आजी-आजोबांच्या वस्तु - ३ (मोजमापे)

आजी आजोबा आले तेव्हापासुन घरात माझा वेळ मस्त जातो. आधी फक्त टिव्ही बघ, नाहीतर गेम्स, नाहीतर क्रिकेट काहिच नाही नाही तर दादाला त्रास दे आणि तो ही नसला तर अभ्यास यात सगळा वेळ जायचा. आजी आजोबा आले आणि माझं टाईमटेबल बदलूनच गेलं. मी हल्ली आजी बरोबर सकाळी फुलं तोडायला जातो. सॉरी! वेचायला किंवा खुडायला (आजी रागवते तोडायला म्हटलं तर्!) मला ह्या फुलांची नावंच माहित नव्हती, पण आता मी अजून हुशार झालोय. मला जास्वंद आणि गुलाब माहित होते. पण आता मोगरा, कण्हेर, प्राजक्त ही पण फुलं माहित आहेत. आजीने तर बिट्टी आणि गोकर्णातील फरकही समजावून सांगितला आहे.
काल आजी म्हणाली, "आपण मैलभर पुढे जाउया का रे? तिथे शंकराचं देऊळ आहे ना!"
मला हे देऊळ पक्क माहित आहे. तिथे एक भेळवाला पण बसतो. " हो पुढे आहे एक देऊळ. जाऊ आपण" मी आजीचा हात धरून तिला देवळात घेऊन गेलो. भेळ पण खाल्ली. आणि फ्रि पुरी पण! परत घरी जात होतो.. अचानक आठवलं म्हणून विचारलं, "आजी, मैल बरोबर का मीटर? का आपण मराठीत मीटरला मैल म्हणतो?".
"नाहि रे, मीटर किलोमीटर आत्ता वापरतात. आधी आम्ही मोजायला मैलच वापरायचो. बहुतेक गोरे वापरायचे मैल. "
"गोरे म्हणजे आपले समोरचे गोरे काका?"
"नाहि रेऽऽऽ" आजीने परत हसायला तोंडाला पदर लावला. "गोरे म्हणजे इंग्रज!"
"अच्छा, म्हणजे ब्रिटिश!" मी तसा हुशार आहे कळलं मला लगेच! बोलता बोलता आम्ही घरी येऊन पण पोचलो. आजीने जरा हुऽऽश्श् केलं आणि आजोबांना म्हणाली "भारी चौकस होऽऽ नातु तुमचा. तुम्हीच सांगा आपण लांबी कशी मोजायचो ते"
"काय रे, कसली लांबी??"
तसा मी हुशार आहे, मी लगेच सांगितलं "लांबी म्हणजे लेन्थ!" आजोबा हसले.
"आस्स् का?अरे आम्ही छोट्या लांब्या इंचात मोजायचो. तुझ्या फुटपट्टीवर अजून इंच आणि सेमी दोन्ही असतं की नाही. आणि अजून मोठं अंतर फुटात. आणि त्याहुन लांब अंतर मैलामधे. "
"म्हणजे तुमच्यावेळी पण फुटपट्टी होती?"
"हो ही बघ"

आबांची ती फुटपट्टी बघुन मला मजा वाटली. एकदम जूनी फोल्डिंग फुटपट्टी होती.
"आरे लांबीचं तरी ठिक होतं, वजनं मात्र तुमच्यापेक्षा फार वेगळी होती."
"म्हणजे?"
"सोनं, चांदी अश्या गोष्टी छोट्या तराजूत तोलायचे त्याला तागडी म्हणायचे. हे बघ ही सध्या वापरतात त्या तागडीचं चित्र आलं आहे. आणि ही आमच्यावेळची तागडी"
         

"यात एका बाजूला गुंजा घालायच्या आणि दुसर्‍या बाजूला सोनं"
"गुंजा म्हणजे?"
"गुंजा म्हणजे एक बी असते. एका शेंगेत ४-५ गुंजा निघतात. ही चित्रं बघ......     

....गंमत अशी की प्रत्येक गुंजेचं वजन एकदम सारखं असतं"
"ही गुंज काय मस्त दिसते नाही" मला ही गुंज फार आवडली. लाल चुटुक.
"आता पण मिळतात गुंजा?"
आजी म्हणाली "हो मिळतात की, आता शंकराच्या देवळामागे मला दिसल्या गुंजांच्या वेली, परत गेलो ना देवळात की दाखवीन होऽऽ"
तसा मी हुशार आहे. " पण जर खुप जास्त सोनं हवं असेल तर कीतीतरी गुंजा लागतील."
"बरोब्बर म्हणून जास्त वजनासाठी तागडीबरोबर इतर वजनमापंही  वापरायचे. जसे वाल, कवड्या वगैरे. पण वानरं आल्यावर आमच्या लहानपणीच हल्ली वापरतात तशी मापे वापरायला सुरवात झाली होती."
"वानरं म्हणजे माकड ना?"
" हो, पण इंग्रजांची नाकं आणि गाल लाल असायचे अगदी आपल्या हुप्प्या वानरासारखे, म्हणून त्यांना वानरं म्हणायचो आम्ही!"
" आपल्याकडे माळ्यावर एक तागडी आहे ना रे?" आबांनी बाबांना विचारले. "हो पण आपण नंतर बघुया का?" बाबा पेपर वाचत होते. पण आबांनी त्यांच न ऐकता त्यांना माळ्यावरून ती तागडी काढायला लावली

