आजी - आजोबांच्या वस्तु - ५ (शिवणयंत्र)

काल मी आजी बरोबर फुलं वेचायला गेलो होतो. नंतर देवळातही गेलो. आजीने त्या वेलीवरच्या गुंजादेखील दाखवल्या. मस्त लाल चुटुक गुंजा! मी काही शेंगा तोडल्या आणि खिशात भरल्या. उद्या शाळेत बाईंना दाखवणार आहे. मी खूश होतो, कारण आजी म्हणाली होती की आज आपले ब्रह्मकमळ फुलणार आहे. हे फूल कधीतरीच येते म्हणून आम्ही ते बघायला पटापट घरी आलो. पण ती कळी अजून उमललीच नव्हती. आई म्हणाली
"जा आधी हात पाय धुऊन घे आणि उपमा खायला बस. ती कळी संध्याकाळी उमलेल. उगाच तिच्या शेजारी बसून राहू नकोस"
मग काय! मी उठलो. इतक्यात मला खिशातल्या गुंजांची आठवण झाली. मी खिशात हात घातला आणि शेंगा बाहेर काढल्या पाहतो तो काय बर्‍याच शेंगांमधल्या गुंजा हरवल्या होत्या. मग कळलं की माझ्या चड्डीचा खिसा थोडा उसवला होता.
आजी म्हणाली "जा सुई-दोर्‍याचा डबा घेऊन ये. शिवून टाकूया."
"काय हो आई, या शिवण्यावरून आठवलं, घरचं चालू आहे का शिवणयंत्र?" आईने आजीला विचारलं
"नाही गोऽ बर्‍याच महिन्यात हातही लावला नाही आहे. आजकाल हे देखील तयार कपडे वापरायला लागल्यापासून काही गरजच पडत नाही"
"तू स्वतः कपडे शिवायची" मला एकदम मजा वाटली.
"सगळे कपडे नाही रे, पण पोलकी, यांचे सदरे, झालंच तर पिशव्या आणि हल्लीच्या मुलींना फॉल वगैरे लावून द्यायचे त्यावर."
"पिशव्या कशाला? गावात मिळत नाहीत पिशव्या?"
"इथल्यासारख्या गावाला सगळीकडे प्लॅस्टिकच्या पिशव्या मिळत नाहीत. प्रत्येकजण बाजारात कापडी पिशव्या घेऊन जातं. तशाही, तुमच्या या प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणं चांगलं नाहीच. तिथे त्या प्लॅस्टिकच्या पिशव्या गुरं खातात, विहिरींमध्ये-पाण्यात जातात. इथे त्या गटारांत जातात, पाणी साचतं अगदी जमिनीत पुरल्या तरी जमीन खात नाही त्यांना"
"मग तू आता काही वापरत ते मशीन?"
"दमली रे आता आजी तुझी" असं म्हणून आजी गप्प झाली.
"चल रे जा बाहेर, आजोबा बघ काय सांगताहेत. इथे लुडबुड करू नकोस मध्ये"
आईने मला बाहेर पाठवलं
तसा मी हुशार आहे सुईंग मशीन मी गावाला गेलो असताना बघितलं आहे. पण मला ते चालतं कसं हे कळलंच नव्हतं
"आबा, सुईंगमशिन चालतं कसं?"
आजोबा पेपर वाचत होते. तो बाजूला ठेवत ते म्हणाले "म्हणजे शिवणयंत्र!"
"तु बघितलं आहेस ना आपल्याकडचं यंत्र? आपल्याकडे जे यंत्र आहे ते जरा जुनं आहे. त्यावर शिवायला पायाने खालची फळी हालवत बसावी लागते. थांब तुला चित्रच दाखवतो."

