गेल्या शतकातील अमेरिकन घरे - ५
मागे एक उत्तर अमेरिकेत आढळणार्या घरांविषयी लेखमाला सुरू केली होती. त्याचे पुढचे भाग मधल्या काही वर्षांत इच्छा असूनही जमले नव्हते. ते या वर्षात पूर्ण करेन असा विचार आहे.
याआधीचे भाग -
http://mr.upakram.org/node/874
http://mr.upakram.org/node/888
http://mr.upakram.org/node/957
http://mr.upakram.org/node/1047
-------------------------------------------------
अमेरिकन घरे - फ्रेंच प्रभाव
फ्रेंच कलोनियल घरे -
जसे भारताला गंगा, यमुनेचे वस्ती, गावे, शहरे निर्माण होण्याच्या महत्त्व तसेच महत्त्व अमेरिकेत मिसिसिपी नदीचे आहे. अमेरिकेत उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत वाहणार्या, आणि अमेरिकेतील दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या मिसिसिपी नदीच्या काठी इसवी सनाच्या सतराव्या शतकापासून फ्रेंच लोकांची वस्ती होत गेली. चौदाव्या लुईच्या नावाने प्रसिद्ध झालेले मिसुरी (मिसुरा) मधील अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात वसलेले सेंट लुई हे शहर या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मिसुरा येथील फ्रेंच संत जेनवीवच्या नावाने प्रसिद्ध झालेले Ste. Genevieve शहर हेही अमेरिकन घरांच्या बांधकामावरील फ्रेंचांच्या प्रभावाचे द्योतक आहे. याचप्रमाणे लुईजियानामध्ये फ्रेंचांची वस्ती (कॉलनी) झाली. म्हणून ही "कलोनियल" (वसाहतकारांची) घरे. पण घरांच्या बांधकामावरील या प्रभावाला केवळ फ्रेंच म्हणणे हे अवघड जाईल.
खुद्द फ्रान्समधील याकाळातली घरे कशी होती हे पाहिल्यास फ्रेंच घरातील मुख्य फ्रेंच प्रभाव काय आहेत ते समजणे सोपे जाईल.
सतराव्या शतकातील फ्रान्समधील ही एक प्रसिद्ध वास्तू :
उतरते छप्पर, मध्यम रूंदी, छताच्या दर्शनी भागात असलेल्या धनुष्याकृती (आयब्रो) "डॉर्मर" खिडक्या, घराच्या दर्शनी भागावर अनेक उभ्या आयताकार सपाट खिडक्या, आणि त्यापेक्षाही बघूनच नजरेत भरणारी, दमदार, आकर्षक रचना हे वर्णन करता येईल. यापैकी डॉर्मर (छपरामधून डोकावणार्या) खिडक्यांचा उपयोग घराच्या माळ्यावजा जागेत (ऍटिक) वापरण्यासाठी लायक जागा तयार करण्यासाठी केला जातो. याबरोबरच घराच्या आजूबाजूला असलेल्या सपाट, बागा, आणि दर्शनी भागातले प्रशस्त घराकडे आणणारे बांधीव रस्ते. पण हे वैभव अमेरिकेतल्या वस्तीकरांकडे असणे शक्य नव्हते. म्हणून अमेरिकेतली फ्रेंच प्रभाव असलेली घरे ही वरील घरापेक्षा आकार आणि रुपाने बरीच वेगळी आहेत, ती तेथील कॅरिबियन आणि स्पॅनिश प्रभावामुळे, तसेच हवामानामुळेही फरक पडलेला दिसतो.
अमेरिकेतील उत्तरेकडील ही चर्चची इमारत फ्रेंच प्रभावाची दिसते. फ्रान्समधील वरील भव्य वाड्याशी साधर्म्य राखणार्या मोठ्या खिडक्या, डॉर्मर आणि प्रवेशाचे मोठे रस्ते ही वैशिष्ट्ये दिसतात.
