चला बोलू या - भाग १

आज येथे, महाराष्ट्रापासून दहा हजार मैलांवर, अनेक मराठी लोकांना आपापल्या जीवनात कुठे ना कुठे, कधी ना कधी तरी उपयोगात पडेल असा एक अगळा वेगळा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र फाउंडेशन व कनेटिकट महाराष्ट्र मंडळाने "चला बोलू या" नावाच्या एका चर्चा सत्रासाठी येथील सर्व मराठी कुटुंबांच्या जीवनाशी निगडीत विषय निवडला होता, "अमेरिकेतील मराठी म्हणून आपले विचार, अनुभव व आपल्या समोरील प्रश्न".

या चर्चा सत्रात तीन मराठी पिढ्यांचे प्रतिनिधी होते. या तीन पिढ्यात होते आपली मुले येथे अमेरिकेत लहानाची मोठी करणारे अनुभवी पालक, ज्यांची मुले आजून लहान आहेत असे नवीन पालक व तिसरे आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे असे मराठी तरूण/तरुणी जे या पश्चात्य संस्कृतीत वाढले आहेत. यांत अनेक क्षेत्रातले दिग्गज जसे डॉक्टर, सामाज सेवक, शिक्षक, उद्योजक, मानसोपचार तज्ञ, आदिंचा सुद्धा समावेष होता. त्यांनी परदेशस्थ मराठी समाजा समोरील विविध समस्यांवर चर्चा केली तसेच या चर्चेच्या माध्यमातून मौलिक माहितीची देवाण-घेवाण पण केली. कार्यक्रमाच्या सुव्यवस्थित संचलनाने त्याला सर्व उपस्थितांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला व तो अफलातून यशस्वी झाला हे सांगणे नको.

या चर्चा सत्रात चर्चिले गेलेले काही मुद्दे सहसा मराठी वा भारतीय कुटुंबात चर्चिले जात नाहीत ज्यामुळे काही घटनांना कसे सामोरे जावे याची आपाली तयारीच असत नाही. चला तर बघू या काय झाले या कार्यक्रमात.

कार्यक्रमाची सुरुवात अर्थातच सर्वांत मूळ प्रश्नाने करण्यात आली.
या देशात आपल्या मुलांना मराठी येणे कितपत महत्वाचे आहे? या प्रश्नावर आलेली प्रातिनिधीक मते...

एक अजोबा: येत्या दोन-तीन दशकात मराठीचा वापर खुद्द महाराष्ट्रातच कमी होणार आहे. तर येथे मुलांवर "मराठी बोल, मराठी बोल" अशी बळजबरी का बरे करावी? मला वाटते मराठीचा अट्टाहास आपण सोडला पाहिजे. कारण ती या मुलांची ज्ञान-भाषा नाही, ती यांना वाचता येण्याची शक्यता कमीच आहे ज्यामुळे त्यांना तिची गोडी लागणार नाही आणि गोडी लागली नाही तर ते ती पुढच्या पिढीला कशी देणार? मग जर मराठी आपल्या पुढच्या दोन पिढ्या सुद्धा जगणार नाही, तर मग या मुलांचे "टॉर्चर" का?

दुसरे अजोबा: मी माझ्या नातीला कधीच मराठी बोल म्हणत नाही. ती जी इंग्रजी बोलते तिचे उच्चार भारतातल्या इंग्रजीपेक्षा वेगळे असतात. मग मी तिला ते हळू-हळू मला समजेल असे बोलायला लावतो. त्यांनतर तेच मराठीतून तिला सांगतो. तिला ते उच्चारायला अवडते अन आमचा संवाद मराठी मध्ये सुरु होतो. "टॉर्चर"चा प्रश्नच नाही.

अमेरिकन मराठी तरूण (अ.म.त.): (त्याला "टॉर्चर" बद्दल विचारले गेले तेव्हा) हो, होते "टॉर्चर". पण शाळेत जाणे, अभ्यास करणे, चांगल्या सवयी लावणे, हे सुद्धा "टॉर्चर"च आहे. ते चालते तर मग मराठी बोलण्यालाच का सोडायचे? शाळेत गेल्याचा, अभ्यास केल्याचा व आई वडिलांनी चांगल्या सवयी लावल्याचा फायदा होतो तसाच मराठी येत असल्याचा अभिमान पण वाटतो. आपल्या ईतर मित्रांजवळ नसलेली एक खूबी आपल्यात आहे हे पाहून आनंद वाटतो.

अमेरिकन मराठी तरूणी (अ.म.ती.)ची आई: मुलांना मराठी शिकवण्यासाठी "टॉर्चर"च करायची गरज नाही. काही छोट्या-छोट्या घटनांमधून त्यांच्यात ती शिकवण्याची भावना जागृत केली तर ते आपोआपच शिकतात. माझ्या मुलांना दुकानात मला कोणाबद्दल काही सांगायचे झाल्यास त्या व्यक्तिसमोरच मराठीतून सांगता आल्याने फार गंमत वाटायची (एक गंमतीशीर उदाहरण सांगितले).
यावर आणखी एका पालकाने त्यांच्या मुलाचा अनुभव सांगितला. सार्वजनीक ठिकाणी आई-बाबा रागाऊ लागले तर ते इतरांना समजून आपली वेशीवर टांगली जाऊ नये म्हणून हा म्हणायचा, "आई/बाबा, मराठीत, मराठीत".

