आजी-आजोबांच्या वस्तु - १ (जातं)

काल आई आजीला फोनवर काहीतरी सांगत होती. की आता आपलं जातं माळ्यावर धूळ खात पडलंय. मला कळेना की जातं म्हणजे काय? मी आईला विचारलं. "काय गं जातं म्हणजे काय?". आई फार घाईत होती म्हणाली , "सांगेन नंतर कधीतरी, आत्ता मला आधी कुकर लाऊ दे. " मला काही स्वथ बसवेना, मी सरळ दादाच्या खोलीत गेलो. तो नेहेमीप्रमाणे गेम्स खेळत होता. वॉव! लेटेस्ट एन्.एफ्.एस्.!! मी पार विसरूनच् गेलो मला काय विचारयचंय ते. दादा कसला ग्रेट खेळतो! ओम ला मी सांगणार आहे आज की माझ्या दादाने ४ ट्रॅक्स त्याच्या आधी पूर्ण केले. अरे हो! मला एकदम आठवलं जात्याबद्दल. मी दादाला विचारलं की जातं काय असतं. तर म्हणे "ग्राइंडिंग मशिन, पुर्वी दळणाला वापरायचे बहुतेक.  बाबांना विचार. आणि मला खेळू दे"

तसा मी हुशार आहे... पण बाबा येइपर्यंत थांबायचं म्हणजे. तसंही बाबा येणार रात्री कधीतरी. तेव्हा मला आई झोपायला लावते. अरे हो.. तर जातं.. जर दादा म्हणतो तसं ग्राइंडिंग मशीन असेल तर आपल्या एवढ्याशा माळ्यावर कसं मावलं? आपल्या पिठाच्या गिरणीत तर केवढं मोठ्ठ मशीन आहे. तसा मी हुशार आहे, लगेच मी खाली नाना आजोबांकडे गेलो. आमच्या खालीच राहतात. त्यांच्याकडे फिशटँक आहे आणि त्यात किलर मासा पण आहे. मी त्याचं नाव डॅनी ठेवलंय. अरे हो.. तर जातं.. मी नाना आजोबांकडे गेलो. गेल्या गेल्या नेहेमीप्रमाणे त्यांनी हातातला पेपर खाली ठेवला. आणि मला गोळी दिली. 
"आजोबा, जातं म्हणजे काय हो?" मी पण गोळी तोंडात टाकल्या टाकल्या प्रश्न केला
" का रे बाबा? आज काय हे मधेच? शाळेत विचारलय का? का गृहपाठात आहे?"
"सांगा नाऽऽऽ!!" आमच्या नानांना प्रश्नच फार असं सतीश काका बोलल्याचं मला आठवलं
"बरं बरं. सांगतो. आमच्या घरातच जातं नाही आहे. पण आजच् एका मासिकात एका जात्यावर पिठ काढणार्‍या बाईचं चित्र आहे."

"वॉव. म्हणजे यात पिठ दळायच्? स्वतः?"
"अरे! पिठ दळता येतं का? धान्य दळायचं. आणि हो स्वतः! आता हे बघ..." त्यांनी एक् चित्र काढलं. "जातं असं दोन सपाट दगडांच्या जड चकत्यांचं बनलं असतं. एक घट्ट बसलेला असतो तर एक त्यावर गोल फिरतो. या इथुन वरून धान्य टाकायच आणि हे जातं गोल गोल फिरवायचं की या दोन दगडांमधे धान्य भरडलं जातं...."
"भरडलं भणजे?"
"म्हणजे स्मॅश होतं. आणि त्याचं पिठ बनतं. हे पिठ इथुन बाहेर येतं"
तसा मी हुशार आहे. लगेच विचारलं "पिठाला कसं काय कळतं कुठुन बाहेर यायचं ते."
"हं" आजोबा हसले. असे ते कधी कधी उगाच हसतात." हे चित्र बघ...."

