पल में तोला पल में माशा आणि सत्यनारायणाचा प्रसाद.

सत्यनारायणाच्या प्रसादासाठी सवामण रवा अणि सवा बाराशेर तूप लागले यावरून बर्‍याच अटकळी मांडण्यात आल्या. शेर आणि मण या परिमाणांत ज्यांनी कधीही काहीही मोजलेले नाही ते तिथेच गारद झाले. ;-) यावरून खालील विषयाची आठवण झाली.

आपल्या पूर्वजांना जेव्हा मोजमापे घेण्याची गरज भासू लागली तेव्हा परिमाणांसाठी त्यांनी नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग सुरु केला हे जागतिक इतिहासात दिसून येते. जसे,

 1. लांबी, रुंदी मोजण्यासाठी माणसाने आपली बोटे, तळहात, पावले यांचा वापर केला. वीत, फूट इ. परिमाणे त्यातून उगम पावली.
 2. वजनाच्या परिमाणांसाठी त्याने बियांचा आणि धान्याचा वापर केला. रत्ती, माशा, तोळा ही परिमाणे त्यातून उगम पावली.
 3. द्रव मोजण्यासाठी त्याने ओंजळ आणि त्यानंतर जनावरांच्या कातडीपासून बनवलेल्या द्रोणांचा वापर केला. छटांक, शेर ही परिमाणे त्यातून उगम पावली.
 4. वेळ मोजण्यासाठी अर्थातच, ग्रह तारे यांचा वापर केला गेला. प्रहर, पळ इ. परिमाणे त्यातून उगम पावली.

यापैकी अनेक शब्द आपण रोजच्या भाषेत नेहमी वापरतो.

जसे,

 • बाईच्या अंगावर रत्तीभर सोने नव्हते.
 • शेरास सव्वाशेर भेटला.
 • हसिनाओंकी अदा का क्या कहेना? पलमें तोला पलमें माशा।

वगैरे वगैरे वगैरे पण त्यांचे नेमके अर्थ फारच कमीजणांना माहित असावेत असे वाटते. चू. भू. दे. घे.

रत्ती, तोळा, माशा यांचा परस्परसंबंध असा सापडला.

८ रत्ती = १ माशा
१२ माशा (की माशे?) = १ तोळा
५ तोळे = १ छटांक
१६ छटांक = १ शेर
४० शेर = १ मण.

एक रत्ती हे अदमासे ०.१२२ ग्रॅम असते. तर १ शेर म्हणजे ९३३.००५ ग्रॅम आणि १ मण म्हणजे ३७३२०.१८२ ग्रॅ.

 1. यापैकी कुठेतरी वाचल्याप्रमाणे रत्ती म्हणजे बार्लीच्या बिया. याप्रमाणेश माशा हे ही किडनी बीन्स (राजमा? चवळी? किंवा तत्सम) असल्याचे वाचले होते. यावर कोणाला अधिक माहिती असल्यास प्रकाश टाकू शकेल काय?
 2. १ रत्ती हे परिमाण कसे मोजले गेले असावे?
 3. बार्लीला मराठी प्रतिशब्द कोणता?
 4. कवडी हे ही एक पुरातन परिमाण बिया किंवा अशाच काही नैसर्गिक साधनांपासून बनवले होते का?
 5. अशी आणखी परिमाणे आढळल्यास त्यांची माहिती द्यावी.

Comments

रत्ती म्हणजे गुंज

रत्ती म्हणजे गुंज असेही मागे कोणीतरी सांगितल्याचे आठवते. गुंजीचा उपयोगही अनेक वाक्यांतून होतो. जसे "गुंजभर सोने" हे परिमाण वापरले जाते.

तेव्हा रत्ती म्हणजे नेमके काय? बार्ली की गुंज हे जाणकारांनी कृपया सांगावे.

बार्लीचा एकच महत्त्वाचा उपयोग माहिती असणार्‍यांनी चर्चा कृपया भरकटवू नये. - ह. घ्या.

