नरसोबाच्या वाडीचा यज्ञ (इ.स.१८९०)

नरसोबाच्या वाडीचा यज्ञ (इ.स.१८९०)
[आगरकर यांच्या सुधारक पत्रात "धर्माचा सुकाळ आणि बकर्‍यांचा काळ" या शीर्षकाचा एक लेख आहे.त्यातील काही निवडक भाग पुढील प्रमाणे:--]

.......पंचहौद मिशनात पेलाभर चहा आणि दोन बिस्कुटें खाल्ली तर सक्षौर प्रायश्चित्त घ्यावे लागते.पण नरसोबाच्या वाडीस विद्वान धार्मिकांनी स्वहस्ते बोकडाचे प्राण घेऊन त्याच्या शिजवलेल्या मांसाचे गोळेच्या गोळे दिवसाढवळ्या हजारों लोकांसमक्ष मिटक्या मारीत खाल्ल्यास कांही हरकत नसते.

वाडी येथे नुकताच झालेला यज्ञ ज्या दांपत्याने केला व त्याचे काम ज्या ऋत्विजांनी चालविले त्यांविषयीं आमचे काही एक म्हणणे नाही.मोठ्या पुण्याईने प्राप्त झालेल्या ब्राह्मणजन्माचे सार्थक करण्याचे जे साधन त्यांस योग्य वाटले तें त्यांनी योजिलें. हे स्वाभाविक आहे.त्यांना दोष देणे योग्य नाही.आम्हांस जें वाईट वाटते ते बोकड मारून त्याचें मांस खाल्ल्याने देव खुष होतो आणि मुक्ति देतो असा मूर्खपणाचा समज अद्यापि आपल्या धर्मात राहिला आहे आणि त्या समजावर आचरण करणारे लोक अद्यापि आहेत, याबद्दल.
मांस खावेसे वाटले,किंवा दारू पिण्याची लहर आली तर पेड्रोच्या किंवा नसरवांजीच्या हॉटेलात जावे.चार दोन रुपये खर्चावे.आणि आत्मा गार करावा.त्या सुखाकरिता इतके सव्यापसव्य आणि द्राविडीप्राणायाम कशाला? हाटेलात जाताना थोडेसे तीर्थ बरोबर घेऊन जावे आणि मांसाची बशी समोर आली की थोडा भाग देवाला अर्पण करणे असेल तर स्वत: करावा किंवा बबर्जीला तसे करण्यास सांगून ठेवावे म्हणजे पुलावा चुलीवरून उतरल्या उतरल्या तो वैश्वदेव आटपून घेईल.

यज्ञाच्या मिषाने आपणास मांस खाण्याची मोकळीक आहे, इतकेच नाही तर तसे केल्याने आपल्या पदरी पुण्याची जोड होते असे समजणे हे केवढे अज्ञान आहे!! यज्ञावर श्रद्धा ठेवणारे असेही मानतात की यज्ञात मारलेला बोकड पुन्हा जिवंत होतो. बुक्क्यांनी हालहाल करून मारलेल्या बकर्‍याच्या मांसाचा काही भाग हुताशनाद्वारा जगदात्म्यास अर्पण करून बाकीच्याचे यजमानाने आणि ऋत्विजांनी सेवन केले असता देव प्रसन्न होतो.आणि त्यांना जन्म-मरणाच्या फेर्‍यातून मुक्त करतो ही जितक्या वेडगळपणाची समजूत तितक्याच वेडगळणाची ही दुसरी समजूत.यज्ञात मारलेले बकरे जिवंत होत असतील तर खाटिकखान्यात तोडलेले प्रत्येक जनावर पुन्हा जिवंत होत नसेल कशावरून? त्याचे मांस सुद्धा सकल अग्नीत जो श्रेष्ठ जठराग्नी त्यासच अर्पण होत असते.मारलेले बकरे उठतात याचा अर्थ काय? ते एकदा मेले की मेले.जर त्यांना जिथल्या तिथे उठविण्याचे सामर्थ्य कुणा ऋत्विजात असेल तर तो याज्ञिक खरा.तसेच बुक्क्या मारून बकर्‍यास गुदगुल्या होतात असेही त्या याज्ञिकाने सिद्ध करून दाखवायला हवे.

या यज्ञिकांस आम्ही आणखी एक प्रश्न विचारतो.अग्निनारायणास बकर्‍याचे मांसच आवडते हे त्यांना कसे समजले? खुद्द परमात्मा किंवा त्याचा गुमास्ता हुताशन, इतर इतके जीव सोडून बोकडावरच फिदा का? मनुष्याप्रमाणे देवालाही बोकडच आवडावा याचा आम्हांस मोठा अचंबा वाटतो.

यज्ञपशूला मारापासून यातना होत नसतील व तो फिरून जिवंत होत असेल तर आम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे.मागे आम्ही प्रेतसंस्कार आणि श्राद्ध विषयावर लेख लिहिला. त्यावेळी आमच्यावर टीका करणार्‍यांस एका वृद्ध वारकर्‍याने जो प्रश्न केला त्याच्या उदाहरणावरून धैर्याचे अवलंबन करून आम्ही हा प्रश्न विचारणार आहोत.तो वृद्ध म्हणाला,"जर भटास दिलेली शय्या ,गाय व श्राद्धे मृतास पोहचत असतील तर मृताची बायकोही त्या श्राद्धाच्या रात्री भटाकडे का पाठवू नये? "

स्पष्टवक्त्या बाबाच्या या प्रश्नाइतका आमचा प्रश्न झोंबणारा नाही.आम्ही एवढेच विचारतो की जर यज्ञबलीस यातना होत नाहीत तसेच त्याला फिरून जीवदशा प्राप्त होते असा श्रद्धाळूंचा समज आहे, तर यजमानाने स्वत:ची आहुती देण्यास काय प्रत्यवाय आहे? असे केल्याने कोमल भागावर बुक्क्या मारून घेणे,गळा आवळून घेणे किती सुखकारक असते हे अनुभवास येईल . तसेच परलोकाची हालहवाल कशी काय असते हे ताबडतोब पाहाण्यास सापडेल."

Comments

एक दुरुस्ती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
यज्ञाच्या मिषाने आपणास खाण्याची मोकळीक आहे, इतकेच नाही तर....(परिछेद ४) हे वाक्य "यज्ञाच्या मिषाने आपणास मांस खाण्याची मोकळीक आहे, इतकेच नाही तर..." असे हवे

उत्तम

मांस खावेसे वाटले,किंवा दारू पिण्याची लहर आली तर पेड्रोच्या किंवा नसरवांजीच्या हॉटेलात जावे.चार दोन रुपये खर्चावे.आणि आत्मा गार करावा.त्या सुखाकरिता इतके सव्यापसव्य आणि द्राविडीप्राणायाम कशाला? हाटेलात जाताना थोडेसे तीर्थ बरोबर घेऊन जावे आणि मांसाची बशी समोर आली की थोडा भाग देवाला अर्पण करणे असेल तर स्वत: करावा किंवा बबर्जीला तसे करण्यास सांगून ठेवावे म्हणजे पुलावा चुलीवरून उतरल्या उतरल्या तो वैश्वदेव आटपून घेईल.

हे बाकी उत्तम! ज्यांना असे करणे अपराधीपणाचे वाटत असेल त्या लोकांनी देवाला वेठीस धरुन आपले जिव्हाचौचल्य भागवून घेण्याची सोय् केली असावी!
प्रकाश घाटपांडे

:-)

अग्निनारायणास बकर्‍याचे मांसच आवडते हे त्यांना कसे समजले?

