आजी - आजोबांच्या वस्तु - ४ (टाईपरायटर)

काल मी दादाच्या  खोलीत बसून कॉम्प्युटरवर मस्तपैकी गेम्स खेळत बसलो होतो. आबा कधी मागे येऊन उभे राहिले कळलंच नाही. माझ्या ३ लेवल्स पार झाल्यावर मी मागे वळून पाहिलं तर आबा अगदी चष्मा लावून स्क्रीनकडे कौतुकाने पाहत होते. मला गंमत वाटली, म्हटलं  "आबा, इतकं काय बघताय? फ़क्त गेम आहे तो."
"अरे, आमच्या लहानपणी नव्हते असे खेळ. असो मी आलो कारण मला माझं पाकिटावर नाव घालायचंय. हाताने लिहिलं असतं पण आपल्या अक्षरापेक्षा छापील अक्षर असलं की सरकारी पत्राला जास्त वजन येतं असा अनुभव आहे."
"पाकीट म्हणजे एन्व्हलप ना?"
"हो रे बाबा. करतोस का नाव पत्ता टाईप? मग आपण पाकिटावर प्रिंट करूया"
"मला टायपिंगच येतं फक्त, पाकिटावर प्रिंट कसं करायचं ते फक्त दादालाच माहीत आहे. मी टाईप करून ठेवतो. मग दादा आला की काढा प्रिंट"
"हं ठीक आहे. पण जर घरात टाईपरायटर असता तर किती बरं झालं असतं दोन मिनिटात पत्ता छापून तयार."
तसा मी हुशार आहे "टाईपरायटर म्हणजे ते पेपर घालून टायपिंग करतात तेच ना?"
"हो तेच ते"
"आपल्याकडे होता टाईपरायटर?"
"हो होता. अजूनही असेल चल आईला विचारूया तुझ्या"
मी आणि आबा किचनमधे म्हणजे स्वयंपाकघरात गेलो.  मी लगेच आईला विचारले
"आई, आपल्याकडे टाईपरायटर आहे का?"
"का रे आता कुठे मध्येच आठवला तुला?"
"अगं त्याला नाही मलाच " आबा पुढे आले "म्हटलं असेल बाहेरच तर बघू थोडं तेल-पाणी करून ठेवतो बसल्या बसल्या"
"अहो, हे आले की काढायला सांगते माळ्यावर असेल"
"तो आल्यावर कशाला? आम्हीच काढतो की. तेवढीच दुपार व्यस्त राहील, चल रे"
आबां मग स्वतः माळ्यावर चढले. कसले ग्रेट आहेत ते!! आणि हनुमानासारखा तो टाईपरायटर खाली आणला.

त्या टाईपरायटरवर खूप धूळ जमा झाली होती. आजोबांनी तो फडक्याने नीट पुसून काढला.
"आबा, आता हा वापरायचा कसा?"
"हा टाईपरायटर कार्बनच्या एका पट्टीमुळे प्रिंट करतो. याला ही जी बटणं आहेत ना ती आतून धातूच्या ठश्यांना जोडलेली असतात."
"म्हणजे? मला नाही कळलं"
"हं.. हे बघ.. हा कार्बनचा रोल. यावर तू जे काही ठेवशील, लिहिशिल त्याची आकृती मागच्या कागदावर उमटेल.

टाईपरायटरमध्येही जेव्हा तू बटण दाबतोस तेव्हा त्याचा ठसा या कार्बनच्या पट्टीवर जोरात आपटतो आणि कागदावर अक्षर उमटतं. आपण टाईपरायटर चालू करूया म्हणजे कळेल तुला" आजोबांनी टाईपरायटर उघडला. मला म्हणाले" हं आता एक एक बटण दाबून बघ"
मी एक एक बटण दाबत होतो. जे बटण दाबलं जायचं ना।ई तिथे आबा थोडं तेल टाकत. मग हळू हळू सगळी बटण नीट दाबली जाऊ लागली.
"पण मग हे सगळे पार्टस काय आहेत?"
"माझ्याकडे एका जुन्या टाईपरायटरचं चित्र आहे. यात बघ. आपला टाईपरायटर जरी या चित्रातल्या यंत्रापेक्षा खूप  प्रगत असला तरी तुला पार्टस ची म्हणजे वेगवेगळ्या भागांची कल्पना येईल." आजोबांनी पुढील चित्र दाखवले

