गेल्या शतकांतील अमेरिकन घरे -३ -युरोपमधील प्रभाव

मागील दोन भागात उत्तर अमेरिकेतील प्राचीन लोकांची घरे पाहिली. याहून वास्तुकलेत कितीतरी जास्त प्रगत अशी माया संस्कृती दक्षिण अमेरिकेत स्पॅनिशांचे आक्रमण होऊन ती उद्ध्वस्त होईपर्यंत होती. माझ्या एका जेष्ठ स्नेही जोडप्याने मला या संस्कृतीवर लिहायला सांगितले म्हणून अधिक माहिती गोळा करीत असताना लक्षात आले की याला वेळ अधिक लागेल. पण ह्या संस्कृतीच्या वास्तुकलेबद्दल लवकरच कधीतरी विस्ताराने लिहायचे मनात आहे. याचे एकच उदाहरण द्यायचे झाले तर ते म्हणजे दक्षिण अमेरिकेतील टिकल येथे सापडलेले त्यांचे भग्नावशेष.

या भागात घरांचे रचनात्मक वर्णन करण्यापेक्षा अमेरिकेत आलेले हे लोक नक्की का आणि कशामुळे आले, त्यांचा इतिहास त्यांच्याविषयी काय सांगतो, असे वर्णन जास्त आले आहे याची जाणीव आहे!

-------------------------------------------------------------------------------------------------------------------
माणसांनी कुठेही स्थानांतर करण्याची कारणे म्हणजे एकतर दुसरीकडे उपलब्ध असलेल्या संधी , पैसा, किंवा काही नैसर्गिक आपत्ती असे बहुदा दिसते. इंग्लंडमधील पहिल्या एलिझाबेथ राणीच्या काळात तिच्या प्रोत्साहनाने काही सरदार जगभर नवीन संधी शोधत जात होतेच. बर्‍याच लोकांचा असा समज असतो की इ. स. १६२० च्या सुमारास अमेरिकेत आलेले पिलग्रिम हे पहिले बाहेरचे लोक. परंतु हे खरे नाही. पिलग्रिमांना घेऊन येणारे जहाज सध्याच्या मॅसॅचुसेटसच्या केप कॉड या भागात येण्याआधी अनेक वर्षे इंग्लंडातील लोकांना अमेरिकेची माहिती होती. ते येथे व्यापारउदीम करण्यासाठी, तसेच जंगले आणि संपत्तीचा शोध घेत आले होते. स्पॅनिश लोकांनी तर दक्षिण अमेरिकेतील प्राचीन माया संस्कृतीतील लोकांना जबरदस्तीने धर्मांतर करायला लावून आणि रक्तपात करून स्वतःचा जम बसवायला सुरूवातही केली होती. डच व्यापारीही जगभर फिरत होते. फ्रान्सनेही आपली वसाहत कॅनडातील क्युबेकमध्ये वसवली होती. या बातम्यांमुळे इंग्लंडमधील राजेशाही अस्वस्थ होऊन नव्या वसाहती स्थापन करण्याची त्यांचीही महत्त्वाकांक्षा वाढली असल्यास आश्चर्य वाटायचे कारण नाही. इ.स. १६२० च्या आधी स्पॅनिश लोकांनी सांता फे, फ्रेंचांनी क्युबेक आणि ब्रिटिशांनी जेम्सटाऊन या उत्तर अमेरिकेतील भागांमध्ये वसाहती केल्या होत्या. अमेरिकेतली पहिली कायमस्वरूपी वसाहत ती म्हणजे १६०७ मधील इंग्रजांची -व्हर्जिनियामधील जेम्सटाऊन म्हणून. त्याआधीही अनेकदा अमेरिकेत या बाहेरील देशांतील एकट्यादुकट्या शिलेदारांनी वास्तव्य करायचा प्रयत्न केला होता. अमेरिकेत येण्याआधी इंग्रजांना, स्पॅनिश आणि डच लोकांना अमेरिकेची माहिती होती. ह्या "नव्या जगात" येण्यासाठी असलेली खुमखुमी असल्याने त्यांनी अनेकदा येथे येण्याचा प्रयत्न केला. त्यांना येथील स्थानिक लोकांची थोडीफार माहिती असावी, परंतु त्यांच्याशी जास्त संबंध आला नव्हता.

Colonies in USA 1600-1700

अमेरिकन इंडियन (नेटिव अमेरिकन) लोकांनी बांधलेल्या घरांपेक्षा नंतर आलेल्या या युरोपियन लोकांनी थोडी वेगळी घरे बांधली. त्यांची वास्तुकला ही त्यांच्या मूलस्थानांची आणि तत्कालिन परिस्थितीची द्योतक आहे. त्यांच्या पारंपारिक बांधणीचा विचार केल्याशिवाय घरे बांधण्याच्या नवीन पद्धती कशा विकसित होत गेल्या असतील हे कळणार नाही. इ. स. १६००-१७०० मधील अमेरिकेतील घरे कशी होती पाहण्याआधी इंग्लंडमधील घरे कशी होती ते थोडक्यात पाहू.