 

"तर हे शिवणयंत्र. याला एक खास पुढे भोक असलेली सुई वापरतात त्यात दोरा घातलेला असतो. हा दोरा इथे वरच्या रिळातून येतो. ही सुईच्या खालची चीर असलेली पट्टी पाहिलीस? याला हवंतर कपड्याची धावपट्टी म्हणता येईल. त्याच्या खाली अजून एक छोटंसं रीळ असतं त्याला बॉबिन म्हणतात. बॉबिनीवर मुख्य रिळावरच्या रंगाचाच दोराचा असतो. ही सुई या आतल्या उभ्या दांड्याला आणि तो एका आडव्या दांड्याला जोडलेला असतो. हे चित्र बघ म्हणजे समजेल तुला"
तसा मी हुशार आहे. पण तरी नक्की शिवलं कसं जातं हे काही मला कळलं नाही. आबा बोलतच होते..अगदी मन लावून..
"आता तू हे पॅडल वर खाली केलंस की हे चक्र पट्ट्यामुळे फिरतं हा आतला दांडा फिरतो. हा दांडा सुईला सतत वरखाली वरखाली असा हालवतो. ची कापडामागून बॉबिनीच्या दोर्‍याबरोबर गुंफली जाते आणि टाका बसतो. या धावपट्टी वरून आपण कापड पुढे पुढे न्यायचं नाहीतर सगळे टाके एकाच ठिकाणी पडून गुंताही होईल नी कापडही फाटेल."

"पण त्यात बॉबीनीचा दोरा कशाला हवा. आपण तर सुईने शिवतो त्याला एकच दोरा लागतो."
"यासाठी, मला मध्ये जालावर म्हणजे तुझ्या इंटरनेटवर एक चित्र सापडलं होतं ते मी दादाला सेव्ह करायला सांगितलं होतं. संगणक चालू कर दाखवतो तुला."
मी काँप्युटर चालू करायला नेहमीच तयार असतो. तो मी चालू केला.आबांनी एक फाइल उघडली. त्यात पुढील चित्र होतं"

"वॉव.!" आबांना काही सांगायची गरजच पडली नाही मला हे चित्र पाहूनच कळलं की टाका कसा पडतो.
आबांनी मात्र मला अजून थोडी माहिती शोधायला सांगितली. हे शिवणयंत्र कधी वापरात आले? सिंगर कोण होता? नंतर आलेले इलेक्ट्रॉनिक शिवणयंत्र कसे चालते?
तसा मी हुशार आहे. पण मी ही माहिती इंटरनेटवरून शोधणार आहे. दादाने शिकवलंय कसं शोधायचं ते. तुम्हीपण नक्की शोधा.
अरे हो विसरलोच, आमचं ब्रह्मकमळ देखील दुपारनंतर छान फुललं.

Comments

सुंदर!

चलरेखाचित्राने (लाईन ऍनिमेशनने) क्रिया नेमकी समजली!

आजवर याबद्दल कुतूहल होते, पण बॉबिनकडे टक लावून बघूनसुद्धा नीट कळले नव्हते. (यंत्र चालू असताना रिळावर एक संरक्षक पट्टी सरकते, ते चांगले, नाहीतर मला लहानपणी इजा झाली असती ते नक्की!)

प्रभावशाली

मित्रवर्य ऋषिकेश,

आपली लेखमाला अगदी भन्नाट जमली आहे. प्रत्येक भागासोबत दर्जा वाढतच आहे. सगळेच भाग उत्तम जमले आहेत. आपल्याकडे असणारे हुनर जगाच्या कामी कसे लावावे याचे हे उत्तम उदाहरण. या लेख मालिकेचा उपयोग बालशिक्षणाचे साहित्य म्हणून शिक्षण मंडळाने करुन घ्यायला हवा.

मी तर तुमच्या या लेख मालिकेने एवढा प्रभावित झालो आहे की अशीच एक लेखमाला ग्रामिण जीवनावर सुरु करायचा विचार आहे. पण त्यात अडचण अशी आहे की त्यासाठी लागणारी चित्रे मला मिळत नाहीत. मळणयंत्र, खळे, विहीरीवरील मोट, विहीरीच्या दगडी बांधकामाचे प्रकार, बारव, गोठा, औत, जू, बैल-नांगर, औत, तिफण, साडे-नळे, अशा दैनंदिन जीवनातल्या असंख्य वस्तूंवर मुलांना माहिती देता येईल. तसेच लोहार, सुतार, कुंभार, तेली, चांभार, अशा परंपरागत अभितांत्रिकी कलांची ओळख करुन देता येईल. गावी राहणार्‍या माझ्या धाकट्या बंधूला मी छायाचित्रे काढण्याचे काम दिले आहे. पण तो त्यातले काय-काय मिळवू शकतो अन काय काय नाही हे माहित नाही. त्यामुळे उपक्रमवरील कोणी सदस्य मला ही चित्रे मिळवून द्यायला मदत करील का?

