आजी - आजोबांच्या वस्तु - ८ (तार)

आज रविवार असल्याने घरात सगळेजण होते. दादा काँप्युटरवर बसला होता. शेजारी आबा काही न बोलता शांतपणे तो काय करतोय ते बघत होते. त्याने नेहमीप्रमाणे मेलबॉक्स उघडला, तसंच याहूवरही तो ऑनलाईन गेला. त्याच्या मित्रांशी चॅट सुरू केलं. खरंतर पटकन जेवण संपवून मला काँप्युटरचा ताबा घ्यायचा होता. पण गारेगार ताक पिण्याचा नादात दादाने काँप्युटर पटकावला.
आबा अचानक म्हणाले "बरंय रे आता, एखाद्याशी संवाद साधायला किती माध्यमं आहेत! फोन आहे, झालंच तर तुमचं चॅटिंग आहे, शिवाय फॅक्स आहे, ईमेल आहेत एखाद्याशी बोलणं आता फारच सोपं झालं आहे"
"तुमच्यावेळी कसं होतं हो आबा?"
तसंही दादा मला काँप्युटरवर बसू देणार नव्हताच तेव्हा एक डोळा तिथे ठेऊन आबांशीच गप्पा मारत बसलो.
"आमच्यावेळी तर मुळात टेलिफोनच नव्हते. मग हे इंटरनेट, आणि फॅक्स कसले येताहेत."
"मग तुम्हाला एखादा मेसेज फास्ट पोचवायचा असेल तर काय करायचात"
"साधारणत:  पत्र पाठवून खुशाली विचारणं होत असे. पण लगेच संपर्क साधायचा असला तर तार करावी लागे"
"तार म्हणजे"
"म्हणजे टेलीग्राम"
"हे काय असतं? हल्ली कुठे येते तार? आणि तार म्हणजे तारेवर मेसेज लिहायचे? मग ते वाचत कसे येणार? आणि ति तार मेसेज लवकर कसा पाठवणार?"
"अरे हो.. हो.. हो.. किती प्रश्न विचारशील! सांगतो." असं म्हणून आजोबा जरा बाहेर गेले.
तसा मी हुशार आहे! मी दादाला म्हटलं.."दादा, आबा काहीतरी तारेचं सांगताहेत. नेटवर काहीतरी मिळेल. तुझं झालं की लगेच सांग"
दादा  तर माझ्यापेक्षाही हुशार आहे. म्हणाला "ये इथे शोधू आपण मग करतो मी माझं काम"
इतक्यात आबा आले. मग मी परत काँप्युटर मिळवायचा नाद सोडला. नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे एक फोटो होताच.

 

