आजी - आजोबांच्या वस्तु - ६ (चरखा)
सुप्परमॅन सुप्परमॅऽन .. सुप्परमॅऽऽन.. सुप्परमॅन! वरतुन चड्डी आतून पँऽऽऽटऽ.... सुप्परमॅन सुप्परमॅऽन ... सुप्परमॅऽऽन!!!!!..... काय सही गाणं आहे हे. कालच आजोबांनी मला "अग्गोबाई ढग्गोबाई'ची सीडी आणून दिली. मला खूप आवडली.. आताही मी गाणीच ऐकत होतो. मला एकदम एक जुनी शंका आठवली..
"आबा! सुपऽमॅन असतो का हो खरंच? ओम म्हणतो की सँटाक्लॉज सारखा सुपरमॅन पण खरा नाही आहे"
"त्याला काय माहीत.. सुपरमॅन असतोच आणि एक नाही तर बरेच असतात. फक्त त्यांना सुपरमॅन म्हणून ओळखत नाही कोणी. अरे भारतात बरेच सुपरमॅन होऊन गेले. तुला रामाच्या अनेक गोष्टी माहीत आहेतच, शिवाय कृष्ण आहे, बुद्ध आहेत; हल्लीचं म्हणावं तर शिवाजी महाराज वगैरे सगळे खरंतर सुपरमॅनच होते. त्यांचे कार्य खूप सुपर होते"
"तुम्ही पाहिलाय का कोणता सुपऽमॅन?"
"होऽ.. मी लहान असताना एक सुपरमॅन होता. महात्मा गांधी"
तसा मी हुशार आहे "म्हणजे मोहनदास करमचंद गांधी!"
"बरोब्बर! तेच ते. आपल्या नोटेवरही तेच असतात"
"ते खूप वेगात चालत आणि चरख्यावर सूत कातत ना?"
"बरोब्बर. अरे सूतकताई तर त्यांनीच जगभरात प्रसिद्ध केली"
"तुम्हाला येतं सुत कातता?"
"हो तरुणपणी शिकलो होतो. पण पुढे गरज पडली नाही. आता माहीत नाही येईल का ते"
"सही! म्हणजे तुम्हाला चरखा चालवता येतो. ग्रेट! पण सुत निघतं म्हणजे नक्की कसं निघतं? "
"हं सांगतो. सूतकताईसाठी सगळ्यात आधी चांगला कापूस शोधावा लागतो. ज्यातून चांगला लांब धागा निघतो तो व्यापारी कापूस वेगळा आणि आपण घरी वातींसाठी वगैरे वापरतो तो कापूस वेगळा. चांगला कापूस मिळाल्यावर तो पूर्वी पिंजून घ्यावा लागे. हल्ली बाजारात असा पिंजलेला कापूसच मिळतो. कापूस मिळाल्यावर मुख्य काम असते ते त्याची पुन्नी बनवणे. चल आपण नेटवर बघूया पुन्नीचं चित्र"
आम्हाला नेटवर पुढील चित्र मिळाले.
आजोबा परत सांगू लागले "तू सिगार बघितली आहेस का?"
"म्हणजे सिगारेट? शेजारचे काका ओढताना पाहिली आहे."
"सिगारेट नाही रे! जुन्या चित्रपटात असतात बघ."
"हा! ती जाडजूड सिगारेट"
"हं! तर त्या सिगारच्या आकारासारखा नीट पिंजलेला कापूस गुंडाळून घेतात. याला पुन्नी म्हणतात. ही कापसाची पुन्नीमध्ये जितक्या कमी गुठळ्या असतील तितके सुत चांगले निघेल. चरख्याला एका टोकाला मोठं चक्र असतं आणि दुसर्या टोकाला एक छोटं चक्र असतं या चक्राला एक जाड सुई म्हण किंवा दाभण म्हण अडकवलेली असते. याला इंग्रजीत स्पिंडल म्हणतात. जेव्हा मोठं चाक फिरतं तेव्हा हे छोटं चक्र फिरतं आणि म्हणून हे स्पिंडल फिरतं. स्पिंडलला पुन्नीचं एक टोक जोडतात. जेव्हा चरखा फिरू लागतो तेव्हा पुन्नीतून छान दोरा निघतो. तो स्पिंडलभोवती गोळा होतो."
"मला नाही कळलं नीट"
"बरं हे बघ हे जुन्या चरख्याचं चित्र आणि हे हल्लीच्या"
"आपण काही विडियो मिळताहेत का नेटवर ते पाहू.. हा बघ एक विडियो नवीन चरख्यातून सुत कसं काततात ते दाखवतोय...
