गेल्या शतकांतील अमेरिकन घरे - २

सुरुवातीला:
अमेरिकन घरांबद्दलचा पुढचा लेख पिलग्रम लोकांवरून लिहीण्याचा बेत होता, पण तेवढ्यात नंदन यांच्या व्यक्तिगत निरोपातून त्यांनी मला त्यांनी स्वतः काढलेली कोलोरॅडोतील एका नेटिव अमेरिकन जमातीच्या घरांची सुंदर छायाचित्रे पाठवली आणि त्यावर लिहील्यास छायाचित्रे वापरू देण्याची ऑफर दिली. अशी संधी वाया दवडणे हा वेडेपणा झाला असता.. त्यामुळे हा लेख त्यावर. पण लेख लिहायला घेतला आणि लक्षात आले की ही माहिती केवळ मंत्रमुग्ध करणारी आहे आणि विषयाचा आवाकाही अतिशय मोठा आहे - यातील अनासाझी लोकांची घरे म्हणजे खरे तर गेल्या शतकांतील म्हणजे चार पाच शतके पूर्वीची नुसती नाहीत, तर त्याच्याही आधीची आहेत. त्यामुळे खरे तर एक अजूनच स्वतंत्र लेख त्यावर होऊ शकतो पण तो आत्ता तरी शक्य नाही.

छायाचित्रे अर्थातच नंदनकडून घेतलेली आणि जालावरील काही ठिकाणाहून लावलेली.

नॅवाहोंची होगन घरे :

नॅवाहो जमातीला अनेक वर्षांचा इतिहास आणि परंपरा आहेत. अमेरिकेतील यूटा, अरिझोना आणि न्यू मेक्सिको येथे राहणारी ही जमात स्वतःला "दिने" म्हणवून घेते. त्यांच्यात प्राचीन जगाविषयीच्या मन रमवून टाकतील अशा अनेक अद्भुतरम्य कथा प्रचलित आहेत. त्यात बोलके देव आहेत, चार जगे आहेत, प्राचीन प्रार्थना आहेत ज्या दिवसाच्या एका विशिष्ट वेळीच म्हणता येतात. त्यांच्यातील प्रचलित कथांमधली एक अशी की ते या जगात प्रवेश करण्याआधी तीन जगांत राहत होते. तेथे भांडणे झाल्यामुळे त्यांना या चौथ्या जगात पाठवले आहे. त्यांची अशी समजूत आहे की या भागात चार दिशांना जे चार डोंगर (Mt. Blanca -east, Mt. Taylor- south, San Francisco Peaks -west, and Mt. Hesperus -north) आहेत त्यांच्या मर्यादेत त्यांनी कायम रहायला पाहिजे. त्यांना धर्म असा नाहीच, पण एकप्रकारे त्यांचा धर्म हा त्यांच्या या नॅवाहो चालिरीतीच आहेत. त्यांना भुईला आई, आकाशाला पिता मानण्याची शिकवण आहे. या जगात सर्वाचा समतोल राखला जावा ही जबाबदारी ते मानतात, आणि त्यासाठी झटतात.

पूर्णत्वे निसर्गाशी तादाम्य पावलेली ही जमात घरेही तशाच ढंगाची बांधते. सूर्य पूर्वेला उगवतो म्हणून होगन पद्धतीची घरांची दारे पूर्वेला असतात. गंमत म्हणजे घरे दोन प्रकारची असतात - पुरुष आणि स्त्री. स्त्री-पुरुषांच्या स्वभावातील नैसर्गिक विरोध या घरांच्या रचनेत आढळतो. पुरुष घरे लहान, त्यांत रहायचे नसून कामकाजासाठी वापरायचे असते. लाकडाचे पाच खांब एकमेकांना जोडून त्यांच्यामधील जागा मातीने भरीव करून भिंती तयार केल्या जातात. यालाच जोडून काहीसा स्वागताचा कक्ष केला जातो. स्त्री घर हे मोठे, काहीसे गोल आणि जेथे कुटुंब राहील असे बांधलेले असते. या घराचे छप्पर वैशिष्ट्यपूर्ण आहे - ते सीडर वृक्षाच्या लाकडाच्या दणकट ओंडक्यांपासून बनवलेले असते.

