आजी - आजोबांच्या वस्तु - ७ (पतंग आणि मांजा)

काल आई "तिळगुळाचे लाडू बनवायला हवेत" असं आजीशी बोलताना म्हणाली. तसा मी हुशार आहेच, लगेच ओळखलं की संक्रांत जवळ येते आहे. मी कालच शाळेत ओमशी बोललो. आमच्यापुढे एक मोठा प्रश्न होता. गेल्यावर्षी आम्ही ओमकडे पतंग उडवायला गेलो होतो. हल्ली त्याचा दादा आमच्याशी खेळत नाही. तो म्हणतो की आता तो मोठा आहे आणि त्याचे मित्र पण मोठे आहेत. पतंग तो त्यांच्याबरोबर उडवणार. मग यंदाच्या पतंगाचं काय?
मी एकदम सॅड होऊन बसलो होतो. आजोबा कुठुनसे आले.
"काय रे! आता संध्याकाळ होईल.. तू घरी कसा?"
"असंच"
"असंच कसं? काहीतरी झालं असणार. भांडलास का कोणाशी? का मारामारी केलीस? का कोणी काही बोललं का?"
"नाही"
"मग?"
"मग काय? मला पतंग उडवायचाय"
"हात्तिच्या एवढंच ना. उडवूयात की आपण"
"खरंच?!?"
"हो त्यात काय."
"चला मग जाऊया आता पतंग आणायला"
"आता? अरे अजून ४-५ दिवस आहेत. आपण असं करूयात का घरी बनवून बघायचा का पतंग?"
"घरी येतो बनवता?"
"होऽ येतो की एकदम सोपं आहे. जा हे पैसे घे आणि सोसायटीच्या दुकानातून पतंगाचा कागद घेऊन ये. आणि बाहेर रस्त्यावर जायचं नाही! नसेल त्या दुकानात तर सरळ घरी ये!!"
मी धावत गेलो आणि पळत आलो. मस्त लाल लाल कागद घेऊन आलो. घरी येऊन बधतो तर आबा खराटा घेऊन बसले होते. म्हटलं
"हे काय आता पतंग करायचाय ना तुम्ही सफाई काय करताय?"
"नाही रे! आपल्या पतंगासाठीच काठी शोधत होतो. पण खराट्याची नाही चालणार. फारच तकलादू आहे"
मग आबाच खाली गेले आणि मजबूत पण फ्लेक्झिबल काठ्या घेऊन आले. म्हणाले "गोळेवाल्याकडून घेऊन आलो त्याने अजून तुकडे केले नव्हते" मग आबांनी एक काठी फूटभर लांबीची घेतली आणि दुसरी काठीही तितक्याच लांबीची करून घेतली. दोन्ही काठ्या सारख्याच जाड होत्या. आता त्यांनी एका काठीचा मध्य शोधला आणि ती काठी दुसऱ्या काठीवर आडवी ठेवली. मग त्यांना उभ्या काठीच्या उंचीचा डायमंड शेप पतंगाच्या कागदातून कापून घेतला. पुढची चित्र बघा म्हणजे नीट कळेल.

"आता हा पतंग झाला तयार. त्याला कन्नी बांधायची आहे. "
"कन्नी?"
"हो अरे मांजा सरळ पतंगाला गुंडाळत नाहीत त्याला कन्नी बांधावी लागते. ही कन्नी पतंगाला दोन बाजूंनी तोलते ज्यामुळे तो वाऱ्यावर तरंगतो."
मग आबांनी एका साधा दोरा पतंगाला बांधला (शेवटच्या आकृत्या). त्यासाठी आडव्या काठीच्या वर आणि आडव्या काठीखाली त्याच्या दुप्पट अंतरावर  भोकं पाडली.
"आता मांजा आणायला जायचं?"
"मांजा कशाला आणायचाय तोपण बनवू यात चल!"
"तो कसा काय बनवणार?"
"जा आईला खळ करायला सांग. मी तो पर्यंत लांब दोऱ्याच गुंडा घेऊन आलो."
इतक्यात आई म्हणाली "अहो आबा, स्टार्च नाही आहे घरी खळ कशी बनवणार?"
"हो का! ठीक आहे स्टार्च पण घेऊन आलो."
आबा स्टार्च आणि दोरा घेऊन आले. स्टार्च पाण्यात शिजवून त्याची खळ तयार केली. खळ तयार होत असताना एका प्लॅस्टिकच्या भांड्याला बाजूने दोन भोकं समोरासमोर पाडली. मग दोरा त्या भोकांतून काढला. शिवाय एक जुनी काचेची बाटली फोडली आणि पाटा वरवंट्याखाली काचेचा रवाळ चुरा केला.
"चल आता गच्चीत. मांजा सुकेलही पटापट आणि घरी तसंही इतकी जागा नाही आहे."
गच्चीवर गेल्यावर त्यांनी एका ओल्या फडक्यावर थोडी काच पावडर ओतली.

मग त्या दोन भोकं आणि त्यातून दोरा असलेल्या भांड्यात खळ ओतली. आणि दोरा हळूहळू खेचू लागले त्याच वेळी दुसऱ्या बाजूला काचेच्या फडक्यातून दोरा काढत त्यामुळे तो काचेचा चुरा त्या खळीला आणि दोऱ्याला चिकटे. मी तो दोरा घेऊन पुढे जात होतो आणि सुकला की रिळाला गुंडाळत होतो. काय मस्त झालेला मांजा एकदम कडक आणि धारधार!!
मला आता आबा पतंग उडवायला पण शिकवणार आहेत. शिवाय पतंगोत्सव कुठे कुठे होतो, चीनमधले ड्रॅगनचे पतंग, वेगवेगळ्या आकारातले पतंग शिवाय पतंगांची गाणी सगळं काही नेटवर मिळेल असं आबा म्हणाले तेही शोधायचंय. तुम्हीही शोधाच. फक्त जर मांजा घरी बनवणार असाल तर कोणीतरी मोठं माणूस घरी असेल तरच बनवा. हॅपी संक्रांती! तिळगूळ घ्या गोड बोला!!