हे तारयंत्र. तार म्हणजे "वायर". हे यंत्र म्हणण्यापेक्षा बटण किंवा स्वीच म्हण हवंतर. हे यंत्र वायरच्या एका बाजूला असतं तर बीपर किंवा ध्वनीयंत्र दुसर्‍या बाजूला असा सेटअप असायचा. माझ्या वडिलांच्या म्हणजे तुझ्या पणजोबांच्या काळात तर तार म्हणजे खरोखरच्या तारा असायच्या. पुढे रेडियोचा शोध लागल्यावर रेडियो टेलीग्राफि चालू झाली आणि संदेश वायर शिवाय येऊ लागला. पण एकदा "तार" नाव पडलं की पडलं! "
"पण मग वायर मधून सिग्नल कसा पाठवायचे?"
"हा तारेचा स्वीच विशिष्ट क्रमाने दाबला की विशिष्ट अक्षर समजले जाते. या मान्यताप्राप्त लिपि म्हणजे कोडला मोर्स कोड म्हणतात. आपल्याकडे नोकियाचा जुना हँडसेट आहे बघ. त्यात एस्.एम्.एस्. आल्यावर कसा आवाज येतो."
तसा मी हुशार आहे लगेच आवाज काढून दाखवला "बिप् बिप् बिप्.... बीऽऽप बीऽऽप.. बिप् बिप् बिप्"
"बरोबर!! यातल्या कमी वेळ चालणार्‍या बिप् ला डिट् अथवा डॉट् म्हणतात. तर दीर्घ म्हणजे जास्त वेळ आवाज होणार्‍या बीऽऽप ला डाह् अथवा डॅश म्हणतात. मोर्स कोड मध्ये एस् हे इंग्रजी अक्षर '...' अश्या तीन डॉट् ने मिळून बनले आहे तर एम् म्हणजे '__' दोन डाह्. म्हणून एस्.एम्.एस् म्हणजे ..?!?"
"डॉट् डॉट् डॉट्  डाह् डाह्  डॉट् डॉट् डॉट्"
"शाबास!"
"पण मग हे आवाज कसे काय पाठवत असत?"
"ते सोपं आहे.  आता तू दारावरचं बटण दाबलं की काय होतं?"
"घरात बेल वाजते आणि आपल्याला कळतं की बाहेर कोणीतरी आहे"
"तसंच हे ही. फक्त बेल कशी वाजवतो त्याचा मोर्स कोडने क्रम ठरवला आहे. म्हणजे जर तीनदा पटापट बेल वाजवली तर एस् .. तीच दोनदा दीर्घकाळ वाजवली तर एम् असं"
"मग तेव्हा दूरवरून मेसेज पाठवायला वायर्स टाकल्या होत्या."
"हो असं दिसतंय.. " दादा एकदम म्हणाला. म्हणजे तो ऐकत होता तर! "हे बघ. विकिपीडियावर १८९१ ला जगात अश्या वायर्स कुठे कुठे होत्या ते दाखवलं आहे. पुढे रेडियो आल्यावरही सिग्नल्स मोर्स कोडनेच पाठवत फक्त तारेच्या ऐवजी 'बिनतारी' संदेश असे म्हणत. नंतर हा कोड ऐकून मग संदेश बनवण्या ऐवजी डायरेक्ट कोडचा अर्थ छापणारी मशीन्स आली"

आबा परत सांगु लागले. "पण कधी कधी संदेश पाठवणारा जरा चुकला तरी फार मजा येत असे. असो. हा मोर्स कोड अजूनही काही जागी वापरला जातो. आता तो कसा हे मात्र तू नेटवर शोध. बघू मिळतंय का"
"हा कोड सद्ध्या शिकला येईल  का हो!" दादाने विचारले. त्याला भलती हौस असते सगळ्याची.
"हो येईल की. जगात अनेक क्लब्स आहेत. आपल्याकडेही ठाण्याला हॅम क्लब आहे. तिथे हा कोड शिकता येईल. तो तुमचा हॅम सेट म्हणजे तार यंत्र बनवायला मदत करतं शिवाय जगभरातील हॅम रेडियो धारकांशी संवाद साधू शकतोस तेही चकटफू"
"ग्रेट!" असं म्हणून दादा जरा बाहेर गेला.
मी लगेच काँप्युटरचा ताबा मिळवला आणि गेम्स सुरू केले!!

----------------
संदर्भः
१. माहिती: विकीपिडिया आणि हॅम रेडियो क्लब, ठाणे यांच्या तर्फे आलेल्या व्याख्यात्याकडून २ वर्षापूर्वी मिळालेली माहिती
२. चित्रे: विकीपिडिया

Comments

तारखाते

तारखात्याच्या कारभारावर पूर्वी एक जोक सांगितला जाई -

बाबुजी नावाचे गृहस्थ अजमेरला गेले. त्यांच्या गावाकडील नातेवाईकांना ही गोष्ट कळविण्यासाठी तार पाठवली गेली -
"बाबुजी अजमेर गये".
तारखात्याने ही बातमी पोचवली - "बाबुजी आज मर गये"!

शाळेत स्काऊटमध्ये शिट्टीमधून संदेश पाठविण्यासाठी मोर्स कोडचाच वापर केला होता असे आठवते. आणखी कोठे मोर्स कोडचा वापर होतो हे लक्षात येत नाही.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पोलिस बिनतारी विभाग

आणखी कोठे मोर्स कोडचा वापर होतो हे लक्षात येत नाही.

