गेल्या शतकांतील अमेरिकन घरे - ४ -

इ. स. १६२०-१६७५ अमेरिकेतील सामाजिक परिस्थिती:

सोळाव्या शतकात आलेल्या इंग्लंड, फ्रान्स आणि स्पेनमधील लोकांविषयी मागच्या भागात वाचले. यापैकी पिलग्रिमांना अमेरिकेच्या उत्तरपूर्वेकडच्या मॅसॅचुसेटस मधे आल्यानंतर कडक हिवाळ्यामुळे काय त्रास सहन करावे लागले त्याचे वर्णन करता येणार नाही. एकीकडे साम्राज्याची आकांक्षा, परत जायचे नाही असे ठरवूनच आलेल्या ह्या लोकांनी हळूहळू आपले बस्तान अमेरिकेत बसवायला सुरूवात केली. सुरूवातीला त्यांनी इथल्या स्थानिक लोकांशी काहीशा नाराजीने का होईना जुळवून घेतले. स्थानिक लोकांकडच्या धान्याची त्यांना गरज होतीच. स्क्वांटा आणि मसॉएट, या नावाच्या दोन स्थानिक वांपानोग जमातीच्या व्यक्तींनी त्यांना या कठीण काळात मदत केली असे म्हणतात. स्थानिक लोकांनी व्हर्जिनियातील वसाहत जेम्सटाउन वर केले तसे हल्ले मॅसॅचुसेटसमध्ये आलेल्या पिलग्रिम लोकांवर कधीच झाले नाहीत. यापैकी स्क्वांटा हा स्थानिक माणूस इंग्लिशही बोलू शके असे म्हटले जाते. परंतु येऊन काही वर्षे झाल्यानंतर पिलग्रिमांचा नेता कॅप्टन माईल्स स्टँडिश याने त्यांच्या वसाहतीवर नेटिवांचा हल्ला होणार आहे असे समजून स्वतःच हल्ला चढवला आणि त्यात काही स्थानिक लोकांना ठार मारले. परंतु नंतर मात्र या हल्ल्याचा परिणाम म्हणून स्थानिक लोक चिडले. तरी जवळजवळ १६६२-६३ सालापर्यंत ह्या दोन्ही जमाती थोड्याफार तणावाखाली पण सामोपचाराने राहत होत्या. यातही पिलग्रिमांचे स्थानिक लोकांना ख्रिश्चन करून घेण्याचे प्रयत्न चालूच होते. सुरूवातीला धान्यवस्तूंसाठी पिलग्रिमांनी स्थानिक लोकांबरोबर व्यापार केला. त्यानंतर मात्र हळूहळू त्यांची ती गरज संपत आली. आता व्यापार अधिकांशी जमिनीचा सुरू झाला. त्यातच धर्मांतर केलेले स्थानिक युवक स्थानिकांपैकी इतरांचे धर्मांतर करू लागले. (उदा. जॉन सॅसमन हा स्थानिक युवक एका पिलग्रिम कुटुंबाने दत्तक घेऊन वाढवला होता. नंतर हार्वर्डमध्ये शिकलेल्या या तरूणाने पिलग्रिमांना या उठावाची माहिती दिली असे सांगितले जाते यामुळे संशय बळावलेल्या स्थानिकांनी त्याला मारून टाकले) त्यामुळे तणाव अर्थातच वाढू लागले. या तणावांमुळे अस्वस्थ असलेल्या (जुन्या राजांच्या मृत्युनंतर नेतृत्त्व मिळालेल्या) किंग फिलिप या नावाने ओळखल्या जाणार्‍या वांपानोग जमातीच्या नेत्याने लढा दिला. परंतु यात स्थानिक वांपानोग जमातीचाच विनाश मनुष्यहानीच्या स्वरूपात अधिक झाला. ६०० पिलग्रिम तर ३००० वांपानोग लोक यात मारले गेले आणि पिलग्रिम वस्तीला बळकटी आली. अनेक स्थानिक लोकांना पकडून गुलाम म्हणून बाहेरदेशी विकण्यात आले. १६७७ पर्यंत वसाहतकारांनी आपल्या वसाहतींना चांगलीच बळकटी आणली. त्यानंतर परत आपापली गावे वसवली.

वसाहतकालीन (कलोनियल) घरे - इंग्लिश परंपरा इ.स. १६२०-१७०० :
कुठच्याही घरासाठी बांधकाम साहित्य लागते. जितका समाज अतिप्रगत तितके बांधकाम साहित्याचे विविध प्रकार बघायला मिळतात. अमेरिकेचे वैशिष्ट्य मला जाणवले ते असे की सध्याची अमेरिकन घरे आणि पूर्वीची अमेरिकन घरे यात काळाप्रमाणे नक्कीच फरक होत गेला आहे - पण तो विशेषतः घरांच्या आकारात, त्यात असलेल्या खोल्यांच्या प्रमाणात आणि घर गरम किंवा थंड ठेवण्याच्या प्रकारांमध्ये. पण एक गोष्ट अजूनही तशीच आहे आणि ती म्हणजे बांधकामात लाकडाचा असलेला प्रचंड वापर. लाकूड तयार करण्याच्या आणि जोडण्याच्या कला जशा विकसित होत गेल्या तसतशी बांधकामात सफाई दिसू लागली. पण आतली संरचना तत्त्वतः तशीच असते. लाकडाची आडवी आणि उभी जोडून संरचना (फ्रेम) आणि त्यावर उतरते छप्पर करण्यासाठी लाकडी त्रिकोणी संरचना (ट्रस). उन्हा-पावसापासून संरक्षण करण्यासाठी घराला मग पांघरूण घालायचे - भिंती आणि छप्पराचे.

