अणू आहेत की नाहीत? - अणुवादाचे प्राचीन खंडन (भाग २)

पुढील दोन सूत्रांचे भाष्य येथे देत आहे. पण मागच्या भागात असे लक्षात आले की वाचकांचे काही गैरसमज होते. त्याचे काही प्रमाणात सुरुवातीलाच निराकरण व्हावे.

काही उपक्रमींना वाटले की वैशेषिकांच्या अणुवादात नास्तिकत्व होते, ज्याचा शंकराचार्य विरोध करत होते. हे लक्षात असू द्यावे, की वैशेषिक हे नास्तिक नव्हेत. वैशेषिक हे एक आस्तिक तत्त्वज्ञान आहे. कणाद-संप्रदायाचे लोक वैदिक धर्म मोडू इच्छित होते, असा काही गैरसमज मागील लेखाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत जाणवला. तो विचार बरोबर नाही. वैशेषिक हे वैदिक धर्माचे समर्थक होते. "शंकराचार्यांनी वैदिक धर्म वाचवला" असा इतिहास आपण वाचला असल्यामुळे हा गैरसमज होत असेल का? पण त्या इतिहासाचा हा अर्थ घेऊ नये की शंकराचार्यांनी ज्यांचे-ज्यांचे खंडत केले, ते सर्व वैदिक धर्म बुडवायला निघाले होते. या लेखमालेत जे अधिकरण दिले आहे, त्याच्या आधीच्या एका अधिकरणात शंकरांनी सांख्य मताचे सांगोपांग खंडन केले आहे. आणि भगवद्गीता वाचलेल्यांना हे ठाऊक आहे, की त्यात सांख्ययोगाचे मंडन केले आहे, खंडन नव्हे. म्हणूनच शक्यतोवर शंकरांच्या म्हणण्याला कुठलाही वैदिक-धर्म-रक्षक अर्थ जोडू नये. या अधिकरणात वादविवाद करणारे दोन्ही पक्ष वैदिकच आहेत.

अनेक वाचकांना शंकराचार्यांची भूमिका "ऊर्जे"शी संबंधित वाटली, आणि वैशेषिकांची भूमिका ऊर्जा नकारणारी होती, असे वाटले. या गैरसमजाचे मूळ मला नेमके समजू शकले नाही. काही वाचक "ऊर्जा" शब्दाचा आधुनिक अर्थ लावत असल्याची शंका येत आहे. या आधुनिक कल्पनेचा ओढूनताणून संबंध लावायचाच असेल तर तो वैशेषिकांना सहज लागतो. आधुनिक "ऊर्जा" म्हणजे कार्याची राशी. क्रिया, क्रियाशीलता या गोष्टी वैशेषिकांना मान्य होत्या. प्रलयकाळात ही क्रियाशीलता "अदृष्ट" नामक तत्त्वात असते. त्यातील "क्रिये"शी संबंध येऊनच अणूंचे समूह एकत्र येतात. या कल्पनेत "आधुनिक" "ऊर्जा" कल्पनेचा संदर्भ लावायचाच तर लागतो. शंकरांची चेतना ही वेगळी. शंकरच तो वेगळा अर्थ समजावून सांगतात : "...आत्म्याचा गुण असलेला "प्रयत्न" संभव नाही. शरिरात मन असते, त्या मनाचा आत्म्याशी संयोग होतो, आणि आत्म्याच्या गुणाने प्रयत्न जन्मतो. ... चेतना... टक्करमध्ये नाही..." (मागच्या भागात.)

आधुनिक "ऊर्जा" टक्करेमध्ये असते. त्याचा "चेतने"शी संबंध लावणे म्हणजे शंकराचार्यांचे स्वतःचे मत आव्हेरणे होय. शक्यतोवर आधुनिक कल्पना शंकरांच्या किंवा कणादांच्या तोंडी घुसडण्याचा मोह आपण टाळला पाहिजे.

