ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .... मनोगत

लेखकाचे मनोगत

''तू ज्योतिषाचा कोर्स कुठं केला?`` असा एक प्रश्न मला हमखास विचारला जातो. पण मी कुठंही कोर्स केला नाही. हे सांगितलं तर त्यांना पटत नाही. या विषयातले ग्रंथ,लेख, व्याख्यानं, चर्चासत्र, अधिवेशन आणि आपली शिकण्याची इच्छा हेच आमचे गुरु. या विषयांत मी जातक, विद्यार्थी, अभ्यासक, समर्थक, ज्योतिषी, चिकित्सक अशा सर्व पातळयांवर अनुभव घेतले.
भविष्याविषयी उत्कंठा असणं ही अत्यंत स्वाभाविक आहे. केवळ उत्कंठे साठी ज्योतिषाकडे येणारी माणसे कमी व अडचणीत आहे, संकटात आहे म्हणून मार्गदर्शनासाठी येणारी माणसेच जास्त. मनुष्य अडचणीत असला की चिकित्सा वगैरे असल्या भानगडीत तो पडत नाही. साहजिकच श्रद्धा हाच भाग मग जोपासला जातो. आपल्या धर्मामध्ये चिकित्सेला मोठी परंपरा आहे. फलज्योतिषात विविध मतप्रवाह आहेत. पण तरीही ज्योतिष विषयाला एक गूढ वलय प्राप्त झालेले आहे. तोडगे,यंत्र, मंत्रतंत्र, दैवी उपाय, सिद्धी, उपासना या गोष्टी ज्योतिषापासून वेगळया करता आलेल्या नाहीत.
ज्योतिषी आणि जातक यांच नातं हे आपल्याकडे डॉक्टर आणि रुग्णा सारखं आहे. तिथ अपेक्षा असते समीक्षा नसते. ज्योतिषाविषयी विविध क्षेत्रातल्या लोकांची मते अजमावण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. परिवर्तनवादी चळवळीतल्या लोकांना जेव्हा आपला ज्योतिषावर विश्वास आहे का? असा प्रश्न विचारतो तेव्हा तो त्यांना अडचणीचा वाटतो. '' आमचा तसा विश्वास नाही. पण .......`` '' आपला त्यातला काही अभ्यास नाही.`` पण त्या विषयाच्या अंतरंगात डोकवावे असे काही वाटत नाही. ज्योतिष हा विषय सोपा करुन सांगावा असं खूप दिवस मनात होतं. पण कितीही सोपं केलं तरी ते लोकांना अवघडच वाटत राहीलं. मग हा विषय लोकांच्याच मनातल्या प्रश्नांमधून मांडला तर? असं मनात आल्यावर त्या चष्म्यातून उत्तरे शोधू लागलो आणि या पुस्तकाचा जन्म झाला.
माझे जेष्ठ स्नेही श्री. माधव रिसबूड यांचेशी वेळोवेळी होणारी अनौपचारीक चर्चा हा तर या पुस्तकाचा पाया आहे. ग्रहांकित मासिकाचे संपादक मा. चंद्रकांतजी शेवाळे उर्फ दादा यांचेशी गप्पा मारताना त्यांनी मर्मावर अचूक बोट ठेवले. ते म्हणाले, '' सर्वसामान्य माणसाला ज्योतिषाकडे जावंस वाटाव अशीच इथली सामाजिक परिस्थिती आहे. ती जेव्हा बदलेल त्या वेळी ज्योतिषाकडे जाणारा वर्ग आपोआप कमी होईल.``
हे पुस्तक चिकित्सकांनी सर्वसामान्य माणसांच्या चष्म्यातून वाचावे, सर्वसामान्य माणसांनी चिकित्सकांच्या चष्म्यातून वाचावे आणि ज्योतिषांनी अंतर्मुख होउन वाचावे असं अपेक्षित आहे.

Comments

एक प्रश्न

हा प्रश्न थोडासा ढ वाटेल पण मला ही शंका फार पूर्वीपासून आहे.

तुम्ही अंनिसचे कार्यकर्ते असल्याने आणखीच गोंधळात पडते. ज्योतिष या विषयावर तुमचा विश्वास आहे का? आणि ते तुम्हाला कळतं असा तुमचा दावा आहे का?

प्रश्न गांभीर्याने विचारले आहेत. :)

माझा

ज्योतिष या विषयावर तुमचा विश्वास आहे का? आणि ते तुम्हाला कळतं असा तुमचा दावा आहे का?

