चला बोलू या - भाग ३

भाग १ येथे आहे.

भाग २ येथे आहे.

भाग ३ सुरु... आयोजकांनी पुढील मुद्दा मांडला.

आपणांस भारतातील आपल्या जवळच्या नातेवाईकांची विषेशत। आई-वडिलांची येथे सतत उणीव भासते. तसेच आपल्या मुलांना त्यांच्या आजी-आजोबांची व ईतर नातेवाईकांची भासत नसेल का? त्यांचे सर्व नातेवाईकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण व्हावेत यासाठी आपण काय करू शकतो?

या विषयावर विषेश गरमागरमी झाली नाही. आपल्या मुलांनी आजी-आजोबा तसेच इतर नातेवाईकांशी दूरध्वनीवर बोलावे, आपण चर्चेच्या ओघात आपल्या नतेवाईकांची माहिती आपल्या मुलांना द्यावी, भारतात गेल्यावर सर्वांशी भेटावे, मुलांना आपल्या नातेवाईकांच्या मुलांमध्ये मिसळण्यासाठी प्रोत्साहित करावे असे विचार मांडण्यात आले. त्यातला एका आईने त्यांच्या मुलीबद्दलचा किस्सा सांगितला.

एक तरूण आई: आमची मुलगी भारतात गेल्यावर तिथल्या मुलांशी मराठीतून बोलत होती. ते मात्र तिच्याकडे अमेरिकन म्हणून पाहात होते. ती जेव्हा मराठी बोलू लागली तेव्हा त्यांचा तिला आग्रह होता की तू इंग्रजीतून बोलून दाखव. हिला मात्र ते जरा वेगळे वाटत होते. तेव्हा आपण जरी आपल्या मुलांना साधरण मराठी घरातील मुलांसारखे वाढवत असू तरी आपल्या भारतातल्या नातेवाईकांनी त्यांच्याशी अन्य नातेवाईकांप्रमाणे सामान्य वागायला हवे.

आणखी एक पालक: दूरध्वणीवरून बोलताना मुलांना येणारा प्रश्न म्हणजे त्यांची बोलण्याची शैली. त्यांचा इंग्रजी शैलीतून मराठी बोलण्याचा प्रयत्न असतो पण तिकडे कोणाला हे काय म्हणतात ते समजत नाही. तेव्हा आमच्या मुलाने आजी आजोबांना त्याचे मराठी समजावे यासाठी शक्य तेवढे मराठीतून बोलण्याचा सराव सुरु केला. म्हणजेच याला त्यांच्याशी बोलणे आवडत होते हे आम्ही पाहिले. जे की आनंददायक होते.

यानंतर कोणाकडून काही प्रतिसाद येता नाहीत हे पाहून आयोजकांनी पुढील मुद्दा चर्चेला घेतला. (पहिले दोन मुद्दे संपायला नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ लागल्याने येथे कात्री मारायची संधी सोडण्यात काय अर्थ असा विचार त्यांनी केला असावा).

भाग ४

आयोजक : तर मंडळी आता आपल्याला असा मुद्दा चर्चेला घ्यायचाय ज्याच्यावर आपण सहसा चर्चा करत नाही. अजूनही आपल्या मनात या विषयाचा ट्याबू थोड्या फार प्रमाणात असतोच. पण विषय आपल्या मुलांच्या जडणघडणीसाठी खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे आपल्या मुलांच्या डेटींगच्या प्रकरणात आपला सहभाग काय? मुलांसोबतचे संबंध जपत त्यांना मदत कशी करावी? शाळेत लैंगिक शिक्षण सुरु झाल्यावर आपण त्यांच्याशी काय बोलावे व कसे वागावे?

पालक १: मला वाटते आपले आपल्या मुलांशी मैत्रीचे, विश्वासाचे संबंध असतील तर हा विषय हाताळताना काही त्रास होत नाही. शिवाय आपण एक पालक म्हणून त्यांच्या जडण घडणीची, संस्कारांची चांगली काळजी घेऊन आपली जबाबदारी चांगली निभवत आला असाल तर त्याचा या काळात खूप फायदा होतो. पण एक सूचना म्हणून मला असे म्हणायचे आहे की आपल्या मनात मुलाची काळजी नसते मात्र मुलीची असते. त्या काळजी पोटी आपण कधीही मुलीला असे म्हणू नये की बाई तू मुलगी आहेस म्हणून रात्री उशीरापर्यंत बाहेर रहात जाऊ नकोस असे सांगितलेत तर ती तुमच्यावर चिडेल कारण येथे मुला मुलीत फरक न करता त्यांना वाढवले जात असल्याने हा केवळ मुलगी म्हणून केलेला भेदभाव तिला सहन होणार नाही.

