आजी - आजोबांची विशेष माणसे

आज तर माझी खूप म्हणजे खूपच मजा होती. माझे दुसरे आजोबा पण घरी आले होते. ते पुण्याला राहतात वाड्यात. काय मजा येते तिथे. गेल्यावेळी मी गेलो असताना आजोबांनी मला भोवरा फिरवायला शिकवले होते. तो पण दोरीवाला भोवरा. मी परत घरी आल्यावर सगळ्यांना तो भोवरा फिरवून दाखवून काय स्टाइल मारली होती म्हणून सांगू!
आज मात्र आजोबा गप्पाच मारायच्या मूडमध्ये होते. दोन्ही आजोबा त्यांच्या लहानपणीच्या गमतीत रमले होते. त्यांच्या बोलण्यात बरंच काही नवीन नवीन ऐकू येत होतं. मी आपला नुसताच ऐकत बसलो होतो. इतक्यात आबांनी मला काहीतरी विचारले मी माझ्याच तंद्रीत होतो. मी आपलं काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून नुसतीच मान हालवली. तर आजोबा म्हणाले "अरे बोल ना तोंडाने, काय नंदीबैलासारखा माना हालवतो आहेस"
"नंदीबैल म्हणजे सांग सांग भोलानाथ गाण्यात आहे तोच ना!?"
"बरोब्बर"
"आई नेहमी म्हणून दाखवते ते गाणं.. एकदम सह्हीये ते गाणं"
"तुला येतं कारे? दाखव पाहू म्हणून"
आता आली ना पंचाईत. मी तसा हुशार आहे. मी एकदम विषयच बदलला
"हा भोलानाथ वाला रोज यायचा तुमच्या घरी"
"रोज नाही रे फार पुर्वी दर सोमवारी यायचा. सोमवार शंकराचा आणि नंदी शंकराचं वाहन, म्हणून मग दर सोमवारी यायचा तो. गळ्यात ढोल, मस्त सजवलेला रुबाबदार बैल, त्याची शिंग पण रंगवलेली असायची, तो भोलानाथ मग त्या ढोलावर काठ्या घासून बूग्वूऽऽबूग्वूऽऽ असा आवाज काढायचा. आम्ही तमाम पोरंसोरं जमा होतं असू. हा नंदीबैलवाला गावाच्या वेशीला जाईपर्यंत आम्ही पण मग त्याच्या मागंमागं अख्खा गाव हिंडत असू! लोक त्याला प्रश्न विचारत आणि तो बैल हो किंवा नाही अश्या माना हालवत असे."
"आजोबा, मग तुम्ही कधी प्रश्न नाही का विचारला"
"लहानपणी खूप प्रश्न विचारले. आता फारसे आठवत नाहीत. पण पुढे मोठं झाल्यावर माझा फारसा विश्वास उरला नव्हता, पण एक वर्ष तुझ्या बाबांना खूप ताप भरला होता. काही करूनही कमी होईना. तेव्हा अचानक समोर नंदीबैल ओता त्याला विचारलं की माझ्या पोराचा ताप कमी होईन ना रे? आणि त्याने चांगलं चारचारदा मान हालवून हो म्हटलं आणि ४ दिवसात ताप उतरला"
"बरं का, पण भोलेनाथाचा बूग्वूऽऽबूग्वूऽऽ आणि डोंबार्‍यांचं बूग्वूऽऽबूग्वूबूग्वूऽऽबूग्वूऽऽएकदम वेगळं"
"डोंबारी म्हणजे?" हे मी कधीच ऐकलं नव्हतं
"डोंबारी म्हणजे एकप्रकारची रस्त्यावरची सर्कस म्हण ना. हे डोंबारी बरेच लोकं जमल्यावर वेगवेगळे खेळ करून दाखवायचे. त्यातील सगळ्यात प्रसिद्ध खेळ म्हणजे दोरीवरून चालणे. दोन बांबूंच्यामध्ये एक दोरी लावलेली असायची आणि त्या वाद्याच्या तालावर ती डोंबारीण अगदी रस्त्यावर चालावं तसं सहजपणे चालायची त्यावेळी ही डोंबारीण आम्हाला जगातील सगळ्यात शूर स्त्री वाटायची. काही डोंबारीतर आगीतून उड्या मारायचे खेळ पण करायचे. त्या जाळामुळे नाकातून-डोळ्यातून पाणी यायचं पण आम्ही पोरं तर बाहीला नाक पुसत पुसत ते खेळ जीव डोळ्यात साठवून पाहायचो. काय हो आठवतायत का डोंबारी?"
शेवटचा प्रश्न दुसर्‍या आजोबांना होता
"हो तर, डोंबारीच काय मला तर माकडांचे खेळ करून दाखवणारे मदारी, सकाळी सकाळी एकापेक्षा एक सुंदर गाणी म्हणत दिवसाची निर्मळ सुरुवात करणारा वासुदेव..."
"मला मदारी माहीत आहे आता हा वासुदेव कोण?"
"वासुदेव म्हणजे सकाळी सुंदर भजनं, भूपाळ्या म्हणत दारोदार फिरून पोट भरणारा एक गावकरी. हा डोक्यावर मस्त मोरपिसांची टोपी घालायचा आणि हातात टाळ. त्याच्या गाण्याशिवाय दिवस सुरू झाला असं वाटायचंच नाही. कोंबडा आरवतोय, समोर बंबात पाणी कढत होतंय, आबांचे न्हाणीघरातून "हर हर गंगे भागीरथीऽऽ" करून घंगाळा रिकामं केल्याचा आवाज येतोय, आईने नुकताच सडा घातला आहे, ती सुंदर रांगोळी काढते आहे, मी एखाद्या वासरा शेजारी बसून झोपेत राखुंडीने दात घासतो आहे आणि समोरून एखादी सुंदर भूपाळी गात, आपल्याच आनंदात डुल्लत, मस्त गिरकी घेत देवाच्या भक्तीत रममाण झालेला वासुदेवाचं आगमन व्हायचं. त्याचा ह्या रूपामुळे कित्येक वर्ष मला हा वासुदेव सगळ्यात सुखी माणूस वाटायचा हा फोटो आहे बघ एक वासुदेवाचा"