आपला,
(ग्रामिण) भास्कर
आम्ही येथे वसतो.

बारव

भास्करराव अगदी मनातल बोललात. नोस्टल्जिक होण्याची भीती पण वाटते. ही बघा आमच्या गावातील बारव. फोटो ४६-४७ मधील असावा. ही बारव गावच्या वेशीबाहेर पुढील ओढ्याच्या जवळ आहे. त्या भागाला टक्का म्हणत ही पांडवकालीन आहे असे म्हणले जाते. खरं काय माहित नाही. तिथ भुत आहेत अशी वदंता असल्याने टक्क्याची भीतीच वाटायची. मधे पाण्याचे कूंड आहे. कडेला मोठे कोनाडे दिसतात. पावसाळ्यात कोनाड्यापर्यंत पाणी येत असे. बारवेत शिरायला दगडी पाय-या. या बारवेचा कठडा खूप मोठ्या चौकोनी दगडांचा माणुस झोपेल एवढा मोठा.
बारव
प्रकाश घाटपांडे

प्रोत्साहन

तुमच्या प्रतिसादातून प्रोत्साहन मिळाले आहे.... उत्साह वाढला आहे... लागतोच कामाला...

आपला,
(खेडूत) भास्कर
आम्ही येथे वसतो.

उत्तम लेख

अतिशय सोप्या शब्दात उत्तम माहिती सांगितली गेली आहे,त्याबद्दल मनःपूर्वन अभिनंदन!

खूपच मस्त

ऍनिमेशन सुरेख आणि आवडले. सुईत दोरा घालण्याचे काम लहानपणी आई करायला द्यायची ते आठवले! तुमचा या लेखांच्या बाबतीत वेग वाखाणण्यासारखा आहे. सुरू राहू द्या.

सुंदर

तुमची लेखमाला अतिशय छान चालली आहे,चित्रा म्हणते त्याप्रमाणे वेग ही उत्तम राखला आहेत,
ऍनिमेशन झकासच आहे,:) तुम्ही दाखवलेले सिंगर च्या पायमशिनचे चित्र आमच्या जुन्या घरी घेऊन गेले. आजही आमच्याकडे ते मशिन आहे आणि ह्या भारतभेटीत मी त्याच्यावर किरकोळ शिवणही केले.(उसवलेल्या टीपा मारणे इ.)
आमच्या आवारात गुंजेचे वेल होते ते ही आठवले आणि दादरच्या सिध्दीविनायकाच्या मंदिराच्या आवारात पडलेल्या भरपूर गुंजा पाहूनही त्या वेचायचा मोह टाळावा लागला,:(
स्वाती

मस्त माहिती

ऋषीकेशच्या पोतडीतून नवा लेख कोणता निघणार याची नेहमी उत्सुकता असते. ऍनिमेशनने मजा आली, क्रिया सहज समजली.

माझी आई उत्तम कपडे शिवते. आमच्या घरात पूर्वी पॅडलचे शिवण यंत्र होते. नंतर तिने त्याला मोटर लावून पायाने बटन प्रेस करून शिवणयंत्र चालवायची सुविधा लावली. नंतर काही वर्षांनी (म्हणजे सुमारे २०-२५वर्षांपूर्वी) हे असं आधुनिक शिवणयंत्र तिने मागवून घेतलं. त्यावर अनेक टीपा, भरतकाम होत असे आणि तसे मशीन तेव्हा इतर कोणाकडे नसल्याने मी मैत्रिणींत भाव खाऊन घेत असे. आईला मात्र हे नवे यंत्र मागवले तरी फारसे जमले नव्हते तिला ते जुने शिवणयंत्रच अधिक आवडायचे. बहुधा हात बसला होता. आजही आमच्याकडे ही दोन्ही शिवणयंत्रे आहेत. या लेखाने जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लेख मस्त झाला आहे.