या घरासाठी वापरण्याचे लाकूड सुरूवातीला वसाहतकार स्वतःच कापत. इंग्लंडमध्ये ब्रिटिशांनी जंगलांची दोन प्रकारात विभागणी केली होती - एक म्हणजे "वूडस" आणि दुसरे म्हणजे "फॉरेस्ट".

Oak Woods - Tx.us

वूडस म्हणजे जेथे लाकूड मुबलक प्रमाणात मिळत असे. फॉरेस्टस ह्या अधिकांशी राखीव जागा असत जेथे वेडीवाकडी लाकूडतोड किंवा प्राण्यांची शिकार चालत नसे. साधारणपणे हीच पद्धत वसाहतकारांनी उचलली. सुरूवातीला मासेमारी करण्याच्या विचाराने आलेल्या लोकांना प्रचंड जंगले पाहून उद्योगाचे हे नवीन साधन मिळाले असावे. घरबांधणी आणि व्यापार जसा वाढू लागला तशी लाकूडकामाची पद्धत सुधारली. लाकडांची त्यांच्या प्रतीप्रमाणे वर्गवारी केली जाई. यात ओक आणि पाईन हे घरांच्या बांधणीसाठी वापरले जाई. पणा इतरही अनेक प्रकारचे वृक्ष त्यांना नवीन जगातील जंगलांमध्ये दिसले. त्यामुळे वेगवेगळ्या जातींच्या उपयोगितेप्रमाणे लाकडे वेगवेगळ्या आकाराची कापली जात. जड इमारती लाकडाला "टिंबर" आणि बाकीच्या सर्व लाकडाच्या प्रतीला "लंबर" असे नाव होते. टिंबर म्हणजे आठ इंचांहून मोठे कापलेले लाकूड. त्याखालचे लाकूड वेगवेगळ्या नावांनी प्रचलित होते - जसे प्लांक, बोर्ड, डील इत्यादी. ते घराच्या वेगवेगळ्या भागांसाठी वापरले जाई. लाकूड सामान्यतः ओक किंवा पाईन या झाडांचे असे. हळूहळू लाकूडतोडीचा व्यवसाय वाढत गेला. यातील बरेचसे लाकूड इंग्लंड, वेस्ट इंडिज येथे निर्यात केले जात असे. १९ व्या शतकाच्या सुरूवातीस घरकामाला लागणार्‍या लाकडाची किंमत होती फुटाला ५ सेंट! आणि जहाजबांधणीसाठी लागणारे चेस्टनट लाकूड ४ डॉलर प्रति टन! सुरूवातीला लाकूडतोडीवर प्रतिबंध नव्हता, पण जंगले जशी कापली जाऊ लागली तशी हळूहळू ही बंधने आणली गेली. जर बंधने पाळली नाहीत तर पाडलेल्या वृक्षामागे काही एक दंडही असे. नंतरच्या काळात वसाहतकारांनी स्थानिक लोकांकडून लाकडे विकत घेण्यावरही बंधने आणली गेली.

नव्या वसाहतीत प्रत्येक कुटुंबाला बेतशीर जागा दिली गेली. आणि त्यात सर्वांनी मिळून घरे बांधली. असे लाकूडकाम प्रत्येकाला शक्य नसे. लाकूड कापायला नदीच्या पाण्याच्या उर्जेने चालणार्‍या यंत्रांचा वापर सुरू होण्याआधी लाकूडकाम म्हणजे एक कसरतच असे. लाकूड कापण्यासाठी प्रथम एक मोठा खड्डा (चर) खणायचा. एकाने त्याच्या वरील बाजूला जमिनीवर उभे रहायचे. दुसर्‍याने त्यात आतल्या बाजूला. मग एक उभी पातळ पात्याची करवत असे, ती वरच्याने लाकडातून घालायची, आणि खालच्या माणसाने करवत योग्य दिशेने जाते आहे ना ते पहायचे आणि कापायला मदत करायची. अशा प्रकारे लाकडे वापरण्यासाठी तयार होण्यासाठी खूपच वेळ लागत असे. पण आलेल्या वसाहतकारांनी अशा पद्धतीने आपली घरे बांधली. त्याकाळात चिमणी सुद्धा मुख्यत्वे लाकडांपासून बांधली जाई आणि त्यावर मग मातीचे आवरण. परंतु अशा प्रकारे बांधलेली चिमणी गवती छपराला आग लावायला कारणीभूत होते असे समजल्यापासून त्यांनी लाकडी पट्ट्यांपासून बनलेली ज्वलनापासून अधिक सुरक्षित अशी छते बनवायला सुरूवात केली. सुरूवातीला आल्यानंतर पाण्यात पडल्यावर पोहता येते अशा प्रकारे वसाहतकार नवीन गोष्टी करायला शिकत गेले.