Vasudev madari garudi

"वासुदेवच काय आमचं लहानपण अश्या असंख्य लोकांनी भरलं आहे."
"म्हणजे कोण कोण"
"आता जेवायचंय पण नुसती नावं सांगतो, डोंबारी, मदारी, वासुदेव याशिवाय आमच्याकडचा नेहमीचा पाहुणा म्हणजे गारुडी. त्याचा तो फस्स्स्स् करत येणारा काळा कभिन्न नाग, त्याच्या डोक्यावरचा तो १० चा आकडा, केवढं अप्रूप होतं या सगळ्याचं"
"याशिवाय कडकलक्ष्मी सुद्धा तर नेहमी यायचा."
"तो काय करायचा?"
"तो फाट् फाट चाबकाचे फटके स्वतःच्या अंगावर मारून घ्यायचा. आम्ही त्याला जाम टरकून असायचो. त्याशिवाय काही स्त्रिया देखील गावात नेहमी यायच्या त्यातली दर महिन्याला येणारी अमावास्येची बाई! तिला दर अमावास्येला आई तांदूळ, कांदा, शिळी भाकरी असं काय काय द्यायची. महिन्यातून एकदाच अन्न घेऊन तेच महिनाभर खाते याचं मला फार वाईट वाटायचं. तिचं डोक्यात असल्याने त्यामुळे मी कधी पानात टाकत नाही. दुसरी स्त्री म्हणजे बोहारीण. ही तर अजूनही येते नाही?"
"हो येते ना!" मी तसा हुशार आहे, मला लगेच आठवलं "आई मग कपडे देऊन नेहमी एखादा डबा नाहीतर, मोठं पातेलं घेते."
"या शिवाय, दर महिन्याला येणारा बांगडीवाला, गोटी-सोडा पुऽऽईई-फुट्ट् करून फोडणारा सोडावाला, फुगेवाला, गोळावाला असे विक्रेते तर ठरलेले. त्याशिवाय डोळा लावून मुंबई-ताजमहाल दाखवणार्‍याचा खेळ पाहण्यासाठी मी माझ्या बाबांकडे खूप हट्ट केल्याचं आठवयतय मला"
"आबा, मग इतके सगळे लोक गेले कुठे?"
"गेले.. काळाच्या पडद्या आड!!!.. शेवटी कालाय तस्मै नमः दुसरं काय?"
मला हे काही कळलं नाही. आता आजोबांना भूक लागली आहे असं मला वाटलं आणि म्हटलं "चला आजोबा भूक लागली आहे, जेवूया आता"

Comments

वा!

ऋषिकेशा! मस्तच रे!
ह्यातले सगळे दोस्त माझेही बालपण समृद्ध करून गेलेते. त्यापैकी अजूनही काही आहेत्. गारुडी,मदारी,कडकलक्ष्मी(मरी आई),बर्फाचे गोळेवाला,कापुसवाला(खाण्याचा), कुल्फीवाले,आईसफ्रुटवाले इत्यादी.
शहरात तरी आता न दिसणारे म्हणजे.. कल्हईवाले,वासुदेव,पिंजारी,धारवाले(क्वचित दिसतात) वगैरे.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

मस्त रे !!!

