नरसोबाच्या वाडीचा यज्ञ (इ.स.१८९०)

नरसोबाच्या वाडीचा यज्ञ (इ.स.१८९०)
[आगरकर यांच्या सुधारक पत्रात "धर्माचा सुकाळ आणि बकर्‍यांचा काळ" या शीर्षकाचा एक लेख आहे.त्यातील काही निवडक भाग पुढील प्रमाणे:--]

.......पंचहौद मिशनात पेलाभर चहा आणि दोन बिस्कुटें खाल्ली तर सक्षौर प्रायश्चित्त घ्यावे लागते.पण नरसोबाच्या वाडीस विद्वान धार्मिकांनी स्वहस्ते बोकडाचे प्राण घेऊन त्याच्या शिजवलेल्या मांसाचे गोळेच्या गोळे दिवसाढवळ्या हजारों लोकांसमक्ष मिटक्या मारीत खाल्ल्यास कांही हरकत नसते.

वाडी येथे नुकताच झालेला यज्ञ ज्या दांपत्याने केला व त्याचे काम ज्या ऋत्विजांनी चालविले त्यांविषयीं आमचे काही एक म्हणणे नाही.मोठ्या पुण्याईने प्राप्त झालेल्या ब्राह्मणजन्माचे सार्थक करण्याचे जे साधन त्यांस योग्य वाटले तें त्यांनी योजिलें. हे स्वाभाविक आहे.त्यांना दोष देणे योग्य नाही.आम्हांस जें वाईट वाटते ते बोकड मारून त्याचें मांस खाल्ल्याने देव खुष होतो आणि मुक्ति देतो असा मूर्खपणाचा समज अद्यापि आपल्या धर्मात राहिला आहे आणि त्या समजावर आचरण करणारे लोक अद्यापि आहेत, याबद्दल.
मांस खावेसे वाटले,किंवा दारू पिण्याची लहर आली तर पेड्रोच्या किंवा नसरवांजीच्या हॉटेलात जावे.चार दोन रुपये खर्चावे.आणि आत्मा गार करावा.त्या सुखाकरिता इतके सव्यापसव्य आणि द्राविडीप्राणायाम कशाला? हाटेलात जाताना थोडेसे तीर्थ बरोबर घेऊन जावे आणि मांसाची बशी समोर आली की थोडा भाग देवाला अर्पण करणे असेल तर स्वत: करावा किंवा बबर्जीला तसे करण्यास सांगून ठेवावे म्हणजे पुलावा चुलीवरून उतरल्या उतरल्या तो वैश्वदेव आटपून घेईल.

यज्ञाच्या मिषाने आपणास मांस खाण्याची मोकळीक आहे, इतकेच नाही तर तसे केल्याने आपल्या पदरी पुण्याची जोड होते असे समजणे हे केवढे अज्ञान आहे!! यज्ञावर श्रद्धा ठेवणारे असेही मानतात की यज्ञात मारलेला बोकड पुन्हा जिवंत होतो. बुक्क्यांनी हालहाल करून मारलेल्या बकर्‍याच्या मांसाचा काही भाग हुताशनाद्वारा जगदात्म्यास अर्पण करून बाकीच्याचे यजमानाने आणि ऋत्विजांनी सेवन केले असता देव प्रसन्न होतो.आणि त्यांना जन्म-मरणाच्या फेर्‍यातून मुक्त करतो ही जितक्या वेडगळपणाची समजूत तितक्याच वेडगळणाची ही दुसरी समजूत.यज्ञात मारलेले बकरे जिवंत होत असतील तर खाटिकखान्यात तोडलेले प्रत्येक जनावर पुन्हा जिवंत होत नसेल कशावरून? त्याचे मांस सुद्धा सकल अग्नीत जो श्रेष्ठ जठराग्नी त्यासच अर्पण होत असते.मारलेले बकरे उठतात याचा अर्थ काय? ते एकदा मेले की मेले.जर त्यांना जिथल्या तिथे उठविण्याचे सामर्थ्य कुणा ऋत्विजात असेल तर तो याज्ञिक खरा.तसेच बुक्क्या मारून बकर्‍यास गुदगुल्या होतात असेही त्या याज्ञिकाने सिद्ध करून दाखवायला हवे.

