वाइन : एक परंपरा

वाईनवरील एका लेखमालेच्या आधारे सदर लेख या ठिकाणी दिलेला आहे. याबद्दल कोणाला आणखी काही ठोस माहिती असेल तर त्यांनीही ती द्यावी ही विनंती. कृपया सदर माहिती ही फक्त वाईन, इतिहास, परंपरा, निर्मिती, नवे तंत्र, नवे प्रवाह याबद्दलच असावी. ( दारु किंवा ग्रामीण भाषेत सांगायचे झाल्यास, नवटाक-नवटाक बद्दल नसावी.)

मद्य आणि दारू यामध्ये फरक न करण्याच्या मानसिकतेमुळे मद्यनिर्मिती (वाइन मेकिंग) यासारख्या, एका मोठ्या व्यवसायाबद्दल आजवर आपल्याला गप्पच राहावे लागले. जागतिकीकरणामुळे बाजारपेठेचे खुलीकरण झाले, तंत्रज्ञान उपलब्ध झाले. द्राक्षापासूनचे मद्य (वाइन) आपल्याकडे नवीन नाही; मात्र परदेशात "वाइन' हे ज्या पद्धतीने आरोग्य पेय म्हणून विकसित झाले ते पाहूनच भारतातील वाइन उद्योगाचे भवितव्य आकारत चालले आहे.

वाइन हे सौम्य मद्य आहे. थकल्यानंतर शिथील वाटून आराम देणारे, मन उल्हसित करणारे सौम्य मद्य म्हणून त्याची ख्याती आहे. ग्रीक व रोमन परंपरा असणाऱ्या युरोपीय देशांमध्ये वाइनला विविध पातळ्यांवर प्रतिष्ठा आहे. ख्रिस्त काळापूर्वीपासून वाइनचे प्रस्थ आहे. सगळ्या जुन्या संस्कृतींमध्ये समाजातल्या आणि निसर्गातल्या प्रत्येक घडामोडींचा ताबेदार देव. उदाहरणार्थ कराराची देवता "मित्र'. करार मोडला, तर त्याचे फळ (शिक्षा) देणारी देवता म्हणजे मित्र. पावसाचे दैवत "वरुण' इ. ग्रीक संस्कृतींतल्या पुराणकथांमध्ये अशा अनेक देवदेवता आहेत. उदा. कुजवून केलेल्या खताची देवता म्हणजे "स्टर्क्‍युलिस' (या वरूनच पान चुरगळल्यावर कुबट वास येणाऱ्या वनस्पतींचे "स्टर्क्‍युलिया' कूळ मानतात!), तसेच वाइनचेसुद्धा दैवत आहे. त्या दैवताचे नाव "डायोन्युसस'. देवांचा देव थीडस हा देवगणातल्या आणि मनुष्य गणातल्या राण्या होत्या.

त्यातल्या खेमेल या मानवी राणीपासून जन्मलेला देवपुत्र "डायोन्युसस' हा वाइनचा, वनसृष्टीचा, मुक्त स्वैर वर्तनाचा देव आहे. त्याच्या प्रतीकचिन्हात व मूर्तीमध्ये घड असलेली द्राक्ष वेल असते. तत्कालीन ग्रीक समजुतींनुसार "डायोन्युसस' दर हिवाळ्यात मरण पावतो आणि वसंत ऋतूबरोबर पुनश्‍च जन्माला येतो. हे वर्णनदेखील द्राक्षवेल सुप्तावस्थेत जाणे आणि नवी फूट येणे या चक्राशी मिळतेजुळते आहे. या डायनोस्यूस कथांवर आधारलेले (युरिपीडिस या विख्यात नाटककाराचे) "बॅकऊस' नावाचे नाटकदेखील आहे. ग्रीक नाटककारांची नाटके ज्या उत्सवात सादर व्हायची तो उत्सवदेखील डायोन्युसचाच! याच डायनोस्यूसचे रोमन संस्कृतीतले रूप आणि नाव म्हणजे "बॅकऊस' हे वाइन दैवताचे रोमन नाव.

दुसरीकडे यहुदी परंपरेत (सध्याचे इस्राईल व पॅलेस्टाईन) या प्रदेशातील प्राचीन संस्कृती) नोहा या आद्य पुराणपुरुषाने प्रथम शेती केली. आश्‍वासित भूमीत त्याने द्राक्षवेली लावल्या. एवढेच नव्हे तर त्या द्राक्षांची वाइनही त्यानेच बनविली. नोहाचे वाइन पिऊन तल्लीन होणे हे ख्रिस्ताच्या क्रूसावरील यातनांचे आदिम रूप व प्रतीक नंतर मानले गेले. बायबलमध्ये (ओल्ड टेस्टमेंट आणि न्यू टेस्टमेंट) सर्वाधिक कुठल्या वनस्पतीचा व पिकाचा उल्लेख येत असेल, तर तो द्राक्ष पिकाचा आणि त्यापासून बनविलेल्या वाइनचा. ख्रिस्ताचा पहिला मोठा चमत्कार कोणता, तर त्याने वाइनचा दुष्काळ असताना निरवळ पाण्याचे वाइनमध्ये रूपांतर केले. ख्रिस्ताला अलौकिक विभूती बनविणारा हा चमत्कार वाइनशी निगडित आहे.