Old Ursuline Convent, French Quarter, New Orleans, Photo Courtesy: Flickr photographer mbtrama Photo on Wikimedia |
प्रवेशद्वारावरील अर्धगोलाकार पंखाकृती काचेचे गवाक्ष (फॅनलाईट) हा साधारणतः ब्रिटिश प्रभाव असे सांगितले जाते, पण हा फ्रान्समधील वरील इमारतीच्या प्रवेशद्वारालाही आहे.
या पद्धतीचे जुने बांधकाम म्हणजे टिंबरच्या मोठ्या दोन उभ्या खांबांमध्ये मातीत प्राण्यांचे केस किंवा गवत भरून हे सँडविच बाहेरील थर म्हणून 'स्टको' किंवा जुन्या पद्धतीचे प्लास्टर वापरून बंद करून टाकायचे. हे बांधकाम खालील जुन्या घरात दिसते.
The Durand Cabin is an example of poteaux-sur-solle and pierrotage construction. It is located in Ste. Geneviève, Missouri, Date= May 26, 2007, Author= Andrew Balet, Photo on Wikimedia |
अमेरिकेतल्या मिसुरा येथील हे जुने चित्र तत्कालिन गावठाणाची जाणीव करून देते.
en:Ste. Genevieve, Missouri as depicted in a mural in the en:Missouri State Capitol |
सेंट जेनवीव येथील Bolduc_House या घराचा हा फोटो घर आतून कसे दिसत असेल हे दाखवतो.
आणि हा याच घराचा आतील ऍटिकमधील (माळ्याच्या) भागातून काढलेला फोटो छपराच्या ट्रसची अंतर्गत रचना दाखवतो.
लुईजियाना येथील फ्रेंच वस्तीवर तेथील उष्ण दमट हवामानाचा परिणाम झालेला दिसतो. त्यामुळे घरांचा बंदिस्तपणा जाऊन घराच्या छपराला पुढे नेऊन घराभोवती शाकारलेली जागा केलेली दिसते. (मुंबईकरांना अशा प्रकारच्या लोखंड (wrought iron, cast iron) वापरून केलेल्या बाल्कन्या असलेल्या चाळी किंवा जुन्या हॉटेलांच्या इमारती माहिती असतील. ) शिवाय घरे लहान, आणि त्यामुळे प्रवेशद्वारांची भव्यता कमी झालेली दिसते. त्याचप्रमाणे घरांचे जिनेही आतून नसून बाहेरच्या भागामधून आहेत, तसेच घराच्या आतल्या भागांमध्ये मोठाले पॅसेज नसतात, तर खोल्या एकमेकांत उघडतात.
न्यू ऑर्लीन्समधील फ्रेंच क्वार्टरमधील एक दृष्य:
यात फ्रेंच विंडोज (उंच काचेच्या तावदाने असलेले दरवाजे/खिडक्या) दिसतात. लोखंडी, नाजूक कोरीवकाम असलेल्या बाल्कन्या गेल्या एक ते दोन शतकांमधील प्रभाव सांगणार्या आहेत.
-------------
*सगळी चिकटवलेली चित्रे विकीमीडियावरून साभार.
** संदर्भ - A Field Guide to American Houses, by Virginia McAlester, Lee McAlester, Knopf २००६, आणि विकीपीडिया
***पुढील भागात स्पॅनिश कलोनियल घरे.
Comments
धन्यवाद
चांगली लेखमाला सापडली.
छान
उत्तम लेखमाला. माझे अमेरिकन घरांचे अनुभव नंतर टाकतो.
चन्द्रशेखर
हाही भाग उत्तम
फोटोंमुळे हा भागही देखणा झाला आहे.
धन्यवाद
लेख नक्कीच माहितीपूर्ण आहे, धन्यवाद. एवढी विस्तृत आणि तांत्रिक माहिती आपण जमवली आहे म्हणजे हा आपला छंद आहे कि आपल्या अभ्यासाचा(एकाडेमिक) एक भाग आहे?
