी आहेत. त्याबद्दल आभार.
आता लेखाचा दुसरा भाग लवकर यावा ही विनंती.

अणूंच्या प्रकाराविषयी तुच्छ प्रश्न

भावानुवाद आणि प्रतिसादांतून झालेली चर्चा उद्बोधक आहे.

कणादांचे चार प्रकारचे अणू होते - पृथ्वीचे अणू, आप् चे अणू, तेजस् चे अणू आणि वायूचे अणू.

"अवयवी-वस्तूचा अवयवांमध्ये विभाग जिथे थांबतो, त्याहून लहान भाग करता येत नाही ती मर्यादा पोचते, तोच परमाणू." यानुसार सकृतदर्शनी वेगवेगळ्या दिसणार्‍या, वेगवेगळे गुणधर्म असलेल्या वस्तूंचा/पदार्थांचा मूलभूत-घटक/परमाणू एकाच स्वरूपाचा असेल हे कसे काय समजले असेल? उदाहरणार्थ सोने आणि लोखंड (किंवा भाजी आणि कापड) या सकृतदर्शनी वेगवेगळ्या दिसणार्‍या, वेगवेगळे गुणधर्म असणार्‍या पदार्थांचे परमाणू एकसारखे (पृथ्वी तत्त्वाचे अणू?) असावेत ही कल्पना (सूक्ष्मदर्शक वगैरे साधने उपलब्ध नसताना) कशी काय सुचली असावी?

महाभूते ही अणूंपूर्वीची

पाच महाभूते ही अणूंपूर्वीची.

काही वस्तू रूप बदलतात असे दिसते. लाकूड जळते, लोखंड गंजते, वगैरे. काही गोष्टी अशा बदलायला कठिण असतात, उदा. सोने, पण प्रयत्न केल्यास त्याची माती होईल, असा कयास करता येतो. कारण लोखंड गंजते, चांदी काळवंडते, तांबे हिरवे पडते - सगळ्याची माती होते.

म्हणजे बहुतेक वस्तू कसलीतरी एकजीव मिश्रणे असतात. काही वस्तू मात्र (त्या काळात जितपत दिसत होते) मिश्रण केलेल्या नव्हत्या. त्या वस्तू म्हणजे :
पृथ्वी, पाणी, तेज, (वायू)
या गोष्टी त्या काळात "मूळ" द्रव्ये होती. पृथ्वी(=माती/राख) वगैरे जाळून, धुवून, वाळवून बदलत नाही. माती+पाणी=चिखल; पुन्हा पिळून पाणी बाहेर काढता येते, वाळवून घेऊन कोरडी माती. असेच बाकी तीन महाभूतांविषयी. त्यांपैकी "वायू" हा फार पूर्वी महाभूत मानत नसत. पुढे मानू लागले.
बाकी सर्व गोष्टी म्हणजे महाभूतांची मिश्रणे आहेत. मिश्रणे आण्विक असतील, नसतील. त्यामुळे याबाबतीत सूक्ष्मदर्शक यंत्र नसले तरीही हा विचार करता आला. अणुवाद वादग्रस्त होता. महाभूते मात्र वादग्रस्त नव्हती.

महाभूतांची कल्पना आधीच उपलब्ध होती, आणि बाकी सर्व पदार्थ त्यांची मिश्रणे मानली जात होती. म्हणून कणादांनी अणू=परमाणू या मूळद्रव्यांचेच आहेत असे म्हटले.

"आकाश" नावाचे महाभूत या सगळ्यांपेक्षा वेगळे आहे. "आकाश" म्हणजे अवकाश. पोकळीच नव्हे. पोकळी+सर्वकाही असे अवकाश. ही एक म्हटली तर भन्नाट कल्पना आहे. म्हटली तर नाही. "एक असे कुठले अवकाश नाही" हा विचार त्यापेक्षा भन्नाट आहे. (हे आइन्स्टाइनच्या लेखात त्यांनी समजावलेले आहे.)

नक्की..

चर्चेची सुरवात आणि नंतर वरील आपली स्वतःची उत्तरे या दोन्हीतील सूर थोडासा परस्परविरोधी वाटला (अर्थात् तसे वाटण्यात माझी चूक आहे). त्यामुळे माझा अर्जून होत आहे :-(

त्या संदर्भात एक मूळ प्रश्न विचारतो:

तुम्ही नक्की कुणाच्या टिम मधे आहात? - शंकराचार्यांच्या का कणादमुनींच्या?

कोणाच्याच टीममध्ये नाही

मुळात मी कोणाच्याच टीममध्ये नाही. केवळ खेळाचा फॅन आहे.

कणादांचा पहिला मुद्दा पटण्यासारखा आहे. {वरती लिहिलेला (१अ)}
वस्तूंचे भाग पाडून विश्लेषण करणे उपयोगी आहे.