"भावानुवाद" म्हणून माझी मते घुसडली न जावी, अशी काळजी घेतली आहे. पण पल्लेदार वाक्ये तोडताना पूर्वीचे संदर्भाचे शब्द प्रत्येक छोट्या वाक्यात पुन्हा-पुन्हा घालावे लागलेत. त्यामुळे अनुवाद शब्दशः राहिलेला नाही, म्हणून त्याला "भावानुवाद" म्हटले आहे. संस्कृत पाठ्य येथे उपलब्ध आहे :
डीएलआय दुवा (Alterna Tiff पाने २३९ पासून पुढे. विसुनाना यांस धन्यवाद.)
एक इंग्रजी भाषांतर येथे दिसते :
इंग्रजी दुवा
काही लोकांना ते सोपे जावे. पण हे लक्षात असू देणे, की कधीकधी संस्कृतातला शब्द जसाच्यातसा मराठीत अनुवाद म्हणून येऊ शकतो, इंग्रजीत मात्र अर्थ कधीकधी थोडासा ढोबळ असतो.

भावानुवाद पुढे चालू.

--------
२.२.१३
(समूह-भाव मानला तर त्याच्याशी समान "अनवस्थिती" होते. )
समूह-भाव मानला तरी त्यांचा अभाव होतो, या अणुवादाच्या निराकरणाबद्दल हे आहे. तुम्ही (वैशेषिक) असे मानता : "दोन अणूंचे द्वि-अणुक जेव्हा निर्माण होते, ते दोन अणूंपेक्षा अत्यंत वेगळे असते - द्वि-अणुक म्हणजे अणूंचा समावेश करणारा समूह असते." अणूंना कारण मानून ही अशी कल्पना केली जाऊ शकत नाही. ते कसे? त्या कल्पनेचे आदल्या एका कल्पनेशी साम्य होते. एका कल्पनेतून दुसरी कल्पना निघत राहिल्यामुळे तर्काची अवस्था स्थिर होत नाही (अनवस्थिती होते).

अनवस्था या प्रकारे होते : अणूंपेक्षा अत्यंत वेगळे असलेले हे द्वि-अणुक समूह-भावाच्या खास गुणधर्मांमुळे उत्पन्न होते. त्याच्या आदल्या पायरीशी हे साम्य बघावे - "समूह-जोडणारा-संबंध" याचे गुणधर्म अणूंपेक्षा खूप वेगळे असतात, त्या "संबंधा"ला अणूशी जोडण्यासाठी आणखी एक वेगळा "अणूंशी-संबंध-जोडणारा-संबंध" मानावा लागेल. मग ते संबंध एकमेकांशी जोडण्यासाठी आणखी संबंध मानावा लागेल. ही "अनवस्था" आहे, म्हणजे एकापाठीमागे एक करत तर्क स्थिर होऊच शकणार नाही. पण (वैशेषिक म्हणतात) "अणू एकासारखे एक असतात. फक्त समसमान असलेल्या वस्तू एकत्र येतात समूह-भाव आम्ही मानतो. समूहात असा भाव नित्यच असतो. असंबद्ध गोष्टींना किंवा संबंधांना एकमेकांशी जोडणारा असा कुठला वेगळाच प्रकार इथे नाही. म्हणजे तर्काच्या समानतेने एकापाठीमागे एक तर्क जात नाहीत. कुठलाच स्थिर तर्क नाही अशी अनवस्थाही येत नाही." तर तसे नाही म्हणता येत. नाहीतर कुठल्याही दोन वस्तूंमधला संयोगही असलाच म्हणावा लागेल. तिथेही संयोग नित्य आहे, संबंधाची गरज नाही, असे मानावे लागेल. जसा वस्तूंमधला संयोग कुठल्या संबंधामुळे होतो, तो वेगळा "संबंध" मानावा लागतो, तसा समूहसुद्धा कुठल्या वेगळ्या "संबंधा"मुळे होतो. वैशेषिक म्हणतील की "दोन वस्तूंतला संयोग हा एक वेगळा गुण आहे, तिथे कुठलातरी वेगळा संबंध लागतो. समूह होणे हा काही वेगळा गुण नव्हे, म्हणून त्याला वेगळा संबंध लागत नाही." असे म्हणणे योग्य नाही. गुण असल्याचा मुद्दा येथे प्रस्तुत नाही. म्हणून "समूह" असा काही आहे, असे म्हणणार्‍यांना अनवस्थाप्रसंग येतोच. अनवस्था जर होणार असेल तर सगळे काही असिद्ध होते, आणि दोन अणूंचे द्वि-अणुक उत्पन्न होणारच नाही. म्हणूनसुद्धा परमाणु-कारण वाद उपपन्न होत नाही.

