मराठीकरण आणि वैश्विक जाळे - संघटीत प्रयत्नांची गरज

लेखाच्या शीर्षकावरून लेखाचा हेतू स्पष्ट होत आहे असे समजून फारशी प्रस्तावना न लिहिता मी खाली मुद्देसूद माहिती मांडत आहे. सर्व तंत्रज्ञ, जाणकार, माहितगार, होतकरू मदतनीस, सुविधाकार यांनी एकत्र येऊन वैश्विक जाळ्याकरता आवश्यक असलेल्या सुविधा मोफत आणि मुक्तस्रोत स्वरुपात उपलब्ध कराव्यात/व्हाव्यात हा ह्या लेखामागचा हेतू आहे.

कोणतेही सॉफ्टवेअर,प्लगीन,टूल ( सर्वसमावेशक म्हणून यापुढे यासर्वांचा उल्लेख तंत्रसुविधा असा केला आहे) विकसित करताना विकासकार्यात पुढील टप्पे महत्त्वाचे ठरतात-

१) मागणी ( रिक्वायर्मेंट)
आपण तयार करत असलेल्या तंत्रसुविधेची गरज/मागणी नक्की काय आहे हे जाणणे.
२) विचारसरणी ( कन्सेप्चुअलायसेशन)
प्रत्य्क्षात केलेली मागणी आणि तांत्रिक बाबींची निकड कशी घालता येईल याबद्दल विचारसरणी ठरवणे.
३) आखणी ( प्लानींग)
गरजेची पूर्तता करण्यासाठी तंत्र, मनुष्यबळ, साहित्य-सुविधा, वेळ, पैसा यांची आखणी करणे.
४) बांधणी ( कोडींग)
योग्य तंत्रज्ञानाची निवड करून आणि विकसनाचे सर्वमान्य निकष आणि संकेत पाळून तंत्रसुविधेची बांधणी करणे.
५) चाचणी ( टेस्टींग)
विविध प्रकारच्या चाचण्या करून तंत्रसुविधेतील चुका शोधणे, दुरुस्त्या करणे इ.
६) श्रेणी ( क्वालिटी)
गरजेच्या पूर्ततेवरून विकसीत केलेल्या सुविधेची श्रेणी तपासणे.
७) मोजणी (क्वांटीफिकेशन)
सांख्यिकीनुसार विविध निकष पडताळून पाहणे ( उदा. साठवणक्षमता, वेग, उपलब्धता, कंपॅटीबिलिटी { याला मराठी शब्द सुचवा})
८) जोडणी (इंटिग्रेशन )
विकसीत केलिली तंत्रसुविधा इतर सुविधांबरोबर जोडता येणे.
९) परतावा (फीडबॅक)
सुविधा वापरणार्‍यांकडुन मिळणार्‍या सुचना,मदत, सुचवण्या इ.

वरील मुद्दे विचारात घेऊन ह्या घडीला वैश्विक जाळ्यावरच्या मराठीकरणाचे प्रमाणिकरण, एकत्रीकरण करून सुसुत्रता आणण्याची सुरुवात व्हायला हवी. त्या अनुषंगाने ज्या ज्या तंत्रज्ञ, जाणकार, माहितगार, होतकरू मदतनीस, सुविधाकार यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी इथे त्यांची मते मांडावीत.

प्रथमदर्शनी मला पुढील मागण्या दिसून येतात:

१)मराठीत उच्चारानुरूप टंकलेखनाकरता सुविधा
२) शुद्धलेखन तपासण्याकरता सुचिधा
३) स्वयंपूरक सुविधा ( ऑटोकम्प्लिट टूल)
४) स्वयंशुद्धी सुविधा (ऑटोकरेक्शन)
५)शब्दभांडार
६) ड्रुपल सारख्या सीएमएस बरोबर जोडणी आणि त्यांचे मराठीकरण
७) मराठीत गप्पा ( चॅट)

सद्ध्या उपलब्ध असलेल्या मुक्तस्रोत आणि मोफत सुविधा:
गमभन टंकलेखन सुविधा
शब्दभांडार
उपक्रम ( ड्रुपल आणि गमभनच्या जोडणीचे उदा.)
( मी सद्ध्या शुद्धलेखन तपासण्याकरता लागणार्‍या सुविधेवर काम करतो आहे. महत्त्वाचा गाभा तयार झाला आहे, शब्दशोध घेण्याकरता भरगच्च शब्दभांडाराची गरज आहे.)