केल्टिक /अँग्लो सॅक्सन लोकांची मूळ घरे -(५०० ते १०६६)

अँग्लो सॅक्सन लोक हे मूळ जर्मन वंशाचे समजता येतील. त्यांच्या वसतीस्थानांची फारच थोडी माहिती आता उपलब्ध आहे. इ. स. १००० च्या आधी इंग्लंडमध्ये जर्मनी, हॉलंड, डेन्मार्क या भागातून स्थायिक झालेल्या सॅक्सन, अँग्लेस, जूटस ह्या लोकांची वस्ती होती. आज ग्रेट ब्रिटन आणि अमेरिकेत अनेक गावांना जी नावे असतात त्यांचा (उदा. हार्टफर्ड, स्टोनहम, बॉस्ट, हँपडेन इत्यादी) उगम या लोकांच्या मूळ भाषेत आहे. यातील पोटशब्दांचे मूळ अर्थ खालीलप्रमाणे सांगितले जातात (माहितीचा स्त्रोत : बीबीसी).

ford - नदी पार करण्याची पाणथळ जागा (river crossing)
ham - वसाहत (settlement)
den -टेकडी (hill)
ton - शेत / गाव (farm or village)
wic - शेत जमीनजुमला (farmstead)

अँग्लो-सॅक्सन लोकांचा धर्म हा सुरूवातीला ख्रिश्चन नव्हता, पण इंग्लंडवर नॉर्मन राजांनी कबजा करेपर्यंत ते ख्रिश्चन झाले होते. या काळात रोमन मिशनर्‍यांमुळे या मूळच्या पेगन संस्कृती (नैसर्गिक शक्तींचे उपासक) मधील लोकांचे ख्रिश्चन होण्याचे प्रमाण वाढले. नंतरच्या काळातील काही दगडी अथवा विटांच्या चर्चच्या इमारती सोडल्या, तर त्या काळातले एकुलते एक लाकडी चर्च इंग्लंडमध्ये शिल्लक आहे. आजमितीला काही चर्चच्या इमारती सोडल्या तर त्यांच्या घरांची कल्पना ही भग्नावशेषांवरूनच करता येते. त्यांची घरे काळाच्या ओघात शिल्लक राहिली नाहीत. चर्च आणि घरांच्या बांधणीतील मुख्य फरक म्हणजे चर्च दगडांची असत तर घरे लाकडी. चर्चची रचना ही रोममधील मिशनर्‍यांकडून इंग्लंडमध्ये आली असावी. घरे मात्र लाकडी असत. जंगलात मिळणारे ओक आणि पाईन हे वृक्ष वापरून ही घरे बनवलेली असत. या वृक्षांचे ओंडके कापायचे. यासाठी लागणारी हत्यारे वेगवेगळ्या प्रकारची असत. ते जमिनीत रोवून मग त्यांच्याभोवती लोकरीची वीण घालत. लाकडाच्या उंचीप्रमाणे या विणी दोन तीन पातळ्यांवर घातल्या जात. त्यानंतर त्यामधली जागा मातीच्या लेपाने शिंपली जायची. या मातीत गवत मिसळून माती एकत्र धरून ठेवण्याची क्षमता वाढवली जात असे. त्याचबरोबर शेणही मिसळले जाई. हा लेप थंडीपासून रक्षण करायलाही उपयोगी पडत असे. ह्या प्रकारच्या रचनेला (wattle and daub) असे म्हणतात. घराच्या मधोमध एक इतर खांबांपेक्षा उंच खांब रोवून त्याला केंद्रस्थानी ठेवून गवताचे छप्पर घातले जाई. घरांची थोड्याफार फरकाने हीच पद्धत सर्वत्र असे.

