आजी-आजोबांच्या वस्तु - २ (बंब)

मी एकदम खुष होतो. माझे आजी आजोबा गावावरुन येणार होते. त्यांना आणायला बाबा स्टेशनवर गेले होते. मला गावाला जायला फार फार आवडते. तिथे एक गोठा आहे. तिथे बर्‍याच गायी-म्हशी आहेत. एकदा मी आजीला सांगितलं होतं की आम्ही मुलाला 'गाय' म्हणतो. तर आजी "तुम्ही गाय कसले बैल आहात लेकाचे! " असं तोंडला पदर  लाउन हसत म्हणाली होती. ती अशी पदर तोंडाला लाऊन हसली की मला एकदम फनी वाटतं. मी आजी-आजोबांची खुप वाट बघत होतो.
तसा मी हुशार आहे. आजी आजोबा येणार म्हणून  शहाण्यासारखी आंघोळ करून बसलो होतो. माझा खणपण आवरला होता. नाहितर आई नेमकी त्यांच्यासमोर ओरडते. एकदाची दारावरची बेल वाजली. आईने लगबगीने दार उघडलं
"या आई, कसा झाला प्रवास?"
"सुरेख होऽ कोकण रेल्वेने अर्ध्या वेळात आणून सोडलं" आजी नेहेमीच्या फनी टोनमधे बोलली.
इतक्यात आजोबा आत आले. ते काही ओमच्या आजोबांसारखं धोतर घालत नाहित. मी त्याना पाहुन एकदम खुष. सगळ्या आजोबांसारखं ते पण मला मजेशीर गोष्टी सांगतात. तोपर्यंत आजीने एक पिशवी हातात दिली.
"जा आईला दे.. खरवस् आहे गोऽ त्यात... रंभा व्याली .. दुसर्‍या दुधाचा आहे हो.."
"व्याली म्हणजे?" मी लगेच विचारलं
"म्हणजे तिला बाळ झालं. एकदम छान रेडकु आहे. डोक्यावर मोती आहे त्याच्या"
माझ्या डोळ्यासमोर ती मारकी म्हैस आली. म्हणजे तिला बाळ झालं तर. आजी आणि आईची काहितरी बडबड चालली होती. माझं लक्ष आजीकडच्या गोळ्यांकडे होतं इतक्यात "...त्यात काल आमचा बंब बिघडला..." असं काहितरी आजी बोलली. म्हटलं हे काय नवीन प्रकरण? तसा मी हुशार आहे, आई मला असा उघडाबंब बसु नको असं कधी म्हणते हे मला लगेच् आठवलं. त्यातला का हा बंब?
मी आजोबांना जाऊन बिलगलो. "आबा, बंब म्हणजे काय?"
"कसला रे बंब? आग विझवायचा? आग विझवायचा बंब म्हणजे ते फायर ब्रिगेडवाल्यांकडे असतो ना तो!"
"तुमच्याघरी पण हा आग विझवायचा बंब आहे?"
"नाहि रे.. घरी कसा असेल? केवढा मोठा असतो तो!"
"मग आजी काय् म्हणतेय ?की तो बिघडला आहे म्हणून"
"हा हा हा".. ठ्योऽऽय छिकऽक .. आजोबा एकदम जोरदार आवाजात शिंकले. मी तर हसायलाच लागलो. पण त्यांना कळलच नाही ते सांगत होते" अरे घरी तर पण पाणी तापवायचा बंब आहे"
"म्हणजे?"
"म्हणजे पाणी तापवायचं यंत्र."
तसा मी हुशार आहे. मला लगेच् कळलं  "अच्छा म्हणजे गिझर!!"
" हो गिझरच पण कोळशावर चालणारा."
"पण त्यात पाणी कसं गरम होतं?"
इतक्यात बाबा ओरडले "अरे ते आत्ताच आले आहेत त्यांना थोडावेळ बसु देत" मी पटकन आजोबांपासुन दुर झालो.
"नाही रे तु विचार बिनधास्त" असं म्हणून आजोबांनी मला परत जवळ ओढलं. आजोबा म्हणूनच मला आवडतात. मी बांबांकडे हळुच चिडवत पाहिलं. तोवर आजोबांनी एका कागदावर हे चित्र दुसरं काढलं होतं