सीडर वृक्षाचे ओंडके

छपरातील लॉग्ज हे विविध स्तरात बसवलेले असतात. पहिल्याने बाहेरच्या वर्तुळाच्या परिघाला अनेक लहान कॉर्डस मधे विभागून त्यावर एकेक लाकडाचा लॉग रचलेला असतो. हे बाहेरचे वर्तुळ पूर्ण झाले की त्यातील कॉर्डचा आधारासारखा वापर करून अजून एक जरा लहान आकाराचे वर्तुळ. असे करीत ही छपराची बांधणी पूर्ण होई. छपरात एक लहानसे भोकही ** ठेवण्यात येई. हे झाले की परत सर्वावर मातीचे लेपन. ही रचना त्यांना त्यांच्या "बोलक्या" देवाने सांगितली अशी समजूत आहे.

पुरूष होगन (छायाचित्रे:worldexperience.com)
male hogan
स्त्री होगन घर : छायाचित्रे आणि अधिकार : नंदन
पुरुष घराची बांधणी
स्त्री घराच्या छपराची रचना
गेल्या शतकातील लाकडी होगन घरे (photograph reference: wikimedia)

अनासाझी लोकांची वैविध्यपूर्ण घरे:
सुमारे हजार वर्षांपूर्वी अमेरिकेतील कोलोरॅडोच्या पठारी भागात अनासझी नावाचे प्राचीन लोक राहत असत. अनेक वर्षे त्यांची या भागात वस्ती होती. त्या काळाच्या मानाने त्यांचे व्यवहार प्रगत आणि राज्य चहूदिशांना पसरलेले होते. कोलोरॅडोचा हा भाग अत्यंत विषम तापमानाचा. उन्हाळ्यात कडक ऊन तर थंडीत बर्फ. शिवाय कडेकपारींचा. रखरखीत, आणि एकट्या दुकट्या डोंगराळ प्रदेशातला. पण या रहाण्यासाठी अत्यंत कटकटीच्या भागात ही संस्कृती वाढत होती. त्यांच्या कलेची साक्ष त्यांनी तयार केलेल्या मातीच्या सुरेख भांड्यांमधून मिळते.

अनासाझींची मातीची भांडी

मेसा वर्डे येथील राष्ट्रीय उद्यानात त्यांच्या त्या प्राचीन वस्तीचे अवशेष आहेत त्यावरून त्यांचे घरे बांधण्यातील कसब आणि चिकाटी दिसून येते. नेवाहो लोकांचे ते शत्रू असावेत कारण त्यांना बहाल झालेले "अनासाझी" हे नाव नॅवाहो भाषेतील " प्राचीन शत्रू" या अर्थाचे आहे. त्यांच्या कोलोरॅडोतील वसतीस्थानाचे अवशेष आज जतन केलेले आहेत.

त्यात काही जमिनीत खड्डा खणून बांधलेली घरे आहेत. हा खड्डा नंतर फांद्यांनी शाकारला जायचा. या पद्धतीने घरे बांधल्यामुळे तीव्र उन्हापासून रक्षण होत असेल.

खड्ड्यातील घरे (पिटहाउसेस) - छायाचित्रे आणि त्यांचे अधिकार: नंदन

ही प्राथमिक स्वरूपाची घरे नंतर घरे उभारण्यातील कल्पना, कसब आणि साधने मिळत गेली तशी जमिनीवरच्या घरात रूपांतरित होत गेली असावी. जशी वस्ती वाढत गेली तशी पठारी भागावर (मेसा = टेबल) भिंती उभ्या करून स्थानिक सँडस्टोनपासून बनवली गेली असावीत. हीच वस्ती नंतर हळूहळू कडेकपारीत रहायला लागलेली दिसते. ह्या वस्तीला क्लिफ ड्वेलिंग्ज (कड्यावरची घरे) म्हणतात. कदाचित वेगवेगळी संकटे, प्राणी, किंवा आक्रमणे यांचा सामना करण्यासाठी अशा जागेचा विचार झाला असावा. अशा ठिकाणी घरे बांधल्यामुळे तीव्र उन्हापासून संरक्षण हाही एक उद्देश साध्य होत असावा.

