आजी - आजोबांची विशेष माणसे

आज तर माझी खूप म्हणजे खूपच मजा होती. माझे दुसरे आजोबा पण घरी आले होते. ते पुण्याला राहतात वाड्यात. काय मजा येते तिथे. गेल्यावेळी मी गेलो असताना आजोबांनी मला भोवरा फिरवायला शिकवले होते. तो पण दोरीवाला भोवरा. मी परत घरी आल्यावर सगळ्यांना तो भोवरा फिरवून दाखवून काय स्टाइल मारली होती म्हणून सांगू!
आज मात्र आजोबा गप्पाच मारायच्या मूडमध्ये होते. दोन्ही आजोबा त्यांच्या लहानपणीच्या गमतीत रमले होते. त्यांच्या बोलण्यात बरंच काही नवीन नवीन ऐकू येत होतं. मी आपला नुसताच ऐकत बसलो होतो. इतक्यात आबांनी मला काहीतरी विचारले मी माझ्याच तंद्रीत होतो. मी आपलं काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून नुसतीच मान हालवली. तर आजोबा म्हणाले "अरे बोल ना तोंडाने, काय नंदीबैलासारखा माना हालवतो आहेस"
"नंदीबैल म्हणजे सांग सांग भोलानाथ गाण्यात आहे तोच ना!?"
"बरोब्बर"
"आई नेहमी म्हणून दाखवते ते गाणं.. एकदम सह्हीये ते गाणं"
"तुला येतं कारे? दाखव पाहू म्हणून"
आता आली ना पंचाईत. मी तसा हुशार आहे. मी एकदम विषयच बदलला
"हा भोलानाथ वाला रोज यायचा तुमच्या घरी"
"रोज नाही रे फार पुर्वी दर सोमवारी यायचा. सोमवार शंकराचा आणि नंदी शंकराचं वाहन, म्हणून मग दर सोमवारी यायचा तो. गळ्यात ढोल, मस्त सजवलेला रुबाबदार बैल, त्याची शिंग पण रंगवलेली असायची, तो भोलानाथ मग त्या ढोलावर काठ्या घासून बूग्वूऽऽबूग्वूऽऽ असा आवाज काढायचा. आम्ही तमाम पोरंसोरं जमा होतं असू. हा नंदीबैलवाला गावाच्या वेशीला जाईपर्यंत आम्ही पण मग त्याच्या मागंमागं अख्खा गाव हिंडत असू! लोक त्याला प्रश्न विचारत आणि तो बैल हो किंवा नाही अश्या माना हालवत असे."
"आजोबा, मग तुम्ही कधी प्रश्न नाही का विचारला"
"लहानपणी खूप प्रश्न विचारले. आता फारसे आठवत नाहीत. पण पुढे मोठं झाल्यावर माझा फारसा विश्वास उरला नव्हता, पण एक वर्ष तुझ्या बाबांना खूप ताप भरला होता. काही करूनही कमी होईना. तेव्हा अचानक समोर नंदीबैल ओता त्याला विचारलं की माझ्या पोराचा ताप कमी होईन ना रे? आणि त्याने चांगलं चारचारदा मान हालवून हो म्हटलं आणि ४ दिवसात ताप उतरला"
"बरं का, पण भोलेनाथाचा बूग्वूऽऽबूग्वूऽऽ आणि डोंबार्‍यांचं बूग्वूऽऽबूग्वूबूग्वूऽऽबूग्वूऽऽएकदम वेगळं"
"डोंबारी म्हणजे?" हे मी कधीच ऐकलं नव्हतं
"डोंबारी म्हणजे एकप्रकारची रस्त्यावरची सर्कस म्हण ना. हे डोंबारी बरेच लोकं जमल्यावर वेगवेगळे खेळ करून दाखवायचे. त्यातील सगळ्यात प्रसिद्ध खेळ म्हणजे दोरीवरून चालणे. दोन बांबूंच्यामध्ये एक दोरी लावलेली असायची आणि त्या वाद्याच्या तालावर ती डोंबारीण अगदी रस्त्यावर चालावं तसं सहजपणे चालायची त्यावेळी ही डोंबारीण आम्हाला जगातील सगळ्यात शूर स्त्री वाटायची. काही डोंबारीतर आगीतून उड्या मारायचे खेळ पण करायचे. त्या जाळामुळे नाकातून-डोळ्यातून पाणी यायचं पण आम्ही पोरं तर बाहीला नाक पुसत पुसत ते खेळ जीव डोळ्यात साठवून पाहायचो. काय हो आठवतायत का डोंबारी?"
शेवटचा प्रश्न दुसर्‍या आजोबांना होता
"हो तर, डोंबारीच काय मला तर माकडांचे खेळ करून दाखवणारे मदारी, सकाळी सकाळी एकापेक्षा एक सुंदर गाणी म्हणत दिवसाची निर्मळ सुरुवात करणारा वासुदेव..."
"मला मदारी माहीत आहे आता हा वासुदेव कोण?"
"वासुदेव म्हणजे सकाळी सुंदर भजनं, भूपाळ्या म्हणत दारोदार फिरून पोट भरणारा एक गावकरी. हा डोक्यावर मस्त मोरपिसांची टोपी घालायचा आणि हातात टाळ. त्याच्या गाण्याशिवाय दिवस सुरू झाला असं वाटायचंच नाही. कोंबडा आरवतोय, समोर बंबात पाणी कढत होतंय, आबांचे न्हाणीघरातून "हर हर गंगे भागीरथीऽऽ" करून घंगाळा रिकामं केल्याचा आवाज येतोय, आईने नुकताच सडा घातला आहे, ती सुंदर रांगोळी काढते आहे, मी एखाद्या वासरा शेजारी बसून झोपेत राखुंडीने दात घासतो आहे आणि समोरून एखादी सुंदर भूपाळी गात, आपल्याच आनंदात डुल्लत, मस्त गिरकी घेत देवाच्या भक्तीत रममाण झालेला वासुदेवाचं आगमन व्हायचं. त्याचा ह्या रूपामुळे कित्येक वर्ष मला हा वासुदेव सगळ्यात सुखी माणूस वाटायचा हा फोटो आहे बघ एक वासुदेवाचा"