ख्रिस्ताच्या त्यागाचे पुनरागमनाचे ईश्‍वरी मुलाशी तादात्म्य होण्याचे प्रतीक म्हणजे त्याचे बलिदानदर्शक रक्त. या रक्ताने पवित्रीकरण होते. त्या रक्ताचे प्रतीक लाल वाइन. सामान्य धर्मगुरू वगळता, प्रार्थनेसाठी जमलेल्या सामान्यजनांना ख्रिस्ताशी, त्याच्या त्यागाशी, पुनरागमन वार्तेशी मिसळून घेणारी प्रतीकात्मक वस्तू म्हणजे वाइन. आपल्याकडे आरती झाल्यावर प्रसाद देतात, तसा धाटणीने ख्रिस्ताचे अवयव असलेली "भाकर' त्याच्या रक्तात भिजवून सेवन करतात. ख्रिस्ताने शिष्यांसोबतच्या अखेरच्या भोजनाच्या वेळी आता "यानंतर मी वाइन पिईन ती आपल्या पित्याच्या (देवाच्या) साम्राज्यातली नवी वाइन असेल,'' असे उद्‌गार काढलेले आढळतात.

तात्पर्य वाइनला यहुदी व ख्रिश्‍चन परंपरेत एक पौराणिक, आस्तिक, धार्मिक मरातब आहे. भोजनाचा नैवेद्याचा तो एक "मानाचा' हिस्सा आहे. वाइन जुनी असावी, की नवीन याबद्दलचे देखील संकेतात्मक विचार व त्याबद्दलची भिन्न मते या धार्मिक परंपरेत मुरलेली आहेत. भोजनापूर्वी, भोजनाबरोबर आणि भोजनानंतर वाइन पिण्याच्या प्रघाताला ही धर्म-सांस्कृतिक पीठिका आहे.

इ. स. चौथ्या शतकामध्ये रोमन साम्राज्याने अधिकृत ख्रिस्त धर्म पत्करला. तेव्हापासून या दोन्ही (प्राचीन रोमन व ख्रिश्‍चन) वाइनप्रेमी संस्कृतीची वाइन या पेयाबाबतची वीण आणखी घट्ट झाली. ईश्‍वराचे आभार मानावयाच्या सामूहिक प्रार्थनेसाठी वाइन लागे. चर्चची स्वतःची जमीन असे, त्यामध्ये द्राक्षबागा रचल्या जात. चर्च-मठातले धर्मगुरू या बागांमधल्या द्राक्षाची वाइन बनवीत. या खटाटोपामुळे धर्मगुरू, प्रवचक, मठात राहणारे व्रती, संन्यासी वाइन बनविण्याच्या कलेत माहीर असत. चर्चच्या स्वतःच्या द्राक्षबागा त्यातल्या द्राक्षांची वाइन बनविणारी चर्चची सरंजामी गढी हे सहजी आढळणारे चित्र असे.

या परंपरेच्या परिणामी वाइन बनविण्याला सामाजिक स्थान व प्रतिष्ठा तर होतीच, पण त्या जोडीला वाइन बनविण्याच्या तंत्रालादेखील मोठी चालना व मानमरातब मिळत असे. वाइन तयार करण्यातल्या प्रत्येक बारीक तपशिलाचा, पायरीचा विचार करणे, त्याते प्रयोग, त्यात बदल करणे याचे "शास्त्र' (तंत्रशास्त्र) उमलून विकसित होत गेले.

Comments

पयला प्रतिसाद माझाच रं भोऽ

पाश्‍चिमात्य भोजनातले वाइनचे प्रस्थ यापेक्षाही अधिक गूढ आणि गाढ आहे. अमुक प्रकारच्या मांसाच्या आणि अमुक प्रकारच्या सॉसबरोबर तमुक प्रकारची वाइन, असे संकेत हे या भोजनपरंपरेचा राजरोस हिस्सा आहेत. यातले संकेत आणि वैयक्तिक प्रचिती व रुचीनुसार त्यात करायचे बदल ही जिभेचे चोचले सांभाळण्याची कला मानली जाते. मासे आणि कोंबडीचे मांस रंगाने पांढुरके असते. त्याबरोबर सफेद वाइन घ्यावी. बोकड, बैल, डुकरे यांचे मांस रक्तवर्णी (तांबडे) असते. त्याबरोबर लाल वाइन घ्यावी, असा एक ढोबळ नियम सांगितला जातो. तो फारच सरधोपट आणि निर्बुद्ध ठोकताळा आहे. वाइन व खाद्यपदार्थांची सांगड ही गंध, चव, स्वाद यावर बनवायची असते, निव्वळ मांसाच्या रंगावर नव्हे. हा रंगाचा ठोकताळा आला याचे एक कारण म्हणजे मासा व कोंबडीचे मांस पदार्थ बनविताना वापरले जाणारे पदार्थ (खारवण, व्यंजवण, मसाले, सॉस) निराळ्या बाजाचे (ढंगाचे) असतात. उदा. मासे करताना अगोदर लिंबू, मीठ चोळून ठेवतात. याला खारवण किंवा व्यंजवण म्हणतात (इंग्रजीत मेरिनेशन). माशाच्या चवीत या व्यंजवणाची खूण लोण्यावर तळला तरी शाबूत राहते. अर्थात अगदी सौम्य स्वरूपात. मासा खाल्ल्यावर त्यांची चव तोंडात अगोदर पसरते. त्यावर सफेद वाइन घेतली, तर सफेद वाइनचा आंबटपणा सौम्य बनतो व वाइन अधिक प्रसन्न लागते. तात्पर्य मांसाच्या रंगापेक्षाही पदार्थ शिजवताना शिरलेला मसाला, स्वाद व रंग देणारे पदार्थ (उदा. पुदिना, कोथिंबीर, सेलरी) यांची वाइनच्या गुणधर्मांबरोबर खुबीने सांगड घालायची ही "पाककला' आहे.

