ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग १ ) प्रकरण ४ फलज्योतिषाच्या विविध पद्धती

३८) मेदिनीय ज्योतिष काय प्रकार आहे?
मेदिनीय ज्योतिष म्हणजे देश, प्रांत यांचे भवितव्य सांगणारी ज्योतिष शाखा. यात हवामान, राजकीय बदल, सामाजिक स्थित्यंतरे, सृष्टी-चमत्कार, क्रांती, भूकंप, युद्धे, दंगली इ. गोष्टींचा मागोवा घेतात. यात देश, प्रांत, शहर, राजकीय पक्ष यांना सुद्धा राशी बहाल केल्या आहेत. यात पानशेतच्या धरणफुटीची कुंडली, मंत्रीमंडळाच्या शपथविधीची कुंडली, वास्तुप्रवेशाची कुंडली इ. बाबींचा सामावेश असतो.

३९) राजकीय भाकिते कशी वर्तवली जातात?
मेदिनीय ज्योतिषाच्या आधारेच ही भाकिते वर्तवली जातात. उदा. आधुनिक भारताची रास मकर आहे. आता ही सुद्धा कशी? १ नोव्हे.१८५८ रोजी इंग्लंडच्या ईस्ट इंडिया कंपनीचे भारतावरील वर्चस्व संपून राणीच्या राजसत्तेचे वर्चस्व चालू झाले. या अर्थाने आधुनिक भारताचा जन्म झाला. मग अगोदर भारत नव्हता का? हा प्रश्न इथे निरर्थक आहे. भारताचे भाकीत वर्तवताना आधुनिक भारताची पत्रिका, १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला म्हणून स्वतंत्र भारताची पत्रिका, २६ जाने १९५० ला भारत प्रजासत्ताक झाला म्हणून ती पत्रिका, सत्तेवर असलेल्या पक्षाची पत्रिका, पंतप्रधानांची पत्रिका वगैरे अनेक पत्रिका विचारात घेवून भाकीत वर्तवले जाते. कॉंग्रेसची पत्रिका कुठली तर २८ डिसेंबर १८८५ म्हणजे पक्षस्थापनेची. त्यानंतर भारत स्वतंत्र झाला कॉंग्रेसमध्ये विभाजन होत गेले तरी पत्रिका तीच. पोर्तुगीजांनी ब्रिटीशांना मुंबई बेट आंदण म्हणून दिले ती मुंबईची पत्रिका. असे प्रातांचे जन्म धरून त्यांच्या पत्रिका तयार केल्या आहेत. इंदिरा गांधी १९७७ ची निवडणूक हरल्या कारण त्यांनी अमावस्येला फॉर्म भरला होता असं अजंता जैन या राजकीय भाकीत वर्तवणाऱ्या ज्योतिषाने सांगितले होते. १९९१ च्या निवडणूका व राजीव गांधींची हत्या ही कोणालाही सांगता आली नाही. बहुसंख्य ज्योतिषांनी राजीव गांधींच पंतप्रधान होणार असे सांगितले होते. ( पहा साप्ताहिक सकाळ २७ एप्रिल १९९१. व इलस्ट्रेटेड विकली २५-३१ मे १९९१) एकंदरीत राजकीय भाकितांची भाषा बघता राजकीय अंदाजच फलज्योतिषाच्या आवरणातून भाकीत म्हणून सांगितले जातात. 'सरकारला फारच दिव्यातून जावे लागेल` 'मंत्रिमंडळाचा एकोपा राखणे हीच एक बाब पंतप्रधानांची डोकेदुखी असेल` 'सरकार अस्थिर राहील.` 'देशात गंभीर स्वरुपाचे पेचप्रसंग उद्भवतील` 'अर्थिक परिस्थिती नाजूक होईल` 'धोका संभवतो जरा जपूनच` अशा संदिग्ध शब्दांची पेरण करीत बदलत्या राजकीय परिस्थितीचा मागोवा घेत भरमसाठ अंदाज लिहायचे व काहीही झाले तरी आम्ही याचे भाकित अगोदरच वर्तवले होते. समजा नाही तसं काही झालं तर आहेच गाजराची पुंगी! वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. पत्रिके वरून कुठल्या पक्षाला किती सीट मिळतील हे सांगण्यापर्यंत ज्योतिषांची मजल गेली. तसेही एक्जीट पोल, ओपिनियन पोल वगैरे अंदाज घेण्याचे प्रकार असतातच की. मग तुम्ही पण सांगू शकता की भाकीत. अं हं! तुम्ही आम्ही सांगतो तो अंदाज व ज्योतिषी सांगतो ते मात्र भाकीत.