".... हे  'आय' लिहिलं आहे ना तिथुन धान्य टाकायचं. जात्याला आतमध्ये चिरा असतात आणि चर असतात.. चर म्हणजे "क्रॅकिंग्ज" यामुळे धान्य नीट भरडलं जातं. व्हेरी फाईन. पिठ कीती जाड किंवा बारीक हवं आहे त्यावर हे चर कीती खोल आणि किती हवेत ते ठरतं. चिरा म्हणजे ज्यात धान्य भरडल्यावर पिठ साचतं ते!"
"पण ते बाहेर कसं येतं?"
"जेव्हा नवीन पिठ तयार होतं ते पिठ आधिच्या पिठाला चिरांमधून बाहेर ढकलतं"
इतक्यात आ़जी मस्त भज्या घेऊन आली
"आजी, तु पाहिलं आहेस जातं?"
"पाहिलं?! अरे मी तर स्वतः दळलं आहे जात्यावर. वा वा काय सुरेख पीठ मिळायचं अगदी आपल्याला हवं तसं जाड. त्या भय्याची कटकट नाही. इतरांचं हलकं पीठ मिसळायला नको."
आजी एकदम काहीतरी गाणं गुणगुणायला लागली. मला तर एकही शब्द कळेना.
"हे काय गातेस? काही कळलं नाही!"
"ही अहिरणी बोली आहे. तुला नाही कळायची"
मला नाही काळायची म्हटलं की अस्सा राग येतो मला! जाऊदे! तसंही आजीला काहि नव्हतं त्याचं ती त्या गाण्यतच अडकली होती.

आजोबा सांगत होते. " आपल्या भय्याचं जे मशीन असतं ना तेही असंच काम करतं फक्त एलेक्ट्रीक मोटार जात्याला फिरवते. त्यामुळे खुप पीठ वार जलद बाहेर येतं." मी विचार करत होतो की आपल्या जयकिसनला(आमचा पीठाचा भैय्या) एकदा मशीन उघडलं की मला बोलावं असं सांगायचं. इतक्यात मला आठवले की आपल्याकडे जातं आहे. मी तसा हुशार आहे! मी पक्क ठरवलं की रविवारी बाबांना जातं माळ्यावरून काढायला लावायचं आणि स्वतः पीठ काठून बघायचं. सही! कीती ग्रेट आयडिया आहे. ओमला आत्ता सांगतो या विकेन्डचा प्लॅन.. त्यालाही बोलावतो.... तुम्हीपण बघा कधीतरी जात्यावर दळून!!

Comments

टिप

अश्या बऱ्याच गोष्टी आहेत जी आजची मुलं फक्त ऐकतात. पण पाहिल्या नसतात जसं जातं, पाणी तापवायचा बंब, उखळ इ. याची मुलांना माहिती व्हावी असं वाटत होतं. सर्कीटरावांनी मुलांसाठीच्या लिखाणाचा विषय काढला नि ही कल्पना परत वर आली. अर्थात यात बऱ्याच सुचवण्या असतील यात शंका नाही. पण मुलांसाठी लिखाणाची सुरवात व्हावी या हेतूने हा एक छोटासा प्रयत्न. सुचवण्यांचं स्वागत आहे. यात पुढे इतर अनेक जुन्या वस्तु, खेळ यांची ओळख करून द्यायचा मानस आहे बघुया कसं जमतय, झेपतय आणि मुलांपर्यंत पोचतय ते.

१. कृपया ज्यांना मराठी वाचू शकणारी लहान मुलं आहेत त्यांना हा लेख वाचायला देऊन त्यांचाही अभिप्राय कळवावा
२. चित्रे जालावरून व विकीमधुन घेतली आहेत
३. भाषा याहून सोपी हवी का? याहून वैज्ञानिक लिहावं का? यावर मते ऐकू इच्छितो

-ऋषिकेश

मस्त

लहान मुलांना कळेल असेच आहे. आणि माहितीच्या दृष्टीने परिपूर्ण. अभिनंदन.