माझ्या या नावामुळं वाचकांना लय तरास झाला. त्याबद्दल मला लय खेदपूर्ण दुखवटा होतो हाय. तवा मी हे नाव आताच्या आता टाकून देऊन ओरिजनल नाव घ्येणार हाय.

मजकूर संपादित.

आमाला काय बी तर्रास नाय, चालू द्या! :)

तुम्ही खुशाल तुम्हाला हवे ते आयडी घ्या. अहो नुसते नामसदृष आयडी घेऊन कोणी 'तात्या' होत नाही! :)

वाईन हा आमच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय! हा विषय इथे मांडल्याबद्दल विसोबाच्या खेचरा तुझे अनेकानेक आभार..

आम्हाला गोव्याला बनणारी जांभळाची वाईन फार आवडते बॉ! 'व्हिनिकोला' म्हनत्यात नव्हं तिला?

आपला,
(बाईबाटली प्रेमी!) तात्या.

मजकूर संपादित.

झकास!

तुम्ही खुशाल तुम्हाला हवे ते आयडी घ्या. अहो नुसते नामसदृष आयडी घेऊन कोणी 'तात्या' होत नाही! :)

झकास तात्याबा... वा एकदम मस्त बोललात!

हेच आम्हीही मटा ला म्हणतोय... नाव घेऊन गुंड्या होता येत नाही... तेथे गुंड्याच लागतो लिहायला...

आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र)

चांगली माहिती

लेख आवडला. माहितीपूर्ण आहे. आपण लिहिलेला आहे का? मूळ लेखमालेचा दुवा देता येणे शक्य आहे का?

काही अधिक माहिती:

"डायोन्युसस' हा वाइनचा, वनसृष्टीचा, मुक्त स्वैर वर्तनाचा देव आहे.

डायोनायसस (Dionysus) हा ग्रीक समजुतींनुसार भारतातील शिवशंकर मानला जातो. रोमन पुराणांनुसार त्याला बाकस (Bacchus क वर थोडा अधिक भर) म्हटले जाते. ग्रीक पुराणांनुसार (किंवा तत्कालिन इतिहास) हा देव सर्वप्रथम भारतात आलेला ग्रीक असे समजले जाते.

या वाईनचा समग्र इतिहास येथे वाचता येईल.

अवांतरः
१. रिचर्ड ऍटेनबरोंच्या गांधी या चित्रपटात गांधीजींचे मित्र रेव्ह. चार्ली अँड्र्युज यांना ट्रेनच्या टपावर बसलेला एक मजूर [जलाल आगा़] विचारतो, "आप ईसाई हो? मुझे एक ईसाई मालूम है जो खून पिती है और मांस खाती है|" (शब्दशः आठवत नाही परंतु या संवादाची आठवण लास्ट सपर बद्दल वाचून हमखास होते.)

रेव्ह. चार्ली अँड्र्युजबद्दल माझ्या अनुदिनीवर येथे वाचता येईल.

२. आपल्या नावामुळे वाचकांना त्रास होण्यापेक्षा आपल्यालाच जास्त त्रास होईल कारण सदस्य आपल्याकडे गांभीर्याने पाहणार नाहीत असे वाटते. तेव्हा नाव बदलण्याच्या निर्णयाचे स्वागत!

सामाजीक प्रतिष्ठा

वाइन ज्याला भारतीय मूळ शब्द आहे "सुरा" ही पौराणिक भारतात पण होती. पण त्याचे व्यसन होऊन काय होऊ शकते हे समजल्यावर त्याची सामाजिक प्रतिष्ठा लयास गेली आणि एका अर्थी दुसरे टोक गाठले गेले.

