आजी - आजोबांच्या वस्तु - ९ (बोरू)

आमच्याकडे या रविवारी बरेच पाहुणे येणार होते. त्यामुळे घरात बरीच धांदल होती. दुपारी जेवणं होईपर्यंत सगळे कामात होते. दुपारची जेवणं झाली आणि आई-आजी दमल्याने जरा विसावल्या. आजोबा उरलेल्या कामांची यादी करायला बसले. मला काहीच उद्योग नसल्याने त्यांच्या बाजूला बसून काय लिहितायत ते वाचत होतो.
आजोबा नेहमीप्रमाणे नीट टेबलसमोर बसून व्यवस्थितपणे कागदावर लिहीत होते. त्यांचे अक्षर एकदम क्लास आहे, छापल्यासारखेच वाटते.
"काय छान अक्षर आहे हो तुमचं!"
"हं. आहे. सुबक आहे. आमच्या दामले मास्तरांची कृपा बरंका!"
"का ते खूप वेळा लिहायला लावायचे?"
"नाही रे, लहानपणीच त्यांनी आम्हाला बोरूने कित्ते गिरवायला लावले."
"बोरू म्हणजे?"
"बोरू म्हणजे एक प्रकारचं लाकडी पेन. माझ्याकडे असेल बहुतेक अजून एखादा बोरू. चल त्या खाटेखाली पेटी आहे ना त्यात शोधूयात"
आबांनी पेटीतून एक लाकडाची काडी काढली

boru

"हा बोरू. याने आम्ही अक्षरे गिरवायचो."
"मग यात शाई कुठून भरायची?"
"यात शाई भरायची नाही तर हा शाईत बुडवून लिहायचं"
मला तो बोरू बघून मजा वाटली. तो एका टोकाला एकदम टोकदार होता. आबा सांगत ओते
"हा बोरू वेगवेगळ्या आकारात असतो. त्याने वेगवेगळ्या मापाची, जाडीची, तर्‍हेची अक्षरे काढता येतात. हे चित्र बघ यात वेगवेगळ्या प्रकारचे बोरू दाखवले आहेत. यालाच आम्ही टाक म्हणायचो."

किती प्रकारचे बोरू होते त्या चित्रांत. प्रत्येकाने वेगवेगळ्या जाडीतली अक्षरे काढता येतात.
"आबा, मग आता आपण पेन वापरतो लिहायला. तुम्ही पेन कधी वापरायला लागलात?"
"अरे आम्हीही पेनच वापरायचो. बोरू फक्त अक्षर सुधारण्यासाठीच्या कित्त्यांपुरते. फार पूर्वी पासून एकोणीसव्या शतका पर्यंत बोरू बरोबरच पक्षांची पिसे देखील लिहायला वापरली जात असत. बोरूचा वापरदेखील अगदी इजिप्शियन संस्कृतीतही झालेला दिसतो."
"बापरे इतक्या आधी?"
"हो. बोरू बनवायला फार तंत्राची गरज नव्हती. बांबू घेतला आणि एका बाजूने छान निमुळता केला की बोरू तयार. शाईचा मात्र खूप मोठा इतिहास आहे. इजिप्तमध्ये बनलेली शाई होती पण भारतातील फक्त काजळीमध्ये तेल मिसळून एकदम दाट शाई बनवलेली असे ती जगभर प्रचलित झाली. त्या शाईने जे सुबक अक्षर येत असे त्याला तोड नाही. पुढे फाऊंटन पेन आल्यावर मात्र ही शाई चालेनाशी झाली. त्यात वेगवेगळी रसायने मिसळून अधिक प्रवाही तरीही कागदाला धरून ठेवणारी शाई बनवली जायला लागली"
"हं... आपल्याला लिहिता येईल का या बोरूने?"
"हो!! येईल की. दौत आहे का आपल्याकडे?"
"हो माझ्या शुद्धलेखनासाठी बाबांनी कालच फाऊंटनपेन आणलं आहे त्याच्या बरोबर शाईची बाटली - म्हणजे दौतसुद्धा आणली - आहे"
"अरे वा मग आण की..मी दौत घेऊन आलो. आजोबांनी त्यात बोरू २ मिनिटं बुडवून ठेवला आणि मग एका कागदावर "श्री गणेशाय नमः" असे इतक्या सुंदर अक्षरात लिहिले म्हणून सांगू. मी पण मग बोरू घेतला. पण काही लिहिताच येईना.
"आबा, मला लिहिता का येत नाही हो?"
"अरे लगेच कसे येईल, तो कोन साधावा लागतो. म्हणून तर प्रत्येक हाताचा बोरू वेगळा ठेवत असत.प्रत्येकाची लिहायची पद्धत वेगळी त्यामुळे वेगवेगळ्या जागी दाब पडत असे. एकाचा बोरू दुसर्‍याला वापरायला कठीण. असो. आपण तुला नवा बोरू बनवू आणि मग तुला हवं तसं लिही. तो पर्यंत थोड्या वेगळ्या कोनातून लिहून बघ जमेल तुला"
थोडावेळ ट्राय केल्यावर एकदाची अक्षरं उमटायला लागली. पण आजोबांच्या अक्षरापुढे अगदीच कोंबडीचे पाय वाटत होती :)