माझा अनुभव - अमेरिकेमध्ये जागा विपुल प्रमाणात असल्याने घरे मोकळी बांधता येतात असे जाणवते, तसेही त्यांना घर+पुढे मागे बाग+तलाव असा प्रकार खूपच आवडतो. पण युरोपात जागेची कमतरता असल्याकारणाने छोट्या जागेत आकर्षक घरे बांधतात, हि घरे छोटी असूनही अतिशय टुमदार व सुंदर असतात. अमेरिकन घरे थोडी मिनिमिलीस्टिक पद्धतीकडे झुकणारी असतात, पण युरोपात घरात खूपसारे सामान असते, ते सुंदररित्या मांडलेले देखील असते. दोन्हीही अनुभव खूप छान वाटतात.
विनंती - लेख आणि छायाचित्राची रचना जर विकिपीडिया प्रमाणे केली तर लेख अधिक परिणामकारक ठरू शकेल, आत्ता छायाचित्रांचा आकार जरा मोठा वाटत आहे.
उत्तम सचित्र लेखमाला
उत्तम सचित्र लेखमाला. धन्यवाद.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
मस्तच
हा भाग मस्तच. खंड पडलेली लेखमाला सुरु केल्या बद्दल अभिनंदन.
अमेरिकेतली सध्याची घरे कशी असतात? मला वाटते की घराच्या बांधणीवर हवामानाचा एक मोठा परिणाम असतो. जसे कोकणातली घरे :)
पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत.
धन्यवाद
@चंद्रशेखर - >>माझे अमेरिकन घरांचे अनुभव नंतर टाकतो.
नक्कीच टाका.
@चाणक्य >>अमेरिकेतली सध्याची घरे कशी असतात?
ते शेवटच्या भागात लिहीन. अजूनही न बदललेली गोष्ट म्हणजे लाकडाचा (लंबरचा) भरपूर वापर.
@आजूनकोणमी
>> छंद आहे कि आपल्या अभ्यासाचा(एकाडेमिक) एक भाग आहे?
दोन्ही.
>> आत्ता छायाचित्रांचा आकार जरा मोठा वाटत आहे.
सूचनेबद्दल धन्यवाद. पुढच्या वेळी लक्षात ठेवीन.
प्रतिसादांबद्दल सर्वांचे धन्यवाद.
अमेरिकन घरांचे अनुभव
मी प्रथम जेंव्हा अमेरिकेच्या भूमीवर पाऊल टाकले ते व्हर्जिनिया मधे. महिना बहुदा ऑक्टोबर होता. स्वच्छ निळे आकाश, फॉल कलर्सनी झगमगणारी झाडे व त्यातून मधून मधून डोकावणारी चित्रात काढावीत तशी टुमदार घरे. मी या सर्व लॅन्डस्केपच्या अक्षरश: प्रेमातच पडलो होतो. परंतु जसजसे या घरांच्यात राहणे होत गेले तसतसे या घरांच्यातल्या तृटी ध्यानात येऊ लागल्या.
अमेरिकेतल्या बहुसंख्य घरांची रचना अतिशय तकलादू असते. मोठे लाकडी खांब कॉंक़्रीटमधे पुरून त्याला आडवे वासे खिळ्यांनी ठोकून घरांचे स्ट्रक्चर बनवले जाते. यानंतर बाहेरच्या बाजूने हार्ड बोर्ड ( लाकडाचा भुस्सा, चिप्स व कचरा हा रेझिन च्या सहाय्याने दाबून फळ्यांसारखा बनवला जातो.) या स्ट्रक्चरवर ठोकला जातो. आतल्या बाजूने असाच पातळ हार्ड बोर्ड व त्यावर जिप्सम बोर्ड चिकटवले जातात. यावर रंग किंवा कागद चिकटवला की झाल्या भिंती तयार. घराचा तळ करण्यासाठी जमिनीपासून 2 ते अडीच फुटावर अशाच प्रकारे फळ्या मारून तळ तयार केला जातो. छपरासाठी बहुदा लाकडी कौले बसवली जातात. माझा एक मित्र जरा संतापी होता. त्याने एकदा भिंतीवर जोराने बुटाची लाथ मारल्यावर भिंत फुटली होती. अशा तकलादू बांधणीच्या घराला (कॅलिफोर्निया मधे) 5 ते 6 लाख डॉलर्स द्यायचे म्हणजे जिवावर येते.
