गेल्या शतकांतील अमेरिकन घरे

थोडे सुरुवातीला:
अमेरिकेत आले तेव्हा भारतातील दाटीवाटीत बांधलेल्या रंगीबेरंगी इमारती पहायची सवय होती, त्यामुळे इथला एकंदरीत रंगाचा अभाव किंवा डोळ्यात न भरणार्‍या रंगांचा वापर आवडत नसे. शांततेत असलेली घरे दूरची, परकी वाटायची. तशी ती बर्‍यापैकी असतातही, पण हळूहळू नजरेला सवय झाल्याने त्यातील विविधताही जाणवू लागली. बरीचशी घरे लाकडाची हे साधर्म्य सोडले तर घरांच्या ठेवणीत खूपच विविधता दिसते. त्यात अमेरिकेत आलेल्या अनेकदेशीय लोकांनी आणलेल्या पारंपारिक घरांच्या पद्धतींचा प्रभाव आणि त्यानंतर अमेरिकन भूमीवर झालेली परंपरांची सरमिसळ दिसते. ती वरवर पहाणार्‍याला जाणवत नाही. पण नीट बघू गेल्यास अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या प्रकारची घरे प्रचलित आहेत असे आढळते. अमेरिकन घरांच्या सर्व नाही तरी मुख्य प्रकारांचा आढावा घ्यायचा हा प्रयत्न आहे. एका लेखात या प्रकारांचा आढावा घेण्यासारखे नसल्याने ही लेखमाला तयार करावी हा विचार आहे. ही माहिती फार तपासून न पाहिलेली असल्याने तसेच अनेक स्त्रोतांपासून (पुस्तके, आंतरजाल, चित्रे) संकलित केली असल्याने ह्यातील सर्वच माहिती कदाचित परिपूर्ण नसेल याची नोंद घेणे आवश्यक आहे. या लेखांमध्ये त्रुटी किंवा चुका आढळल्यास जरूर लिहाव्यात म्हणजे योग्य माहितीचे संकलन व्हायला मदत होईल. अजून एक म्हणजे यातील छायाचित्रे मी काढलेली नाहीत, मूळ छायाचित्रे कोणाची ते प्रत्येक छायाचित्रावर राईट क्लिक करून प्रॉपर्टीजमध्ये पाहिल्यास कळेल. छायाचित्रांचे अधिकार मूळ छायाचित्रकारांकडे. सुरूवात अमेरिकन इंडियन (नेटिव अमेरिकन) घरांपासून.

अमेरिकन इंडियन (नेटिव अमेरिकन) लोकांची घरे:

अमेरिकन इंडियन (नेटिव अमेरिकन) हे अमेरिकेचे मूळ रहिवासी मानले जातात. अनेक अमेरिकन इंडियन जमाती अमेरिकेतील वेगवेगळ्या भागात राहत होत्या. उदाहरण द्यायचे असले तर इ.स. १६१६ च्या आधी एकट्या र्‍होड आयलंड आणि मॅसॅचुसेटस या भागांत वांपानोग नावाचे अमेरिकन इंडियन लोक राहत असत. ६७ गावांमध्ये मिळून जवळजवळ ५०,००० अमेरिकन इंडियन राहत होते. शिकार करणे, मासे पकडणे, मका किंवा तत्सम स्थानिक फळे आणि भाज्यांची शेती असा त्यांचे जीवनक्रम असे. या भागातील स्थानिक अमेरिकन इंडियन भाषेत वीटू (wetu) म्हणजे एक कुटुंबाचे घर.

स्थानिक झाडे (सीडर), पाणथळ जागी उगवणार्‍या वनस्पती (बूलरश/कॅटटेल) , जनावरांची वाळवलेली कातडी आणि झाडांच्या साली यांपासून बनवलेली ही घरे या लोकांचे उन्हापावसापासून रक्षण करीत, तसेच बर्फापासूनही. घर बांधण्यासाठी लागणारी सामग्री ते रानावनात हिंडून मिळवत.