पण या छोट्या-छोट्या घटनांमधून त्यांची नाळ मराठीसोबत बांधून ठेवण्यात हे पालक यशस्वी झाले. त्यानंतर काहींनी आपल्या मुलांमध्ये मराठी येते हा एक "कॉन्फिडन्स" वाढवण्याचा भाग कसा असू शकतो ते सांगितले. काहींना आपल्या भावना पोचवण्यासाठी आपली मायबोलीच उपयुक्त असल्याचे वाटते तर काहींना भाषा ही त्यात महत्वाची वाटत नाही.

त्यानंतर ऐरणीवर आलेला दुसरा प्रश्न...
आपण या समाजाच्या मुख्य प्रवाहात का व कसे सामिल व्हायला हवे? उदाहरणार्थ आपल्या अन्नाच्या सवयींमुळे मुलांना येथे काही सामाजिक त्रास होतात का? आपण या सवयी बदलायला हव्यात का? कशामुळे व कशाप्रकारे?
या मुद्याच्या चर्चेला सुरुवात झाली मुलांच्या डब्यांमुळे निर्माण होणार्‍या समस्यांपासून. आपल्या मुलांना भाजी-पोळी/भात वा आणखी काही भारतीय जेवण दिले तर ही मुले त्यांच्या शाळेत जेवताना वेगळे पडतात. आपल्या अन्नाचा सुगंध बाकीच्यांसाठी उग्र असतो त्यामुळे ते आपल्या मुलांना वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात करतात, कधि-कधि नावे पण ठेवतात, चिडवतात. मग आपली मुले डब्यात मराठी/भारतीय जेवण नको म्हणतात. तसेच त्यांच्या मनात आपल्या अन्नाबद्दल, सवयींबद्दल व एकूनच संस्कृतीबद्दल न्यूनगंड निर्माण व्हायला मदत होऊ शकते. त्यामुळे आई-वडिलांनी आपल्या मुलाला त्यांच्या शाळेत जास्तच वेगळे वाटणार नाही असे जेवण द्यावे, जसे की गुंडाळलेली पोळी-भाजी, चमच्याने खाता येणारे व सुगंध न पसरवणारे पदार्थ, वगैरे. पण यावरच न थांबता अधून मधून आपल्या सणांचे/उत्सवांचे निमित्त साधून अमेरिकन मुलांना जमेल असे पदार्थ (शंकरपाळे, साधी चकली, चुरमुर्‍याचा दाणे नसलेला चिवडा (जेणेकरुन कोणा अलर्जीवाल्याला त्रास होणार नाही), वगैरे) घेऊन शाळेत जावे. त्यांना आपल्या पदार्थांची माहिती करून द्यावा व त्यातून ते आपल्या मुलांस नावे ठेवणार नाहीत असा "ऍक्सेप्टन्स" मिळवावा. अशा प्रयोगशील पालकांनी या गोष्टींचा त्यांच्या मुलांना झालेला फायदा, त्यातून त्यांचा उंचावलेला "कॉन्फिडन्स" यांची काही उदाहरणे सांगितली. त्यातील एक म्हणजे आपल्या एका मराठी मुलाच्या मित्रांना शंकरपाळे एवढे आवडले की तो त्याच्या स्काऊट वगैरेची कमाई करण्यासाठी शंकरपाळे मित्रांना विकत असे!

एकंदरीत काय तर तुम्हाला तुमच्या जेवणाच्या सवयी सोडून द्यायची गरज नाही. तर गरज आहे ती आपल्या व त्यांच्यात सूवर्णमध्य साधन्याची.

क्रमश।

पुढील भागात आपण खालील विषयांवरील चर्चेचे अवलोकन करू या. दरम्यान आपण या भागावर आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही विनंती...
भाग २:
आपली सांस्कृतिक/धार्मिक ओळख आपल्या मुलांनी कशी निर्माण करावी? त्यासाठी आपण मुलांना आपल्या धर्माबद्दल व संस्कृतीबद्दल, केव्हा (कोणत्या वयात), काय व किती सांगावे? मुलांच्या प्रश्नांना (आपण चर्चला का जात नाही?, हॉलोवीनला टर्की का करत नाही? वगैरे) उत्तरे कशी द्यावी? मुलांना त्यांच्या मित्रांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायला कसे तयार करावे? अशा घटनांमधून मुलांच्या मनाला कसे जपावे? काय टाळावे व काय टाळायची गरज नाही?
भाग ३:
आपणास आपल्या भारतातील जवळच्या नातेवाईकांची विषेशत। आई-वडिलांची येथे सतत उणीव भासते. तसेच आपल्या मुलांना त्यांच्या आजी-आजोबांची व ईतर नातेवाईकांची भासत नसेल का? त्यांचे सर्व नातेवाईकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण व्हावेत यासाठी आपण काय करू शकतो?
भाग ४:
आपल्या मुलांच्या डेटींगच्या प्रकरणात आपला सहभाग काय? मुलांसोबतचे संबंध जपत त्यांना मदत कशी करावी? शाळेत लैंगिक शिक्षण सुरु झाल्यावर आपण त्यांच्याशी काय बोलावे व कसे वागावे?

Comments

हम्म!

या देशात आपल्या मुलांना मराठी येणे कितपत महत्वाचे आहे?