                                                        

हा बंब आहे. हा पितळेचा असतो. पितळेची वस्तु लगेच गरम होते ना, म्हणून हा बंब पण पितळेचा.म्हणजे यात पाणीपण लगेच गरम होईल. तर यात मागे या झाकणातुन कोळसा घालतात. बंबाच्या आतमधे असे दोन भाग असतात. वरच्या भागात थंड पाणी ओततात . ते ह्या नळ्यांमधुन येतं ह्या नळ्या कोळशामुळे मस्त तापलेल्या असतात. त्यातुन पाणी गेल्यावर ते लगेच गरम होतं एकावेळी बरच पाणी ह्या छोट्या छोट्या नळ्यांमधुन आल्याने एकदम बरच् तापलेलं पाणी आपल्याला पटकन मिळतं. यातुन बरीच वाफ तयार होते ती इथुन चिमणीमधुन बाहेर येते."
मला एकदम गंमत वाटली. "म्हणजे मग हा बंब उघडता येतो?" मी विचारलं
" हो येतो की. गावाला आलास ना की मी उघडून दाखविन नक्की"
तसा मी हुशार आहे,  मी लगेच विचारलं. "मग गिझरमधे कुठे कोळसा घालतो आपण? मग त्यात पाणी कसं तापतं?"
"अरे, गिझरमधे इलेक्ट्रिसिटीने पाणी तापतं"
"इलेक्ट्रिसिटीने कसं तापतं? कोळसा पेटला म्हणून गरम होतो? पण इलेक्ट्रिसिटीने वायर कुठे गरम होते?"
"वायरचं मटेरियल कुठलं त्यावर ते अवलंबुन असतं. इस्त्री आपण इलेक्ट्रिसिटीने तापवतो की नाही तसं"
"बाबा, मग आपण घरी बंब नाही आणत? हा गिझर का वापरतो?"
" बंबाला कोळसा, लाकुड, गोवर्‍या लागतात. त्या जाळल्याने बराच धुर होतो. शिवाय त्यामुळे हा बंब साफ करायला लागतो तो वेगळाच" गोवऱ्या मला एकदम शेणाचा वास आठवला. घरात नको बाबा तो वास. आणि तसंही रोज तो बंब पिटवत बसलो तर शाळेला रोजच सुट्टी!!
"हं म्हणजे आपल्याला वस्तु गरम करायला गॅस, इलेक्ट्रिसिटी नाहितर कोळसा हवाच आणि बंबात कोळसा असल्याने पाणि तापतं. त्यातही नळ्या असल्याने ते एकदम लवकर तापतं. "
"आहे बाबा तुझा पोरगा हुशार!" आजोबा बाबांना म्हणाले.. मी जाम खुष.. मी इतकं छान बोलल्याबद्दल आबांना एक पापा दिला आणि खेळायला पळालो.

Comments

छान जमला आहे

शैली आवडेल अशी आहे. मस्त.

अवांतर : चित्र तांब्याच्या बंबाचे आहे, पण शब्द पितळ्याच्या बंबाबाबत आहेत.

अरे वा!

खूपच छान लेख...

खूपच आवडला..

(तांब्याच्या बंबाचे चटके बसलेला, घाबरलेला, धुराला वैतागलेला) सहज
;-)

वा

हाही लेख आवडला. असं काही वाचायला चांगलं वाटतं.

मी गमभन शब्दसंपदा कधीकधी वापरते.

हेहे

मला एकदम गंमत वाटली. "म्हणजे मग हा बंब उघडता येतो?" मी विचारलं

उघडाबंब हा शब्द कसा आला असावा? "आजी-आजोबांच्या वस्तू" प्रमाणेच "आजी-आजोबांचे शब्द" यावर लेख लिहिण्याचा विचार करतो आहे!