"तू रिबिन म्हणजे कार्बनची पट्टी तर बघितली आहेसच. प्लॅटन म्हणजे धावपट्टी. ही पट्टी पेपरला मागून आधार देते. जेव्हा आपण बटण दाबतो तेव्हा हे टाईपबार्स म्हणजे टंकपट्ट्या ठसा रिबिनीवर आपटतात. रिबीन आणि धावपट्टी यांच्यामध्ये असलेल्या पेपरवर अक्षरे उमटतात. तू जसजसं टाईप करत  जातोस तसतसं ही धावपट्टी पुढे पुढे सरकत जाते. पान संपलं की तुला हे हँडल दाबून धावपट्टी परत पहिल्या जागी आणायला लागते."
"म्हणजे हे असं दर वेळी करत बसायचं?"
"हो"
"त्यापेक्षा आमचा काँप्युटर बरा" मी आजोबांना चिडवायला म्हटलं. पण आजोबांना हे माहीत होतं बहुतेक. तेच म्हणाले.
"हो रे! आता टाईपरायटर वापरण्यापेक्षा संगणक उत्तमच. पूर्वी हाताने लिहावं लागत असे. तेव्हा त्यापेक्षा टाईपरायटर बरा होता. पुढे संगणक आल्यावरही टाईपरायटर वापरणं गरजेचं राहिलं नाही. पण म्हणून तो माहीत नसावा का?"
"माहिती हवीच! मला तर फार आवडला. गंमत म्हणून किंवा घरच्याघरी प्रिंट करायला चांगला आहे." मी एकदम मोठ्या माणसांसारखं बोललो. आबा मोठ्याने हसले आणि पाठिवर थाप मारली
"पण आबा, याच्या बार्सवर ही अक्षर उलट का हो? आणि हा 'रिबन व्हायब्रेटर' कशासाठी?"

"तू ठसा बघितला आहेस का?"
"ठसा म्हणजे?"
"म्हणजे स्टँप. पोस्टाचा नाही. स्टँपिंगवाला"
"होऽ बघितला आहे"
"त्यात कस उलट अक्षरं असतात. ती कागदावर सरळ होऊन उमटतात तसंच हे. आणि हा व्हायब्रेटर म्हणजे कार्बनपट्टीला वरखाली करतो. कार्बनची पट्टी सतत हवेच्या संपर्कात आली तर लवकर सुकते. म्हणून फक्त ठसा जवळ आला की हा व्हायब्रेटर रिबिन वर करतो."

मी मग त्या टाईपरायटरमध्ये कागद घातला. तिथे दोन पट्ट्या होत्या त्याने कागद धावपट्टीवर घट्ट बसला. मग मी माझं नाव, आईचं नाव, बाबांचं नाव, आबा-आजींची नावं सगळं टाईप करून बघितली.
आता आबा पुढे झाले आणि त्यांनी त्यांच्या पाकिटावरही  नाव टाईप करून घेतलं. आता आज आम्ही पोस्टात जाणार आहोत ते पाकीट पाठवायला!!

Comments

वा!

माला तर खुपच मजा वाटली हे वाचायला...
जुने दिवस तर आठवलेच.
रिबिनी घालतांना हात काळे व्हायचे ते ही आठवले. शिवाय कोर्टाच्या कामांना ४ ते ६ कार्बन कॉप्याही आठवल्या.
(त्यातली शेवटची कॉपी वाचणे म्हणजे शिक्षाच असे... नुसतेच कार्बनचे काळे झालेले असे!)
पण तरी कोर्टाला प्रसंगी चालत असे! आणि असे टायपिंग करायला चांगलाच जोर द्यावा लागे.
फार काही महत्वाचे असले की मग लाल काळ्या दुरंगी रिबिनी.
टायपिंग चे क्लास... त्यातली प्रकरणे...मजा होती!