डॉक्टर : मुलगा असो वा मुलगी. आपण दोघांनाही डेटींगच्या परिणामांची माहिती वेळोवेळी (स्टेप बाय स्टेप) देत जावी. त्यांचे सगळे मित्र जर डेटिंगला जात असतील तर तुम्ही या देशात त्यांना आडवू शकत नाही. परंतू जर त्यांना तुम्ही व्यवस्थित माहिती दिलेली असेल तर काळजी करायची गरज नाही. मात्र त्यांना ताकीद जरूर द्यावी.

पालक २: ही ताकीद कशा सवरूपाची असावी?

डॉक्टर : ते सर्वस्वी तुमच्यावर आहे. पण एक चांगली ताकीद म्हणजे... "हे बघ, तुला काय करायचे ते सदसदविवेक बुद्धिने कर. पण जर त्याचे काही लोण घरापर्यंत आणू नकोस. प्रेग्नन्सी हा विषय जर तू घरी आणलास तर तुला घराचे दार बंद आहेत हे लक्षात ठेव." मुलांना अशी ताकिद दिली की ते सुद्धा जपून वागतात जेणेकरून त्यांच्या आयुष्यात पुढे काही प्रश्न उभे राहणार नाहीत.

आयोजक : पण मुलांना डेटींग बद्दल माहिती कधी द्यावी. म्हणजे कोणत्या वयात?

शिक्षिका (अमेरिकेत वाढलेली): आपल्याला आपली मुले लहान आहेत असे जरी वाटत असले तरी टीव्ही, चित्रपट, मित्र यांच्या माध्यमातून त्यांना खूप काही अगोदरच कळालेले असते. त्यांच्या मनात या विषयाबद्दल कुतुहल जागृत झालेले असते. अशा वेळी त्यांना योग्य ती माहिती देण्यात यावी म्हणून पाचव्या वर्गात त्यांना अगदी मूलभूत गोष्टी शिकवल्या जातात. जसे की शरीराबद्दल माहिती, मुला-मुलींतले फरक तसेच यापुढे त्यांच्या शरिरात अपेक्षित असलेले बदल वगैरे. सहाव्या वर्षापासून पुढे टप्प्याटप्प्याने सेक्स बद्दल माहिती शिकवली जाते. या शिकवण्याचा उद्देश हा ठेवलेला असतो की मुलांना जसे आपण खातो, पितो, झोपतो, व्यायाम करतो, तसेच सेक्स सुद्धा एक सामान्य बाब आहे हे शिकवणे तसेच त्यांच्या मनात काहीतरी चुकीच्या कल्पना तयार होण्यापासून रोखणे हा असतो.

पालक: पण ही माहिती स्विकारण्याची मुलांची कितपत तयारी असते? त्यांना हे समजते का?

शिक्षिका: या विषयावर माहिती देण्यासाठी विषेश तज्ञांची नेमणुक केलेली असते. ते मुलांना समजेल अशा भाषेत खेळी मेळीने शिकवतात. जवळ जवळ सर्व मुले त्यांच्याशी चर्चेत भाग घेतात. माझ्याच वर्गात एक मितभाषी मुलगी होती. माझ्या वर्गातल्या मुलांसमवेत शिक्षिका म्हणून मला पण त्यांच्या सेशनला जावे लागले. तिचे प्रश्न ऐकून मला तर धक्काच बसला. एखाद्या तरुण व्यक्तीला असावे असे ज्ञान तिला या विषयावर होते हे तिच्या प्रश्नांवरुन लक्षात येते होते.

मानसोपचार तज्ञ : तुम्ही तुमच्या मुलांशी सतत संभाषण ठेवायला हवं. मूल शाळेत जाऊ लागल्यावर ते दिवसभर काय करतं हे पुम्ही जाणून घेत असता, त्याला काय घडलं ते विचारत असता. यातून तुमच्या मुलाला तुमच्याशी संभाषण ठेवायची सवय लागते. ही सवय बंद होऊ देता कामा नये. मग तुमची मुलं तुमच्याशी सगळे बोलू लागतात. शाळेत काही विषेश शिकवले तर, खेळांविषयी काही माहिती असेल तर, अथवा त्यांनी काही निरिक्षण केले तर ते तुम्हाला सांगत राहतात. तसेच या विषयाचे सुद्धा आहे. तुमची मुले काय प्रश्न विचारत आहेत यावरुन त्यांच्या मनात काय चाललं आहे याचा अंदाज येतो. अर्थात तुम्ही त्यांना बोलतं ठेवायला हवं.