बोध

माझे एकंदरीत लिखाण हे बाळबोध असल्यामुळे वय वर्षे सहा ते पंधरा या वयोगटांमधील बाळांना नक्कीच बोध होईल अशी आशा आहे :)

बंब

आमच्या कडचा बंब हा तांब्याचा होता. तोटी मात्र पितळेची होती. पण अंघोळी साठी चुलीवर मोठ्या हंड्यात पाणी तापवणे सोयीचे असायचे. कारण आंघोळींनंतर गुरांसाठी बाजरीचा "दाणा " [ गुरांचा शिराच तो ] घमेल्यात शिजवला जायचा. त्या दाण्यात घरातल उरलसुरल भाजी आमटी टाकली जायची . असे ते "आंबोवण" तयार होते. तसेच शेतातल्या कुत्र्यांच्या भाकरी त्याच चुलीवर केल्या जायच्या. शिवाय कुठलही सरपण हे चुलीला चालत. बंबाच तस नसत. कमी आकाराची फोडलेली लाकडेच बंबाला लागायची. दिवाळीत व पाहूणे रावळे असले की मात्र बंब आणी चुल दोन्ही वापरले जायचे.
प्रकाश घाटपांडे

तांब्याचा बंब

आमच्याकडील बंब पण तांब्याचाच होता. बंबात घालण्यासाठी लाकडाच्या लहान लहान ढलप्या मिळत. त्यांना बंबफोड असेही म्हणत. लेखातील बंब आमच्या बंबाच्या मानाने जरा आधुनिक आहे. आमच्या बंबात मध्यभागी एक मोठे सिलिंडर बसवलेले असायचे. त्याच्या तळाशी झारा अडकवण्यासाठी जागा असायची. तिथे झारा क्षितिजसमांतर रेषेत (म्हणजे आडवा)अडकवायचा. मग वरून सिलिंडरमधून ढलप्या / कोळसे घालून ते पेटवायचे. बंब पेटवणे सर्वांनाच जमायचे असे नाही. ढलप्या/कोळसे जरूरीपेक्षा जास्त झाले की बंब चोंदून नुसता धूर व्हायचा आणि तो सिलिंडरमधून बाहेर यायचा. अंघोळ झाल्यावर बंबात भर / विस्तव घालणे हे मुले नेहमी विसरत आणि बोलणी खात! (भर म्हणजे पाण्याची भर व बंब विझत आला असेल तर ढलप्या, कोळसे वगैरे घालणे म्हणजे विस्तव घालणे.)

असेच...

लेखमाला अत्यंत आवडली. (पाटा-वरवंटा, उखळ-मुसळ, धुण्याचा दगड, चूल/कोळशाची शेगडी अशा अनेक वस्तू नजरेसमोर आल्या...)

ठोक्याचा (म्हणजे तांबटाने ठोकून बनवलेला) तांबे या धातूचा बंब, पितळी नळ, अक्षरेषेत विरुद्ध दिशांना दोन पितळी कान बसवलेले गोल झाकण, लोखंडी झारा,तिवई, पाणी भरण्यासाठी पितळेची बिजागिरी आणि मूठ बसवलेले दिंडीझाकण (दिंडी दरवाजा प्रमाणे), मध्यभागीच्या नळकांड्यातून बाहेर पडणारी आग किंवा धूर, बंबफोड, गोवर्‍या, रॉकेल...
उकळते पाणी आणि पावसाळ्यात कपडे वाळवणे हे महत्त्वाचे फायदे.

छान

लेख मस्त आहे आणि त्यानिमित्ताने सर्वांच्या आठवणीही.

आमच्या घरी पण एक बंब होता, मीराताई म्हणतात तशी ढलप्यांची रास घरातल्या एका कोपर्‍यात ठेवलेली आठवते. त्याने पाणी नळातून जसे भरपूर काढता येते तसे नाही - थोडेच मिळायचे पण कढत!

छान

ऋषिकेश, लेख चांगला झाला आहे. तयार झालेली राख कशी काढली जाते? आणि त्या राखेचा सुद्धा वापर होतो हे सांगता आले तर लेख आणखी माहितीपुर्ण होइल. असेच लिहित जा.