व्हायकिंग घरे -

नॉर्वे, स्वीडन आणि मुख्यत्वे डेन्मार्क येथील व्हायकिंग लोक ही एक हल्लेखोर आणि लढाऊ जमात होती. त्यांनी फ्रान्समधील ज्या भागात वसाहत केली त्याला नॉर्मंडी हे नाव पडले. त्यांना नॉर्समेन (किंवा नॉर्थमेन, उत्तरेकडून आलेले लोक) असे म्हणत. त्यांनी इंग्लडवर अनेक वेळा हल्ले केले. प्रत्येक वेळी हे हल्ले परतवून लावण्यात अल्फ्रेड द ग्रेट हा इंग्लंडमधील तत्कालिन सॅक्सन राजा सुरूवातीला पुरेसा पडला नाही. व्हायकिंग लोकांच्या सततच्या स्वार्यांकना गांजून अल्फ्रेडने व्हायकिंग राजांशी पाच वर्षांचा करार केला आणि परत व्हायकिंग जेव्हा आले तेव्हा त्यांना परतवून लावण्यात आणि डेनलॉ या लंडनजवळील भागापर्यंत त्यांना सीमित करण्यात ते यशस्वी झाले. त्यानंतरच्या काळात म्हणजे सुमारे १०१६-१०६६ च्या काळात मात्र व्हायकिंगना संपूर्ण इंग्लंड काबीज करण्यात यश मिळाले. व्हायकिंग लोकांची घरे म्हणजे आधीच्या भागात स्थानिक अमेरिकनांची पाहिली तशी लाँगहाऊस (लांबट घरे) प्रकारची, फारशी वेगळी अजिबात नाहीत. ५०-६० लोकही तेथे एकत्र राहत असत. पुढे व्हायकिंग आणि अँग्लो सॅक्सन लोकांची लग्ने झाली आणि त्यांच्या मिश्र संततीकडे सत्ता आली. याच काळात ख्रिश्चन चर्च सामर्थ्यवान होऊ लागले. त्यांना राज्यसत्तेत महत्त्वाची पदे मिळू लागली. पुढे व्हायकिंगना विल्यम ऑफ नॉर्मंडी (किंवा विल्यम द बास्टर्ड) या राजाने हरवले. त्यानंतर इंग्लंडवर फ्रेंच नॉर्मन राजांची सत्ता स्थापन झाली ती जवळजवळ ३०० वर्षे.

नॉर्मन घरे -
नॉर्मन राजवटीत ब्रिटिश राजसत्तेचा पाया घातला गेला. या काळात इंग्लंडमध्ये तीन भाषा बोलल्या जात: जुने इंग्लिश, फ्रेंच आणि लॅटिन. परंतु १२ व्या शतकात मूळ फ्रेंच भूमीशी असलेले संबंध कमी होऊन इंग्लंडात राष्ट्रवाद आणि भाषावाद बळावला. जरी राजे फ्रेंच वंशाचे असले तरी फ्रेंच भाषेचा वापर कमी होऊ लागला.. परंतु या काळात घडलेली मुख्य गोष्ट म्हणजे ख्रिश्चन धर्माचा पगडा वाढत गेला. मिशनर्‍यांच्या प्रभावामुळे अँग्लो सॅक्सन राजे आणि सामान्यजन ख्रिश्चन होऊ लागले. आणि त्यामुळे चर्चची वास्तुकला देखील झपाट्याने वाढू लागली. चर्च हे देवळांप्रमाणे लोकांचे एकत्र जमण्याचे ठिकाण. पण कॉन्स्टंटाईनच्या काळात ख्रिश्चन धर्म अधिकाधिक प्रबळ होत गेल्याने चर्चच्या इमारती पूर्वीच्या साध्या वास्तुकलेला टाळून इमारतीच्या भव्यतेने मनावर दडपण येईल अशा उंच, भव्य, दगडी आणि कुठूनही लगेच नजरेत भरतील अशी बांधण्याकडे कल वाढला होता. राजे आणि सरदार यांची घरे बहुतांशी दगडी आणि मोठी असत. या काळात सामान्य लोकांची घरे मात्र साधीसुधी, लहान आणि लाकडीच असत. त्या काळातील चर्चच्या किंवा मोठ्या सरदारांच्या घराच्या दगडी भिंती जाडजूड बांधल्या जात. जितकी जाड भिंत तितकी अधिक बळकट असा समज असावा. तसेच प्रचलित गोलाकार कमानींमुळे येणारे दाब सहन करायला आधाराच्या भिंतीही दणकट लागत.

