आजी - आजोबांच्या वस्तु - ७ (पतंग आणि मांजा)

काल आई "तिळगुळाचे लाडू बनवायला हवेत" असं आजीशी बोलताना म्हणाली. तसा मी हुशार आहेच, लगेच ओळखलं की संक्रांत जवळ येते आहे. मी कालच शाळेत ओमशी बोललो. आमच्यापुढे एक मोठा प्रश्न होता. गेल्यावर्षी आम्ही ओमकडे पतंग उडवायला गेलो होतो. हल्ली त्याचा दादा आमच्याशी खेळत नाही. तो म्हणतो की आता तो मोठा आहे आणि त्याचे मित्र पण मोठे आहेत. पतंग तो त्यांच्याबरोबर उडवणार. मग यंदाच्या पतंगाचं काय?
मी एकदम सॅड होऊन बसलो होतो. आजोबा कुठुनसे आले.
"काय रे! आता संध्याकाळ होईल.. तू घरी कसा?"
"असंच"
"असंच कसं? काहीतरी झालं असणार. भांडलास का कोणाशी? का मारामारी केलीस? का कोणी काही बोललं का?"
"नाही"
"मग?"
"मग काय? मला पतंग उडवायचाय"
"हात्तिच्या एवढंच ना. उडवूयात की आपण"
"खरंच?!?"
"हो त्यात काय."
"चला मग जाऊया आता पतंग आणायला"
"आता? अरे अजून ४-५ दिवस आहेत. आपण असं करूयात का घरी बनवून बघायचा का पतंग?"
"घरी येतो बनवता?"
"होऽ येतो की एकदम सोपं आहे. जा हे पैसे घे आणि सोसायटीच्या दुकानातून पतंगाचा कागद घेऊन ये. आणि बाहेर रस्त्यावर जायचं नाही! नसेल त्या दुकानात तर सरळ घरी ये!!"
मी धावत गेलो आणि पळत आलो. मस्त लाल लाल कागद घेऊन आलो. घरी येऊन बधतो तर आबा खराटा घेऊन बसले होते. म्हटलं
"हे काय आता पतंग करायचाय ना तुम्ही सफाई काय करताय?"
"नाही रे! आपल्या पतंगासाठीच काठी शोधत होतो. पण खराट्याची नाही चालणार. फारच तकलादू आहे"
मग आबाच खाली गेले आणि मजबूत पण फ्लेक्झिबल काठ्या घेऊन आले. म्हणाले "गोळेवाल्याकडून घेऊन आलो त्याने अजून तुकडे केले नव्हते" मग आबांनी एक काठी फूटभर लांबीची घेतली आणि दुसरी काठीही तितक्याच लांबीची करून घेतली. दोन्ही काठ्या सारख्याच जाड होत्या. आता त्यांनी एका काठीचा मध्य शोधला आणि ती काठी दुसऱ्या काठीवर आडवी ठेवली. मग त्यांना उभ्या काठीच्या उंचीचा डायमंड शेप पतंगाच्या कागदातून कापून घेतला. पुढची चित्र बघा म्हणजे नीट कळेल.

