चला बोलू या - भाग २

आयोजकांनी दुसरा मुद्दा उपस्थित केला.
आपली सांस्कृतिक/धार्मिक ओळख आपल्या मुलांनी कशी निर्माण करावी? त्यासाठी आपण मुलांना आपल्या धर्माबद्दल व संस्कृतीबद्दल, केव्हा (कोणत्या वयात), काय व किती सांगावे? मुलांच्या प्रश्नांना (आपण चर्चला का जात नाही?, थ्यांक्सगिविंगला टर्की का करत नाही? वगैरे) उत्तरे कशी द्यावी? मुलांना त्यांच्या मित्रांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायला कसे तयार करावे? अशा घटनांमधून मुलांच्या मनाला कसे जपावे? काय टाळावे व काय टाळायची गरज नाही?

एक तरुण पिता: मला वाटतं धर्म म्हणजे कर्मकांड हे आपण आपल्या मुलांना शिकवायची गरज नाही. त्यांना गरज पडल्यास ते तसे शिकू शकतील. पण त्यांना त्यांच्या जीवनात जेव्हा खूप मोठी अडचण येईल तेव्हा मर्गदर्शनाचा स्त्रोत हा त्यांचे आंतर्मन, त्यांचे जीवनातील अनुभव अन श्रद्धा हेच असते. यातली श्रद्धा फार महत्वाची आहे आणि ती आपल्याला आपल्या धार्मिक संस्कारांतून मिळालेली असते. मग ती श्रद्धा देवावरची असेलच असे नाही. माझं श्रद्धास्थान शिवाजी महाराज आहे. जेव्हा केव्हा मला कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं तेव्हा निर्णय घ्यायला शिवरायांच्या जीवनपटाचा संदर्भ मला उपयोगी पडतो.

तरुण आजीबाई: मला वाटतं धर्म हा तितकासा महत्वाचा भाग नाही. आपण चर्चमध्ये जातो का मंदिरात हा सुद्धा महत्वाचा भाग नाही. (आणि मग त्यांनी त्यांच्या चर्चच्या जाण्यावरचा एक अनुभव सांगितला).

दुसरे तरुण पिता: मला वाटतं आपण चर्चला जाताना जरा जागरुक राहणेक आवश्यक आहे. माझी मुलगी मिशनरी शाळेत जायची. तिच्या शाळेच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आम्ही तिला चर्चमध्ये सुद्धा घेऊन जात असू. तर तितल्या धर्मप्रचारकांना वाटले की आम्ही ख्रिश्चन धर्मच स्विकारायला हवा. ते दर रविवारी आमच्या घरी येऊन आम्हाला धर्मांतराबद्दल बोलत असत. मग आम्हाला एकदा त्यांना कडक भाषेत सांगावे लागले की बाबांनो आम्ही तुमच्या धर्माचा आदर करतो पण आम्हाला आमचा धर्म प्रिय आहे. आम्हाला तुमच्या धर्मात यायची गरज नाही. पण या सगळ्या घडामोडीदरम्यान आमच्या मुलाला धर्माची ओळख झाली.

आयोजक: ही धर्माची ओळख म्हणजे काय? मुलांना आपला धर्म म्हणजे काय हे कसे समजवावे?
एक पालक: धर्माची वेगळी अशी ओळख करुन द्यायची गरज नाही. आपण आपले सण-वार साजरे करावेत. निमित्त साधून मंदिरात जाऊन यावे. तसेच आपल्या आचरणातूनच मुलांना हळू-हळू धर्माबद्दल माहिती करून द्यावी.

आयोजक: पण ही माहिती कधी, कोणत्या वयात द्यावी?
एक पालक: मला वाटते यासाठी वयाची अट नाही. ही एक दैनंदिन जीवनातून शिकन्याची बाब आहे. जसे की मूल खूप लहान असताना त्याला तुम्ही रामकृष्णाच्या गोष्टी सांगू शकता, थोडे मोठे झाल्यावर काही श्लोक शिकवू शकता, तसेच अजून थोडे मोठे झाल्यावर त्याला गंध लावणे, मांसाहार न करने ह्या आपल्या धर्मातल्या गोष्टींची माहिती देऊ शकता.