अग्निनारायणाच्या गायीचे मांस ओरपण्यावर अंकुश आल्यावर त्याला बोकडाचे मांस आवडू लागले असावे.

मांसाचे सोडा, देवादिकांना मोदक, केळी घातलेला साजूक तुपातील शिरा, साबुदाण्याची खिचडी वगैरे वगैरे कधीपासून आवडू लागले असाही प्रश्न विचारता येईलच.

"जर भटास दिलेली शय्या ,गाय व श्राद्धे मृतास पोहचत असतील तर मृताची बायकोही त्या श्राद्धाच्या रात्री भटाकडे का पाठवू नये? "

:-) सही! त्या वृद्ध वारकर्‍याला दंडवत.

मस्त

पंचहौद मिशनात पेलाभर चहा आणि दोन बिस्कुटें खाल्ली तर सक्षौर प्रायश्चित्त घ्यावे लागते.पण नरसोबाच्या वाडीस विद्वान धार्मिकांनी स्वहस्ते बोकडाचे प्राण घेऊन त्याच्या शिजवलेल्या मांसाचे गोळेच्या गोळे दिवसाढवळ्या हजारों लोकांसमक्ष मिटक्या मारीत खाल्ल्यास कांही हरकत नसते.

बळजबरी प्रायश्चित्त घेणार्‍याचा आक्षेप समजू शकतो, बाकिच्यांना का त्रास?

आम्हांस जें वाईट वाटते ते बोकड मारून त्याचें मांस खाल्ल्याने देव खुष होतो आणि मुक्ति देतो असा मूर्खपणाचा समज अद्यापि आपल्या धर्मात राहिला आहे आणि त्या समजावर आचरण करणारे लोक अद्यापि आहेत, याबद्दल.

ह्यात देवाचे अस्तित्व मान्य केले आहे काय?

मांस खावेसे वाटले,किंवा दारू पिण्याची लहर आली तर पेड्रोच्या किंवा नसरवांजीच्या हॉटेलात जावे.चार दोन रुपये खर्चावे.आणि आत्मा गार करावा.त्या सुखाकरिता इतके सव्यापसव्य आणि द्राविडीप्राणायाम कशाला? हाटेलात जाताना थोडेसे तीर्थ बरोबर घेऊन जावे आणि मांसाची बशी समोर आली की थोडा भाग देवाला अर्पण करणे असेल तर स्वत: करावा किंवा बबर्जीला तसे करण्यास सांगून ठेवावे म्हणजे पुलावा चुलीवरून उतरल्या उतरल्या तो वैश्वदेव आटपून घेईल.

फुकटचा सल्ला.

यज्ञाच्या मिषाने आपणास मांस खाण्याची मोकळीक आहे, इतकेच नाही तर तसे केल्याने आपल्या पदरी पुण्याची जोड होते असे समजणे हे केवढे अज्ञान आहे!!

अज्ञानात सुख आहे.

तसेच बुक्क्या मारून बकर्‍यास गुदगुल्या होतात असेही त्या याज्ञिकाने सिद्ध करून दाखवायला हवे.

त्यासाठी बकर्‍याला विचारायला हवे.

अग्निनारायणास बकर्‍याचे मांसच आवडते हे त्यांना कसे समजले? खुद्द परमात्मा किंवा त्याचा गुमास्ता हुताशन, इतर इतके जीव सोडून बोकडावरच फिदा का? मनुष्याप्रमाणे देवालाही बोकडच आवडावा याचा आम्हांस मोठा अचंबा वाटतो.

याज्ञिकाला स्वप्नात दृष्टांत झाला होता.

जर भटास दिलेली शय्या ,गाय व श्राद्धे मृतास पोहचत असतील तर मृताची बायकोही त्या श्राद्धाच्या रात्री भटाकडे का पाठवू नये?

भटाने सांगितलेले शास्त्र आहे ना? त्याने सांगितले आणि पाठवू शकत असाल तर जरुर पाठवा, ज्याची त्याची श्रध्दा.

स्पष्टवक्त्या बाबाच्या या प्रश्नाइतका आमचा प्रश्न झोंबणारा नाही.आम्ही एवढेच विचारतो की जर यज्ञबलीस यातना होत नाहीत तसेच त्याला फिरून जीवदशा प्राप्त होते असा श्रद्धाळूंचा समज आहे, तर यजमानाने स्वत:ची आहुती देण्यास काय प्रत्यवाय आहे? असे केल्याने कोमल भागावर बुक्क्या मारून घेणे,गळा आवळून घेणे किती सुखकारक असते हे अनुभवास येईल . तसेच परलोकाची हालहवाल कशी काय असते हे ताबडतोब पाहाण्यास सापडेल."

प्रश्न तुम्हाला आहे, अनुभव तुम्ही घ्या की.

बुझाऊं शकेना विधाता तयाला|

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
@आकोमी
हे कोणासाठी लिहिले आहे? कोणी लिहिले आहे? ते कृपया समजून घ्यावे.
जे श्रद्धाळू आहेत, यज्ञ करतात, पशुबळी देतात,त्याचे मांसभक्षण केल्याने पुण्य लाभते असे मानतात, मृत आप्ताचे श्राद्ध घालतात,त्या भटजीला जे जे द्यावे(खाद्यपदार्थ,उदककुंभ,शय्या,काठी,छत्री इ.) ते ते सर्व मृताला स्वर्गात पोचते हे ज्यांना खरे वाटते अशा माणसांसाठी हे लिहिले आहे.
..ज्यांनी लिहिले आहे त्यांचा असल्या कर्मकांडांवर तिळमात्र विश्वास नाही.ते मृत आप्ताचे श्रद्ध करीत नाहीत. भटजी नसतोच.तेव्हा त्याला कांही संगणे,त्याचे ऐकणे याचा प्रश्नच उद्भवत नाही.त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न तर्काधिष्ठित आहेत.श्रद्धाळूंना अनुत्तरित करणारे आहेत.

??

तर्काला सगळेच समजले असते तर यदृच्छेचे प्लेसहोल्डर्स तयार झालेच नसते, आज १०० वर्षानंतर यज्ञात पशूबळी जाण्याचे प्रमाण नगण्य झाले आहे, पण जिभेच्या चोचल्यासाठी पशूबळी जाण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसते आहे, श्रध्देच्या नसण्याने वृत्तीत फरक पडल्याचा विदा असल्यास मी देखील तुमच्याशी सहमत असेन.

चुकीची समजूत

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
**********************************
आकोमी लिहितात, "

आज १०० वर्षानंतर यज्ञात पशूबळी जाण्याचे प्रमाण नगण्य झाले आहे, पण जिभेच्या चोचल्यासाठी पशूबळी जाण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसते आहे"

यात शंकाच नाही. आगरकरांचा विरोध मांसभक्षणाला नाही.असा यज्ञ करून, पशू बळी देऊन त्याचे मांस खाल्ले म्हणजे देव प्रसन्न होतो.मोक्ष देतो.ही जी धार्मिकांची चुकीची समजूत आहे,त्या विचारसणीला विरोध आहे.श्रद्धेमुळे माणसाची बुद्धी इतक्या रसातळाला जाते याचा त्यांना खेद वाटतो.
..
(बुझावू शकेना विधाता तयाला...:(काही समजून घ्यायचेच नाही असे ज्याने ठरवले आहे)
त्याला विधाता(ब्रह्मदेव) सुद्धा काही समजावू शकणार नाही.