मराठीत लिहा. वापरा.

राखेचा वापर- अंगारा

अंगारा तयार करण्यासाठी भस्म म्हणुन होत असे. प्रत्यक्ष भस्म म्हणजे नेमकी कशाची राख हे मला माहीत नाही. पण ती राखच. चुलीवर पोतेरे [ माती व पाणी यांचे मिश्रण करुन ते पोत्याच्या कापडाने म्हणजेच तरटाने सारवून घेणे] करण्यासाठी, गोवर्‍या थापताना होत असे. तिन्हीसांजा झाल्यावर (संध्याकाळी) हातपाय धूउन देवाच्या पाया पडुन् मग "रामरक्षा" स्तोत्र म्हणताना मी ती राख हाताने चोळत असे. रामरक्षा म्हणुन पुर्ण झाली की त्या राखेचे अंगार्‍यात रुपांतर होई. जेवढे जास्त जोरात चोळणे तेवढा 'अंगारा 'पॉवरफुल. ही रामरक्षा म्हणताना मात्र साधे पद्मासन ( म्हणजे मांडी) घालून डोळे मिटून बसायचे असते. हा अंगारा भूताखेतांसाठी पॉवरफूल मानला जायचा. एखाद्याचा ताप उतरत नसेल तर त्यालाही तो दिला जाई.
भैरोबाचा (भैरवनाथ हे ग्रामदैवत) च्या देवळात उदबत्त्या, धुप याची जी राख तयार होउन त्याचा अंगारा बनत असे. दर रविवारी संध्याकाळी भैरोबाला तेलवात घालून तो अंगारा घरी आणून घरात सर्वत्र उधळून द्यायचा असतो असे केल्याने विंचू-साप घरात निघत नाहीत किमान त्याचा त्रास होत नसे . जर हे केले नाही तर विंचू साप घरात निघण्याचे भय. हे काम मी करत असे. एकदा मी खेळण्याच्या नादात हे "कृत्य" करायचे विसरुन गेलो. नेमका त्या आठवड्यात घरात साप निघाला आणि मला अपराधी वाटू लागले. मनातल्या मनात भैरोबाची माफी पण मागितली.
प्रकाश घाटपांडे

राखेचा असाही उपयोग

आपल्या शास्त्रात बहुतांशी सर्वच कृतींमागे कारणे आहेत. आंगाला भास्म/राखा फासण्यात सुद्धा. पूर्वी आजच्यासारखे अंगावरील घाण काढायला साबन नव्हते. तेव्हा रिठा, शिककाई, लिंबू, आंबा, वगैरे नैसर्गिक पाने-फळे वापरुन अंग साफ केले जाई. त्यातूनही जर शरिरावर बॆक्टेरिया राहिले तर त्यांना मारुन टाकण्यासाठी भास्म/राख सर्वांगाला लावली जाई.

आमच्या बालपणी आमच्या गावात कडुलिंब, उंबर, मोगला, सुबाभूळ यांच्या काड्यांबरोबरच वोवयाच्या राखेचाही दात घासण्यासाठी वापर होत असे. नंतर हळूहळू मंजन अन पुढे ब्रश आले. तरी अजून मी गावी गेल्यावर आंगणातल्या कडूलिंबाच्या काडीनेच दात घासतो.

आपला,
(गाववाला) भास्कर
आम्ही येथे वसतो.

राखुंडी

होय, गवर्‍या अर्धवट जाळून त्याची कोळ्सायुक्त राख घेउन ती कापुर व मीठ टाकून ती अर्धवस्त्रगाळ करुन मोठ्या डब्यात साठवून ठेवली जात असे. त्याला राखुंडी म्हणत. त्यामुळे मी आवडीने दात घासत असे. अत्यंत चवदार लागे. त्यातली हळूच थोडी खाल्ली तरी कुणाला कळत नसे.पण माती खाण्यापेक्षा हे बरं अस मोठया लोकांना वाटत असावे.
प्रकाश घाटपांडे

मस्त

ऋषिकेश, लेख मस्त झाला आहे. सहज शैलीमुळे ओघवता.