४०) भूकंपाचे भाकीत वर्तवता येणे शक्य आहे काय?
हा पण मेदिनीय ज्योतिषाचाच प्रकार. कोयनेच्या भूकंपापासून अशा भाकितांची चलतीच झाली. सूर्यचंद्र ग्रहणे व ग्रहयोग यांचा पत्रिकेशी संबंध जोडून अशी भाकिते वर्तवतात. या बाबत ज्योतिषी कै. श्री.के. केळकर यांचा बराच गवगवा होता. कोयनेचा १९६७ चा भूकंप तारीखवार वर्तवला होता असे ते सांगत. त्याबाबतचा पुरावा म्हणून ते 'भारतज्योती` फ्री प्रेस २९ नोव्हे १९६७ चा लेखाचा संदर्भ देत. संदर्भ देउन एखादी गोष्ट सांगितली की लोकांचा विश्वास ठेवण्याचा कल वाढतो. एकतर तो संदर्भ सहज उपलब्ध नसतो व त्यांना तो तपासण्यची गरजही वाटत नाही. साहजिकच अशा गोष्टींचा बोलबाला होतो. आम्ही जेव्हा तो संदर्भ तपासून पाहिला त्यावेळी त्यात असे लिहीले होते, ' ....या सर्व गोष्टी अशा सूचित करतात की, हवामानात आत्यंतिक बदल होतील. वादळ, अतिवृष्टी, विजांचा कडकडाट, भूकंप यासारख्या घटना घडतील. वादळे किनारपट्टीवर होतील. वरील परिणामांची शक्यता २ नोव्हेंबर पूर्वीचा किंवा नंतरचा आठवडा किंवा डिसेबरचा दुसरा आठवडा किंवा कदाचित जाने ६८ मध्ये दिसेल.` ( मूळ इंग्रजी लेखातील वाक्यांचा मराठी अनुवाद ) आता यात कुठे तारीखवार, स्थलनिश्चिती आली. अत्यंत मोघम स्वरूपात लिहीलेले हे भाकीत लोकांच्या समोर अचूक भाकीत या सदरांत आले. दरवर्षी ७- ८ रिश्टरचे भूकंप चारपाच तरी होतात. बहुसंख्यवेळा ते समुद्रात होत असल्याने जीवित वा वित्तहानी होत नाही. पण केळकरांच्या थिअरीत ग्रहणांची दिप्ती आणि व्याप्ती एवढी मोठी आहे की कुठलाही भूकंप त्या तावडीत सापडतो. या बाबत भूकंपतज्ज्ञ सांगतात की, आधुनिक विज्ञानालाही अजून भूकंपाची अचूक पूर्वसूचना देता येत नाही. भूकंपप्रवण क्षेत्रे सांगता येतात. पण केव्हा होईल हे सांगता येत नाही. किल्लारीचा व गुजरातचा भूकंप कुणाला सांगता आला का? पण झाल्यानंतर हे कुणीतरी अगोदरच वर्तवले होते अशी उदाहरणे दरवेळी नंतर उगाळली जातात. एकूण काय भूकंपाचे भाकीत सुद्धा राजकीय भाकितासारखाच गोलमाल.