"आता हा पतंग झाला तयार. त्याला कन्नी बांधायची आहे. "
"कन्नी?"
"हो अरे मांजा सरळ पतंगाला गुंडाळत नाहीत त्याला कन्नी बांधावी लागते. ही कन्नी पतंगाला दोन बाजूंनी तोलते ज्यामुळे तो वाऱ्यावर तरंगतो."
मग आबांनी एका साधा दोरा पतंगाला बांधला (शेवटच्या आकृत्या). त्यासाठी आडव्या काठीच्या वर आणि आडव्या काठीखाली त्याच्या दुप्पट अंतरावर  भोकं पाडली.
"आता मांजा आणायला जायचं?"
"मांजा कशाला आणायचाय तोपण बनवू यात चल!"
"तो कसा काय बनवणार?"
"जा आईला खळ करायला सांग. मी तो पर्यंत लांब दोऱ्याच गुंडा घेऊन आलो."
इतक्यात आई म्हणाली "अहो आबा, स्टार्च नाही आहे घरी खळ कशी बनवणार?"
"हो का! ठीक आहे स्टार्च पण घेऊन आलो."
आबा स्टार्च आणि दोरा घेऊन आले. स्टार्च पाण्यात शिजवून त्याची खळ तयार केली. खळ तयार होत असताना एका प्लॅस्टिकच्या भांड्याला बाजूने दोन भोकं समोरासमोर पाडली. मग दोरा त्या भोकांतून काढला. शिवाय एक जुनी काचेची बाटली फोडली आणि पाटा वरवंट्याखाली काचेचा रवाळ चुरा केला.
"चल आता गच्चीत. मांजा सुकेलही पटापट आणि घरी तसंही इतकी जागा नाही आहे."
गच्चीवर गेल्यावर त्यांनी एका ओल्या फडक्यावर थोडी काच पावडर ओतली.

मग त्या दोन भोकं आणि त्यातून दोरा असलेल्या भांड्यात खळ ओतली. आणि दोरा हळूहळू खेचू लागले त्याच वेळी दुसऱ्या बाजूला काचेच्या फडक्यातून दोरा काढत त्यामुळे तो काचेचा चुरा त्या खळीला आणि दोऱ्याला चिकटे. मी तो दोरा घेऊन पुढे जात होतो आणि सुकला की रिळाला गुंडाळत होतो. काय मस्त झालेला मांजा एकदम कडक आणि धारधार!!
मला आता आबा पतंग उडवायला पण शिकवणार आहेत. शिवाय पतंगोत्सव कुठे कुठे होतो, चीनमधले ड्रॅगनचे पतंग, वेगवेगळ्या आकारातले पतंग शिवाय पतंगांची गाणी सगळं काही नेटवर मिळेल असं आबा म्हणाले तेही शोधायचंय. तुम्हीही शोधाच. फक्त जर मांजा घरी बनवणार असाल तर कोणीतरी मोठं माणूस घरी असेल तरच बनवा. हॅपी संक्रांती! तिळगूळ घ्या गोड बोला!!

Comments

अरे वा!

संक्रातीला पतंगाची आणि मांजाची माहितीपूर्ण गोष्ट मस्त वाटली,जुने पतंग उडवत,काटत होतो ते दिवस आठवले.आमच्याकडे मोठ्ठे अंगण आणि मैदानही होते, पण मुली पतंग उडवण्यात फारशा रमत नसत,पण मला मात्र उडवायला मजा यायची,बिल्डींगमधल्या इतर मुलांच्यात मी ही लुडबुडत असे,त्यांच्यात मी लिंबूटिंबूच होते,पण मला खूप प्रयत्नांनी जमले उडवणे..त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या,:)
स्वाती

असेच!

आमच्याकडे मोठ्ठे अंगण आणि मैदानही होते, पण मुली पतंग उडवण्यात फारशा रमत नसत,पण मला मात्र उडवायला मजा यायची,बिल्डींगमधल्या इतर मुलांच्यात मी ही लुडबुडत असे,त्यांच्यात मी लिंबूटिंबूच होते,पण मला खूप प्रयत्नांनी जमले उडवणे..

कन्नी मला माहिती नसलेला शब्द आहे - कदाचित पतंग लिंबूटिंबू म्हणून उडवायला दिल्यामुळे असेल.

मस्त रे!

ऋषिकेश,

अगदी समयोचित लेख. लहानपण आठवले.

हा लेख वाचून लहानग्यांना सुद्धा पतंग, मांजा विकत आणन्या ऐवजी घरीच करावा वाटेल. मदतीला आजोबा प्रमाणे कोणी असेल तर अजूनच मजा.

आपला,
(पतंगी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

+१

एकदम बरोबर. समयोचीत आणि मस्त लेख आहे.

धन्यवाद!