Vasudev madari garudi

"वासुदेवच काय आमचं लहानपण अश्या असंख्य लोकांनी भरलं आहे."
"म्हणजे कोण कोण"
"आता जेवायचंय पण नुसती नावं सांगतो, डोंबारी, मदारी, वासुदेव याशिवाय आमच्याकडचा नेहमीचा पाहुणा म्हणजे गारुडी. त्याचा तो फस्स्स्स् करत येणारा काळा कभिन्न नाग, त्याच्या डोक्यावरचा तो १० चा आकडा, केवढं अप्रूप होतं या सगळ्याचं"
"याशिवाय कडकलक्ष्मी सुद्धा तर नेहमी यायचा."
"तो काय करायचा?"
"तो फाट् फाट चाबकाचे फटके स्वतःच्या अंगावर मारून घ्यायचा. आम्ही त्याला जाम टरकून असायचो. त्याशिवाय काही स्त्रिया देखील गावात नेहमी यायच्या त्यातली दर महिन्याला येणारी अमावास्येची बाई! तिला दर अमावास्येला आई तांदूळ, कांदा, शिळी भाकरी असं काय काय द्यायची. महिन्यातून एकदाच अन्न घेऊन तेच महिनाभर खाते याचं मला फार वाईट वाटायचं. तिचं डोक्यात असल्याने त्यामुळे मी कधी पानात टाकत नाही. दुसरी स्त्री म्हणजे बोहारीण. ही तर अजूनही येते नाही?"
"हो येते ना!" मी तसा हुशार आहे, मला लगेच आठवलं "आई मग कपडे देऊन नेहमी एखादा डबा नाहीतर, मोठं पातेलं घेते."
"या शिवाय, दर महिन्याला येणारा बांगडीवाला, गोटी-सोडा पुऽऽईई-फुट्ट् करून फोडणारा सोडावाला, फुगेवाला, गोळावाला असे विक्रेते तर ठरलेले. त्याशिवाय डोळा लावून मुंबई-ताजमहाल दाखवणार्‍याचा खेळ पाहण्यासाठी मी माझ्या बाबांकडे खूप हट्ट केल्याचं आठवयतय मला"
"आबा, मग इतके सगळे लोक गेले कुठे?"
"गेले.. काळाच्या पडद्या आड!!!.. शेवटी कालाय तस्मै नमः दुसरं काय?"
मला हे काही कळलं नाही. आता आजोबांना भूक लागली आहे असं मला वाटलं आणि म्हटलं "चला आजोबा भूक लागली आहे, जेवूया आता"