सुरेख!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
एकूण आत्तापर्यंतचे ह्या मालिकेतले सगळेच लेख मस्त आहेत.आता ज्यांच्यासाठी हे लिहिले गेलेय त्यांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल पण माझ्यासारख्याच्या ज्ञानातही बरीच भर पडलेय हे कबूल करायला हवे.
'टाका कसा पडतो' हे आजच्या लेखातील चलतचित्र पाहून डोक्यात अगदी पक्के बसले.
हा लेखन प्रकल्प उत्तरोत्तर असाच बहरत जावो हीच सदिच्छा.
शाब्बास ऋषिकेश!

मस्त

ऋषिकेश,
मस्त लेख. मलाही आजपर्यंत टाका नेमका कसा शिवला जातो हे माहित नव्हते. चित्र पाहून 'फंडे क्लिअर' झाले. :)
आमच्याकडे चित्रात दाखवल्यासारखेच यंत्र होते, फक्त कंपनी वेगळी होती कोणती ते आठवत नाही. लहानपणी सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे बॉबीनीचा दोरा संपल्यावर दोरा परत भरणे.
यावर टारगेट ऑडीअन्स काय म्हणतो? कुणा उपक्रमींच्या आसपास बच्चेकंपनी असेल तर त्यांना लेख दाखवून त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवल्यास बरे होईल. त्यांना लेख कसा वाटतो? समजायला अडचण येते आहेका? कालच ऋतुजाचे नाव कोण आलय मध्ये दिसले होते. तिने लेख वाचला का कल्पना नाही.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

प्रामाणिकपणे

ऋषिकेश,
लेखमाला सुरेखच आहे. मला स्वतःला खुप आवडली. मात्र माझ्या पुतणीला, ऋतुजाला 'इतके मराठी' वाचायला काही जमले नाही.
"काका मला बोर होतंय, मला नाहीये वाचायचं" असा प्रतिसाद तिने दिला. कदाचित हे "बॉइज टॉक" वगैरे आहे म्हणून का ते मलाही कळले नाही?
वैयक्तिकरित्या मला तरी वाईट वाटले, कारण तीला तीचा तोच तोच असणारा निटेंडो डि एस लाईट गेम मात्र बोर वाटत नव्हता. कदाचित या पीढीची वाचनाची आवडच कमी झाली आहे.. कदाचित निंटेंडोचे 'ब्रेन ट्रेनींग' जास्त इंटरॅक्टिव आहे.
किंवा कदाचित ही मुले 'या सगळ्याशी स्वतःला जोडू शकत' नाहीयेत. (असे म्हणण्याचे कारण नाही, कारण तीची आजी आणि काकाही तीने अनेकदा शिवण करतांना पाहीले आहेत!) किंवा या वयात कदाचित पियर गृप मध्ये काय 'कूल' आहे नि काय 'ग्रॉस' आहे यावरही हे अवलंबून असावे.
किंवा कदाचित 'तेंव्हा' ती ला नसेल वाचायचे. नंतर वाचेलही (मी पण काही असे सोडणार नाहीच... काळजी नको! )
मात्र मला हे सगळे वाचतांना मस्त नोस्तालजिक होण्याचा अनुभव येतोय. या बद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावेत तितके थोडेच आहेत.

लहानपणी अनेकदा बॉबीन भरायला मला आवडायची. शिवाय सुईत दोरा ओवायलाही मीच असायचो.
आईला मशीनला तेल घालून देणे... ऐन वेळेला दोरा संपल्यावर 'तातडीने' दोरा आणून देणे. आईची 'अतिशय महत्वाची मॅचिंग बटने' आणण्यासाठी दोन-तीन चकरा मारणे वगैरे कामेही माझीच असायची. हे सगळे केल्या बद्दल बक्षिस म्हणून मला शिवण्यासाठी म्हणून एखादा हातरुमाल किंवा (जुन्या पँट्सच्या कापडातून काढलेल्या कपड्याची) पिशवी मिळायची. तेंव्हा सफाई व टाका आईसारखाच यावा म्हणून जीव काढायला खुप मजा यायची. शिवाय कापड कापायला आईची कात्री वापरण्याची संधीही मिळायची.
माझे तीन मावस भाऊ मात्र शिवणकलेत वाकबगार होते. त्यातल्या एका भावाने तर 'स्वालंबनाच्या कल्पनेने पेटून' स्वतःचा शर्टही स्वतःच शिवला होता.
शिवाय टीप मारतांना कपडा संपत आल्यावर त्याच लयीत टाका उलट फिरवणे वगैरे 'चमत्कृतीही' त्याला लिलया जमत.
असो, हे सगळं आठऊन खुप छान वाटलं.