गुंजांची माळ
बार्ली

गुंजेचा

>गुंजीचा उपयोगही अनेक वाक्यांतून होतो.
गुंजेवरून मराठीत अनेक वाक्प्रचार आले आहेत. उदा: हत्तीला जाऊ दिले आणि गुंजेला मारले!--वाचक्‍नवी

हे असे का?/ कपर्दिक

कवडी हे कवच असल्याचे मीही आताच वाचले होते. तेव्हा हे चित्र सापडले.

बार्लीला जव म्हणत असावेत. मलाही वाचल्यासारखे आठवते पण आता आठवले आठवण करून दिल्यावर. :)

---

कपर्दिक असेही एक परिमाण आठवते. कपर्दिक म्हणजे कवडी की वेगळे काही? तसेच कवड्या या फक्त खेळांत वापरल्या जात नसाव्यात. त्यांना मूल्य असावे असे वाटते.

एक फुटकी कवडी मिळणार नाही माझ्याकडून - या वाक्यात त्या कवडीचे मूल्य दिसते. चू. भू. दे. घे.

जवच..

बार्लीचा एकच महत्त्वाचा उपयोग माहिती असणार्‍यांनी चर्चा कृपया भरकटवू नये. - ह. घ्या.

मुद्दा व्यवस्थित लक्षात घेतला!

बार्ली म्हणजे जव.

आणि कवडीचा अर्थदेखील वर टग्या यांनी सागीतल्याप्रमाणेच.

गुंज

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
गुंजेची वेल असते. त्या वेलीला शेंगा येतात. एका शेंगेत ३ किंवा ४ गुंजा असतात.(बहुधा ) गुंज लाल भडक रंगाची असून तिच्या मुखाच्या ठिकाणी काळा रंग असतो.सर्व गुंजा सारख्या आकाराच्या असतात (जवळ जवळ). त्या कधी खराब होत नाहीत. तसेच त्या टणक असल्याने झिजत नाहीत. म्हणून त्या वजनासाठी वापरल्या असाव्या.
..गुंजेचा रंग लाल असल्याने तिला 'रक्ती' असेही नाव आहे. त्यावरून ' रत्ती' असा अपभ्रंश झाला. " रत्ती म्हणजे गुंज " असे प्रियाली यांना वाटते ते अगदी बरोबर आहे.

रक्ती/रत्ती

गुंजेचा रंग लाल असल्याने तिला 'रक्ती' असेही नाव आहे. त्यावरून ' रत्ती' असा अपभ्रंश झाला.

हे अगदी पटण्यासारखे वाटले. धन्यवाद!

आपल्याकडे अजून अशी माहिती असल्यास कृपया येथे देणे.

गुंजा

भारतात गुंजाच वापरल्या जात होत्या हे नक्की. याची विषेशता म्हणजे याच्या प्रत्येक बीचे वजन तीन दशांशापर्यंत सारखे असते (आकार काहिही असला तरीही) आमच्या विज्ञानाच्या सरांनी खास गुंजा आणून (मुंबईत दहिसरला अजुनही गुंजाची अनेक झाडे आहेत) इलेक्टॉनिक वजनमापकावर वजन करून दाखवल्याचं आठवतय!

बाकी आजीच्या तोंडून छटाक हे परिमाण सोन्याच्या बाबतीत ऐकलं नाही. ऐकलं आहे ते कोष्टक असं (ऐकीव माहिती. चुभुदेघे):
८गुंजा = १ माशा
१२ माशे = १ तोळा
८० तोळे = १ शेर
४० शेर = १ मण

छटाकभर

याची विषेशता म्हणजे याच्या प्रत्येक बीचे वजन तीन दशांशापर्यंत सारखे असते (आकार काहिही असला तरीही) आमच्या विज्ञानाच्या सरांनी खास गुंजा आणून (मुंबईत दहिसरला अजुनही गुंजाची अनेक झाडे आहेत) इलेक्टॉनिक वजनमापकावर वजन करून दाखवल्याचं आठवतय!