कॅटटेल वनस्पती
कॅटटेल वाळवून शिवलेल्या साधारणतः ५-६ फूट रूंदी आणि १० फूट लांबीच्या चटया

याचप्रमाणे बुलरश उकळून त्यातील जीवनरस काढून टाकण्यात येई. कधी त्यांना रंग देऊन त्यांच्याही चटया विणल्या जात.
या चटया विणण्याचे काम स्त्रिया मुख्यत्वे करीत. सुंदर रंगांच्या या चटया घरात वर्षानुवर्षे एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला देण्याचीही पद्धत होती.

बुलरशच्या सुंदर चटया

ही सर्व साधनसामग्री वापरून रहाण्यायोग्य घरे बनवली जात.

वीटू /पुट्टकाकन - puttakaukan -

वीटू ही एका कुटुंबासाठी बांधलेली गोलसर घरे घुमटाकार छपराची असत. घरातील उष्णतेला धरून ठेवायला या गोलसर आकाराचा उपयोग होत असल्यामुळे तसेच वार्‍याच्या दाबाखालीदेखील हा आकार अधिक संरक्षण देत असल्याने असा आकार प्रचलित झाला असावा. झाडांचे लवचिक बुंधे किंवा जाड फांद्या (यासाठी जून झाडे चालत नसत, म्हणून बांधताना नवीन कोवळ्या बुंध्यांची झाडे निवडत जेणेकरून ती वाकवता येतील) वापरून त्याची उभ्या दिशेने गोलाकार बांधणी तयार केली जाई. यासाठी फांदीला गोलाकार देत तिची दोन्ही टोके जमिनीत घट्ट रूतवली जात. नंतर आडव्या दिशेने उरलेल्या फांद्या किंवा खोडे वेली किंवा जनावरांच्या कातड्याच्या पट्ट्यांनी एकत्र जोडून बांधणी तयार केली जाई. यावर वर तयार केलेल्या चटया घालून उन्हापावसापासून रक्षण मिळवले जाई. आतमध्ये थंडीसाठी शेकोटी करत असल्याने धूर बाहेर जायला म्हणून एक भोक मध्यभागी असे. एरवी त्यावरही चटया किंवा झाडांच्या साली लावून ते बंद करता येई. दरवाजेही जनावरांच्या सुकवलेल्या कातडीचे असत.

लांबट घर (longhouse) /नीसक्ट्वा - neesquttow

छोट्या घराप्रमाणेच अनेक कुटुंबे एका छताखालीही रहाण्याची पद्धत प्रचलित होती. विशेषतः हिवाळ्यात अशा घरांचा उपयोग होत असावा असे संदर्भ मिळाले. तसेच विशेष महत्त्वाच्या व्यक्ती या प्रकारची घरे वापरीत असाव्यात. अशा घराला नीसक्टवा (neesquttow -longhouse) म्हणत. या पद्धतीचे घर अनेक कुटुंबांना रहायला म्हणून पुरेसे लांब रूंद आणि उंचही असे. त्याच्या छताची ठेवणही गोलसर असली तरी भिंती सरळ उभट असत. यासाठी झाडांचे बुंधे दोन ओळींत रोवून गोलाकार वळवून वर एकत्र बांधले जात. त्याही लहान घरांप्रमाणेच झाडाच्या बुंध्यांपासून केलेल्या असत. घरात अनेक कुटुंबांसाठी शेकोटी करायच्या एकाहून अधिक जागा (फायरप्लेसेस) असत. तेथे तयार झालेला धूर बाहेर जावा म्हणून छताला पुरेसे मोठे भोकेही असत.

���ाखेरीज अमेरिकेभरच्या स्थानिक इंडियन लोकांच्या जीवनशैलीला योग्य अशी इतर प्रकारची घरेही अमेरिकेत सर्वत्र आढळून येत. यात तंबूप्रमाणे दिसणारे टीपी (अमेरिकेच्या पठारी प्रदेशातील भटक्या जमातींसाठी), फ्लोरिडाच्या भागातली 'चिक्की' नावाची पुराच्या पाण्याचा त्रास कमी व्हावा म्हणून बांधलेली लहान जोत्यावरची (स्टिल्टवरची) घरे, झोपडीप्रमाणे दिसणारी गवताची दक्षिणेकडची घरे, असी नावाची बांबूची बांधणी असलेली (अमेरिकेतील आग्नेयेकडची) घरे असे अनेक प्रकार यात आहेत.