---
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

शैली आणि लेख

दोन्ही मस्त. माझ्याही आजीआजोबांकडे, खुद्द मुंबईत बंब होता. तांब्याचा! त्याची आठवण झाली.

बंब

लेख आवडला आणि शैली देखील. काही काळ आमच्या कडे तांब्याचा बंब गिझरसारखा होता. म्हणजे त्यात हिटींग कॉर्ड होती. पण आमच्या आजोबांना ते (गमतीत) विशेष पसंत पडले नाही कारण गरम पाणी मिळाले तरी जळण घालून धुराचा वास असलेले "कढथ" पाणी वेगळेच!

छान

छान लेख. बंबाबद्दल काहीच माहिती नव्हती, कधी प्रत्यक्ष पाहिलेलाही नाही.
राधिका

शेणाचा वास

ऋषिकेश, तुझा हा लेख पण छानच जमला आहे. असेच लिहित रहा. मात्र मला तुझ्या शेणाच्या वासाच्या निरिक्षणाबद्दल काही सांगायचं आहे.

शेणाच्या वासाबद्दल -
आमच्या बालपणी आम्ही शेणाचा सडा-सारवणासाठी, गोव-यासाठी, खतासाठी, वगैरे सर्रास वापर करीत असू. तेव्हा शेणाबद्दल विषेश अशी घाण वाटायची नाही. आता मात्रा शेणाची दुर्गंधी आल्यासारखी वाटते. शहरात राहून शेणाचा वास घेण्याची सवय मोडल्याने जाणवणारा हा फरक नक्कीच नाही. म्हणून माझ्या बालपणी गुरांच्या शेणाचा येणारा वास आणि आता गुरांच्या शेणाचा येणारा वास याविषयी मी आमच्या गावातल्या गुरांच्या डॊक्टरांशी बोललो. त्यांनी सांगितले की या पंधरा वर्षांत गाजर गवत (कॊंग्रेस गवत) तसेच बेशरम अशा विषारी तणांचा प्रश्न फारच भयानक झाला आहे. गुरे आजकाल सर्रास गाजर गवत खातात. ते विषारी असते. तसेच गुरांना मिळणारा चारा हा सुद्धा खते, किटक नाशके वगैरे सारख्या रसायनाने प्रदुषित झालेल्या शेतांतला असतो. त्यामुळे त्यातही रसायणे असतात. गुरांच्या या सगळ्या बदललेल्या आहारामुळे त्यांच्या पचनसंस्थेवर भयंकर परिणाम होत आहेत. परिणाम म्हणून शेणाचा सुद्धा घाण वास येत आहे. यातही भयंकर बाब म्हणजे छोट्या-मोठ्या शहरात कचर्यावर जगणा-या गुरांच्या शेणाचा मानवाच्या विष्ठेसारखा वास येतो.

आपला,
(गुराखी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

सहमत

शेणाच्या वासाबद्द्ल पुर्ण पणे सहमत. आपण शहरी झाल्याने असे होते आहे अशी अपराधीपणाची भावना माझ्या मनात असायची. त्याचे निरसन झाले. गाजरगवताला आमच्या कडे "वजबुडी" म्हणत. काँग्रेस गवत हा पर्यायी शब्द पण होता. सुरुवातील जनावर हे गवत खत नसत. पण नंतर नंतर ती खाउ लागली. त्यामुळे गायीच्या दुधाची चव ही कडवट व्हायला लागली .हे तण फार भयानक होते.
वजबुडी हा वंशबुडी म्हणजे इतर पिकांचा वंश बुडवणारी अशी व्युत्पत्ती आमच्याकडील जोशी डॉक्टरांनी काढली होती. तसेच हे गवत काँग्रेस पक्षासारखे फोफावते आहे म्हणुन त्याला काँग्रेस म्हणतात ही व्युत्पत्ती पण त्यांचीच. प्रत्यक्षात हे तण अमेरिकेतून ७२ च्या दुष्काळात मदत म्हणुन पाठवलेले धान्य "मिलो" या सोबत आले किंवा अमेरिकेने ते मुद्दाम दुष्टपणे मदतीच्या बहाण्याने पाठवले असे नंतर सिद्ध झाले असे म्हणतात.
प्रकाश घाटपांडे

बरोबर

प्रत्यक्षात हे तण अमेरिकेतून ७२ च्या दुष्काळात मदत म्हणुन पाठवलेले धान्य "मिलो" या सोबत आले किंवा अमेरिकेने ते मुद्दाम दुष्टपणे मदतीच्या बहाण्याने पाठवले असे नंतर सिद्ध झाले असे म्हणतात.