घराची ही रचना थंड हवामान असलेल्या गावांच्यातील हिवाळ्यात अतिशय आरामदायी ठरते. परंतु उन्हाळ्यात भिंतींच्यामधे घातलेल्या उष्णतावाहक विरोधी पॅनेल्समुळे ही घरे अतिशय त्रासदायक वाटतात असा माझा अनुभव आहे. मग एसी लावणे आवश्यकच बनते. गंमतीची गोष्ट म्हणजे फिनिक्स सारख्या कायम गरम असलेल्या भागात सुद्धा अशीच घरे बांधली जातात.
जुने कॉ न्डोज याच बांधणीचे असतात. आता काही नवीन कॉ न्डोज मधे लोखंडी स्ट्रक्चर व प्री स्ट्रेस्ड कॉ न्क्रीट स्लॅब्स वापरतात. परंतु भिंती मात्र लाकडीच म्हणजे हार्डबोर्डच्या असतात.
सार्या जगभर घर बांधणीत लाकडाचा उपयोग कसा कमीत कमी करता ये ईल हे बघितले जाते. अमेरिकेत घर बांधणीसाठी लाकूड एवढ्या मोठ्या प्रमाणात वापरले जाते की अमेरिकेतील जंगले बहुदा कधीही न संपणारी असावीत असे वाटू लागते.
आता घरातील फिटींग्ज बद्दल. बाकी जगात बाथरूम किंवा किचनमधे अतिशय आधुनिक फिटिंग्ज वापरली जातात. अमेरिकेतील बहुतेक घरात अतिशय जुनाट डिझाईनची फिटिंग्ज मी बघितली आहेत. बहुदा अमेरिकन लोकांना जुन्या फिटिंग्जचे प्रेम असावे.
हिवाळ्यात हीटर्सची गरज असते. जुने वाफेवर चालणारे हीटर्स (याला फिन्स असतात.)आता अगदी थोड्या ठिकाणी दिसतात. हे हीटर्स माझ्या अनुभवाप्रमाणे सर्वात उत्तम वाटले. आता इलेक्ट्रिक हीटर्स वापरतात. यामुळे हवा अतिशय कोरडी बनते व काही वेळानंतर त्यांचा अतिशय त्रास हो ऊ लागतो.
अर्थात हे माझे अनुभव आहेत. कदाचित या गोष्टींच्या चांगल्या बाजूही असतील. वैयक्तिक रित्या विटांनी बांधलेली व आत इन्शुलेटिंग पॅनेल्स असलेली घरे मला सर्वात चांगली वाटली परंतु अशी घरे अमेरिकेत फार थोड्या प्रमाणातच दिसतात.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
बाकी जगातली फिटींग्ज
यात तथ्य वाटत नाही. :-) माझा नवरा इंग्लंडबद्दल असेच म्हणतो. तिथे म्हणे 'सिंकवर/ बाथरुमात गरम पाण्याचा एक नळ आणि थंड पाण्याचा एक नळ असे दोन वेगळे स्वतंत्र नळ असतात. इंग्लिश लोकांना या जुन्या फिटिंग्जचे प्रेम असावे.'
कोहलर हा अमेरिकेतला बाथ फिक्श्चर्सचा प्रसिद्ध ब्रँड आहे. त्यांच्या स्थळावर फिक्श्चर्स दिसतील.
जुनाट डिझाईन
मी जुनाट डिझाईन असे शब्द वापरले आहेत. जगात सगळीकडे सिरॅमिक बॉल तंत्र वापरून सिंगल लीव्हर फॉसेट्स व मिक्सर वापरले जातात. अमेरिकेत अजूनही बहुतेक ठिकाणी गरम व थंड पाण्याचे निरनिराळे नळ व त्याला चार बाहू असलेले नॉब हे बघायला मिळतात. अमेरिकेत ते आवडते म्हणून कोहलर सह सर्व उत्पादक त्या डिझाईनची फॉसेट्स बनवतात.अर्थात हे माझे निरिक्षण आहे. कदाचित ते जनरलाइझ्ड नसेलही.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
छान
लेखमाला पुन्हा सुरू केल्याबद्दल धन्यवाद.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
पुनरागमन
या लेखाच्या निमित्ताने चित्राने केलेले पुनरागमन दिलासादायक होते. तिच्याकडून अधिक लेखनाची अपेक्षा आहे.