सह्ही आता कळलं की किती कठीण होतं सुत कातणं. बरं झालं आमच्यावेळी रेडीमेड शर्टस असतात. आजोबांनी आता अजून एक काम दिलं आहे. कोणकोणत्या नोटेवर गांधीजींचं चित्र असतं ते सांगायचंय. तसंच चरखा आणि आपला झेंडा यात काय संबंध होता ते नेटवर शोधायचंय. पण ते उद्या.. आता मी परत गाणी ऐकतोय "मी पप्पाचा घेऊन फोऽऽऽन.. फोन केले एकशे दोन!!!" तुम्ही पण ऐका "अग्गोबाई ढग्गोबाई"
टिपः मुलांना दाखवायला बरेच विडियो यू ट्यूबवर उपलब्ध आहेत
Comments
मस्त
आणखीन एक चांगला लेख. ही माहिती नेमकी कुठून गोळा करतोस?
विडिओ पाहून चरख्याचे काम कसे चालते ते कळले. झोपलेली राजकन्या (स्लीपींग ब्युटी) या परीकथेत राजकन्या चरख्यावर सूत कातत असताना तिला सुई टोचते असे वाचले होते तेव्हा प्रश्न पडायचा की या चरख्याच्या चाकात सुया आहेतच कुठे? आज विडिओ पाहिल्यावर स्पष्ट झाले.
अवांतरः सुपरम्यानचे गाणे सही आहे. ;-) पण चाल कोणती लावायची?
माहिती
एखादा विषय डोक्यात नक्की करतो मग नेट जिंदाबाद. त्याविषयी जितकी माहिती मिळेल तितकी शोधतो. मग वेगवेळ्या साईट्सवरून क्रॉसचेक करतो. मग प्रश्न उरतो तो सोप्या शब्दात मांडणे. पण या लेखाच्या बाबतीत म्हणाल तर नेटपेक्षा पूर्वॉ मणीभवनला भेट दिली होती (पाचेक वर्षांपूर्वी) तेव्हा त्यांनी चरख्यावर सूत काढायला शिकवलं होतं.. जमल नव्हतं अगदी सलग पण जाणवलं होतं की किति कठीण आहे :).
आणि सुपरम्यानचे गाणे संदिप खरे-सलील कुलकर्णीच्या नव्या बालगीतांच्या संग्रहातील (अग्गोबाई-ढग्गोबाई) आहे.. मला जाम आवडलं.. :) सगळ्यांनी ऐकावं असं अहे ;)..
-(बालगीतप्रेमी)ऋषिकेश
छान माहिती.
स्पिंडल वाचून शाळेत असताना कोहिनूर मिल मध्ये गेलेली सहल आठवली.
लांबच लांब गिटारसारखे उपकरण घेऊन फिरणारे कापूस पिंजणारेदेखील आजकाल दिसत नाहीत.
छान लेख
मी खूपच लहानपणी माझ्या अमरावतीकडून आलेल्या एका मावस आजीकडे असेच काहीतरी पाहिले आहे असे आठवते. त्याला काय म्हणायचे ते आठवत नाही. टकळी? माझ्या आठवणीप्रमाणे मोठ्या खिळ्याप्रमाणे दिसायचे आणि ते हातानेच गोल फिरवत चरखा न लागता त्याने लहान प्रमाणावर सूत कातता यायचे असे आठवते. पुन्नी गुजराती शब्द आहे का? असा शब्द वापरल्याचे आठवत नाही.
पुन्नी
होय, पुन्नी हा गुजरातीच शब्द असावा. मी मणीभवन केंद्रात गेलो असताना तेथिल माहिती देणारीने तो वापरला होता. पण मराठीत याला वेगळा शब्द असल्यास मिळाला नाहि. कोणास माहित असल्यास कृपया सांगावे.
बाकी टकळी ही सुतकताईच्या वेळी वापरतात ती की हातमागावर?
-ऋषिकेश
पुन्नी म्हणजे बहुतेक
मराठीत 'पेळू'
अंतिम इशारा.
गांधीचा खेड्यासाठी अर्थसंपन्न करण्याचा शोध चालू असतांना त्यांना देशी चरख्याचा शोध लागला. नेहमी प्रमाणे त्यांनी प्रतिज्ञा केली की ते फक्त या देशी साधनातून आलेलीच कपडे वापरतील. सुरवातीला धोतरासाठी लांब पन्हाच्या कापड बनविणे अवघड आहे असे लक्षात आले. तेंव्हा त्यांनी इशारा दिला की देशी कारागिरांनी यावर मार्ग शोधावा अन्यथा ते आखूड धोतर वापरतील. शेवटी बरीच धावपळ होऊन पाहिजे तसे कापड विणता येऊ लागले.