आयोजक: मांसाहाराचा विषय निघाला आहे. तेव्हा तुम्ही पालक तुमच्या मुलांच्या आहाराबद्दल काय करता किंवा करू इच्छिता?
एक तरूण माता: आम्हाला वाटते आमच्या मुलांने बीफ व पोर्क, विषेशतः बीफ खाऊ नये. पण त्याचे मित्र जर ते सगळे खात असतील त्याला आडवणे आवघड आहे. कारण त्याच्या मित्रांपासून वेगळा पडणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी. तर मग आम्ही त्याला म्हटले की तुला खायचे असेल तर खाऊन बघ. पण रेड-मीट आरोग्याला चांगले नसते. तेव्हापासून तो बाहेर असताना स्वतःच रेड-मीट नाही ना हे विचारुन घेऊन मगच खातो.

आणखी एक तरुण पिता: मला वाटतं काही खाल्ल्यामुळे बुडेल इतका आपला धर्म "हलका" नाही. पुर्वी मांस खाल्ले म्हणून आपण आपल्याच लोकांना धर्मबहिष्कृत केले. ते मुसलमान झाले. पुढे ब्रेड पावाच्या तुकड्यांनी आपले बांधव ख्रिस्ती धर्मात गेले. आता तरी आपण हे विचार सोडायला पाहिजेत. बाटतो वगैरे ह्या कल्पना आपण आत्ता नाही सोडल्या तर कधी सोडणार. आपणच सुरुवात करु या त्याची... माझ्या मुलीने कोणताही आहार घेतल्याने तिचा धर्म बुडणार नाही असे मी तिला सांगत असतो.

आणखी एक तरुण पिता: आणि हे करु नका ते करु नका असे सांगितल्याने मुलांना आपल्या धर्माबद्दल नसलेले गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा आपल्या धर्मात चांगल्या गोष्टी करण्यासाठी कसे प्रोत्साहन दिले जाते हे दाखवून दिले पाहिजे. आणि अगोदर चर्चेत म्हटल्याप्रमाणे मुलांना धर्माचा, श्रद्धेचा उपयोग कठीण प्रसंगी मार्ग काढण्यासाठी करता यावा.

आयोजक: (येथे वाढलेल्यांना उद्देशून) तुम्हाला काय वाटते? तुम्हाला धर्माचा/श्रद्धेचा कठीण प्रसंगी फायदा झालाय?
अ.म.त. : मी धर्माचा आदर करतो पण धार्मिक वगैरे नाही. मला अथर्वशिर्ष येते पण जर कधी खरेच कठीण प्रसंग आला तर मी "देवा मला वाचव" असे म्हणत बसणारा नाही. तर त्या वेळी मी सल्ला घेण्यासाठी माझे आई-बाबा अन तुम्ही सगळे जे त्यांच्यामुळे माझ्या जीवनात आलात आणि माझे मित्र बनलात यांच्याशी संपर्क करीन.

अ.म.ती. : हम्म, मी लहानपणापासूनच धार्मिक वगैरे नव्हते. पण माझा भाऊ होता. त्याच्याकडे धर्मावरच्या व्हिडिओ, पुस्तके वगैरे बरेच असत. पण आता मोठा झाल्यावर तो अगदी निधर्मि झालाय. आणि पहायला गेले तर मीच त्याच्या पेक्षा जास्त धार्मिक आहे असे म्हणता येऊ शकेल. पण संकटाच्या वेळी वगैरे मला काही धर्मामुळे फायदा होईल असे वाटत नाही.

आणखी एक तरुण पिता: मला वाटतं आपण धर्माकडुन प्रत्यक्ष फायद्याची अपेक्षा न ठेवता आपल्याजवळ जे जे चांगले आहे ते ते देऊन या समाजाला मदत करावी. जसे की योग, मेडिटेशन, ईतर धर्मांचा आपल्या धर्मात राहून आदर तसेच स्विकार या गोष्टी आपण या समाजाला देऊ शकतो. आणि त्या आवश्यकही आहेत.