प्रति

यात शंकाच नाही.

ठीक.

आगरकरांचा विरोध मांसभक्षणाला नाही.असा यज्ञ करून, पशू बळी देऊन त्याचे मांस खाल्ले म्हणजे देव प्रसन्न होतो.मोक्ष देतो.ही जी धार्मिकांची चुकीची समजूत आहे,त्या विचारसणीला विरोध आहे.

विरोध मान्य आहे, पण गेल्या १०० वर्षात ह्या श्रद्धेच्या अनुपस्थित लोकांच्या वृत्तीत सकारात्मक फरक पडला आहे काय? ह्याचे उत्तर आगरकर देउ शकणार नाही, आपण द्याल काय?

(बुझावू शकेना विधाता तयाला...:(काही समजून घ्यायचेच नाही असे ज्याने ठरवले आहे)
त्याला विधाता(ब्रह्मदेव) सुद्धा काही समजावू शकणार नाही.

असेच म्हणावे वाटते, पण तुम्ही ब्रम्हदेव वगैरे मानता हे वाचून विशेष वाटते.

रूढ शब्दप्रयोग

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************

तुम्ही ब्रम्हदेव वगैरे मानता हे वाचून विशेष वाटते.

...आकोमी यांच्या प्रतिसादातून
आपली महाकाव्ये,मिथके,गीता अशा ग्रंथांद्वारे अनेक शब्दप्रयोग मराठी भाषेत रूढ झाले आहेत. ते आपण वापरतो.म्हणजे ते संबंधित मिथक आपण खरे मानतो असे नव्हे.समजा मी "हा सूर्य हा जयद्रथ" असा शब्दप्रयोग वापरला.तर त्यावरून,"वा! म्हणजे श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने सूर्य झाकला हे तुम्ही खरे मानता." असा निष्कर्ष काढणे तर्कहीन आणि अज्ञानमूलक आहे.

अवांतर

आपण माझ्या पुर्ण प्रतिसादावर प्रतिक्रिया देण्याचे टाळत आहात काय?

आपली महाकाव्ये,मिथके,गीता अशा ग्रंथांद्वारे अनेक शब्दप्रयोग मराठी भाषेत रूढ झाले आहेत. ते आपण वापरतो.म्हणजे ते संबंधित मिथक आपण खरे मानतो असे नव्हे.समजा मी "हा सूर्य हा जयद्रथ" असा शब्दप्रयोग वापरला.तर त्यावरून,"वा! म्हणजे श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने सूर्य झाकला हे तुम्ही खरे मानता." असा निष्कर्ष काढणे तर्कहीन आणि अज्ञानमूलक आहे.

छे छे..तुम्ही तुम्हाला किंवा आगरकरांना ब्रम्हदेव वगैरे उपाधी द्याल असे वाटले नाही म्हणून मे ते उपरोधिक विधान केले, असो. सिलेक्टीव्ह रिडींग करुन रेटत रहाणे ह्याला तर्कहीन हा शब्दप्रयोग देखील मला योग्य वाटतं नाहिये.

ब्रह्मदेव - अवान्तर

'बुझावू शकेना विधाता तयाला' ह्याचा मूळ पूर्ण मराठी श्लोक मला माहीत नाही पण तो बहुतांशी भर्तृहरीच्या नीतिशतकातील खालील प्रसिद्ध श्लोकाचे भाषान्तर असावा असे वाटते:

अज्ञः सुखमाराध्य: सुखतरमाराध्यते विशेषज्ञः|
ज्ञानलवदुर्विदग्धं ब्रह्माऽपि नरं न रञ्जयति||

( अ़ज्ञान मनुष्याला पटविणे सुकर असते, विशेषज्ञाला पटविणे अधिकच सुकर असते. (पण) थोडक्या ज्ञानाने पंडित बनलेल्याला ब्रह्मदेवसुद्धा काही पटवू शकणार नाही.)

हे वाचले का?

ही बातमी वाचली का? मला वाटलं की मानवत खटल्याला ४० वर्षे व्ह्यायला आली. :-( पण सुधारणा अद्याप बाकी आहे.

बळी देणार्‍यांना बोकड काय आणि पोरगं काय!

छान

आगरकरांचे लिखाण फारच मार्मिक आहे. आवडले आणि धन्यवाद.

"जर भटास दिलेली शय्या ,गाय व श्राद्धे मृतास पोहचत असतील तर मृताची बायकोही त्या श्राद्धाच्या रात्री भटाकडे का पाठवू नये? "

हे फारच आवडले.

फटाकडे लिखाण

१९०० काळातले लिखाण वाचता जाणवते, की (ओरखडे काढेपर्यंत) फटकारून लिहिण्याची पद्धत त्या काळात आजपेक्षाही जास्त होती. किंवा कमीतकमी आजकालच्या इतपत तरी होती.

खरे आहे

असेच लिखाण धर्मानंद कोसंबी यांचे वाचले आहे. मात्र एक वाटते: आगरकरांच्या लिखाणात मला कळकळ जाणवते, अहंकार जाणवत नाही. येथे त्यांनी समजुती वेडगळपणाच्या म्हटल्या आहेत, माणसे वेडगळ किंवा निर्बुद्ध आहेत असे म्हटल्यासारखे वाटत नाही. अर्थात त्यांचे मी फारसे वाचलेले नाही.
लवकरात लवकर सुधारणा राबवण्यासाठी ते न समजणार्‍या कोणाला निर्बुद्ध, अप्रामाणिक, स्वार्थी म्हणणे योग्य नाही, असे मला वाटते.
अलिकडचे फटकारणे हे आगरकर-स्टाईल नसून इतर कोणत्यातरी स्टाईलचे असावे असे वाटते.

बहुतेक तेव्हाच्या लोकांना वैयक्तिक अपमान वाटत असेल

एक असे असेल, की पूर्वीचे लेखक स्मृतीत शुद्ध झालेले आहेत (we cannot see warts from this distance), आणि काही प्रमाणात आजचे लेखक चांगल्या-वाइटासह दिसतात.

दुसरी गोष्ट अशी की त्या काळचे काही जळजळते प्रश्न पिढ्या मरून नव्या पिढ्या आल्यावर एका बाजूच्या दिशेने निकालात लागलेले आहेत. त्यामुळे जे लोक (hindsight २०-२०) निकालाच्या बाजूने होते, त्यांचे म्हणणे तिटकार्‍याचे होते, असे म्हणावेसे आपल्याला वाटत नाही. कारण शंभर वर्षांपूर्वी ते ज्या व्यक्तींना (धूर्त किंवा) मूर्ख म्हटले होते असे कोणीच आपल्या ओळखीत नसते. उदाहरणार्थ वरच्या लेखातच ही वाक्ये आहेत :

...मांस खाल्ल्याने देव खुष होतो आणि मुक्ति देतो असा मूर्खपणाचा समज अद्यापि आपल्या धर्मात राहिला आहे आणि त्या समजावर आचरण करणारे लोक अद्यापि आहेत...
...तसे केल्याने आपल्या पदरी पुण्याची जोड होते असे समजणे हे केवढे अज्ञान आहे!!