"वॉव, किती मस्त! त्याच्याबरोबर वेगवेगळी वेट्स म्हणजे आबा म्हणतात तशी वजनमापे होती.  आबा म्हणाले "जा आतून एक वाटीभर चणे घेऊन ये. आणि ते या एका बाजुला घाल. आता या चण्याचं वजन करायचय आपण. कीती असेल?"
"असेल खुप"
"खुप म्हणजे? १००ग्रॅ., २००ग्रॅ? की एकदोन ग्रॅ?"
"..." मी वेड्यासारखा बघतच राहिलो. आता मला कसं कळणार!
"बरं, असं करु या दुसर्‍या बाजूला १०० ग्रॅ. च वजन टाक"
तिथे वजन ठेवल्या ठेवल्या ती बाजू एकदम खाली गेली. म्हणजे चणे १०० ग्रॅ.पेक्षा कमी वजनाचे होते.
"आता ५० बघ घालून"
पण ५० घातल्यावर चण्याचं वजन जास्तच राहिलं.

123
"आबा आपल्याकडे १०० आणि ५० याच्यामधलं वजन् कुठे आहे?"
"हुशार आहेस!" (आहेच मुळी) "अरे, मग त्याच बाजुला आणखी २०ग्रॅ चं घाल"
"पण मग आता वजन जास्त झालय"
4

"आता गंमत करू. चण्याच्या बरोबर आणखी ५ ग्रँ.चं वजन घाल"

5
"सह्ही!! काटा बरोब्बर मधे आलाय! म्हणजे वजन कीती?"
तसा मी हुशार आहे "७०-५ बरोबर ६५ ग्रॅम!!!"
"कर्रेक्ट!!" आजोबा असं मधेच इंग्रजी बोलले की फार गंमत वाटते. आजोबांनी मग एक कॅडबरीपण दिली
आता मी ठरवलंय की ओमला बोलावून आमच्या सगळ्या जिआयजोंचीं वजनं करायची. तुम्हीपण कुठुन तरी तागडी मिळवा आणि स्वतः वेगवेगळ्या वस्तुंची वजन करून बघा. खुप मजा येते!

टिपः बाकी श्री. प्रकाश घाटपांडे यांनी जालावर चढवलेली तागडीची चित्रे मुलांना येथुन दाखवता येतील

Comments

छान माहिती..

जुन्या कोष्टकामाणे
१२ इंच = १ फूट
३ फूट = १ यार्ड
२२० यार्ड = १ फर्लांग
८ फर्लांग = १ मैल

अर्थात १७६० यार्ड म्हणजे १ मैल (माझ्या आजीच्या तोंडी "भरपूर" या अर्थी "सतराशे साठ" असा शब्द असे : सतराशे साठ प्रश्न् विचारू नकोस , त्याचे मूळ हे का?)

भारताने दशमान पद्धत स्वीकारून ५० वर्षे झाली. आता आम्ही लांबच्या अंतरासाठी कि.मी अगदी सहज वापरतो. पण, लहान अंतरासाठी अजूनही जुनी परिमाणेच वापरतात. जसे की उंची अद्याप फूट-इंचातच आणि कुणी नवा फ्लॅट घेतला की किती स्क्वेअर फूट असेच विचारले जाते.

(जाता जाता : अगदी प्रत्येक ठिकाणी दहाच्या पटीत असणारी दशमान पद्धत स्वीकारण्याची गरज होती काय? जिथे फारशी आकडेमोड करावी लागत नाही तिथे जुनीच पद्धत ठेवली असती तर काय बिघडले असते? अमेरीकेने नाही का बर्‍याच ठिकाणी जुनी imperial पद्धत ठेवली? काय बिघडले त्यांचे?)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चांगला लेख

ऋषीकेश,

हा लेखही चांगला उतरला आहे. इलेक्ट्रॉनिक वेईंग मशिन्सवर सामान मोजणार्‍या परदेशातील आजच्या पोरांना तागडी, तराजू आणि आपण भाजीवाल्यांकडे पाहतो ती काळी षटकोनी वजनेही पहायला मिळत नाहीत.

या लेखाला कमी प्रतिसाद मिळण्याचे कारण येथील "रत्तीची मणभर" चर्चा आधीच झाल्याने असावे. :) तरी, या धर्तीचा पुढचा लेख टाकावास. हा उपक्रम सुंदर होतो आहे. भविष्यात हे सर्व लेख संकलीत करून त्याचे पुस्तक छापता येईल. (त्यावेळेस आभारप्रदर्शनात माझे नाव टाक हो! ;-) ह. घे.)

पु.ले.शु.
प्रियाली.

धन्यवाद

सुनील व प्रियालीताई प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

प्रियालीताई,
या लेखाला कमी प्रतिसाद मिळण्याचे कारण येथील "रत्तीची मणभर" चर्चा आधीच झाल्याने असावे
हा हा काही हरकत नाही हो.. नाहितरी या लेखाचा टार्गेट ऑडियन्स इथे नाहि आहे. त्यामुळे त्यांना आवडला की झालं :)

तरी, या धर्तीचा पुढचा लेख टाकावास
नक्की! असा सोडणार नाही मी :प, कमी प्रतिसादमुळे मी काहि थांबणार नाही, काळजी नसावी :प्

(ह घ्या हे सांगणे नलगे)

-ऋषिकेश

हे आवडले..

कमी प्रतिसादमुळे मी काहि थांबणार नाही, काळजी नसावी
मलाही प्रियालीसारखेच वाटते - उपक्रम चालूच ठेवावा, चित्रे फार छान.
माझ्या पहिलीतल्या मुलीला वाचून दाखवते हा लेख आज-उद्याकडे आणि मग तिला काय कळले/कळले नाही ते सांगते.

 
^ वर