धन्यवाद टग्या!
अतिशय मौलिक सुचना. मला लिहितानाच पतंग आणि मांजा यावर वेगवेगळे लिहावेसे वाटत होते. पण एकत्र लिहिल्याने आधीच लेख इतका मोठा झाला की अजून माहिती डोक्यात असूनही लिहिली नाहि. (अर्थात हे कारण असु शकत नाहि ). इतक्या सुंदर सुचना केल्याबद्दल अनेक आभार!

>> पतंग आणि मांजा या आजी-आजोबांच्या वस्तू??? ... इतक्यातच नातवंड कुठून आणू?
मांजाबद्दल कदाचित तुम्ही म्हणताय ते बरोबर असेल (मीही घरी मांजा बनवलाय) पण पतंग तरी मी अथवा माझ्या आजुबाजूला फारसा बनवलेला पाहिला नाहि कोणी. सगळे विकतचा आणायचे. कदाचित मुंबईत जन्मलो-वाढलो असल्याने असं असावं. असो. तुर्तास आपले वय वाढवल्याबद्दल क्षमस्व ;)

-ऋषिकेश

ढिल देणे

आजून एक पारिभाषिक शब्द् म्हणजे "ढिल देणे"
ढिल देणे म्हणजे पतंग उडवते वेळी अजून मांजा हवेत सोडणे. पतंग उडवताना एकदा का पतंग स्थिर झाला की केवळ त्याला खेचून उभा करायचा आणि मग ढिल दिली की वारा त्यला अजून उंच उंच घेऊन जाई.

(जरासा ढिल )ऋषिकेश

बदवणे

ढिल देण्याला 'बदवणे' हा शब्दही प्रचलित असल्याचे आठवते.
आणि आट्या देण्याला 'लपेट'णे :)

लपेट

मुंबईत त्यासाठी लपेट हा शब्द आम्ही वापरीत असू आणि त्यावरूनच बहुधा लपेटणे (खोटे बोलणे) हे क्रियापदही बनले!

लहानपणी का आताही उडवा

लेख नेहमीप्रमाणे छान जमलाय. पतंग कसा बनवायचा हे दाखवणारी आकृतीही सुबक. मांजा कसा बनवायचा याचे वर्णनही व्यवस्थित.

सहमत. लेखकाला दरवेळेस लेख छान जमलाय असे सांगावे लागते. तेव्हा तेच तेच वाक्य सांगण्यापेक्षा काहीतरी वेगळं वाक्य शोधायला हवं. ह. घ्या.

पतंग आणि मांजा या आजी-आजोबांच्या वस्तू??? माझ्याही लहानपणी पतंग उडवला जात असे, एवढेच नव्हे, तर बरेच जण घरीही बनवत.

पतंग आपल्या लहानपणीच का, आपल्या मुलांच्या लहानपणीही व्यवस्थित उडवला जातोय. अमेरिकेत उडवला नसेल तर कोणत्याही डिपार्टमेंट स्टोअरात खरेदी करा. अतिशय सुरेख, निरनिराळ्या आकारांचे पतंग मिळतात. आम्ही दर उन्हाळ्यात हमखास उडवतो. आमच्याकडे वारंही चांगलं असतं. फक्त इथले लोक भारतासारखा एकाजागी उभे राहून पतंग न उडवता त्या पतंगासकट धावत असतात.

असो.

एक शंका: मांज्याला काचेची पूड का लावली जाते? फक्त काटण्यासाठी की काही विशेष कारण?

होय

एक शंका: मांज्याला काचेची पूड का लावली जाते? फक्त काटण्यासाठी की काही विशेष कारण?

होय काचेच्या चुर्‍याचे काटाकाटी हेच कारण.
मात्र खळीचे कारण असे की, खळ लावलेला मांजा जास्त कंट्रोल करता येतो आणि सरळ रहातो.. साधा दोरा तितके "टेंशन" तयार करत नाहि.

प्रतिसादाबद्दल आभार!

-ऋषिकेश

खरं आहे पण...