नवीन जगात आल्यानंतर सुरूवातीला त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने विगवॉमही बांधले. पण वर्ष - दोन वर्षांत त्यांच्या मूळ घरांसारख्या रचना बांधायला सुरूवात केली. म्हणजे हॉल आणि पार्लर अशा पद्धतीच्या. सुरूवातीला आलेले लोक मधोमध शेगडी, चिमणी, जिने असलेली रचना करीत. जिने अगदी अरूंद, म्हणजे एका वेळी एकच माणूस जाईल असे असत. आपल्याकडच्या जुन्या वाड्यांतील दगडी जिन्यांसारखे. या जिन्याखालीच जागा करून त्यात वस्तू/कपडे ठेवण्यासाठी कपाट (क्लोजेट) असे. वर गेल्यावर बरोबर वरच्या बाजूला दोन झोपायच्या खोल्या. अर्थात त्यावेळी खोल्यांचा वापर सर्व कामांसाठी होत असे, प्रत्येक कामासाठी वेगळी खोली अशी चैन करण्याची सोय नव्हती. मध्ये बॉस्टनमध्ये अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यातील पॉल रीवीअरच्या घराचीही रचना बघण्याची संधी मिळाली. रचना अशीच, म्हणजे हॉल आणि पार्लर अशी, फक्त जिना हॉलच्या एका बाजूला. वर दाखवलेल्या चित्राप्रमाणे मधोमध नाही. तत्कालिन श्रीमंताचे समजले जाणारे हे घर सध्याच्या अमेरिकन घरांच्या तुलनेत फारच लहान आहे. पण ते एकेकाळी तीन मजले उंच होते.

Paul Revere House - Boston MA - view from backyard

घर बांधताना आधी चर खणून त्यात कडेने लाकडाची चौकट बसवली जाई (सिल बीम). यावर टोकांना लाकडी खांब (पोस्ट) उभे केले जात. घराची उंची कमी असे, म्हणजे साधारणपणे ६ -६ १/४ फूट एवढीच. जर घर दुमजली असले तर खांब हव्या त्या उंचीचे कापले जात. हे खांब सर्वाधिक बळकट असावे लागत. त्यावर मजबूत लाकडी तुळया ( गर्ट) असत. या पद्धतीच्या लाकूडकामाला "पोस्ट अँड गर्ट" बांधणी म्हटले जाते. लहान आकाराच्या घरांसाठी याचा उपयोग असे. यात टोकाच्या खांबांखेरीज फक्त जेथे दरवाजे किंवा खिडक्या असतील तेथे त्या तेवढ्या मोकळ्या भागाला आधार देण्यासाठी खांब घातले जात. नंतर घरांचे आकार वाढल्यानंतर खांब टोकांशिवाय घराच्या परिमितीवर काही काही अंतराने घातले जाऊ लागले. खांब घालून झाले की मग त्यावर मजले उभे करायचे. खोल्यांच्या मध्यभागी असलेल्या ज्या तुळईवर इतर तुळया आधार घेत त्याला समर गर्ट म्हटले जाई. ही तुळई एका कबुतराच्या पंखासारख्या खाचेत (शोल्डर्ड दव्हटेल जॉइंट) बसवली जाई जेणेकरून ती हलणार नाही.

timberlast.com

वरच्या बाजूला त्या तुळईला खाचा करून त्यात छोटे दुसर्‍या दिशेने जाणार्‍या छोट्या तुळया ( फ्लोअर जॉइस्ट) बसवले जाई. या प्रकारे वरील भाग एकाच सपाट उंचीला असेल याची तरतूद केली जाई. घरातील प्रत्येक मुख्य तुळईला नावे असत ( एंड गर्ट, फ्रंट गर्ट, चिमनी गर्ट इत्यादी). असा सांगाडा तयार झाल्यानंतर वरच्या बाजूला परत टोपी घातल्याप्रमाणे तुळया रचत (कॅप बीम/संधीकाष्ठ). यावर छपराची सांधणी (ट्रस) उभारली जाई. ही सांधणी म्हणजे अनेक वेगवेगळ्या लांबीच्या काळजीपूर्वक कापलेल्या आणि जोडलेल्या चपट्या लाकडी तुकड्यांची रचना. घरांच्या छताचा उतार तेव्हा प्रचलित असलेल्या गवती छपरांवरून बर्फ किंवा पाणी घसरून जावे यासाठी अधिक (जवळजवळ ४५ अंशाच्या कोनात) असे. परंतु जसे छपर लाकडी पट्ट्या, किंवा कौलांपासून बनायला लागले तशी एवढ्या उताराची घरे बांधण्याची गरज नाही हे त्यांना कळले. लाकडी त्रिकोणी संरचनेचे छत हे या रचनेचा सर्वात मुख्य भाग. दोन त्रिकोण खोलीच्या टोकांच्या कॅप बीमच्या (संधीकाष्ठ) आधाराने उभे करायचे.