वा! ही माहिती विशेष वाटली.

छटांक हे परिमाण प्रसिद्ध असावं. छटांकभर दूध, छटाकभर नखरा इ. शब्द अद्यापही वापरात आहेत. ते अधिक करून द्रवाच्या मोजमापासाठी वापरले जात असल्याने सोने मोजताना गाळले जात असावे.

इंग्रजी वजनामापांशी संबंध

आम्हाला शिकवला गेलेला तोळा व इंग्रजी वजनांचा संबंध खालीलप्रमाणे आहे.

अडीच तोळे = १ औंस्
१६ औंस् = १ पौंड्
२८ पौंड् = १ क्वार्टर्
४ क्वार्टर् = १ हंड्रेडवेट्
२० हंड्रेडवेट् = १ टन्

माशाअल्ला!

हे माशा मराठीत माशा रहात असावं की मासा होत असावं असा प्रश्न पडला होता पण तोळामासा नेमकं आठवलं नाही. ते मासा होत असावं हे या प्रतिसादाने समजलं.

असो.

माशाअल्ला मधला माशा कोणता असावा? ;-)

अजून दोन मापे

पायली = ??
पसाभर = ??

पावशेर...अवांतर

गज़लेत कमीतकमी पाच शेर तरी असावेत

काही शायर "पावशेर" टाकल्याशिवाय हे पाच शेरदेखील लिहू शकत नसत, असे म्हणतात!

पासरी

आम्ही शाळेंत शिकलो त्याप्रमाणे चार शेर म्हणजे एक पायली व पाच शेर म्हणजे एक पासरी. (एखादी गोष्ट स्वस्त असली की पैशाला पासरी असे तिचे वर्णन करीत)

पसाभर

पसाभर--एका हाताच्या ऒंजळीचे माप.
पायलीभर- पाच शेर(वजनी किंवा मापी)
पासरी--पाच शेराचे वजन.
ही घ्या अजून मापे:--१मापटे किंवा निठवे = अर्धा शेर.
एक चिपटे = एक पावशेर. = १/४ शेर.
१ निळवे = १/१६ शेर = १ छटाक.
१ कोळवे = १/८ शेर = १ अदपाव.
वजने: --टांक = १/७२ शेर.
नवटाक = १/८ शेर.
--वाचक्‍नवी

मस्त

खूप माहिती मिळाली. कितीतरी शब्द अर्थ न कळता वापरतो ते जाणवते.. निठवे ऐकल्यासारखे वाटते - लहानपणी असणार.

एक प्रश्न -
आणि मग हे पण नवटाक कसे?

हे पण नवटाक- असे.

तिथे आलेला'नवटाक' म्हणजे पावशेर (दारू). नवटाक हे पावशेराचे वजन असते तसे मापपण आहे. --वाचक्‍नवी

कवडी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
कवडी हे अगदी कमी मूल्याचे नाणे म्हणून पूर्वी वापरात होते.(त्यावरून कवडीमोल ).भास्कराचार्यांच्या लीलावतीत (इ.स.११५०) नाण्यांचे कोष्टक पुढील प्रमाणे आहे:
२० कवड्या=१ काकिणी
४ काकिणी=१ पण
१६ पण= १ द्रम्म (या द्रम्म वरून दाम शब्द आला. "दाम करी काम")
१६ द्रम्म = १ निष्क
........
लीलावतीतच सोन्याच्या वजनाचे कोष्टक पुढील प्रमाणे आहे:
२ यव (जव,बार्ली)= १ गुंज
३ गुंजा= १ वाल
८ वाल= १ धरण
२ धरण = १ गद्यानक

निष्क, द्रम्म वगैरे आणि वाल

द्रम्मचा ग्रीक नाण्यांशी संबंध असणे अगदी शक्य आहे. निष्क हा ही रोमन शब्द आहे. आभूषणांसाठी वापरला जाई. यांत एक गोष्ट वाचल्याची आठवते पण संदर्भादाखल पुरावे देणे सध्या शक्य नाही.