इथे (कॅलिफोर्नियात) पतंग उडवणं खूप सोपं वाटलं. एकतर इथले बहुतेक पतंग एरोडायनॅमिकली (वायुगतिकी का?) समतोल असतात आणि मोकळी जागा आणि वारा भरपूर.
इथे शोअरलाईनला, पतंग एकदा थोडा उचलला की नुसता खांबाला बांधून ठेवला तरी चालतो आपोआप वर जातो. (स्वानुभवावरून...)

भारतात उडवायला खरा कस लागतो. पडलेल्या वार्‍यात पतंगाची उंची तशीच ठेवणं किंवा वार्‍याच्या दिशेला अनुकूल् असा पतंग फिरवणं कठीण काम आहे.
या लेखामुळे मजा आली. आता या विकेंडला शोअरलाईनला गेलं पाहिजे. दुधाची तहान ताकावर दुसरं काय?

मस्त

लेखकाला दरवेळेस लेख छान जमलाय असे सांगावे लागते. तेव्हा तेच तेच वाक्य सांगण्यापेक्षा काहीतरी वेगळं वाक्य शोधायला हवं. ह. घ्या.

-- असेच म्हणतो :)

नंदन

मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)

मस्त रे !!!

लेखकाला दरवेळेस लेख छान जमलाय असे सांगावे लागते. तेव्हा तेच तेच वाक्य सांगण्यापेक्षा काहीतरी वेगळं वाक्य शोधायला हवं. ह. घ्या.

असेच म्हणतो :)

कोरपड आणि काचेचा चुरा करुन आम्हीही मांजा बनवायचो. पण, पतंग काटल्यापेक्षा बोटे कापल्याचे जास्त आठवते :(
अवांतर :) संक्रातीच्या दुस-या दिवशी पतंकबाजी होते , तेव्हा जमले तर उद्या पतंग उडवतांनाचा आमचा फोटो टाकण्याचा विचार आहे !! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे वा!

संक्रातीच्या दुस-या दिवशी पतंकबाजी होते , तेव्हा जमले तर उद्या पतंग उडवतांनाचा आमचा फोटो टाकण्याचा विचार आहे !! :)

अरे वा! जरूर.. फोटु बघायला आवडेल.. वाट पहातोय
बाकी प्रतिसादाबद्दल आभार

ऋषिकेश

चढाओढीने उडवीत होतो :)

pantag...
सुर्याकडेच वारे असल्याने डोळ्याला ढापन लाऊन पतंग उडवण्याची काटा-काटीची मजा घेणारे प्रा.डॊ..............

प्रा. डॉ. ...मंगळावर

हाच फोटो प्रा.डॉ. बिरुटे सुक्ष्मलिंगदेहाने मंगळावर जात असल्याचा प्रयोग म्हणुनही खपेल. तेजपुंज गोळा हा सुक्ष्म लिंगदेहाचा. ( आठवा मी व माझा शत्रुपक्ष - पुल)
प्रकाश घाटपांडे

सही रे सही !!!

हाच फोटो प्रा.डॉ. बिरुटे सुक्ष्मलिंगदेहाने मंगळावर जात असल्याचा प्रयोग म्हणुनही खपेल.

हाहाहा:)))
घाटपांडे साहेब, मस्त हं !!!

स्वगत :) तरी म्हणत होतो, पतंगाचा फोटो येत असेल तर फोटो घे, पण, ऐकतंय कोण आमचं !!!

संधी हुकली

लहानपणी नेहमीच तयार पतंग आणि मांजा वापरला. लेख वाचून वाटते की पतंग आणि मांजा स्वतः तयार करण्याची संधी कायमची हुकली !!

