संघर्ष विचारांचा - भाग १

१९९३ च्या "Foreign Affairs" च्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेला सॅम्युअल हंटिग्टन यांचा "The Clash of Civilizations?" हा निबंध प्रचंड गाजला. या निबंधाने झडलेल्या वादविवांदांमुळे आणि त्याच्या वाढत्या महत्त्वामुळे अखेरीस हंटिंग्टन यांनी १९९६ मध्ये "The Clash of Civilizations and the Remaking of World Order" हे सविस्तर पुस्तक लिहिले. या पुस्तकाची गणना गेल्या दशकातील काही प्रभावी लिखाणांपैकी एक अशी करता येइल. "प्रभाव" हे विशेषण मी मोठ्या व्यापक अर्थाने येथे वापरतो आहे. अनेक देशांच्या राष्ट्रीय आणि परराष्ट्रीय धोरणाला तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान पुरविण्याचे कार्य या पुस्तकाने पार पडले असे म्हटले जाते.

हंटिंग्टन यांच्या वर्गसंघर्षाच्या सिद्धांताची मांडणी थोडक्यात अशी -
संपूर्ण जगभर पाश्चिमात्य राष्ट्रांची संस्कृती, राजकीय पद्धती झपाट्याने पसरत आहे, स्वीकारल्या जात आहे हा समज भोळेपणाचा आहे. लोकशाही मूल्ये, आंतरराष्ट्रीय कायदे आणि जागतिक आर्थिक घडी यांचा सर्वच राष्ट्रांनी स्वीकार करावा यासाठी धरला जाणारा आग्रह हा जगाला अराजकाकडे घेऊन जाईल.
जग हे विविध वर्गांमध्ये, वंशामध्ये आणि संस्कृतींमध्ये विभागले गेलेले आहे. आर्थिक, राजकीय आणि लष्करी सामर्थ्यावरील पाश्चिमात्य जगाचा पगडा जसजसा (विशेषतः दुसर्‍या महायुद्धानंतर) कमी होतो आहे तसतशी ह्या वर्गसंघर्षाची रूपरेखा अधिकाधिक धारदार होऊ लागेल.

=======================================================

हंटिग्टनची जागतिक वर्गविभागणी आणि संभाव्य वर्गसंघर्षाची रूपरेखा - जितकी रेषा ठळक तितका संघर्ष मोठा
=======================================================
आर्थिक आणि लष्करी घोडदौडीमुळे बळ मिळालेली चीनी (कॉन्फ्युशिअन्) संस्कृती आपले पूर्ववैभव मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि आजूबाजूच्या राष्ट्रांची आघाडी पाश्चिमात्यांसमोर उभी करेल.
इस्लामच्या संस्कृतीचे इराणमधील पुनरूज्जीवन, मुसलमान तरुणांच्या संख्येमध्ये झालेली बेसुमार वाढ, तसेच गल्फमधील अमेरिकेशी सतत सुरु असलेला संघर्ष यांचाही वर्गसंघर्षांवर रक्तरंजित परिणाम अटळ आहे.
कट्टरता, अधिकारांची उतरंड या आणि अशा समान मूल्यांवर आधारित असलेल्या कॉन्फ्युशिअन् आणि इस्लामिक संस्कृतीची व्यक्तिस्वातंत्र्य, तसेच विविधतेला प्राधान्य देणार्‍या पाश्चिमात्य संस्कृतीविरुद्ध युती होईल अशी चिह्ने आहेत. २१ व्या शतकात या दोन वर्गांमध्ये आर्थिक बंधनापासून ते युद्धांपासून ते अतिरेकी हल्यांपर्यंत अनेक पातळ्यांवर संघर्ष होतील आणि रक्ताचे पाट वाहतील.

भारत, जपान, रशिआ यासारखे वर्ग हे या दोहोंपैकी कोणत्याही एका वर्गाची बाजू घेतील हे सांगणे कठीण आहे.

=======================================================

खुलासे -

  1. लेखाचा उद्देश जगात वाहणार्‍या विचारांची/ पुस्तकांची निव्वळ तोंडओळख करून देणे असा आहे. आंतरजालवर बरीच माहिती आहेच. येथे लिहिल्याने उत्सुकता चाळविली जावी इतकाच हेतू आहे. शक्य झाल्यास मूळ लिखाण आवर्जून वाचावे.
  2. माझी स्वतःची मते मांडणे येथे टाळले आहे. जशी सवड मिळेल त्याप्रमाणे टिपण्णी जोडण्याचा विचार आहे. विशेषतः सदर पुस्तकाबद्दल माझे अनेक ठिकाणी आक्षेप आहेत.
  3. पुढील भागांमध्ये आणखी काही विचारांविषयी/ पुस्तकांविषयी जसे जमेल तसे लिहीन असे म्हणतो. अन्य अभ्यासकांनीही भर घालावी ही विनंती.

(संघर्षाचा साक्षीदार) एकलव्य

Comments

वा!

पुस्तके विकत घेतली हे चांगलेच. माझे आक्षेप नक्कीच मांडेन. आठवड्याभरात ते होईल याची मात्र शक्यता कमी वाटते.

(भयानक राबणे चालले आहे... होप यू अन्डरस्टॅड!!)

उत्सुकता

एकलव्यराव आपण विषयाची आणि पुस्तकाची ओळख चांगली करून दिली आहे. आपल्या सविस्तर टिप्पणीची उत्सुकता आहे.