हा भाग आवडला. इमारतींवरील घुमट हे मला पूर्व युरोप आणि पुढे यांची बांधणी वाटत असे.
उत्तम
या लेखमालेला पुन्हा सुरुवात झाली हे उत्तम. हा भागही आवडला.
(मोन्टाना राज्याची राजधानी असलेल्या हेलेना शहराची गायडेड टूर घेण्याचा योग अलीकडेच आला होता. खाणव्यवसाय आणि ट्रान्स-पॅसिफिक रेल्वे लाईनच्या बांधकामामुळे गेल्या शतकात तिथे जी अचानक समृद्धी अवतरली, तिचं प्रतिबिंब शहराच्या एका संपूर्ण विभागातल्या घरांवर (क्वार्टर) पडल्याचं दिसून येतं. त्या टूरच्या वेळी घेतलेले काही फोटो मिळाल्यास येथे चिकटवेनच. कदाचित न्यू ऑर्लिन्सचे आणि त्या परिसरातल्या प्लँटेशनचेही मिळावेत. मिसिसीपीच्या मुखाजवळ असल्यामुळे वारंवार येणार्या पुरामुळे होणारं नुकसान टाळण्याकरता जमिनीपासून उंचावर झालेलं बांधकाम आणि लेखात म्हटल्याप्रमाणे फ्रेंच पद्धतीचा प्रभाव ह्यामुळे तीही वैशिष्ट्यपूर्ण आहेत.)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
लेखमालेच्या पुनरागमनाबाबत आनंदी
लेखमालेच्या पुनरागमनाबाबत आनंद झालेला आहे.
आता बघण्याची दृष्टी आली, तर असे काही बारकावे लक्षात येत जातील.
लुइझियानामधील जुन्या घरांच्या छपरांचे कोन त्या मानाने उथळ असतात. हा हवामानाचा परिणाम असावा. उथळ उतरती झपरे पावसाळी हवामानासाठी, तर जवळ-जवळ उभ्या कोनात उतरणारी छपरे हिमवर्षावाच्या हवामानासाठी बरी.
न्यू ऑर्लीन्स येथील गार्डन डिस्ट्रिक्ट मधील एक घर :
बॉल्टिमोर येथील "बेल्व्हेडियर" बिल्डिंग : उभट कोनात उतरते छप्पर, मध्यम रूंदी, छताच्या दर्शनी भागात "डॉर्मर" खिडक्या, घराच्या दर्शनी भागावर अनेक उभ्या आयताकार सपाट खिडक्या...
धन्यवाद
सर्वांचे प्रोत्साहनासाठी धन्यवाद.
@ चंद्रशेखर - तुम्ही लिहीलेल्या अनुभवांमुळे चर्चा अधिक होऊ शकते. जुनी फिटिंग्ज आता निदान आमच्याइथे फार दिसत नाहीत.. रिप्लेसमेंटच्या वेळी नवीन वापरली जातात. अगदी बेसिक फॉसेटची किंमत १०० डॉ. पर्यंत असते.
"अमेरिकेतल्या बहुसंख्य घरांची रचना अतिशय तकलादू असते. मोठे लाकडी खांब कॉंक़्रीटमधे पुरून .. अशा तकलादू बांधणीच्या घराला (कॅलिफोर्निया मधे) 5 ते 6 लाख डॉलर्स द्यायचे म्हणजे जिवावर येते.