ट्युडर घराणे (१४८५-१६०३)
१४५५ च्या सुमारास यॉर्क आणि लँकॅस्टर या दोन परगण्यातील वंश आपसात लढाई सुरू झाली, त्याला "वॉर ऑफ रोजेस" म्हणतात (दोन्ही घराणी प्लॅन्टाजेनेट या फ्रेंच घराण्याच्या शाखा होत्या). या लढाईचा शेवट दोन घराण्यातील उपवर मुलामुलींची म्हणजे लँकॅस्टरच्या ट्युडर घराण्यातील हेन्री ट्यूडर आणि यॉर्कची एलिझाबेथ यांचा विवाह करून झाला. हा हेन्री म्हनजे सातवा हेन्री. त्याचा मुलगा आठवा हेन्री, मेरी आणि पहिली एलिझाबेथ हे ट्युडर घराण्यातील मुख्य व्यक्तींच्या काळात इंग्लंडमध्ये धार्मिकदृष्ट्या मोठे बदल घडून आले. आठव्या हेन्रीने इंग्लंडच्या कॅथलिक चर्चचे महत्त्व संपवले आणि इंग्लंडच्या प्रोटेस्टंट चर्चची स्थापना केली. या सर्वाचे परिणाम नुसते इंग्लंडला बदलण्यात झाले नाहीत तर अमेरिकेत १६२० नंतर आलेल्या बर्‍याचशा लोकांच्या अमेरिकेत येण्यात या धार्मिक बदलांचा मोठा हात होता. एव्हाना सतत बदलत गेलेली इंग्लिश भाषा आता जनमानसात रूजली होती आणि महत्त्वाकांक्षा वाढली होती. त्यातच छापखाने उघडल्यामुळे साहित्यनिर्मिती वाढली. शेक्सपियर हा याच काळातील. त्यातच प्रतिस्पर्धी स्पेनने बाहेरच्या जगात घेतलेली वसाहती तयार करण्यात घेतलेली आघाडी इंग्लंडला सलायला लागली होती. एका बाजूला प्रचंड संपत्ती आणि दुसरीकडे खूप गरिबी, असे तत्कालिन इंग्लंडचे वर्णन केले जाते.
ट्युडर राजांच्या काळात श्रीमंतांच्या घरांना थोड्या थोड्या अंतराने लाकडाची सरळ उभी रचना आणि दोन लाकडांमधली जागा प्लास्टरने भरून बाहेरून दर्शनीय भागात डोळ्यात भरतील असे आकर्षक भौमितिक पॅटर्न असलेल्या भिंती तयार करण्याची पद्धत रूढ होऊ लागली होती.

Stokesay Castle -late 13th century

या चित्रात दिसणारी दगडावरील लाकडी बंदिस्त घराची रचना ही खास युरोपमधली विशेषतः फ्रान्स आणि जर्मनी येथील. दगडी बांधकाम सुरूवातीचे आणि लाकडी बांधकाम हे नंतरच्या काळातील असावे. गरीब आणि श्रीमंतांच्या राहणीमानात खूपच फरक होता. गरीब लोक अजूनही लाकूडमातीच्या घरांमध्येच राहत होते. त्यात काळानुरूप थोडाफार बदल झाला होता. घरे साधीच असत म्हणजे-"हॉल अँड पार्लर" या प्रकारची. मोठ्या खोलीला "हॉल" असे म्हणत आणि लहान खोलीस "पार्लर". तेव्हा खोल्यांचा वापर एकाच कामासाठी होत नसे. जिथे शेकोटी असे तिथेच स्वैपाक केला जाई. किंवा घराच्या मागे एक आडोसा करून स्वैपाक होई. झोपणे, खाणे, पाहुण्यांचे स्वागत अशा अनेक कामांना हॉलचा वापर केला जाई. पण या काळात इंग्लंडात लाकूड आणि दगड यांनी नेटक्या इमारती उभारणारे कारागीर तयार झाले. त्या काळातील बरेचसे लाकूडकाम हे खिळे ठोकून केले जात नसे. तर लाकूड तसेच कापले जाई. आणि कापताना ती लाकडे एकमेकांवर बसतील अशा आकाराच्या खाचा तयार करण्यात येत आणि तसेच लाकडी सांधे बनवले जात. त्यामुळे लाकूड कापणे हे काम अतिशय कौशल्याचे असे.

नवीन जग

पहिल्या एलिझाबेथ राणीच्या मृत्युनंतर गादीवर बसलेल्या पहिल्या जेम्स या इंग्लिश राजाने तेथील काही दर्यावर्दी लोकांना अमेरिकेत जाऊन सोने , आणि पूर्वेला जायची पाणवाट शोधून काढायची आज्ञा दिली. १०४ माणसांची एक तुकडी जेम्स नदीच्या तीरावर असलेल्या व्हर्जिनियामधील जेम्सटाऊन या चीपसाकी (बे) आखाताजवळच्या भागात जाऊन दाखल झाली. यातल्याच एकाच्या म्हणजे कॅप्टन जॉन स्मिथच्या अंगभूत धडाडीमुळे त्याला या वस्तीकरांचे नेतृत्व प्राप्त झाले. जेम्सटाऊनमध्ये इंग्लंडची पहिली कायमस्वरूपी वसाहत झाली. जेम्सटाऊन हे तसे दलदलीच्या प्रदेशात होते. त्यामुळे बरेचसे वसाहतकार लोक वेगवेगळ्या रोगांनी ग्रस्त झाले, त्यातच दुष्काळ पडला आणि त्यांना अन्न मिळेना त्यामुळे अनेक मरण पावले. त्या जमिनीत कुठचेही पीक येईना, मग पोकाहोंटासच्या नवर्‍याने म्हणजे जॉन राल्फने तंबाखू लावायला सुरूवात केली. त्यात त्याला बराच फायदा झाला. अशी तयार तंबाखू पाणवाटेने इंग्लंडला पाठवण्यात येऊ लागली. याची गंमत इतकी की लग्नाळू लोकांच्या भावी वधूंच्या प्रवासाचा मोबदला म्हणून तंबाखूच पाठवण्यात येऊ लागली!