माझा तरी विश्वास आहे बॉ!
शिवाय क्वचित प्रसंगी पाहिलेल्या पत्रिकांचे भाकित खरेही येत गेले आहे.
म्हणजे दरच वेळी येते असे नाही. पण मनाची बैठक जमलेली असली तर बरेचदा येते. यात जातकाच्या मनस्थितीचाही /विचारांचा/इच्छांचाही भाग असतो असे मी मानतो.

आपला
कुडमुड्या ज्योतिषी
गुंडोपंत

प्रातिनिधिक प्रश्न

असे अनेक प्रश्न मला पहिल्या आवृत्ती नंतर विचारले गेले. दुसर्‍या आवृत्तीच्या निमित्ताने...अशी एक भूमिका पोस्ट टाकतो आहे. त्यात काही उहापोह आहे. पुस्तकाचा मुक्तस्त्रोत करण्यासाठी तयारीत आहे. किंबहूनायुनिकोडमध्ये आता तयार आहे. ई बुक स्वरुपात करण्यासाठी राज जैन तयार आहेत. पुस्तक वाचल्यावर कदाचित हा प्रश्न आपल्याला पडणार नाही किंवा वेगळ्या पद्धतीने पडेल. उत्तर देण्याचा तेव्हा प्रयत्न करीन. पुस्तकातल्या अंतरंगाबाबत येथे पुर्वी आपण वाचले असेलच.
प्रकाश घाटपांडे

आपण भाग्यवान आहात

माझे जेष्ठ स्नेही श्री. माधव रिसबूड यांचेशी वेळोवेळी होणारी अनौपचारीक चर्चा तसेच
ग्रहांकित मासिकाचे संपादक मा. चंद्रकांतजी शेवाळे उर्फ दादा यांचेशी गप्पा मारताना
हे वाचून आपण भाग्यवान आहात हे मनात आले.
अशा लोकंना भेटणेही गुंडोपंतांना मोठे वाटते तेथे आपण त्यांच्याशी चर्चा करत.
आणी अशा या व्यासण्गी व्यक्तीमत्वाशी माझा जालावरून का होईना पण परिचय आहे या कल्पनेनेच मला धन्य वाटते आहे.

आपला
चाहता
गुंडोपंत

वाट पहात आहे...

घाटपांडे साहेब,
मला ही असंच वाटतं कि ज्योतिष वगैरे मधे काही तथ्य नाहीं, पण तुमच्या सारख्या अभ्यासू लोकांची पुस्तकं वाचली कि कदाचित हे मत बदलू ही शकतं...
ब‌र्‌याच ज्योतिषांचे भाकित खोटे ठरलेले पाहून आता ह्या पुस्तका बद्दल उत्कंठा वाढलेली आहे...
खगोल शास्त्र आणि ज्योतिष शास्त्र ह्या मधे काय गुंतागुंत आहे, हे ही कळेल, तसेच ज्योतिषा ला "विज्ञान" म्हणावं कां? कि ही विद्या (?) फ़क्त अनुमान आणि "लॉ ऑफ़ प्रोबेबिलिटी" वर काम करणांर एक गणित... हे ही कळेल...

सुरेश चिपळूणकर
http://sureshchiplunkar.blogspot.com

अभ्यास

मला ही असंच वाटतं कि ज्योतिष वगैरे मधे काही तथ्य नाहीं,
मला कल्पना नाही या विषयातला आपला अभ्यास किती आहे ते. पण आपण दहा वर्ष ज्योतिषाचा अभ्यास करून असे वाक्य लिहिलेत तर मी गांभीर्याने घेईन.

कदाचित हे मत बदलू ही शकतं...
ही शक्यता महत्वाची आहे.
कि ही विद्या (?) फ़क्त अनुमान आणि "लॉ ऑफ़ प्रोबेबिलिटी" वर काम करणांर एक गणित... हे ही कळेल...

ही गोष्ट तुमच्या अनुभवातून ठरवा. उगाच 'हा असं म्हणतो म्हणून' असे नको.
सिताफळाची गोडी कशी आहे हे ते खाणार्‍यालाच समजते. बाकीच्यांना ते गोड असते असे सांगता येते पण गोडवा कसा आहे ते मात्र चाखावाच लागतो तेंव्हा कळतो.

आपला
फळावर जराशी चोच मारलेला
गुंडोपंत

प्रति: अभ्यास

आपण दहा वर्ष ज्योतिषाचा अभ्यास करून असे वाक्य लिहिलेत तर मी गांभीर्याने घेईन.

२००७ च्या वाक्यावर २०१० मध्ये प्रतिक्रिया देतो आहे त्यामुळे कदाचित कोणी वाचणारेही उरले नसतील, परन्तु पी झी मेयर यांचा लेख तुमच्या युक्तिवादाला सडेतोड उत्तर आहे.