वरील मागण्या आणि विकासातील टप्पे लक्षात घेऊन त्यांची पूर्तता करण्यासाठी तंत्रज्ञ, जाणकार/माहितगार, होतकरू मदतनीस, सुविधाकार, आर्थिक पाठबळ इ.ची गरज आहे.

तंत्रज्ञांसाठी निकष -
jsp,asp, java,perl,javascript,vbscript,php,drupal यापैकी एकाचे/एकापेक्षा जास्ती तंत्रज्ञानात गती असणे आवश्यक.

मदतनीस -
शब्दभरणा, चाचण्या, सुचवण्या, गरजा, बदल इ. बाबत मदत आणि मते पुरवणार्‍यांची गरज आहे.

भाषाविषयक जाणकार -
भाषेचे व्याकरण,लिपी, प्रमाणीकरण इ.चे ज्ञान असलेल्यांची गरज आहे.

सुचिधाकार -
तंत्रसुविधा चालवण्याकरता, चाचण्यांकरता, वापरण्याकरता जाळ्यावर जागा आणि सुविधा पुरवणार्‍यांची गरज आहे.

मूलभूत सुविधांकरता टाळता न येणारे आर्थिक व्यवहार करण्याकरता आवश्यक वाटल्यास आर्थिक पाठबळाची गरज लागू शकते.

वरील गरजा लक्षात घेऊन प्रत्येक गरजेकरता नवा लेख लिहिला जावा जेणेकरून व्यवस्थापन करणे सोपे होईल.
त्यानुसार लेखांचे आणि प्रतिसादांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असावे असे वाटतलः

लेख
लेखाचे शीर्षक : गरज
मजकूर : सामान्य भाषेत मांडलेल्या मागण्या.

प्रतिसाद
शीर्षक : विकासकार्यातील टप्पा
मजकूर : बदल , सुचवण्या, प्रगती, अडचणी,निकष यांबद्दल उहापोह

आधीच म्हटल्याप्रमाणे हे सगळे प्रयत्न मोफत आणि मुक्त स्रोत राहतील याची सर्वानी दखल घ्यावी.

आपल्या सर्वांच्या सहभागाची आणि मतांची वाट पाहतो आहे.

Comments

थक्क!

ओंकारशेठ,

तुझा उत्साह पाहून थक्क झालो रे बाबा! खरंच तुझं खूप कौतुक वाटतं!

सर्व तंत्रज्ञ, जाणकार, माहितगार, होतकरू मदतनीस, सुविधाकार यांनी एकत्र येऊन वैश्विक जाळ्याकरता आवश्यक असलेल्या सुविधा ..

'होतकरू मदतनीस' म्हणून मला जमेस धरायला हरकत नाही! बाय द वे, 'होतकरू मदतनीस' हे शब्द मला प्रचंड आवडले! ;)

मूलभूत सुविधांकरता टाळता न येणारे आर्थिक व्यवहार करण्याकरता आवश्यक वाटल्यास आर्थिक पाठबळाची गरज लागू शकते.

जरूर कळवा मालक! ऐपतीप्रमाणे खारीचा वाटा उचलयला मला निश्चितच आनंद वाटेल!

कितना पेटी भेजनेका बॉस? बोलो.. ;)

आपला
(होतकरू मदतनीस!) तात्या.

मदतनीस !

म्हणून मी काम करायला तयार आहे, मात्र मी त्यासाठी पात्र आहे की नाही हे व्यक्तिगत संवादातून ठरवता येईल. त्यासाठी मी आपल्याला व्यनि मधून माझा संपर्कासाठीचा तपशील देत आहे.

मराठीत गप्पा ( चॅट)

अक्षरमाला+गूगलटॉक वगैरे वापरून सध्याही मराठीत गप्पा मारता येतातच. ही सोय संकेतस्थळावर देण्याबद्दल म्हणत असाल तर मराठीचा अडसर नसावा.गॅबर की काय.. त्याची मदत घेता येईल असे वाटते.
~ तो ~

एक पायाभूत सुविधा

याहूकरता मी गमभनचे प्लगीनही उपलब्ध केलेले आहे. याहू इंडीचॅटसारखेच हेही कार्य करते, परंतु याहूने अजून यास मान्यता दिलेली नाही :(.