४१) भृगुसंहिता हा काय प्रकार आहे? भृगुसंहितेमध्ये जगातल्या सर्वांच्या कुंडल्या सापडतात कशा?
हजारो वर्षांपूर्वी त्रिकालज्ञ ऋषिमुनींनी हिमालयाच्या पायथ्याशी एकत्र येवून आपल्या दिव्य दृष्टीच्या सहायाने पृथ्वीवर जन्माला येणाऱ्या मानवजातीचे भविष्य पाहिले व ते भूर्जापत्रावर लोककल्याणार्थ लिहून ठेवले. त्यापैकी भृगु ऋषींनी जे लिहिले आहे ते भृगुसंहिता अशी भृगुसंहितेची कथा सांगितली जाते.
उत्तर भारतात अनेक लोकांकडे वेगवेगळया भृगुसंहिता आहेत. त्यावरुन ते भविष्यकथन करत असतात. आपल्याकडे ढवळे प्रकाशनने सुबोध भृगूसंहिता नावाचा खंड प्रकाशित केला. त्यामुळे भृगूसंहिता मराठी लोकांपर्यंत पोहोचली. यात सन १९०१ ते २००० या शंभर वर्षात जन्माला आलेल्या लोकांच्या कुंडल्या आहेत. खरं तर ती कुंडली नव्हेच तो कुंडलीसदृश आराखडा असतो. कारण तिच्यात चंद्र दाखवलेलाच नसतो. तसेच मेष रास प्रथमस्थानात असे गृहीत धरून तो आराखडा बनविलेला असता.े असे एकूण ४८८६ आराखडे त्या कुंडली खंडात दिलेले आहेत. त्या सर्वांचे भाकित हे ३०० प्रकारच्या वर्णनात बसवून ते फलित खंडात दिलेले आहे. म्हणजे एका प्रकारचे वर्णन हे सरासरी १६ प्रकारच्या विविध आराखडयांना लागू होते. हे १६ आराखडे विविध कालखंडातील असणार हे उघड आहे. या विविध कालखंडात जन्मलेल्या कोटयावधी लोकांना ते भाकीत लागू. स्त्रियांसाठी स्त्री खंड अशाच प्रकारचा आहे. त्यात शंभर प्रकारची भाकिते वर्णन केलेली आहेत. यावरून आपल्या आता लक्षात आले असेल की भृगूसंहितेत कुणाचीही कुंडली सापडते म्हणजे काय प्रकार आहे.
भृगुसंहितेत सरासरी आठ ते दहा दिवसांच्या अवधीत जगात जन्माला येणा या प्रत्येक जातकाच्यासाठी एकच एक कुंडली असते. तसल्या अपु या कुंडलीवरून वर्तवलेले भविष्य हजारो जातकांना बरोबर लागू पडते असे श्रद्धाळू लोक मानतात. जगभरातले लोक जसे बारा राशीत विभागले आहेत तसाच काहीसा हा प्रकार आहे.
चिं.वि. वैद्य १९२१ साली जुलै च्या 'चित्रमय जगत` अंकातील 'फलज्योतिषाचे निष्फळत्व` या लेखात लिहितात - म. गांधींची कुंडली एका राजकीय चळवळीतल्या सुशिक्षिताने भृगूसंहितेतून मिळवून आणली. त्याने असे सांगितले, ''त्यात असे सापडले की हिंदुस्थानास स्वराज्य १९२१ साली जरी मिळाले नाही तरी १९२५ साली मिळेल आणि महात्मा गांधी हे पहिले प्रेसिडेंट होतील, परंतु ते ती जागा पत्करणार नाहीत.`` वगैरे. तेव्हा मला मोठे आश्चर्य वाटले. भृगूसंहिता अमुक वर्षी हिंदुस्थानास स्वातंत्रय मिळणार म्हणून सांगणार आणि त्या प्रोत्साहनाने आमचे लोक स्वराज्याचा प्रयत्न करणार! भृगूसंहिता हे एक प्रचण्ड थोतांड असून त्याचा आमच्या सुशिक्षित आणि कर्तव्यदक्ष मंडळींवर अजून पगडा आहे हे आश्चर्य आहे.

कै. शं.बा.दिक्षित ( इ.स. १८९६ ) आपल्या ' भारतीय ज्योतिषशास्त्र अथवा भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास ` या ग्रंथात म्हणतात- भृगुसंहिता हा ग्रंथ प्राचीन नसावा. कारण त्याविषयीचा उल्लेख वराहमिहिर ( ७ वे शतक ) व भटोत्पल ( ९ वे शतक ) यांच्या ग्रंथात नाही. कुठलीही जन्मकुंडली यात सापडते असे मानले तर निरनिराळी लग्नराशी व भिन्न भिन्न स्थानगत ग्रह यांच्या मानाने ७,४६,४९,६०० कुंडल्या पाहिजेत. एकेका कुंडलीचे दहा दहा श्लोक जरी धरले तरी ७५ कोटी श्लेाक पाहिजेत. भृगुसंहितेचा काही भाग ज्यांच्यापाशी असेल ते प्रसंगवशात लबाडी करत असतील. म्हणजे एखाद्या मनुष्याची पत्रिका नवीन करुन ती भृगुसंहितोक्त म्हणून देत असतील.

