आजी - आजोबांच्या वस्तु - ८ (तार)

आज रविवार असल्याने घरात सगळेजण होते. दादा काँप्युटरवर बसला होता. शेजारी आबा काही न बोलता शांतपणे तो काय करतोय ते बघत होते. त्याने नेहमीप्रमाणे मेलबॉक्स उघडला, तसंच याहूवरही तो ऑनलाईन गेला. त्याच्या मित्रांशी चॅट सुरू केलं. खरंतर पटकन जेवण संपवून मला काँप्युटरचा ताबा घ्यायचा होता. पण गारेगार ताक पिण्याचा नादात दादाने काँप्युटर पटकावला.
आबा अचानक म्हणाले "बरंय रे आता, एखाद्याशी संवाद साधायला किती माध्यमं आहेत! फोन आहे, झालंच तर तुमचं चॅटिंग आहे, शिवाय फॅक्स आहे, ईमेल आहेत एखाद्याशी बोलणं आता फारच सोपं झालं आहे"
"तुमच्यावेळी कसं होतं हो आबा?"
तसंही दादा मला काँप्युटरवर बसू देणार नव्हताच तेव्हा एक डोळा तिथे ठेऊन आबांशीच गप्पा मारत बसलो.
"आमच्यावेळी तर मुळात टेलिफोनच नव्हते. मग हे इंटरनेट, आणि फॅक्स कसले येताहेत."
"मग तुम्हाला एखादा मेसेज फास्ट पोचवायचा असेल तर काय करायचात"
"साधारणत:  पत्र पाठवून खुशाली विचारणं होत असे. पण लगेच संपर्क साधायचा असला तर तार करावी लागे"
"तार म्हणजे"
"म्हणजे टेलीग्राम"
"हे काय असतं? हल्ली कुठे येते तार? आणि तार म्हणजे तारेवर मेसेज लिहायचे? मग ते वाचत कसे येणार? आणि ति तार मेसेज लवकर कसा पाठवणार?"
"अरे हो.. हो.. हो.. किती प्रश्न विचारशील! सांगतो." असं म्हणून आजोबा जरा बाहेर गेले.
तसा मी हुशार आहे! मी दादाला म्हटलं.."दादा, आबा काहीतरी तारेचं सांगताहेत. नेटवर काहीतरी मिळेल. तुझं झालं की लगेच सांग"
दादा  तर माझ्यापेक्षाही हुशार आहे. म्हणाला "ये इथे शोधू आपण मग करतो मी माझं काम"
इतक्यात आबा आले. मग मी परत काँप्युटर मिळवायचा नाद सोडला. नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे एक फोटो होताच.

 

हे तारयंत्र. तार म्हणजे "वायर". हे यंत्र म्हणण्यापेक्षा बटण किंवा स्वीच म्हण हवंतर. हे यंत्र वायरच्या एका बाजूला असतं तर बीपर किंवा ध्वनीयंत्र दुसर्‍या बाजूला असा सेटअप असायचा. माझ्या वडिलांच्या म्हणजे तुझ्या पणजोबांच्या काळात तर तार म्हणजे खरोखरच्या तारा असायच्या. पुढे रेडियोचा शोध लागल्यावर रेडियो टेलीग्राफि चालू झाली आणि संदेश वायर शिवाय येऊ लागला. पण एकदा "तार" नाव पडलं की पडलं! "
"पण मग वायर मधून सिग्नल कसा पाठवायचे?"
"हा तारेचा स्वीच विशिष्ट क्रमाने दाबला की विशिष्ट अक्षर समजले जाते. या मान्यताप्राप्त लिपि म्हणजे कोडला मोर्स कोड म्हणतात. आपल्याकडे नोकियाचा जुना हँडसेट आहे बघ. त्यात एस्.एम्.एस्. आल्यावर कसा आवाज येतो."
तसा मी हुशार आहे लगेच आवाज काढून दाखवला "बिप् बिप् बिप्.... बीऽऽप बीऽऽप.. बिप् बिप् बिप्"
"बरोबर!! यातल्या कमी वेळ चालणार्‍या बिप् ला डिट् अथवा डॉट् म्हणतात. तर दीर्घ म्हणजे जास्त वेळ आवाज होणार्‍या बीऽऽप ला डाह् अथवा डॅश म्हणतात. मोर्स कोड मध्ये एस् हे इंग्रजी अक्षर '...' अश्या तीन डॉट् ने मिळून बनले आहे तर एम् म्हणजे '__' दोन डाह्. म्हणून एस्.एम्.एस् म्हणजे ..?!?"
"डॉट् डॉट् डॉट्  डाह् डाह्  डॉट् डॉट् डॉट्"
"शाबास!"
"पण मग हे आवाज कसे काय पाठवत असत?"
"ते सोपं आहे.  आता तू दारावरचं बटण दाबलं की काय होतं?"
"घरात बेल वाजते आणि आपल्याला कळतं की बाहेर कोणीतरी आहे"
"तसंच हे ही. फक्त बेल कशी वाजवतो त्याचा मोर्स कोडने क्रम ठरवला आहे. म्हणजे जर तीनदा पटापट बेल वाजवली तर एस् .. तीच दोनदा दीर्घकाळ वाजवली तर एम् असं"
"मग तेव्हा दूरवरून मेसेज पाठवायला वायर्स टाकल्या होत्या."
"हो असं दिसतंय.. " दादा एकदम म्हणाला. म्हणजे तो ऐकत होता तर! "हे बघ. विकिपीडियावर १८९१ ला जगात अश्या वायर्स कुठे कुठे होत्या ते दाखवलं आहे. पुढे रेडियो आल्यावरही सिग्नल्स मोर्स कोडनेच पाठवत फक्त तारेच्या ऐवजी 'बिनतारी' संदेश असे म्हणत. नंतर हा कोड ऐकून मग संदेश बनवण्या ऐवजी डायरेक्ट कोडचा अर्थ छापणारी मशीन्स आली"

आबा परत सांगु लागले. "पण कधी कधी संदेश पाठवणारा जरा चुकला तरी फार मजा येत असे. असो. हा मोर्स कोड अजूनही काही जागी वापरला जातो. आता तो कसा हे मात्र तू नेटवर शोध. बघू मिळतंय का"
"हा कोड सद्ध्या शिकला येईल  का हो!" दादाने विचारले. त्याला भलती हौस असते सगळ्याची.
"हो येईल की. जगात अनेक क्लब्स आहेत. आपल्याकडेही ठाण्याला हॅम क्लब आहे. तिथे हा कोड शिकता येईल. तो तुमचा हॅम सेट म्हणजे तार यंत्र बनवायला मदत करतं शिवाय जगभरातील हॅम रेडियो धारकांशी संवाद साधू शकतोस तेही चकटफू"
"ग्रेट!" असं म्हणून दादा जरा बाहेर गेला.
मी लगेच काँप्युटरचा ताबा मिळवला आणि गेम्स सुरू केले!!

----------------
संदर्भः
१. माहिती: विकीपिडिया आणि हॅम रेडियो क्लब, ठाणे यांच्या तर्फे आलेल्या व्याख्यात्याकडून २ वर्षापूर्वी मिळालेली माहिती
२. चित्रे: विकीपिडिया