छान

छान लेख आहे. लहानपणी तयार पतंग उडवल्यामुळे कन्नी बांधण्याचा प्रसंग आला नाही. पतंगाशी संबंधित वाक्प्रचार आहेतच, शिवाय (हिंदी) गाणीही आहेत.
टगेरावांशी सहमत. मीही लहानपणी पतंग उडवला आहे आणि मी बापही नाही :)

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

घरी पतंग बनवणे पूर्वीचे वाटले उडवणे नव्हे

बर्‍याच जणांच असं म्हणणं आहे की पतंग हा काही आजी अजोबांच्या होऊ शकत नाहि. म्हणूनच पतंग उडवावा कसा हे सांगितलच नाहि आहे. :) फक्त पतंग आणि मांजा बनवायचा कसा इथेच थांबलो आहे. उडवाउडवी हवी तशी करा. :-)
खरं तर निरनिराळ्या प्रदेशात, वेगवेगळ्या प्रकारचे पतंग उडवण्याच्या पद्धती इतक्या रोचक आहेत की एक स्वतंत्र लेख लिहिता येईल ( हा मात्र मोठ्यांसाठी! कारण तो लेख छोट्यांच्या भाषेत लिहिताना फार दमछक होईल हो ;))

-ऋषिकेश

छान

हाही लेख माहितीपूर्ण झाला आहे. (अवांतरः मांजा बनवण्यातले धोके, काचेची पूड केल्यानंतर पाट्या वरवंट्याची करावी लागणारी किचकट स्वच्छता (ज्याबद्दल आजी आई नक्कीच खूप उत्साही नसाव्यात)यामुळे मांजा घरी बनवणे ,लहान मुलांसाठी तर सोडाच, आजी आजोबांसाठीही कितपत सुरक्षित आहे याबद्दल साशंक आहे.)

मी गमभन शब्दसंपदा कधीकधी वापरते.

काचेचा चुरा

धन्यवाद !

काचेची पूड केल्यानंतर पाट्या वरवंट्याची करावी लागणारी किचकट स्वच्छता ...

यावरून आठवलं.. काचांचे मोठे तुकडे करून पाट्यावर सरळ तसेच न वाटता एका कोरड्या फडक्यात गुंडाळतात आणि ते बंद फडकं वरवंट्याखाली भरडून काढायचं.(शेंगदाणे कसे सालं उडू नये म्हणून कापडात भरडतात तसे :) ) त्याने पाट्याला काचेचा चुरा चिकटत नाही :)

कटी पतंग

मेरी जिंदगी है क्या एक कटी पतंग है| - चित्रपट कटी पतंग
( भरकटलेला, बिनतारी कटी पतंग )
प्रकाश घाटपांडे

काय घाटपांडे साहेब :)

मेरी जिंदगी है क्या एक कटी पतंग है|

आनंदाच्या प्रसंगात हे काय कटी पतंग आठवले :)
तुमचा पतंग गोते खाऊ लागला की काय ? ( ह. घ्या )

दै. सकाळ पतंगाच्या बातम्या

सप्तरंगांनी आसमंत इंद्रधनुषी

नगर, ता. १५ - नगरचे आसमंत आज नयनमनोहर व सप्तरंगी पतंगांनी भरून गेले होते.... मांजाला ढील देत रंगलेला काटाकाटीचा खेळ... पार्श्‍वभूमीवर शिट्ट्यांचे आवाज व ध्वनिक्षेपकांवर वाजणारी लोकप्रिय चित्रपट गीते.... अशा उत्साही वातावरणात आज नगरमध्ये पतंगोत्सव साजरा झाला.
उंच अवकाशात दिमाखाने भरारी मारणाऱ्या पतंगाला गोत बसविण्याची धडपड यशस्वी झाल्यानंतर मांजाला दोन्हीकडून मिळणारी ढील व मध्येच एखादा देणारा आखडपेच.... यात दुसरा पतंग कटला, की "काप्या रेऽऽ'चा एकच जल्लोष वातावरणात उत्साह पेरणाराच ठरत होता. कटला रेऽऽ.... आवाज होताच हवेच्या झोताबरोबर तरंगणारा पतंग पकडण्यासाठी हातात काठ्या वा झाडाची फांदी घेऊन रस्त्याने पळणारी मुले.... पतंग पकडल्यावर "तो कोणाचा' यावरून होणाऱ्या किरकोळ हमरीतुमरीनंतर व त्यातल्या त्यात थोडा "शक्तिमान' असलेल्याचा त्यावर हक्क शाबीत झाल्यावर कटलेला दुसरा पतंग पकडण्यासाठी पुन्हा सुरू होणारी पळापळ मनोरंजक ठरत होती.