आयोजक : येथे वाढलेल्या तरुणांपैकी कोणाला काही मांडायचं आहे?

अ.म.त. (अमे. मराठी तरुण) : मला तरुण पालकांना हे सांगायचं आहे की तुम्ही खूप जास्त काळजी करु नका. दे विल बी ऑलराएट. त्यांच्यावर विश्वास ठेवा. माझे आई-बाबा मित्र आहेत. त्यांच्याशी मी मोकळेपणाने बोलू शकतो. आणि मी एकदम मजेत आणि चांगला आहे.

एक पालक : तुला काय वाटते मुलांची कोणाशी चांगली मैत्री होऊ शकते आईशी का बाबांशी?

अ.म.त. : मला वाटतं पालकांना जन्डर नसतं. ते केवळ आपले पालक असतात. तेव्हा त्यांच्या दोघांशीही तेवढीच चांगली मैत्री असू शकते. आणि हो, पालकांव्यतिरिक्त भावंडे सुद्धा आमच्यासाठी महत्वाचे घटक असतात. आम्ही भावडं घरात जरी एकमेकांशी भांडत असू तरी बाहेर मात्र मी माझ्या बहिणीची काळजी घ्यायचो. ती काय करते, तिचे मित्र-मैत्रिणी कोण याची मला सगळी माहिती असायची. त्यामुळे तिला जरी माझी भिती असली तरी एक प्रकारे आधार सुद्धा होता. तसेच शाळा कॉलेजात आम्ही एकमेकांना जाणून सुद्धा घेऊ शकलो. आणि आज आम्हा भावंडांचं नातं खूप पक्क आहे.

आणखी एक पालक : पालकांच्या जन्डर वरुन एक अनुभव आठवला. माझी मुलगी एके दिवशी मला पिरिएडस बद्दल माहिती विचारू लागली. तिला त्या दिवशी त्यांच्या शाळेत यावर शिकवले होते. तेव्हा मी तिला म्हणालो की आईला विचार. तर ती म्हणाली, "बाबा, मला हे कळतं की तुम्हाला या विषयावर सुद्धा सगळं माहित आहे. आमच्या टीचर पेक्षा तसेच आईपेक्षाही तुम्ही माझ्या प्रश्नांना चांगली उत्तरं देता तेव्हा हे सुद्धा तुम्हीच मला सांगा". म्हणजेच मुलं पालकांमध्ये भेदभाव करत नाहीत. आपणही त्यांना पालक म्हणून योग्य ते मार्गदर्शन करायला हवं.

आयोजक : आणखी काही पालकांना विषेश मुद्दे मांडायचेत?

एक पालक : हो. आपण भारतात वाढलेले पालक आत्ता कुठे आपल्या पाल्यांच्या डेटींगबद्दल आपल्या मनाला तयार करत आहोत. पण आपण मुलांच्या डेटिंग मधून निर्माण होणार्‍या समस्या तसेच काही विषिष्ट प्रश्न यांना हाताळण्याची तयारी करत आहोत का? तसे काही प्रॉब्लेम्स आपल्याला येणार नाहीत अशी आपल्या मनाची आपण समजूत घालत बसणार का त्यांना सामोरं जाण्याची तयारी करणार? जसे की अशातच आपल्या सारख्या मराठी घरातील युवा पाल्यांनी त्यांच्या समलिंगी जोडिदाराला घरी बोलावून ओळख करुन दिल्याच्या घटना घडल्या. येथील समाजात हे चालते पण आपल्या सारख्यांना हा धक्का आहे. तर आपण अशा धक्क्यांना सामोरं कसं जावं?

मानसोपचार तज्ञ : एखाद्या व्यक्तीला कोणाबद्दल आकर्षण निर्माण होईल यावर आपण काही बंधने घालू शकत नाही. मात्र आपण आपल्या पाल्याच्या विचारांना इन्फूअन्स करु शकतो. जेणेकरून आपला पाल्य अशी निवड करणार नाही. पण अशी परिस्थिती उद्भवलीच तर उपाय म्हणजे आपण अगोदर आपल्याला सांभाळणे. आपला सामाजिक तसेच मानस शास्त्रीय अभ्यासाचा पाया चांगला मजबूत असेल तर तुम्ही या प्रसंगांना तोंड देताना कोलमडणार नाही.

आयोजक : पालकांनो, तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही या देशात राहिल्यामुळे तुम्हाला तुमच्या पाल्याच्या डेटिंबद्दल येणारा मानसिक तनाव भारतात राहिला असता तर आला नसता?