भारतात वाइनच्या अतिरेकामुळे झालेल्या दोन प्रसिद्ध पौराणी़क (अथवा ज्याला भारतात "इतिहास" असेही म्हंटले जाते त्या महाभारतातील) गोष्टी :

असुरांचे गुरू शुक्राचार्यांना मद्य पिण्याचे (व्यसनच) आवड होती. परिणामी देवांकडून संजीवनी विद्या शिकायला आलेल्या आलेला शुक्राचार्याच्या मित्राचा आणि देवांच्या गुरू बृहस्पतीचा मुलगा "कच" याचा कायमचा काटा काढण्यासाठी म्हणून त्याला राक्षसांनी जाळून त्याची राख दारू मध्ये घोटवून शुक्राचार्यांना प्यायला दिली. म्हणजे आता तरी तो जिवंत होऊ शकणार नाही . पण देवयानीच्या "तारुण्यसुलभ" हट्टा पायी त्यांना त्याला जिवंत करावे लागले आणि मग त्याला पोट फाडून बाहेर आल्यावर स्वतःस जिवंत ठेवण्यासाठी संजीवनी विद्या द्यावी लागली. परिणामी शुक्राचार्यांनी (उशीरा शहाणपण सुचून पण) मद्य पिणे सोडून दिले.

दुसरा जास्त माहिती असलेला किस्सा म्हणजे "यादवी" ज्यात शेवटी श्रीकृष्ण आणि बलरामासहित सर्व यादव कुळाचा अंत झाला. म्हणून संस्कृत मध्ये असे वचनही आहे: "मद्यं कूल विनाशकम्"

नंतरच्या गेल्या दोन हजार वर्षात पण आपले राजे राजवाडे असल्याच धुंदीत राहिले आणि परिणामी आपल्यावर अनेक हल्ले झाले की ज्याचे दृश्यादृश्य परिणाम आजही आपण भोगत आहोत.

रोमन साम्राज्याच्या बाबतीत पण म्हणले जाते की त्यांच्यात वाइन पिणे समाजीक होते. त्यात ते वाइन नंतर शिसाच्या (लेडच्या) भांड्यामधे करायचे. परीणामी ते शिसे दारूमधे विरघळायचे (लीचींग). शिसे हे डोक्यासाठी आणि इतर इंद्रियांसाठी विषारी असल्याने त्याचे परीणाम सर्व समाजावर होवू लागले आणि त्यातच बाकीच्या गोष्टींमुळे शेवटी हे पश्चिमेतील अजिंक्य साम्राज्य बघता बघता लयास गेले. याबाबतीत USEPA चा हा दुवा पहा .

थोडक्यात मला इतकेच म्हणायचे आहे की वाइन घेणे चांगले-वाईट हा प्रश्न नाही, पण आधीच्या चर्चेप्रमाणे "तिच्या नशे बरोबरच" तिला सामाजिक प्रतिष्ठा देण्याची अथवा उदात्तीकरण करण्याची काही गरज नाही . अमेरिकेत पण मधे "रेड वाइन" घेणे प्रकृतीस चांगले असते असेम्हणायला लागले पण नंतर डॉक्टरपण सांगायला लागले, वाइन औषधा सारखी चांगली असते जर ती औषधाइतकीच घेतली तर!

माहिती आवडली.

वाइन बद्दलची माहिती आवडली.विषेशतः वाइन परंपरेचा शोध घेण्याचा प्रयत्न आवडला.

अवांतर;) बिरुटे गुर्जीचे आपण केलेले कौतुक कसे विसरता येईल.आपण नाव बदला की बदलू नका,
जे लेखन आवडेल त्याला दाद देऊ.
नाही आवडले की आम्ही आमच्या शब्दात समाचार घेऊ. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आभारी हाय गुर्जी

प्रतिसादाबद्दल आभारी हाय गुर्जी

मजकूर संपादित. व्यक्तिगत स्वरूपाचे प्रश्न आणि चर्चा कृपया, खरडवही किंवा व्य. नि.द्वारे करावी.

माहितीबद्दल आणि दुव्यांबद्दल

आपल्या माहितीबद्दल आणि दुव्यांबद्दल आभारी आहे.

नाही सदर माहिती ही नेटवर उपलब्ध नाही. आमच्या मराठवाड्यातून एक मासिक प्रसिद्‌ध होते. त्याचा खप मर्यादित असला तरी बऱ्यापैकी माहितीपूर्ण असते. वसुंधरा त्याचे नांव. त्यातच उपरोक्त लेखाची माहिती आलेली होती. असो. त्यातील काही संपादीत भाग या ठिकाणी दिलेला आहे.

वाईन हा विषय केवळ वादग्रस्त नसून त्याच्या खोलात जाऊन अभ्यास करायला पाहिजे असे माझे प्रामाणिक मत आहे. माझे सर्व उद्योग धंदे(दूधाची डेअरी, थोडीशी शेती आणि लोकांना शिकविण्याचा धंदा अर्थातच मास्तरकी) सांभाळून जेवढे शक्‍य होईल तेवढी माहिती मिळविण्याचा हा प्रयत्न.

(नावात काय आहे? असे कोणीतरी म्हटलेलेच आहे. पण आम्हाला हे मंजूर नाही काहीतरी नाव पाहिजेच. शिवाय ते मिश्‍किलही हवे. अर्थात मिश्‍किल नाव असल्यावर गंभीर लेख लिहिता येत नाही असे थोडेच आहे. असो माझे बदलेले नांव, विसोबाचं खेचर, आहे की नाही मजेदार! )

वा

लेख आवडला.
-- लिखाळ.

परदेशात भारतीयांनी एकमेकांकडे पाहून स्मितहास्य करावे असे मला वाटते.

वा वा! अगदी धुंद विषय आहे हा!