माझं मतः इतरांसमोर कोड लँग्वेजमध्ये बोलायला उपयुक्त आहे तेवढेच महत्त्व (सध्यातरी) मराठीचे आहे आणि त्यासाठी मराठीच का? हिंदी, गुजराथी किंवा 'च' ची भाषा आणि पिग-लॅटीनही चालून जाऊ शकते.

आपल्या मुलांना मोडके तोडके चार शब्द मराठीत बोलता येतात म्हणजेच त्यांना मराठी येते आणि त्यांची नाळ मराठीशी जोडलेली आहे असा अनेकांचा (गैर)समज असतो. या मुलांना मराठीत दुकानात बोलणे किंवा परक्यांसमोर मराठी फेकणे याच्यापुढे काय माहित असते? जसे, ही मुलं अमेरिकनांना कळू नये म्हणून मराठीत बोलणे पसंत करतात तसे त्यांचे आईवडिल मुलांना कळू नये म्हणून हिंदीत बोलतात आणि मराठी आणि हिंदी भाषा बर्‍यापैकी सारख्या असूनही मुलांना हिंदीचे आकलन होत नाही यावरून त्यांचे मराठीचे ज्ञान लक्षात येईल. ज्ञानेश्वर, तुकाराम, पु.ल., गदिमा इ. इ. वाचणे, समजणे, त्यावर भाष्य करता येणे, वर्तमान मराठी जगतात काय चालले आहे या फार पुढच्या गोष्टी झाल्या.

बरेचदा आपल्याला मराठी येतं, यांत त्या मुलांना काही विशेष वाटत नसतं पण त्यांच्या पालकांना त्याचं खूप विशेष असतं. अर्थात, हे दोन्ही बाजूंनी दिसतं म्हणजे 'आमच्या मुलाला मराठी येतं' आणि 'त्याच्याशी मराठीत बोलून उपयोग नाही त्याला मराठी अजीबात येत नाही' ही दोन्ही वाक्ये पालक सारख्याच अभिमानाने उच्चारतात. (पैकी दुसरे वाक्य खुद्द मुंबईतच अनेकदा ऐकले आहे.)

अमेरिकेत, मला अद्याप एकही मूल भेटले नाही जे मराठी अस्सखलित वाचते किंवा लिहिते. बोलणारे खूप आहेत. माझी कन्या मराठी आणि हिंदी दोन्ही भाषा व्यवस्थित बोलते. तिला मराठी-हिंदी चित्रपट पाहण्यातही खूप रस असतो. तिला दोन वर्षे मराठी लिहायला शिकवून पाहिले. काही दिवसांत उत्साह मावळला. त्यापेक्षा हॅरी पॉटरचे खंड वाचणे ती पसंत करते. आता इथे "टॉर्चर" होते का ते माहित नाही पण कला आणि विद्या आवडीशिवाय येत नाहीत. तेव्हा ते सोकॉल्ड टॉर्चर करावे असे मला वाटले नाही.

यापुढे जाऊन असे म्हणावेसे वाटते की शाळेत जाणारे अमेरिकन मूल हे बाहेरच्या जगात (शाळेत आणि इतर कार्यक्रम) जितके तास वावरते त्याच्या निम्मे तासही घरात वावरत नाही. अठरा वर्षांनंतर मुले घरातही राहात नाहीत तेव्हा मराठीचा यज्ञकर्म थोडक्यात खुंटतो असा अनेकांचा अनुभव आहे.

असो. भाषा समजणे आणि मोडकी तोडकी बोलणे म्हणजे भाषा येणे नाही. भाषा येणे या शब्दात जो खोलपणा आहे (बोलणे, वाचणे, लिहिणे, व्याकरण, साहित्य, काव्य) तो मी एकाही अमेरिकन मराठी मुलात पाहिलेला नाही. (अपवाद नसतीलच असे नाही पण ते अपवादच ठरावेत.) त्यामुळे हे "भाषा येणे" १६-१७ व्या वर्षापासून विरायला लागते असेही पाहिलेले आहे. मराठी मंडळाच्या कार्यक्रमाला येणारी अनेक तरूण मुलं/ मुली (वय : १८+, जन्मः अमेरिका, घरातून बाहेर पडलेले) आलेच तर आई-वडिलांनी दाव्याला बांधून आणल्याप्रमाणे येतात. एका जागी बसून २-३ तास घालवतात, खातात आणि चालू पडतात असा अनुभव आहे.

बाकी, खाद्यपदार्थ, कला, नृत्य, गायन यांतून नाळ बांधली राहणे शक्य आहे. त्यात शारिरीक ऍक्टीविटीज अधिक आहेत. सुनीता विल्यम्स अंतराळात समोसे घेऊन गेल्याची कथा प्रसिद्ध झाली होती.

अवांतरः हॉलोवीनला टर्की का करत नाही - टर्की थँक्स गिविंगला करतात. हॅलोवीनला आपणच टरकायचं असतं. ह. घ्या.

प्रियाली यांस

प्रियाली-ताई,

आपला प्रतिसाद वाचताना पुन्हा एकदा कालच्या चर्चासत्रात गेल्यासारखे वाटले. :)

आणि त्यासाठी मराठीच का?
-- हे चर्चासत्र मराठी भाषकांनी, मराठी भाषकांसाठी आयोजित केलेले असल्याने त्यावर केवळ मराठी-इंग्रजी यावर चर्चा झाली. तसेच हिंदीसह इतर भारतीय भाषांचा ओघवता उल्लेख आपण केला तसा झाला.