अजाबळीबाबत असे वाटणारे असे कोणीच लोक आपल्या आप्तांत आज नाही. त्यामुळे आगरकर फक्त समजाला मूर्ख म्हणतात, समज असलेल्या लोकांना मूर्ख म्हणत नाहीत, असे सहज वाटून जाते. पण ज्याच्या गावात ग्रामदैवताला रक्ताचे बळी देतात, त्या व्यक्तीचे आईवडील, ते स्वतः मूर्ख समज असलेले मानले जातील, अज्ञानी मानले जातील. आणि "माझा समज मूर्ख आहे=मी मूर्ख आहे, असे आगरकर म्हणत आहेत" हे सहज वाटून जाते. कारण माझे समज (किंवा माझ्या प्रेमळ आणि आदरणीय आप्तांचे समज) आणि माझी (किंवा माझ्या आप्तांची) कुवत यांच्यात अगदी अभेद मानला जातो. (मी, धनंजय, कित्येकदा अशा प्रकारे रागावतो.) पण खूप आदल्या काळातल्या पूर्वजांची समज आणि त्यांचा आपल्यात आलेला सुजाण अंश यांच्यात आपण भेद करू शकतो.

दुर्गाबाई भागवतांनी राजारामशास्त्री भागवतांचे समग्र वाङ्मय प्रसिद्ध केले आहे, त्यात राजारामशास्त्री (हेसुद्धा डु. आयडीने लिहीत) आणि भुकेलेले भट (हा डु. आयडी कोणाचा हे अजून ठाऊक नाही) यांच्यातला छापील वाद दिलेला आहे. दोषारोपण एकमेकांचा मूर्खपणा काढण्यापर्यंत गेले, असे म्हणा, किंवा "तू मला मूर्ख म्हणतोस काय?" अशा प्रकारच्या सवालांपर्यंत गेले. म्हणजे त्या काळात "अमुक वागण्याला मूर्ख म्हणणे = मला मूर्ख म्हणणे" असेच वाटत असे. माणसाच्या मानसशास्त्रात तितकासा बदल झालेला नाही. :-)

काळ गेल्यावर समाजातली सरासरी स्मृती बदलत गेल्याचे एक आपल्या डोळ्यादेखतचे उदाहरण म्हणजे विजय तेंडुलकर : आपल्या आदल्या पिढीत असे मत कित्येकदा दिसे : "तेंडुलकर सुधारलेल्या समाजासाठी नव्हे तर प्रसिद्धी/कुप्रसिद्धीची हाव म्हणून सनसनाटी लिहितात." आणि या/पुढल्या पिढीत तसे कमीकमी म्हटले जाते.

अगदी सहमत

दुर्गाबाई भागवतांनी राजारामशास्त्री भागवतांचे समग्र वाङ्मय प्रसिद्ध केले आहे, त्यात राजारामशास्त्री (हेसुद्धा डु. आयडीने लिहीत) आणि भुकेलेले भट (हा डु. आयडी कोणाचा हे अजून ठाऊक नाही) यांच्यातला छापील वाद दिलेला आहे. दोषारोपण एकमेकांचा मूर्खपणा काढण्यापर्यंत गेले, असे म्हणा, किंवा "तू मला मूर्ख म्हणतोस काय?" अशा प्रकारच्या सवालांपर्यंत गेले. म्हणजे त्या काळात "अमुक वागण्याला मूर्ख म्हणणे = मला मूर्ख म्हणणे" असेच वाटत असे. माणसाच्या मानसशास्त्रात तितकासा बदल झालेला नाही. :-)

अगदी सहमत आहे. एक गुळगुळीत झालेल वाक्य पहा. " आमचा विरोध व्यक्तिला नसून वृत्ती ला आहे" यात व्यक्तीला विरोध केला तर आम्ही रोषास पात्र ठरु पण वृत्तीला विरोध केला कि तो वैचारिक असहमती असा अभिप्रेत धरला जातो. खर तर ती व्यक्ती त्या वृत्तीची वाहक असते. प्रबोधनात बर्‍याचदा अशा शब्दांच्या कसरती कराव्या लागतात.
प्रकाश घाटपांडे

प्रतिसाद आवडला

प्रतिसाद आवडला.

त्रयस्थाला मूर्ख म्हणणे आणि जाहीररित्या मूर्ख म्हणणे तेव्हाही आणि आताही फारसे कठीण नसावे. प्रश्न येतो तो आपल्या आप्तांना मूर्ख म्हणण्याचा. असा प्रश्न उद्भवला की शब्दांची धार कमी होत असावी. तेथे सामोपचाराने समजवण्याचा मार्ग धरला जात असावा.

सहमत

एकंदरच प्रतिसादाशी सहमत.

त्यात राजारामशास्त्री (हेसुद्धा डु. आयडीने लिहीत) आणि भुकेलेले भट (हा डु. आयडी कोणाचा हे अजून ठाऊक नाही) यांच्यातला छापील वाद दिलेला आहे.

राजारामशास्त्रीदेखील भ्याडांपैकीच का? चला तर. आणि भुकेलेले भट हे टोनाही मस्तच. त्याकाळीही "अंअंअं..राजारामशास्त्री टोनांच्या मागे लपून लिखाण करतात!! उंऊं..राजारामशास्त्री टोनांच्या मागे लपून लिखाण करतात" असे संततरूदन करणारी शेंबडी पोरेही असतीलच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

तेंडुलकर

>>पण ज्याच्या गावात ग्रामदैवताला रक्ताचे बळी देतात, त्या व्यक्तीचे आईवडील, ते स्वतः मूर्ख समज असलेले मानले जातील, अज्ञानी मानले >>जातील.
एक स्पष्ट करते, बहुदा स्पष्ट झालेले नाही म्हणूनः मला कोणी व्यक्ती अज्ञानी आहे असे मानण्यास विरोध नाही. अज्ञानी आहे किंवा बुद्धिमान, कपटी किंवा मत्सरी, प्रेमळ किंवा दुर्बळ अशी विशेषणे आपण सर्वांनाच मनातल्या मनात लावत असतो. पण ते कृतीतून दाखवून द्यायचे तर हवे ते उद्दिष्ट साध्य होते काय? (अवांतर - "मंक" या प्रसिद्ध सीरीयलचा एक भाग पाहिला, मंक आणि यूएफओ. मंकला एक यूएफओ दिसते. त्याला यूएफओ दिसली असे मान्य होत नाही, पण दिसलेली तर असते. त्याची गाडी एका आडवळणाच्या गावी बंद पडते. मंक जाऊन त्याच्या सेक्रेटरीबरोबर कार मेकॅनिककडे उभा राहतो, त्याला विचारतो, सांगत असतो, तेव्हा मेकॅनिकला काही आश्चर्य वाटत नाही. तो शांतपणे म्हणतो," होय, मलाही अमूक ठिकाणी एक भूत दिसले होते. तुला यूएफओ दिसली, यात आश्चर्य नाही. " मंक म्हणतो, काय आहे मला दिसली तर माझे वेगळे आहे, मी डोक्याने काम करतो. तुझे तसे नाही. अर्थात या वाक्याचा अर्थ कळण्याएवढी अक्कल मेकॅनिकला असतेच. )

परत: मारून मारून हड्डी नरम केल्याखेरीज मुले शिकतच नाहीत असे मानणारे जुने आईवडिल, आणि अज्ञानी लोकांना आपले अज्ञान दूर करण्यासाठी वेळ झिडकारणारे आणि तोंडाने वाटेल तसे झोपडणारे सुधारक यात मला फरक दिसत नाही. दोघेही अज्ञानी वर्गाच्या उन्नतीसाठीच झटत असतात बिचारे. मारतोय बाप, पोरगा रडतोय पण ठीकच आहे, उन्नतीसाठी चालले आहे म्हणून शेजारी गप्प बसून ऐकतात. तसेच सुधारकांच्या बाबतीत इतर समाजाने करावे काय?