Comments

वा

वा! बोरुचे इतके वेगवेगळे प्रकार प्रथमच पहायला मिळाले. फाऊंटनपेनने लिहूनही दहा-बारा वर्षे लोटली असल्याने, बोरुने लिहिण्याबद्दल फार अप्रूप वाटले.

जालावर ह्या दुव्यावरही थोडी अधिक माहिती सापडली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

मस्त

मस्त लेख. चित्रही एकदम झकास आहे! आपल्याकडे बोरू कधीपासून वापरात आला हे जाणून घ्यायला आवडेल. (महाभारत लिहीताना गणेशाच्या हातात पक्ष्याचे पीस असल्याचे आठवते आहे.)

अवांतर : यावरून चिनी कॅलीग्राफी आठवली. एकूणातच चिनी लोकांचा कल अवघड गोष्टी करण्याकडे दिसतो. चॉपस्टीक्सने खाणे काय किंवा ही कॅलीग्राफी काय!

----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx

क्रिएटीविटी

महाभारत लिहीताना गणेशाच्या हातात पक्ष्याचे पीस असल्याचे आठवते आहे.

याला चित्रकाराची क्रिएटिविटी म्हणणे शक्य आहे. ;-) गणेशाने महाभारत लिहिले तर ते नेमके कोणत्या लिपीत हा प्रश्न पडतो. ;-)

कूटलिपी

एकदा का कूटलिपी म्हणले कि त्यात गुढ संकेत येतात व चिकित्सेच्या वाटा बंद होतात.
प्रकाश घाटपांडे

कदाचित

ते पीस नसून जॉयस्टीक होती. प्राचीन भारत किती प्रगत होता याचा आणखी एक पुरावा. ;-)
----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

बोरू

शाळेत असताना फलक लिहिण्यासाठी आम्ही बोरूचा वापर करत असू. विज्ञान प्रदर्शनातील फलक बोरूने लिहिण्याचा एक खास उपक्रम असे.

माझ्या एका सिनिअर चित्रकार शाळामित्राने मला बोरूने, तो विशिष्ट कोनात धरून कसे लिहायचे ते शिकवले होते, त्यामुळे बोरूने सुरेख(?) लिहायची सवय झाली होती पण त्याच्या इतके सफाईदार लिहिणे कधी जमले नाही आणि बोरू तासणेही कधी जमले नाही. बोरू तासायची वेळ आली की मी त्याच्याकडे जाऊन "प्लीज तासून दे" असा तगादा लावत असे.

बोरूने लिहिणे याप्रमाणेच बोरू तासणे ही एक कला आहे. माझ्यासारख्या घिसाडघाईने काम करणार्‍यांना ती जमणे दुरापास्त आहे. ;-)

पण भारतातील फक्त काजळीमध्ये तेल मिसळून एकदम दाट शाई बनवलेली असे ती जगभर प्रचलित झाली.