या मुलांना मराठीत दुकानात बोलणे किंवा परक्यांसमोर मराठी फेकणे याच्यापुढे काय माहित असते?
--तेच तर. परंतू अशाच काही छोट्या-छोट्या गोष्टींमधून या मुलांचा मराठीशी संबंध तर टिकून राहतो.

पैकी दुसरे वाक्य खुद्द मुंबईतच अनेकदा ऐकले आहे.)
--होय, कालच्या चर्चासत्रात एका मुलीचा या विषयावरील अनुभव फार बोलका होता. ती जेव्हा भारतात गेली होती तेव्हा तिची चुलत का मामेबहीन तिच्याशी इंग्रजी बोलत होती व ही तिच्याशी मराठी! त्या भारत स्थित मुलीच्या आईवडिलांचे पण हिला इंग्रजी बोल, इंग्रजी बोल असे चालले होते म्हणे.

यापुढे जाऊन असे म्हणावेसे वाटते की शाळेत जाणारे अमेरिकन मूल हे बाहेरच्या जगात (शाळेत आणि इतर कार्यक्रम) जितके तास वावरते त्याच्या निम्मे तासही घरात वावरत नाही. अठरा वर्षांनंतर मुले घरातही राहात नाहीत तेव्हा मराठीचा यज्ञकर्म थोडक्यात खुंटतो असा अनेकांचा अनुभव आहे.
--हो, हा मुद्दा मी नोंदवायचा विसरलो. कृपया माझा नवीन प्रतिसाद पाहा.

मराठी मंडळाच्या कार्यक्रमाला येणारी अनेक तरूण मुलं/ मुली (वय : १८+, जन्मः अमेरिका, घरातून बाहेर पडलेले) आलेच तर आई-वडिलांनी दाव्याला बांधून आणल्याप्रमाणे येतात. एका जागी बसून २-३ तास घालवतात, खातात आणि चालू पडतात असा अनुभव आहे.
-- याचर्चा सत्रात आलेली मुले २१-२२ वर्षांची होती व त्यांनी खूप सक्रीय सहभाग नोंदवला. पुढील भागात त्यांच्या अनुभवांना मी टिपणार आहे.

अवांतरः हॉलोवीनला टर्की का करत नाही - टर्की थँक्स गिविंगला करतात. हॅलोवीनला आपणच टरकायचं असतं. ह. घ्या.
-- चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आभार. :)

आपला,
(गुर्‍हाळी) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

१८+ वयांची मुले

याचर्चा सत्रात आलेली मुले २१-२२ वर्षांची होती व त्यांनी खूप सक्रीय सहभाग नोंदवला. पुढील भागात त्यांच्या अनुभवांना मी टिपणार आहे.

वा! हे अनुभव वाचायला खूप आवडतील. याबरोबरच शक्य असल्यास या वयांतील मुलांत अमेरिकेत जन्मलेली आणि भारतात जन्मलेली, तिथे दोन-चार वर्षे का होईना पण वाढलेली आणि नंतर अमेरिकेत आलेली मुले किती हा आकडा तुम्हाला मिळाला तर पाहाल का?

मला असा अनुभव आहे की भारतातून जन्मलेली आणि नंतर इथे आलेली मुले ऋणानुबंध टिकवण्यास थोडी अधिक उत्सुक दिसतात.

पु. ले. शु.

कर्मभुमी की जन्म भुमी?

या देशात आपल्या मुलांना मराठी येणे कितपत महत्वाचे आहे?

आपण परत भारतात जाणार आहोत काय? यावर ते अवलंबून आहे. उर्वरित प्रियालीच्या मताशी सहमत आहे.
मुलांना मराठी येणे ही पालकांची भावनिक गरज आहे.

आपण या समाजाच्या मुख्य प्रवाहात का व कसे सामिल व्हायला हवे? उदाहरणार्थ आपल्या अन्नाच्या सवयींमुळे मुलांना येथे काही सामाजिक त्रास होतात का? आपण या सवयी बदलायला हव्यात का? कशामुळे व कशाप्रकारे?

मुस्लीम इतके वर्ष भारतात रहातात. गेली काही शतके. बरेचसे इथेच धर्मांतरीत झाले . तरी इथेले लोक त्यांना आपले मानायला तयार नाहीत. मुख्य प्रवाहात सामील होणे अपरिहार्य आहे, तसे केले नाही तर वेगळेपणा हा संघर्ष निर्माण करेल. कर्मभुमी महत्वाची कि जन्मभुमी हा पुढच्या पिढिला कदाचित कमी पडेल.

पुढची झलक दिल्याने वाचण्यास आसुसलेला.

प्रकाश घाटपांडे

भावनिक गरज

मुलांना मराठी येणे ही पालकांची भावनिक गरज आहे.

अगदी! मनातलं बोललात आणि बरेचदा पालक मुलांना खरंच टॉर्चर करताता की काय असेही वाटण्याइतपत उदाहरणे पाहिलेली आहेत. उलटपक्षी, ही काही मुलांची गरजही असू शकते. विशेषतः जर त्यांचे ऋणानुबंध मराठीशी जुळलेले असतील तर. जसे, माझ्या मुलीला आजी-आजोबांशी इंग्रजी बोलण्यापेक्षा मराठीत बोलायला आवडते आणि ती त्यांच्याशी फोनवर आवर्जून मराठी बोलते. त्यामागे, मी इंग्लिशमध्ये बोलले तर त्यांना काही कळतच नाही (ऍक्सेंटमुळे) अशी तिची तक्रार असते. इंग्लिश बोलून त्यांना काही कळलं नाही किंवा पुन्हा पुन्हा तेच सांगावं लागलं तर तिला वाईटही वाटतं. तेव्हा ही तिची भावनिक गरज आहे.