King Post Truss - Grandoakstimberframing.com

या त्रिकोणांच्या उतरत्या बाजूंना प्रिन्सिपल राफ्टर म्हणत. या दोन टोकांना असलेल्या त्रिकोणांचे शिखराचे कोन हे एका लांब लाकडी खाचा असलेल्या फळीने जोडायचे. (या फळीला रिज बोर्ड किंवा शिखर फळी म्हणत). त्यानंतर मधली जागा अनेक उतरत्या कॉमन राफ्टर (किंवा सामान्य राफ्टर) ने जोडायची. राफ्टरला आधार म्हणून पर्लिन नावाची एक आधारफळी मधोमध दोन त्रिकोणांच्या मध्ये बसवायची. वार्‍याच्या जोराने छप्पर उडून जाऊ नये आणि या सांधणीला मजबुती यावी म्हणून म्हणून कॉमन राफ्टरना वरच्या अंगाला काही अंतराने आडव्या फळ्या (टाय बीम) बसवायच्या. मुख्य रचना ही अशीच. त्यानंतर जास्त मजबूत अशा अनेक पद्धतीच्या रचना थोड्या फार फरकाने (त्रिकोणाला जास्तीचे उभे किंवा तिरके खांब बसवून तयार झाल्या. या सर्व रचनांमागे थोडीशी आंतरप्रेरणाही होती, थोडेफार अनुभवाने आलेले शहाणपण होते आणि नंतर यांत्रिक युगात लाकडाची प्रत ठरवण्यासाठी प्रमाणपरिक्षा ठरवण्यात आल्या. या पद्धतीने तयार झालेल्या छपराला गेबल पद्धतीचे छप्पर म्हणतात. (घराच्या अरूंद बाजूने घराकडे पाहिले असता छ्पराचा सपाट त्रिकोण दिसणे). यात सपाट त्रिकोणाऐवजी पंचकोनी रचना टोकाला असली की झाले गँम्ब्रेल छप्पर. सपाट त्रिकोणाऐवजी एका (अरूंद बाजूने) तिरका त्रिकोण दिसला, दुसर्‍या बाजूने (लांब बाजूने) तिरका चौकोन (ट्रॅपेझॉइड) दिसला तर झाले हिप्प्ड पद्धतीचे छप्पर. तिरक्या त्रिकोणावर लावण्याच्या राफ्टरना जॅक राफ्टर म्हणत असत. हे वेगवेगळ्या लांबीचे कापावे लागत. जर नंतर जागेची गरज वाढली (आणि पैसे असले) तर घराच्या मागच्या बाजूला रेललेले (एकेरी उताराचे) छप्पर (लीन टू रूफ) घालून जागा वाढवली जाई. हा उतार घराच्या इतर भागातील छताच्या उतारापेक्षा वेगळा असे.

Lean to roof (सॉल्टबॉक्ससारखा आकार)

यातच नंतर सुधारणा होऊन "सॉल्ट बॉक्स" पद्धतीची रचना रूढ झाली. यात दोन्ही उतार सारखेच असत, त्यामुळे घराची सामान्यतः मागची बाजू ही अधिक मोठी आणि उताराची दिसे. अशी जागा स्वयंपाक इत्यादी कामासाठी वापरली जाई.

याकाळच्या घरांचे एक अजून वैशिष्ट्य म्हणजे बर्‍याचदा वरचा मजला खालच्या मजल्यापेक्षा क्षेत्रफळाच्या दृष्टीने थोडा मोठा असे. त्यासाठी बाहेरचा (विशेषतः पुढच्या, दर्शनी भागात सज्ज्याप्रमाणे भाग पुढे आलेला असे - अर्थात बंदिस्त सज्ज्याप्रमाणे. सध्या आपल्याकडे प्रचलित असलेल्या गॅलर्‍यांप्रमाणे रूंद नाही, तर जेमतेम १.५-२ फूट. आणि आतल्या बाजूने हा सज्जा वेगळा नसून वरच्या खोलीचाच भाग असे. पॉल रीवीअरच्या घराची रचना अशीच दिसते. ह्याला "ओव्हरहँग" असे नाव आहे. ह्याच्या खालच्या दर्शनी भागात किंचित सजावट (पदकाप्रमाणे दिसणारी)बहुदा केलेली असे. या सज्ज्याच्या उपयोग खालच्या बाजूला छत म्हणून होई.