४२) नाडी म्हणजे काय? नाडी भविष्य हा फलज्योतिषाचा प्रकार आहे का?
वैद्यकशास्त्रातल्या नाडीचा इथं काहीही संबंध नाही. ही एक कालमापक संज्ञा आहे. नाडी म्हणजे एका पळाचा अवधी. एक पळ म्हणजे २४ सेकंद. एका अहोरात्रात, म्हणजे २४ तासात, ३६०० पळे बसतात. दरेक पळाचे भाकीत कुणी वर्तवल्यास एका दिवसाची ३६०० भाकिते तयार होतील. तिकडे आकाशात राशी-चक्राचे जे ३६० अंश असतात त्यांचे प्रत्येकी १० विभाग केल्यास ३६०० विभाग होतात. एकेक विभाग पूर्वेस उगवून वर यायला एक पळ लागते. (३६०० पळात म्हणजे २४ तासात राशीचक्राची एक फेरी पुरी होते.) या ३६०० पळांच्या भाकितांची सांगड ३६०० राशी-विभागांशी घातलेली असते. मेष राशीच्या पहिल्या अंशाचा पहिला एकदशांशावा भाग ज्या पळात उगवून वर येतो ते पळ पहिल्या क्रमांकाचे मानून त्याचे भाकीत एका पट्टीवर लिहायचे, व याप्रमाणे पुढे अनुक्रमाने ३६०० नाडी-पट्ट्या तयार करून ठेवायच्या. हे नाडी भविष्याचे भांडवल.
नाडी-ज्योतिष हा फलज्योतिषाचाच एक प्रकार असला तरी प्रचलित फलज्योतिषात आणि नाडीज्योतिषात एक मूलभूत फरक आहे. तो असा की फलज्योतिषातली भाकिते जन्माच्या वेळच्या संपूर्ण ग्रहस्थितीचा विचार करून वर्तवायची असतात, पण नाडीज्योतिषातली भाकिते राशीचक्राच्या कितव्या अंशाचा कितवा भाग जन्मवेळी उगवत होता याचा विचार करून पूर्वीच कुणीतरी वर्तवून ठेवलेली आहेत! म्हणजे, नाडी-ज्योतिष हे भृगुसंहितेप्रमाणेच जणू काही एखादे रेडीमेड भाकितांचे स्टोअरच आहे. भोंदूंनी फसवावे आणि दुधखुळ्यांनी फसावे या सहकारी तत्वावर ही रेडीमेड भाकितांची दुकाने जोरात चालत असतात.