या सर्व शेतांत काम करायला लागणारे लोक गरीब स्तरातून आलेले इंग्रज होते. त्यांना प्रवासाचा मोबदला देता येत नसे म्हणून काही वर्षे ते मालकांकडे विनामोबदला काम करीत आणि मग त्या देण्यातून मुक्त झाल्यावर त्यांना थोडी जमीन मिळत असे. यानंतर डचांनी पोर्तुगीजांकडून मिळवलेले आफ्रिकन वंशाचे लोक अन्नाच्या मोबदल्यात दिले आणि अशा तर्‍हेने इंग्रजांना शेतात काम करायला मजूर मिळाले. जेम्सटाऊनमधील दुसरा एक फारसा न चाललेला उद्योग म्हणजे काचनिर्मिती. इंग्लडमध्ये काचेला भट्ट्या लागत, त्यासाठी लाकूडफाटा, कोळसा कमी पडे, म्हणून व्हर्जिनियातील ही वसाहत त्यासाठी नेमस्त केली होती. त्यासाठी पुरेसे कुशल इंग्रज मनुष्यबळ नसल्याने डच लोकांना बोलावण्यात आले होते, तसेच इटालियन लोकांनाही आणण्याचे प्रयत्न झाले पण ते त्यांना झेपेनात. हळूहळू लोक जेम्सटाऊनमधून बाहेरच्या भागात वस्ती वाढू लागली. विल्यम्सबर्ग येथे ही वस्ती वाढू लागली. आणि जेम्सटाऊनची काही काळाने नंतर अगदीच दयनीय अवस्था झाली. तेथे पाच वेळा चर्च बांधल्याचे उल्लेख आहेत, घरे आणि काचेचे लहान कारखानेही बांधले असणार. चर्च जळून गेल्याचे उल्लेख आहेत, पण आता चर्चचे भग्नावशेष सोडले फारसे काही शिल्लक नाही. या वसाहतकारांनी बांधलेली घरे तेव्हाच्या सामान्य इंग्रज (किंवा अँग्लो सॅक्सन) पद्धतीची असावीत असा अंदाज आहे. दलदलीच्या जेम्सटाऊनमध्ये ती फारशी टिकली नाहीत.

स्मिथ १६०९ नंतर परत गेला, तो परत १६१४ मध्ये अमेरिकेच्या पूर्व भागात म्हणजे मेन आणि मॅसॅचुसेटसमधे आला. त्यानेच अमेरिकेच्या उत्तरपूर्वेकडील भागाला न्यू इंग्लंड हे नाव दिले. यानंतर १६२० मध्ये इंग्लंडमधून मेफ्लावर नावाचे ब्रिटनमधील लोकांना वाहून आणणारे जहाज अमेरिकेत आले. या जहाजावरील लोक हे इंग्लंडच्या राज्यसत्तेला नकोसे होते असे म्हटले जाते. इंग्लंडमधील चर्च हे ज्या लोकांना बंधनकारक वाटत असे ते सरळ अमेरिकेत न येता प्रथम जवळच्या हॉलंडमध्ये गेले. जवळजवळ बाराएक वर्षे तेथे काढूनही मुलाबाळांना वाढवण्यासाठी मनासारखे धार्मिक स्वातंत्र्य मिळत नसल्याने आणि पुढचा सुबत्तेचा मार्ग दिसत नसल्याने ते परत इंग्लंडला आले असे म्हटले जाते. इंग्लंडमध्ये आल्यानंतर इतर समविचारी लोकांबरोबर इंग्लंड सोडून यातील अनेकांनी अमेरिकेचा रस्ता धरला. ते फारसे श्रीमंत किंवा शिकलेलेही नसावेत. इंग्लंडमधील कमतरतेला कंटाळून "नव्या जगात" जमीन मिळवण्याच्या दृष्टीने ते आले होते. त्यांना इथे येण्यासाठी पैसे हे इंग्लंडमधील श्रीमंत लोकांनी द्यावे, त्यांनी मासेमारी करून (कॉड मासे) ते मासे मागे इंग्लंडमध्ये पाठवावेत, आणि नव्या जगात मिळणार्‍या जमिनीच्या बदल्यात सात वर्षे त्यांनी इंग्लंडच्या कंपनीत काम करावी असा बेत होता. यात नंतर अनेक कारणांनी बदल घडत गेले.