मेसा वर्ड येथील भूस्तर (छायाचित्रः यूएसजीएस)

यातील सर्वात वरील स्तर हा सँडस्टोन या बांधकामासाठी उपयुक्त दगडाचा. सँडस्टोन हा पूर्वीचे दगड झिजून झालेली वाळू दाबली जाऊन नवीनच तयार झालेला अनेकस्तरीय दगड. त्यामुळे सुंदर रंगाचा आणि कापायला योग्य. ह्या दगडाचा वापर करून एक शहरच या पुरातन लोकांनी या पठारी प्रदेशात वसवले होते. ह्या घरांची रचना पाहिल्यास तेव्हाच्या गवंड्यांचे कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. भिंतींसाठी कापलेल्या दगडाच्या लाद्या फारशा सरळसोट नाहीत पण जी काही रचना दिसते ती भौमितिक आणि सुबक आहे. सुरूवातीस भिंती दगडी चपटी लाद्यांवर मातीचे थर बसवून नंतरचा लाद्यांचा थर देणे अशा सोप्या पद्धतीने तयार केल्या गेलेल्या आढळतात. नंतर मात्र या कारागिरांचे कसब बाढत गेल्याचे आढळते. काही काळाने तुटक्या दगडांच्या थराच्या दोन्ही बाजूला पृष्ठभागी कापलेल्या दगडी लाद्या आणि त्यावर मातीचे लेपन अशी सँडविच म्हणता येईल अशी रचना स्विकारल्याचे नंतरच्या अवशेषांतून कळते.

पठारावरील घरांचे अवशेष
मेसा वर्डे येथील कड्यावरची घरे, छायाचित्रे आणि अधिकार :नंदन
मेसा वर्डे येथील कड्यावरची घरे

किवा हा त्यांच्या धार्मिक किंवा तत्सम विधींसाठी बांधलेला एक चर असावा. येथील बसायला दगडी बाक, जमिनीत खणलेला खड्डा हे या गोष्टीला अनुमोदन देतात. येथे एक सूर्यमंदिरही आहे.

किवा, छायाचित्रे आणि अधिकार :नंदन
सूर्यमंदिर -छायाचित्रे आणि अधिकार :नंदन

पण चांगल्या सुरू असलेल्या नाटकाला अनपेक्षित कलाटणी मिळावी तसे काहीतरी अकल्पित घडले - एकतर दुष्काळ किंवा युद्ध - पण हे लोक कोलोरॅडोतील हा भाग सोडून निघून गेले ते कायमचेच. ते तेथून जवळच्या अमेरिकेच्या पश्चिमेकडील राज्यांत म्हणजे यूटा, न्यू मेक्सिको आणि अरिझोना येथे विखुरले. तेथे राहणार्‍या इतर जमातींमध्ये ते मिसळून गेले आणि नंतर त्यांच्यापासून वेब्लो, होपी, झूनी या जमाती तयार झाल्या. वेब्लो लोकांनी बांधलेली अडोबी (चिकणमाती + गवतसदृश एकत्र करून उन्हात भाजून तयार केलेले बांधकाम साहित्य) पद्धतीच्या विटांची घरे अजूनही अनासाझींच्या त्यावेळच्या घरांची वैशिष्ट्ये जपून आहेत.