आयोजक: बरे आता आपल्या धर्मामुळे या समाजात एकरूप होण्यासाठी आपल्याला काही आडचणी येतात का? त्या कशा सोडवाव्यात?
आणखी एक तरुण माता: आडचणी अशा विषेश वाटत नाहीत. पण मुलांचे प्रश्न मात्र फार खोचक वाटतात. कारण येथे मुले भीड-भाड न ठेवता बोलतात. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांचे समाधान होईल अशा प्रकारे आजच्या काळात लागू होणार्‍या गोष्टींतून धर्म समाऊन द्यावा लागतो. उदाहरणार्थ आपण मंगळसुत्रा, बांगड्या, टिकली का लावतो, आपल्याला येवढे जास्त देव का, वगैरे.

एक शिक्षिका: मला वाटतं आपल्या मुलांना या समाजात एकरूप होऊन वाढता यावे यासाठी आपणही काही गोष्टी पाळायला हव्यात. जसे की मुलांना टिळा/टिकल्या लावून शाळेत पाठवायची गरज नाही. माझ्या वर्गात एक मुलगा भस्माचा टिळा लाऊन यायचा. त्यावरुन त्याला त्याचे मित्र अनेक प्रश्न विचारतच असत, चिडवत असत. अर्थात त्या प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडे नसल्याने व मित्रांच्या चिडवण्याने त्याच्या कोवळ्या मनात धर्माबद्दल गैरसमज तसेच चीड निर्माण झाली नाही तर नवल.

एक माता: आम्ही जसे गणपती, दिवाळी वगैरे आपले सण साजरे करतो तसेच येथील ख्रिसमस, हॅलोवीन सुद्धा साजरे करतो. मी टर्की खात नाही पण मुलांना आणि त्यांच्या बाबांना करुन देते. त्याने मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख राहते तसेच त्यांच्या मित्रांपासून वेगळेपण सुद्धा वाटत नाही.

अशा प्रकारे दोन्ही संस्कृतीचा सूवर्णमध्य साधला जावा असे सर्वच उपस्थितांचे मतैक्य झाले.

आयोजक: बरं कोणाला आपल्या सांस्कृतीक बाबींमुळे जसे की साडी नेसणे, काही अनुभव आले आहेत का?
एक माता: हो, माझ्या मुलाला कदाचित माझ्या साडी नेसून त्याच्या मित्रांसमोर त्याच्यासोबत राहण्या बद्दल नाराजी होती. तसे त्याने बोलून सुद्धा दाखवले. पण मी त्याला म्हटले की माझ्या कपड्यांची बाब ही माझी आहे. कपड्यांनी कधी कोणी लहान-मोठा ठरत नाही. तुला जसे कपडे घालायचेत तसे घाल पण माझ्या कपड्यांची निवड मलाच करु देत. त्यानंतर तो या विषयावर काही बोलला नाही तसेच तो नाराज आहे असे सुद्धा कधी जाणवले नाही.

या भागाचा सारांश काय तर प्रत्येक माता-पिता आपल्या मुलांना आपली संस्कृती जपत इथल्या मुख्य प्रवाहात मिसळता यावे यासाठी धडपडणारे होते. या भागची सांगता आयोजकांतील महाराष्ट्र फाउंडेशनच्या प्रतिनिधिने खूप छान केली. मला नक्की शब्द आठवत नाहियेत. त्यांनीच येथे ती प्रतिसादात लिहावी ही त्यांना विनंती.

तळटीप:
१.
२. तरुण पिता/पिता याचा येथे "ज्यांची मुले अजून लहान (बालवयातील आहेत)" असा अर्थ अभिप्रेत आहे. तसाच तरुण आजी-आजोबांचा सुद्धा.

Comments

खरच बोलल पाहिजे

तिथल्या तरुण पालकांमधल्या अंतर्मनातल हे द्वंद्व आहे. तरी देखील मला त्यांची भुमिका मला प्रामाणिक वाटते.
प्रकाश घाटपांडे

सुवर्णमध्य

दोन्ही संस्कृतीचा सूवर्णमध्य साधला जावा असे सर्वच उपस्थितांचे मतैक्य झाले.

नि:संशय! लेख आवडला. पुढचा लेख येऊ द्यात.

