''तू ज्योतिषाचा कोर्स कुठं केला?`` असा एक प्रश्न मला हमखास विचारला जातो. पण मी कुठंही कोर्स केला नाही. हे सांगितलं तर त्यांना पटत नाही. या विषयातले ग्रंथ,लेख, व्याख्यानं, चर्चासत्र, अधिवेशन आणि आपली शिकण्याची इच्छा हेच आमचे गुरु. या विषयांत मी जातक, विद्यार्थी, अभ्यासक, समर्थक, ज्योतिषी, चिकित्सक अशा सर्व पातळयांवर अनुभव घेतले.
भविष्याविषयी उत्कंठा असणं ही अत्यंत स्वाभाविक आहे. केवळ उत्कंठे साठी ज्योतिषाकडे येणारी माणसे कमी व अडचणीत आहे, संकटात आहे म्हणून मार्गदर्शनासाठी येणारी माणसेच जास्त. मनुष्य अडचणीत असला की चिकित्सा वगैरे असल्या भानगडीत तो पडत नाही. साहजिकच श्रद्धा हाच भाग मग जोपासला जातो. आपल्या धर्मामध्ये चिकित्सेला मोठी परंपरा आहे. फलज्योतिषात विविध मतप्रवाह आहेत. पण तरीही ज्योतिष विषयाला एक गूढ वलय प्राप्त झालेले आहे. तोडगे,यंत्र, मंत्रतंत्र, दैवी उपाय, सिद्धी, उपासना या गोष्टी ज्योतिषापासून वेगळया करता आलेल्या नाहीत.
ज्योतिषी आणि जातक यांच नातं हे आपल्याकडे डॉक्टर आणि रुग्णा सारखं आहे. तिथ अपेक्षा असते समीक्षा नसते. ज्योतिषाविषयी विविध क्षेत्रातल्या लोकांची मते अजमावण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. परिवर्तनवादी चळवळीतल्या लोकांना जेव्हा आपला ज्योतिषावर विश्वास आहे का? असा प्रश्न विचारतो तेव्हा तो त्यांना अडचणीचा वाटतो. '' आमचा तसा विश्वास नाही. पण .......`` '' आपला त्यातला काही अभ्यास नाही.`` पण त्या विषयाच्या अंतरंगात डोकवावे असे काही वाटत नाही. ज्योतिष हा विषय सोपा करुन सांगावा असं खूप दिवस मनात होतं. पण कितीही सोपं केलं तरी ते लोकांना अवघडच वाटत राहीलं. मग हा विषय लोकांच्याच मनातल्या प्रश्नांमधून मांडला तर? असं मनात आल्यावर त्या चष्म्यातून उत्तरे शोधू लागलो आणि या पुस्तकाचा जन्म झाला.
माझे जेष्ठ स्नेही श्री. माधव रिसबूड यांचेशी वेळोवेळी होणारी अनौपचारीक चर्चा हा तर या पुस्तकाचा पाया आहे. ग्रहांकित मासिकाचे संपादक मा. चंद्रकांतजी शेवाळे उर्फ दादा यांचेशी गप्पा मारताना त्यांनी मर्मावर अचूक बोट ठेवले. ते म्हणाले, '' सर्वसामान्य माणसाला ज्योतिषाकडे जावंस वाटाव अशीच इथली सामाजिक परिस्थिती आहे. ती जेव्हा बदलेल त्या वेळी ज्योतिषाकडे जाणारा वर्ग आपोआप कमी होईल.``
हे पुस्तक चिकित्सकांनी सर्वसामान्य माणसांच्या चष्म्यातून वाचावे, सर्वसामान्य माणसांनी चिकित्सकांच्या चष्म्यातून वाचावे आणि ज्योतिषांनी अंतर्मुख होउन वाचावे असं अपेक्षित आहे.