वेब्लो पद्धतीची आधुनिक घरे, छायाचित्रे: about.com

-------------
** छपरातील भोकावरून नंदन यांची मजेदार टिपणी त्यांच्याच शब्दांत :
"छपरात ठेवण्यात येणारे भोक मनोरंजक आहे. थोडं अवांतर होईल, पण यावरून आठवलं - डॅलसच्या फूटबॉल स्टेडियमची रचनाही अशीच आहे (फूटबॉल स्टेडियम च्या आकाराचा छोटा आयताकृती भाग छतात उघडा ठेवला आहे. 'अमेरिकाज टीम' असल्याने देवाची त्यांच्यावर दृष्टी रहावी म्हणून हा खटाटोप. अगदी १ बिलियन डॉलर्स खर्चून बांधण्यात येणार्‍या नवीन स्टेडियममध्येही छतात एक छोटासा आयताकृती भाग मोकळा ठेवला आहे. दुवा -- "

Comments

छान उपक्रम

चित्रा ताई,

छान उपक्रम हाती घेतला आहे. दोन्ही भाग माहितीपूर्ण असून मांडणी खूप आकर्षक केल्याने वाचायला, समजायला, पचायला फारच हलके फुलके अन मनोरंजक झालेले आहेत.

आपला,
(गृहस्थ) भास्कर
आम्ही येथे वसतो.

वा

वा! मस्त जमलाय हा लेख.
अर्थातच नंदन यांच्या कडेही अशी बरीच माहिती असणार असे आता कळून चुकले आहे. :)
आम्ही हा लेख आपल्या मुळ लेखाला अडिशन असे समजतो आहोत.
असो,
नेवाहो जमातीची माहिती अतिशय आवडली.
आपण फक्त घरांचीच माहिती नाही तर खर्‍या अमेरिकेचीही ओळख करून देत आहात असे जाणवते आहे.
या वेगळ्या विषयावर कधी वाचायलाही मिळाले नाही.

ही ऑफिसवाली घरे बांधून तेथे काय व्यवहार होत असतील असाही प्रश्न पडला आहे?
तसेच हे संस्कृती का विनाश पावली याची काही कारणे सापडली नाहीत का? शिवाय या सर्वांचा काळ आपण साधारण पणे २००० वर्षाच्या आतला म्हणत आहात.
तो का?
(माझ प्रश्न आला आहे कारण, बरेचदा पाश्चात्य इतिहास लेखक/माध्यमे, ख्रिस्ता आधी जग नव्हतेच असा काहीसा सूर आळवतांना दिसतात म्हणून...)
ही संस्कृती त्या आधीचीही असु शकते असा संशय आलाच आहे मला... ;)

आपला
गुंडोपंत वर्तक दिने

(भारताचा अमेरिका खंडाशी समुद्रमार्गे संबंध सुमारे २००० वर्षांपासून होता अशी रोचक माहीती माझ्याकडे आहे. पण पुरावे कितपत ग्राह्य धरता येतील अशी शंका आहे म्हणून दावा करत नाही.)

उत्तरे

नंदन यांच्या कडेही अशी बरीच माहिती असणार असे आता कळून चुकले आहे. :)

असणार, असणार! त्यांच्या पोतडीत अजूनही बर्‍याच रम्य गोष्टी असतील असा माझाही अंदाज आहे.. :-)

ऑफिसवाली घरे बांधून तेथे काय व्यवहार होत असतील असाही प्रश्न पडला आहे?

म्हणजे पुरुष होगन घरे म्हणायचे आहे का? ते व्यवहार म्हणजे धार्मिक विधी, आलेल्या पाहुण्याचे स्वागत.
कधीतरी पुरुष घरे म्हणून काही (नको असलेल्या) पाहुण्यांचे "खास" स्वागतही होत असेल हा अंदाज! :-) कृपया लाईटली घेणे.

संस्कृती का विनाश पावली याची काही कारणे सापडली नाहीत का? शिवाय या सर्वांचा काळ आपण साधारण पणे २००० वर्षाच्या आतला म्हणत आहात.