वा वा वा! अगदी धुंद विषय आहे हा!
माझी कल्पना, वाईन कशी प्यावी याची.

रक्तवर्णी वारूणी घ्यावी. सुरेखशा एका हाताच्या पंजात न मावणार्‍या देठाच्या चषकात.
पण चषक भरून नव्हे... अगदी थोडी तळाशी राहील इतकीच. एकदा तो धुंद गंध श्वासात जाऊ द्यावा. समोर शेकोटीचा जाळ पटलेला असावा. मंद दिव्यांच्या प्रकाशात, कोरीव काम केलेल्या मखमलीच्या कोचावर बसून त्याची उब यावी न यावी इतपत अंतरावर बसणे असावे. एखादी सुरेख आवाजातली गझल अगदी शांत आवाजात सुरू असावी. सोबतीला खुप दिवसांनी भेटलेला जुन्या गप्पा मारणारा मैतर असावा. गप्पा रंगात याव्यात. वाईन संपत जावी, नवी नवी कुपी उअघडत जावी. वारूणीचा आग्रह नसावा पण चषक भरलेला असावा. सोबत खायला म्हणून तळलेले झिंगे, थोडे निरनिराळे चीज.

बोलणे अचानक थांबल्यावर बाहेरच्या पावसाचा आवाज यावा.

परत बोलणे सुरु व्हावे. हळू हळू अजून मित्र-मैत्रिणी जमत जाव्यात, बोलण्याचे विषय रंगत जावेत, रात्र धुंद होत जावी.

हळूहळू सगळे शांत होत जावे... नकळत वारूणीचा हलकासा अंमल यावा. अगदी जाणवेल न जाणवेल असा. सगळे शांत आहेत असे पाहून आपण दार उघडून बाहेर यावे. पाऊस थांबला आहे नि समोर सुरेखसा पौर्णिमेचा चंद्र ढगा आडून दिसतो आहे, याने आपण हरखुन जावे. समोरच्या झुडुपावरचे थेंब त्या चंद्र प्रकाशात चमकावेत.. आपण त्या चमकण्यात विरघळून जातो आहोत हे वाटणे तसेच वाटू द्यावे. अचानक सगळे शांत झाल्यावरही सुरूच असणार्‍या गझलमधून एक तान बाहेर पर्यंत ऐकु यावी...

ही तान, आता नक्की पडेल असं वाटणारा पण न पडणार ओघळणारा झुडुपावरचा थेंब, ढगा आडून अचानक पणे दिसलेला तो चंद्र! बस आयुष्य इथेच येवढेच असावे त्या थेंबात सगळ्या मित्र मैत्रिणी सोबत विरघळून जावे!

आपला
गुंडोपंत

वाह क्या बात हे

सोबतीला खुप दिवसांनी भेटलेला जुन्या गप्पा मारणारा मैतर असावा. गप्पा रंगात याव्यात. वाईन संपत जावी, नवी नवी कुपी उअघडत जावी. वारूणीचा आग्रह नसावा पण चषक भरलेला असावा. सोबत खायला म्हणून तळलेले झिंगे, थोडे निरनिराळे चीज.

ही तान, आता नक्की पडेल असं वाटणारा पण न पडणार ओघळणारा झुडुपावरचा थेंब, ढगा आडून अचानक पणे दिसलेला तो चंद्र! बस आयुष्य इथेच येवढेच असावे त्या थेंबात सगळ्या मित्र मैत्रिणी सोबत विरघळून जावे!

वा वा गुंडोपंत क्या बात है। वेगळ्याच दुनियेत घेउन गेलात.
प्रकाश घाटपांडे

फ्रेंच पॅरॉडॉक्स

फ्रेंच लोकांची जीवनशैली ( आहारातील प्राणीजन्य मेद, लोणी, चीजचे प्रमाण, व्यायामाचा आळस वगैरे) हृदयविकाराला अत्यंत पोषक असली तरी फ्रेंच लोकांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण अत्यंत कमी आहे . फ्रेंच लोक पाण्यासारखी पितात ती रेड वाईन आणि तिच्यातील रेसव्हरट्रॉल हा घटक यामुळे हृदयविकारापासून संरक्षण मिळते, असा दावा आहे.
अधिक माहिती इथेपहा
सन्जोप राव

लेख आवडला

छान आहे.

वाहवा!

लेख मस्त आहे. शँपेनबद्दल लिहा की कोणी.

रंग' आणि "बांधा'

रंग' आणि "बांधा' या दोन घटकांवर वाइनच्या प्रमुख शाखा बसविल्या आहेत. या शाखांना उपशाखा आहेत, कुळी आहेत "घराणी'सुद्धा आहेत! पण तो झाला खासियतीने धंदा चालविण्यातला तपशील. तूर्तास आपण प्रमुख नऊ वर्ग किंवा शाखांचा विचार करणार आहोत. हे प्रमुख वर्ग म्हणजे
१ सफेद वाइन - हलक्‍या शेलाट्या बांध्याच्या वाइन्स.
२ सफेद - पूर्ण/ठाशीव बांधाच्या वाइन्स.
३ सफेद-फुर्फुरी/फेसाळ नूरी (लकाकणाऱ्या) वाइन्स.
४ सफेद खुशबुदार वाइन्स.
५ गोड-टेबल वाइन्स.
६ लाल हलक्‍या/शेलाट्या बांध्याच्या वाइन्स
७ लाल-मध्यम बांधा वाइन्स.
८ लाल - पूर्ण/ठाशीव वाइन्स
९ जोम दिलेल्या वाइन्स.