त्यातून काढलेला कणादांचा निष्कर्ष मला पटलेला नाही. "कार्यकारणांची साखळी कुठेतरी एकाच ठिकाणी अवश्य थांबते, आणि विभाग पाडता येत नाही, तेच परमाणू=अणू" हे पटत नाही. (म्हणजे अमेरिकन फुटबॉलप्रमाणे, त्यांनी सुरुवात मस्त केली, पण थर्ड डाऊनवर बॉल हातचा गेला, म्हणून ती टीम हरली.)

खेळाच्या पहिल्या हाफमध्ये शंकरांनी नुसता बॉल खेळवला पण स्कोअर केला नाही. वैशेषिकाचे "अदृष्ट" चालणार नाही, आणि आपली "चेतना" मात्र हवी, याबाबतचा शंकरांचा मुद्दा ०-० स्कोअरचा.

शंकरांनी केलेले दुसरे खंडन पटते. {वरती लिहिलेला मुद्दा (२आ)}. पण त्यांनी कणादांची कार्यकारणाची साखळी मागे ओढून दाखवली, तेव्हा हे तत्त्व सांगितले नाही की सर्वच कार्यकारण साखळ्या अशाच प्रकारे मागे ओढून दाखवता येतात. (ते स्वतः जेव्हा कार्यकारणाची साखळी कुठेतरी थांबवतात तिथे ती थांबवता यावी, म्हणून असेल - पण तो भाग या सूत्रभाष्यात नाही.) पण या ठिकाणी कणादांचा तर्क शंकराचार्यांनी खंडित केला आहे, स्कोअर+व्हिक्टरी शंकराचार्य. (म्हणजे अमेरिकन फुटबॉलप्रमाणे, त्यांनी कणादांच्या फंबलवर टचडाऊन केला, पण त्यानंतर गोल मारला नाही, तरीही खेळ ते जिंकले.)

कणादांची सुरुवातीची स्ट्रॅटेजी आवडते, शंकर टचडाऊनने गेम जिंकले हे आवडते. फील्ड गोल हुकवला ते आवडत नाही.

उत्तरे

१. कणादांनी अणू असल्याचे मत मांडले आहे. ते मत पटण्यासारखे आहे का?
'त्याहून लहान भाग करता येत नाही ती मर्यादा पोचते, तोच परमाणू.' सुटसुटीत (ढगळ) व्याख्या. ज्याचे भाग होतात सिद्ध झाले त्याला परमाणू न म्हणता त्या-त्या भागांना परमाणू म्हणत जावे. 'पृथ्वी, आप (पाणी), तेज, वायू. त्यामुळे चार प्रकारच्या परमाणूंची कल्पना होते.' ही झेप न कळण्यासारखी.
(त्याला अणूच्या विभाज्यतेपेक्षा प्रत्येक वस्तूच्या मुळाशी एकसारखी संरचना असणारा घटक असणे ही कल्पकता अधिक प्रभावी वाटते.)

२. शंकराचार्यांनी अणू नाहीत म्हणून खंडन दिले आहे. ते तुम्हाला तार्किकदृष्ट्या पटते का?
तर्काचे दोन भाग आहेत.

पैकी चेतने बाबत, कणाद संप्रदायाचा 'कारण नसले तर कार्य होऊ शकत नाही, म्हणून परमाणू हे जगाचे कारण आहे, असा कणाद-संप्रदायाचा अभिप्राय आहे' हा तर्क पचत नाही.

(मुळात विश्वाची उत्पत्तीच त्या पुढील सर्व घटनांचे कारण आहे असे मानल्यास हे असे अणूंचे चेतनायुक्त (चार्जड?) असणे, एकत्र येणे हे सहाजिक असून हे 'सारे' विश्वनिर्मिती या एकाच 'कर्मा'चे फल आहे हा आजचा त्याचा समज शंकराचार्यांच्या काळात ज्ञात असल्याचे त्याला खात्री पूर्वक माहीत नसल्याने तर्क चूक नाही असे वाटते.)

दुसरा, एकदुसर्‍याशी संयोगाबाबतचा तर्क 'विभाज्यतेच्या' विरोधात तिथे ' आणि त्यामुळे त्याला सुरुवात आहे, आणि शेवट आहे.' हे पाहता शंकराचार्यांचा हाही तर्क पटू शकतो.

३. शक्यतोवर प्राचीन ग्रंथ वाचताना आपण त्याच्यानंतर लागलेले शोध मनात आणत नाही - मन त्या दृष्टीने स्वच्छ केले तर कणाद आणि शंकर यांच्यापैकी कोणाचे पटते?
शंकराचार्यांचा.

४. आता आपल्याला जे काही शाळेत भौतिक-रसायनशास्त्र शिकवले आहे, ते माहीत आहे, असे समजा. कणादांच्या आणि शंकरांच्या विचारांचा आपण काय अर्थ लावू शकतो?
शंकराचार्यांचा तर्क योग्य वाटतो, अणूचे ही भाग होतात (की असतात?). अणू अविभाज्य असता त्यांच्यातील संबंध व रेणू निर्मिती कठीण आहे.