पालक : आम्ही भारतात राहिलो असतो तर पुण्या-मुंबईत असलो असतो. आणि तेथे सुद्धा मुलांच्या डेटींगचे प्रमाण असेच मोठे आहे. फरक येवढाच आहे की तिथे बहुतांशी सगळे चोरी-छुपे चालू असते आणि इथे बरेच वेळा खुलेआम सांगून.
(बाकी पालकांचेही या विचारला अनुमोदन).

आयोजक : डेटींग प्रकरणात मुलांना आई वडिलांकडून तसेच आई-वडिलांना मुलांकडून एकमेकांना समजाऊन घेण्याच्या अपेक्षा असतात. या चर्चा सत्रामुळे त्या समजाऊन घेण्यासाठी तुम्हाला नक्कीच काहीतरी माहिती मिळाली असेल अशी अपेक्षा.

आवांतर :
या कार्यक्रमाच्या संयोजकांना आपण येथे भेट देऊ शकता:
महाराष्ट्र फाउंडेशन
कनेटिकट महाराष्ट्र मंडळ

Comments

मित्राची टिपण्णी

एका मित्रासोबत गप्पा मारताना या चर्चासत्राचा विषय निघाला तेव्हा त्याची प्रतिक्रिया ऐकून मला वाटले की याचे हे प्रश्न त्या चर्चा सत्रात हवे होते. किमाण येथे तरी चर्चा करता यावी म्हणून ते येथे उद्घृत करत आहे.

अमेरिकेत लैंगिक शिक्षण पाचवी-सहावीपसूनच सुरु होते तर आपल्याकडे ते अभ्यासक्रमात नसतेच. या विषयावर आमच्या या मित्राचे म्हणने असे की लैंगिक शिक्षण दिल्याने मुलांचा सेक्स करुन बघण्याचा कल जास्त वाढतो. त्याचे परिणाम म्हणूनच अमेरिकेत सर्वांत कमी वयात होणार्‍या सेक्सचे प्रमाण खूप जास्त आहे. पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा ते येवढे नाही. तेव्हा आपल्याकडे हे असले काही करण्याची गरज नाही.

मग मी विचारले की मग मुलांना योग्य-आयोग्याची माहिती कशी मिळणार. तर यांचे म्हणने असे की, "जशी आपल्याला मिळाली तशी. मित्र आहेत ना."

मी म्हटले की बाबा रे मित्र किंवा सडक छाप एखाद्या पुस्तकातून मिळणारी माहिती योग्य असेल कशावरुन. आपल्या मुलांना योग्य आहे ते चांगल्या भाषेत आई-वडिलचा सांगू शकणार नाहीत का?

त्यावर त्याचे म्हणने असे, "आपल्या मुलांसोबत बोलायला जगात जे हजारो चांगले ज्ञानाचे विषय आहेत ते संपलेत का? या पाश्चात्य लोकांना खाणे-पिणे आणि ऐय्याशी करणे याशिवाय काही सुचत नाही म्हणून असे विषय मुलांना शिकवतात."

मला उपक्रमिंचे अभिप्राय वाचायला आवडतील.

आपला,
(तटस्थ) भास्कर
आम्ही येथे वसतो.

गैरसमज

नक्की आकडा आठवत नाही पण मुंबई आणि दिल्ली येथील साधारण ३०% हून अधिक कुमारवयीन शालेय विद्यार्थ्यांनी सेक्स मधे भाग घेतला सतो अथवा प्रयत्न केला असतो असं एका मान्यताप्राप्त मासिकात (इंडिया टुडे बहुतेक) वाचल्याचं आठवतं आहे. अर्थात हे प्रमाण केवळ तसं कबूल करणार्‍यांचं आहे हे लक्षात घेता "पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा ते येवढे नाही." यातील फोलपणा ध्यानी यावा (टक्केवारी व मासिकाचं नाव केवळ स्मरणशक्तीवर. चुभुदेघे)

गैरसमजाशी सहमत

नक्की आकडा आठवत नाही पण मुंबई आणि दिल्ली येथील साधारण ३०% हून अधिक कुमारवयीन शालेय विद्यार्थ्यांनी सेक्स मधे भाग घेतला सतो अथवा प्रयत्न केला असतो असं एका मान्यताप्राप्त मासिकात (इंडिया टुडे बहुतेक) वाचल्याचं आठवतं आहे.

मीही हे हल्लीच म्हणजे गेल्या आठवड्यात कोणत्याशा मराठी वृत्तपत्रातच वाचले. म.टा, लोकसत्ता किंवा सकाळच असणार. त्यात ६ तील १ विद्यार्थी सेक्समध्ये भाग घेतो असे होते. यांत मला तथ्य वाटते.