पण भाषा लिहिणे आणि वाचणे ही तिची सध्यातरी गरज नाही.

मुख्य प्रवाहात सामील होणे

हो, हा मुद्दा सर्वांनीच मांडला व मान्य केला की आपण येथे राहणार असू तर येथील मुख्य प्रवाहात लवकरात लवकर सामील व्हायला हवे. कदाचित मी हा मुद्धा या भगात व्यवस्थित मांडु शकलो नाही. पण पुढील भागांत हा पुन्हा येणार आहेच.

आवांतर - या चर्चसत्रात आयोजकांनी याच विषयावरील अपर्णा वेलणकरांचे "फॉर हिअर, ऑर टू गो?" हे पुस्तक विक्रीस ठेवले होते. चाळत असताना ते खूप चांगले वाटले. वाचून प्रतिक्रिया देईन.

आपला,
(प्रवाही) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

विसरलेले मुद्दे

मराठी येण्याची चर्चा चालू असताना आलेले दोन मुद्दे वरील लेखात द्यायचे मी विसरलो. त्याबद्दल क्षमस्व. ते मुद्दे असे...

१. वरीष्ठ पालक (ज्यांची मुले मोठी झाली आहेत) तसेच त्यांची मुले यांना १५-२० वर्षापूर्वी आपले मराठीपण टिकवून ठेवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष हा आजच्या पेक्षा कठीण होता. कारणे दोन आहेत. एक, त्यावेळी येथे आपली लोकसंख्या खूपच कमी असल्याने मुलांना आई-वडिलांव्यतिरिक्त कोणाशी मराठी बोलायलाच मिळत नसे. आता मात्र मराठी कार्यक्रमांव्यतिरिक्त मित्रांच्या घरात, दुकानांत, मंदिरात बरेचदा मराठी बोलायला मिळते. दूसरे म्हणजे आता मुलांसाठी भरपूर डीव्हिडी विकत मिळतात. काही मुलांना तर कार्स, मेडागस्कर पेक्षा जिंगल-टून्सचा चॉकलेटचा बंगला जास्त आवडतो असे कळले. तसेच आता अल्फा मराठी, सह्याद्री वगैरे येथे घरोघरी पोचले आहेत. या कारणांमुळे मुलांना मराठी शिकन्यासाठी जास्त वाव मिळतो. कार्टुन्स हे असे प्रभावी माध्यम आहे की जे शाळेतल्या आठ तासाच्या शिकवणी ईतकेच दोन तासांत मुलांना शिकवू शकते. त्यामुळे आठ-दहा तास इंग्रजी वातावरणात राहिलेले मुले तास-दोन तास मराठी वातावरणात राहिले की त्यांना दोन्ही भाषा उत्तम बोलता येतात.

२. एका आजोबांनी उपस्थित केलेला मुद्दा: चीनचा पुनर्वोदय झाल्यापासून अमेरिकेत चीनी भाषा शिकण्याकडे बरेच लोकांचा कल आहे. भारताचीही घोडदौड चालू आहेच. पुणे-औरंगाबाद-कोल्हापूर-नाशिक-नागपूर येथे जर आंतराष्ट्रीय उद्योगांची भरभराट झाली तर मराठी येत असणार्‍या अमेरिकन तरूणांना नवीन दालणे उघडली जातील. अर्थात ती जर मराठी मुले असतील तर त्यांना पुन्हा आपल्या पूर्वजांच्या भूमीत जायला आवडेल जसे आता यूरोप मूळ असलेल्यांना युरोपात जायला आवडते. हा खूप मोठा आशावाद वातला तरी दुसर्‍या महायुद्धातल्या विंड-टॉकर्स नंतर अमेरिकेत अल्पसंख्यांकांच्या भाषेला आलेल्या महत्वामुळे शासन दरबारी सुद्धा एखादी परदेशी भाषा येत असल्यास नक्कीच फायदा होतो.

आपला,
(विसराळू) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

दाय फायका?

आजोबा नं १ यांच्या म्हणण्यात तथ्य आहे.

एक अजोबा: येत्या दोन-तीन दशकात मराठीचा वापर खुद्द महाराष्ट्रातच कमी होणार आहे. तर येथे मुलांवर "मराठी बोल, मराठी बोल" अशी बळजबरी का बरे करावी? मला वाटते मराठीचा अट्टाहास आपण सोडला पाहिजे. कारण ती या मुलांची ज्ञान-भाषा नाही, ती यांना वाचता येण्याची शक्यता कमीच आहे ज्यामुळे त्यांना तिची गोडी लागणार नाही आणि गोडी लागली नाही तर ते ती पुढच्या पिढीला कशी देणार? मग जर मराठी आपल्या पुढच्या दोन पिढ्या सुद्धा जगणार नाही, तर मग या मुलांचे "टॉर्चर" का?