शैलीच्या दृष्टीने एक वाक्याचा पुन्हापुन्हा वापर खटकला : "मी तसा हुशार आहे!" त्यामुळे गोष्ट सांगणारा मुलगा अतिहुशार=दीडशहाणा असल्याचा भास होतो, आणि मला वाटते की तो विनोद तुम्हाला अभिप्रेत नसावा.

कबुल करायचं नाही ;)

तो विनोद तुम्हाला अभिप्रेत नसावा.
अहो.. बर्‍याचदा मुलांना आपल्याला माहित नाही हे कबुल करवत नाही त्यामुळे ते 'हुशार आहे पण.. 'चं पालुपद लावतात असं निरिक्षण होतं. (लहानांचच कशाला माझंही आत्ता असंच् होतय बघा ;) येत नही माहीत नाही हे कबुल करायचं नाही :p)

छान

लेख आवडला. चित्रेही छान आहेत. कंटेंटच्या दृष्टीनेही योग्य वाटतो. मुलांना आवडेल असे वाटते.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

क्वालिटी-अशुअरन्स बद्दल उत्सुक

मी आज घरी मुलीला वाचायला देतो
वा वा वा! नक्की द्या.. तिथे खरी परिक्षा आहे.. :P

-ऋषिकेश

सुरेख

लेखाची कल्पना विशेष आवडली. त्याला दिलेलं स्वरूप तर सुरेखचं म्हणजे दुपारभरात एकदा लेख उघडला (वाचला नाही) तेव्हा हे ललित साहित्य इथे कसं आलं बॉ असा प्रश्न पडला परंतु कथारूपाने, संवादरुपाने एखादा यांत्रिक किंवा शास्त्रीय विषय खुलवून सांगण्याची कला आवडली. असे आणखी लेख येऊ द्या, वाचायलाही गंमत वाटली.

हेच अगदी!

ललित साहित्य इथे कसं आलं बॉ असा प्रश्न पडला

उत्तम लेख.

छान

ऋषीकेश,
छान लिहिला आहेस हा लेख.
अगदी चुणचूणीत कंटेंपररी.

पुढील लिखाणाच्या प्रतिक्षेत असूच.

आपला
गुंडोपंत

चांगला लेख आहे

म्हणजे ज्या हेतूने लिहलाय ते जमलयं असे वाटते.
अर्थात लहान मुलांची प्रतिक्रिया महत्वाची. सर्केश्वर महाराज कळवतीलच.

छान

एकंदर लेखातली शैली आणि माहिती आवडली.आकृती आणि माहिती मधली मेहनत दिसते आहे.

मी गमभन शब्दसंपदा कधीकधी वापरते.

मस्तच

चांगलाच जमला आहे लेख.
जात्याचे आणखी काहि फायदे सांगता येतील. जसे..
१. हवे तेंव्हा ताजे पीठ तयार कराता येणे.
२. दळताना कविता सुचणे वा पाठांतर करणे :)
३. बायसेप ट्रायसेप चांगले होणे :)

आपल्या विषयांच्या सेरिज मध्ये माझ्या काहि सुचवण्या:
१. कणगी
२. सुप

तसेच या गोष्टी आता का वापरल्या जात नाहित? याचे स्पष्टीकरण देणे सुद्धा जास्त चांगले ठरेल.

मराठीत लिहा. वापरा.

सुंदर

राजीव तांबे यांची आठवण करुन देणारा लेख. फारच छान.

- आजानुकर्ण

उत्तम

लेख, मी पण माझ्या भाच्याला देतो वाचायला.