मुळात अविभाज्य असणे व सर्व मूलद्रव्याच्या मुळाशी एकसारखा घटक असणे या दोन गुणवत्ता एकाच घटकात असणे हा अट्टहास फारसा पटत नाही. हे अचेतन घटक हेच चैतन्याचे कारक आहेत हे ही न पटण्यासारखे.

[डेमोक्रिटसने हे सारे अणू मूलतः सारख्या गुणधर्माचे (पण वेगळ्या आकाराचे?)असल्याचे मानले होते. तोच 'अणू' शब्द उचलून डाल्टनने प्रत्येच मूलद्रव्याच्या त्याकाळी अविभाज्य समजल्या गेलेल्या घटकाला अणू नाव दिले. अर्थात डाल्टन व डेमोक्रिटसचाच ऍटम जिथे एक नव्हता तिथे कणादांचा अणू तोच कसा असावा. :)]

अवांतर: परमाणू शब्द हिन्दी वाटतो (परमाणू बम्ब, (हिन्दी धन्य आहे. म्हणे विश्व-कप! )), मराठीत अणू-रेणू (अण्वस्त्रे वगैरे) असावेत. अणूच्या घटकांना (अविभाज्य ;) ) 'परमा'णू म्हणता यावे. :)

उर्जा

वेगळ्या विषयाला येथे आणल्याबद्दल धनंजयाचे आभार.

मस्त चर्चा आहे, आवडली.
कणाद गटापेक्षा शंकराचार्यांचे मत 'काहीसे' पटते आहे.

मागे अशी चर्चा झाली असतांना त्यातून आलेले विचार म्हणून, 'विश्वात उर्जा हाच शेवटचा घटक' असे काहीसे मनात होतेच. ही चर्चा वाचून, मनातल्या त्या अमूर्तशा विचारांना अचानकच शब्दात पकडल्यासारखे वाटले.
खालच्या प्रतिक्रीया वाचतांना चित्र स्पष्टच होते आहे की काय असे वाटले.

मात्र हे अणु विषयी तर्कसंगत विचार स्फुरण्यासाठी आधी कशा प्रकारचे शिक्षण या ऋषींचे झाले असावे असाही प्रश्न मनात आलाच.
आजचे भौतिकी मधले 'स्पेशलायझेशन' तेंव्हा नसावे पण पण सर्व समावेशक असे काही विषय असावेत का? (अध्यात्म हा श्ब्द वापरणार होतो पण त्याच्या अर्थ छटा अनेक विपरीत प्रकारच्या आहेत म्हणून टळला!)

(त्यात परत कोहम् या सनातन प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नातून तर हे सगळे येत गेले नसावे?)

आपला
गुंडोपंत

अरे वा!!

धनंजय,
सर्वप्रथम या सुंदर स्वैर भाषांतर / भावानुवाद आवडला. इतक्या तांत्रिक गोष्टीचे सोप्या शब्दातील अनुवादाबद्दल आभार!
चर्चेत उशीरा सहभाग घेत असल्याबद्दल क्षमस्व

१. कणादांनी अणू असल्याचे मत मांडले आहे. ते मत पटण्यासारखे आहे का?
कणादांचे मत अत्यंत तर्कपूर्ण वाटले.

२. शंकराचार्यांनी अणू नाहीत म्हणून खंडन दिले आहे. ते तुम्हालाप तार्किकदृष्ट्या पटते का?
पण हे खण्डन वाचून तर मी स्तिमीत झालो. आधुनिक विज्ञानाची मुहुर्तमेढ या विचारांना पुढे नेल्यास फार आधीच भारतात रोवली गेली असती. भारतात इतका तर्कशुद्ध प्रतिवाद घालणारे शास्त्रज्ञ इतक्या पूर्वीच होते हा विचारच भारावून टाकणारा आहे. हे खंडन मलातरी तार्किकदृष्ट्या पटते.

३. शक्यतोवर प्राचीन ग्रंथ वाचताना आपण त्याच्यानंतर लागलेले शोध मनात आणत नाही - मन त्या दृष्टीने स्वच्छ केले तर कणाद आणि शंकर यांच्यापैकी कोणाचे पटते?
मला शंकरांचे मत म्हणण्यापेक्षा प्रतिवाद पटतो. त्या प्रतिवादाला तोड शंकरांच्या काळात कोणी देण्याच प्रयत्न केला का? याबद्दल काहि माहिती असल्यास पुढील भागात वाचायला आवडेल

४. आता आपल्याला जे काही शाळेत भौतिक-रसायनशास्त्र शिकवले आहे, ते माहीत आहे, असे समजा. कणादांच्या आणि शंकरांच्या विचारांचा आपण काय अर्थ लावू शकतो?
शंकरांचे विचार पटतात आणि हाच तर्क आधुनिक युगात्त शास्त्रज्ज्ञांनी पुढे नेऊन अनूचे अंतरंग उलगडल्याचे लक्षात येते.

-ऋषिकेश

 
^ वर