पुण्यात रस्त्यावर व दुकानात पहिले वाक्य मराठीत ऐकले की आनंदातिशयाने हॄदय बंद पडेल की काय अशीच भीती वाटते. जरा चांगले कपडे बिपडे घातले की भेटणारा कोणीही लगेच हिंदीच सुरु करतो. त्यामुळे मधून मधून मळके व गबाळे कपडे घालून मराठीपण सिद्ध करावे लागते.

-(मराठी) आजानुकर्ण

अभिमान वगैरे गोष्ट जरा बाजूला ठेवली तर अमेरिकेतील "मराठी" मुलांना (सेकंड जनरेशन-दुसरी पिढी) मराठी येण्याचा तसा काय फायदा आहे? अमेरिकेतील संस्कॄतीशी समरस होणे, स्वतःचे सांस्कृतिक व वांशिक वेगळेपण न दर्शवणे या गोष्टी त्यांच्यासाठी फायदेशीर व योग्य आहेत असे वाटते.

-(फायदेशीर) आजानुकर्ण


आम्हाला येथे भेट द्या.

फायदा

माझी मुलगी व्यवस्थित मराठी बोलते. पण मी तिला मराठी शिकण्याच्या शाळेत घातलेले नाही. पाच दिवस नेहमीच्या शाळेत गेल्यावर परत रविवारी तिने मराठीसाठी शाळेत जाणे हे मला तेवढेसे आवश्यक वाटत नाही. पण मी घरी जमेल तेवढी अक्षर ओळख करून देते - आणि काही गोष्टी/गाणी मराठीतूनही सांगते. मराठी गाण्यांचे अर्थ सांगते. भाषेतून संस्कृती पुढे जाते म्हणतात, तेवढे मी थोड्याफार प्रमाणात करू शकले तर मला बरे वाटेल, इथे समरस होण्यासाठी तिचा भाषेशी आहे तोही संबंध तोडण्याची गरज मला वाटत नाही. आमच्या घरात नैसर्गिकपणे मराठीच बोलले जाते अर्थात ती ते आपोआप शिकली आहे. यापलिकडे प्रियाली म्हणते तसे मराठी किंवा मातृभाषा "येत" असले (म्हणजे व्याकरण वगैरे सर्व) तर माझ्या मते दुधात साखर.

अजून एक म्हणजे मुलीचे नात्यातील लोकांशी व्यवस्थित संबंध ठेवणे हेही मी करते - मराठी येते का यापेक्षा तिला त्यांच्यात परके वाटू नये एवढ्यासाठी मी तिला ते दूर असले तरी आमच्या घरातल्या गोष्टी सांगत तिच्या मनात तिकडची नाळ ठेवायचा प्रयत्न करते. आणि इथल्याही मैत्रिणींना घरी बोलावणे, त्यांच्याकडे मुलीला पाठवणे, शाळेतल्या गोष्टींमध्ये भाग घेणे यासारख्या गोष्टी करते.

"स्वतःचे सांस्कृतिक व वांशिक वेगळेपण न दर्शवणे या गोष्टी त्यांच्यासाठी फायदेशीर व योग्य आहेत असे वाटते. "
वेगळेपण दर्शवायचे नाही म्हणजे काय करायचे ह्या प्रश्नाने मात्र माझी पंचाईत होणार!

अनुभव

मी पालक नाही त्यामुळे साहजिकच अनुभव माझे नाहीत. मुले आणि भाषा यांच्या अनुषंगाने माझ्या माहितीतील अनुभव इथे सांगावेसे वाटतात.
इटलीमध्ये आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत भारतातील एक शास्त्रज्ञ त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह आले होते. इथे त्यांचे जवळजवळ अडीच तीन महिने वास्तव्य होते. परत गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की त्यांची मुले इटालियन बोलायला शिकली आहेत. मग मुलांच्या लक्षात आले की आपल्या आई-बाबांना इटालियन समजत नाही. तेव्हापासून आईबाबांच्या समोर काही शीक्रेट बोलायचे असेल तर मुले इटलियनचा वापर करत असत. :)
दुसरे एक कुटुंब ओळखीचे होते. त्यात आई उत्तर प्रदेशातील आणि बाबा बंगाली. त्यांच्या मुलाला त्यांनी बंगाली, इंग्रजी आणि हिंदी अशा तीन भाषा शिकवल्या होत्या. आणि तो पठ्ठाही आरामात आईशी हिंदी आणि बाबांशी बंगाली बोलत असे.
लहान मुलांमध्ये कुठलीही भाषा अतिशय चटकन आत्मसात करण्याचे प्राविण्य असते. काहींच्या मते हा जनुकीय गुणधर्म आहे. अर्थात हा भाग भाषा येण्याबद्दल आहे. त्या भाषेत वाचन, लेखन करणे याबद्दल मांडलेले वरचे मुद्दे पटण्यासारखे आहेत.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

बोध

परत गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की त्यांची मुले इटालियन बोलायला शिकली आहेत.
-- यातून आपण असा बोध घ्यावा .... "मुलांना घेऊन इटलीला जाऊ नये". ह. घ्या. :)

उत्तम चर्चा

या लेखात (चर्चा सत्रात) उत्तम चर्चा चाललेली दिसते आहे.
आवडली. मते महत्वपूर्ण वाटली.