वाइनचे हे वर्गीकरण पत्करण्याची दोन प्रमुख कारणे आहेत ः पहिले कारण म्हणजे वाइन खरेदी-विक्री करताना "रंग' आणि "बांधा' या विशेषणांवरच त्यातले भेद सांगण्याची रूढी आहे. उदा. ः विकणारा दुकानदार ""साहेब ही रेड वाइन घ्या, लाइट बॉडीची आहे'' असे सांगतो. दुसरे म्हणजे या प्रत्येक वाइनवर्गाशी काही द्राक्षांच्या जाती आणि वाइन बनवायची विशिष्ट रीत निगडित आहे.

------------------------------------------------------------------------------
मजकूर संपादित. इतर सदस्यांवर टिप्पणी करणारा प्रतिसादातील भाग अप्रकाशित केला आहे.

डिझर्ट वाइन

डिझर्ट वाइन यात कशात मोडते की ते वेगळेच प्रकरण?

डिझर्ट वाइन

आमच्या मते गोड टेबल वाइन.. म्हणजेच डिझर्ट वाइन

वर्गवारी

ह्यामध्ये काही लाल खुशबुदार वाइन्स देखिल असतात. उदा. रोज वाइन.

तुमच्या वरिल वर्गवारीत प्रत्येक वर्गाची एखाद दोन उदाहरणे दिलीत तर कळण्यास सोपे जाइल.
आम्हाला आवडलेल्या पिनो नुआर, कॅबरनेट सुवॅनिअन, शिराझ/सिराह ह्या सर्व रक्तवर्णी वाइन्स 'लाल - पूर्ण/ठाशीव वाइन्स' आहेत असे आम्हाला वाटते ते खरे का?(आम्ही त्यांची कोरडेपणा वरुन केलेली वर्गवारी ऐकली आहे)

चांगल्या वाईन्स कोणत्या?

अमेरिकेत चांगल्या समजल्या जाणार्‍या वाईन्स दर्जा, चव इ. च्या दृष्टीने याबद्दल कोणी सांगू शकेल का?

किंवा पाहुण्यांना कोणती वाईन सर्व करावी? रेड की व्हाईट हे कसे ठरवतात?

एखाद्या प्रसंगानुसार कोणती वाईन सर्व करावी असे ठरवलेले असते का? जसे, सेलेब्रेशन=शँपेन?

उत्तरे देण्याचा प्रयत्न..

चव ही सापेक्ष असल्याने त्यावर दर्जा सहसा अवलंबुन नसतो. दर्जासाठी अत्यंत ढोबळ निकष म्हणजे बाटलीवरील निर्मितीचे साल. अर्थातच वाईन जितकी जुनी तितका दर्जा अधिक. त्याचबरोबर अमेरिकेत वाईन्सना तज्ञ मंडळ त्यांच्या गुणवत्तेनुसार १०० पैकी गुण देतात. ह्या मध्ये ज्या वाइन्सना सहसा ९० पेक्षा अधिक गुण असतात त्यावर तसा आकडा वाइन शॉप्सवाले आवर्जुन लावतात असे आमचे निरिक्षण आहे. तेव्हा इथल्या (अमेरिकेतल्या) कोणत्याही वाईनच्या दुकानात बारकाइने ह्या गुणांच्या नोंदीचा शोध घेतला तर दर्जेदार वाईन शोधण्यास मदत होते.

रेड आणि व्हाईट ह्यापैकी कोणती सर्व्ह करावी हा पूर्णपणे पाहुण्यांच्या आवडीचा प्रश्न आहे.. सहसा दोनही प्रकारच्या वाईन्सचा एक एक तरी नमुना ठेवून पाहुण्यांची पसंती विचारली जाते. बर्‍याचदा व्हाईट वाईनकडे (शार्डने) महिलांचा कल अधिक असतो असे आमचे निरिक्षण आहे.

सलेब्रेशन=शँपेन हे जरी खरी असले तरी बाकीच्या प्रकारांची निवड मात्र विसोबाच्या खेचरांनी सांगीतल्या नुसार प्रसंग काय आहे ह्यापेक्षा मेन्यू काय आहे ह्यावर अधिक ठरते असे वाटते.

टू बक चक

वाइन्सचे प्रकार हे वेगेवेळ्या भावात मिळतात. हे भाव कुठे, कधी तयार झालेत यावर अवलंबून असतात.

पण आपल्याजवळ टट्रेडर्स जो असेल तर त्यांच्याकडे $२-३ ला वाइनच्या बाटल्या मिळतात त्या खूप चांगल्या असतात. त्या लोकां"टू बक चक" नावाने प्रसिद्ध आहेत आणि लोकांना त्या खूप आवडतात. बरेच लोक असले तर त्या स्वस्त पडतात हे सांगायला नकोच. त्यांच्या डिझर्ट वाइन्स पण चांगल्या असतात.