उत्सुकता

प्रकाशराव, तुमची पुस्तकलेखनामागची भूमिका वाचून पुस्तकाविषयी आणि त्यातील चिकित्सेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

आपला
(वाचनोत्सुक) वासुदेव

पुस्तकाचा मुक्तस्त्रोत करण्यासाठी तयारीत आहे. किंबहूनायुनिकोडमध्ये आता तयार आहे. ई बुक स्वरुपात करण्यासाठी राज जैन तयार आहेत.

तुमचे पुस्तक संगणकीय स्वरूपात येत आहे ही आनंदाची गोष्ट आहे, पण एकेका भागावर, प्रश्नोत्तरावर इथे लेख लिहिलेत तर त्यावर चर्चा होऊन तुम्हाला तुमचा संदेश अधिक चांगल्या प्रकारे वाचकांपर्यंत पोचवता येईल.
आपला
(सूचक) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

माझे उत्तर

ज्योतिष या विषयावर तुमचा विश्वास आहे का?

जरी प्रियालींचा प्रश्न हा घाटपांडे साहेबांना होता तरी उत्तर द्यावेसे वाटले...

माझा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे पण ते कोणी बघू शकत असेल यावर अर्थात "ज्योतिष्यावर" नाही :-)

बाकी जरा अवांतरः विधीलिखित हा सचिन, यशवंत दत्त, श्रीराम लागू आणि महाभारतात जीने रुक्मीणीचे काम केले आहे तीचा चित्रपट पाहीला आहे का? छान आहे. एकदम आवडला, पण नंतर कळले की तो पण कुठल्या तरी हॉलीवूड सिनेमावर आधारीत आहे आणि मग भारतीय चित्रपटसृष्टीच्या स्वकर्तुत्वान होण्याच्या भविष्यावरील विश्वास उडाला;-)

महभारतातील रुक्मिणी

म्हणजे चन्ना रुपारेल का? यात कृष्ण ही (नितीश भारद्वाज) होता ना?

अवांतर (?): त्याच्या पत्रिकेत ज्योतिषावर विश्वासाचा योग नाही.

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

वेळ

त्याच्यावर तशी वेळ आली आपसूक योगही जमून येईल.
फक्त तेंव्हा आपण वेळोवेळी घेतलेल्या भुमीकांचा स्वतःला फार त्रास वा त्रागा न करून घेता,
त्या आलेल्या योगाचा आनंद घ्या इतकेच म्हणेन!