महाराष्ट्रातच भाषा मागाच्या पीढीपासून मरायला लागली आहे अशी ओरड करून काय उपयोग?
ज्यांना यात रस आहे ते ती जीवंत ठेवतीलच.
भावनिक, नातेवाईक अशी कारणे असली तरी, जेंव्हा मी कोण व कुठुन... हा पुरातन प्रश्न य नव्या पीढीला येईल , तेंव्हा ही तुट्पुंजी माहितीका होईना काहीसा आधार देवून जाईल असे वाटते!

आपला
गुंडोपंत

पटले

भावनिक, नातेवाईक अशी कारणे असली तरी, जेंव्हा मी कोण व कुठुन... हा पुरातन प्रश्न य नव्या पीढीला येईल , तेंव्हा ही तुट्पुंजी माहितीका होईना काहीसा आधार देवून जाईल असे वाटते!
-- १००% पटते.

आम्ही बोलायचं का ?

भास्करराव ! उत्तम चर्चा आणली राव तुम्ही !
अमेरिकेतील मराठी माणसांनी मराठी बोलले पाहिजे, कमीत कमी मराठी माणसांशी भेटीगाठी होत असतील तेव्हा आणि आपल्या मुलांनाही मराठी आली पाहिजे , कधीतरी ते मराठी साहित्यही वाचतील हे आमचे ढोबळ मत. आता तिथे सार्वजनिक ठिकाणी मराठी काय उपयोगाची या प्रश्नाचे उत्तर आम्हाला तरी वाटते तिथे ती उपयोगाची नसावी, असे वाटते.

अनुक्रमे जे आजोबा बोलले त्यातील पहिल्या क्रमांकाच्या आजोबाच्या विचारातील येत्या दोन-तीन दशकात मराठीचा वापर खुद्द महाराष्ट्रातच कमी होणार आहे.या बाबत आमचे मत असे की, अनेक दशकापासून असे बोलले जात असल्यामुळे त्या बाबतीत फार चिंता करण्याची गरज नाही. आता आम्ही ज्या भागात राहतो तो भाग जरासा मागासलेला आहे, अजूनही येथे मराठीचे अ,आ,इ,ई गिरवणे चालू आहे. म्हणजे अजून त्यांना चांगले मराठी येण्यासाठी काहीएक दशकाचा काळ जाणार आहे, तेव्हा मराठीला महाराष्ट्रात अजून काहीएक वर्ष तरी धोका नाही, असा निरोप त्या आजोबांपर्यंत पोहचवा इतकेच आमचे सांगणे..................बाकी अमेरिकेतील मराठी लोकांच्या चर्चा वाचायला मजा येत आहे, पुढील चर्चेच्या प्रतिक्षेत ! :)

आपला..
महाराष्ट्रातून मराठी हद्दपार झाली तर कोणती भाषा शिकावी या विवंचनेत असलेला.
प्रा.डॊ........................

तेव्हा

महाराष्ट्रातून मराठी हद्दपार झाली तर कोणती भाषा शिकावी या विवंचनेत असलेला.
-- तेव्हा आपण वरती गेलेलो असू व देवाशी देववाणीत गप्पा मारत असू. कदाचित तोपर्यंत तिथे सुद्धा अशी संकेतस्थळे चाळायला मिळू लागतील. तसे झाले तर आपण तिथे सुद्धा अशाच चकाट्या पिटत बसू. :)

आपला,
(गप्पा प्रेमी.... गप्पिष्ट नव्हे बरे!) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

एक उपप्रश्न ! :)

<<तेव्हा आपण वरती गेलेलो असू व देवाशी देववाणीत गप्पा मारत असू. कदाचित तोपर्यंत तिथे सुद्धा अशी संकेतस्थळे चाळायला मिळू लागतील. तसे झाले तर आपण तिथे सुद्धा अशाच चकाट्या पिटत बसू. :)


देव बहूतेक संस्कृत मधून बोलतील किंवा इंग्रजीमधून. आम्हाला येते ती फक्त थोडी मराठी आणि जास्त बोली. तेव्हा त्यांच्याशी आमचा संवाद कसा व्हायचा, होईल तो विसंवाद ! कारण देवाच्या संकेतस्थळावर गप्पांसाठी अनुमतीची प्रतिक्षा करावी लागेल. तेव्हा तिथे बंड करुन देवांच्या विरोधात 'आपली बोली, माय मराठी' असे संकेतस्थळ चालू करावे लागेल. त्यासाठी इहलोकातून आताच सद्स्य नोंदणी करुन घ्यावी म्हणतो ! :)

आपला
गप्पाप्रेमी.
प्रा.डॉ.........

बोलून मराठी

केवळ बोलून मराठी भाषा जिवंत राहणार नाही हे खरं आहे आणि जी गोष्ट माणसाला उपयोगाची नसते ती तो कळत-नकळत नष्ट करतो. माणसाचे शेपूट असेच नकळत नष्ट झाले आणि कळत त्याने किती गोष्टी नष्ट केल्या त्याची क्रमवार माहिती द्यायला पानंच्या पानं अपुरी पडतील.