या यज्ञिकांस आम्ही आणखी एक प्रश्न विचारतो.अग्निनारायणास बकर्‍याचे मांसच आवडते हे त्यांना कसे समजले? खुद्द परमात्मा किंवा त्याचा गुमास्ता हुताशन, इतर इतके जीव सोडून बोकडावरच फिदा का? मनुष्याप्रमाणे देवालाही बोकडच आवडावा याचा आम्हांस मोठा अचंबा वाटतो.

यज्ञपशूला मारापासून यातना होत नसतील व तो फिरून जिवंत होत असेल तर आम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे.मागे आम्ही प्रेतसंस्कार आणि श्राद्ध विषयावर लेख लिहिला. त्यावेळी आमच्यावर टीका करणार्‍यांस एका वृद्ध वारकर्‍याने जो प्रश्न केला त्याच्या उदाहरणावरून धैर्याचे अवलंबन करून आम्ही हा प्रश्न विचारणार आहोत.तो वृद्ध म्हणाला,"जर भटास दिलेली शय्या ,गाय व श्राद्धे मृतास पोहचत असतील तर मृताची बायकोही त्या श्राद्धाच्या रात्री भटाकडे का पाठवू नये? "

स्पष्टवक्त्या बाबाच्या या प्रश्नाइतका आमचा प्रश्न झोंबणारा नाही.आम्ही एवढेच विचारतो की जर यज्ञबलीस यातना होत नाहीत तसेच त्याला फिरून जीवदशा प्राप्त होते असा श्रद्धाळूंचा समज आहे, तर यजमानाने स्वत:ची आहुती देण्यास काय प्रत्यवाय आहे? असे केल्याने कोमल भागावर बुक्क्या मारून घेणे,गळा आवळून घेणे किती सुखकारक असते हे अनुभवास येईल . तसेच परलोकाची हालहवाल कशी काय असते हे ताबडतोब पाहाण्यास सापडेल."

Comments

डाउन सिंड्रोम?

पियर प्रेशरला बळी पडणार्‍यांचा (डाउन सिंड्रोम वाल्यांचे) कशा-कशापासुन बचाव करणार? जर पियर प्रेशरला बळी पडणे ही मानसिकता असेल तर धर्म फक्त साधन आहे, साधनावर बंदी आणणे योग्य की मानसिकता बदलणे योग्य?

काउंटरप्रेशर

टिंगल करणे हे प्रतिदडपण आहे. ते सुधारले नाहीत तरी किमान अरेरावी तरी करणार नाहीत अशी अपेक्षा असते.

उत्तर

धार्मिक कर्मकांडांना ज्या प्रमाणात प्रतिष्ठा आहे त्या प्रमाणात ती नवकर्मकांडांना नाही, त्यांच्यावर अनेकजण टीका करतात. नवकर्मकांडे तितकी कर्मठही नाहीत. मेणबत्तीवर नीट फुंकर मारली नाही, किंवा, केक तोंडाला लावून घेण्यास व्यक्ती तयार झाली नाही या कारणांनी जाळपोळ किंवा खून पडत नाहीत.

पेड्रो आणि नसरवानजी.

<मांस खावेसे वाटले,किंवा दारू पिण्याची लहर आली तर पेड्रोच्या किंवा नसरवांजीच्या हॉटेलात जावे.>

ह्या दोनांपैकी नसरवानजी ओळखीचा आहे. पुणे कँप सरहद्दीवर असलेले हे रेस्टॉरंट 'नॉन-व्हेज' साठी ३०-४० वर्षांपूर्वी तरी जोरात होते. अजून ते चालू आहे काय?

पेड्रो मात्र कधी ऐकलेला नाही. कोणास त्याची काही माहिती आहे काय?

लेख छान आहे.

वृद्ध वारकरी बाबांची वाहवा करणारे दोन प्रतिसाद वाचले.
यज्ञांत पुरोहितांनी असले उद्योगही केल्याचे वाचनात आहे..
(म्हणजे त्या स्त्रीस विकृत वागण्यास भाग पाडणे.)

मस्त!

आगरकरांचे विचार फार आवडले.

-Nile

मार्मिक लेखन

अतिशय मार्मिक लेखन.
इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल यनावाला यांचे अनेक आभार

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

 
^ वर