रत्ती, निष्क ही आधी परिमाणे होती. वजनाकरता वापरली जात. कालांतराने चलनासाठी नाणी पाडली गेल्यावर त्यांना त्या त्या वजनाच्या नाण्यांचे स्वरूप आले. वेदांत निष्क हा शब्द येतो म्हणतात (चू. भू. दे. घे तसेच संदर्भ हवा.) परंतु वैदिक काळात नाणी नव्हती. तेव्हा ही धान्याच्या रुपाने वापरण्यात येणारी परिमाणे असावीत.

ग्रीकांच्या आक्रमणानंतर संपूर्ण भारतवर्षांतील नाण्यांच्या वापरांत अमूलाग्र बदल घडून आला. त्याबरोबरच, निष्क, द्रम्म ही नावे नाण्यांना दिली गेली असावीत. यनांच्या प्रतिसादातील कवडी, पण, निष्क, द्रम्म हे नाण्यांचे चलन वाटते.

यनांच्या प्रतिसादांत वाल येतात. वाल म्हणजे बीन्स. मासा हे परिमाण किडनीबीन्सचे असे वाचले होते. ते हेच असावे.

धरण आणि गद्यानक मात्र समजले नाही. :(

धरण आणि गद्यानक(गद्याण)

यादवनृपति कृष्णदेवराय याच्या नांदगाव येथील शिलालेखाची माहिती वाचताना गद्याण (गदियान) हा शब्द वाचण्यात आला.
नांदगाव हे वर्‍हाडातील उमरावतीच्या ईशान्येला २० मैलावर असलेले एक खेडे. तिथे गावाबाहेर एका टेकडीवर खंडेश्वर, नरसिंह आणि देवी या तीन देवतांचे मिळून एक समान सभामंडप असलेले देवालय आहे. या देवालयाच्या बाहेरील भिंतीवर हा शिलालेख कोरलेला आहे. शिलालेखाचा काळ शके ११७७. इसवी सन १२५४-५५.
या लेखाचा उद्देश काही लोकांनी खंडेश्वराच्या देवळांत लाखोली(लक्ष फुले) वाहण्यासाठी गद्याण नामक नाणी दिली हे नमूद करण्याचा आहे.
गद्याण किंवा गदियाण हे लहानसे सोन्याचे नाणे महाराष्ट्रात प्रचलित होते. शके ९३० च्या खारेपाटणच्या लेखात परदेशाहून येणार्‍या प्रत्येक जहाजावर एक सुवर्ण गद्याण शुल्क आकारले जात होते, असे म्हटले आहे. एक गद्याण म्हणजे यनावालांनी लिहिल्याप्रमाणे ४८ गुंजा वजनाचे सोन्याचे नाणे. लीलीवतीतील प्रस्तुत श्लोक:

तुला यवाभ्यां कथितात्र गुंजा बल्लस्त्रिगुंजो धरणंच तेSष्टौ ।
गद्यानकस्तद्‌द्वयमिन्द्रतुल्यैर्बलैस्तथैको धटक: प्रदिष्ट: ॥


संस्कृत शब्दकोशात गद्यान(ल)क चा अर्थ ४८ गुंजा वजन असा दिला आहे. धरण म्हनजे १० पल किंवा २४ रती(गुंजा) असेही म्हटले आहे.
--वाचक्‍नवी

नाणी...अवांतर

गद्याण किंवा गदियाण हे लहानसे सोन्याचे नाणे महाराष्ट्रात प्रचलित होते

त्याकाळी भारतात अनेक राज्ये होती (अगदी १९४७ पर्यंत) आणि प्रत्येक राज्याने बहुदा आपापली चलने व्यवहारात आणली असावीत.शिवाजीनेदेखील राज्याभिषेकानंतर आपली वेगळी नाणी बनवून घेतली होती.