किंवा

'किंवा प्रयत्न केला जातो' सारख्या मोघम वाक्यरचनांमुळे त्यापुढील आकडेवारीला गौणत्व येते असे वाटते. इंडिया टुडे सारखी नियतकालिके अशाच शब्दांच्या आधारे विस्फोटक विधाने करतात असे वाटते.

(अवांतरः ३०% म्हणजे, ६० (प्रत्येक किंवा कुठल्याही) च्या वर्गात १८, ज्यावर्गात जितके कमी, तितकेच दुसर्‍या वर्गात अधिक.)

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

हे घ्या आकडे

योगायोगाने आजच्या लोकमत मध्येच हे काही आकडे मिळाले. येथे ती बातमीच पूर्णपणे चिटकवत आहे...

मला जमत नाहीये. काहीतरी गडबड आहे... जेपेग इमेज येथे कशी चिटकवायची यावर कोणी मदत कराल का?

ही गायत्री पाठक यांनी दिलेली बातमी "प्रगत राज्यांतील वीस टक्के मुले पडतात शोषणाला बळी" या मथळ्याखाली १४-११-२००७ च्या इ-मुखपृष्ठावरील आहे.

आपला,
(वार्ताहर) भास्कर
आम्ही येथे वसतो.

मित्र

आपल्या मित्राचे पुणे-मुंबई किंवा एकूणच भारताबद्दल गैरसमज दिसतात. वर उल्लेख केलेली बातमी मीही वाचली होती. नक्की आकडेवारी साशंक असली तरणापल्याकडे असे होत नाही हे म्हणणे जरा भाबडेपणाचे वाटते.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

मेग मिकर यांचे पुस्तक

योगायोगाने या कार्यक्रमा नंतर काही दिवसातच एका अमेरिकन संस्थेने भेट म्हणून मला एक पुस्तक दिले. मेग मिकर नावाच्या एका डॉक्टरने तिच्या अनुभवांवर तसेच सामाजिक संशोधनावर अधारित असलेल्या स्ट्राँग फादर्स, स्ट्राँग डॉटर्स या पुस्तकात वरील चर्चासत्रांत चर्चिलेल्या जवळपास सगळ्याच विषयांवर सखोल खल केला आहे. हे पुस्तक अमेझॉनवर येथे आहे.

आपला,
(वाचक) भास्कर
आम्ही येथे वसतो.

न पटलेले पहिलेप्रथम

बाकी काय मते ती नंतर देते - पण खालील सल्ला पटला नाही.

डॉक्टर : ते सर्वस्वी तुमच्यावर आहे. पण एक चांगली ताकीद म्हणजे... "हे बघ, तुला काय करायचे ते सदसदविवेक बुद्धिने कर. पण जर त्याचे काही लोण घरापर्यंत आणू नकोस. प्रेग्नन्सी हा विषय जर तू घरी आणलास तर तुला घराचे दार बंद आहेत हे लक्षात ठेव." मुलांना अशी ताकिद दिली की ते सुद्धा जपून वागतात जेणेकरून त्यांच्या आयुष्यात पुढे काही प्रश्न उभे राहणार नाहीत.

चित्राशी सहमत

प्रेग्नन्सी हा विषय जर तू घरी आणलास तर तुला घराचे दार बंद आहेत हे लक्षात ठेव."

मलाही हे फारसे पटले नाही. विशेषतः असे म्हणणारे मुलींचे पालक असावेत का काय असेही वाटून गेले. अर्थात, तसंच असेल हे सांगता येत नाही. हे सांगण्यापेक्षा अडनिड्या वयांत मुलं झाली किंवा लहानमुलांनाच (१५-१६ वर्षांची पोरं लहानच असतात माझ्यामते) मुलं झाली की जबाबदार्‍या, अडचणी, निराशा या सर्वांचा सामना करावा लागतो हे मुलांना पटवून/ दाखवून (टिव्हीवर असे कार्यक्रम येतात) द्यावे. संबंध प्रेग्नन्सीपर्यंत जातीलच असे नाही परंतु अनेकजणांबरोबर डेटिंग करणे हे मानसिक स्वास्थ्यासाठीही वाईट ठरू शकते. 'हार्टब्रेक्स' या मुलांसाठी अतिशय निराशाजनक ठरू शकतात. पालकांचे कर्तव्य आहे की त्यांना दारे बंद करण्यापेक्षा आपल्या पंखांखाली घेऊन बर्‍यावाईटाची जाणीव देऊन त्यांना सुधारण्याचा/ मार्गावर ठेवण्याचा प्रयत्न करणे.