संस्कृती विनाश पावली नाही, पण लोक परागंदा झाले. कारणे अनेक असावीत. दुष्काळ, परकीय आक्रमण अशी कारणे असतील, कसलेही डोक्युमेंटेशन नसल्याने नक्की काय ते कळणार नाही. शिवाय कदाचित इतरत्र संधी अधिक उपलब्ध झाल्या असतील. कदाचित अंतर्गत कलहही असतील हा एक (माझा) तर्क. पण हे सर्व लोक येथून निघून गेले ते कायमचेच, परत आले नाहीत.

पाश्चात्य इतिहास लेखक/माध्यमे, ख्रिस्ता आधी जग नव्हतेच असा काहीसा सूर आळवतांना दिसतात म्हणून...)
ही संस्कृती त्या आधीचीही असु शकते असा संशय आलाच आहे मला... ;)

माझा पुरातत्वशास्त्राचा काही अभ्यास नाही, आणि हा कालखंड निश्चित काय होता हे मलापण माहिती नाही. कोणी तशी माहिती मिळवायचा प्रयत्न केल्यास ती मिळू शकेल. पण कोणत्याही लोकांच्या कालखंडाचे निश्चितीकरण (डेटिंग) हे एखाद्या ठिकाणी सापडलेल्या अवशेषांचे शास्त्रीय पद्धतींनी विश्लेषण करून करता येते. ( कार्बन डेटिंग, ट्री रिंग्ज डेटिंग इत्यादी). अर्थात सर्व शास्त्रज्ञांचे सर्व संशोधन हे किल्मिषविरहित असते असे नाही, त्यात स्वतःचे, स्वतःच्या समाजाचे आणि सत्तेचे स्वार्थ असतात. त्यामुळे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की हे असे निर्णय जसेच्या तसे स्विकारण्याआधी त्याच्या उगमाची नीट छाननी करावी. पण मला या लेखासाठी हे वेळेअभावी शक्य नव्हते.

भारताचा अमेरिका खंडाशी समुद्रमार्गे संबंध सुमारे २००० वर्षांपासून होता अशी रोचक माहीती माझ्याकडे आहे.
मग लिहा... आम्ही वाचू की!

गुंडोपंत वर्तक यांस, ;-)

भारताचा अमेरिका खंडाशी समुद्रमार्गे संबंध सुमारे २००० वर्षांपासून होता अशी रोचक माहीती माझ्याकडे आहे.

भारताचा नव्हे पण आशिया खंडाचा अवश्य अमेरिका खंडाशी संबंध होता. नेमका कसा ते बहुधा अद्यापही ज्ञात नाही पण दोन शक्यता मांडल्या जातात. त्यातून

१.सुमारे ३५,००० वर्षांपूर्वी अलास्काचा भाग जो सायबेरियाशी जोडलेला होता तेथून भटक्या जमाती अमेरिका खंडात उतरल्या.
२. प्रशांत महासागरातून समुद्रमार्गे आशियातून सुमारे १७-१८,००० वर्षांपूर्वी या जमाती अमेरिकेत आल्या.

पुरावे कितपत ग्राह्य धरता येतील अशी शंका आहे म्हणून दावा करत नाही.

भारताशी संबंध असणारे पुरावे ठोस नसतील तर जाहीर करू नका, हव्यास तपासून घ्या! ;-) तोंडघशी पडण्याचा संभव जास्त आहे.

अमेरिकेत मूळ रहिवाश्यांच्या किती जमाती आहेत त्यांची यादी येथे पाहून घ्या. यांतील ऍमेझॉनच्या जंगलात राहणार्‍या यानोमामोंबद्दल (काय मस्त नाव आहे नाही!) एक कादंबरी मध्यंतरी वाचली होती.

हेच तर!

हेच तर!

सगळे आदिवासी हे 'मुळात' हिंदु आहेत! ;))
फक्त प्रश्न असा आहे की,
पण हे नवीन जगाला कसे सांगणार?
आदिवासींना तर ते माहीतच नाही.
नि ज्यांना माहित आहे त्यांना अमेरिकेत जाण्याची घाई झाली आहे.