आता या विविध नाण्यांचे विनिमय दर काय असावेत आणि ते ठरविणारी कोणती यंत्रणा त्याकाळी अस्तित्वात होती?

बिघा..

ही चर्चा वजनांच्या एककांपुरती मर्यादीत आहे की त्यात इतरही गोष्टी जसे की क्षेत्रफळ, लांबी, घनता इ. देखील समविष्ट होते?

मला माहिती हवी होती ती बिघा (दो बिघा जमीन) आणि त्याच्या मराठीतील समानर्थी एककाची.

बिघा म्हणजे एकर

हे मला इथून कळलं. एकराला मराठीत काय म्हणतात. (तसा पूर्वी मला हा शब्द मराठीच वाटायचा.)

बिघा म्हणजे एकर नाही.

बिघा म्हणजे एकर ही विकीवरची माहिती तितकीशी बरोबर नाही.
बिघा हे जमीन मोजणीचे एक हिंदुस्थानी एकक. हयाची किंमत प्रांताप्रांतात वेगळी होती. एक एकर म्हणजे ४८४० चौ. वार. याचे बिघ्याशी नाते कसे जुळवायचे ते ज्याने त्याने हिशेब करून ठरवावे.
१ बिघा = २०० पांड = ४०० चौ. काठी.
बंगालीबिघा = ६४०० चौ. हात( चौ. कांडे). हात म्हणजे एक क्यूबिट. १८ ते २२ इंच. कोपरापासून मधल्या बोटापर्य़ंतचे अंतर.
बॉम्बे बिघा = १५८०० चौरस हात.
संयुक्त प्रांत (उ.प्र.)बिघा = ८०० कटवंशी(?).
पंजाब बिघा= ७२० सरशी(?).
बॉम्बे बिघ्यापेक्षा लहान-मोठी मापे: (मोल्सवर्थमधून)
३९.५ वर्ग हात = १ काठी.
२० काठी = १ पांड
२० पांड =१ बिघा
६ बिघा = १ रुका/रुक्का
२० रुके = १ चाहूर.
--वाचक्‍नवी

धन्यवाद..

बिघा म्हणजे एकर नसावे असे वाटत होतेच पण प्रत्येक प्रांतात त्याचे वेगवेगळे माप होते हे वाचून आश्चर्य वाटले.

तुम्ही बॉम्बे बिघ्याचा उल्लेख केला आहे पण आपल्याकडे बिघा फारसा प्रचलीत होता असे वाटत नाही. आपल्याकडे गुंठा (अंदाजे १००० चौ फूट) प्रचलीत होता आणि अश्या ४० गुंठ्यांचा एक एकर होई.

एकर हे ब्रिटिश (इंपीरियल) एकक आहे का?

बॉम्बे

बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणजे मुंबई इलाखा. याचा विस्तार सिंध पासून दक्षिणेला बेळगाव, धारवाड, हुबळी , कारवार, विजापूरपर्यंत होता. यात मराठवाडा आणि वर्‍हाड मात्र नव्हते. मराठवाडा हैदराबाद संस्थानात आणि वर्‍हाड 'सेंट्रल प्रॉविन्स आणि बेरार' या प्रांतात येई. या मुंबई इलाख्याच्या कुठल्यातरी प्रदेशात बिघा वापरात असावा. पूर्वी वहीच्या मागच्या मलपृष्ठावर अनेक कोष्टके दिली असत; त्यावरून मिळालेल्या माहितीत 'बॉम्बे लॅन्ड मेझर' मध्ये बिघा वाचले होते. --वाचक्‍नवी

बिघा

एक बिघा म्हणजे २० 'कठ्ठा'.

सर्व साधारणपणे २००० चौरस फुटांचा एक कठ्ठा, म्हणजेच ४०,००० चौफुटाचा एक बिघा म्हणजे एक एकर.

एक कठ्ठा म्हणजे किती हे तालुक्या-तालुक्या प्रमाणे देखील बदलते.