ऋषी,
आजी-आजोबाच्या माणसांच्या गोष्टी लै भारी !!!
वासुदेव आम्हाला आवडतो, अरे जेव्हा गावात संपर्काची, संवादाची साधने नसायची तेव्हा निरोप देवाण-घेवाणीचे काम या वासुदेवानं केलं !!! लेकी बाळी माहेरची ख्याली-खूषाली कळावी म्हणुन या वासुदेवाची वाट पाहत असायची. 'वासुदेव आला हो,वासुदेव आला' च्या आवाजाने गाव मोहरुन जात असेल.

"गेले.. काळाच्या पडद्या आड!!!.. शेवटी कालाय तस्मै नमः दुसरं काय?"

सही !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर..

सुंदर लिहिलं आहेस रे ऋषिकेशा!

औरभी लिख्खो...

आपला,
(अजूनही बर्फाचा रंगीत गोळा आठवड्यातून एकदोनदा तरी हमखास खाणारा) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

आठवणी

अंगावर फटके मारून घेणारा कडकलक्ष्मी अगदी २ वर्षांपूर्वीपर्यंत ठाण्यात दिसत असे. कपड्याच्या बदल्यात भांडी देणारी बोहारीण अजूनही असावी. बाकीचे गारूडी, डोंबारी, भल्यामोठ्या गिटारसारखी दिसणारी वस्तू घेऊन फिरणारा कापुसपिंजारी मात्र काळाच्या पडद्याआड गेले.

गोळावाला आणि "म्हातारीचे केस" विकणारा यांनी तर् आमचे बालपण गोडघोड करून टाकले होते!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

वा..

वा ऋषिकेश,
घाटपांड्यांच्या नंदीबैलावरील लेखात केलेली विनंती लगेचच मनावर घेऊन एकदम छान लेख पेश केला आहेस, तुझं कौतुक!

अरे सही

बालपणच्या बर्‍याच आठवणी जागॄत केल्यास.

नंदीबैलवाला
डोंबारी
मदारी
वासुदेव
गारूडी
कडकलक्ष्मी
बोहारीण
कल्हईवाला
धारवाला
कापुसपिंजारी
गोळावाला
कुल्फीवाला
बांगडीवाला
फुगेवाला/चक्रवाला/खेळणीवाला/
देशी व्हायोलीनवाला
खारी, टोस्ट, नानकटाई वाला

यादीत भर घाला. जमल्यास फोटो.

अजून एक

दरवेशी (अस्वलवाला)

अभिजित...

मस्त!

लेख आवडला.

गेले.. काळाच्या पडद्या आड!!!.. शेवटी कालाय तस्मै नमः दुसरं काय?

हे वाचून चुटपूट लागते पण यासर्वांना संग्रहालयातील एखादा कोपरा देण्यावाचून दुसरा पर्याय आहे असे वाटत नाही हे खेदाने म्हणावेसे वाटते.

सामाजिक/आर्थिक कारणे

सर्वप्रथम , एका चांगल्या लेखाबद्दल ऋषिकेश यांचे आभार.

ज्याप्रमाणे प्राणि-वनस्पतींच्या अनेकानेक जातीजमाती नष्ट झाल्या/होत आहेत त्याचप्रमाणे या माणसांच्या बाबतीत झाले/होते आहे. प्रचंड वेगाने झालेले शहरीकरण, खेड्यांच्या स्वयंपूर्णतेच्या तत्वाला दिलेली तिलांजली असे अनेक घटक तर सरळसरळ कारणीभूत आहेतच.

दैनंदिन आयुष्यतल्या अनेकानेक गोष्टींच्या दर्शनाने - आणि अनेक गोष्टींच्या दर्शनाच्या अभावाने - एकूणच मानवी प्रगती , विकास या प्रश्नांकडे पुन्हा पुन्हा वळावे अशी परिस्थिती आहे. आपल्या आजूबाजूच्या अनेक प्रश्नांचे अगदी जवळचे नाते शहरीकरण, बकालीकरण, विकासाच्या नावाने चाललेली नासाडी, गावेच्या गावे , गावाकडील पारंपारिक उद्योग, शेती, व्यवसाय यांचा नाश या सार्‍याशी आहे याची प्रकर्षाने जाणीव होते.

प्वॉरधरी

लहानपणी शहरातल्या मुलांना जशी बागुलबुवाची भीती दाखवायचे तशी खेड्यात मुलांना "प्वॉरधरी सुटल्यात" अशी भिती दाखवली जायची. हे पोरधरी नेमके कसे दिसतात अशी उत्सुकता मला नेहमी असायची. बहुरुप्यासारखे दिसतात कि डोंबार्‍यासारखे. कसे ही दिसोत पण मुल प्वॉरधर्‍याच्या भीतीने घरात थांबत असत. ही पोरधरी टोळी गावात शिरुन त्रास देणार्‍या मुलांना धरुन नेत असे चित्र डोक्यात तयार झाले.

प्रकाश घाटपांडे

आम्ही पोरधरीच्या रुपात.