नॉन-व्हेज जेवण असेल तर व्हाईट मीटबरोबर व्हाईट वाइन आणि रेड मीटबरोबर रेड वाइन असा सर्वसाधारण नियम आहे. मेर्लो, झिन्फडेल या सर्वसाधारण प्रचलीत वैन्स आहेत असे मला जाणवले आहे.

उबग आणणारे मराठीकरण

हलक्‍या शेलाट्या बांध्याच्या वाइन्स,फुर्फुरी/फेसाळ नूरी (लकाकणाऱ्या) वाइन्स,लाल हलक्‍या/शेलाट्या बांध्याच्या वाइन्स, जोम दिलेल्या वाइन्स...
हे बद्धकोष्ठी मराठीकरण करण्यापेक्षा मूळ स्पार्कलिंग वाईन्स, फोर्टिफाईड वाईन्स असे ठेवले असते तरी चालले असते. मराठीचा अभिमान वगैरे ठीक आहे, पण चित्त्त म्हणतो तसे कुंथून कुंथून मराठीकरण करण्यापेक्षा आहेत ते सुंदर इंग्रजी शब्द तसेच ठेवावेत. इंग्रजीचा दुस्वास करुन मराठीची प्रगती होणार नाही.

सन्जोप राव

हेच..

मराठीचा अभिमान वगैरे ठीक आहे, पण चित्त्त म्हणतो तसे कुंथून कुंथून मराठीकरण करण्यापेक्षा आहेत ते सुंदर इंग्रजी शब्द तसेच ठेवावेत. इंग्रजीचा दुस्वास करुन मराठीची प्रगती होणार नाही.

लाख मोलाची बात! अहो आमचे मित्रवर्य शैलेश खांडेकरांसारख्या येथील काही मराठी भाषेच्या सेनापतींना आमचंही अगदी हेच सांगणं आहे!

तात्या.

वाईन्स ने काय होते !

इतके प्रतिसाद होऊनही आम्हाला काही नशा येईना ! वाइन घेतली तर डोक्याला मुंग्या येत नाही.त्याच्यासाठी नेहमीचाच ब्रँड पाहिजे.

अवांतर ;) घ्या बरं तात्या अन गुंड्याभाऊ ज्याचे त्याचे ग्लास अन या सोंगाड्याला पाठवा फुटाने आणायला ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर..

बास का सर,
अहो.. तुम्ही एक बाटली रेड वाईन घेउन तर पहा....
काय मजा येते ते...

ब्रँड तर चालतोच हो पण हे माहोल चे काम आहे गा...!

आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र)

ब्रॅंड

आयला मास्तरा !

तुझा ब्रॅंड लईच हलका हाय राव ! वाईनसारखी उंची न्हाय त्याला !

शेवटी गुंडो म्हणतो तेच खरं .

अरिष्ट

आयुर्वेदातील द्राक्षासव वा तत्सम आसवे व आरिष्टे ही पण वाईनच. हल्ली ते ऍपी फीझ पण वाईनच आहे असे माझे मत आहे

प्रकाश घाटपांडे

मला दारू चढत नाही

हे नव(विडंबन) काव्य या विषयाशी संबंधीत असल्याने येथे देत आहे. वाचले नसेल तर नक्कीच हसायला येईल असे आहे.

' मला दारू चढत नाही ' ( कवि : वि. रा. भाटकर) ही कविता 1993 च्या ' अपूर्व '- दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली आहे.
(या कवितेवर आधारीत अजूनही एक "तळीराम" नावाची कविता आहे जी थोडीफार वाड्मयचौर्य ठरू शकेल अशी पण तशीच विनोदी आहे. )

मला दारू चढत नाही
दारूबंदी असूनही
मी दारू खूप पितो पण मला दारू
कधी चढत नाही.

याचं एक कारण आहे.
दारू पिण्याची माझी एक
स्पेशल सिस्टीम आहे.

ती अशी-

दारू प्यायची असली म्हणजे
मी ती रात्री झोपण्यापूवीर् पितो.
तेव्हा आधी बायकोच्या खोलीत
हळूच डोकावून पाहतो.
बायको पलंगावर
गाढ झोपलेली असते.
मग मी माझ्या खोली येतो.
दारूची बाटली आणि ग्लास
टेबलावर घेऊन बसतो.
प्रथम मी
बाटलीचं बूच काढतो.
मग तिच्यातली भरपूर दारू
ग्लासात ओतून घेतो.
बूच बाटलीला परत लावून टाकतो
आणि बाटली
कपाटात ठेवून देतो.
मग ग्लासातली
सगळी दारू मी पिऊन टाकतो.
मग मोरीत जाऊन
ग्लास धुऊन टाकतो-
आणि फळीवर ठेवून देतो.
मग मी पुन्हा बायकोच्या खोलीत
हळूच डोकावून पाहतो.
बायको पलंगावर
गाढ झोपलेली असते.
बघितलंत ?
या कानाचा
त्या कानाला पत्ता नाही
आणि दारू मला
चढलेलीसुद्धा नाही.