ह्या संदर्भात मीपण ऐकले आहे. म्हणूनच कुणाचीही मदत घेताना निदान आता तरी सावध असायला हवे असे वाटते. आता चीनच्या उत्पादनात अनेक प्रदुष्ण (विशेष करून लहान मुलांच्या आरोग्यास हानीकारक) गोष्टी आहेत. ते अमेरिकेत ल़क्षात आले. मला काळजी वाटते की आज आपल्यापकडे पण "मेड इन चायना" चे वेड आले आहे. त्यामुळे त्याचे परीणाम काय होऊ शकतील याचा विचार हवा...

सुरुवातील जनावर हे गवत खत नसत. पण नंतर नंतर ती खाउ लागली.
गायीने ़काँँग्रेस गवत खाणे सोडा, पाश्चात्य देशात गाईच्या चार्‍यात "बीफ" अर्थात "गोमांस" पण असते. त्यामुळेचे "मॅड काउ" रोग पसरू लागला आणि खरे म्हणाल तर अचाट जाड पण अमेरिकेत फोफावले असे वाटते (आधीच रेड मीट ची सवय, भाज्या न खाणे किंबहूना त्यात कमीपणा मानणे आणि त्यात हे रेडमीट अशाअ जनावराचे की ज्याची चर्बी मुद्दमून वाढवलेली... अर्थात आता ते हळू हळू बदलत आहे).

सुरेख

ऋषिकेश चा हा लेख म्हणजे
हा दुसरा मनाचा तुराच आहे.
सहजतेने आलेला हा लेख वाचला पण मग सर्किटरावांशी वाद घालण्यात प्रतिक्रिया लिहायचा राहुन गेला.
तांब्या चा बंब पाहुन खुप आठवणी सगळ्यांच्याच जागृत झाल्या तश्या माझ्याही लहानपणच्या झाल्या.
डोळ्यात गेलेला धूर, मोडलेल्या गवर्‍या, नळातून येणारे थोदेसेच पण गरम पाणी नि त्या पाण्याची वेगळीच चव... पहाटेच्या आंघोळी सगळेच आठवून गेले.
खुप दूर कुठे तरी हे सगळे हरवून गेल्या सारखे वाटले.

अप्रतिम लेख. अजून येवू देत.

आपला
गुंडोपंत

तेच तर!

तेच तर... म्हणून तर मुकाट बसलोय!
शिव्या द्यायला काय लागतं हो... त्या आपसुकच येतात...

पण सगळा 'तोल सावरून' योग्य शब्दांत हे बाल साहित्य म्हणजे... 'बाल गिरने का' काम आहे बाबा!

आपला
गुंडोपंत

धन्यवाद

सगळ्यांचे उत्साहवर्धक प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!

अजित,
"आजी-आजोबांचे शब्द"मधे मराठीतील वेगवेगळ्या बोलींतील जुने शब्द वाचायला मिळाल्यास बहार येईल. नक्की लिहा. वाट पाहतोय

मीराताई,
ढलप्या, झारा, भर, विस्तव वगैरे शब्द खास बंबाबरोबर आठवणार्‍या गोष्टींना उजाळा दिल्याबद्दल आभार.