Comments

वा

वा अगदी जुन्या इंग्लंडचा प्रवास घडवून आणलात.
अतिशय सुरेख इतिहास उलगडलात. खुप दिवसांपासून इंग्लंड विषयी ही माहीती वाचायची होती पण वेळ मिळत नव्हता किंवा जमून येत नव्हते. अशी ती अवचितपणे हाताला लागली यामुळे अतिशय आनंद झाला आहे.
बाकी सोळाव्या शतकात इंग्रजांना लाकूडकामही जमत नव्हते हे वाचून गंमत वाटली. त्यामानाने भारतीय उपखंड व पुर्वे कडील देश चांगलेच पुढारलेले होते. (पुढे प्रगती म्हनजे काय याची कल्पनाच बदलल्याने हे मागास 'वाटू' लागले ही गोष्ट वेगळी!)
अमेरिकेविषयी अनेक कल्पना प्रचलित आहेत. भारतीयांना या खंडाची चांगलीच माहीती होती असा (प . वि. वर्तका बरोबरच) माझाही समज आहे. मात्र भारतीयांनी अमेरिकेशी व्यापार केला त्यांच्या कत्तली नाही! तसेच इंडोनेशियाच्या लोकांचा मजापहीत घराण्याच्या आधी पासून आफ्रिकेशी व्यापार होता. त्यांनाही कदाचित या खंडाची कल्पना असावी.

आपला
गुंडोपंत

छान माहिती..

१६२० साली पिल्ग्रिमसना घेऊन येणारे मेफ्लॉवर हेच ब्रिटिशांना अमेरिकेत आणणारे पहिले जहाज हा समज दूर झाला!

तुम्हीच म्हणाल्याप्रमाणे या लेखात घरांच्या इतिहासापेक्षा माणसांचा इतिहास जास्त आहे. काही बिघडत नाही. तोदेखील पूरक आणि रोचकच आहे!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

खरच् छान माहीती

स्थापत्य, इतिहास, भुगोल, ओळख-माहीती ह्या विषयांची मस्त गुंफूण केली आहे.

अवांतर - ट्रवेल/डिस्कव्हरी वाहीनीवर "अमेझिंग व्हेकेशन होम्स्" कार्यक्रम कोणी बघता का? सही आहे ना?

मस्त लेख !

स्थापत्य, इतिहास, भुगोल, ओळख-माहीती ह्या विषयांची मस्त गुंफूण केली आहे.

हेच म्हणतो, त्याचबरोबर हे लेखन करण्यासाठी आपण जी विविध माहिती एकत्र केली असेल आणि त्यानंतर अमेरिकन घरे, इंग्लंडमधील घरे यांच्यातला फरक सांगतांना त्याचा इतिहास,संस्कृती, भाषेतून व्यक्त होणारी त्या गावांची नावे, घरे, वास्तूकला, त्याची स्पष्टीकरणे फारच अभ्यासपूर्ण आणि मेहनतीने केलेले लेखन आहे, संग्रह करावे असे लेख आहेत, लेखन खूपच आवडले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आभार

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

अरे वा!

चित्राताई
आपण आधीच 'पश्ट' केल्याप्रमाणे स्थापत्यापेक्षा इतिहासाकडे झुकणारा असला तरी लेख अतिशय रोचक असल्याने खूप आवडला. पहिले दोन भाग लगेच आल्याने तिसर्‍या भागाची वाट पहातच होतो. :)

आता चौथ्या भागात या इतिहासाचा नवीन घरांच्या जडणघडणीवर कसा परिणाम झाला हे सचित्र समजता आला तर बहार येईल.. :)

बाकी पहिलं चित्र (टिकलचे अवशेष) हे ते दक्षिण अमेरिकेतील पिरॅमिडस का? (नवीन सात आश्चर्यांच्या शर्यतीतही होते.)

-ऋषिकेश

सर्वांचे आभार

बाकी सोळाव्या शतकात इंग्रजांना लाकूडकामही जमत नव्हते हे वाचून गंमत वाटली.

लाकूडकाम जमत नव्हते असे नाही, पण ते कसे जोडावे याच्या त्यांच्या कल्पना वेगळ्या होत्या. लाकूडकामात त्यांनी नंतर चांगली प्रगती केली. भारतात तर ते लाकडाच्या वखारीच चालवत होते असे ऐकले आहे.

त्यामानाने भारतीय उपखंड व पुर्वे कडील देश चांगलेच पुढारलेले होते.
एका अर्थी खरे आहे. भाषा, कला याबाबतीत भारत तरी खूपच आघाडीवर असावा. यामुळेच तर भारताकडे बाहेरच्या लोकांचे लक्ष गेले.

पहिलं चित्र (टिकलचे अवशेष) हे ते दक्षिण अमेरिकेतील पिरॅमिडस का?
होय. पण त्यावर देऊळ असे. सूर्य ही मुख्य देवता असल्याने सूर्याच्या जितके जवळ देऊळ बांधता येईल तितके चांगले असे वाचले.

अमेझिंग व्हेकेशन होम्स बघितले नाही आहे. :-)

लेख वाचणार्‍या सर्वांचेच आभार.