"बळद "ते "जाते "

इथे आमच्या घरात जात्यावर मी हौसेने दळत असे. जात्यावरच्या ओव्या हा बायकांचा विरंगुळा असे. रवी घुसळखांबाला बांधुन मोठ्या भांड्यात ताक करणे , उखळात धान्य कांडणे, बळदाच्या तळाशी जे माजघरात होते त्यातील लाकडी खिट्टी सारखी फळी काढून बळदात भरलेली बाजरी काढणे, { बळदाचे मुख्य प्रवेशद्वार हे मागील माडीत होते} ती आधुलीने ( साधारण डमरुच्या आकाराचे धान्य मोजण्याचे पात्र, त्याला आठवा ही म्हणत ) गोणीत ( लहान आकारावे पोते ) भरताना पहिली आधुलीला "लाभ" असे म्हणुन पुढील गणना करणे. हे मला ऐकायला खुप आवडे. लाभच्या ऐवजी एक का म्हणत नाहीत? असा प्रश्न मी मुर्खासारखा विचारित असे.
जात्याच्या तळ हा चित्रात दाखवल्या प्रमाणे पीठ करण्यासाठी खडबडीत करणे आवश्यक असते. त्याला " टाकी लावणे" असे म्हणतात. छिन्नि हातोड्याने तो लावणारा स्वतंत्र माणुस किंवा बाई असे. " टाकीला बाऽऽई " असे ओरडत तो गावात फिरत असे. अधुन मधुन अशी 'टाकी लाउन 'घेणे आवश्यक असे. गावात गिरण्या आल्या आणि जात्याच महत्व हळू हळू कमी होत गेले.
प्रकाश घाटपांडे

धन्यवाद

सगळ्यांचे प्रतिसादबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद. प्रयत्न सगळयांना आवडला याचा आनंद आहे.

सर्किटराव आणि आनंदयात्री,
टारगेट ऑडियन्सच्या प्रतिक्रिया ऐकायला उत्सुक :)

चाणक्य,
कणगी, सुप वगैरे नक्की :) आणि ट्रायसेप्सचा फायदा लक्षातच आला नव्हता :)) (असामी असामीतलं 'पाणी डोक्यावरून वाहायच्या त्यामुळे बायकांची फिगर नीट राहात् होती' ची आठवण झाली;)

प्रकाशराव,
घुसळखांबाची रवी वगैरे मीच फार लहानपणी बघितली होती. आता बहुदा कुठेही नसावी. बाकी तुम्ही दिलेल्या बर्‍याच गोष्टी , बळद, आधुली, खरचं विस्मरणात गेल्या होत्या. उजाळा दिल्याबद्दल आभार.

-ऋषिकेश

मुलांसाठी लेखन

श्री.ॠषीकेश यांची लेखनशैली मुलांना आवडेल अशीच आहे.विषयाची निवडही चांगली आहे.मुले स्वतःला हुशार समजतात(तशी ती असततही) हे ॠषीकेश यांचे निरीक्षण सूक्ष्म आहे.श्री.सर्किट यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी परिश्रमपूर्वक एक चांगला लेख लिहिला आहे; हे निर्विवाद
पण उद्दिष्ट काय ते ठरवायला हवे. आजची मुले मराठी पुस्तके वाचतील तेव्हा जाते,उखळ,मुसळ,मोट ,थारोळे असे अनेक शब्द त्यांना अडतील. त्यांचा परिचय करून देणे आवश्यक आहे. पण तेवढेच. "जाते म्हणजे पूर्वी धान्य दळण्यासाठी वापरीत असत असे एक दगडी साधन."त्याची थोडीशी माहिती पुरे.सचित्र तांत्रिक बरकाचे देणे आवश्यक आहे असे मला वाटत नाही.जात्यावर दळण्याचे कितीही लाभ असले तरी त्या तंत्रज्ञानाचे आता पुनरुज्जीवन होणे नाही. (न होणे योग्यच आहे).तेव्हा बारकावे(डीटेल्स) अनावश्यक.
माझ्या मते अशा शब्दांचा भाषेच्या अंगाने परिचय करून द्यावा. म्हणजे जात्याशी संबंधित म्हणी,वाक्प्रचार अर्थासह लिहावे. जसे"जात्यातले रडतात, सुपातले हसतात. जात्यावरील ओव्यांविषयी लिहिले आहे ते योग्यच आहे.

»

थारोळे

आजची मुले मराठी पुस्तके वाचतील तेव्हा जाते,उखळ,मुसळ,मोट ,थारोळे असे अनेक शब्द त्यांना अडतील.