भारतातील शाई आजही जगप्रसिद्ध असावी असा कयास आहे. ;-) कोणत्याश्या एका चित्रपटात बहुधा जॅकी चॅनचा "रश अवर २"* असावा. नोटेवरची शाई भारतीय असेल तर ती नोट खरी आहे हे ओळखण्याचा एक प्रकार असल्याचे आठवते. ;-)

* नसल्यास निकोलस केजचा नॅशनल ट्रेजर असावा.

जबरी

मस्त रे!!!

बोरू पाहीला इतकेच आठवते कुठे ते काही आठवत नाही.

अवांतर - ह्या नातवाने आयुष्यात जास्त काही केले नाही तरी हरकत नाही. कलेक्टर्स आयटेमस् खुप आहेत. विकुन बरेच काम भागेल ;-)

चांगली माहीती

लेख आवडला. लहानपणी कधीतरी आजोबांमुळेच बोरू वापरल्याची आठवण झाली... पण नंतर ते कधी सवयीत ठेवले नाही. बोरू ने सुरवात केल्यास अक्षरास वळण लागते असे म्हणतात. कदाचीत ते काम, मी लहान असताना - फाउंटन पेन ने केले. अक्षर चांगले झालेपण होते. नंतर जसे किबोर्डला सोबती केले तेंव्हापासून सातत्याने "लिहायची" सवय गेली आणि आता पटकन काही लिहायला घेतले तर पानावर "कोंबड्या मनोसोक्त नाचतात" ;)

तिरपा छेद

सुवाच्च्य अक्षरासाठी बोरु/ टाक/ मोराचे पीस् या सर्वांचे टोक हे किंचित तिरपा छेद घेतलेले असते. प्रथम वापर करताना हा तिरपा छेद तयार करायचा असतो. टाकाच्या बाबतीत हा छेद हा दगडी पाटीवर घासून करतात. बोरुच्या बाबतीत तो कानसीने वा खडबडीत दगडावर घासून करतात. आमच्या जीवन शिक्षण मंदिरात देव गुरुजी पेन वापरु देत नसत. टाक वापरणे बंधनकारक होते.चुकुन कुणाकडे पेन दिसला तर तो भिंतीवर आपटुन त्याची निब व जीभ तोडुन टाकला जाई. प्रभात छाप शाईची पुडी मिळत असे. ती दौतीत टाकून त्यात पाणी टाकुन शाई तयार केली जाई. त्याचा घट्टपणा तपासण्यासाठी थेंब शेणकुटावर / सारवलेल्या भिंतीवर टाकुन तपासला जाई. दौतीला सुतळीची विशिष्ट गाठ मारुन सुतळीचेच एक हँड्ल तयार केले जाई. म्हणजे तर्जनी व मधले बोट यात पकडायला सुलभ जाई. टाकाच्या तोंडाशी एक निब खुपसण्यासाठी एक फट असे. त्यात नवीन निब घेउन ते खुपसले जाई व लिखाणायोग्य टाक तयार होई. बोरु हे अक्षर ओळख व वळणासाठी वापरले जाई. अशा टाकाने शुद्धलेखनाच्या पाच ओळी रोज लिहुन आणण्याचा उपक्रम आम्ही तीन वर्षे केला. ( नाही तर देव गुरुजींच्या छड्या ) हेतु हा कि अक्षर सुधारावे. माझ्या बाबतीत ही सुधारणा तात्कालीन ठरली . पुन्हा ये रे माझ्या मागल्या. आठवीत हायस्कूल मध्ये आल्यावर पेन वापरायला सुरुवात झाली. तेव्हा आमच्या ए बी सी डी ला सुरुवात पेन ने झाली. ८ वी ९ वी त विंग्रजी विषय हा कंडेस्ड कोर्स होता. ५ वी ते ९ वी चे विंग्रजी दोन वर्षात करणारा तो कोर्स होता. परत दहावी एस एस सी समद्यांबरोबर यकच.

