आजी - आजोबांच्या वस्तु - ९ (बोरू)

आमच्याकडे या रविवारी बरेच पाहुणे येणार होते. त्यामुळे घरात बरीच धांदल होती. दुपारी जेवणं होईपर्यंत सगळे कामात होते. दुपारची जेवणं झाली आणि आई-आजी दमल्याने जरा विसावल्या. आजोबा उरलेल्या कामांची यादी करायला बसले. मला काहीच उद्योग नसल्याने त्यांच्या बाजूला बसून काय लिहितायत ते वाचत होतो.
आजोबा नेहमीप्रमाणे नीट टेबलसमोर बसून व्यवस्थितपणे कागदावर लिहीत होते. त्यांचे अक्षर एकदम क्लास आहे, छापल्यासारखेच वाटते.
"काय छान अक्षर आहे हो तुमचं!"
"हं. आहे. सुबक आहे. आमच्या दामले मास्तरांची कृपा बरंका!"
"का ते खूप वेळा लिहायला लावायचे?"
"नाही रे, लहानपणीच त्यांनी आम्हाला बोरूने कित्ते गिरवायला लावले."
"बोरू म्हणजे?"
"बोरू म्हणजे एक प्रकारचं लाकडी पेन. माझ्याकडे असेल बहुतेक अजून एखादा बोरू. चल त्या खाटेखाली पेटी आहे ना त्यात शोधूयात"
आबांनी पेटीतून एक लाकडाची काडी काढली

boru

"हा बोरू. याने आम्ही अक्षरे गिरवायचो."
"मग यात शाई कुठून भरायची?"
"यात शाई भरायची नाही तर हा शाईत बुडवून लिहायचं"
मला तो बोरू बघून मजा वाटली. तो एका टोकाला एकदम टोकदार होता. आबा सांगत ओते
"हा बोरू वेगवेगळ्या आकारात असतो. त्याने वेगवेगळ्या मापाची, जाडीची, तर्‍हेची अक्षरे काढता येतात. हे चित्र बघ यात वेगवेगळ्या प्रकारचे बोरू दाखवले आहेत. यालाच आम्ही टाक म्हणायचो."

किती प्रकारचे बोरू होते त्या चित्रांत. प्रत्येकाने वेगवेगळ्या जाडीतली अक्षरे काढता येतात.
"आबा, मग आता आपण पेन वापरतो लिहायला. तुम्ही पेन कधी वापरायला लागलात?"
"अरे आम्हीही पेनच वापरायचो. बोरू फक्त अक्षर सुधारण्यासाठीच्या कित्त्यांपुरते. फार पूर्वी पासून एकोणीसव्या शतका पर्यंत बोरू बरोबरच पक्षांची पिसे देखील लिहायला वापरली जात असत. बोरूचा वापरदेखील अगदी इजिप्शियन संस्कृतीतही झालेला दिसतो."
"बापरे इतक्या आधी?"
"हो. बोरू बनवायला फार तंत्राची गरज नव्हती. बांबू घेतला आणि एका बाजूने छान निमुळता केला की बोरू तयार. शाईचा मात्र खूप मोठा इतिहास आहे. इजिप्तमध्ये बनलेली शाई होती पण भारतातील फक्त काजळीमध्ये तेल मिसळून एकदम दाट शाई बनवलेली असे ती जगभर प्रचलित झाली. त्या शाईने जे सुबक अक्षर येत असे त्याला तोड नाही. पुढे फाऊंटन पेन आल्यावर मात्र ही शाई चालेनाशी झाली. त्यात वेगवेगळी रसायने मिसळून अधिक प्रवाही तरीही कागदाला धरून ठेवणारी शाई बनवली जायला लागली"
"हं... आपल्याला लिहिता येईल का या बोरूने?"
"हो!! येईल की. दौत आहे का आपल्याकडे?"
"हो माझ्या शुद्धलेखनासाठी बाबांनी कालच फाऊंटनपेन आणलं आहे त्याच्या बरोबर शाईची बाटली - म्हणजे दौतसुद्धा आणली - आहे"
"अरे वा मग आण की..मी दौत घेऊन आलो. आजोबांनी त्यात बोरू २ मिनिटं बुडवून ठेवला आणि मग एका कागदावर "श्री गणेशाय नमः" असे इतक्या सुंदर अक्षरात लिहिले म्हणून सांगू. मी पण मग बोरू घेतला. पण काही लिहिताच येईना.
"आबा, मला लिहिता का येत नाही हो?"
"अरे लगेच कसे येईल, तो कोन साधावा लागतो. म्हणून तर प्रत्येक हाताचा बोरू वेगळा ठेवत असत.प्रत्येकाची लिहायची पद्धत वेगळी त्यामुळे वेगवेगळ्या जागी दाब पडत असे. एकाचा बोरू दुसर्‍याला वापरायला कठीण. असो. आपण तुला नवा बोरू बनवू आणि मग तुला हवं तसं लिही. तो पर्यंत थोड्या वेगळ्या कोनातून लिहून बघ जमेल तुला"
थोडावेळ ट्राय केल्यावर एकदाची अक्षरं उमटायला लागली. पण आजोबांच्या अक्षरापुढे अगदीच कोंबडीचे पाय वाटत होती :)