संक्रांतीनिमित्त आज नगरमध्ये पतंग उडविण्याचा आनंद आबालवृद्धांनी मनसोक्त लुटला. शासकीय सुटी नसतानाही अनेकांनी रजा टाकून मुलाबाळांसह या अनोख्या आनंदात सहभाग घेतला. महिलाही मागे नव्हत्या. अनेक इमारतींच्या गच्च्यांवर युवकांच्या बरोबरीने पतंग उडविताना युवती जल्लोष करताना दिसत होत्या. कॉलन्यांमधून हातात थोड्याशा मांजासह पतंग धरून इकडे-तिकडे पळणारी लहान मुले मजेशीर दिसत होती. ध्वनिक्षेपकावरील विविध गाण्यांचे आवाज उत्साहात भर घालणारेच ठरले. बागडपट्टी, माळीवाडा, गंज बाजार, कापड बाजार, सर्जेपुरा, पारशा खुंट, सावेडीच्या प्रोफेसर कॉलनी चौकासह केडगाव, भिंगार व औद्योगिक क्षेत्रातही पतंग व मांजाविक्रीची दुकाने गर्दीने भरून गेली होती. घरातील पुरुष मंडळींची दिवसभर पतंग उडविण्याची धावपळ सुरू असताना घरोघरी महिलांची वाणवसा व सायंकाळच्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाची धांदल सुरू होती. सायंकाळी घरोघरी जाऊन मित्रपरिवारांना "तिळगूळ घ्या - गोड बोला' अशा शुभेच्छा दिल्या जात होत्या. ज्येष्ठांकडून तिळगूळ घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले जात होते.

"पतंग महोत्सवा'ला प्रतिसाद
पुण्या-मुंबईसारख्या शहरांच्या धर्तीवर सावेडीत नगरसेवक मिलिंद गंधे यांच्या पुढाकाराने प्रोफेसर कॉलनीमागील मैदानावर आज पतंगोत्सव झाला. औरंगाबादच्या महापौर विजया रहाटकर यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. या वेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी, सदाशिव देवगावकर, नरेंद्र कुलकर्णी, प्रा. मधुसूदन मुळे, अन्वर खान, शिवाजी शेलार, केसरी ड्रीम हॉलिडेजच्या संचालिका वृंदा साळवेकर आदी उपस्थित होते. नागरिकांना अनोख्या आनंदोत्सवात सहभागी करणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना या वेळी वक्‍त्यांनी व्यक्त केली.
---------------------------------------------------------------------------------------------------
आता ही बातमी पहा. ई सकाळ वर उपलब्ध नव्हती म्हणुन स्कॆन केली आहे.

Picture 160

गंमत म्हणजे दोन्ही बातम्या नगर जिल्ह्यातीलच आहेत. दोन्ही ही वास्तवच आहे.

प्रकाश घाटपांडे

पतंग आणि सुरक्षितता

आजच्या दै. सकाळ ची ही बातमी पहा http://esakal.com/esakal/esakal/01172008/rightframe.html गुजराथ मध्ये दोन दिवसात दहा लोकांचा व दीडशे पक्षांचा मृत्यु . मोकळ्या जागी पतंग उडवल्यास ते सुरक्षित.
आता आजच्याच दैनिक सकाळ मधिल दुसरी बातमी वाचा. पुन्हा नगर जिल्ह्यातीलच.