ऋषिकेश, मला वाटतंय की तुला मस्त फॉर्म सापडलाय लिखाणाचा...
आता असाच कंटिन्यु कर. जितके घडेल तितके जास्त येवूच दे!

तुझा
टाईपरायटर अजूनही आवडणारा व एक छोटा टाईपरायटर अजूनही जपून ठेवणारा,
गुंडोपंत

सहमत

ऋषिकेश, मला वाटतंय की तुला मस्त फॉर्म सापडलाय लिखाणाचा...
आता असाच कंटिन्यु कर. जितके घडेल तितके जास्त येवूच दे!

-- पंतांशी पूर्णपणे सहमत आहे.

मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)

+१

एकदम सहमत. मस्त जमतेय. एकदम लीलया.

मराठी भाषेला नविन बालसाहीत्यकार ऋषिकेश मिळाले म्हणायला काहीच हरकत नाही.

हात खूप दुखायचे

सुंदर लेख. त्यावरून आठवण आली.

माझ्याकडे थोडेच दिवस अंडरवुड कंपनीचे एक छोटे टंकलेखन यंत्र होते. यंत्र म्हणून सुरेख होते, पण हात खूप दुखायचे, हे आठवते. मग पुढे माझ्या ऑफिसात मराठी यंत्र होते - काही महिने शिकायचा प्रयत्न केला तरी ते मला वश झाले नाही.

इंग्रजी यंत्राची अक्षरांची क्वर्टी (QWERTY) ही मांडणी वापरणार्‍याच्या गैरसोयीसाठी मुद्दाम झाली असे कुठेतरी वाचले तेव्हा गंमत वाटली. फार भराभर टंकन केले तर यंत्राच्या पट्ट्या एकमेकांत अडकतात. अक्षरे अशी गैरसोयीची मांडल्यामुळे मनुष्याला शक्य त्या कमाल वेगाने टंकता येत नाही, त्यामुळे यंत्राच्या पट्ट्या अडकणे कमी झाले. तीच मांडणी रूढ झाली, सवयीची झाली, आणि आता संगणकाच्या कळफलकावरही आली!

कुठेही

यंत्र तर कुठेही जुने मिळेल !
नि त्यात इतके काही बिघड्ण्यासारखे नसते हो... (जोवर एखादा भाग अगदीच खराब होत नाही तोवर!)
मस्त चालतात... फार तर क्वचित अक्षरे अडकतात... ती काय् हातानेही सोडवता येतात.
रिबिनी तर मिळतात बॉ अजून तरी. नाहीच मिळाल्या तर डॉट मॅट्रीक्स प्रिंटर ची रिबिन् काढून टाकताच येते. ती तर वाळत पण नाही लवकर!
थोडेफार तेलपाणी बास!

आपला
गुंडोपंत

बिघड्ण्यासारखे नसते

नि त्यात इतके काही बिघड्ण्यासारखे नसते हो... (जोवर एखादा भाग अगदीच खराब होत नाही तोवर!)
अगदी खरे आहे. माझ्या घरचे यंत्र खरंच आजोबांचे आहे. अजुनही उत्तम चालते. तेही मुंबईच्या हवेत जिथे गंजण्याची भिती फार!. वेळच्या वेळी ग्रीस आणून मस्त चोपडायचे :)
अजूनही झकास चालते काळजी नसावी. खर तर हल्लीची तकलादू यंत्रे घेण्यापेक्षा छान जुने दणकट पोलादि यंत्र कोणी दुसर्‍यांदा विकते आहे का ते पहा हा एक् आगाऊ सल्ला ;)

अवांतरः मला टंकन म्हटले की पु.लं चा "टंककुट्टीका" हा अफलातून शब्द आठवतो :)
-(टंकनप्रेमी)ऋषिकेश