टिनएजर्स कितीही सांगितले तरी करायचे ते करतात असा ९९% पालकांचा अनुभव असतो. त्यांना दटावून घाबरवून ठेवल्याने ते या गोष्टी चोरून करतात किंवा लपवून ठेवतात. ज्यावेळेस त्या बाहेर पडतात तेव्हा बरेचदा उशीर झालेला असतो. येथे केवळ डेटींग नाही तर वाममार्गाला लागणार्‍या मुलांविषयीही हेच सांगेन, ड्रग्ज, चोर्‍या इ. करणार्‍या मुलांनाही पालकांनी समजून त्यांच्यात सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे. घराचे दार बंद केल्याने सुधारणा होण्यापेक्षा बिघाड अधिक होतो.

मला वाटतं, डेटींग हा काही वाईट प्रकार नव्हे. (थोडक्यात सांगायचं तर हा प्रकार मला स्वतःला आवडेल/ आवडतो[ इतरांसह जाण्याचे वय आणि लायसन्स गेले तरी हक्काच्या नवर्‍यासह आताही आणि अद्यापही मुलगी घरात नसताना किंवा इतरत्र असताना [तिला कटवून] डेटींग करायला आवडतं - ह. घ्या] तर त्या वयांतील मुलांना त्याची किती क्रेझ असेल) अर्थात, मुलांना कल्पना असावी की आपण काय करतो याकडे पालकांचे लक्ष आहे आणि पालकांनाही कल्पना असावी की आपण पाल्याला किती आणि कशी सूट देऊ शकतो. मुलांवर विश्वास दाखवणे हे ही अत्यंत महत्त्वाचे असते. करड्या शिस्तीतील मुले बरेचदा आततायी निर्णय घेताना दिसतात. त्यापेक्षा त्यांना बर्‍यावाईटाची जाणीव अगदी लहानपणापासून करून द्यावी.

घरातलं सांगायचं झालं तर मी टिव्हीवर येणार्‍या कार्यक्रमातूनही कधीतरी उपदेशाचे डोस पोरीला पाजते. त्यामुळे आपल्या मम्माला हे आवडतं आणि हे पसंत नाही याची जाणीव तिला सध्यातरी आहे.

विश्लेषण

चित्रा ताई तसेच प्रियाली ताई,

मला वाटते सारांशात्मक माहिती देताना या मुद्यात महत्वाची असणारी पार्श्वभूमी न दिल्याने डॉक्टरांचे म्हणने जरा कडक वाटत आहे. खरे तर प्रत्यक्ष चर्चा सत्रामध्ये डॉक्टरांनी प्रियाली ताई म्हणतात त्याप्रमाणे मुलांना समजाऊन सांगणे, "आपल्या पंखांखाली घेऊन बर्‍यावाईटाची जाणीव देऊन त्यांना सुधारण्याचा/ मार्गावर ठेवण्याचा प्रयत्न करणे", यावर उहापोह करुनच डॉक्टर साहेबांनी वरील विधान केले होते. माझ्याकडून व्यवस्थित विश्लेषण झाले नाही या बद्दल क्षमस्व.

आपला,
(चुकलेला) भास्कर
आम्ही येथे वसतो.

हा तर प्रत्येक पालकाचा प्रश्न

हे विषयांतर आहे की नाही ते तुम्ही ठरवा पण या बाबतीत मला आपल्यासारखेच अमेरिकन पालकही काळजीत दिसले. माझ्या ऑफिसमधील एक सहकारी (जो अमेरिकन आहे) तो आपल्या टिन एजर मुलीवर लपून पहारा देतो. त्याला तीची फार काळजी वाटते. एकदा-दोनदा त्याने तिला एका मुलाबरोबर थोडी जवळीक करताना पाहिले तर् मुलीच्या नकळत त्याने त्या मुलाला असा काही दम भरला की तो मुलगा त्या मुलीच्या जवळही गेला नाही. (इति तोच... शहानिशा कोण करायला जाईल :) )
काही पालक तर प्रायवेट डिटेक्टिव ठेवून असतात असंही त्याने मला सांगितलं. खरं खोटं देव जाणे.

हे मुलांवर अशी पाळत ठेवणं मला तरी चुक वाटतं. पण् सांगायचा मुद्दा हा की हा प्रश्न केवळ इथे स्थायिक झालेल्या भरतीयांपुरता मर्यादित नसून कोणत्याही पालकांना आपल्या पाल्याबद्दल वाटणारा आहे.