लाकडी रचना काँक्रीट किंवा विटांच्या तुलनेने तकलादू आहे हे खरे आहे. पण जेव्हा अमेरिकेत भूकंप झाले आहेत तेव्हा या लाकडी घरांमुळे वजन कमी असल्याने त्यामुळे प्राणहानी कमी झाली आहे. वित्तहानी अर्थातच अपरंपार. पण जर बांधकाम सदोष असले (मुख्यत्वे जेथे जॉइंटस/सांधे आहेत तेथे) तर कुठचेही बांधकाम तग धरेल असे नाही. विटा/काँक्रीट वापरलेली घरे दुरुस्त करण्याचा (कधी भिंतींना भेगा पडतात, कधी खर्चही बराच असतो. शिवाय विटांचे इन-फिल असले तर ते अधिक धोक्याचे ठरते.
तसेच कॅटरिनासारखी जेथे वादळे येतात, तेथे वित्तहानी प्रचंड होते, ती मुख्यत्वे जेथे जोड/सांधे आहेत तेथील रचनेत दोष असल्याने (उदा. अँकर नीट केलेले नसणे). म्हणून अशा ठिकाणीही अमेरिकन लोक लाकडाचा वापर करतात हे मलाही पूर्वी आश्चर्यकारक वाटत असे. तसेच मला असे वाटते की येथील या प्रकारच्या बिल्डरांची फळी मजबूत आहे. पण हेही लक्षात ठेवले पाहिजे की लाकूड वापरण्याचे फायदे असे आहेत की घरे चटकन दुरुस्त करता येतात. उदा. खिडक्या जुन्या झाल्या, रिप्लेसमेंट विंडो आणून त्या बदलणे सोपे असते. कुशल घरमालक स्वतःही घरातले लहानसहान रीमॉडिलेंगचे प्रॉजे़क्ट करू शकतो.
दुसरे असे की आपल्याकडच्या घरांमध्ये भिंतींच्या पृष्ठभागाचे क्षेत्र हे केवळ कुठच्यातरी वॉटरप्रूफ रंगाने रंगवणे हा आपल्याकडचा पाणी रोखण्याचा मार्ग होऊन बसला आहे. अमेरिकेतील भिंतींमध्ये जे स्टड (लहान मापाचे खांब) भिंतींच्या आत वापरले जातात त्यामधील जागेमध्ये जसे इन्सुलेशन भरतात तसेच मॉईस्चर बॅरिअर असते, वेपर डीफ्युजर असते, आणि बाहेरच्या बाजूला तुम्ही म्हटले आहे तसा वॉलबोर्ड लावून मग त्यावर सायडिंग असते. अर्थात नेहमीच्या वापरासाठी ही रचना अधिक सुखद, आरामदायक आहे. अमेरिकन घरांमध्ये (अगदी जुन्याही) पाणी गळण्याचे, भिंती, तसेच सीलिंग्ज खराब होण्याचे प्रमाण कमी असते. विटांच्या भिंतींची एक फळी जरी आपण लावली तरी बिल्डिंगला आपण पुरेसे प्रोटेक्ट करत नाही असे मला वाटते. आपल्याकडे पूर्वी म्हणून छज्जे मोठे असत, आता तेही नसतात. यामुळे बांधल्यानंतर दोनचार पावसाळ्यांमध्येच भिंतींना ओल येते, गळायला लागतात.
घराची ही रचना थंड हवामान असलेल्या गावांच्यातील हिवाळ्यात अतिशय आरामदायी ठरते. परंतु उन्हाळ्यात भिंतींच्यामधे घातलेल्या उष्णतावाहक विरोधी पॅनेल्समुळे ही घरे अतिशय त्रासदायक वाटतात असा माझा अनुभव आहे. मग एसी लावणे आवश्यकच बनते. गंमतीची गोष्ट म्हणजे फिनिक्स सारख्या कायम गरम असलेल्या भागात सुद्धा अशीच घरे बांधली जातात.
आहे, परंतु ते वायुवीजनाने (व्हेंटिलेशनने) थोडे सुखकर करता येते असे वाटते.
वेळेअभावी प्रतिसादाची जागा राखून ठेवते.