बहुतांश निरोपकांवर मराठीत गप्पा मारण्याकरता एकच जोडता येण्यासारखी सुविधा असावी का? ह्या हिशोबाने काही प्रयत्न करता येतील का याबबत विचार करता येईल का?
ड्रुपल वर गप्पाष्टकांसाठी मोड्यूल उपलब्ध आहे, पण ते नीटसे चालत नाही. कोणी वापरले/सुधारले आहे का?

:)

सोर्सफोर्ज वरील आपला प्रकल्प पाहिला. रुपडे उत्तम आहे. तेथे उपलब्ध असलेल्या सुविधा, साठवण क्षमता ह्या बाबींनी विकासकार्यात काही अडसर निर्माण होणार नसेल तर माझी काही हरकत नाही.उपक्रम हे ह्याविषयीचे माहितीचे आदान प्रदान केंद्र ठरवले आणि तांत्रिक सोईंची पूर्तता करणारे एक दुसरे छप्पर उपलब्ध असले तर चांगलेच आहे. ह्याबाबत सविस्तर बोलून कल्पना राबवायला आवडेल.

मदतनीस

मी मदतनीस तसेच प्रकल्प व्यवस्थापका प्रमाणे कार्य करण्यास तयार आहे.

मी पण्

मी पण मदतनीस म्हणून मिळेल ते करण्यास तयार आहे.

पाठबळ

सर्वांचे मिळणारे पाठबळ बघून हुरूप आला आहे. लवकरच उपक्रमावर प्रत्येक मागणीसाठी नवा लेख आणि प्रतिसाद दिसायला लागतील अशी अपेक्षा ठेवण्यास हरकत नसावी. सर्व उत्साही मंडळींचे आभार. लवकरच प्रत्येक भूमिकेचे कार्य विषद करण्याचा सर्वांनी प्रयत्न करूया. उपक्रमी आपल्या ओळखीच्या इच्छुक व्यक्तीपर्यंत माहिती पोहोचवतील आणि प्रयत्न अधिकाधिक सुलभ होत जातील अशी आशा बाळगतो.

विकी आणि मराठीकरण

विकीवरील मराठीकरणाने अजून बाळसे धरलेले नाही. मध्ये अभय नातु यांच्याशी बोलणी झाली होती. त्यानुसार गमभन ची विकी मध्ये जोडणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. परंतु अद्याप यश आलेले दिसत नाही. विकीचा गाभा माझ्या परिचयाचा नसल्याने मला मदत करणे कठीण जात होते. त्याचवेळी युकेश,तांत्री इ. विकीसदस्यांनी नेपाळी आणि तत्सम काही २-३ लिप्यांसाठी गमभन मध्ये सुयोग्य बदल करून वि़कीबरोबर जोडून ते कार्यरत केले. मराठी विकीवरील प्रयत्न कोठे खोळबले आहेत याबद्दल कोणाला काही कल्पना आहे का?

विकीवरील मराठीकरण

माहीतगार यांनी "कळफलक प्रमाणीकरणाचा विचार व्हावा" अशी सूचना केली. तर अभय नातू यांनी "ज्यांना हवे त्यांना ही सोय उपलब्ध असावी, ती ही येण्याची नोंद केल्यानंतर" असे मत मांडले आहे.
एकूणच १६ डिसेंबर पासून ही बाब प्रलंबित आहे.

मी ही सोबत आहे .

मी पण मदतनीस म्हणून मिळेल ते करण्यास तयार आहे.

नीलकांत

तंत्रसुविधा चालवण्याकरता

तंत्रसुविधा चालवण्याकरता, चाचण्यांकरता, वापरण्याकरता जाळ्यावर जागा आणि सुविधा पुरवणार्‍यांची गरज आहे.

मी जागा व संकेतस्थळाचे नाव देत आहे जर उपयोगी असेल तर संपर्क साधा ! rajkiranjain@gmail.com

राज जैन

 
^ वर