अवांतर

आजकाल (प्रगत देशात) भारतीय पालक आपला मुलगा, एखाद्या मुलीशी किंवा आपली मुलगी एखाद्या मुलाशी जवळीक करताना दिसला/दिसली की सर्वप्रथम एकमेकांना "Hi 5" देतात!! आपलं पाल्य "नॉर्मल" आहे ही पहीली काळजी मिटते!!!!!! ;-)

मग ती नेहमीची काळजी आहेच!!!!

लोकांना मुलगा का हवा असतो?? "पाय घसरायची" रिस्क नाही ना...

विचार करण्याजोगा!

खरं आहे... सहजराव!
"मुलीने सून" व "मुलाने जावई" आणायचे दिवस आजूबाजूला दिसत असतांना
आपले मुल नॉर्मल आहे याचा कोणत्याही नॉमल आईवडिलांना आनंद होईलच!
मला तरी होईलच बॉ!
असो, यावर मागे एक अतिशय सुंदर फ्रेंच चित्रपट पाहिला होता... नाव लक्षात नाही पण कथा आहे.

एक आई आपली तरूण मुले/मुली 'अशी' का आहेत याचा विचार करते. स्वतःत काय कमी आहे जे मी माझ्या मुलांना दिले नाही असा विचार करते... खुप ताणतणावनंतर हा विषयच ती सोडून देते व आपल्या तिसर्‍या नॉर्मल मुलीच्या आयुष्याकडे वळते. तेला १० वर्षांची मुलगी असते. आपल्या १० वर्षांच्या नातीला हे संबंध सांगतांना ती कोलमडून जाते... तीने ते सगळे पाहू नये म्हणून खुप धडपड करते. पण त् शक्य होत नाही... वतुर नात सहजपणे हे मान्य करून् तीला चाट पाडते. ते सहजतेने घेणेही तीला पटत नाही. हे नॉर्मल नाही हे सांगण्यासाठी तीची तडफड होते. त्यसाठे चर्च मध्ये पाठवण्याचा उपाय वगैरे ती करते... पणत्याचा काही उपयोग होत नाही!
तीचे हे आपलीच मुले 'असे असणे' तीला खुपतच राहते.

पण शेवटी 'मुलाचा जावई' व 'मुलीची सून' हळूहळू कुठे तरी मान्य करते... ते कुटुंबाच्या ख्रिस्मस पार्टीत धुसफुसत का होईना पण 'या' पार्टनर्स ना प्रवेश मिळतो यातून दिसते.

कोणतेही प्रश्न न सोडवता जुन्या पीढीची घालमेल दाखवणारा अतिशय सुंदर चित्रपट होता...

नाव आठवल्यावर देईनच!

आपला
गुंडोपंत

स्तुत्य उपक्रम, जिव्हाळ्याचा विषय

मुलामुलींचे सेक्स/डेटिंग या विषयावर माझे अनेक नातेवाईक विचार करताना, काळजी करताना दिसतात.
आपली मुले आपल्यापेक्षा खूप वेगळ्या संस्कृतीत वाढलेली आहेत हे लक्षात येते, आणि आपले त्या वयातले अनुभव मार्गदर्शन करण्यास कमी पडतात. तुमच्या तिथे अनेक लोकांनी मन मोकळे करून मते दिलीत ते वाचून बरे वाटते. तुम्ही ती आगत्याने आमच्याकडे पोचवत आहात, त्याबाबत धन्यवाद.

स्तुत्य उपक्रम

मुलामुलींचे सेक्स/डेटिंग या विषयावर माझे अनेक नातेवाईक विचार करताना, काळजी करताना दिसतात

त्या भीतीतून डेटिंगच्या वयात मुल आली कि काही पालक भारतात परत येतात. असे माझे निरिक्षण आहे.
प्रकाश घाटपांडे

निरिक्षण

माझे सुद्धा हेच निरिक्षण आहे. काही पालक या भितिपोटी भारतात पळून जातात. पण केवळ या भितीपोटी जाणे योग्य आहे का? पळून गेल्याने प्रश्न संपतात का असा मला प्रश्न पडतो.

आपला,
(प्रश्नांकित) भास्कर
आम्ही येथे वसतो.

संवाद

वरील प्रतिसादांत येऊन गेले आहेच पण मुलांना दमदाटी करणे हे नुसतेच काउंटरप्रॉडक्टीव्ह नाही तर एकूणच अयोग्य आहे. लहान मुलांना झोपत नाही म्हणून भिती दाखवणं आणि वयात आलेल्या मुलांना (घरात वेळेवर येऊन) झोपत नाही म्हणून दम देणे यात फरक आहे. संस्कृतमधे एक श्लोक आहे. ज्याचा अर्थ इतकाच की लहानपणी दमदाटी करावी लागली तरी वयात आलेली मुलांना मित्र/मैत्रीणीसारखे वागवावे. याचा वर्तमानात असा अर्थ लावू नये की आईने अथवा बापाने पण डेटींगला जावे आणि आपले अनुभव मैत्रीपुर्‍ण भाषेत मुलांशी शेअर करावेत!