Paul revere House - Facade - Overhang and lack of symmetry

अमेरिकेतील उत्तरेकडे चिमण्या अधिकांशी घराच्या मधोमध असत, तर दक्षिणेकडे घराच्या एका बाजूला. उत्तरेकडे अधिक थंडी असल्याने उष्णता राखून ठेवण्यासाठी त्या मधोमध असत तर दक्षिणेकडे थंडी कमी, तसेच जागा जास्त यामुळे चिमण्या बाजूला असाव्यात असा अंदाज बांधता येतो. तसेच जसजशी वस्ती वाढत गेलीतसतशी या चिमण्या सुशोभित करण्याची पद्धत सुरू झाली. सांधणीच्या वरच्या बाजूस त्रिकोणी छपरात ऍटिक नावाची जागा असे जिचा उपयोग वस्तू ठेवण्यासाठी होत असे. सुरूवातीला काचेचा वापर कमी होता, किंवा नव्हता म्हटला तरी चालेल. पण नंतर याच ऍटिकमध्ये यात स्कायलाईट म्हणजे उजेड आत येईल असे काचेचे तावदान लावले जाई. त्या तावदानासाठी सांधणीत खास उभ्या आडव्या पट्ट्या लावून आधार देत काच बसवली जाई. खिडक्या या केसमेंट पद्धतीच्या म्हणजे तावदान एका बाजूने उघडणार्‍या असत. (आपल्याकडच्या खिडक्यांप्रमाणे). वर पाहिलेली पद्धत साधारणतः "पोस्टमीडीवल इंग्लिश" या नावाने ओळखली जाते. यापुढचे भाग स्पॅनिश आणि फ्रेंच प्रभाव याविषयी.

Comments

अतिशय ज्ञानप्रद

अतिशय ज्ञानप्रद लेख.. खूप आवडला :) सविस्तर प्रतिक्रिया आणि काहि शंका आहेत त्या नंतर लिहिन! आत्ता घाईत आहे :)

-(प्रभावित) ऋषिकेश

उत्तम

लेख. वूड्स आणि फॉरेस्ट तसंच टिंबर आणि लंबर यातला फरक आणि बीम्सचे वेगवेगळे प्रकार प्रथमच समजले. लेख वाचून बाहेर भटकायला गेलो असताना गेबल आणि ग्रॅम्बल प्रकारची छपरे शोधायचा प्रयत्न केला :)

बाकी दोन्ही बाजूला सारखाच उतार असणार्‍या पद्धतीला 'सॉल्ट बॉक्स' हे नाव का पडले असावे? (म्हणजे इतर नावांसारखे स्वयंस्पष्ट/इन्ट्युईटिव वाटत नाही.)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)

स्वयंस्पष्ट!

शब्द आवडला.
लवकर शब्दभांडारात टाका कसे!

दोन्ही बाजूला उतार नाही. उतार एकाच बाजूला, पण लीन टू रूफ प्रकारात हे उतार सारखे नसत, म्हणजे मध्येच रेषा तुटल्याप्रमाणे दिसे, तर सॉल्टबॉक्स पद्धतीच्या घरात रेषा सलग असे. जुने मीठ ठेवण्याचे डबे असेच असत, त्यावरून ते नाव पडले.

pfkauctions.co.uk

डव्हटेल

तुमच्या या लिखाणात कितीतरी माहिती डव्हटेल होऊन येते.

हा लाकडाच्या सांध्याचा प्रकर आहे हे कळल्याशिवाय त्या इंग्रजी शब्दाचा अर्थ स्वयंस्पष्ट होत नाही.

माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद.

आता

आता डव्हटेल म्हणजे काय ते आधी शोधणे आले.
आरे! असे जड नि भयंकर शब्द वापरण्या आधी आमच्या
सारखे गरीबलोकही येथे आहेत याचा विचार करत जारे...

घाटपांडे साहेब तुम्हाला सापडलाय काहो? मी स्पेलींग शोधण्यापासून सुरुवात केलीय.
मला वाटलं बदकाचे शेपूट.. :))
आपला
गुंडोपंत

अर्थ लेखातच चित्रासकट दिला आहे

वेगवेगळ्या ठिकाणी उपयोगी पडतील असे अनेक प्रकारचे सांधे कल्पक सुतार वापरतात, त्यांच्यापैकी हा एक प्रकार. यात लाकडाच्या एका तुकड्याला पारव्याच्या शेपटीसारखा आकार दिलेला असतो, आणि दुसर्‍या तुकड्यात तो आकार तंतोतंत मावेल अशी खाच असते. एका दिशेने तुकडे एकमेकांवर रुळासारखे सरकतात, पण दुसर्‍या कुठल्याही दिशेने लाकडाचे तुकडे एकमेकांपासून ओढायला गेले तर तुकडे मुळीच वेगळे होऊ शकत नाहीत. अशा प्रकारे लाकडी वस्तू बांधताना तुकडे सांध्यात सरकवून जोडता येतात, पण बांधलेल्या वस्तूत तुकडे मुळीच खिळखिळे नसतात आणि निखळून पडू शकत नाहीत.

असे परव्याच्या शेपटासारखे सांधे योजून केलेले सुतारकाम मजबूत आणि टिकाऊ असते. सुतार कुशल असला तर जोडलेले तुकडे एकसंध भासतात.