आमच्या गावाकडे एक टेकडी आहे, तिला इदगाह असेही म्हणतात. तर एकदा, अंदाजे २०/२५ वर्षापूर्वी त्यावर आम्ही मित्र नेहमीच दुपारी गप्पा मारायला जात असू. तर तेथे सावलीमध्ये गप्पा मारणे ही एक गमंत असायची.

एकदा असेच आम्ही ४/५ मित्र गप्पा मारायला गेलो. तेथे एक ७/८ वर्षाचा मुलगा अगोदरच बसला होता. त्याच्या आजूबाजूलाच आम्ही गप्पा मारत बसलो. १५/२० मिनीटे झाल्यानंतर तो मुलगा एकदम ओक्साबोक्सी रडायला लागला. आम्ही साहजीकच विचारले, अरे, का रडतोस?, त्यावर तो म्हणाला की, " मला वाटले, की प्वारधरीच आले?."

मग कसेबसे त्याला शांत केले आणि आम्हीपण तेथून लगेच निघालो.

आज हा किस्सा आठवला.

छान

नेहमी प्रमाणेच मस्त.

या लेखात ओढूनताणून एक उणीवच काढायची म्हटली तर -
"गेले.. काळाच्या पडद्या आड!!!.. शेवटी कालाय तस्मै नमः दुसरं काय?"
मला हे काही कळलं नाही. आता आजोबांना भूक लागली आहे असं मला वाटलं आणि म्हटलं "चला आजोबा भूक लागली आहे, जेवूया आता" "

यापेक्षा वेगळा शेवट करता येईल का? या संवादांमधून एवढे सर्व समजूनही शेवटी मुलाची उत्सुकता काहीशी कमी दिसते असे वाटले. किंवा हल्लीच्या मुलांचे म्हणून कदाचित हे चित्रण बरोबरही होईल.

बाकी लेखाने आठवणी खूपच आल्या. धन्यवाद!

असेच

बाकी लेखाने आठवणी खूपच आल्या. धन्यवाद!

म्हणतो. लेख सुरेख झाला आहे. संकेतस्थळांवर मुलांसाठी सातत्याने लिहीणारा ऋषिकेश हा एकमेव लेखक आहे.

----

कडकलक्ष्मी

Kadaklaxmi
ही कड्कलक्ष्मी अगदी परवाच दिसली होती. आता वेषभुषेत काही फरक जाणवतो. कमरेला चोळीचे खण असायचे, मळवट ठसठसीत भरला असायचा, लांब केस सोडलेले असायचे. कालानुरुप असे फरक व्हायचेच. आसूडाच्या टोकाला एक गाठ बांधलेली असते . तेच आसूडाच्या फटक्याच्या आवाजाचे रहस्य आहे. ही गाठ सोडवुन फटके मारुन घेतले तर खरोखरच वळ उठतील.पुर्वी मला देवीच्या 'पावर 'मुळे यांना लागत नाही असे वाटायचे.
आज ही भारतात पोटाच्या खळगी साठी वणवण उन्हात फिरत ही परंपरा जपावी लागते.
प्रकाश घाटपांडे

मस्त!

लेख मस्तच आहे! पुढच्या लेखात कश्याची माहिती असेल बरे?

धन्यवाद

सर्व प्रोत्साहनकर्त्यांचे अनेक आभार!

चित्राताई,
आपण म्हणता ते कदाचित असेल. तकतर हा लेख मी अगदी एकहाती लिहिला आहे. त्या वेळी (आणि अजूनही) या मुलाला एकदम कालाय तस्मै नमः चा अर्थ कळेल असे वाटले नाही.. :) तसा तो हुशार आहे पण तितकाही नाहि हो ;)
आवर्जून स्पष्ट मत दिल्या बद्दल "आभार+१ " :))

पिढील काहि दिवस माझा जालाशी संपर्क दूरपास्त असेल तेव्हा ह्या लेखावरील भावी प्रतिसादकर्त्यांचे आगाऊ आभार :)

(आभारी) ऋषिकेश

फार आवडला

लेख फार फार आवडला.

माझ्या पोराचा ताप कमी होईन ना रे?

वा, ऋषीकेशराव लेख खूप आवडला.

मोठं झाल्यावर माझा फारसा विश्वास उरला नव्हता, पण एक वर्ष तुझ्या बाबांना खूप ताप भरला होता. काही करूनही कमी होईना. तेव्हा अचानक समोर नंदीबैल ओता त्याला विचारलं की माझ्या पोराचा ताप कमी होईन ना रे? आणि त्याने चांगलं चारचारदा मान हालवून हो म्हटलं आणि ४ दिवसात ताप उतरला

हा भाग सर्वाधिक आवडला.

आपला
(गतवैभवविलासी) प्रवासी

 
^ वर