>आपल्या आदल्या पिढीत असे मत कित्येकदा दिसे : "तेंडुलकर सुधारलेल्या समाजासाठी नव्हे तर प्रसिद्धी/कुप्रसिद्धीची हाव म्हणून सनसनाटी >लिहितात." आणि या/पुढल्या पिढीत तसे कमीकमी म्हटले जाते.

हे केवळ तेव्हा आणि आतामध्ये जो काळ गेला आहे त्याने झाले असावे असे नाही. स्मृती सर्व प्रकारच्या असतात. तेंडुलकरांची काही नाटके मी पाहिली आहेत. त्यांच्या "घाशीराम कोतवालमध्ये" त्यांना जे सांगायचे होते त्यासाठी त्यांनी जो काळ निवडला, तो अनेक ब्राह्मणांना मुद्दाम हिणवण्यासाठी म्हणून शोधून काढल्यासारखा वाटला असावा असे म्हटले तर चूक ठरू नये. नथुरामने गांधीजींना मारण्याचे कृत्य केल्यानंतर झालेल्या सामाजिक उलथापालथीत ब्राह्मणांचा पूर्वीचा जातीसमुदायाच्या वर्चस्वाने असलेला जो काही थोडाफार शिल्लक राहिलेला तोरा होता तोही गेला होता म्हणायला हरकत नसावी. तेंडुलकरांनी भाष्य सत्ता, सत्तेपुढे चालणारी हांजीहांजी, अनैतिकता इ. सर्वांवर केले आहे पण राहताना "पुण्याचे बामण हरि" तेवढे लक्षात राहिले. ह्या स्मृती ताज्या असताना, त्यात होरपळलेल्या मागील पिढ्या जिवंत असताना ते तसे होणार हे तेंडुलकरांना कळलेच नाही असे नसावे. तरी त्यांनी ही जोखीम घेऊनही नाटक लिहीले, पार पाडले. नाटककाराला मुळात ब्राह्मणांवर भाष्य करायचे नाही तरी नाटकाची प्रसिद्धी यामुळे होईल, नाटक सर्वत्र पोचेल, याची कल्पना त्यांना किंवा त्यांच्या नाटक-दिग्दर्शकाला असावी असे वाटते. म्हणून त्यांना (किंवा कदाचित दिग्दर्शकाला) प्रसिद्धीची हाव होती असे म्हणणार्‍या पिढ्यांचे चुकले असेलच असे नाही. चांगले लिखाण प्रसिद्धीच्या हावेने नसते असे समजण्याचे कारण नाही. किंबहुना प्रसिद्धीसाठीच लिहीले जाते.

सध्याच्या पिढ्यांमध्ये यापैकी कसल्याही स्मृती फारशा नाहीत, काळही पुढे गेला आहे, च्यालेंजेही वेगळी आहेत, या गोष्टीत लक्ष घालायला वेळ आहे कोणाला? म्हणून आता बघताना त्यातील संदेश लक्षात येऊ शकतो.

श्रद्धा, अंधश्रद्धा आणि कर्मकांडे

लेख फारच आवडला. ज्याची श्रद्धा आहे त्याला कोणत्याही पुराव्याची गरज नाही, ज्याची नाही त्याच्यासाठी कोणताही पुरावा पुरेसा नाही वगैरे सगळे मान्य करुनही हा वाद अनंत काळापर्यंत चालत राहाणार, असेच दिसते.
या निमित्ताने अशा श्रद्धा या फक्त धार्मिक कर्मकांडांपर्यंतच सीमित आहेत का असा एक प्रश्न पडतो. वाढदिवसाला केकवर मेणबत्त्या लावून त्या फुंकर मारुन विझवणे (अशाने त्या केकवर असलेल्या जीवाणूंच्या संख्येत अनेक पटीने वाढ होते असे म्हणतात!), दिवाळीला आकाशकंदील लावणे, औक्षण करणे, अभ्यंगस्नान करणे, दसर्‍याला सोने लुटणे, संक्रांतीला तिळगूळ वाटणे... (तज्ज्ञांनी यात भर घालावी, हॅलोविनचे 'ट्रिक ऑर ट्रीट' वगैरे यात मुद्दाम घेतलेले नाही!) या सगळ्याचा मारुन-मुटकून विज्ञानाशी संबंध लावला जातो. पण असा काही संबंध आहे की नाही याचा सुतराम विचार न करता वर्षानुवर्षे, शतकानुशतके हे करत राहाणे हेही अंधपणाचेच नाही का?

सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

+१

या निमित्ताने अशा श्रद्धा या फक्त धार्मिक कर्मकांडांपर्यंतच सीमित आहेत का असा एक प्रश्न पडतो

मलाही हाच प्रश्न पडतो. टीका कर्मकांडांवर (डॉग्मा) करावी की (फक्त) धार्मिक कर्मकांडांवर करावी?

कालबाह्य,अहितकारक रूढी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
ज्या परंपरा,रूढी,सवयी कालबाह्य झाल्या आहेत,समाजाला अहितकारक आहेत त्या सर्वांवर टीका करावी.याचा अर्थ असा नव्हे की ज्याला टीका करायची आहे त्याने अशा सर्वच गोष्टींवर टीका करायलाच हवी.
एखाद्याने हिंदुधर्मातील कर्मकांडावरच टीका केली तरी ती त्याज्य ठरत नाही.त्याने जे लिहिले आहे ते समाजाच्या हिताचे आहे की अहिताचे ते पाहावे. हिताचे असेल तर स्वीकारावे." तो केवळ हिंदुधर्मातील कर्मकांडांवरच् टीका करतो. इतर कशावरच करीत नाही.म्हणून आम्ही त्याच्या लेखनाचा निषेध करतो" असे म्हणणे तर्कसंगत नाही.
.
आगरकरांच्या सुधारकपत्रात "धार्मिक कर्मकांडांवर टीका आहेच पण<"आम्हा पुरुषांचा पोषाख"
आमच्या स्त्रियांचा पेहराव,स्त्रियांना चरितार्थसंपादक शिक्षण देण्याची आवश्यकता,स्त्री व पुरुष यांस एकच शिक्षण द्यावे व तेही एकत्र" अशा विविध विषयांवर लेख आहेत.

कालबाह्य आणि अहितकारक

यज्ञ करणे हे कालबाह्य कसे काय? तर्कसंगत नसेल, पण कालबाह्य कसे काय? दोन हजार वर्षांपूर्वीही यज्ञ करणे आवश्यक समजणारे लोक होते, आजही आहेत. उद्याही राहतील. यज्ञ तर्कविसंगत असेल, तर दोन हजार वर्षांपूर्वीही तर्कविसंगत होता, (आणि तसे सांगणारे लोक त्यावेळीही होते – बुद्ध होता, वेदांती होते, लोकायत होते) आजही आहे, आणि उद्याही राहील. तेंव्हा यज्ञाला तर्कविसंगत म्हणणे ठीक आहे, पण कालबाह्य म्हणणे ठीक नाही. (कालबाह्य चे उदाहरण – कम्प्युटर - प्रिंटर उपलब्ध असताना टाइपरायटर वापरणे.)