आपला
गुंडोपंत

प्रातिनिधिक प्रश्न आणि दुसर्‍या आवृत्तीच्या निमित्ताने


दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने


आपल्याला जे पटत नाही ते सर्व त्याज्य अशी भूमिका न घेता बहुविध दृष्टिकोणातून या विषयाकडे बघण्याची दृष्टि ही मला माझया ज्योतिष प्रवासातूनच मिळाली. अनेक बुद्धिप्रमाण्यवादी फलज्योतिष विरोधक आपल्या मताशी जो पूर्णत: सहमत नाही तो फलज्योतिष समर्थकच आहे असे मानणारे आहेत. तसेच अनेक फलज्योतिष समर्थक हे आपल्याशी सहमत नसणारा तो विरोधक असे मानणारे आहेत. हे पुस्तक फलज्योतिषाचे समर्थन करते की विरोध असाही प्रश्न काही लोकांना पडला. एखाद्या गोष्टीला समर्थन वा विरोध यो दोनच बाजू नसून चिकित्सा नावाची वेगळी बाजू पण आहे. चिकित्सा ही दोन्ही पातळयांची करावी लागते. फलज्योतिष समर्थक वा विरोधक हे आपापल्या व्यासपीठावरुन एकमेकाविरुद्ध आग्रही मतं मांडत असतात. या दोन्ही भूमिका लोकांना एकाच वेळी ऐकायला मिळाव्यात या हेतूने पहिल्या आवृत्तीचे समारंभपूर्वक प्रकाशन केले. त्यात डॉ.नरेन्द्र दाभोलकर यांनी आपला फलज्योतिष विरोधी आणि ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार यांनी आपली समर्थक भूमिका मांडली. तसेच श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची दोघांनीही उत्तरे दिली. उत्तरे पटणे वा न पटणे हा भाग निराळा. पण या निमित्ताने एक विचार प्रक्रिया तर चालू झाली. आतापर्यंत फलज्योतिष हा विषय वा ज्योतिषी ही व्यक्ती केन्द्रबिंदू धरुन विरोध वा समर्थन झाले आहे. हा विषय मुख्यत: ज्योतिषाकडे जाणारी व्यक्ती म्हणजेच जातक यांच्या करता आहे. परंतु यांना केन्द्र बिंदू मानून चिकित्सा केली जात नाही. जातक हा चिकित्सकही बनू शकतो अशी भूमिका मांडताना त्याची मानसिक जडणघडण विचारात घेतली आहे. फलज्योतिष हा श्रद्धेचा विषय झाला की चिकित्सेच्या वाटाच बंद होतात. चिकित्सेला प्रवृत्त करण्यासाठी काही तडजोड करणे ही आवश्यक असते. ती तडजोड म्हणजे जातकाला वेळोवेळी समजून घेण्याचा प्रयत्न करणे.
फलज्योतिषातील समर्थक वा विरोधी मते यातील विविध अंतर्प्रवाह मला जवळून पहायला मिळाले. अत्यंत तटस्थ राहून मी फलज्योतिष चिकित्सा केली आहे असे माझे अजिबात म्हणणे नाही. टीकाकार या नात्याने अंतर्विसंगती मांडायच्या झाल्या तर त्या फलज्योतिषीय परिभाषेत मांडाव्या लागतील. त्या फक्त अभ्यासकांनाच समजतील सर्वसामान्य माणूस चिकित्सेपासून पुन्हा वंचितच राहिल म्हणून तो विषय फलज्योतिषीय पातळीवर फारसा मांडला नाही. चिकित्सा करताना दोन्ही बाजू अभ्यासक या नात्याने समजावून घेताना कधी सुसंगतीतही विसंगती आढळली तर कधी विसंगतीतही सुसंगती आढळली. हेच तर मानवी स्वभावाचे वैशिष्टय आहे. मनुष्य हा काही विवेकवाद, मानवतावाद, बुद्धीप्रामाण्यवाद यांचे प्रोग्रामिंग फीड केलेला जैवरासायनिक यंत्रमानव नव्हे. त्याला केवळ बुद्धी नाही तर भावनाही आहेत हे भान ठेवून चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला आहे.
दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने वाचकांना काही अधिक माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

प्रकाश घाटपांडे

छान पण

वा छान आहे हे पण.
आतापर्यंत फलज्योतिष हा विषय वा ज्योतिषी ही व्यक्ती केन्द्रबिंदू धरुन विरोध वा समर्थन झाले आहे.

हे आपले दुर्दैव आहे.
फलज्योतिष हा श्रद्धेचा विषय झाला की चिकित्सेच्या वाटाच बंद होतात
वा काय बोललात! हा विषय श्रद्धेपेक्षा अभ्यासाचा व्हावा असे मलाही वाटते!

मनुष्य हा काही विवेकवाद, मानवतावाद, बुद्धीप्रामाण्यवाद यांचे प्रोग्रामिंग फीड केलेला जैवरासायनिक यंत्रमानव नव्हे. त्याला केवळ बुद्धी नाही तर भावनाही आहेत हे भान ठेवून चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला आहे.

भावनेचे भान ठेवून झालेली चिकित्सा गुंडोपंताना जास्त महत्वाची वाटते.
इथेच बुद्धीवादी नि सामान्य माणसाची संगत सुटते. प्रकाशराव हे सामान्य माणसाचे विचार घेवून चिकित्सेच्या दिशेने पुढे जात आहेत म्हणोनच त्यांचे लेखन महत्वाचे आहे.

अर्थातचा प्रकाशरावांच्या या भुमीकेमुळे एक समर्थ विचारवंत या क्षेत्रात दिपस्तंभासमान कार्यरत आहे हे जाणवते.
श्रद्धेच्या या अतिरेकी वातावरणात भावनेचेही मोल जाणणारा वास्तववादी बुद्धीवादच या पुढे ज्योतिष्यातल्या अभ्यासाला दिशा देईल यात शंका नाही.
प्रकाशरावांचे लेखन हे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे. त्यांनी भरपुर लिखाण करावे हीच सदिच्छा!

आपला
गुंडोपंत

शुद्ध बकवास !

हाताच्या लबाड रेषांवर जाऊ नकोस !
ग्रहांचे दुराग्रह साहू नकोस !
परीश्रमांना विसरू नकोस
कारण
ज्योतीष्याच्या दुकानात
नशीब विकत मिळू शकत नाही !

हा विषय इथे दिसतो आहे हे शतकानुशतकांचा उत्कंठा आणि भय यांचा ससेमीरा अजुनही कायम आहे आणि मानस शास्त्र सामान्य माणसापासून कोसो दूर आहे याचेच लक्षण् नव्हे काय ?

जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.

 
^ वर