तुमचा लेख

दोन भागात विभागलेला हा लेख वाचला. तो लिहिण्यामागची. अधिकाधिक लोकांना याबाबतीत विचार करायला लावण्याची तळमळ , त्यामधून आपल्या मुलांनाच नव्हे तर आपल्यालाही आपल्या आयुष्याचा समन्वय कसा साधावा याची सतत तेवत असणारी जाणीव याचा मला कुठेतरी स्पर्श होऊन गेला.

फाउंडेशन या संस्थेच्या कुठल्याही प्रकल्पाचे स्वरूप मिडास् टच् प्रमाणे असते. तुम्हा सर्वांचे आणि या संस्थेचे पुन्हा एकदा अभिनंदन.

छान

हा ही लेख छान आहे. सुवर्णमध्याची कल्पना पटली.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

दोन संस़्रुती...

लेख आणि संवाद साधायची कल्पना आवडली. त्यातील सर्वजणांचे मुद्दे/विचार हे अमेरिकेतील अनिवासी भारतीयांबाबत प्रातिनिधीक स्वरूपाचे वाटले. येथील बहुतांशी भारतीय हे या प्रश्नोत्तरामधून जात असतात. हे प्रश्न केवळ धर्मापुरते अथवा त्यातील रुढींपुरतेच मर्यादीत असतात असे नाही तर भाषा आणि इतर सांस्कृतीक गोष्टींच्या बाबतीत पण असतात. स्वतःला आणि मुलांना आपल्या संस्कृतीबद्दल आंधळा अहंकार न शिकवता डोळस अभिमान कसा बाळगावा हे शिकवणे म्हणजेच दोनही संस्कृतीतील सुवर्णमध्य गाठणे महत्वाचे वाटते.

कदाचीत भारतीय संस्कृती अथवा हिंदू संस्कृती खूप प्रबळ असेल म्हणून म्हणा अथवा अडमुठी असेल म्हणून म्हणा पण आपल्या समाजाचा अविभाज्य भाग आहे. उ.दा. इंडोनेशिया मुसलमान झाला तरी त्यांची नावे भारतीयच राहीली आणि तशाच भारतीय कथा (रामायणासहीत) समाजाचा अविभाज्य भाग बनला. तसेच आज कितीही आपण नुसतेच अमेरिकन होयचे ठरवले तरी आपल्याला अभारतीय भारतीय आणि मनात कुठेतरी हिंदूच समजणार. याचे दुसरे उदाहरण म्हणजे नुकतेच निवडून आलेले - लुइझियाना प्रांताचे गव्ह्र्नर बॉबी जिंदाल. ह्या व्यक्तीने कॉलेजात असताना आपला धर्म बदलला आणि शिख/हिंदू होता ते ख्रिश्चन झाला. एकीकडे संपूर्ण अमेरिकन होऊन त्याने "़कॉन्झ्रवेटीव्ह" ख्रिश्चन लोकांची मने जिंंकली पण आज तो ओळखला जात आहे ते भारतीय वंशाचा म्हणून "ख्रिश्च्न" म्हणून नाही. त्याचे व्यक्तिगत वागणे पण भारतीयच आहे असे काही माहीतगार व्यक्तिंकडून कळले.

या सार्‍याचा अर्थ काय? या देशात (अमेरिकेत) जगभरची माणसे येतात आणि एका पिढीत अमेरिकन बनून जातात. (चायना टाऊन मधील सोडून) चिनी लोकांना तर तेव्ह्ढापण वेळ लागत नाही. ते तर आल्याआल्या या मेल्टींग पॉट मधे मेल्ट होतात आणि एक वर्ण आणि ठेवण सोडल्यास सगळे बदलून जाते...पण भारतीयांच्या बाबतीत कदाचीत शेकडा ८०-९० तरी असे वाटते पण पुढच्या पिढीतपण भारतीय अंश राहतो. भारतात पण जी अनेक आक्रमणे झाली त्या आक्रमण कर्त्यांचे पण तसेच झाले ग्रीक, शक, कुशाण, हूण आणि काही अर्थी मोघल/मुसलमान (भारतबाहेरून आलेले) हे भारतात समरस झाले.