पण एक गोष्ट नक्की की काव्य-शास्त्र-विनोद या सर्वांवर मुलांशी सहज संवाद असावेत. तसेच अजून एक महत्वाचे म्हणजे, मुलांना याची जाणिव असणे कि घरात आई-वडीलांचे पण एकमेकांशी संवाद आहेत ते. या एका गोष्टीने बराच फरक एक कुटूंब म्हणून पडू शकतो.

दमदाटी नव्हे योग्य धाक

श्री विकास,

मला वाटते माझ्या अपूर्ण लेखनाने तुम्हा सर्वांचा या चर्चासत्रातील एका मुद्याबद्दल गैरसमज झालेला आहे. चित्रा यांच्या प्रतिसादात मी यावर थोडा उजेड टाकायचा प्रयत्न केला आहे.

एकंदरीत चर्चासत्रात सर्वच पालकांनी "मुलांशी सुसंवाद" यावर आपापले विचार/अनुभव सांगितले. डॉक्टरांनी मात्र या मुद्यांच्या जोडीला हे सुद्धा सांगितले की केवळ मुले म्हणतात याला माना डोलवने व त्यांच्याशी सुसंवाद साधन्याच्या धडपडीत स्वतःचे पोस्चर गमावून बसने याला अर्थ नाही. मुलांना योग्य धाक असावा. जसा की कायद्याचा धाक असल्याने साधारणपणे लोक बेकायदा वागत नाहीत. त्याप्रमाणेच घराचे सुद्धा कायदे (नियम) असावेत व ते पाळण्यासाठी कुटुंब प्रमुखाचा धाक असावा.

या विषयावर मी वाचत असलेल्या उपरोल्लेखित मेग मिकर यांच्या पुस्तकातला एक किस्सा देत आहे.

लेखिका तिच्या जोडीदाराला (बॉयफ्रेंडला) आई-वडीलांची ओळख करुन द्यायला घरी घेऊन येते. तिचे वडील तिच्याशी नेहमी खूप प्रेमाने वागणारे असतात मात्र या मुलासोबत त्यांचे वागणे तिला आनवश्यक कडक वाटते. तसेच ते त्याला भिंतीवर लटकवलेल्या प्राण्यांच्या मुंडक्यांची शीरे ही त्यांनी स्वतः शिकार करुन आणलेली आहेत व त्यांचा निशाना आजूनही तेवढाच चांगला आहे हे नमूद करावे अशा भावात सांगतात. नंतर लेखिका मध्यरात्रीच्या आत घरी यायचा शब्द देऊन त्या मित्रासोबत बाहेर जाते. रात्री एक वाजता ती तिच्या मित्रासोबत बसलेली असते त्या भोजनालयात भोंग्यावरुन तिच्या नावाची घोषणा होते की तिचे वडील घरी वाट पाहत आहेत. ते दोघे घाईघाईने घरी जातात. त्याला बाथरुमला जायचे असते परंतू वडील दाराबाहेर वाट पाहात असतात. त्यांच्या रागाचा पारा पाहून तिचा तो मित्र बाथरुमला सुद्धा घरात येत नाही. अर्थातच या नाट्या नंतर तिला आपल्या वडीलांचा राग यायला लागतो. मात्र पुढे तो मित्र लफंगा आहे व अनेक मुलींसोबत त्याचे गुटर्गू चाललेले आहे हे तिच्या लक्षात येते. मात्र तिच्या वडीलांनी याचा अगोदरच अंदाज बांघलेला असतो व ते तिला या क्षणी कसे मदत करतात हे वाचण्यासारखे आहे.

आपला,
(प्रांजळ) भास्कर
आम्ही येथे वसतो.

आभार!

ऋषिकेश, प्रियालीताई, तो, राजेंद्रपंत, चित्राताई, सहजराव, मित्रवर्य गुंडोपंत, श्री. धनंजय व श्री. विकास, घाटपांडे साहेब, अजानुकर्ण, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, जेसन बोर्न, वासुदेव, मुक्तसुनीत, सर्किटराव व प्रदिपशेट,

या लेखमालिकेला आपण सर्वांनी चांगला प्रतिसाद देऊन लिहिण्याबद्दलचा माझा उत्साह वाढवला आहे. सर्वांचे मनःपूर्वक आभार!

आपला,
(आभारी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

 
^ वर