पहिल्या आजोबांचे म्हणणे जहाल आहे पण पटकन सोडून द्यावे इतकेही खोटे नाही. मुंबई-पुण्याबाहेर मराठी जिवंत राहिल पण नोकरी धंद्यानिमित्त या शहरांत येणारा लोंढा इथल्या लोकांप्रमाणेच मराठीला विसरायला लागतील, इथून त्यांच्या पिढ्या परदेशांत पोहोचतील. मुंबईचं सांगतो की मध्यमवर्गापासून वरील वर्गांतील कोणाचीही मुले मराठी माध्यमातून शिकत नाहीत. भावी अमेरिकेत जाणारी पिढी हीच आहे. तळागाळातील लोक अमेरिकेला पोहोचले अशी उदाहरणे कमीच दिसतात. त्यामुळे अमेरिकेतील येणार्‍या पिढ्यांची मराठीबद्दल आस्था कमीच होत जाईल. आपण कुठून आलो आणि मी कोण हे जाणून घ्यायला मराठी भाषेची गरज नसावी. इंग्लीशमध्येच त्यांना ते शिकता येईल.

खाण्यापिण्यातूनही आपण इतरांपेक्षा सतत वेगळे आहोत - सतत म्हणजे रोज डब्यातून देशी पदार्थ देणे इ. - हे दाखवण्यापेक्षा इतरांत स्वत:ला सामील करून बाहेर त्यांच्याप्रमाणे खावे आणि घरात भारतीय खाणे बनवावे, त्याहीपेक्षा चांगला उपाय म्हणजे आपले खाणे तेथे प्रसिद्ध करावे. चिनी अश्याचप्रकारे पुढे गेले असावेत आणि पंजाबी आणि दाक्षिणात्यही. मराठी माणसाचे उपहारगृह आहे का हो परदेशांत कोठे?

मराठी माणसाचे उपहारगृह आहे का हो परदेशांत कोठे

मराठी माणसाचे उपहारगृह आहे का हो परदेशांत कोठे?
--आहे की, आमच्या गावात शेखर नाईक या मराठी माणसाचे "ऍम्बॅसिटार ऑफ इंडिया" नावचे तीन उपहारगृहे आहेत. ते कार्यक्रमांना मराठी पदार्थ पाठवण्यावर भर देतात. लोकांना पुरणपोळी, आंब्याचा रस, आळू-वडी, ठेचा, भरले वांगे असे पदार्थ फार आवडतात.

खाण्यापिण्यातूनही आपण इतरांपेक्षा सतत वेगळे आहोत - सतत म्हणजे रोज डब्यातून देशी पदार्थ देणे इ. - हे दाखवण्यापेक्षा इतरांत स्वत:ला सामील करून बाहेर त्यांच्याप्रमाणे खावे आणि घरात भारतीय खाणे बनवावे,
-- बहुतांशी लोक हेच करतात. पण काही मुलांना भारतीयच जेवनच हवे असते अशा पालकांसमोर प्रश्न उभा राहतो.

त्याहीपेक्षा चांगला उपाय म्हणजे आपले खाणे तेथे प्रसिद्ध करावे.
-- ते हळू-हळू होत आहे. जर काही बड्या उद्योजकांनी लक्ष देऊन चांगली उपहारगृहे उभारली तर ते लवकर होईल.

आपला,
(उपहारगृह प्रेमी) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

सुंदर

भास्करपंत,

आपण या चर्चासत्राची अतिशय नेटकी माहिती दिली आहे. त्यात उपस्थित झालेले मुद्दे चर्चा, विचार करण्यायोग्य आहेत आणि त्यावर एक चांगली चर्चा वाचल्याचे समाधानही प्रतिसादांतून मिळाले. पुढील भागात काय येणार याची माहिती उत्सुकता वाढवणारी आहे.

आपला
(वाचक) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

सहमत

वासुदेवरावांशी सहमत आहे...

आपला
गुंडोपंत

आभार!

लेख लिहिताना मला आपल्या जागृत उपक्रमींचा सहभाग येणार हे अपेक्षित होतेच. पण येवढे सगळेजन प्रोत्साहन देतील याची कल्पना नव्हती. कनेटिकट महाराष्ट्र मंडळाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी सुद्धा पाठ थोपटली तेव्हा खरेच आनंद झाला आता पुढील भाग लिहायला चांगलाच उत्साह संचारला आहे.

प्रियाली ताई, आपण चर्चेच्या सुरुवातीलाच विधायक दिशा दिल्याने चर्चा पुढे रंगात यायला मदत झाली.

घाटपांडे साहेबांनी विसरलेला मुद्दा लक्षात आणून दिला.

आजानुकर्ण, तुमची पुण्यात मराठीपण सिद्ध करण्याची गंमत गमतीशीर आहे. पण तिचे वास्तव मात्र भितीदायक आहे.

चित्राताई, तुमच्या रुपाने या चर्चेत आणखी एका आईचा सहभाग झाला.

राजेंद्रपंत, प्रत्यक्ष मैदानात उतरायच्या अगोदर विषयाचे ज्ञान असणे कधीही फायदेशीर असते. तसेच आपल्यासारख्यांच्या अपक्षांच्या मताला महत्व आहेच.

गुंडोपंत, "ज्यांना यात रस आहे ते ती जीवंत ठेवतीलच"हा आपला मराठमोळा रांगडा दृष्टीकोन आवडला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, चला आपण कामाला लागू अन मायबोलीच्या सदस्यांची नोंदणी करूनच "तेथे" जाऊ.

वासुदेवराव, आपल्या उत्सुकतेला योग्य न्याय द्यायचा प्रयत्न हा पामर नक्कीच करेल.

आपणा सर्वांचे आभार.

आपला,
(भारावलेला) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

भाग २

येथे आहे
http://mr.upakram.org/node/822

येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे

 
^ वर