पतंगाच्या मांजाने घेतला नगरमध्ये एकाचा बळी

नगर, ता. १६ - पतंगाचा मांजा दुचाकीस्वाराच्या गळ्यात अडकल्याने मागे बसलेली व्यक्ती खाली पडून दुसऱ्या वाहनाखाली चिरडल्याने ठार झाली, तर मांजाने कापल्याने दुचाकी चालविणाराही गंभीर जखमी झाला.
ही घटना आज सायंकाळी नगर-कल्याण रस्त्यावर शिवाजीनगरजवळ घडली. याप्रकरणी पोलिसांनी मात्र जीपचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

यासंदर्भात माहिती अशी - लतीफ फकीर मोहंमद शेख (वय ३५, रा. टाकळी खातगाव, ता. नगर) व आरिफ पापाभाई शेख (वय १८, रा. निमगाव वाघा, ता. नगर) हे दोघे दुचाकीवरून (एमएच- १६ एबी-२७८६) नगर-कल्याण रस्त्याने नगरहून टाकळी खातगावला जात होते. शिवाजीनगरजवळ रस्त्यावरच काही जण पतंग उडवीत होते. त्यांतील एका पतंगाचा मांजा दुचाकी चालविणाऱ्या लतीफ यांच्या गळ्यात अडकला. त्यामुळे त्यांचा वाहनावरील ताबा सुटला. दुचाकी घसरल्याने मागे बसलेला आरिफ शेख रस्त्यावर पडला. त्या वेळी रस्त्याने जाणाऱ्या जीपखाली (एमएच-१६ बी-२७८६) सापडल्याने तो ठार झाला. मांजाने गळ्याला कापल्याने लतीफही गंभीर जखमी झाले. त्यांना नगरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या मानेला अठरा टाके पडले असून, प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. जखमी लतीफ शेतकरी आहेत, तर मृत आरिफ शिवणकाम करीत होता. नगरमधील काम आटोपून परतत असताना ही घटना घडली. यासंबंधी जाकिर हबीब शेख (रा. औरंगाबाद रस्ता) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी जीपचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. जीपचालक फरार आहे. पतंगाची मात्र पोलिसांनी दखलही घेतली नसल्याचे आढळून आले.

पतंगासाठी वापरण्यात येणारा मांजा अतिशय मजबूत असतो. दोऱ्यावर खास प्रक्रिया करून तो अधिक मजबूत बनविला जात असल्याने, गळ्याभोवती आवळलेला मांजा सहजासहजी तुटतही नाही. वाहनाचा वेग अन्‌ उडत्या पतंगाचा ताण, यामुळे गळ्याभोवती फास पडल्यासारखीच स्थिती होते. आकाशात उडणाऱ्या कित्येक पक्ष्यांचा यामुळे बळी जातो. आता रस्त्यावरून जाणाऱ्या माणसांचाही बळी जाऊ लागला आहे. लहान मुलेच नव्हे, तर अनेक तरुण अन्‌ सुशिक्षित माणसेही अशा धोकादायक पद्धतीने पतंग उडवितात. तुटलेला पतंग पकडण्यासाठी धावणारी लहान मुलेही वाहनाखाली सापडून जखमी होण्याचे प्रकार घडतात. पतंगाच्या मांजातून थोडक्‍यात बचावलेल्यांची संख्याही मोठी आहे. तुटलेले पतंग अन्‌ मांजा कित्येक दिवस विजेच्या तारा अन्‌ झाडांवर लोंबळकत राहतात.

कारवाईचा पोलिसांना अधिकार
मोकळ्या मैदानात पतंग उडविण्यास हरकत नसावी; मात्र रस्त्यावर धोकादायक पद्धतीने पतंग उडविणे चुकीचे आहे. पतंग उडविणाऱ्यांना भले आनंद मिळत असेल; मात्र त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या लोकांचा आणि आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांचा जीव धोक्‍यात येऊ शकतो. रस्त्यावर अडथळा होईल अशा पद्धतीने पतंग उडविण्याचे कृत्य नियमानुसार गुन्हाही आहे. मुंबई पोलिस अधिनियम ११३ नुसार, धोकादायक पद्धतीने पतंग उडविणाऱ्यांवर कारवाई करण्याचा पोलिसांना अधिकार आहे. त्यामध्ये बाराशे रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे; मात्र या नियमाची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

(पतंगाला 'आकाश 'व उडवणार्‍याला 'अवकाश' मिळण्याचे भाग्य लाभलेला)
प्रकाश घाटपांडे

 
^ वर