अनेक वस्तू तितक्याच कौशल्याने बेमालूम मिळून आल्या तर त्या वस्तू "डव्हटेल" झाल्या आहेत असे म्हणतात. सुतारकामातले हे किती कौशल्याचे काम आहे हे सचित्र माहीत नसेल, तर त्या इंग्रजी वाक्याचा अर्थ सहज कळत नाही, ती उपमा किती चपखल आहे ते उमगत नाही.

चित्रा यांच्या लेखात अशाच प्रकारे वेगवेगळी माहिती एकसंध जुळून आली आहे.

प्रतिशब्द सुचवण्या

लेख वाचणार्‍या सर्वांना आवाहन -
प्रत्येक गोष्टीचे/वस्तूचे वर्गीकरण/नामकरण करणे ही पाश्चात्यांची सवय त्यांच्या भाषेला उपकारक ठरली आहे. तुम्हाला जर अशा लेखात वापरलेल्या इंग्लिश शब्दांना प्रतिशब्द मिळाल्यास ते जरूर लिहावेत. उदा. मी राफ्टरला काही प्रतिशब्द आहे का बघत होते, पण सुचेना. जे सुचले आहेत ते टाकले आहेत ( ते प्रचलित नाहीत - उदा. शिखरफळी, इतर काही शब्द मिळाल्यास जरूर लिहा). तेव्हा मराठी प्रतिशब्द मिळाल्यास जरूर कळवावे ही विनंती. त्यातील चांगले शब्द शब्दभांडारात टाकता येतील.

हवे तर वेगळा सुचवण्यांचा लेख सुरू करता येईल.

धन्यवाद.

चित्रा

तुळई

रॅफ्टरसाठी "तुळई" हा शब्द ऐकला आहे. तुळई म्हणजे चौकोनी कापलेला लाकडाचा लांब दणकट ओंडका. त्यामुळे कदाचित छपराच्या फासळ्यांसारख्या नाजूक फळ्यांना लागू होणार नाही, पण मधल्या दणकट ओंडक्याला लागू होईल.

तुळई

हा शब्द सर्किटराव म्हणतात तसाच वापरलेला ऐकला आहे म्हणून लेखात बीमसारख्या उपयोगासाठी वापरला आहे. राफ्टर जरी बीमच असला, तरी तिरपा असतो (साधारणपणे) इन्क्लाईन्ड. म्हणून शब्द - राफ्ट/रॅफ्ट - काय म्हणाल तसे - वरून कसा होईल त्याचा विचार केला. तराफा किंवा तत्सम शब्द, पण सुचत नव्हते.

पण सर्वांना धन्यवाद !

वासे?

आपल्याकडे कैलांना वासे असतात तेहि तिरपेच असतात. "वासे" शब्द चालेल का
-ऋषिकेश

अरे हो की!

वासे बरोबर आहे!
तुझे वाचल्यानंतर मोलस्वर्थ बघितले - आधी ते का सुचले नाही कळत नाही -
त्यात उंदीरवासा, खाकरवासा, कोनवासा असे अनेक शब्द मिळाले. अनेक धन्यवाद!

चित्रा

म्हण - अवांतर

बडा घर पोकळ वासा ही म्हण यावरूनच आली ना?

हो..

बरोबर!

छान

अतिशय माहितीपुर्ण लेख. नंदन यांनी म्हणल्याप्रमाणे आता इतर घरांकडे पाहून ,"हे कुठल्या पद्धतीचे?" असा विचार डोक्यात येणार.

सुरवातीला थोडा इतिहास, मग घराचा मुळ विषय... हाही लेख खूप आवडला.

अवांतर - लाइफ इन ए सॉल्टबॉक्स

आभार

सीएनएनचा दुवा चांगला आहे.

इतिहास देण्याचे कारण एवढेच की अनेकदा घरे ही प्रत्येक काळातील सांपत्तिक स्थिती, सामाजिक परिस्थिती, उद्योग यांच्याशी निगडित असतात. बाहेरून आलेल्यांनी आपापल्या परंपरा आणल्या, आणि टिकवल्या. कदाचित प्रत्येक ठिकाणचे कारागीर (गवंडी, सुतार) आल्याने त्यांच्या कलेचे आणि कारागिरीचे संवर्धन आणि संरक्षण झाले असेल.

अमेरिकेत काळाप्रमाणे घराच्या ठेवणीत खूपच बदल होत गेलेले दिसतात, इतके की वास्तुकलेच्या डिटेल्स वरून ( खुब्यांवरून) साधारण घर कधी बांधले असेल याचा अंदाज बांधता येतो - (सामान्यपणे). कधीकधी वास्तुकला विशारद लोक त्याचेही नको इतके स्तोम माजवताना दिसतात.

वा लेख आवडला.