चाणक्य,
राख कशी काढायची हे केवळ बघुन आहे. स्वतः ते उद्योग केले नाहीत [करायाला दिले नाही कोणी :( ]... त्यामुळे हे लक्षातच आलं नाही. सुचवणीबद्दल आभार

विकास,
>>जळण घालून धुराचा वास असलेले "कढथ" पाणी वेगळेच
अगदी खरंय, तो वास आणि तांब्याची चव मिसळलेलं ते पाणी आणि हिटिंग कॉईलचे गरम पाणी याची तुलनाच नको :)

भास्कर
आभार.. अवांतरः शेणाचा वास तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ज्या कारणामुळे बिघडला आहे ते असेल तर ह्याच गाई-म्हशींच्या दुधावरही परिणा होतच असेल ना?

गुंडोपंत,
>>खुप दूर कुठे तरी हे सगळे हरवून गेल्या सारखे वाटले.
हं!! अगदी खरंय.. हरवलय खरं !
जाहिरात म्हणून सांगत नाही पण आपल्याकडचं बरच् काही हरवलय या वाक्यावरून मी पुर्वी केलेली आपण यांना पाहिलय का ही कविता आठवली

पुन्हा एकदा सगळ्यांचे प्रतिसाद, सुचवण्या, आठवणी आणि प्रोत्साहनाबद्दल आभार
टार्गेट ऑडियन्सची प्रतिक्रिया महत्वाची.. त्यांच्यापर्यंत लेख पोचवणार्‍या टार्गेट ऑडियन्सच्या बाबा मंडळींचेही आभार ;)

-ऋषिकेश

आम्ही

आता काय काय सांगु...

ह्या जनसागरातही एकटा असणारा मी...

माझा मलाच शोधतो आहे.. माझा मीच हरवलो आहे... आपण खऱ्या मला पहिलय का??

हित उपक्रमावर खरा ऋषिकेश आम्हाला पघायला मिळ्तो हाये. आम्ही बी बरुबर् हाय वला!
प्रकाश घाटपांडे

मस्त!

असेच आणखी येऊ द्यात. चूल, फुंकणी, पाटा-वरवंटा, खलबत्ता, उखळ, अडकित्ता, चंची बर्‍याच गोष्टी आठवू लागल्या आहेत.

एक वस्तू होती. अजूनही ती मिळते. काटा काढण्यासाठी एक चिमटा, सोबत एक टोकदार सुईसारखे काहीतरी आणि पुणेरी लोकांना तूप वाढण्यासाठी वापरता येईल असा चमचा. (त्याचे मुख्य काम कान स्वच्छ करायचे आहे असे म्हणतात). अशी बहूद्देशीय महाराष्ट्रीय स्विस नाईफच होती ती. लाचकंड की काही तरी म्हणायचे. नाव नक्की आठवत नाही.

- आजानुकर्ण

चिमुकला संसार

पुण्यात "चिमुकला संसार" नावाने श्री विलास नारायण करंदीकर नावाचे हौशी गृहस्थ या आजी अजोबांच्या काळापासून ते आताच्या पिढीपर्यंत छोट्या प्रतिकृती तयार करुन त्याचे प्रदर्शन भरवतात. अशा एका प्रदर्शनात त्यांचे विजिटींग कार्ड घेतले होते .

Chimukla Samsar" alt="">
चिमुकला संसार

प्रकाश घाटपांडे

वा!

चिमुकला संसार छानच आहे. पण विळी उघडी ठेवलीय ते तेवढं खटकतंय. (मनाचं कंडिशनिंग् किती झालेलं असतं पहा!)

कंडीशनींग


(मनाचं कंडिशनिंग् किती झालेलं असतं पहा!)

अगदी बरोबर ! चुकुन उघडी राहीली तर पाय पडेल. विळी हा धारधार वस्तु आहे जपून वापरली पाहिजे. इथे चुकिला क्षमा नाही. असं बिंबवण्यासाठी असलेले ते कंडिशनिंग असाव. आपण आता विजेची उपकरणे त्याच कंडीशनींगने वापरतो.
प्रकाश घाटपांडे

आजोबांची अंघोळ

ही बघा आमच्या दादांची ( आजोबा) अंघोळ चित्रात बंब, घंगाळ, तपेली. पातेली, आड. रहाटगाडगे सर्वकाही दिसत आहे. या आडावर रहाटगाडगे असल्याने पाणी शेंदणे हा प्रकार नव्हता.
Ajoba
प्रकाश घाटपांडे

आठवणी..