थोडक्यात भारतीय संस्कृतीत अमेरिकन संस्कृतीसमोर उभे राहण्यासाठी सद्गूण आणि दूर्गूणही आहेत असे (आजच्या भारतातील भारतीय तरूण पिढीकडे खिन्न होऊन पहाताना आणि त्यांचे अमेरिकन इंग्लीश म्हणत लिहीलेले अकलेचे तारे वाचताना देखील) वाटते! ज्यांना केवळ आपणच श्रेष्ठ वाटत असू त्यांनी "दोन शब्दात दोन संस्कृती" हा सावरकरांचा लेख आजही वाचावा!

म्हणून इतकेच वाटते की आपल्याकडे जे काही चांगले आहे त्याचा कुठलाही अहंगंड न ठेवता मोकळे पणाने आपल्या येथील (अमेरिकन) पिढीस आणि अगदी बाकीच्या समाजाला शक्य तितके "मेल्टींग प्रोसेस मधे" द्यावे. जे आपल्यात कमी आहे त्याचा न्यूनगंड न बाळगता येथून "मेल्टींग प्रोसेस मधून" स्वतःआत्मसात करून आपल्या पुढच्या पिढीसही द्यावे. कारण "अहं-"ं असो अथवा "न्यून-" शेवटी कुठलाही "गंड" हा त्याच्या अभावाने अथवा प्रभावाने व्यक्तीस आणि समाजास घडवतो किंवा बिघडवतो...

छान प्रतिसाद

प्रतिसादही चर्चेइतकाच भावला

मुद्रण दोष

प्रतिसादावरील प्रतिसादाबद्दल धन्यवाद. काही कारणामुळे माझ्या एका संगणकावरून मला फक्त फायरफॉक्सच वापरता येते. त्यात काही अक्षरे नीट दिसत नसली तरी आता सवयीने समजतात. तरी देखील नावापासून काही मुद्रणदोष झाल्याचे आत्ता (दुसर्‍या संगणाकरून पहाताना) लक्षात आले, त्याबद्दल क्षमस्व.

पटले

श्री. विकास,

आपला विश्लेषक प्रतिसाद येथे चपखल बसला आहे. अपले विचार पटले.

आपला,
(सहमत) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

सहमत

कारण "अहं-"ं असो अथवा "न्यून-" शेवटी कुठलाही "गंड" हा त्याच्या अभावाने अथवा प्रभावाने व्यक्तीस आणि समाजास घडवतो किंवा बिघडवतो

व्यवहारात सुद्धा एखाद्याचा इगो सुखावल्याने कामे होतात तर एखाद्याचा इगो दुखावल्याने कामे होतात. पण ते गणित जमल पाहिजे नाहि तर होत्याच नव्हत होतं.
प्रकाश घाटपांडे

हे छायाचित्र पहा..

भारतीय संस्कृती किती पाळेमुळे ठेवू शकते याचे उदाहरण म्हणून इंडोनेशियाच्या २०००० रु. च्या नोटेवरचे चित्र पहा:

http://www.banknotes.com/ID138.JPG

संग्रही ठेवण्यासारखे

चित्र आहे.

आभार.

आपला,
(स्नेहाभिलाषि) भास्कर
आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

अरे वा!

बरं वाटलं बधून :) .. खरच संग्राह्य चित्र!!

असेच

म्हणतो. चित्र रोचक आणि संग्राह्य आहे. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

दुरूस्ती...

ही भारतीय संस्कृती आहे ? मला तर ही इंडोनेशियन संस्कृती वाटते. कारण भारताच्या सर्व नोटा तपासून पाहिल्या, त्यात वरील कुठलीच चित्रे नाहीत.

खरंच की, मग समान धागा लक्षात घेऊन, आपण त्याला हिंदू संस्कृती म्हणूया! मग ती इंडोनेशियात असू शकते, भारतात असू शकते आणि कॅलीफोर्नीयात पण असू शकते!