आपला
गुंडोपंत वर्तक यानोमोमो

पाताळ...

वर्तकांच्या म्हणण्याप्रमाणे अमेरिका (विशेष करून द. अमेरिका) या भागालाच आपण् "पाताळ" असे म्हणतो. मय राक्षसाच्या "मायन संस्क्रूती" चे अवशेष आजही मेक्सिकोत आहेत पेरूला दिसणार्‍या काही पुरातन चिन्हांचा संदर्भ रामायणात दिला आहे. इथपर्यंत सर्व ठिक आणि पटेल असे, पण नंतर कुठल्याही पुराव्याशिवाय ते म्हणतात "गौटेमाला" म्हणजे "गौतमालय";)

हा हा हा!

व्हेनेझुएला वाचून इतका हसतोय... की पडलोच खुर्चीवरून! :)))))))))))))))

पण कल्पना इंटरेस्टींग आहे... ;)))

आपला
गुंडोपंत

लेखमाला..

ह्यांच्या चालीरीतींचा आक्रमकांच्या धर्मावर काय परिणाम झाला, हे वाचायला आवडेल. पण त्यासाठी दुसरी लेखमाला हवी.

प्रियालीताईंच्या टेरिटोरीत प्रवेश करायला सांगताय की काय?!! कृ. ह. घे.

पण विषय चांगला आहे, लिहायलाही आवडले असते, पण आता हाच काही दिवस मला हाच उपद्व्याप पुरेल असे दिसते आहे. पण प्रियालीला खरेच विनंती करायला पाहिजे. ती जास्त चांगले लिहील.

भूप्रदेश ;-)

ह्यांच्या चालीरीतींचा आक्रमकांच्या धर्मावर काय परिणाम झाला, हे वाचायला आवडेल. पण त्यासाठी दुसरी लेखमाला हवी.

प्रियालीताईंच्या टेरिटोरीत प्रवेश करायला सांगताय की काय?!!

नाही हो! धर्माच्या राजकारणातून मी ४ हात दूर असते. म्हणजे, मताची पिंक इ. ठीक आहे पण लेख नाही. ;-)

असो.

हा ही लेख आवडला. पुरुष घरे आणि स्री घरांची योजना तर फक्कड आहे. गुंडोपंतांनी वर म्हटल्याप्रमाणे तुमच्या लेखातून वेगळीच अमेरिका समोर उभी ठाकली आहे.

विचार केला नव्हता

जगातील सर्वाधिक क्षेत्रात निसर्गवादी (ऍनिमिस्ट) आदिवासीम्च्या चालीरीतींचा तेथील आक्रमकांच्या (ख्रिश्चन, आणि हिंदू. मुस्लिम तेथे नंतरच आलेत.) धर्मांवर काय परिणाम झाला, त्याविषयी आपल्या नेहमीच्या अभ्यासपूर्ण शैलीत कृपया लिहावे ही विनंती !

अरे बापरे! या विषयावर कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. तशी मी परधर्मीयांपासून स्वप्नातही ४ हात दूर असते. ह घ्या.

अवांतरः

नाही लिहिले तर, इंडियानापोलीस तुंबरूंचा र्‍हास होऊन, पीटन मॅनिंगच्या खांद्याचे स्नायू तुटून त्याची शंभर शकले होतील. ;-)

किती दुष्टपणा! :(

आदीवासी

जगातील सर्वाधिक क्षेत्रात निसर्गवादी (ऍनिमिस्ट) आदिवासीम्च्या चालीरीतींचा तेथील आक्रमकांच्या (ख्रिश्चन, आणि हिंदू. मुस्लिम तेथे नंतरच आलेत.) धर्मांवर काय परिणाम झाला, त्याविषयी आपल्या नेहमीच्या अभ्यासपूर्ण शैलीत कृपया लिहावे ही विनंती !