इथेच टाका तंबू (टीपी)
फ्लोरिडातील घरे (चिक्की)

महत्त्वाची ही गोष्ट की युरोपियनांनी आपली आखीवरेखीव गृहबांधणीची बीजे अमेरिकेत रूजवण्याआधीच स्थानिक अमेरिकन रहिवासी आपापल्या जीवनाच्या शैलीला योग्य अशी घरे स्थानिक साधनसामग्री वापरून बांधत होते आणि त्यात ते पारंगतही झाले होते.

Comments

व्वा!

वा वा! मस्त उपक्रम. पुढिल लेखांसाठी अनेक शुभेच्छा!

घराला विटु, चिक्की नावं आवडली :-) चिक्की काय कधीही बेष्टच् ;) चिक्की तर कोकणातल्या आमराईत आराम करायल पडवी असते ना तशी वाटली :)

-(शुभेच्छुक) ऋषिकेश

पडवी

बरोबर, पण मला आठवते त्याप्रमाणे पडवीला अर्धवट उंचीच्या भिंती असू शकते (हवेशीर असली तरी), तसे हे घर जास्त करून उघडेच असते. फ्लोरिडाच्या भागात हवा बरी इथल्या मानाने :-) त्यामुळे गरज नसली तर भिंतीही नसत! जिथे गरज असेल तेथे मातीच्या भिंती बांधत.

छान

माहितीपूर्ण लेख. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.
राधिका

सचित्र लेख आवडला

महत्त्वाची ही गोष्ट की युरोपियनांनी आपली आखीवरेखीव गृहबांधणीची बीजे अमेरिकेत रूजवण्याआधीच स्थानिक अमेरिकन रहिवासी आपापल्या जीवनाच्या शैलीला योग्य अशी घरे स्थानिक साधनसामग्री वापरून बांधत होते आणि त्यात ते पारंगतही झाले होते.

यावरून आठवले. पुढे फ्रँक लॉईड राइट या अमेरिकन स्थापत्याच्या दिग्गजाला या तत्त्वाचे महत्त्व पटले. त्याच्या इमारतींचे आकार नेटिव्ह अमेरिकन घरांसारखे फारसे नसले, तरी तो बांधणीत स्थानिक साधनसामग्री वापरण्यास प्राधान्य देई.

स्थानिक साधनसामग्री

बरोबर मुद्दा धरलात. सहज मिळणार्‍या स्थानिक सामग्रीचा नैसर्गिक वापर हा पर्यावरणालाही उत्तम आणि (बर्‍याचदा) पाकिटालाही. पूर्वीचे लोक आसपासच्या गावांत सहज उपलब्ध असलेल्या गोष्टी वापरून घरे बनवीत असत. नंतर औद्योगिक क्रांतीमुळे ही सामग्री बाहेरून आणणे सोपे झाले. पण त्याचा वापर हा पर्यावरणाला काहीसा हानीकारकच असतो. पण नवीन मटेरियल्सशी जुळवून घेताना राईटने त्यातही ऑरगॅनिक आर्किटेक्चर ही संकल्पना वापरली - मुख्यत्वे कलेने आजूबाजूच्या निसर्गात मिसळून जावे, ती डोळ्यात खुपू नये ही काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्याचे तत्व हे त्याच्या अनेक सुंदर वास्तूंमधून दिसते. मुख्यत्वे वास्तू कोठच्या प्रदेशात, कसल्या पार्श्वभूमीवर आहे त्यावर आधारित त्याची डिजाईन्स असत.

FallingwaterWright.jpg यात काँक्रीटचा वापर असूनही डोळ्याला विशेष खुपत नाही.

भारतात लॉरी बेकर या मूळ ब्रिटीश आर्किटेक्टनेदेखील असे काम केले आहे.