अजून एक मस्त लेख. चित्राताई हे लेखन असे आहे की याचे छानदार पुस्तक तयार होईल.
किमान मराठीमध्ये असनारी घरांविषयीची एक वेबसाईट तर नक्कीच तयार होईल.टासो,
आता लेखाकडे वळतो.
जवळजवळ १६६२-६३ सालापर्यंत ह्या दोन्ही जमाती थोड्याफार तणावाखाली पण सामोपचाराने राहत होत्या.
म्हणजे राज च्या वक्तव्यापर्यंत भय्ये राहत होतते तसेच. नाही का?

यातही पिलग्रिमांचे स्थानिक लोकांना ख्रिश्चन करून घेण्याचे प्रयत्न चालूच होते.

भटाला दिली ओसरी तर भट पाय पसरी? च्यामारी या किरिस्तावांनीही कुणाला धड राहु दिले नाही राव या जगात. काय नडले होते का? चांगले आयुष्य होते त्या आदिवासींचे. शिवाय इथे स्वतःलाझायला धड नाही नि चालले दुसर्‍याला देवपूजा शिकवायला... उगाच नव्हतं यांना यांच्या देशातून हाकलून दिले...
असो.
एकुण पुढे बदलत गेलेली लाकडाची व घरांची रचना आवडली.
मराठी शब्द सुचले की नक्की सांगतो.
तुळई हा शब्द तसा मलाही सुचला होता.

आपला
गुंडोपंत

पुस्तक?

गुंडोपंत,
पुस्तक वगैरे खूपच झाले. उपक्रमावर येत्या चार महिन्यांत सर्व मालिका टाकता आली तरी खूप होईल..
पण चांगले वाटले!

म्हणजे राज च्या वक्तव्यापर्यंत भय्ये राहत होतते तसेच. नाही का?

तरी म्हटले अजून विषयांतर कसे झाले नाही :)

भटाला दिली ओसरी तर भट पाय पसरी? च्यामारी या किरिस्तावांनीही कुणाला धड राहु दिले नाही राव या जगात. काय नडले होते का?

त्यांच्या राजाने मॅसॅचुसेटस चार्टर मध्ये खालीलप्रमाणे लिहीले आहे - येल युनिव्हर्सिटीचा दुवा पहा- http://www.yale.edu/lawweb/avalon/states/mass03.htm

"whereby our said People, Inhabitants there, ....... maie wynn and incite the Natives of Country, to the KnowIedg and Obedience of the onlie true God and Saulor of Mankinde, and the Christian Fayth, which in our Royall Intencon, and the Adventurers free Profession, is the principall Ende of this Plantacion. "

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

जमेल हो!

जमेल हो! नक्की जमेल.
आधी लिखाण येवू तर द्या!

तरी म्हटले अजून विषयांतर कसे झाले नाही :)

असं वेडं वाकडं खुसले नाही तर गुंडोपंत कसले ते? तुम्ही आणाकी लायनीवर परत. :)))

असो,
मॅसॅचुसेटस चार्टर
आता राजा म्हंटलं की संपलच की सगळं असं? राजा असला म्हणून त्याचं सगळंच ऐकायचं?
इतका ट्रु गॉड म्हणून गळे काढणारांना त्यात देव दिसू नये हे त्यांच्या राजाचे दुर्दैव!

या ख्रिस्ती धर्मगुरुंनी स्वतःचं डोकं नको चालवायला काही?
उगाच आपलं राजा नि चर्च सांगतंय तर हे निघाले आपले धर्मांतरं करायला...
उलट यांनीच सांगायला हवं होतं की,
"नको! हीच लाईफ स्टाईल चांगलीये. आता आम्हीच 'ते' होतोय"

आपला
गुंडोपंत

चार्टर

राजाच्या चार्टरचा दुवा अशासाठी दिला की कळावे की धर्मांतर करणे हा त्यांचा अजेंडा होताच. त्याचबरोबर धर्मांतर हे जमीन मिळवण्याचा एक मार्ग म्हणून वापरला गेला होता. जरी आलेले लोक हे इंग्लंडमध्ये रहायला तयार नव्हते तरी त्यांचा हेतू हा त्यांच्या मूळ लोकांशी फार प्रतारणा करणारा नव्हता.

त्यात १८ व्या शतकात अनेक बदल झाले, हे सांगायला नकोच. मुख्यत्वे इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळवणे ही इच्छा तयार होणे, टिकणे आणि त्यात मिळालेले यश.

सुंदर लेख !!!

अशा लेखनासाठी आपण जी मेहनत घेता, त्या मेहनतीस आमचा नमस्कार आहे. अप्रतिम- अप्रतिम लेख.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद!

मेहनत नाही, पण लिहीताना शक्य तितके संदर्भ तपासून घेते, एवढे मात्र करते. पणा तरी चुका राहिल्या नसतील असे नाही.
तुम्ही लेखाला अप्रतिम म्हटले म्हणून धन्यवाद, तरी ते तेवढे खरोखरच तसे नाही याची जाणीव आहे. नम्रपणा म्हणून नव्हे तर पाहिजे तेवढे डिटेलींग करणे वेळेअभावी शक्य नसते म्हणून.