४३) दक्षिण भारतात केवळ तुमच्या अंगठयाच्या ठशावरून काढलेल्या नाडीपट्टीत तुमचे नांव, तुमच्या बायकोचे नांव, तुमची कुंडली, तुमचा वर्तमान काळ, भूत, भविष्य सर्व काही सापडते ते कसे?
आता हे नाडीग्रंथ महाराष्ट्रातही आले आहेत. २०-२२ ठिकाणी ही नाडीकेंद्रे जोरात चालू आहेत. उपलब्ध माहितीनुसार गेल्या एक वर्षात दक्षिणेकडून आलेली अशी पाच केंद्रे पुण्यात कार्यान्वित झाली आहेत. प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी तेथे भेट दिली असता तेथील माहितीपत्रकानुसार अंगठयाचा ठसा वा पत्रिकेवरुन नाडी पटटी शोधून व्यक्तीचे नांव, आईवडिलांचे नांव, पति/पत्नी, व्यवसाय, भावंड, संतती इ. खुलासा केला जातो. नाडी पट्टीतील मजकुर हा कूट तामिळ लिपीत असतो असे सांगितले जाते. त्याअनुषंगाने ते हिंदीत प्रश्न विचारतात. नाडीपट्टी शोधण्यासाठी असे प्रश्न विचारावे लागतात असे नाडीवाचक सांगतात. सर्वांच्याच पट्टया सापडतात असे नाही असे नाडी केन्द्रात अगोदरच सांगितले जाते. पट्टी सापडल्यास वाचनाचे रूपये तीनशे आकारले जातात. ( हा रेट नाडी केंद्रानुसार बदलतो.)
माझी पत्नी मंजिरी ता. २३-२-२००१ रोजी श्री रिसबूड व श्री प्रकाश पेंडसे यांच्या समवेत पुण्यातल्या नाडी-केंद्रात गेली. तिने तिच्या अंगठयाचा ठसा, पूर्ण नाव व जन्मतारीख सांगितली पण जन्मवेळ मात्र माहीत नाही असे सांगितले. काही काळानतंर ज्योतिष्याने नाडी-बंडलातली एकेक पट्टी भराभर उलटत तिला बरेच प्रश्न विचारले. तिची रास धनू आहे हे दरम्यानच्या काळात तिच्या जन्मतारखेवरून पंचांगातून त्याने काढले असावे, म्हणून एक पट्टी समोर धरून व तिच्यात वाचल्यासारखे करून त्याने तिला विचारले की तुमची रास धनू आहे का ? मंजिरी म्हणाली की तिला माहीत नाही. श्री. रिसबूड शेजारीच बसले होते, त्यांनी त्याला विचारले की पट्टीवर धनू रास लिहिली आहे काय ? तो होय म्हणाला. त्यावर रिसबुडांनी म्हटले की मग त्या पट्टीत लग्न कोणते लिहिले आहे ते सांगा. तो जरासा घुटमळला व म्हणाला की ते आत्ता कळणार नाही, वो तो बाद मे आयेगा. आणखी काही प्रश्न विचारून झाल्यावर त्याने सांगितले की तुमची पट्टी सापडत नाही. हा त्याचा हुकुमी एक्का होता. पट्टी सापडत नाही असे म्हटले की खेळ खलास. पट्टी सापडली असे म्हणायची सोय नव्हती कारण जन्मवेळ दिलेली नसल्यामुळे लग्न-रास काढता येत नव्हती, ती काय सांगायची हा पेच त्याला पडला असता. त्यातून त्याने अशी सुटका करून घेतली.
मंजिरीच्या वडिलांचे नाव लक्ष्मण. ज्योतिष्याने अनेक प्रश्न विचारून ते नाव कसे काढून घेतले ते मंजिरीने समक्ष अनुभवले आहे. त्याने विचारलेले प्रश्न असे :- नाव तीन अक्षरी की दोन अक्षरी आहे ? नाव देवाचे आहे का ? ते नाव य र ल व यापैकी कोणत्या अक्षराने सुरू होते ? पहिल्या प्रश्नाचे उत्तर देतांना मधले अक्षर एकच समजायचे की दीड अक्षर समजायचे असा संभ्रम तिला पडला म्हणूने तीन अक्षरातले मधले अक्षर जोडाक्षर आहे असे तिने सांगितले. तिच्या वडलांचे नाव पट्टीत निघाले असे नंतर सांगायची तयारी त्याने केली असावी यात आम्हाला शंका नाही.
नाडी-पट्टीत कुंडलीची माहितीच कोरलेली नसावी असा तर्क वा संशय आम्ही वरील प्रयोगावरून बांधला. तो बरोबर आहे की नाही ते पहाण्यासाठी रिसबुडांनी इथल्या नाडी-केंद्राला एक पत्र पाठवले. त्यात संशोधनासाठी हा प्रयोग करण्याचे आवाहन केले होते. त्यात असे म्हटले होते की, आम्ही आपणास जन्मतारीख व वेळ सोडून व्यक्तीच्या ठशाबरोबर व्यक्तीचे नांव, व्यक्तीचे जन्मसाल, महिना, आठवडा, व्यक्तीच्या आईचे नांव, वडिलांचे नाव, पती/ पत्नीचे नांव, स्वत:चा व्यवसाय, शिक्षण, भावंडाची माहिती, संततीची माहिती देउ. सोबत सील केलेली कुंडली देउ. ठसा व माहितीवरून नाडीपटटीतील कुंडली केंद्राने शोधावी. ती जर सील केलेल्या कुंडलीशी जुळली तर आपल्या नेहमीच्या फीच्या दुप्पट फी आम्ही देउ. हा प्रयोग दि.१३ एप्रिल २००१ रोजी सायंकाळी करण्याचे ठरले. प्रत्यक्ष प्रयोगात तुमची माहिती तुमच्या जवळच ठेवा आम्हाला तिची गरज नाही असे सांगून तुमचे फक्त ठसे आम्ही घेतो असे सांगितले. आम्ही तिघांचेही ठसे त्याला दिले. आता पट्टी सापडेपर्यंत थांबा असे त्याने आम्हाला सांगितले. दरम्यानच्या काळात मुंबईहून आलेल्या एका दांपत्याची नाडीपट्टीही सापडली व नाडीवाचनही झाले. अर्ध्या तासानंतर तुम्हा तिघांच्याही नाडी पट्टया या केंद्रात नाहीत. आम्ही त्या मद्र्रासवरुन मागवून घेउ व तुम्हाला फोन करु असे सांगून आम्हास वाटेला लावले. त्यानंतर आजतागायत अनेकदा फोन करुनही आमच्या पट्टया सापडल्या नाहीत यावरुन सूज्ञ वाचक काय ते समजून घेतील.