अनुभव वाचायला आवडले

विकास यांचे म्हणणे -
> येथील बहुतांशी भारतीय हे या प्रश्नोत्तरामधून जात असतात.
मलाही असेच म्हणायचे होते.
मध्ये "द नेमसेक" नावाचा चित्रपट पाहिला. यातही मुलावर होणारे देशी-परदेशी संस्कारांचे मिश्रण दाखवले होते. आईवडील काही चौकट देतात, पण व्यक्तिगत सुवर्णमध्य काय तो त्यातील मुलाला धडपडून शोधावा लागतो.
(चित्रपटापेक्षा कादंबरीत हृदयाला भिडणारे अधिक तपशील आहेत. पण लेखनशैली मला तेवढी आवडली नाही. त्यामुळे चित्रपटाची शिफारस करावी की कादंबरीची ते कळत नाही.)

कादंबरीची शिफारस

मी दोन्ही पाहिले/ वाचले आहे. कादंबरी मला तरी आवडली. मला ती माझ्या सुरूवातीच्या अनुभवांना मिळतीजुळती वाटली. चित्रपट बघायचा म्हणून मी कादंबरी वाचली.

चित्रपटही पाहिला, तोही बरा आहे, पण मनाला फार भिडला नाही. वडिलांचे काम करणारा इरफान खान आवडला. गोगोलचे काम करणारा देखील.

या अनुषंगाने

आपल्याकडे जे काही चांगले आहे त्याचा कुठलाही अहंगंड न ठेवता मोकळे पणाने आपल्या येथील (अमेरिकन) पिढीस आणि अगदी बाकीच्या समाजाला शक्य तितके "मेल्टींग प्रोसेस मधे" द्यावे.

विकास यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे असे मला वाटते. सर्व परदेशातील स्थानिक मराठी मंडळे, बृ.म.मं. यांसारख्या संस्था, "एकता" सारखी नियतकालिके, महाराष्ट्र् फाउंडेशन, "कला" यांसारख्या संस्था या सर्व गोष्टी सांस्कृतिक अभिसरणाच्या कार्यात आपापल्या परीने योगदान करीत आहेत. आणि यांच्यातल्या बहुतांशी संस्था-संघटनांच्या कामाचा दर्जा पहिल्या प्रतीचा आहे. पण, अर्थातच, या सर्वांचा परिपोष होतो तो भारतीय (मराठी ) लोकांकरता. "काही भारतीय (मराठी ) लोकांनी एकत्र येऊन महाराष्तट्रातील किंवा परदेशातील भारतीय (मराठी )लोकांकरता केलेले काम" असे त्याचे स्वरूप आहे. आपले लोक जेथे जाऊन वसले आहेत तेथील स्थानिकांच्यापर्यंत आपले लोक पोचले आहेत असे फार क्वचित् घडते. असे होण्याकरता एखादा रविशंकर जन्मावा लागतो. "मेल्टींग प्रोसेस" चा आतापर्यंतचा आपल्यापुरता अर्थ म्हणजे, आपण स्थायिक होत असलेल्या देशांच्या संस्कृतीला आत्मसात् करणे.

To make the locals appreciate what we have to offer हे आव्हान मोठे आहे. त्या दृष्टीने कुणाचे काही प्रयत्न चालले असतील तर ते जाणून घ्यायला जरूर आवडेल.

पारटकरांचा एक लेख

आजच पारटकरांचा एक लेख वाचायला मिळाला. याच विषयाशी निगडीत आहे म्हणून देत आहे.

http://paratkar.blogspot.com/2007/11/blog-post.html

मराठीत लिहा. मराठीत लिहा. मराठीत लिहा. मराठीत लिहा. मराठीत लिहा. मराठीत लिहा. मराठीत लिहा. मराठीत लिहा. मराठीत लिहा. मराठीत लिहा. मराठीत लिहा. मराठीत लिहा. मराठीत लिहा. मराठीत लिहा. मराठीत लिहा. मराठीत लिहा. मराठीत लिहा. मराठीत लिहा. मराठीत लिहा. मराठीत लिहा.

शाळेतला अनुभव

खालील अनुभवातील संबंधितांची नावे मी लिहीत नाही आहे, पण तो व्यक्तिगत आणि १००% खरा आहे. आम्हाला तो आमच्या मुलीच्या शिक्षिकेने, तीचा अनुभव म्हणून गंमतीत सांगीतल्यावर समजला: (विचार केला तर हा किस्सा बरेच काही सांगून जाईल असे वाटते)

स्थळ: प्री-के ची शाळा (कदाचीत छोटा/मोठा शिशू). मुलांची वये साधारण ४-५ वर्षे

शाळेत मुले रूळली होती आणि एकमेकांशी संवाद साधायची कला त्यांना येऊ लागली होती.