ऑफीस डीपो

'ऑफीस डीपो' मध्ये इलेक्ट्रॉनीक टंकन यंत्रे मी बघीतली आहेत. थोडा शोध घेतल्यास दिसून येतील

मनातलं बोललात

संगणकावर टंकन करताना खोडून टाकण्याची सोय असल्याने, विचार करण्याच्या पद्धतीतच फरक पडलेला आहे.
हे अगदी मनातलं बोललात. आजही संगणकावर थेट टंकन करण्यापेक्षा मला आधी कागदावरच कॉपी लिहणे अधिक योग्य वाटते. मला वाटतं कॅलक्युलेटरच्या अति वापराने सुद्धा असाच परिणाम होत आहे. साधं ७ गुणीले ९ इतकी तोंडी आकडेमोड करुन अचूक उत्तर देण्याचा आत्मविश्वास कमी आढळतो.
बाकी ऋषिकेश तुझी लेखमाला उत्तम आहे. अजून काही लेखांनंतर जाणकार लोकांशी चर्चा करून व आवश्यक वाटल्यास लेखांमध्ये योग्य तो बदल करुन एखाद्या वर्तमानपत्रात छापण्यास हरकत नसावी.

जयेश

असेच

ऋषीकेष रावांचे अभिनंदन. मस्त लय सापडली आहे. टग्यारावांनी सांगितलेल्या माहितीचा समावेशही करता येईल.

सुंदर लेख

लेख सुंदरच झाला आहे. सुस्पष्ट चित्रे आणि उत्तम शैलीमुळे तो मुलांना नक्कीच आवडेल. असे अजून येऊ द्यात. या लेखांचे पुस्तक प्रकाशित झाले तर अगदी दुग्धशर्करा योग होईल! मराठी कळफलकांबाबत माहिती वाचायला आवडेल.

स्नेहांकित,
शैलेश

असेच

लेख सुरेख झाला आहे. तुमच्या लेखांमधील चित्रे खासच असतात..

प्रवास

लेख छान जमला आहे. शैलेश म्हणत आहेत तसे पुस्तकरुपाने येणे चांगलेच. त्यात इथल्या प्रतिसादांच्या सुचवण्या घालाव्यात.
लेख वाढवायचा झाला तर टाइपरायटर ते आजचा डि टि पी चा उद्योग असा प्रवास सुद्धा लिहिता येइल. साधे टाइपरायटर - त्या नंतर आलेले इले. टाइपरायटर हे सुद्धा सांगता येइल.

मराठीत लिहा. वापरा.

सुंदर..

लेख सुंदरच झाला आहे...

आपला,
(टापपिष्ट) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!!

सुंदर

प्रतिसादांशी सहमत आहे. असे लेख जास्तीत जास्त टारगेट ऑडीअन्सपर्यंत पोचायला हवेत.
आमच्या दादांच्या हापिसात अंडरवुड टाइपरायटर होता. त्याच्याशी लहानपणी असेच खेळलो होतो. त्याची आठवण झाली. नंतर इलेक्ट्रॉनिक टाइपरायटर आला तेव्हा त्याचे केवढे अप्रूप वाटले होते. (आता व्हर्चुअल रिऍलिटी बघूनही काही वाटत नाही, संवेदना बोथट झाल्याचा परिणाम असावा का?)

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

उत्तम

लेखमाला उत्तम चालली आहे. जुने बंद पेटीत मावणारं पांढर्‍या रंगाचे टाईपराईटर माझ्या मैत्रिणीकडे होते. या काळ्या टाईपराईटरपेक्षा ते सुबक दिसत असे. त्यावर आम्ही तिच्या वडिलांच्या नकळत अनेकदा बोटे काळी करून घेतली होती.

पुढील लेखासाठी शुभेच्छा! टग्यादादांनी सांगितलेल्या सूचना उत्तम आहेत त्यांची भर घालता येईल.

धन्यवाद!