२.२.१४
(नित्यत्वामुळे)
अणू हे चार वेगवेगळ्या प्रकारे असू शकतात. (१) त्यांचा स्वभाव "प्रवृत्ती"चा असू शकतो (म्हणजे ते स्वगुणधर्मानेच क्रियाशील असतात), (२) त्यांचा स्वभाव "निवृत्ती"चा असतो (म्हणजे ते स्वगुणधर्माने निष्क्रिय असतात), (३) त्यांचा स्वभाव दोन्ही क्रियाशील-निष्क्रिय असा असू शकतो, किंवा (४) त्यांचा स्वभावात दोन्हीपैकी काहीच नाही, असे असू शकते. या चार पर्यायांवेगळा कुठलाच पर्याय राहात नाही. आणि चारही प्रकार चालणार नाहीत. अणू स्वभावतःच क्रियाशील असतील, तर नित्यच क्रियाशील राहातील आणि प्रलय होऊच शकणार नाही, असा प्रसंग येईल. अणू स्वभावतःच निष्क्रिय असतील, तर नित्यच निष्क्रिय राहातील, आणि सृष्टीच होऊ शकणार नाही. त्यांचा सक्रिय आणि निष्क्रिय असा दुहेरी स्वभाव अंतर्गत विरोधामुळे शक्य नाही. सक्रिय-निष्कियपैकी कुठलेच नाही, असे मानले तर प्रवृत्ती आणि निवृत्ती "अदृष्टा"त आहेत असे मानावे लागेल. निमित्त म्हणून अदृष्ट अणूंच्या नेहमीच जवळ असेल, म्हणजे अणू नेहमीच सक्रिय असतील. अदृष्ट नेहमी जवळ नसेल तर अणू अधीच सक्रिय असणार नाही असा प्रसंग येईल.म्हणूनही परमाणु-कारणवाद चालणार नाही.
------------

चर्चेस मुद्दे :
१. येथे शंकराचार्य "अनवस्था" ही कल्पना उपस्थित करतात. "अनवस्था" म्हणजे तोच तर्क एक पायरी मागेही लागू होणे, अशा पायर्‍या मागेमागे जात तर्क कधीच स्थिर न होणे. या कल्पनेला इंग्रजीत "इन्फिनिट रिग्रेस" असे म्हणतात. अनवस्था उत्पन्न करणारे तर्क आपल्या अनुभवातले आहेत. ४-५ वर्षांच्या लहान मुलांचा तो खेळ असतो - "आई-बाबा, आकाश निळे का असते?" आई-बाबा काही "अमुक" उत्तर देतात. मग बाळ पुन्हा "मग 'अमुक' का असते?" असे जेव्हा प्रत्येक पायरीवर करायला लागते, तेव्हा लवकरच आपल्याला लक्षात येते, या बाळाचे "पण ही पुढची पायरी का?" म्हणजे अनवस्था आहे.

अनवस्थेचा मुद्दा सांगून करून अणू-समूह=द्वि-अणुक होऊच शकत नाही, असे शंकर म्हणतात. त्यांचे म्हणणे तुम्हाला पटते का?

२. (वैशेषिकांचे अणू, किंवा अदृष्ट सक्रिय असतील-नसतील वगैरे शंकर म्हणतात. म्हणजे कोणा वाचकाला असे वाटत असेल की वैशेषिकांच्या पाशी "ऊर्जा" नाही, शंकर "ऊर्जा" असावी म्हणून खंडन करत आहेत, तर त्यांनी शंकरांचे शब्द नीट समजावून घ्यावेत.) शंकरांनी सक्रिय-निष्क्रिय वगैरे चार पर्याय दिले आहेत. पण "कधीकधी सक्रिय आणि कधीकधी निष्क्रिय" हा पर्याय दिलेला नाही. हा पर्याय द्यायला हवा होता काय? जे काही सक्रिय किंवा निष्क्रिय असेल ते नेहमीच असेल, नित्यच असेल, असे ते म्हणतात. हे सूत्र पटल्यास-न पटल्यास त्याची चर्चा करावी.

------
पहिल्या भागाचा दुवा