एक मुलगा ("अ") मुलीला ("ब") (अचानक म्हणाला): अल्ला इज द ओन्ली गॉड
बः व्हाय? वुई हॅव गणेशा ऑल्सो. (मग जमेल तसे चित्र काढून) गणेशा इज अवर मेन गॉड
---
असा थोडासा शाब्दीक छल झाला. दोघांचे भांडण ही मी (टिचर) पाहात होते. ऑन वन साईड देअर वॉज मुस्लीम किड ऍन्ड ऑन द अदर साईड हिंदू ऍन्ड इन बिट्वीन "मी", ए ख्रिश्चन दॅट टू हू वर्क्स ऑल्सो ऍज चर्च मिनिस्टर... सो आय टोल्ड "अ" it is right that "allah is the only god. But don't you see Allah sometime as "power", other time as "love", Passion etc.? "अ" nodded yes. Then I (teacher) told him that each emotion or expression that you see in Allah is what "ब" considers as different form of God. ते ऐकून "अ" ला काही तरी समजले असे वाटले आणि तो गप्प झाला..

हे सर्व तीने आम्हाला सहजपणे वर्षाअखेरीस आठवणी सांगताना सांगीतले, त्यात काही तीच्या दृष्टीने विशेष नव्हते अथवा "इश्यू" नव्हता. तीनेच आम्हाला त्या वयातील मुलांना नवरात्र, दिवाळी या वर माहीती देयला बोलावले होते आणि भारतीय स्वीटस् पण देयला सांगीतली होती. आणि आम्ही पण तीला आणि अजून तीच्या दोन सहकार्‍यांना (ज्या पण तीच्या सारख्याच मोकळ्या होत्या) ख्रिसमसची ग्रीट आणि भेट देयला विसरलो नव्हतो..

माझे काही (निराशादायक)

अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल महाराष्ट्र फाउंडेशनचे अभिनंदन. तसेच भास्कररावांनी हे सर्व येथे दोन भागात अत्यंत सुविहीत लिहून कळवल्याबद्दल त्यांचे आभार मानावेत तेव्ह्ढे थोडेच.

ह्या परिसंवादात भाग घेतलेली मंडळी अर्थातच ह्या प्रश्नांबद्दल जागरूक आहेत, व आपापल्या परिने हे प्रश्न सोडवण्याचा विचारपूर्वक प्रयत्न करत आहेत, हे उघड आहे. पण अशी कितीशी मंडळी ज्या स्थळी हा परिसंवाद झाला तिथेच (अथवा त्या स्थळाच्या आसपास) आहेत, व ज्यांना ह्या संवादाचे निमंत्रण होते, पण काही न काही कारणांमुळे ती तेथे आली नाहीत? माफ करा, थोडासा निराशाजनक सूर लावतो आहे, कारण माझ्या (anecdotal) अनुभवांवरून तरी मला असे वाटते की मराठी माणसे स्वतःच्या संस्कृतिबद्दल जेव्हढी उदासिन असततात तेव्हढी अन्य कुठलीच नसतील. आणि धर्माचे म्हणाल तर हिंदू धर्मात 'वरून' काहीच लादले जात नाही. जे काही करायचे आहे, ते आपणच आपल्या जबाबदारीने करायचे आहे. हे चांगले तसेच वाईट असे म्हणण्याची पाळी आली आहे. काहीही केले, कसेही केले, तरी आमच्या धर्मात कुणीही 'हे गैर आहे' असे म्हणत नाही. ह्याचा परिपाक असा की आपण अनेकदा जबाबदारी न ओळखून वागतो, व ते चालूनही जाते. ही दुधारी तलवार आहे, असे मला वाटू लागले आहे.