बिघा हे परिमाण उत्तर भारतात, राजस्थान (२५०० चौ.मी.) गुजरात ते बंगाल (१३३३ चौ.मी), नेपाळ (२६०३ चौ.मी) लोकप्रिय आहे.

महाराष्ट्रात गुंठा (१००० चौ. फुट.) वापरले जाते.

बिघा

२० कट्टा = १ बिघा हे बरोबर आहे. पण एक बिघा = १ एकर हे पटणे जरा अवघड आहे.
महाराष्ट्रातला गुंठा म्हणजे (३३*३३ = ) १०८९ चौरस फूट. -वाचक्‍नवी

माशा नाही मासा

संस्कृतमध्ये माष: म्हणजे उडीद. यावरून हिंदीत माशा आणि मराठीत मासा हे वजनाचे एकक आले. आख्या उडदाच्या एका दाण्याचे वजन आठ गुंजांच्या वजनाइतके असावे. गुंजांमधे कमीतकमी दोन प्रकार आहेत. एक लांबट असते आणि एक गोल चपटी. लांबट गुंजेला काळा ठिपका असतो, ती वजनाचे एकक म्हणून वापरतात. गुंजेचा पाला गोड असतो, तो वाळवून विड्यात घालतात.
'मासा'चे अनेकवचन मासे आणि प्रत्ययापूर्वीची सामान्यरूपे 'माशा-' आणि 'माशां-'. परंतु दुमाशी(दर दोन माशांगणिक), तिमाशी , अशा शब्दात वापरायचा शब्दार्ध ' -माशी '.
तोळा नावाचे धान्य किंवा बी नाही. हा शब्द बहुधा तुलण्याचे एकक म्हणून 'तुला'पासून झाला असावा.
'कवडी 'ला संस्कृतमध्ये कपर्दिका म्हणतात त्यावरून मराठीत कपर्दिक आला.
बार्ली म्हणजे मराठीत जव किंवा सातू. संस्कृतमध्ये यव.

अरुणरागनिषेधिभिरंशुकै: श्रवणलब्धपदैश्च यवांकुरै:--रघुवंश ९.४३

(बहुत लाल नव्या चुनड्या बर्‍या श्रुतिसमर्पित ज्या यवमंजर्‍या । )
वरून जवाच्या मंजर्‍या(की अंकुर?) स्त्रिया कानात खोचत असत असे दिसते.
जवाचा दुसरा महत्त्वाचाउपयोग म्हणजे यापासून माल्ट(उमले) करतात. ज्यापासून तेल करतात ते जवस किंवा आळशी हे धान्य वेगळे.--वाचक्‍नवी

माहितीपूर्ण चर्चा

चर्चा चांगली चालली आहे. प्रियाली ताईंचे आभार.

वेळ मिळाल्यावर आम्ही पण आकलेचे तारे तोडून टाकू या चर्चेत.

आपला,
(तोळाभर) भास्कर
आम्ही येथे वसतो.

वेगळे

वा! वेगळ्याच विषयावर अचानक वाचायला मिळाले.
मला वाटायचे की १० मासे म्हणजे एक् तोळा...
असो, या निमित्ताने गैरसमज दूर झाला.

रत्ती चा उगमही भारी आहे. :)

आपला
गुंडोपंत

दमडी?

सर्वप्रथम ही चर्चा सुरू केल्याबद्दल प्रियाली यांचे आभार. चर्चा मनोरंजक तर आहेच पण माहितीतही भर पडत आहे. सत्यनारायणच पावला म्हणायचा!
--------
नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचला दाम ........

यातील दमडी हे काय आहे?

तसेच दमडा असेही काही आहे का?
(संदर्भ: खिशात नव्हता दमडा, राहिला उघडा आणि झाला महात्मा ---- असा मी असामी)
----------
थोडे विषयांतर - लांबी मोजण्यासाठी जसे वीत, फूट वापरत/ वापरतात, तसेच काहीसे वैद्यमंडळी पण करत(करतात?). वैद्यांची बहुतेक औषधे 'पूड' या स्वरूपात असतात. त्याचा 'डोस्' सांगताना वैद्य दोन बोटांची चिमूट, तीन बोटांची चिमूट असे सांगत असत.