प्रकाश घाटपांडे

वा!

वा प्रकाशराव, नेहेमीप्रमाणे नवीन माहिताचा साठा आमच्यासाठी मोकळा केल्याबद्दल अनेक आभार. आम्ही रेडिमेड बोरु आणि शाई वापरल्याने त्यातील हे तपशील माहित नव्हते जसे प्रभातची शाईची पुडी, त्याचा घट्टपणा तपासायची पद्धत वगैरे.
अजून माहिती असल्यास, शुद्धलेखनाचा नमुना असल्यास कृपया इथे डकवावा :) (मी बराच शोधला पण देवनागरीतील मिळाला नाही :( ) पुन्हा एकदा धन्यु!

-ऋषिकेश

बोरू

नेहमीप्रमाणे उत्तम जमलेला लेख..

माझे एक नातेवाईक कानडी मुलुखात पट्टणकुडीला राहत. त्यांच्याकडे गेले असताना बोरू बनवला होता ते आठवले. त्याने अक्षर खरेच वळणदार आणि सुस्पष्ट यायचे. आता हाताने लिहायची सवय राहिली नाही हेच खरे.

संग्राह्य!

'आजी - आजोबांच्या वस्तु' ही संपूर्ण लेखमलाच अतिशय उत्तम व संग्राह्य झाली आहे! ऋष्या, तुझे खूप कौतुक वाटते!

मनापासून अभिनंदन..

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

'बोरु' चा लेखही मस्त रे !!!

'आजी - आजोबांच्या वस्तु' ही संपूर्ण लेखमलाच अतिशय उत्तम व संग्राह्य झाली आहे! ऋष्या, तुझे खूप कौतुक वाटते!
मनापासून अभिनंदन..!!!

असेच म्हणतो !!!

अवांतर :- दहन, दफन आणि इतिहास हा चर्चा विषयही उत्तम होता, पण् सध्या आम्हाला जरा खरडायला वेळ मिळेना :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
हृषिकेश तुझी लेखमालिका मस्तच आहे. अगदी शोधून शोधून गोष्टी काढतोस आणि त्यावर खूप सुंदर आणि माहितीपूर्ण लिहितोस. तुझ्या चिकाटीचे कौतुक वाटते.
मी देखिल पहिले धडे बोरुनेच गिरवले आहेत. त्यानंतर टाक वगैरे गोष्टींनी.
"हा बोरू वेगवेगळ्या आकारात असतो. त्याने वेगवेगळ्या मापाची, जाडीची, तर्‍हेची अक्षरे काढता येतात. हे चित्र बघ यात वेगवेगळ्या प्रकारचे बोरू दाखवले आहेत. यालाच आम्ही टाक म्हणायचो."

मात्र बोरु म्हणजे टाक नव्हे. बोरूची पुढची सुधारित आवृत्ती म्हणजे टाक. ज्यासाठी बोरुच्या तोंडाला निब लावली जायची. बोरु म्हणजे विशिष्ट आकाराचा नुसताच लाकडाचा तुकडा झाला. घाटपांडे साहेबांनी लिहिल्याप्रमाणे त्याच्या तोंडाशी नीब घालण्यासाठी एक खाच बनवली जायची आणि अशा तर्‍हेच्या प्रकाराला टाक म्हणायचे.

बोरूचा नागरी/उर्दू काप

मी लहानपणी बोरूने कधीही लिहिले नव्हते. मोठेपणी हौस म्हणून बोरूने लिहिण्याचा प्रयोग मात्र भरपूर केला.
येथे बोरूने अक्षर चांगले किंवा वळणदार येते असे म्हणतात ते का याचा थोडासा विस्तार करू इच्छितो. हे हल्लीच्या पिढीसाठी लिहितो आहे, तेव्हा खाली लिहिलेले जुन्या लोकांना अगदीच बाळबोध वाटले किंवा आधीच हे माहीत असल्यामुळे नाविन्य वाटले नाही तर क्षमस्व.