अहितकारक. यात अहितकारक ते काय? मियां बिबि राजी. त्या यज्ञाचा खर्च करणायाला काही अडचण नाही. दक्षिणा घेणाया पुरोहिताला काही प्रॉब्लेम नाही. मग आगरकरांना यात काय अहितकारक दिसले असावे? समाजाची कोणती हानी झालेली दिसली? आता कुणी असे म्हणले, की हे लोक यज्ञ करण्याची “जबरदस्ती” करत आहेत, तर भाग वेगळा. बकऱ्याचा जीव जाणे यात आगरकरांना काही अहितकारक दिसत नसावे (जसे बुद्धाला दिसले होते) कारण हॉटेलात मटण खायला कुणी गेले तर त्याला त्यांची ना दिसत नाही. मग यज्ञाच्या निमित्ताने केले कुणी आपले चोचले तृप्त तर काय प्रॉब्लेम आहे? यज्ञ निरर्थक आहेत, असे (फार फार तर) म्हणता येईल. यज्ञात जाळली जाणारी लाकडे, मारला जाणारा पशू यांच्याविषयी चिंता असेल, तर यज्ञ निश्चित अहितकारक आहेत; पण तसे आगरकर म्हणताना दिसत नाहीत. त्यांना यज्ञ करण्याच्या कारणमीमांसेवर हल्ला करायचा आहे. माझ्या मते त्याच्यात पडण्याचे काही कारण नाही. त्या यजमानाचा आणि त्या पुरोहिताचा समाजाला कसलाही उपद्रव होत नाही. त्यांना त्यांचा टाइमपास करु द्यावा

माणसे बेरकी असतात. यज्ञ करणाऱ्या माणसांना यातला फोलपणा आणि तर्कविसंगती जाणवत नसेल असे म्हणवत नाही. पुकाचा मोठेपणा मिरवण्यासाठी बरीच मंडळी असले उद्योग करताना दिसतात. करु देत बिचारे. असेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच की. असले लेख लिहून आपण समाजसुधारणा करतो आहोत असे काही लोकांना वाटते, तसेच, यज्ञ करुन आपल्याला मोठेपणा मिळतो असे काही लोकांना वाटते. दोन्हीत फारसा फरक नाही. दोन्ही तितकेच इर्रिलेव्हंट आहेत.

तर्कविसंगती दाखवून देणारा एक विनोदप्रचुर लेख यापलीकडे “समाज सुधारणा” वगैरे दृष्टीने या लेखाला फारशी किंमत नाही. यज्ञाची जेवढी किंमत, तेवढीच किंमत याही लेखाची. यज्ञाने समाजाची काही हानी होत नाही, आणि या लेखाने समाजाचे काही भले होत नाही. एखादा भोळसट खरेच सिन्सिअरली यज्ञाच्या लाभांवर विश्वास ठेऊन असेल, तर तो (कदाचित) अंतर्मुख होण्याची एक (धूसर) शक्यता आहे. त्यापलीकडे काहीही नाही.

चंगळवाद

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************

डॉ.शरद अभ्यंकर,वाई हे "जरा शहाणे होऊ" या आपल्या पुस्तकात लिहितात:

"समाजाला उपयोग शून्य.मात्र पैशांची प्रचंड उधळपट्टी हा चंगळवादाचा निकष लावल्यास आजकाल ठिकठिकाणी वारंवार होणार्‍या यज्ञयागांची बरोबरी या बाबतीत इतर कोणतीही गोष्ट करू शकणार नाही.शतचंडी,लक्षचंडी असे एकसे बढकर एक यज्ञ करून सर्पण,तूप,तेल,तांदूळ,तीळ आणि लोकांचा वेळ अशा राष्ट्रीय महत्त्वाच्या गोष्टींचा इथे निष्कारण धूर करतात.विश्वशांती हे अशा यज्ञांची उद्दिष्ट असते असे सांगतात.पण हे यज्ञ जिथे संपन्न होतात त्या स्थानाच्या पलीकडच्या गल्लीतसुद्धा शांतता प्रस्थापित होत नाही हे आपण जाणतोच."
.......

एका विश्वशान्ति यज्ञात दीडहजार कुंडे होती. यज्ञाच्या ठिकाणी त्याच दिवशी दुर्घटना घडून ५०/६० माणसे मरण पावल्याचे वृत्त काही महिन्यांपूर्वी वाचल्याचे अनेकांना आठवत असेल

सिलेक्टिव्ह तर्क

डॉ अभ्यंकरांच्या मताबद्दल दुमत नाही. केवळ धार्मिक डॉग्मालाच लक्ष्य केले जाते; डॉग्मा (मायनस धर्म) नाही - याचे कारण समजत नाही. असो. तुमच्या मते सिलेक्टिव्ह झोडपणीत काही आक्षेपार्ह नाही. ठीक आहे. बाय द वे यज्ञांच्या निमित्ताने "राष्ट्रीय महत्त्वाच्या गोष्टींचा निष्कारण धूर" जेवढा होतो, त्यापेक्षा कैक पटींनी अधिक धूर क्रिकेट मॅचा, निरर्थक मालिका, आणि गल्लोगल्ली असलेले दारुचे अड्डे यांनी होतो. असो. धार्मिक लोकांना मूर्ख म्हणायचे तोंडसुखच घ्यायचे आहे म्हणल्यावर प्रश्नच मिटला.

यज्ञाच्या ठिकाणी त्याच दिवशी दुर्घटना घडून ५०/६० माणसे मरण पावल्याचे वृत्त काही महिन्यांपूर्वी वाचल्याचे अनेकांना आठवत असेल

यना सर, ही दुर्घटना "यज्ञा" मुळे झाली असे म्हणत असाल, तर यज्ञामुळे विश्वशांती होते असे मानण्याइतकाच हाही तर्क हास्यास्पद आहे.

बाकी मुद्द्यांबाबत बोलला नाहीत म्हणजे आपल्याला ते मान्य असावेत बहुदा.

यज्ञामुळेच दुर्घटना

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.आ.रा.लिहितात,

ही दुर्घटना "यज्ञा" मुळे झाली असे म्हणत असाल, तर यज्ञामुळे विश्वशांती होते असे मानण्याइतकाच हाही तर्क हास्यास्पद आहे.

..
पंधराशे कुंडांत जे हवन चालले होते त्यामुळे खूप धूर झाला.तो नाकातोंडात शिरल्याने श्वास कोंडला. अनेक श्रद्धाळूंनी आपापले हवनद्रव्य आणले होते. ते यज्ञात टाकण्यासाठी जो तो धडपडत होता.गर्दी उसळली होती.पळापळी सुरू झाली.चेंगराचेंगरीत बायका-मुलांसह अनेकांचे प्राण गेले. अशी बातमी काही महिन्यांपूर्वी आली होती.अनेकांनी वाचली असेल.यज्ञाचे आयोजन केले नसते तर दुर्घटना झाली नसती.

यज्ञ हे निमित्त आहे

यज्ञासारख्या निरर्थक आणि अंधश्रद्धा वाढीस कारणीभूत ठरणार्‍या गोष्टी बंद कराव्या ही एक बाब आहे परंतु पळापळ, चेंगराचेंगरी, गर्दी यांचे कारण होण्यास यज्ञ हे एक निमित्त आहे. यज्ञाशिवायही गर्दीमुळे होणारी हानी टाळता येईल असे नाही.