@ धनंजय - हवामानाचा छपराच्या रचनेवरील परिणाम योग्य तर्हेने दाखवला आहे. धन्यवाद. चाणक्य यांच्या प्रश्नाचे थोडेसे उत्तर यात मिळावे. यावरून नंतर कधीतरी एक वेगळा लेख लिहीन. फ्रेंच प्रभाव वेगवेगळ्या काळात जरी राहिला तरी त्यात इतर डीटेल्सची भर पडलेली दिसते. उदा. एलिप्टिकल फॅनलाईट आणि बाजूची काचेची उभी तावदाने हा वेगळा प्रभाव असावा. तसेच खिडक्यांची शटर्सही. वरील बेल्व्हेडियर बिल्डिंगवर कोपर्याला असलेल्या quoins या नंतरच्या शतकातील Beaux-Arts प्रभाव दाखवतात.
लाकडी घरे
माझ्या वरील प्रतिसादामधल्या या वाक्याबद्दल
सार्या जगभर घर बांधणीत लाकडाचा उपयोग कसा कमीत कमी करता ये ईल हे बघितले जाते. अमेरिकेत घर बांधणीसाठी लाकूड एवढ्या मोठ्या प्रमाणात वापरले जाते की अमेरिकेतील जंगले बहुदा कधीही न संपणारी असावीत असे वाटू लागते.
चित्राताईंचे काय मत आहे हे जाणून घेण्यास आवडेल.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
सुरुवात करण्यासाठी दुवा
मागच्या शतकात उत्तर अमेरिकेतली कित्येक जंगले पूर्ण संपली होती. आज उत्तर अमेरिका खंडाच्या पूर्व किनार्याकडच्या भागात जी विस्तीर्ण जंगले दिसतात, त्यातील वृक्ष हे सगळे जवळजवळ मागच्या (विसाव्या) शतकात उगवलेले आहेत.
युनायटेड स्टेट्स देशात अंतर्गत जंगले तितकीशी कमी होत नाही आहेत. (याचा असा अर्थ नव्हे की पर्यावरणाचे आणि जैव-इतिहासाचे वैशिष्ट्य असलेली काही खास जंगले धोक्यात नाहीत - उदाहरणार्थ पश्चिमेकडील रेडवुड जंगले. परंतु तुमचा प्रश्न बहुधा "सरासरी सर्व जंगले" बाबतीत आहे.) युनायटेड स्टेट्स मधील लाकडाच्या उत्पादनाचे आत्त येथे सापडेल (सेन्सस ब्यूरोचा दुवा - होय हे सेन्सस ब्यूरोचे काम आहे!) जंगल खात्याच्या जंगल-व्यवस्थापनाबद्दल अहवालाचा दुवा येथे सापडेल.
उत्तर अमेरिकेत वापरले जाणारे लाकूड काही (किंवा मोठ्या) प्रमाणात अन्य खंडांमधून येते, यासाठी बघायचा एक दृष्टिकोन जागतिक लाकूड-व्यापाराच्या अंगाने केला जाऊ शकतो. त्यासाठी एक सुरुवातीचा दुवा यूनियन ऑफ कन्सर्न्ड सायंटिस्ट्स यांच्या संकेतस्थळावरचा आहे. त्याबद्दल काही कल्पना मिळू शकेल.
लाकडाचा व्यापार
या लेखमालेतील आधीचा दुवा पाहिला तर दिसेल की धनंजय यांनी सध्याची आकडेवारी दिली आहे तसा लाकडाचा व्यापार हा गेली तीनएक शतके चालू आहे. अमेरिकेतील पहिल्या वसाहतींना ही जंगले लाकडाच्या वखारी आणि त्यावर आधारित व्यवसायांच्या दृष्टीने महत्त्वाची होती. इंग्राजांनी सुरूवातीला भारतात लाकडाच्याच वखारी घातल्या होत्या असे आठवत असेल. तेव्हा लाकूड हे ज्या देशातले त्या देशात सगळे वापरले जाते असे क्वचितच होते असे दिसते. अर्थात नुसतीच अमेरिकेतील जंगले कमी होतात असे नाही (तीही होतात - जेव्हा नवीन सबडिव्हिजन केल्या जातात तेव्हा झाडे तोडणे मुबलक प्रमाणावर होते). याला काही पर्याय नक्कीच आहेत. माझ्या ओळखीच्या एका सिव्हिल इंजिनीअरांनी वॉशिंग्टन डीसी/ मेरीलँड येथे आपले घर काँक्रीट-आणि लाकडाचे असे बांधले होते व त्याची एनर्जी -एफिशिअन्सी तपासली होती, ती लाकडाच्या घराहून चांगली होती, पण त्यांना सुरुवातीचा बांधकामाचा खर्च अधिक आला असे त्यांनी सांगितल्याचे आठवते. त्यावरून त्यांनी अनेकांना बोलावून प्रात्यक्षिकही दाखवले, परंतु ती कल्पना उचलली गेली नाही.