मराठी छापील अक्षरे (विशेषतः मोठ्या आकाराचे मथळे) पाहिली तर असे दिसते की कोणत्याही अक्षराचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या जाडीचे असतात आणि यामुळे ते अक्षर अधिक सुंदर दिसते. बोरूने किंवा तिरपा काप दिलेल्या लेखणीने अशी अक्षरे लिहिता येतात.
तिरपा काप दोन प्रकारे देता येतो हे उघड आहे. त्यापैकी "\" असा काप देवनागरीसाठी (आणि आपल्या बहुतेक भारतीय / हिंदू लिप्यांसाठी) तर "/" असा काप उर्दू, इंग्रजी(रोमन) या लिप्यांसाठी वापरतात (काही अक्षरलेखन तज्ञ वेगळेपणा येण्यासाठी हे काप मुद्दाम उलटसुलटसुद्धा वापरतात हेही नाटकासिनेमाच्या जाहिराती पाहिल्यास ध्यानात येते). अर्थात् वर दिसतात तितके हे काप उभट नसून ४५ अंशाजवळपासच्या कोनात असतात.

नंतरच्या काळात आम्हाला बोरूची कापाकापी व देखभाल आणि शाईत बुडवून लिहिण्याचा या गोष्टींचा कंटाळा येत गेला व फाउंटनपेनाचेच निब तिरपे कापून वापरण्याची सवय लागली. यातही ते काचेवर घासून गुळगुळीत करणे इ. कटकट करावी लागतेच.
बाजारात कॅलिग्राफीची पेने, निबे मिळतात ती बहुतेक उर्दू/इंग्रजी कटची असतात, ती उलटी धरून लिहावे लागते व तेवढे स्मूथली (प्रतिशब्द?) चालत नाही. पर्यायाने बरेच वेळा निबे तिरपा कट न देता सरळ "-" अशी (आडवा काप) कापलेली असतात पण उजव्या हाताने लिहिताना आपोआप व सहजपणे ती तिरपी धरली जातात व आपोआप इंग्रजी/उर्दू अक्षरांची सोय होते. यच निबाने मराठी लिहायचे झाल्यास मला तरी हात अत्यंत अनैसर्गिक कोनात धरावा लागतो. अजून मराठी/भारतीय लिप्यांसाठीचा काप दिलेले निब मला बाजारात दिसले नाही.

आता बोरूने किंवा काप दिलेल्या लेखणीने अक्षर का सुधारते? तर आपल्याला कमीजास्त जाडीचे अक्षर पाहण्याची सवय असते व बोरूने लिहिण्यात चुकले तर ते लगेच लक्षात येते. काही अक्षरांबाबत (उदा. "र") नेहमीच्या पद्धतीने लिहू गेलो तर नीट येत नाहीये हे तत्काळ जाणवते व त्याची ती विशिष्ट पोकळ गाठ आपल्याला शिकणे भाग पडते. बहुतेक अक्षरे लेखणी एका कोनात धरून लिहिता येतात पण याचे अपवादसुद्धा अभ्यास करून शिकावे लागतात. विशेषतः उर्दूतला "र" लिहिताना लेखनीवरील दाब कमीजास्त करणे किंवा मधूनच पटकन लेखणीचा कोन बदलणे इ. तंत्रे शिकावी लागतात.
अशा सर्व तपशीलवार अभ्यासानेच सुलेखन येते व हे आपल्याला बोरू शिकवतो.

- दिगम्भा

मराठी कापाची नीब

मला अप्पा बळवंत चौकात मिळाली. पण इतके दिवस इंग्रजी कापाची नीब वापरायची सवय असल्यामुळे, तीच वापरतो. (साधारणपणे त्या पेनांतच शाई भरली असते, आणि निबा बदलण्याचा माझा आळस असतो म्हणा...)