पोलिस बिनतारी विभाग यावरच जगतो. मला जुने बंद असलेले बिनतारी संच कागदावर 'चालू' म्हणुन दाखवावे लागे. बघा http://bintarijagat.blogspot.com येथे 'बिनतारी त्याला कोण मारी' हे पत्र वजा लेख.
( आता माजी बिनतारी पोलिस)
प्रकाश घाटपांडे

कट्ट कट्ट

नेहेमीप्रमाणे छान लेख. तारेच्याबाबतीत असे म्हणले जाय्चे की त्याचा आवाज "कट्ट कट्ट कडकट्ट कट्ट" असल्या ठेक्यात असतो. बाकी चुकीचा नंबर सांगीतल्याने गोंधळ झालेले सुनीलनी वर सांगीतल्याप्रमाणेच बरेच विनोद सांगीतले जातात.

असेच

म्हणतो. लेख आवडला. अशाच विनोदांतला पुलंच्या एका लेखात आलेला 'वाईफ रीचिंग टुनाईट'मध्ये त्याऐवजी प्रीचिंग टंकून येते हाही विनोद आठवला.

[अवांतर - लेखासोबतचा तक्ता छान आहे. E हे अक्षर सर्वात जास्त वेळा इंग्रजीत येत असल्याने त्यासाठी कमीत कमी संकेतचिन्हे खर्च केली आहेत. होम्सने एका कथेत नाचणार्‍या माणसांच्या भाषेचा उलगडा याच तत्त्वाने केला होता :)]

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)

नेहमीप्रमाणेच आवडला

दोन अवांतर विचार मनात येतात :

१. हे लेख कधी तुमच्या नावाने संकलित व्हावेत, अन्यत्र छापील प्रकाशित व्हावेत असे वाटते. आणि अशी वेळ आली तर चित्रांच्या प्रत-अधिकाराबद्दल विचार करावा लागेल. याबद्दल तुम्ही (अ) मूळ चित्र-मालकाशी संपर्क साधावा (आ) अशीच प्रत-अधिकार-मुक्त चित्रे संकलित करावीत (इ) जमल्यास स्वतः किंवा सहलेखकाकडून रेखाचित्रे काढून घ्यावीत (ई) आजी-आजोबांच्या काही वस्तूंची छाया/प्रकाशचित्रे उपक्रमींनी स्वतः काढून हक्कांसकट तुमच्या स्वाधीन करावीत.

२. (एक बारीक गोष्ट) : "...एखादा मेसेज फास्ट पोचवायचा..." इथे इंग्रजी शब्द आवडले नाहीत. तसे एसेमेस, इंटर्नेट, फॅक्स, हे मात्र मला पटतात. पण "...एखादा निरोप लवकर पोचवायचा..." इथे तर मराठी शब्द सोपे आणि रोजवापरातले आहेत. तरी जर वाटत असेल की तुमच्या ओळखीची मुले हे शब्द वापरणार नाहीत तर ही क्लृप्ती आवडते का बघा : ते शब्द आजोबांच्या तोंडून आदल्या वाक्यात काढा. आदल्या वाक्यातले शब्द मुलाने अनायासे वापरणे अनैसर्गिक वाटणार नाही.
उदा :

"आमच्यावेळी तर मुळात टेलिफोनच नव्हते. मग झटपट निरोप पाठवायचे हे इंटरनेट, आणि फॅक्स कसले येताहेत."
"मग तुम्हाला एखादा निरोप झटपट पोचवायचा असेल तर काय करायचात"

असो. ही टीका अति-अवांतर आहे. जसे लिहिता तसेच चालू ठेवले तरी उत्तम चालू आहे.