४४) नॉस्टॅ्रडॅमस ने जगातील महत्वाच्या घडामोडींची भाकिते पूर्वीच वर्तवून ठेवली आहेत. त्यात भारत हे हिंदू राष्ट्र म्हणून जगभरात बलशाली राष्ट्र होईल असे म्हटले आहे. ते खरे आहे का?
नॉस्ट्राडॅमस हा सोळाव्या शतकात होउन गेलेला फ्रेंच ज्योतिषी. खरंतर तो वैद्यकी करणारा होता. त्याने सेन्च्यूरीज नावाचा लॅटिन फ्रेंच अशा किचकट भाषेतला काव्यमय ग्रंथ लिहीला. शंभर कडव्यांचे एक शतक अशी दहा शतके त्याने लिहीली. ही कडवी म्हणजे आपल्याकडचा चारोळी हा जसा काव्यप्रकार आहे अगदी तस्सा. जगभरात नॉस्ट्राडॅमस पोहोचला तो एरिका चितम च्या 'प्रोफसिज ऑफ नॉस्ट्राडॅमस` या बेस्ट सेलर पुस्तकामुळे. याच्या अनेक आवृत्त्या अल्पावधीत निघाल्या. त्यात नॉस्ट्राडॅमसचे मूळ श्लोक वा कडवी व त्याचा इंग्रजी अनुवाद. आपल्याकडे नॉस्ट्राडॅमस लोकप्रिय झाला तो जी एम हिरण्यप्पामुळे. त्याने नॉस्ट्राडॅमसच्या भाकितांचे अर्थ काढले ते असे:- ''भारत हिंदू राष्ट्र म्हणून उदय पावणार. दक्षिणेतून भारताला असा नेता लाभणार की जो भारताला अध्यात्मिक प्रकाश देईल. १९९४ मध्ये भारत हे जगात बलशाली राष्ट्र म्हणून मान्यता पावेल. १९९८ मध्ये तिसरे महायुद्ध होईल ते सात वर्षे चालेल. २०२६ पर्यंत त्याचे पडसाद उमटतील. त्यानंतर हजार वर्षे मानवजातीला सुखाची आहेत.`` ही वर्ष पुढे वाढवता येतात व घटनाही बदलता येतात.
मुळात नॉस्ट्राडॅमसने जे लिहीलय ते पद्यात व संदिग्ध भाषेत त्यामुळे त्याचे हवे तसे अर्थ काढले जातात. एकाच श्लोकाचे अर्थ वेगवेगळया घटनांशी जोडले गेले आहेत. भाकितातून व्यक्त होणाऱ्या घटनांचे काळ, वेळ, ठिकाणं काहीही दिलेले नाही. नॉस्ट्राडॅमसचे समर्थक मात्र म्हणतात की हे त्याने जाणीवपूर्वक गूढ व संदिग्ध भाषेत लिहीले होते. कारण श्लोकानुसार भाकीत खरे ठरते असे जर चर्चच्या लक्षात आले असते तर त्यावर सैतानाच्या जादूचा प्रकार म्हणून खटला भरला असता. ऑगस्ट १९९० मध्ये जेव्हा आखाती युद्ध झाल तोपर्यंतच्या आवृत्त्यांमध्ये त्याचा उल्लेख नव्हता. नंतरच्या आवृत्त्यामध्ये मात्र त्याचे उल्लेख येवून हे नॉस्ट्राडॅमसने अगोदरच सांगितले होते असे सांगितले जाउ लागले. ११ सप्टेम्बर २००१ ला न्यूर्यार्कला वर्ल्ड ट्रेड सेंटरवर जो विमान हल्ला झाला तोही नॉस्ट्रडॅमसने सांगितला होता असे नॉस्ट्रॅडॅमसचे समर्थक म्हणू लागले. त्यावर वर्तमानपत्रात लगेच चौकटी, रकाने भरुन मजकूर वाहू लागला. एरिका चितमने जे श्लोक संदर्भ निरो व फ्रेंच राज्यक्रांतीसाठी दिले तेच संदर्भ हिरण्यप्पाने नेहरु व भारताच्या फाळणीसाठी दिले. जिथं त्यांची राणी एलिझाबेथ होती तिथ आपल्या इंदिरा गांधी आल्या. नॉस्ट्राडॅमसचे हिरण्यप्पाने आपल्या सोयीनुसार भारतीयीकरण करून टाकले.
अदभुत, गूढ गोष्टी माणसाला गुंगवून टाकतात. अशा गोष्टी सनसनाटी झाल्या की त्या माणसाला भुरळ पाडतात. त्यामुळे या बाबी निरर्थक ठरल्या तरी त्यांची लोकप्रियता कमी होत नाही. सर्वसामान्य माणसाचा कल अशा अद्भूत व गूढ गोष्टींवर विश्वास ठेवण्याकडे असतो.