मराठीत वायव्येकडून आग्नेयेकडे जी रेषा जाते ती रुंदीला कमी असते ("ष" मधली "पोटफोडी" रेषा जाड येवून चालत नाही!), आणि नैरृत्येकडून ईशान्येकडे जाणारी रेषा सर्वात रुंद असते. ("ळ"मधली डाव्या वर्तुळात सुरू होऊन उजव्या वर्तुळात जाणारी रेषा बघावी.)

इंग्रजीत त्याच्या नेमके उलट! वायव्येकडून आग्नेयेकडे जी रेषा जाते ती रुंदीला अधिक असते ("A"मधली उजवी उताराची रेषा), आणि नैरृत्येकडून ईशान्येकडे जाणारी रेषा सर्वात अरुंद असते. ("A"मधली डावी चढणारी रेषा.)
(आरिआल फाँटमध्ये दिसणार नाही, टाइम्स किंवा तत्सम फाँट बघावा.)

इंग्रजी कापाच्या नीबने मराठी लिहायचे असल्यास
१. ज्यांना जमते त्यांनी डाव्या हाताने लिहावे. (मला जमत नाही.) गंमत म्हणजे दिगम्भा म्हणतात तशीच गैरसोय इंग्रजी निबांनी इंग्रजी लिहिताना डावखुर्‍यांना होते!
२. हाताचा काही विचित्र द्राविडी प्राणायाम करावा लागतो. नेहमी आपले कोपर कागदाच्या "या" बाजूला असते, आणि पेन धरलेला हात खालून (आपल्याबाजूने)-बोटे अक्षराच्या दिशेने, असा असतो. इंग्रजी निबेने देवनागरी लिहिताना कोपर अगदी पुढे, कागदाच्या पलीकडे टेबलावर ठेवायचे, आणि हात कागदाच्या "वरून", बोटे अक्षराच्या दिशेने, असा आणावा.

ऋषिकेश यांचा लेख उत्तम आहे, हे सांगणे नलगे.

धन्यवाद!

प्रमोदकाका,
मला बोरु-टाक ही चूक लेख सुपुर्त केल्यावर जाणवली. पण लिहायचं राहिलं. असो. बोरु व टाक यातील फरक विषद केल्याबद्दल् आभार :)

दिगम्भा,
मला यातील हे तपशिल माहित नव्हते. बर्‍याचदा बाजारातील नीबेने लिहिता येणे कठीण जायचे त्याचे कारण आता कळले. इतक्या सुंदर विस्ताराबद्दल अनेक आभार

बाकी तात्या, प्रा डॉ, चित्राताई, सहजराव, राजेंद्र, नंदन, प्रियालीताई, टग्याराव, विकास, प्रमोदराव सगळ्यांना प्रोत्साहनाबद्दल धन्यु!

छान लेख

लेख आणि प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत.

अवांतर : आमच्या इथे एका दुकानात काचेची काडी मिळते. तिला खरे म्हणजे काडी म्हणणे योग्य होणार नाही. तिला काचेचा बोरूही म्हणता येणार नाही कारण तिचे लिहायचे टोक गोल व फुगीर असून त्याला बारीकसे भोक असते. ते भोक शाईत बुडवायचे. मग त्या गोल फुगीर भागाला आतून ज्या खाचा केलेल्या असतात, त्यांत ती शाई धरून ठेवली जाते व विशिष्ट कोन साधून लिहिल्यास छान लिहिता येते. अर्थात हे प्रकरण फारच महाग आहे.

राधिका

आधुनिक बोरू - माय्क्रोसॉफ्ट् पेंट मधील

आत्ता हातात बोरू नसतानादेखील कोणाला बोरू वापरण्याचा अनुभव हवा असेल तर एक चांगली सोय आहे - माय्क्रोसॉफ्ट् पेंट
(खरे तर हे माझ्या लक्षात आले तेव्हा विन् ३.१ नुकतेच आले होते व त्या काळात याच उपयोजनेला - युटिलिटीला - पेंट् ब्रश् म्हणायचे).