दर उन्हाळी सुट्टीत आम्ही गावी कोंकणात जात असू. चित्र बघून त्या बालपणीच्या गावच्या आठवणी चाळवल्या गेल्या..

पहिल्या आंघोळी होत त्या घरच्या स्त्रीयांच्या. त्यानंतर आजोबा आणि थोरले काका. मग इतर पुरुष मंडळी. आणि जेवणाच्या अगदी थोडावेळ आधी (जेवणाआधी आंघोळ व्हायलाच हवी म्हणून) आम्ही पोरे!!

बंब पेटवला की न्हाणीघरात धूर होई म्हणून एक उंच धुराडे लावले होते आणि भिंतीला भोक पाडून त्यातून ते बाहेर सोडले होते.

आंघोळीसाठी घंगाळात घेतलेले पाणी खूप गरम असे. त्यात थोडे थंड पाणी घालून आंघोळीयोग्य तपमानाला आणावे लागे. त्या थंड पाण्याला "विसण" म्हणत.

घंगाळ हा शब्द गंगाजल या शब्दावरून आला असे कुठेसे वाचल्याचे स्मरते.

वा!.. धन्यवाद!

अगदी नेमके चित्र आहे हे. प्रकाशराव अतिशय धन्यवाद... त्याही काळात न्हाणीघराचेही छायाचित्र काढुन ठेवल्याबद्दल खरंतर अभिनंदन
पुर्वीचं प्रशस्त न्हाणीघर, बंब, घंगाळं, तांब्या, भर घालायला पाणी, मागे रहाटही दिसतोय (रहाट गाडगं म्हणजे रहाटाच्या प्रत्येक आरिला एक गाडगं लावलेलं असायचं ते ना! का रहाट आणि रहाट-गाडगं एकच?)
अशीच आणखी चित्रे असल्यास बघायला नक्कि आवडतील
-ऋषिकेश

चित्रामागील वस्तुस्थिती

त्याकाळात वडीलांनी हे चित्र कोडॅक बॉक्स कॅमेराने काढले होते. त्याला त्यावेळी ६*२० चा रोल लागत असे. नंतर १*२० चा रोलही चाले. त्यांचे कडे रोल डेव्हलप करण्याची गुढ पेटी पण होती. प्रिंट मात्र पुण्यात होत असे. स्वातंत्र्याच्या दरम्यान किंवा असगोदर ते फर्गुसन / स प महाविद्यालयातून बीएस् सी केमिस्ट्री होते. नंतर बी टी (आताचे बीएड ) होते .म्हणजे गावाच्या मानाने खुप शिकलेले. ओतूर, नारायणगाव. पिंपळवंडी , आळे अशा जुन्नर तालुक्यातील ठिकाणी हायस्कूलात शिक्षकाची नोकरी केली. आजोबा वारल्यानंतर राजीनामा देउन त्यांची गादी पुढे चालू ठेवली.
अवांतर- सदर कॅमेरा दोन वर्षांपुर्वी फोटोग्राफी व आर्ट असा छंद असलेल्या मित्रास भेट दिला. जेणेकरुन विविध कॅमेरांचे संकलन करणार्‍याला ते उपयुक्त ठरावे.

(आजी आजोबांच्या वस्तू अडगळ म्हणुन नाईलाजाने वाटून टाकलेला)
प्रकाश घाटपांडे

सुरेख छायाचित्र

छायाचित्रे घेण्याचा छंद फार चांगला. आणि किती "कॅंडिड" म्हणतात तसे हे चित्र आहे!

एक सुचवावेसे वाटते -
तुमच्या आठवणींवर "माहितीपूर्ण" लेख का लिहीत नाही? वरच्या चित्रात तुमचे आजोबा जसे पाणी तापायची वाट बघत उभे आहेत, मागे घरातच आड आहे, हे सर्व हल्लीच्या नळाला पटकन गरम पाणी येण्याची सवय असलेल्या मुलांना तसे नावीन्यपूर्ण वाटेल.

 
^ वर