हानी झाली ती बेशिस्त, सुव्यवस्थेचा आणि व्यवस्थापनाचा अभाव आणि अडाणीपणा यामुळे.

आळशांचा राजा यांचे -

. बाय द वे यज्ञांच्या निमित्ताने "राष्ट्रीय महत्त्वाच्या गोष्टींचा निष्कारण धूर" जेवढा होतो, त्यापेक्षा कैक पटींनी अधिक धूर क्रिकेट मॅचा, निरर्थक मालिका, आणि गल्लोगल्ली असलेले दारुचे अड्डे यांनी होतो.

हे मतही पटणारे नाही. क्रिकेट मॅच हे करमणूकीचे साधन आहे. तो खेळ आहे. लहान थोर आणि सर्वधर्मीय लोक त्याचा आनंद उपभोगू शकतात. त्यावरही वायफळ खर्च झाला की आवाज उठवणारे लोक आहेतच. दारूचे अड्डे बंद करण्याविषयी अनेक संघटना जागरूक असतात. किंबहुना, दारू पिऊन दंगा करणार्‍यांना कायद्याने शिक्षा होऊ शकते. (होतेच असे नाही..दुर्दैव आपले) मालिका कोणी बंद पाडणार असेल तर कळवावे, अक्कला गहाण ठेवल्यासारखे कार्यक्रम बंद करायला माझा पाठिंबा आहे.

यज्ञ आणि क्रिकेट, दारूचे गुत्ते यांच्यात साम्य कमी वाटते.

सहमत

सगळ्याच प्रतिसादाशी सहमत आहे. माझे मत आपल्याला पटले नाही हे ठीकच आहे. ते मी उपरोधाने लिहिले आहे. "राष्ट्रीय महत्वाच्या गोष्टींचा धूर" याला उद्देशून काही गोष्टींची एक औपरोधिक यादी केलेली आहे. क्रिकेट, मालिका, दारुचे (कायदेशीर) अड्डे यांची मला काहीही अडचण होत नाही. आणि "राष्ट्राला" (!) ही काही अडचण होत असेल असेही मला वाटत नाही.

ठीक

क्रिकेट, मालिका, दारुचे (कायदेशीर) अड्डे यांची मला काहीही अडचण होत नाही. आणि "राष्ट्राला" (!) ही काही अडचण होत असेल असेही मला वाटत नाही.

मला ते सारेच हीन वाटते.

वहावत जाणे

यज्ञाचे आयोजन केले नसते तर दुर्घटना झाली नसती.

यज्ञ आणि दुर्घटनेचे नेसेसरी कोरिलेशन किंवा कार्यकारण भाव नाही. दुर्घटना ढिसाळ आयोजनामुळे झालेली आहे. (केवळ) आयोजनामुळे नाही. तुम्ही म्हणता त्या न्यायाने उद्या एखाद्या निरीश्वरवाद्यांच्या सेमिनारमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली तर ती त्या सेमिनारमुळे लागली असे म्हणावे लागेल. ((निरीश्वरवाद्यांच्या) सेमिनारचे आयोजन केले नसते तर आग लागली नसती!)

हास्यास्पद तुलना

धर्मांध लोक यज्ञ करण्याकरिता जमतात तद्वत निरीश्वरवादी लोक हे सेमिनारमध्ये लाँग किंवा शॉर्ट सर्किटचे प्रयोग करण्यासाठी जमतात ही नवी माहिती मिळाली.

यज्ञ करण्याकरिता जमलेल्या लोकांच्या ढिसाळ वा तत्सम आयोजनामुळे धूर झाला तरी धूर होण्याचे कारण यज्ञ हेच आहे. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागली तर त्याचे कारण सेमिनार असू शकत नाही हे सामान्य वकूबाच्या कोणत्याही व्यक्तीला सहज कळावे. कृपया विचार करण्यात आळस करू नये ही विनंती.

तपशीलात चूक

तद्वत निरीश्वरवादी लोक हे सेमिनारमध्ये लाँग किंवा शॉर्ट सर्किटचे प्रयोग करण्यासाठी जमतात ही नवी माहिती मिळाली.

शॉर्ट सर्कीटच्या उलट स्थितीला विशिष्ट परिस्थितीमधे ओपन सर्किट म्हणतात लाँग सर्किट नव्हे.

आगरकरांचा निबंधवजा लेख इथे दिल्याबद्दल आभार.

धन्यवाद

चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.

विदा द्या

निरीश्वरवाद्यांच्या (किंवा पुरोगाम्यांच्या) संमेलनाच्या मांडवाला आग लागण्याच्या (किंवा ढिसाळ कारभाराच्या) प्रत्येक उदाहरणापेक्षा धार्मिकांच्या कार्यक्रमांतील दुर्घटनांची टक्केवारीनेही अधिक उदाहरणे सापडतील असे माझे प्रतिपादन आहे.
पुरोगाम्यांचा मांडव जळण्याविषयी मला तरी एकच संदर्भ माहिती आहे ते म्हणजे दगडू हलवाई, भाऊ रंगारी, इ. 'तेल्यातांबोळ्यां'च्या गटाने दिलेली धमकी. (तेव्हाही मांडव जळालाच नाही.)

अभिव्यक्ति स्वातंत्र्य

'करु देत बिचारे' या छापाचा वरील प्रतिसाद वाचून नवल आणि वाईट वाटले. याचा अर्थ असा की जोवर एखादी गोष्ट समाजाला प्रत्यक्ष इजा पोचवत नाही, तोवर ती गोष्ट निरर्थक आणि तर्कविसंगत असेल तरी तिच्याकडे समाजाने आणि विशेषतः समाजातील विचार करणार्‍या लोकांनी दुर्लक्ष करावे. समाजाच्या या 'मला काय त्याचे?' या वृत्तीनेच समाजाचे अपरिमित नुकसान झाले आहे. यज्ञाने समाजाची काही हानी होत नाही, आणि या लेखाने समाजाचे काही भले होत नाही. हे गृहितक भयानक आहे. असे सगळे सगळीकडे राबवायचे म्हटले तर 'उपक्रमा'वरचे निम्म्याहून अधिक लिखाण फोल ठरेल. कुठल्याशा ग्रह-तार्‍यांची युति होते म्हणून कुणीतरी आपला सगळा संसार संपवला, कुणाला तरी आपले काम लवकर करुन पाहिजे होते म्हणून त्याने काही लाखांची लाच दिली.. या सगळ्यावर 'मियां बीबी राजी' ही भूमिका घेतली तर कठीण आहे....
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

चिंता करितो विश्वाची!

चिंतातूर जंतु (आयडी नव्हे) कविता आठवली.

कुठल्या निरर्थक गोष्टीने समाजाला प्रत्यक्ष इजा होणार हे कसे ठरवणार? सगळ्याच निरर्थक गोष्टींना झोडपणे सुरु करावे आणि अर्थपूर्ण जगाची आखणी करावी.

ग्रह तार्‍यांच्या युती संदर्भात झालेल्या आत्महत्येचे उदाहरण अमान्य. आत्महत्या नैराश्याने झालेली आहे. हे युती वगैरे न मानणारी मंडळीदेखील नैराश्याला बळी पडून जीव देत असतात. त्यांना आत्महत्येसाठी जे काही निमित्त झाले असेल, ते निमित्त धरुन त्याचीही चिंता करा.