जेथे मिडराईज अपार्टमेंट असतात तेथे स्टील आणि काँक्रीट, तसेच लाकूड यांचा वापर होतो. पण बरेच, मुख्यत्वे भिंतीचे क्षेत्रफळ हे लाकडाचे किंवा लाकडापासून बनवलेल्या पदार्थांपासून बनलेले असते हेही खरे आहे. याचे कारण इन्सुलेशनचा वापर अजूनही अधिकांशी लाकडाशीच संलग्न आहे. आता ग्रीन बिल्डिंगांमध्ये रीसायकल्ड वूड वापरण्यास प्रोत्साहन दिले आहे, तसेच नवीन बांधकामात लाकडाचा वापर कमी करण्यास अधिक इन्सेंटिव्ह आहेत. त्यावरून झालेली कुरकूर इथे दिसेल.
९०च्या दशकात भारतातील नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये लाकडाचा वापर कमी करण्यावरून पॉलिसी केली होती असे आठवते आहे. तरीही अमेरिकेसारख्या देशांमध्ये लाकडाचा भरपूर वापर दिसतो याचे कारण आर्थिक आहे, लॉबी आहेत, आणि सहसा पॉलिसीमध्ये एकदम मोठे बदल केले जात नाहीत असेही माझे ऑब्जर्वेशन आहे. तरी ग्रीन बिल्डिंगामध्ये लाईफ सायकल डिझाईनला थोडा वाव मिळाला आहे.
अजूनही उत्तर पूर्ण झालेले नाही, पण सध्या वेळ कमी आहे. उद्या अधिक स्पष्ट करीन.
बदलाला तयार नसणे
अमेरिकन लोक विशेषत: याप्रकारच्या नवीन टेक्नॉलॉजीला चटकन तयार नसतात. शिवाय यावर अनेक बिझनेस अवलंबून आहेत. उद्या अचानक घरे स्टील फ्रेमची किंवा काँक्रीट फ्रेमची व्हायला लागली तर सध्याचे एवढे लाकडाचे काम करणारे कुशल टेक्निशियन/कामगार अचानक कुठे जातील? तेव्हा असे बदल अमेरिकेत शक्यतो चटकन होत नाहीत. म्हणून लॉबी आहे असे म्हटले. लाकडाची अगदीच वानवा झाली तर मग हे बंद होऊन इतर मटेरियल शोधले जाईल.
लेखमालिका आवडली
चित्राताई, लेखमालिका थोडी उशिरानेच पाहिली आणि आवडलीही.
अनेकांना हा प्रश्न विचारून झाला आहे, तरीही पुन्हा विचारावासा वाटतो. अमेरिकेत, निदान मोठ्या घरां*मधेतरी प्रत्येक खोलीत एयर कंडीशनरचे कंट्रोल्स असतात का? साधारणपणे दिवसभर बेडरूम्स आणि रात्री स्वयंपाकघर आणि दिवाणखाना या खोल्या रिकाम्या असतानाही तिथलं तापमानसुद्धा नियंत्रित करावं लागतं. इंग्लंडमधली काही घरं पाहिली तिथे प्रत्येक खोलीत हीटींग सुरू-बंद करण्याची सोय होती असं आढळलं.
*२ किंवा जास्त बेडरूम्स असणारी घरं, अपार्टमेंट्स, इ.
कित्येक घरांत वेगळे नियंत्रण असते
This comment has been moved here.