ऑल् प्रोग्रॅम्स् - ऍक्सेसरीझ् - पेंट् - यात ब्रश् निवडा
- खाली पाहिल्यास ० (गोल), चौरस, "/" (इंग्रजी/उर्दू काप) व "\" (मराठी/नागरी काप) अशा चार ओळी दिसतील. हा ब्रशच्या टोकाचा आकार आहे.
त्यातली चौथी म्हणजे सर्वात खालचीं ओळ निवडा. सोयीसाठी व नीट दिसण्यासाठी सर्वात मोठ्ठा आकाराचा घेतलेला बरा.
आता लिहून पहा.

माउस् हे हत्यार जरा ओबडधोबड आहे, अक्षरावर चांगले नियंत्रण कठीण जाते.
पण बोरू म्हणजे काय हे कळायला ही सोय एकूण छान आहे.

- दिगम्भा

इंग्रजी खरे कशाने लिहितात? (बोरूने नव्हे !)

बोरूने इंग्रजी लिहितात खरे पण ही काही इंग्रजी लिहिण्याची योग्य किंवा अस्सल पद्धत नव्हे.
कारण इंग्रजीतली अक्षराची बदलती जाडी ही लेखणी कोणत्या कोनात धरली जाते यावरून ठरवलेली किंवा ठरवायची नसते. ती ठरते स्ट्रोक् वर जाणारा आहे (बारीक पाहिजे) की खाली येणारा आहे (जाड पाहिजे) यावर. याचे उदाहरण म्हणून एल् हे अक्षर पहा - आधी खालून वर जाणारी रेषा, मग वरून खाली येणारी रेषा. असेच् ई, डब्ल्यू, एच् इ. अक्षरांच्या बाबतीतही ध्यानी येईल. प्रत्येकच अक्षर या प्रकारे लिहायचे असते. यासाठी कोन नव्हे, दाब महत्वाचा.
त्यामुळे इंग्रजी लिहायला बोरू अयोग्य असतो. मग इंग्रजी लिहितात कसे - तर लेखणीवरील दाब - प्रेशर् - कमी जास्त करून.
लेखणी दाबून लिहिले तर जाड रेघ येते व थोडा दाब कमी केला तर बारीक रेघ येते.
असे प्रत्येक अक्षरात दाब कमी-जास्त नियंत्रित करणे अशक्यप्राय वाटेल, पण ते करणारी माणसे मी प्रत्यक्ष पाहिली आहेत.
केवळ ०.५-०.७ मिमि जाडीच्या शिशाच्या पेन्सिलीने असे अस्खलित व सहज लिहिणारा एक जर्मन माणूस माझ्या परिचयाचा होता (मला फारसे जमत नाही), आता हेवन् वासी झाला तो.
पण असे शक्य आहे निश्चित, अभ्यास मात्र आवश्यक.
जुन्या म्हातार्‍या लोकांकडून ऐकले आहे की इंग्रजी लिहिण्यासाठी पूर्वी एक ९ नंबरचे निब मिळायचे म्हणे. काय, कसे होते ते, माहीत नाही.
इथे कोणाला माहीत असल्यास सांगावे.

- दिगम्भा

निबांचे नंबर

माझ्यामते भारतात इंग्रजी लेखनही बोरूने केले जायचे. माझ्या एका आजोबांचे दस्वाइवज त्याकाळचे इंग्रजीत आहेत व बोरूने लिहिलेले आहेत. बाकी निबांच्या नंबरबद्दल मिहि ऐकून आहे. जरा गुगलून बघतो. कोणाला माहिती असल्यास कळवावे.

बाकी तुमच्या माहितीपर प्रतिसादाबद्दल अनेक आभार

लेख छान झाला आहे

ऋषिकेश, लेख् छान् झाला आहे. नविन् माहिती देण्याची ही पद्धत् आणि शैली दोन्ही आवडले.

वा रे!

वा वा!!!
मस्त लेख. उत्तम लेखकु आहेस गड्या तू!

आपला
गुंडोपंत

 
^ वर