लाचेचे उदाहरण साफ अमान्य. कायद्याने गुन्हा असलेली गोष्ट आहे साहेब. निरर्थक नाही.

...तर 'उपक्रमा'वरचे निम्म्याहून अधिक लिखाण फोल ठरेल

ठरेल. मग? त्याचीही चिंता आहे की काय!

सहमत

आत्महत्या नैराश्याने झालेली आहे.

नरबळीसुद्धा क्रौर्याच्या इच्छेतून देण्यात येतात, अंधश्रद्धेतून नव्हे - सारेच सिरीयल किलर धार्मिक भावनेने प्रेरित नसतात तसेच अंधश्रद्धेसोबत नरबळीही योगायोगानेच घडतात!

युती वगैरे न मानणारी मंडळीदेखील नैराश्याला बळी पडून जीव देत असतात.

विदर्भातील शेतकरी आणि अल कैदाचे दहशतवादीसुद्धा!

सूक्ष्म समर्थनाचाच एक प्रकार

'करु देत बिचारे' या छापाचा वरील प्रतिसाद वाचून नवल आणि वाईट वाटले.

असेच. हा सूक्ष्म समर्थनाचाच एक प्रकार आहे असे वाटते. थोडक्यात काय कुणी नरमेध यज्ञ करेपर्यंत आपण विरोध करणार नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

विरोध कशासाठी?

नरमेध यज्ञाचा विरोध कशासाठी करावा? यज्ञात बळी जाणारी व्यक्ती व बळी देणारी व्यक्ती हे मियाबीबी राजी असले तर इतर काजींनी नाक खुपसण्याचे कारण समजले नाही. किंबहुना सतीप्रथेचे पुनरूत्थान करणे आवश्यक आहे असे वाटू लागले आहे.

?

तेंव्हा यज्ञाला तर्कविसंगत म्हणणे ठीक आहे, पण कालबाह्य म्हणणे ठीक नाही.

सहमत.

यज्ञ करणाऱ्या माणसांना यातला फोलपणा आणि तर्कविसंगती जाणवत नसेल असे म्हणवत नाही.

आम्हाला म्हणवते.

एखादा भोळसट खरेच सिन्सिअरली यज्ञाच्या लाभांवर विश्वास ठेऊन असेल

एखादा भोळसट?

यात काय अहितकारक दिसले असावे? समाजाची कोणती हानी झालेली दिसली?

यज्ञ पियर प्रेशरमुळे केला जातो असे मानले तरी:
यज्ञ करण्यास तेव्हा प्रतिष्ठा होती (आताही थोडी आहेच). वर्गातील मुले 'मॅकडी'मध्ये वाढदिवस साजरा करीत असतील, तर ते दडपण बनते. समाजातून वगळले जाणे टाळण्यासाठी आर्थिक आणि आरोग्याचा तोटा सहन करण्यात येतो. यज्ञ तर्कविसंगत असल्याचे पटले तरीही बहिष्कार सहण्याची कुवत सर्वांमध्ये नसते. "मी दडपणामुळे यज्ञ करतो" अशी कबुली (पहा: "यज्ञ करुन आपल्याला मोठेपणा मिळतो असे काही लोकांना वाटते") मिळविल्यास ती प्रतिष्ठासुद्धा कमी होईल.

डॉग्मॅटिक थिंकिंग

आम्हाला म्हणवते.

एखादा भोळसट?

नास्तिकता हा तुमचा धर्म. आणि या धर्माचे तुम्ही अगदी मिशनरी झीलने रिलिजियसली पालन करता हे या तुमच्या टिप्पणींवरुन दिसून येते.

पियर प्रेशरबाबत. तुम्ही म्हणता त्यात काही चूक नाही. यज्ञ करण्यामागची अजून एक शक्यता (सिन्सिअर धार्मिकतेशिवायची) मी बोलून दाखवली इतकेच. ते यज्ञाची प्रतिष्ठा कमी करण्यासाठी तुमच्यात असलेले मोटिवेशन माझ्यात नाही, आणि तसे मला वाटतही नाही.

"नास्तिकता हा धर्म"

फिलॉसफी ऑफ रिलिजन

मी धर्म हा शब्द डॉग्मा या अर्थाने वापरला आहे. झापड लावून विचार करणे. अन्य शक्यतांचा विचार न करणे. प्रस्तुत चर्चेतील नास्तिकता ही केवळ अथेइझम नसून एकूणच स्पिरिच्युऍलिटी नाकारणारी आहे. अन्यथा (काही) बौद्ध विचारधारा या अथेइस्ट, तरीही रिलिजन अशा आहेत. त्यामुळे प्रस्तुत उद्धरण हे "बाय द वे" असे घेण्यात आलेले आहे.

असहमत

स्पिरिच्युऍलिटी ही संकल्पना स्पिरिट म्हणजे आत्म्याशी संबंधित असेल तर ती नाकारणे हा डॉग्मा नाही.

हे तुमचे मत आहे का?

येथे कोणीही बौद्ध विचारधारांवर ताशेरे ओढलेले मला तरी दिसले नाहीत. प्रस्तुत चर्चेतील नास्तिकता ही अथेइझम नसून स्पिरिच्युऍलिटी नाकारणारी आहे हा अडाणी निष्कर्ष आपण काढला आहे. हा निष्कर्ष काढताना आपण इतर शक्यतांचा विचार केला आहे असे दिसले नाही. कृपया स्वतःचे झापडबंद मत आणि चर्चेबाबत निष्कर्षात्मक शेरेबाजी यांची गल्लत करू नये ही विनंती.

आणखी काही :)

आणखी काही इथे. भर टाकावी. :)

खपलो!

आमची भर -

उपक्रम हेच मिसळपाव आहे.
संपादक हेच खरे जालकंटक आहेत.

आणखी भर टाकावी.

आवडले

पान आवडले. Sanity is a mental illness हे विशेष आवडले.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

:)

नास्तिकता हा तुमचा धर्म. आणि या धर्माचे तुम्ही अगदी मिशनरी झीलने रिलिजियसली पालन करता हे या तुमच्या टिप्पणींवरुन दिसून येते.

तुमचा आरोप प्रतिवादास पात्र नाही.

यज्ञ करण्यामागची अजून एक शक्यता (सिन्सिअर धार्मिकतेशिवायची) मी बोलून दाखवली इतकेच.

अजून एक? - तुमचे मत बदलले आहे काय? आधी, तुमच्या मते तीच एक शक्यता (=सिन्सिअर धार्मिकता नसतेच) होती. "यज्ञ करणाऱ्या माणसांना यातला फोलपणा आणि तर्कविसंगती जाणवत नसेल असे म्हणवत नाही." आणि "एखादा भोळसट".

ते यज्ञाची प्रतिष्ठा कमी करण्यासाठी तुमच्यात असलेले मोटिवेशन माझ्यात नाही, आणि तसे मला वाटतही नाही.

नरबळी आणि आत्मघातकी स्फोट हे प्रामाणिक धार्मिकतेचे अवश्य परिणाम आहेत. दांभिक धार्मिकतेचा मोठेपणाचा तोरा उतरविणेसुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे, दोन्हीप्रकारच्या धार्मिकतांची प्रतिष्ठा नष्ट करण्याची आवश्यकता आहे.

 
^ वर