तशी मी हुशार आहे. पण थारोळे हा शब्द मलाही अडला. :ड्

राधिका

थारोळे

थारोळे या शब्दाचा वाक्यात उपयोग असाही होऊ शकतो ना? "त्याच्या देहाभोवती रक्ताचे थारोळे होते." (चूभूद्याघ्या)
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

ह्म्म्

ते थारोळे माहित आहे, पण यनावाला म्हणतायत ती कोणतीतरी वस्तू दिसते.
राधिका

थारोळे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
मोटेतून वर काढलेले विहिरीचे पाणी ज्या ठिकाणी प्रथम ओतले जाते ती उथळ कुंडासारखी जागा म्हणजे थारोळे. थारोळ्यात पडलेले पाणी पुढे पाटातून शेताला जाते. हे थारोळे थोडेसे खोलगट असते.(वरून पाणी ओतल्यामुळे ते तसे होतेच.)त्यामुळे त्यात नेहमी पाणी साठलेले दिसते. त्यावरून 'रक्ताचे थारोळे' असा शब्दप्रयोग रूढ झाला.

अच्छा

स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.
राधिका

अवांतर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री ॠषीकेश यांच्या लेखातील आजी अहिराणी भाषेतील गाणे गुणगुणत होती. त्यावरून बहिणाबाई चौधरी यांची ' घरोट' {घरोट(पु) ..जाते}
नावाची कविता आठवली. त्यातील काही ओळी अशा:
***
अरे घरोट घरोट
वान्या बाम्हनांचं जातं
कसा घरघर चाले
त्याले म्हनवा घरोट.
*
अरे जोडता तोडलं
त्याले नातं म्हनू नही
ज्याच्यातून पीठ येतं
त्याला जातं म्हणू नही.
*
अरे घरोटा घरोटा
माझे दुखता रे हात
तसं संसाराचं गानं
माझं बसते मी गात.

अरे घरोटा घरोटा
तुझ्यातून पडे पिठी
तसं तसं माझं गानं
पोटातून येतं ओठी.
******************************************************************
कोकणात भात भरडण्यासाठी एक मोठे लाकडी जाते असे. त्याला 'घिरट' म्हणत.
..............................................................................................................

वा वा!

मस्त ओळी.. इथे अशी मेजवानी दिल्याबद्दल आभार!!.. (पुढच्या लेखात वस्तुच्या भाषेतील वापरावरही लिहिन. पण त्या वयात असणारी मुलांची चिकित्सक वृत्ती पाहता तांत्रिक बारकावेही मला महत्वाचे वाटले. )

-ऋषिकेश

सुंदर..

अरे जोडता तोडलं
त्याले नातं म्हनू नही
ज्याच्यातून पीठ येतं
त्याला जातं म्हणू नही.

वा वालावलकरशेठ!

अतिशय सुरेख कविता...

तात्या.

--
आम्हाला येथे वाचा!

सुंदर उपक्रम

बालकथा या नावाखाली हल्ली जे काही लिहिलं जातं त्याहून हा लेख खरंच खूप छान आणि मुलांचा असा आहे. याचे पुढचेही भाग येऊ देत, त्यानिमित्ताने आम्हा मुंबईतच जन्मल्या वाढलेल्यांनाही सगळ्या वस्तूंची ओळख होईल.
अवांतर- आमच्याइथल्या गिरणीवाल्याला एकदा मी एक जातं बनवताना पाहिलं होतं. तो छिन्नी-हातोडा सदृश काहीतरी घेऊन चिरा पाडत बसला होता.
राधिका

मस्त

हा लेख वाचून आजीचा बटवाही आठवला.
लहानपणी आजी-आजोबान्च्या गावाला सातार्याला गेल्यासारखे वाटले.

उगिचच् कहितरि

सुन्दर विशय मान्ड्ला अहे

अस नाही का वाटत कि मुळ विशयापसुन आपण भरकटतो अहोत.

 
^ वर