अणू आहेत की नाहीत? - अणुवादाचे प्राचीन खंडन (भाग १)

शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकात आपण शिकलो की प्राचीन काळात भारतातले कणाद ऋषी अणु-वादी होते. त्यावेळी अशी शंका माझ्या मनात आली, की मग त्यानंतर त्या ज्ञानाची प्रगती का नाही झाली? त्या अणुवादाचे सांगोपांग खंडन झाले, हेच त्याचे कारण. खंडन करणार्‍यांपैकी प्रखर बुद्धिमत्तेचे शंकराचार्य हे अग्रणी होते.

प्राचीन अणुवादाचे स्वरूप काय होते? त्याचे आद्यशंकराचार्यांनी कसे खंडन केले? ते खंडन आज आपल्याला पटण्यासारखे आहे का? हे सर्व विचार मनात येऊ शकतात. म्हणून मूळ स्रोताकडे जाऊन बघणे उपयोगी ठरावे. ब्रह्मसूत्रांच्या शांकरभाष्यात हे विवेचन सापडते. दुसर्‍या अध्यायातली काही सूत्रे, आणि त्यावरील भाष्य या कार्याला वाहिलेली आहेत. याला "परमाणु-जगद्-अकारणत्व-अधिकरण", म्हणजे "परमाणू हे जगाचे कारण नसल्याचे प्रकरण" असे म्हणतात (ब्रह्मसूत्रभाष्य २.२.१२-२.२.१७). प्राचीन विचारवंतांचे वादविवाद आणि विचार अभ्यास करण्यासारखे असतात. केवळ "प्राचीन" म्हणून त्यांचा नवीन विचारांशी घटस्फोट होऊ नये. शिवाय प्राचीन विचारांच्या आह्वानाला पुरला, तरच नवीन विचार स्वीकार करावा. या कारणासाठी प्राचीन अणुवाद, आणि त्याचे खंडन आजही विचारात घेण्यालायक ठरावे.

यात जुन्या काळच्या वादांचे एक चांगले वैशिष्ट्य सांगितल्यावाचून राहात नाही - सुरुवातीला शंकराचार्य थोडक्यात कणादांचे मत थोडेफार पटेल अशा पद्धतीने देतात, आणि मगच त्याचे खंडन करतात. दुसर्‍याचे म्हणणे निरर्थक आहे, अशा रीतीने चर्चा सुरू करत नाहीत. (तसा शेवट करतात ते महत्त्वाचे नाही, कारण त्यांच्या मते त्यांनी उत्तम वाद मांडला आहे, पूर्ण खंडन झाले आहे.) दुसर्‍याचे म्हणणे जवळजवळ पटेल असे सुरुवातीला मांडण्याची ही स्तुत्य पद्धत अंगीकारली तर आजचेही अनेक वादविवाद अधिक प्रगतिशील होऊ शकतील.

त्या अधिकरणाचा भावानुवाद येथे देत आहे.

-----------------------------------------
(२.२.१२)
आता परमाणु-कारण-वादाचे निराकरण होईल. तो वाद अशा प्रकारे मांडतात - कपडा वगैरे वस्तूंचे भाग असतात, त्या वस्तू स-अवयव असतात. त्या वस्तू मुळ अवयव असलेल्या धाग्यांनी वगैरे सुरू होतात. धागे वगैरे मूळ अवयव जोडून मग वस्तू तयार होते. त्याच प्रमाणे सामान्यनियम करता येतो. जे जे काही स-अवयव दिसते, ते ते त्याच्या त्याच्या संबंधित भागांनी सुरू होते, आणि ते भाग जोडून बनते. अवयवी-वस्तूचा अवयवांमध्ये विभाग जिथे थांबतो, त्याहून लहान भाग करता येत नाही ती मर्यादा पोचते, तोच परमाणू. हा जगातले सर्वकाही - डोंगर, समुद्र - स-अवयव आहे, आणि त्यामुळे त्याला सुरुवात आहे, आणि शेवट आहे. कारण नसले तर कार्य होऊ शकत नाही, म्हणून परमाणू हे जगाचे कारण आहे, असा कणाद-संप्रदायाचा अभिप्राय आहे. महाभूतांपैकी चार भूते स-अवयव आहेत - पृथ्वी, आप (पाणी), तेज, वायू. त्यामुळे चार प्रकारच्या परमाणूंची कल्पना होते. ती भूते विभागत-विभागत जातात, आणि परमाणूंपर्यंत विभाग होतो, तोच प्रलयकाळ. तेव्हा सृष्टिकाळात वायूच्या अणूंमध्ये अदृष्टामुळे कर्म उत्पन्न होते. ते कर्म ज्या अणूत आहे त्याचा दुसर्‍या अणूशी संयोग होतो. अशा प्रकारे हे सर्व जग अणूंपासून संभव होते. धाग्यांपासून जसे कापड बनते, त्याच प्रमाणे अणूंचे जे काही स्वरूप आहे, त्यापासून द्वि-अणुकांचे स्वरूप संभवते, असे कणाद-संप्रदायातले लोक मानतात.