आशा आहे ही लेखमाला अशीच सुरु राहील!
-निनाद

वाईट वाटून घेऊ नका

वैयक्तिकरित्या मला तरी वाईट वाटले, कारण तीला तीचा तोच तोच असणारा निटेंडो डि एस लाईट गेम मात्र बोर वाटत नव्हता. कदाचित या पीढीची वाचनाची आवडच कमी झाली आहे.. कदाचित निंटेंडोचे 'ब्रेन ट्रेनींग' जास्त इंटरॅक्टिव आहे.

वाईट वाटून घेऊ नका कारण यातून जाणारे तुम्ही एकटे नाही आणि इतरांपेक्षा वेगळेही नाही. माझ्या घरातले उदाहरण द्यायचे तर माझ्या मुलीला मराठी चित्रपट (अगदी टुकार असले तरी) पाहायला खूप आवडतात. ग्रामीण मराठी समजून घेण्याचा ती पूर्ण प्रयत्न करते. मध्यंतरी एका चित्रपटात (बहुधा महेश कोठारेचा खबरदार) तिने जातं पाहिलं आणि हे काय आहे म्हणून विचारत होती. जात्याबद्दल जुजबी माहिती दिल्यावर तिला सांगितलं ते काय आहे त्याची विस्तृत माहिती मी तुला वाचून दाखवते, त्यावर 'हम्म! आता नको, नंतर कधीतरी पाहू.' असे उत्तर मिळाले. यावरून मी तर्क काढला की तिला भाषेत जितका रस आहे तितका सध्या या यंत्रांत नाही.

याउलट, चित्राताईंचा अमेरिकन घरांवरचा लेख वाचत असताना तिला त्याबद्दल उत्सुकता वाटली म्हणून तिला मी काही दुवे शोधून वाचायला दिले. याचे सरळ कारण असे की टिपी किंवा इतर नेटिवांच्या घरांसंबंधी त्यांना शाळेत शिकवले जाते.

काय आहे की ९-१० वर्षांची परदेशातील मुले या भारतीय गोष्टींत समरस होऊ शकतीलच असे नाही कारण त्यांना आपल्या आयुष्याशी आणि या जुन्या आयुष्याची जोडणी करता येत नाही. या उलट, ९-१० वर्षांच्या भारतातील मुलांना जी नुकतीच एखाद्या गावात, आजोळी, संग्रहालयात इ. भेट देऊन आली आहेत त्यांना या गोष्टींत रूची वाटू शकते. कालांतराने, विषयांत गोडी निर्माण झाली किंवा अशा गोष्टी नजरेस पडल्या तर परदेशातील मुलांनाही रूची वाटू शकेल.

दुसरं असं की ऋतुजाचा निंटेंडो डीएस तिच्या वयाची, तिच्या आसपासची सर्व मुले खेळतात. तेव्हा तिला तो खेळण्यातच जास्त रूची असणे स्वाभाविक आहे. त्यामानाने शिवणयंत्राची किंवा इतर यांत्रिक माहिती तिला या वयात आवडेलच असे नाही परंतु भविष्यात तिला त्यात रस वाटू शकेल. जेव्हा तिला स्वतःहून माहिती हवी असे वाटेल तेव्हा ती द्या.

आपल्या लहानपणी आपल्याला पुस्तकं सोडून फारशी इतर माध्यमे उपलब्ध नव्हती. आताच्या मुलांना ती प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे वाचनाची गोडी कमी झाली आहे असं मलाही वाटतं पण हे सत्य म्हणून स्वीकारणे भाग आहे.