४५) लोकमान्य टिळक यांचा ज्योतिषाचा चांगला अभ्यास असून त्यांचा त्यावर विश्वास होता असे म्हणतात ते खरे का?
लोकमान्य टिळकांचा ज्योतिर्गणिताचा अभ्यास होता. फलज्योतिषाचा नव्हे. त्या अनुषंगाने त्यांनी ओरायन व आर्क्टिक्ट होम इन वेदाज असे दोन ग्रंथ ही लिहिले आहेत. या ग्रंथात त्यांनी ज्योर्तिगणिताधारे आर्यांच्या मूळ वसतिस्थानाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पंचांगातील गणितात एकवाक्यता यावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले. रेवती नक्षत्रातील झीटा ताऱ्यापासून राशीचक्राचा आरंभ मानावा असे मानणाऱ्या गटाला त्यांनी मान्यता दिली होती. त्यामुळे त्या गणिताने निर्माण झालेल्या पंचांगाला टिळक पंचांग असे संबोधण्यात येते. वस्तुत: ते टिळकांनी निर्माण केलेले नव्हे. ते केरूनाना छत्रे व आबासाहेब पटवर्धन यांनी शुद्ध पंचांग म्हणून तयार केले होते. टिळकांना या विषयात रस होता. टिळकांनी आपल्या भविष्याला मान्यता द्यावी असे काही ज्योतिषांना वाटे. त्यावेळी महाडकर नावाचे ज्योतिषी चेहरा पाहून तंतोतंत कुंडली मांडत व अदभूत भाकिते सांगत अशी त्यांची ख्याती होती. टिळकांना अमूकवेळा शिक्षा झाल्या हे महाडकरांनी अचूक सांगितले होते असे काही वर्तमानपत्रात आले होते. त्याच्या खरेपणा विषयी खुद्द टिळकांनाचा विचारले असता ते म्हणाले, '' वर्तमानपत्रातील बातमी खोटी आहे. महाडकर ज्योतिषांना या वर्षी काय घडणार ते सांगा असे विचारीत असे. परंतु त्यांनी सांगितलेल्या गोष्टी अनुभवास न आल्याने मी त्यांना विचारणे सोडून दिले.`` टिळकांचे विश्वनाथ नावाचे चिरंजीव त्या वर्षी प्लेगने वारले. ते कुठल्याही ज्योतिषाला सांगता आले नाही. (संदर्भ :- लो.टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका, खंड दुसरा, संग्राहक - सदाशिव विनायक बापट, सन १९२५) टिळकांना या विषयात रस असल्याने समर्थकांनी टिळकांचा विश्वास फलज्योतिषाला चिकटवला. टिळक हे कर्मवादी होते. ज्योतिषांनी भाकीत सांगितल्यानंतर टिळक म्हणत, 'ठीक आहे! ग्रहांना ग्रहांचे काम करू द्यात. मला माझे..`

४६) वास्तूज्योतिष हा काय प्रकार आहे?

वास्तूशास्त्रात घुसलेले ज्योतिष याला वास्तूज्योतिष असे म्हणणे वावगे ठरु नये. विशिष्ट वेळ ही एखाद्या व्यक्तिला अनुकूल वा प्रतिकूल आहे हे जसे मुहूर्त प्रकारात पाहिले जाते. तसे विशिष्ट वास्तू ही त्या व्यक्तिला अनुकूल वा प्रतिकूल आहे का? हे वास्तूशास्त्रात बघितले जाते. हे अनुकूलत्व वा प्रतिकूलत्व हे शुभाशुभत्व कल्पनेशी जोडले आहे. ज्योतिषशास्त्रात वास्तूशांत, मुहूर्त, बाधित वास्तू यांचा विचार केला आहे. दिशांचे कारकत्व हे राशींनाही दिले आहेे. दिशांचे ग्रहाधिपती आहेत. मानवी जीवनावर ग्रहांप्रमाणे गृहाचाही प्रभाव पडत असतो असे वास्तूशास्त्रात मानले गेले आहे. अशा रितीने वास्तूशास्त्र व ज्योतिषशास्त्र यांची सांगड घातली आहे. जन्मकालीन ग्रहयोग बदलणे आपल्या हातात नसते परंतु वास्तू निवडणे आपल्या हातात असते. वास्तू शास्त्रानुसार जर वास्तू 'शास्त्रोक्त` असेल तर त्या वास्तूत राहणाऱ्यांचे आरोग्य, संतती, संपत्ती, यावर त्याचा शुभ परिणाम होतेा व तसे नसेल तर अशुभ परिणाम होतो. वास्तू शास्त्रानुसार वास्तु कितीही शास्त्रशुद्ध असेल परंतु त्यात राहणाऱ्या व्यक्तिच्या कुंडलीतच जर वास्तुसौख्याचा योग नसेल तर काय उपयोग? आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? त्यामुळे काही वास्तुज्योतिषी अशी जाहिरात करतात, आम्ही वास्तू शास्त्रही जाणतो व फलज्योतिषही जाणतो. त्यामुळे तुम्ही आमच्या कडे या. तुमच्या पत्रिकेत वास्तुसौख्याचा योग असेल तर आम्ही तुम्हाला योग्य ते अनुकूल बदल वास्तूत करुन देतो. विनाकारण खर्चात पाडत नाही. फलज्योतिषात ग्रहांची शांती करुन त्यांना अनुकूल करुन घेता येते तसे वास्तूशास्त्रात वास्तुशास्त्रानुसार अनुरुप बदल करुन, वास्तुशांती करुन वास्तू अनुकूल करुन घेता येते. एकूण काय व्यक्तिच्या आयुष्यातील सुखदु:खाच्या घटनांचा संबंध कधी ग्रहयोगांशी जोडला जातो तर कधी वास्तूशी जोडला जातो.