एक उदाहरण: मंदिरात जातांना कुठलाही वेष परिधान करून जाणे कितपत उचित आहे? अलिकडेच गणेशोत्स्तवासाठी जेव्हा आम्ही मंदिरात जावयास निघालो, तेव्हा माझा मुलगा (आता बर्‍यापैकी टीनएजर), शॉर्ट्स् घालून यावयास निघाला. फुल्लपॅंट घालणे त्याला उकाड्यामुळे थोडे त्रासदायक वाटत होते. तेव्हा त्याच्यात व माझ्यात असा काहीसा संवाद झाला:

मी: समज तुला चर्चला जायचे आहे. तर् तू काय घालशील?
मु: अर्थातच शर्ट व् पॅंट (किमान).
मी: का बरे?
मु: तेथे ड्रेस-कोड असतो ना?
मी: तसा तो का असतो?
मु: त्यांचा तो नियम आहे, म्हणून.
मी: देवाच्या दारी जातांना आपण काही डेकोरम पाळला पाहिजे, ह्यातून् तो नियम आला आहे ना? मग आता आपला धर्म 'तुम्ही असेच करा, तसेच करा, असे काहीही सांगत नाही. कारण तो ही जबाबदारी तुमच्यावरच सोपवतो. तुम्हाला चांगले वाईट काय आहे, हे कळते असे आपला धर्म मानतो. मग आपणच ही जबाबदारी ओळखून वागणे जरूरीचे नाही का?

मुलगा मग फुलपॅंट घालून आला खरे. पण पहातो तो मंदिरात अनेक मोठेमोठे बाप्ये सर्रास शॉर्ट्स् घालून आले होते. अनेक स्त्रिया ह्या समारंभाच्या प्रसंगीही जीन्स परिधान करून आल्या होत्या.

मंदिरात जातांना वेष कुठचा परिधान करावा, ह्यामुळे काही आपल्या संस्कृतीला, आपल्या धर्माला फरक पडणार आहे, असा युक्तिवाद इथे केला जाईल. पण अश्याच छोट्या-छोट्या बाबींवर काट मारून शेवटी काहीच उरत नाही. हेच लॉजिक पुढे चालवणे अगदी सोपे आहे.

विकास ह्यांच्या मताशी मी फारसा सहमत नाही. बॉबी जिंदाल भारतीय आहे, म्हणजे काय आहे? नुसते नाव भारतीय आहे म्हणून? घरी भारतीय पद्धतीचेच जेवतो, म्हणून? आपण भारतीय मेल्टिंग पॉट मध्ये लगेच मिसळून गेलो, तरी आपल्यात भारतीयत्व असते, तसे ते चिनी लोकांतपण नसते असे ते म्हणतात. त्या दोन्ही बाबतीत माझी निरीक्षणे बरोबर उलटी आहेत. मी चीनच्या उंबरठ्यावर रहातो. इथे कॅनडात राहून लहानाची मोठी झाली, तिथेच सर्व शिक्षण झाले, असे असलेली इंजिनीयर झालेली कैक मुले मी पाहिली, त्यांना आपली स्वताची भाषा उत्तम बोलता येतेच, पण रहाणे, खाणे हेही सर्व खास चिनी पद्धतिचे. चिनी माणूस जगाच्या पाठीवर कोठेही गेला (अगदी रेफ्युजी म्हणूनसुद्धा) तरी तो आपल्या वंशाला कधीही विसरत नाही. ह्याबाबतीत बरेच काही लिहीता येईल, विस्तारभयास्तव इथे लिहीत नाही, कारण तो ह्या चर्चेचा मूळ मुद्दा नाही.

इंडोनेशियन रूपियाच्या नोटेच्या चित्राचा संदर्भ लागला नाही.

खरे आहे

प्रदिपराव,

आपले म्हणने आगदी १००% खरे आहे. केवळ जागरूक लोकच अशा चर्चा सत्रांना जातात. बाकींच्या बाबतीत आनंदी आनंद आहे. तसेच आपले धर्माबद्दलचे मतही पटले. पण त्यावर आपण काय करू शकतो.

आपला,
(विचारक्रांत) भास्कर
आम्ही येथे वसतो.

भाग ३ (अंतिम भाग)

येथे लिहिला आहे.

आपला,
(लेखक) भास्कर
आम्ही येथे वसतो.

 
^ वर