बरेच विषयांतर - ही औषधाची पूड कागदाच्या लहानश्या तुकडयावर ठेवून वैद्य त्याची अगदी सुबक, नेटकी पुडी बनवत असत. आमच्या लहानपणी असे म्हणत की वैद्याची पुडी, माळ्याची जुडी आणि परटाची* घडी ही दुसर्‍या कोणाला जमणार नाही.

*परीट म्हणजे हल्लीच्या भाषेत धोबी.

कापसाचा एक पाउंड आणि सोन्याचा एक पाउंड

असे तराजूच्या दोन पारड्यांत टाकले तर कोणते पारडे खाली जाईल?
कोणतेही नाही?
सबूर ...

हा प्रश्न फालतू नाही, त्यात एक गोम आहे (ऋणः वि. आ. बुवा)

[आता खालील माहिती बुवांनी दिल्याप्रमाणे व मला आठवते तशी आहे, चूक असल्यास सुधारावी) -

सोन्याचे वजन ट्रॉय पद्धतीने होते की जीत १ पाउंड = १२ औंस
(इतर पदार्थांप्रमाणे) कापसाचे वजन अव्हॉर्डुपॉय् पद्धतीने होते की जीत १ पाउंड = १६ औंस
त्यामुळे कापसाचे पारडे खाली जाईल.
आहे की नाही अनपेक्षित गंमत?

- दिगम्भा

तागडी/तराजू

हा आमच्या घरातील सोन्याच्या वजनासाठी वापरला जाणारा , तसेच सावकारी साठी वापरला पारंपरिक तराजू अथवा तागडी

Tagadi" alt="">
तागडी

प्रकाश घाटपांडे

चिमूट, दमडी वगैरे

चिमट(चिमूट, चिमोट), मूठ, पसा, ओंजळ(ओंझळ) ही घरगुती मापे.
तसेच तसू, वीत, गज, हात, ढोपर ही लांबीची मापे. पुरुष हे खोलीचे(डेप्थ) माप.
४ दमड्या(मूळ संस्कृत द्रम्म)= १ पैसा.
१२ कवड्या (संस्कृत कपर्दिका)= १ दमडी. --वाचक्‍नवी

तोळा

ही बघा विविध तोळ्याची वजने
Tola Vajan
प्रकाश घाटपांडे

तागडी पेटीत अशी बंद होते

ही तागडी पेटीत अशी बंद केली जाई.
Box of Tagadi
प्रकाश घाटपांडे

बंद झाल्यावर तागडी पेटी

बंद झाल्यावर तागडी पेटी अशी दिसते
Tagadi Petee
प्रकाश घाटपांडे

तागडी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. प्रकाश घाटपांडे यांनी येथे स्थापित केलेली चित्रे फारच छान आहेत. कोणत्याही शाब्दिक वर्णनाविना सर्व काही स्पष्ट कळते.
..."हा आमच्या घरातील पारंपारिक सोन्यासाठी वापरला जाणारा तराजू "
हे वाक्य असे हवे होते:
..."हा सोन्या (च्या वजना) साठी वापरला जाणारा आमच्या घरांतील पारंपरिक (..पारिक नव्हे) तराजू."
(पारंपरिक हे विशेषण सोन्याचे नसून तराजूचे आहे.)

वजनमापे

सुट्ट्या पैशांची नांणि देखिल वजनमाप म्हणुन वापरत ही नाणी पहा. इथे त्याचा व्जनमाप म्हणुनच वापर केला आहे.
Coin 1 यातील १ पैशाचा शेजारी कुठल नांण आहे याचा शोध चालू आहे. परंतु ते भारतीय नाण नाही हे मात्र नक्की.
प्रकाश घाटपांडे

विविध ग्रॆमची वजने

Vividh Gram Vajane
प्रकाश घाटपांडे

 
^ वर