लेखासंदर्भात चांगल्या चाललेल्या चर्चेमधे अवांतर होईल म्हणून थोडक्यातः हिंदू कुठे आणि कधीआक्रमक झाले ते (पुराव्यानिशी) कळल्यास बरे होईल.

वाली

वाली आणि सुग्रीवाच्या देशातील आदिवासींना रामाने वालीचा कपटाने वध करून हिंदूंच्या साम्राज्यात आणले. ती माकडे नव्हती. पण वेगळ्या चेहर्‍यांची माणसेच होती.

वर्तकांच्या म्हणण्याप्रमाणे, "वाली हा चांगला राजा होता, म्हणून त्याला मारल्यानंतर त्याची जनता म्हणू लागली की 'आम्हाला वाली उरला नाही'. " हा वाक्प्रचार मराठीत असल्याने याचा सरळ अर्थ असा आहे की मराठी माणसे वानर होत (वर्तकांचे लॉजिक पुढे नेत!)!

पण त्यात हिंदू धर्माने काही केले असे सिद्ध होत नाही. राम हा हिंदू म्हणण्यापेक्षा सनातनी /वैदीक धर्मिय होता. तेंव्हा हिंदू धर्म नव्हताच! :-)

(पुरावा: वर्तक.)

वरच्या शब्दात मी "पुरावा" या शब्दाचा अर्थ चुकून "पुरणे" या अर्थी घेतला आणि गोंधळलो की फारच राग दिसतोय वर्तकांवर म्हणून...!

विषयांतर: तुंबरू, शिंगरू आणि इंडी कोल्ट्स

या विषयांतराबद्दल क्षमस्व चित्रा! पण सर्किट गेले कित्येक दिवस तुंबरू या शब्दाचा वापर करत असल्याने प्रश्न पडला होता.

कोल्ट म्हणजे शिंगरू हवे ना! तुंबरू हा शब्द मी फारसा ऐकला नव्हता फक्त 'नारद तुंबरू करती गायन' अशा सुरेख पंक्ती गणराज रंगी नाचतो या सुमन कल्याणपुरांनी गायलेल्या गाण्यात आहेत. अधिक शोधले असता खालील कथा मिळाली.

तुंबरू आणि नारद हे दोघेही नारायणाचे भक्त. तुंबरू हा अतिशय गुणी गायक होता. एकदा भगवानांसमोर दोघांनी गाऊन दाखवले पण केवळ तुंबरूच्या अप्रतिम गायनाने विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी तुंबरूचा सत्कार केला. यामुळे नारदांना तुंबरूचा हेवा वाटला. नारायणाचा सर्वात प्रिय भक्त मी असताना मला भगवानांनी डावलले असे नारदांना वाटून ते खट्टू झाले. त्यांनी अनेकदा विष्णूसमोर गाऊन त्यांना रिझवण्याचा प्रयत्न केला. शंकराला प्रसन्न करून त्यांच्या कडून चांगला गायक होण्याचा वर घेतला पण या कोणत्याच प्रयत्नाने विष्णू प्रसन्न होईना.

शेवटी, नारदांना आपली चूक कळून आली आणि त्यांनी तुंबरूकडे जाऊन त्याचे शिष्यत्व स्वीकारले.

तात्पर्यः आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीवर जळण्यापेक्षा त्याच्या समोर नतमस्तक होऊन ज्ञानसाधना करावी. ;-)

तेव्हा, हिंदू पौराणिक तुंबरू इंडियानापोलीसचे असण्याचा संभव कमी. आता इंडियाना हे नाव भारताने दिलेल्या पुरातन अमूल्य वारशाचा मान राखावा म्हणूनच दिलेले आहे असा वर्तकी निष्कर्ष काढायचा झाल्यास काढता यावा.

विषयांतराबद्दल क्षमस्व पण तुंबरूची कथा माहितीपूर्ण वाटली. ;-)

तुंबरू, कोल्टस, वाली, माकडे आणि मराठी, वर्तक इत्यादी..