असो.

वा!

लेख उशिरा वाचला. इंग्लंडचा इतिहास सुरेख मांडला आहे. बर्‍याच गोष्टी नव्याने कळल्या, उदा. इंग्लंडमध्ये पूर्वी फ्रेंच बोलले जात असे.
मला सध्याच्या इंग्लंडमधली छोटी छोटी सुबक घरे आणि त्याभोवतालच्या छोट्याश्या बागा (किंवा बरेचदा फक्त फुलांच्या कुंड्या) फारच आवडतात. सगळे कसे नीटनेटके गोष्टीत असल्यासारखे असते.

Gold Hill Cottages, Shaftesbury, England
Gold Hill Cottages, Shaftesbury, England

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

सुखी माणसाचा सदरा..

मला सध्याच्या इंग्लंडमधली छोटी छोटी सुबक घरे आणि त्याभोवतालच्या छोट्याश्या बागा (किंवा बरेचदा फक्त फुलांच्या कुंड्या) फारच आवडतात. सगळे कसे नीटनेटके गोष्टीत असल्यासारखे असते.

असे म्हणतात - अमेरीकन नोकरी, ब्रिटिश घर, भारतीय जेवण आणि जपानी बायको, हे असल्यावर दुसरे काऽऽही नको!!!!

(अर्धवट सुखी) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विनोद

यावर एक विनोद ऐकला होता.
दु:खी माणसाचा सदरा म्हणजे अमेरिकन बायको, ब्रिटीश जेवण, जपानी नोकरी आणि भारतीय घर (चौथ्याबद्दल शंका आहे, नक्की आठवत नाही.)

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

भारतीय नोकरी

दु:खी माणसाचा सदरा म्हणजे अमेरिकन बायको, ब्रिटीश जेवण, भारतीय नोकरी आणि जपानी घर (कारण जपानमधली विशेषतः शहरातील घरे अतिशय लहान असतात. एक उदा. सांगायचे तर ओळखीचा एक मनुष्य घराचा वापर फक्त कपडे ठेवणे आणि झोपण्यासाठी करे कारण तेवढीच जागा होती घरात. बाकीचे सर्व ऑफिसात.)

असो. भारतीय नोकरी मात्र आता दु:खद गोष्ट उरलेली नाही.

सुंदर

छायाचित्र सुरेख. टुमदार घरे काय ते बघून कळते. याच्यात डावीकडे खाली जे पांढर्‍या रंगाचे घर आहे ती रचना खास जुन्या इंग्लंडमधली.

लेख उत्तम आहे

लेख घाईत वाचला, माहितीपूर्ण आणि काळजीपूर्वक लिहिलेला आहे. :-( अतिशय लक्षपूर्वक वाचण्यासारखा आहे. सवडीने पुन्हा वाचन करेनच. इतकी सर्व माहिती मिळवल्याचे कौतुक वाटले. असे लेख वाचायला फार आवडतात. चित्राचे अभिनंदन!

फरक घरांच्या अंतर्भागातील

इंग्लंड आणि अमेरिकेतील घरांमध्ये मला आढळलेले (जाणवलेले) फरक हे असे -

स्वयंपाकघर - इंग्लंडमध्ये स्वयंपाकाची खोलीला स्वतंत्र खोलीचा मान आहे (भारताप्रमाणे). अमेरिकेत मात्र स्वयंपाकाची जागा ही दिवाणखान्याचा विस्तारीत भाग असल्यासारखी वाटते!

तसे पाहिले तर ब्रिटिश जेवण हे काही खास नाही, विशेषतः चॅनलपलिकडील फ्रान्सच्या तुलनेत. पण तरीही स्वतंत्र खोलीचा मान देऊन त्यांनी जेवणाला थोडेफार "प्रतिष्ठित" तरी केले आहे. घरच्या जेवणाकडे पाहण्याची अमेरिकन मानसिकता त्यांच्या स्वयंपाकाच्या जागेवरून दिसून येते, नाही?

पडदे - अमेरिकेत वेनिशियन ब्लाइन्ड्सचा सुळसुळाट दिसतो. याउलट इंग्लंडमधील खिडक्यांना दुहेरी पडदे असतात. आतील पडदे हे खोलीच्या इतर रंगसंगतीशी मिळतेजुळते तर बाहेरील पडदे बहुतांशी पांढरे आणि जाळीदार. त्यामुळे कुठल्याही इमारतीकडे बाहेरून पाहिल्यास एक सुरेख symmetry दिसते.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अवांतर

आतील पडदे हे खोलीच्या इतर रंगसंगतीशी मिळतेजुळते तर बाहेरील पडदे बहुतांशी पांढरे आणि जाळीदार.