Comments

वा! उत्तम लेखन

तुमच्या या पुस्तकातील माहिती माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला इतकी उपयुक्त आहे की ते पुस्तकच विकत घेण्याचे मी ठरवले आहे.
कुठे मिळेल?
फार मोठे काम केले तुम्ही. लेखमाला उत्तमच. चालू द्या.

बापरे!

घाटपांडे साहेब, लेख एकदम खासा आहे. सर्किटरावांनी वाचावा अशी त्यांना विनंती. त्यांची उपक्रमींच्या न लिहिण्याविषयीची तक्रार बंद होईल.

पुढचे भाग येऊ द्या. वाचायला उत्सुक आहोत.

आपला,
(प्रभावित) भास्कर
आम्ही येथे वसतो.

मागील भाग पण वाचा

http://mr.upakram.org/node/777 हे नवीन वाचकांनी प्रथम वाचावे. फलज्योतिष हा विषय हा तसा अघळपघळ आहे. काही मुद्द्यांची पुनरावृत्ती आढळल्यास ती काही वाचकांची सोय आहे असे मी मानतो. विशेष करुन ज्यांना अनुक्रमे वा शिस्तबद्ध पद्धतीने वाचन करता येणे शक्य नाही त्यांच्या साठी. वाचायला सुरुवात कुठुनही करा.

घाटपांडे साहेब, लेख एकदम खासा आहे. सर्किटरावांनी वाचावा अशी त्यांना विनंती.

http://mr.upakram.org/node/276#comment-3440 हे उत्तर वाचा. तेव्हा मला टंकन अजिबात येत नव्हते.
पण त्यानंतर सर्किट रावांनी दिलेले प्रोत्साहन देखील विसरता कामा नये. मला आजही उपक्रमपंत ज्यांच्या मुळे ही लेखमाला आपण वाचू शकता ते कोण आहेत ते मला खरच माहित नाही. हे पुस्तक लेखमाला स्वरुपात येण्यात गुंडोपंत, सर्किटराव यांचा मोठा वाटा आहे. एखादी गोष्ट मुक्त आणी फुकट उपलब्ध झाली तर त्याचे मूल्य कमी होते , शिवाय त्यातील मजकुराची चोरी होते. असा प्रेमळ सल्ला खुप लोकांनी मला दिला. पण मग मी विचार केला कि रुपांतर सारख्या फुकट असणार्‍या तंत्रप्रणालीमुळेच मला युनिकोड कन्वर्जन शक्य झाले आहे. अन्यथा पुन्हा ते टंकित करावे लागले असते. मग लोकांना आपण ते फुकट का उपलब्ध करुन देउ नये. याचे ईबुकमध्ये रुपांतर करण्याचे काम राज जैन यांचेकडे आहे.हिंदी आवृत्ती सुरेश चिपळुनकर करणार आहेत. प्रिंट आवृत्ती वाचणारा वर्ग वेगळा आहे. इथला वाचकवर्ग निराळा आहे. अपवाद असतील पण फार थोडे. समजा चोरी जरी झाली तरी त्याचा "प्रसार" च होणार आहे. चोरी होउ शकेल असे आपल्याकडे काहीतरी आहे हा 'इगो' मला देखील सुखावणाराच आहे. राहिला प्रश्न श्रेयाचा. त्याचे माझ्याकडे उत्तर नाही.

( अल्पसंतुष्टी, अल्पतंत्रज्ञानी)
प्रकाश घाटपांडे

 
^ वर