शिवाय बर्‍याचदा लिहायचे एक डोक्यात असते आणि भलते सलते विषय सुचत राहतात म्हणून वेळ लागतो त्याची जाणीव असते. त्यामुळेही वैताग येतो.

हो ना

शिवाय बर्‍याचदा लिहायचे एक डोक्यात असते आणि भलते सलते विषय सुचत राहतात म्हणून वेळ लागतो त्याची जाणीव असते. त्यामुळेही वैताग येतो.

आम्हाला मात्र भलते सलते विषय सुचत राहतात म्हणून वेळ लागतो शिवाय आपण भलतीकडेच चाललो आहोत याची जाणीवही आम्हाला नसते. त्यामुळेही इतरांना वैताग येतो. हे कधी तरी कळते इतकेच. अर्थात म्हणून आम्ही लगेच वळत नाही हे सांगायला नकोच! ;))))

आपला
भलता सलता
गुंडोपंत

उपयुक्त आणि चाचणी परीक्षा

लेखमाला मस्तच चालली आहे. इतरांसाठी सुरेख वगैरे असली तरी माझ्यासाठी उपयुक्त आहे. ;-) अमेरिकेतील घरांची बांधणी पाहिली तर फळकुटांनी बांधलेल्या झोपड्या असाव्यात का काय असा विचार मनात येतो. दगड, विटा आणि काँक्रिटच्या मजबूत इमारतींसमोर ही घरे तकलादू वाटतात परंतु गेल्या १००-१५० वर्षांपासूनची घरे सुस्थितीत असून त्यात लोक आजही वास्तव्य करतात असे कळल्यावर आश्चर्यही वाटते.

ज्यांनी चित्राताईंचा लेख काळजीपूर्वक वाचला त्यांनी खालील घराची ठेवण सांगावी.

अवांतरः काही लोकांनी मी हा लेख आधीच वाचल्याची वावडी उठवली होती (ह. घ्या.)तरी हा लेख मी काल आणि आज वाचून पूर्ण केला आणि आणखी एकदा काळजीपूर्वक पारायण करायचे आहे. ;-)

कोणाला तरी उपयोग होतोय ना लेखाचा :)

लेखमाला मस्तच चालली आहे. इतरांसाठी सुरेख वगैरे असली तरी माझ्यासाठी उपयुक्त आहे. ;-)
:)

अवांतरः काही लोकांनी मी हा लेख आधीच वाचल्याची वावडी उठवली होती (ह. घ्या.)
काय म्हणता ?
तसे केल्याबद्दल ते लोक क्षमाही मागणार होते म्हणे, पण त्या लोकांच्या संगणकात व्हायरस आल्यामुळे त्यांचा संस्थळाशी संपर्क बंद आहे, असे समजते.

काही लोकांपैकी एक
प्रा.डॉ दिलीप बिरुटे :)

अवांतर :) असेच घर अमेरिकेत कोणी बांधत असेल तर आम्हाला तर खूप आनंद होईल .

गृहपाठ!

चांगला आहे. कोणीच उत्तर दिले नाही याचे तीन अर्थ आहेत - एकतर वाचलेले नाही, किंवा कळलेले नाही, किंवा लेख ठेवण समजून देण्यात अयशस्वी झाला :)

माय कझिन विनी मधल्या "लिसा" प्रमाणे - इटस ए ट्रिक क्वेश्चन!

वरचे घर सर्वसाधारणपणे जुन्या कलोनियल पद्धतीचे किंवा कलोनियल रीवायवल अशा पद्धतीत साधारणपणे आढळते त्याप्रमाणे सिमेट्रिक दिसत नाही (प्लॅनही सिमेट्रिक नसावा). छते गेबलसारखी (त्रिकोणी) असली तरी पुढच्या बाजूला आहेत - कदाचित क्रॉस गेबल असतील असे वाटते म्हणजे दोन्ही दिशेने गेबल. - फोटोत अरूंद, दुसरी बाजू (आत जाणारी बाजू) नीट कळत नाही आहे- प्रवेशदाराजवळचे खांब साधारणपणे ग्रीक रिवायवलप्रमाणे होतील (पूर्ण उंचीचे). यात जुनी वैशिष्ट्ये करतील असे वाटते, पण प्लॅन नवीन आहे.. एका प्रकारावर बोट ठेवून सांगता येणार नाही. neo eclectic म्हणता येईल.

मला तर बॉ

मला तर बॉ गणपतीत कुठल्याश्या मंदिरांची वगैरे प्रतिकृती करतात ना तशी ही एखाद्या उत्सवासाठी केलेली प्रतिकृती वाटली ;)
-ऋषिकेश

बरोबर भूलनगरी

मला तरी मागील बाजु दिसत नसल्याने हा सिनेमाचा किंवा थीम पार्क टाइप सेट वाटला. ह्या कथेतल्या घरासारखा. :-)

माहितीपूर्ण लेख

चित्रा, लेख माहितीपूर्ण आहे, खूप आवडला.

 
^ वर