यामुळे पडदे सुंदर तर दिसतातच त्याच बरोबर बाहेरील उन, पाउस यांचा पडद्याच्या रंगावर, कापडावर कमी परिणाम होतो व पडदे अधिक टिकतात. याच कारणाने भारतातही असे दुहेरी पडदे लावणे चांगले.

स्वयंपाकाची खोली

इंग्लंडमध्ये स्वयंपाकाची खोलीला स्वतंत्र खोलीचा मान आहे (भारताप्रमाणे). अमेरिकेत मात्र स्वयंपाकाची जागा ही दिवाणखान्याचा विस्तारीत भाग असल्यासारखी वाटते!

माझ्यापुरते सांगायचे तर मला स्वयंपाकाची खोली काहीशी अमेरिकन पद्धतीची आवडते, जिथे स्वैपाक करता करता गृहिणीला इतरांशी बोलता येते आणि इतरांचा सहभाग (किंवा लुडबुडही) असते.

ब्रिटिशांच्याही काळात जेव्हा परवडत नव्हते तेव्हा स्वयंपाकघर इतर कामकाजासाठीही वापरले जात असे.

अमेरिकेतील स्वयंपाकघर

दिवाणखान्याला जोडून असणारे स्वयंपाकघर मलाही आवडते. निदान 'काय बाई जळ्ळा जन्म बायकांचा! दिवसभर स्वयंपाकघरात रांधा, वाढा, उष्टी काढा!' असं म्हणायची वेळ तरी येत नाही. ;-) ह. घ्या.

चित्राने दिलेल्या कारणाशी सहमत. काम करता करता गप्पा मारणे, पोळ्या लाटताना पोरांचा अभ्यास घेणे, फोडणी टाकताना मध्येच टिव्हीवर काय चालले आहे ते पाहणे अशा अनेक गोष्टी अमेरिकन स्वयंपाकघरातून करता येतात.

छान

लेख आवडला. शहरांच्या नावामागील प्रत्ययांचा अर्थ नव्यानेच समजला. शेवटच्या परिच्छेदातील इंग्लंड - नेदरलँड्स - अमेरिका हा प्रवास रोचक वाटला.

[अवांतर -- हे कदाचित फारच बादरायण संबंधासारखे वाटेल. पण इंग्लंडमध चर्चला नको असलेले लोक नेदरलँड्सला गेले आणि गुन्हेगारांना ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आले. आता या तीन देशांच्या आणि अमेरिकेतील शहरांच्या जुन्या-नव्या नावांविषयी पाहू. झीलंड हा नेदरलँड्समधला एक प्रांत. त्याच्यावरुनच न्यू झीलंडला त्याचे नाव मिळाले. तर ऑस्ट्रेलियाचे नाव ब्रिटिशांनी बदलेपर्यंत न्यू नेदरलँड्स होते. सीऍटलचे पूर्वीचे नाव जरी न्यूयॉर्क असले, तरी न्यूयॉर्कचे मूळ नाव/गाव 'न्यू ऍमस्टरडॅम' होते. (याचा अर्थ नेदरलँड्सकडे कायमच इंग्लंडने नको असलेले लोक पाठवण्याचा प्रदेश असे कळत/नकळत पाहिले आणि नव्या जगातील अशा - नकोशा लोकांनी वस्ती केलेल्या जागांना नावे देतानाही तोच विचार जाणता/अजाणता केला गेला असेल का?). कृपया याला केवळ एक तर्क म्हणून किंवा सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न म्हणून सोडून द्यावे. यातून कुठलीही थिअरी मांडण्याचा हेतू नाही. विषयांतराबद्दल क्षमस्व.]

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)

नसावे

सीऍटलचे पूर्वीचे नाव जरी न्यूयॉर्क असले, तरी न्यूयॉर्कचे मूळ नाव/गाव 'न्यू ऍमस्टरडॅम' होते.
न्यूयॉर्क ही मुळात डच (हॉलंडमधील लोकांची) वसाहत होती त्यामुळे नाव न्यू ऍमस्टरडॅम असावे.

नेदरलँड्सकडे कायमच इंग्लंडने नको असलेले लोक पाठवण्याचा प्रदेश असे कळत/नकळत पाहिले

असे म्हणणे कदाचित बरोबर होणार नाही कारण माझ्या माहितीप्रमाणे पिलग्रिम स्वतः तेथे गेले होते - तेथे उद्योग मिळेल या आशेने तसेच हॉलंडमध्ये धार्मिक आचारस्वातंत्र्य अधिक मिळेल अशा समजुतीने.

कृपया याला केवळ एक तर्क म्हणून किंवा सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न म्हणून सोडून द्यावे. यातून कुठलीही थिअरी मांडण्याचा हेतू नाही. विषयांतराबद्दल क्षमस्व
एवढे दिलगीर होण्याचे काही कारण नाही. मात्र हे विषयांतर म्हणत असाल तर तुम्ही विषयांतरातले तज्ञ नाही :-)

 
^ वर