प्रोत्साहनपर प्रतिक्रिया आणि नेमक्या सुचवण्यांबद्दल सगळ्यांचे अनेक आभार!

धनंजय,
क्वर्टी च्याविषयी माहिती लेखात विस्तारभयाने दिली नव्हती. ती उद्धृत केल्याबद्दल आभार!

सर्किटराव,
एखादे काही खोडावे लागल्यास पुन्हा संपूर्ण पान टंकित करावे लागेल, ह्या भीतीने सुरुवातीलाच पूर्ण विचार करून लिहावे लागते. शिकताना अशा प्रकारचे बंधन अत्यंत आवश्यक असते.
अगदी पटले!

जयेश,
पाढे वगैरे आपल्या लक्षात तरी आहेत. पण आपल्या आधीच्या पिढ्यांनी पावकी निमकी पासून अडिचकी पर्यंत अनेक गोष्टी पाठ केल्या होत्या. :)

शैलेश,
मराठी कळफलकांविषयी माहिती आपल्याला (तुम्हाला आणि मलादेखील) रसगर्भ (इंटरेस्टींग) वाटते. पण मुलांना त्यात कीती रसगर्भता असेल सांगता येत नाही.

टग्यादादा,
उत्तम सुचवण्या. त्यातील १) व ४) लक्षातच आलं नाही २) विस्तारभयाने टाळलं आणि ३) टाकता टाकता रहून गेलं :) . अश्या गोष्टींसाठी (ज्या विस्तारभयाने राहून जातात) सहजरावांनी एक मस्त आयडियाची कल्पना दिली आहे ती पुढिल भागात. थोडी वाट पहा :)

बाकी सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार!

बाकी थोडं विस्ताराविषयी. मला असं वाटतं की ह्ल्लीच्या मुलांकडे लांबलचक वाचायला वेळ नसतो :).. यावर आपणा सगळ्यांच्या प्रतिक्रिया / सुचवण्या आवडतील. हे लेख अजून मोठे असावेत का?

-(आभारी)ऋषिकेश

विस्तारभय सुज्ञ

लक्ष्य वाचक कोण हे नीट ठरवून विस्तार टाळला, तांत्रिक/ऐतिहासिक तपशील टाळलेत, हे योग्य वाटते. माझ्या मते हा लेख ७-१० वयातली मुलेमुली वाचू शकतील. वरील सुचवणीतली माहिती १०-१५ वर्षांच्या मुलांसाठी चांगली. त्यांच्यासाठी लिहायचे तर कथावस्तूच बदलावी लागेल.

हनुमानासारखा

वा ऋषिकेश, अजून एक मस्त लेख!

"हनुमानासारखा तो टाईपरायटर खाली आणला."... भन्नाट! हनुमान-कृष्णाच्या ऍनिमेशन (मराठी शब्द?) पटांच्या काळात मुलांना आवडेल असे वाक्य.

आपला,
(वाचक) भास्कर
आम्ही येथे वसतो.

किमयागार

टाईपरायटर हा फक्त शहरात असल्याने तो फक्त मी शहरात आल्यावर पाहिला. मला तो कळ बडव्या माणुस हा किमयागार वाटे. कळफलका कडे न पहाता त्याला कसे काय टंकन जमते या बद्द्ल कुतुहल वाटे. तसेच बुलबुल तरंग हे वाद्य मी शहरात पहिल्यांदा पाहिले तेव्हा हे कळबडव्या माणसांना फार पटकन येत असेल असे वाटे. उजव्या हाताने तारा छेडायच्या म्हणजे डावा हात थांबे, डाव्या हाताने स्वरकळा दाबायच्या म्हणल्या उजवा हात छेडायचा थांबे. (शेवटी नाद सोडून दिला)
प्रकाश घाटपांडे

छान लेख

आतापर्यंतच्या या लेखमालेतली ही एकमेव वस्तू अशी आहे जी मी हाताळलेली आहे. त्यामुळे थोडी ओळखीची वाटली. :)
राधिका

 
^ वर