पटले

आपल्या प्रामाणिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

अशी वेळ आली तर चित्रांच्या प्रत-अधिकाराबद्दल विचार करावा लागेल

हे खरंय. काहि चित्रांच्या बाबतीत तसे करावे लागेलसे वाटते. या लेखातील चित्रे मात्र विकी वरून घेतली आहेत तिथे हा प्रश्न असतो का?. बाकी काहि लेखांतील चित्र जसे बंब, तराजू - वजने, पतंग हे मी स्वतःच् पॉवरपॉईंटमधे बनवलेले आहेत. असो पुढिल लेखांत शक्यतो (आ) या पर्यायाची खबरदारी घेईन

बाकी दुसर्‍या मुद्दयातील क्लुप्ती मस्तच आहे आणि काहि आधीच्या लेखांत वापरली देखील आहे :) यापुढे अश्या खटकणार्‍या इंग्रजी शब्दांबद्दल जरूर खबरदारी घेईन
पुन्हा एकदा धन्यवाद

-ऋषिकेश

मुक्तचित्रे

बाकी काहि लेखांतील चित्र जसे बंब, तराजू - वजने, पतंग हे मी स्वतःच् पॉवरपॉईंटमधे बनवलेले आहेत.

ऋषिकेश, प्रताधिकार मुक्त असलेली चित्रे वापरण्यास काहिच हरकत नसावी. फ्लिकर मध्ये 'पब्लिक ओपन ' ठेवून http://flickr.com/photos/praghat/sets/ येथे मी काही प्रकाशचित्रे टाकली आहे. टाकत आहे. त्यातील काही उपक्रमावरही जोडलेली आहेत. बिनतारी यंत्रांचे प्रदर्शनाची काही प्रकाशचित्रे टाकली आहेत.
प्रकाश घाटपांडे

खबरदारी?

यापुढे अश्या खटकणार्‍या इंग्रजी शब्दांबद्दल जरूर खबरदारी घेईन

ज्या मुलाच्या तोंडी हे वाक्य टाकले आहे तो काही सखाराम गटणे नाही. त्यांच्या तोंडी फास्ट शब्द येणे अपरिहार्य आहे असे मला वाटते. किंबहुना यामुळेच मुलांना आपले लेखन हे 'संवादी' व 'आपले' वाटण्याची अधिक शक्यता आहे. हे लेखन मुलांसाठी असल्याने त्यांना जर शब्दबंबाळ केले तर ती मराठी पासून पळून जातील. १२ जाने २००८ मध्ये पुण्यात अक्षरस्पर्श या "सार्‍याजणी" गटातील ग्रंथालयाच्या वर्धापन दिनानिमित्त 'वाच ग घुमा' या विषयावर अनेक वर्ष कॅनडा स्थित असलेल्या मराठी लेखिका विद्युल्लेखा अकलुजकरांनी परदेशात मुलांना मराठीत रुची टिकवण्यासाठी काय काय तडजोडी पालकांना (त्यांना) कराव्या लागल्या ते विशद केले होते. त्यांच्या मुलावर मराठी लादण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांचा मुलगा मराठी पासून अजुन लांब पळाला असता.
मला वाटत ऋषिकेश आपलं लेखन नैसर्गिक आहे. ते उर्मीतून आलेले आहे.महाराष्ट्रातल्या मुलांसाठी लिहिताना सुद्धा स्तराप्रमाणे भाषा बदलावी लागते. तरच ती " क्लिक" होते.
प्रकाश घाटपांडे

आभार!

प्रकाशराव, प्रोत्साहनाबद्दल आभार! :)
माझ्या मते शेवटी वाचक कोण आहेत हे ठरवूनच लिखाण झालेले बरे. हे लेख मोठ्या शहरांतील मुले डोळ्यांसमोर ठेऊन लिहिलेले आहेत.

अवांतरः मी हा ऑडीयन्स ठरवला आहे कारण मला शहरी भाषाच येते :). गावची भाषा, त्यांचे रोजचे वापरातले शब्द याविषयी मी स्वतःच काहि प्रमाणात (खरंतर बर्‍याच प्रमाणात :) ) अनभिज्ञ आहे. मी स्वतः मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटिअन शहरात जन्मलो-वाढलेलो असल्याने हे इंग्रजी शब्द पटकन खटकत नसावेत असा एक अंदाज आहे :)

-ऋषिकेश

सहमत

धनंजय यांच्या पहिल्या मुद्द्याचा विचार केला पाहिजे असे मलाही वाटले. अर्थात त्याचे कारण मीही अशी चित्रे वापरली आहेत. शेवटी मी वापरत असलेल्या चित्रांमुळे (जरी चित्रांचे मूळ स्त्रोत देत असले तरी) प्रताधिकारांचा भंग होतोय की काय असे वाटल्याने स्वतः छायाचित्रे काढायचे ठरवले. पण कधीकधी ती काढणे वेळखाऊ होते. त्यामुळे नक्कीच धनंजय यांनी दिलेले पर्याय विचार करण्यासारखे आहेत असे वाटते.