मला तरी

मला तरी हे काँक्रीट या हिरव्यागार पार्श्वभूमीवर डोळ्यात खुपतेच आहे!
ते खुपू नये म्हणून हे चित्र कसे वाचले पाहीजे ते ही सांगा.
शिवाय लॉरी आणि राइट व त्यांची स्ट्रक्चर्स यावर काही लिहिल्यास वाचायला आवडेल.
आपला
गुंडोपंत वांपानोग

गुंडोपंत

गुंडोपंत,

या स्टक्चरचे रसग्रहण करण्याइतका माझा अभ्यास नाही, पण असे बघा, की जिथे ती वास्तू उभी आहे, ती जागा खडकाळ आहे. त्यावरून एक छोटा नैसर्गिक झरा खाली पडतो आहे. ही जागा दगडांच्या समांतर लाद्या असल्याप्रमाणे दिसते. यात नव्याने घातलेल्या काँक्रीटच्या सपाट लांबट स्लॅब फारशा वेगळ्या दिसत नाहीत. विचार करा की इथे बांधली आहे त्याहून उंच इमारत बांधली असती, तर ते सौंदर्य टिकले असते का? नैसर्गिक दगडाचा सुरेखपणाची सर या लाद्यांना येणार नाही अर्थात. रिनफोर्स्ड काँक्रीट का, तर त्याला कँटीलिवर (एका बाजूने भक्कम आधार असलेली, दुसरीकडून हँगींग असणारी) करता येते म्हणून. हे दुसरे चित्र पहा.

http://www.paconserve.org/fallingwater/drawings/selevation.jpg

आता कळले

आता कळले! :))

आता जरा भारी वाटते आहे हे.

आपला
जरासा मंद
गुंडोपंत

(आवांतर)
आणि आता पुढे याच नियमानी सगळ्याच इमारती बिनडोकपणे सारख्याच चौकोनी
बांधलेल्या असतील तर त्यात पुढचे लोकही तसेच ठोकळे बांधणार...
म्हणून बिल्डर्स सारख्याच इमारती बांधतात...
म्हणजे आधीचा चौकोनी ठोकळ्यांचा व्ह्यु बिघडायला नको हो! ;)))

माहितीपूर्ण

चित्रे आणि माहिती दोन्ही छान आहेत. वीटूला पाहून शाळेत सातवीच्या भूगोलात इग्लूचे चित्र होते त्याची आठवण झाली. :)

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

अगदी!

फक्त बर्फाचा नसून चटयांचा इग्लू!

आपला
गुंडोपंत

धन्यवाद

या टीपींना बाहेरून आकर्षक रंगही दिलेले असतात.

वीटुमध्ये देखील त्यांच्या गोल आकारामुळे उष्णता टिकून राहते.

मस्त लेख!

लेख आणि चित्रे आवडली. माझ्या घराजवळ एकांचे (व्यवस्थित) घर आहे पण त्यांच्या बॅकयार्डात एक टीपी बांधलेली आहे. ती बघून आम्हाला आधी खूप मजा वाटायची. ती कापडाची आहे अर्थात पण दिसायला अगदी वरच्या चित्रातल्यासारखी. त्या टीपीचे ते काय करतात असा नेहमी प्रश्न पडतो आम्हाला आणि मग 'बहुधा उन्हाळ्यात त्यात जाऊन झोपत असतील' असे आम्ही स्वतःचे समाधान करून घेतो.

हलक्या

प्रतिक्रियेबद्दल आभार.
टीपी हलक्या, बांधायला आणि कुठेही न्यायला आणायला सोप्या - त्यामुळे भटकताना उत्तम. तुमच्या शेजार्‍यांना कुतुहल म्हणून विचारून पहा ते टीपीचा कसा वापर करतात किंवा त्यांनी तिथे ती का ठेवली आहे - नवीन माहिती मिळू शकेल :-)

कोणीसा खालच्या दुव्यावर छान उद्योग केला आहे. वेगवेगळ्या आकारांची राहण्याच्या दृष्टीकोनातून तुलना केली आहे.
इथे थोडे टीपीबद्दल

हाहाहा!

लोकांना खूपच मोकळा वेळ असतो, हे क्षणभर वाटले, पण नंतर माझे उद्योग आठवले ;-)

सॉरी पण हसले!

मात्र ती टीपीची वेबसाईट खरंच टीपी (टाईमपास) आहे.

हे मात्र खरे

तुमचे खरेच उद्योग वाटले होते हे पण कबूल करते!