कट्टरता, अधिकारांची उतरंड या आणि अशा समान मूल्यांवर आधारित असलेल्या कॉन्फ्युशिअन् आणि इस्लामिक संस्कृतीची व्यक्तिस्वातंत्र्य, तसेच विविधतेला प्राधान्य देणार्‍या पाश्चिमात्य संस्कृतीविरुद्ध युती होईल अशी चिह्ने आहेत

या वाक्याचा अर्थ मात्र लागला नाही.

माझी स्वतःची मते मांडणे येथे टाळले आहे.

अश्या निरपेक्ष वृत्तीने केलेली समीक्षा उत्तम असेलच. आवडलेल्या किंवा न आवडलेल्या पुस्तकांच्या समीक्षेत पूर्वग्रहांचा प्रादुर्भाव नकळत होत असतो.

आपला
(वाचनोत्सुक) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

वासुदेवायनमः!

माझे वाक्य क्लिष्ट झाले आहे खरे...

कॉन्फ्युशिअन् आणि इस्लामिक या दोन्ही संस्कृतींम्ध्ये कट्टरता, अधिकारांची उतरंड हे समान धागे आहेत. तर पाश्चिमात्य संस्कृतीची लक्षणे म्हणायची झालीच तर व्यक्तिस्वातंत्र्य, विविधतेला प्राधान्य देणारी मानसिकता ही आहेत. चिनी आणि इस्लामी संस्कृती पाश्चिमात्य संस्कृतीविरुध्द लढ्यात एकमेकांला सहाय्य करतील. असा लेखकाचा होरा आहे. त्याचा उहापोह त्याने लेखात केलेला आहे.

याउप्पर अर्थ शोधायचा मीही प्रयत्न करतो आहे.

निरपेक्षपणे मांडले असले तरी सापेक्षपणे असलेले मतही मांडण्याची इच्छा आहे.

आपल्या औत्स्युक्याबद्दल आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

धन्यवाद!

कॉन्फ्युशिअन् आणि इस्लामिक या दोन्ही संस्कृतींम्ध्ये कट्टरता, अधिकारांची उतरंड हे समान धागे आहेत. तर पाश्चिमात्य संस्कृतीची लक्षणे म्हणायची झालीच तर व्यक्तिस्वातंत्र्य, विविधतेला प्राधान्य देणारी मानसिकता ही आहेत. चिनी आणि इस्लामी संस्कृती पाश्चिमात्य संस्कृतीविरुध्द लढ्यात एकमेकांला सहाय्य करतील

आपल्याला असाच अर्थ अपेक्षित असावा असे वाटले होते. लेखकाने मांडलेले हे तत्त्व काहीप्रमाणात वास्तवात उतरले तरी पूर्णपणे वास्तवात येईल असे वाटत नाही. कॉन्फुशियन लोकांची कट्टरता बरीच कमी झाली आहे आणि पुढच्या काळात अधिकच कमी होईल. त्यांच्या नव्या पिढीला पाश्चिमात्य संस्कृतीचे आकर्षण आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाश्चिमात्य देशांचे (युद्ध, आतंकवादी हल्ले वगैरे मुळे) नुकसान झाल्यास त्याची आर्थिक झळ सर्व जगाला बसेल. त्यामुळे हे इस्लामी देशांशी फक्त फायद्यापुरतीच (तेल, खनिजे खरेदी आणि यांच्या उत्पादनांची विक्री इत्यादी) युती करतील. पण यांचे वाढते लष्करी आणि आर्थिक सामर्थ्य ही पाश्चात्य देशांसाठी चिंतेची गोष्ट आहे.

आपला
(निरीक्षक) वासुदेव

निरपेक्षपणे मांडले असले तरी सापेक्षपणे असलेले मतही मांडण्याची इच्छा आहे.

हो हो अवश्य. त्याच्याविषयी उत्सुकता आहे असे आम्ही आधीच म्हटले आहे.

आपला
(वाचक) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

छान!

पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल आणि निबंधाच्या दुव्याबद्दल धन्यवाद! "क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स" हा शब्दप्रयोग आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रांत नेहमी वापरला जातो आणि साधारण या पुस्तकात सांगितलेली भूमिका बरेच तज्ज्ञ मांडताना दिसतात. यातही काही कच्चे (आणि काही कृत्रिमरीत्या पिकवलेले :)) दुवे आहेत असे वाटते. आपल्या टिप्पणीच्या/आक्षेपांच्या आणि पुढील भागांच्या प्रतीक्षेत आहे.

प्रवक्ता काळाच्या पडद्याआड

क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशनचे या सिंद्धांताचे प्रवक्ते सॅम्युअल हंटिग्टन हे नुकतेच कालवश झाले. http://www.google.com/hostednews/afp/article/ALeqM5h4gau4sKlHw5C53YDNdHg...

९/११ च्या काळात त्यांनी मांडलेल्या सिद्धांताचा -- विशेषतः त्यातील मुस्लिम आणि पाश्चिमात्य संस्कृतींचा संघर्ष -- संदर्भ प्रकर्षाने जाणविला असला तरी त्याही पूर्वीपासूनच जगभरातील संघर्षांकडे पाहण्याला एक सर्वमान्य चौकट हंटिग्टन यांच्या लिखाणाने दिलेली होती. त्यांच्या लिखाणाचा प्रभाव येणारी अनेक वर्षे नक्कीच राहणार आहे असे म्हणणे वावगे ठरू नये. त्याअर्थाने हा प्रवक्ता अजूनही काळाच्या पडद्याआडून सूत्रे हलवित राहील.

(बातमीदार) एकलव्य

 
^ वर