बाकी लेख नेहमीप्रमाणेच छान.

.__ ___ .__

._
.__.
._.
._
_
..
__

_.. .... ._ _. _.__ ._ ..._ ._ _..

_.. .... ._ _. _.__ ._ ..._ ._ _..

:))

बाप रे!!

सहजराव आणि ऋषिकेश यांचे प्रतिसाद वाचायला मोर्स कोडचा रेडी रेकनर वापरायला लागला !!

टीप - जग पुढे बायनरी वापरणार आहे याची मोर्सला चाहूल तर लागली नव्हती ना?

... ..- -. . . .-..

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आजी वारल्याबद्दल अभिनंदनपर तार

लेख अद्याप वाचला नाही फक्त चाळला. नंतर सविस्तर वाचते पण एक मजेशीर किस्सा आठवला.

इयत्ता ४थी किंवा ५वीच्या वर्गाला तार आणि पोस्ट खात्याचा धडा आहे. बहुधा अजूनही असावा कारण ही गोष्ट गेल्या ८-१० वर्षांपूर्वीची. (का असावा हा मोठा प्रश्न आहे कारण इमेलाच्या आणि मोबाईल फोनच्या जमान्यात तारा पाठवणे, जे त्या पोरांनी कधी पाहिलेही नाही ते शिकवत राहणे म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही वैतागवाणे असावे.) त्यावेळेस आमच्या इमारतीतील एका हुशार (पण गणितात धांदरट) विद्यार्थ्याला तू जरा मोकळ्या वेळात गणित शिकवशील का म्हणून त्याची आई मागे लागली होती. त्याला हा तारेचा घोळ समजावताना भयंकर नाकी नऊ आले होते. तार म्हणजे त्याला टेलीफोनची तार वाटत होती आणि डोक्यात प्रकाश पडत नव्हता. बर्‍याच वेळाने तो पडला त्याबरोबर मोठ्या उत्साहाने त्याने मला उदाहरण दिले.

समज की ,माझा मावसभाऊ कुठेतरी बाहेरगावी खेड्यात राहतो आणि इथे त्याची आजी वारली (म्हणजे या दोघांची कॉमन आजी नाही तर त्या मावसभावाच्या वडलांची आई) तर मी त्याला आजी वारली म्हणून अभिनंदनपर तार पाठवेन..... बिचारा हे सर्व गंभीरपणे सांगत होता, विचार करताना त्याचा काहीतरी गोंधळ उडाला आणि चुकून अभिनंदनपर तार गेली. ;-) पण घरात हा किस्सा ऐकणार्‍या सर्वांनी हसून घर डोक्यावर घेतले.

त्याच्या आईला किस्सा समजला तेव्हा "गाढवा! कोणीतरी मेल्याचचं उदाहरण कसं सुचलं नेमकं?' अशा शब्दांत त्याची हजेरी झाली.

छान

लेख उशिरा वाचला. छान झाला आहे. यावरून मसाला चित्रपट इंडीपेंडन्स डे आठवला. परग्रहवासियांचे आक्रमण झाल्यावर संदेश दळणवळण बंद पडते, तेव्हा अमेरिकन लोक मोर्स कोडने सर्वांना युद्धाचा संदेश पाठवतात.
एक रोचक प्रश्न. मोर्स कोड आणि एसएमएस यामध्ये कोणत्या रीतीने जलद संदेश पाठवता येईल असे वाटते? उत्तर इथे पहा :)

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

हा हा!!.. अफलातून

अफलातून विडियो आहे हा :).. बाकी लेख आवडल्याचे कळविल्याबद्दल धन्यु!

-ऋषिकेश

मस्त!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
लेख,त्यासोबतची चित्रे आणि त्यानंतरचे हे ध्वनिचित्रमुद्रण सगळेच मस्त आहे.

 
^ वर