मग जरा वेळाने
मी पुन्हा बाटली आणि
ग्लास काढतो.
बाटलीचं बूच काढतो.
भरपूर दारू
ग्लासात ओतून घेतो.
मग बाटलीला बूच लावून
मोरीत ठेवून देतो. मग ग्लासातली
सगळी दारू पिऊन
कपाटात जाऊन
ग्लास धुऊन टाकतो.
आणि फळीवर ठेवून देतो.
मग हळूच बायकोच्या खोलीत
डोकावून पाहतो.
बायको पलंगावर गाढ झोपलेली
असते.
बघितलंत ?
या कानाचा त्या कानाला
पत्ता नाही आणि दारू मला
अजून चढलेली नाही.

मग थोड्या वेळाने मी पुन्हा
बाटली आणि ग्लास काढतो
ग्लासाचं बूच काढतो
भरपूर दारू कपाटात ओतून घेतो.
मग बाटलीला बूच लावून
ती बायकोच्या पलंगावर ठेवून देतो.
मग मोरीतली सगळी दारू पिऊन
कपाटात जाऊन
ग्लास धुऊन टाकतो
आणि फळीवर ठेवून देतो.
मग हळूच
बायकोच्या कानात
डोकावून पाहतो.
बायको मोरीत
गाढ झोपलेली असते.
बघितलंत ?
या कानाचा त्या कानाला
पत्ता नाही आणि दारू मला
अजून चढलेली नाही.

मग थोड्या वेळाने
मी पुन्हा
बाटली आणि ग्लास काढतो.
बाटलीचं बूच काढतो.
भरपूर दारू
मोरीत ओतून देतो.
मग कपाटाला बूच लावून
मोरीत ठेवून देतो.
कपाटातली सगळी दारू पिऊन
ग्लासात जाऊन
मोरी धुऊन टाकतो.
आणि फळीवर ठेवून देतो.
मग बाटलीच्या कानात
हळूच डोकावून पाहतो.
बाटली अजून कपाटावर
गाढ झोपलेली असते.
बघितलंत ?
या बाटलीचा त्या बाटलीला
पत्ता नाही आणि दारू मला
अजून चढलेली नाही.

मग थोड्या वेळाने
मग पुन्हा
मोरी आणि कपाट काढतो.
मोरीतली दारू
कपाटात ओतून घेतो.
अगदी भरपूर. बरं का.
मग कपाट
मोरीत ठेवून देतो.
हो , ठेऊन देतो
मग मोरीतली सगळी दारू
पिऊन टाकतो.
सगळी पितो बरं का.
मग मी बायकोच्या खोलीत जाऊन
कपाट धुऊन टाकतो.
अगदी साफ धुऊन टाकतो
बरं का.
आणि फळी
कपाटावर ठेवून देतो.
मग कपाटातल्या मोरीत
हळूच डोकावून बघतो
हळूच , बरं का!
बायको मोरीत
गाढ झोपलेली असते.

हा: हा: हा:!
बघितलंत ?
या बायकोचा त्या बायकोला
पट्टा नाही
आणि मी इटकी
दारू प्यायलो
पण अजून मला
च्यढली णाही खर्र ना ?

- वि. रा. भाटकर

बढिया !!

ह ह पु वा

काव्य उत्तम

विकास राव,

माहिती आणि

काव्य उत्तम ( ह.ह.पु.वा.)

द्राक्ष प्रक्रिया

महाराष्ट्र शासनाने द्राक्षापासून वाईन बनविण्याबाबत द्राक्ष प्रक्रिया उद्योग धोरण -2001 जाहीर केले. आज नाशिक व सांगली जिल्ह्यात वाईनपार्क सुरू झाले आहेत.

लहान शेतकऱ्यांना छोटे वाईन प्रकल्प सुरू करता यावेत, यासाठी औद्योगिक विकास मंडळाच्या ठिकाणी भुखंड आरक्षीत करण्याचाही शासनाचा विचार आहे. सद्या महाराष्ट्र राज्यात एकुण 35 वाईन प्रक्रिया उद्योग कार्यान्वीत आहेत.

सुला

सुला वाईनचे त्यात बरेच नाव झाले आहे.

वा वा

वा छान लेख आणि प्रतिसाद.
लाल वाईन मध्ये स्वीट, हाफ ड्राय आणी ड्राय असे प्रकार असतात त्याला इकडे लिबलिश, हाल्बट्रोखेन आणि ट्रोखेन म्हणतात. तसेच शँपेन या कंपनीची प्रसिद्ध असलेली स्पार्कलींग वाईन (इकडे तीला सेक्ट म्हणतात.) सुद्धा सुंदरच. जेव्हडे माहिती आहे ते खरडले झाले.

खरेतर एकाने सांगून दुसर्‍याने वाईन प्यावी हे खरे नोहे. अनेक निरनिराळ्या वाईअ प्यायल्यावरच आपल्याला कोणती आवडते ते कळणार.

बाकी वाईन ला धर्मात स्थान आहे ते चांगलेच म्हणायचे :)
--लिखाळ.

जय स्वावलंबन ! कष्ट करा ... कष्ट करा !!

 
^ वर