हं

सर्वप्रथम प्रामाणिक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. :)
याची मला हे लेख लिहिताना पूर्ण कल्पना होती हल्लीच्या मुलांना वाचायला इतके आवडत नाही. पण एखाद्या छोट्या मित्राला/मैत्रीणीला कधी काहि वाचावसं वाटलच तर केवळ मराठीत माहितीपर वाचायला काहिच नाही एवढ्या कारणाने वाचन टळायला नको! त्यामुळे लेखमाला बंद होणार नाही काळजी नसवी :)
मुलांच्या शिक्षणासाठी वाचनापेक्षा अनेक सोपे करमणुकप्रधान मार्ग उपलब्ध असताना केवळ वाचत बस सांगण्यात अर्थ नाहिच! नुसतं डिस्कव्हरी किडस २ तास बघून मुले जितकी शिकतील तितके संपूर्ण लेखमालेतूनही शिकणार नाहित याची खात्री आहेच, पण त्याच बरोबर मुलांना त्यांना आवडेल त्यावर आणि आवडेल असं वाचायला मिळणं महत्वाचं.

उद्या एखाद्या बालदोस्ताने जातं कसं चालतं कींवा बंब म्हणजे काय असं विचारल्यावर कुठेतरी चित्रे, माहिती शोधून त्याचं भाषांतर करून सांगण्यापेक्षा ही संकलित लेखमाला मुलांना थोडी मदत करेल ही आशा आहे.

दुसरं महत्वाचं मलाही लिहिताना हे बर्‍याचदा "इतकं मराठी" वाटतं. अनेकदा त्यांना न कळणारा मराठी शब्द टाळून इंग्रजीच वापरतो. पण काही शब्द मात्र त्यांना जाणूनबुजून समजावेत असं वाटतं तेव्हा मराठी जरून वापरतो. मला तुमच्याकडून (सगळ्यांकडून) याविषयी प्रतिसादाची अपेक्षा आहे की "इतकं मराठी" ठिक आहे का कमी करावं?

शेवटी मला मुलांसाठी लिहिण्याचा अजिबात पुर्वानूभव नाही त्यामुळे तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रियाच हे लेख जास्त बालसापेक्ष (प्रो-चिल्ड्रेन) होणार आहेत. त्यामुळे हे लेख सगळ्यांनी कृपया मूल होऊन वाचावेत आणि सुचवण्या कराव्यात ही विनंती :)

वेळात वेळ काढून कंटाळा येईपर्यंतवाचल्याबद्दल ऋतूजाचे मनापासून आभार! ;)

-(आभारी)ऋषिकेश

टीजी

ऋषिकेश
माझी एक भाची स्मृती जी, ईंडियन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश माध्यमात सहावीत शिकते, तिला जेंव्हा मी तुझे लेख वाचायला दिले तेंव्हा तिला ते नीट कळले व आवडले सुद्धा! परंतु दूसरी भाची प्रियांका जी, मुंबईतील एका चर्च संचालित शाळेत आठवीला आहे, तिला मात्र कळण्यास थोडी अडचण आली.
यावरुन मला असं वाटतं की, वर उल्लेख केलेली परदेशातील मराठी मुलांची अडचण योग्य (व्हॅलिड) असू शकते. आसपासच्या वातावरणाचा प्रभाव नक्कीच प्रभावी ठरतो.
तुझा टार्गेट ग्रुप (टीजी) एकदा निश्चित केलास की, किती सोपं लिहावं किंवा इंग्लिश शब्दांचे प्रमाण किती असावे याची उत्तरं सापडतील.
जयेश

लै भारी .

ऋषिकेश,
आपले लेख मस्त जमताहेत. आज ते एनिमेशन कितीतरी वेळ पाहात राहिलो.
मजा वाटली. आपल्या अशाच दर्जेदार लेखांच्या प्रतिक्षेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर

'तसा मी हुशार आहे' या मालिकेतले सर्व लेख आवडले. योग्य ती चित्रे गोळा करण्यासाठी घेतलेली मेहनतही जाणवते. यातले शिवण घालण्याचे चलतचित्र सर्वात जास्त आवडले.

मी गमभन शब्दसंपदा कधीकधी वापरते.

मस्त

लेख. एकंदर भट्टी छान जमली आहे. वरील प्रतिसादांत म्हटल्याप्रमाणे ऍनिमेशनमुळे टाका कसा घालतात हे प्रथमच नीटपणे समजले :).

नंदन

मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)

खूप आवडला.

लेख खूप आवडला. वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे ऍनिमेशन मुळे फारच रंजक झाला आहे.
(लेख वाचून 'बॉबिन चांगली घट्ट भरली गेली नाही की सळ पडत असे.' हे आठवले.)

 
^ वर