हा हा हा

:)))
निष्कर्षः 'टिपी' साईट काय किंवा उद्योग काय करायला वेळेपेक्षा इच्छा लागते

-ऋषिकेश

वा टीपी आवडलीच!

वा टीपी आवडलीच!

आता एक बनवावी किंवा घ्यावीच लागेल की काय इतपत विचार करतोय!

रहायला काय मजा येईल त्यात! मस्त बाहेरच जाळावर कोंबडी किंवा ससे भाजून खायचे...
मग दुपारचे जरा पडायचे हरव्यागार सावलीत! पोरं खेळतायेत इकडे तिकडे... रंगलेले ते खेळ बघत राहणं.
रात्री मजेत गप्पांचा अड्डा जमवायचा, मावळत्या सूर्याच्या साक्षीने... जाळाभोवती चे किस्से नि कहाण्या...
आरक्त होत जाणारी संध्याकाळ ज्वाळांसोबत अधिकच सोबत गूढ रम्य भासणारी... हलकेच पसरणारी थंडीची शीरशीरी... हवीहवीशी ती ज्वाळेची उब.
रात्र पडल्यावर जमलेच तर ढोल बडवत एक गृप डांस! असलीच, जमलेच तर स्थानीक दारू!
हे सगळे तुमच्या त्या टीपीच्या बॅकग्राऊंडवर...

वा अजून काय पायजे राव आयुष्यात माणसाला???

मस्तच ...

आपला
गुंडोपंत टीपीकर वांपानोग

च्यामारी! नकोच ही व्यायामशाळा आता असं वाटतंय हो!!!

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया देणार्‍या सर्वांचे आभार..

अरे

वा! सुरेख लेख.
आवडला. औद्योगिक क्रांती होण्या आधीचे जग जास्त सस्टेनेबल होते असे जाणवते.
म्हणजे राहण्यालायक पृथ्वी दुसर्‍यापीढीला देण्याची क्षमता मानव राखून होता.
ती आता आपण घालवून बसलोय असे जाणवते.
ऋषीकेशने उल्लेखल्या प्रमाणेच चिक्की आवडलीच!
त्या मोठ्या घरातले एकत्रीत कुटूंबाचे जीवन कसे असेल हे ही क्षणभर डोळ्यासमोर तरळले.
बाकी स्थानीक साधनांचा उपयोग करणे योग्य आहेच पण ते दरवेळेला शक्य होतेच असे नाही असे वाटते.

त्याच वेळी स्थानीक हवामानाचा विचार करून बांधलेली घरे जास्त योग्य वाटतात.

असो,
आवांतरः मुख्य म्हणजे या लोकांना या साठी कोणतेही गृहकर्ज लागत नसे. तसेच घर बांधण्यासाठी नगरपालिकांच्या परवानग्यांची कटकटही नाहे.
त्याही पलिकडे घर बांधले तरी त्यात भावनीक गुंतवणूकीला मर्यादा होती...
म्हणजे जवळ जवळ "झेन" मध्येच राहणे!!!

वा मला कल्पना करूनहीइतके छान वाटतेय.

आपला
माशा मारत बसलेला
गुंडोपंत
---------------
आणि अरे!
काय चित्राताई इतक्यातच आभार प्रदर्शन करून गुंडाळलेत?
तेही चक्क गुंडोपंतांचा एकही प्रतिसाद नसतांना???

अरे वा!

वेगळ्या विषयावरचा लेख छानच आहे. ह्याची एक मस्त लेखमाला होईल. लोकांनी त्यांना माहीत असलेल्या अश्या आगळ्यावेगळ्या घरांबद्दल लिहावे. तसेच आजच्या व भविष्यातील घरे पर्यंत.

अमेरिकेत वादळात सापडुन भुईसपाट झालेली घरे पाहून, ह्यांची घरे चांगली पक्की का नसतात हा विचार येतो. कोणी सांगू शकेल? टीपी व चक्की ज्या भागात होती तेथे ह्या वादळांचा धोका नव्हता का?