त्याबाबत असे म्हणतो - अणू जेव्हा विभागलेल्या अवस्थेत असतात, तेव्हा अणूंचा संयोग कर्मामुळे होतो, असे जाणले पाहिजे. कर्माने युक्त झालेले धागे एकत्र आलेले दिसतात. कर्म हे कशाचेतरी कार्य आहे, त्याचे निमित्त म्हणून काहीतरी जाणले पाहिजे. असे जाणले नाही, तर निमित्त नसल्यामुळे अणूंमध्ये पहिले कर्म होणार नाही. असे जाणले, समजा, आणि जसे निमित्त नेहमी दिसते तसे, म्हणजे प्रयत्न किंवा आघात-टक्कर ते निमित्त मानले म्हणा, तर ते असंभव आहेत, म्हणून अणूंमध्ये पहिले कर्म उत्पन्न होणार नाही. त्या अवस्थेत शरीरच नाही, तर आत्म्याचा गुण असलेला "प्रयत्न" संभव नाही. शरिरात मन असते, त्या मनाचा आत्म्याशी संयोग होतो, आणि आत्म्याच्या गुणाने प्रयत्न जन्मतो. याचमुळे टक्कर हे सुद्धा दृष्ट निमित्त नकारावे लागते. कारण या सर्व गोष्टी सृष्टीनंतरच्या आहेत, आणि त्या पहिल्या कर्माचे निमित्त होऊ शकत नाहीत. आता असे मानले की अदृष्ट हे कर्माचे निमित्त आहे, तर विचारू की हे अदृष्ट आत्म्याशी संबंधित आहे, की अणूंशी? दोन्ही पर्यायांत अदृष्ट हे अचेतन असल्यामुळे अणूंमध्ये कर्माचे निमित्त असू शकत नाही. जे अचेतन आहे, ते चेतनेचे अधिष्ठान असल्याशिवाय स्वतंत्र काही करू शकत नाही आणि काही करवू शकत नाही हे सांख्यांचे खंडन करताना सांगितलेच आहे. त्या अवस्थेत आत्मा उत्पन्न झालेला नाही, त्यामुळे आत्म्याचे चैतन्य नाही. जर असे म्हटले की अदृष्ट आत्म्याशी संबंधित असते, तरीही ते अणूंच्या कर्माचे निमित्त होऊ शकत नाही, कारण त्याचा अणूंशी संबंध येत नाही. अदृष्टाने युक्त आत्म-पुरुषाचा अणूंशी संबंध येतो, असे जर म्हटले तर तसा संबंध नेहमीच येणार, आणि कर्मही नेहमीच होणार, त्याला काहीच आडथळा नाही. अशा प्रकारे कर्माचे कुठले ठराविक निमित्त नसले तर अणूंमध्ये पहिले कर्म होणार नाही. कर्म झाले नाही तर त्यायोगे होणारा संयोग होणार नाही. संयोग झाला नाही तर त्यामुळे होणारी द्वि-अणुके होणार नाहीत.

अणूंचा दुसर्‍या अणूंशी संबंध होतो तो पूर्ण अणूशी होतो की एका भागाशी होतो? जर पूर्ण अणूशी सर्वात्मक संबंध होत असेल तर जोडून वाढ होणार नाही, आणि अणुमात्रच राहील, हे दिसते त्याच्या विपरीत आहे. अणूच्या एका भागाशीच दुसर्‍या अणूचा संबंध येतो असे म्हटले, तर अणूला भाग असतात असे म्हणावे लागेल. परमाणूंना भाग केवळ आपल्या कल्पनेत आहेत असेच म्हणू. तर या केवळ कल्पित भागांशी खर्‍याखरच्या "संयोग" वस्तूचे कार्य होऊ शकणार नाही. संयोग होऊ शकला नाही तर द्वि-अणुके ही घडवलेली द्र्व्ये उत्पन्न होणार नाहीत. जसे सुरुवातीच्या सृष्टीच्या काळात निमित्त नसल्यामुळे संयोगकर्म संभवत नाही, त्याच प्रकारे, महाप्रलयाच्या वेळेला निमित्त नसल्यामुळे अणूंचा विभाग होण्याचे कर्म संभवत नाही. त्याही ठिकाणी कुठलेही नियत किंवा अनियत दृष्ट असत नाही. अदृष्टही भोग घेता यावा यासाठी आहे, प्रलय व्हावा याकरिता नाही - निमित्त नसल्यामुळे संयोग होण्यासाठी किंवा वियोग होण्यासाठी अणूंचे कर्म संभवत नाही. संयोग आणि वियोग संभवणार नाही म्हणून सृष्टी आणि प्रलयही होऊ शकणार नाही. म्हणून परमाणू-कारण-वाद चालणार नाही.
(क्रमशः)
-----------
या लेखाबद्दल करण्यासारखी चर्चा ही :
१. कणादांनी अणू असल्याचे मत मांडले आहे. ते मत पटण्यासारखे आहे का?
२. शंकराचार्यांनी अणू नाहीत म्हणून खंडन दिले आहे. ते तुम्हाला तार्किकदृष्ट्या पटते का?
३. शक्यतोवर प्राचीन ग्रंथ वाचताना आपण त्याच्यानंतर लागलेले शोध मनात आणत नाही - मन त्या दृष्टीने स्वच्छ केले तर कणाद आणि शंकर यांच्यापैकी कोणाचे पटते?
४. आता आपल्याला जे काही शाळेत भौतिक-रसायनशास्त्र शिकवले आहे, ते माहीत आहे, असे समजा. कणादांच्या आणि शंकरांच्या विचारांचा आपण काय अर्थ लावू शकतो?

(शंकराचार्यांनी अणू नसल्याची अन्य प्रकारची खंडने सूत्र १३-१७ च्या भाष्यात केली आहेत. ती अनियतकाळाने क्रमशः देत राहीन.)