टॉयलेटची काय व्यवस्था होती हा प्रश्र खूपच त्रास देतोय. :-)

इतक्या लवकर आभार प्रदर्शन आटोपलेत?
बघा, लवकर प्रतिसाद = फ्लिपंट वाचक हे समीकरण रुढ झाल्यापासुन जरा निवांतपणे हो :-)...

छान!

गुंडोपंत - मोठं रम्य स्वप्न आहे हो तुमचं! आवडलं.
>>मोठ्या घरातले एकत्रीत कुटूंबाचे जीवन कसे असेल हे ही क्षणभर डोळ्यासमोर तरळले.
मलाही हेच वाटले. एकत्र रहायच्या दृष्टीने बांधलेली ही घरे आणि आत्ताचे अमेरिकन वास्तव यात जमीन अस्मानाचा फरक आहे. तो संस्कृतींमधलाही फरक आहे.

>>लॉरी आणि राइट व त्यांची स्ट्रक्चर्स यावर काही लिहिल्यास वाचायला आवडेल.
लिहीन, पुढेमागे कधीतरी:-)

>कोणतेही गृहकर्ज लागत नसे. तसेच घर बांधण्यासाठी नगरपालिकांच्या >परवानग्यांची कटकटही नाहे.
>त्याही पलिकडे घर बांधले तरी त्यात भावनीक गुंतवणूकीला मर्यादा होती...

हे मस्त. मी याचा विचार नव्हता केलेला!

>>बाकी स्थानीक साधनांचा उपयोग करणे योग्य आहेच पण ते दरवेळेला शक्य होतेच असे नाही असे वाटते.
हे बरोबर आहे.

>>इतक्या लवकर आभार प्रदर्शन आटोपलेत?
>काय चित्राताई इतक्यातच आभार प्रदर्शन करून गुंडाळलेत?
>तेही चक्क गुंडोपंतांचा एकही प्रतिसाद नसतांना???

१५ प्रतिसाद आले (त्यातले काही माझेच), म्हटले - चला' डोक्यावरून पाणी.. असो. लेख आवडला हे बरे झाले.

सहजराव -
वादळात सापडून भुईसपाट झालेली घरे - हा तुम्ही मोठा विषय काढला आहे. यावर खरे तर घरे सगळीकडे लाकडाचीच का यापासून सुरूवात करायला लागेल. त्यामुळे वार्‍याच्या विशिष्ट वेगानंतर/ दाबानंतर कितीही काळजीपूर्वक बांधलेली घरे ही काही प्रमाणात व्हल्नरेबल ठरतात. याबद्दल नंतर कधीतरी.

टीपी असलेल्या प्रदेशांतही वादळाचा धोका असणारच, पण त्यामुळे होणारी जिवितहानी कमी कारण वापरलेली सामग्री हलकी. -शिवाय तुलनात्मक घरेही सध्याच्या मानाने फारच छोटी. ती अंगावर पडून दुखापत व्हायची शक्यता कमी. आणि विंचवाच्या पाठीवरचा संसार असल्याने नुकसानही कमी.

आता घरे मोठी, त्यातील वस्तू अधिक म्हणून नुकसानाची शक्यताही जास्त.

उलट उदाहरण द्यायचे झाले तर भुकंपप्रवण भागातील दगडी घरांपासून जिवितहानी/मालमत्ताहानी यांचा धोका अधिक - लातूरप्रमाणे. (भूकंप आणि वारे साधारण सारख्याच दिशेने (वर-खाली नाही, तर आडव्या किंवा लॅटरल दिशेने) अधिक परिणाम करतात - घरे कोलमडून पडतात म्हणून ही तुलना).

त्यामुळे नुसती स्थानिक सामग्री असून चालत नाही, तर त्यापासून घरे कशा प्रकारे उभारायची ह्यालाही महत्त्व असते.

मस्त !!!

लेख आणि चित्रे आवडली. पुढील भाग लवकर येऊ द्या !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उत्तम

वेगळ्या विषयावरील हा लेख आवडला. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

चांगला लेख

अशी लेखमालाच आली तरी आवडेल.
या निमित्ताने जगातील इतर भागाअतील घ्रांचा उहापोह व्हायला हरकत नाही.
पुढील भागासाठी उत्सुक आहे.

 
^ वर