विषयांतराचे काही नाही, वरचे सर्व खूपच माहितीपूर्ण !! :-)

माँतेझूमाचा किल्ला

या प्रकारची घरे मी ऍरिझोनामध्ये बघितली होती, त्यामुळे माहिती वाचून गंमत वाटली. एका डोंगरात बांधलेल्या पुरातन गावाच्या अवशेषाला "माँतेझूमाचा किल्ला" असे चुकीचे नाव कोणीतरी दिले. त्याचा "माँतेझूमा" नावाच्या मेक्सिकन आस्तेक (ऍझ्टेक) राजाशी काहीही संबंध नव्हता. (पण तरी एखादे मेक्सिकन-अमेरिकन वर्तक त्याचा माँतेझूमाशी संबंध बांधत असतील, काही शंका नाही. महाभारत हे कमीतकमी २५०० वर्षांपूर्वीचे, माया लोकांच्या मोठ्या बांधलेल्या इमारतींचे अवशेष ~१००० वर्षांपूर्वीचे - तर माया = मयसभा म्हणजे अगदी कैच्या कैच!)

"माँतेझूमाचा किल्ला"

शिवाय जवळच टुझीगूट नावाच्या गावाचे अवशेष पाहिले - घराला चिकटून घरे अशी पूर्ण टेकडीच असलेले गाव - आता फक्त प्रत्येक घराच्या एक-दोन फूट अवशिष्ट भिंती...

टुझीगूट
टुझीगूट

गंमत म्हणजे त्यांना सापडलेला एक पाटा वरवंटा पुरातत्त्व खात्याने एका घरात तसाच ठेवून दिला आहे!!! ...लव्हाळे राहती, आणखीन काय?

शुद्ध मराठीत बोलायचे तर ...

रेव्हन्स् हॅड् द पॅट्स् बाय् देअर बॉल्स् !

बेलिचिकचा चेहरा बाकी बघताना मजा येत होती !!

फ्रॉम द हॉल्स ऑफ माँटेझूमा

चित्रे खूपच छान आहेत.

त्याचा "माँतेझूमा" नावाच्या मेक्सिकन आस्तेक (ऍझ्टेक) राजाशी काहीही संबंध नव्हता.

"फ्रॉम द हॉल्स ऑफ माँटेझूमा" या अमेरिकन सैनिकांच्या समरगीताचाहा प्रत्यक्ष माँतेझूमाशी काहीही संबंध नसताना त्याचे नाव का वापरले जावे असाही प्रश्न मला पडायचा, पण गाणे बाकी सुंदर आहे. येथे मिळेल.

अवांतरः

महाभारत हे कमीतकमी २५०० वर्षांपूर्वीचे, माया लोकांच्या मोठ्या बांधलेल्या इमारतींचे अवशेष ~१००० वर्षांपूर्वीचे - तर माया = मयसभा म्हणजे अगदी कैच्या कैच

२५०० वर्षे म्हणजे अदमासे इ.स.पूर्व ५ वे शतक. ;-) म्हणजे गौतम बुद्ध हाच श्रीकृष्ण असा अंदाज बांधायलाही लोक कमी करणार नाहीत. असो. :) तेव्हा महाभारत हे इ.स.पूर्वी ३००० वर्षे (३००० असे मला वाटते.)

कथावस्तू नव्हे, लेखन, आणि उशीरतउशीरा...

> २५०० वर्षे म्हणजे अदमासे इ.स.पूर्व ५ वे शतक. ;-) म्हणजे गौतम बुद्ध हाच
> श्रीकृष्ण असा अंदाज बांधायलाही लोक कमी करणार नाहीत. असो. :)
> तेव्हा महाभारत हे इ.स.पूर्वी ३००० वर्षे (३००० असे मला वाटते.)

कथावस्तू प्राचीन आहे, पण कुणा लेखनिकाने मेक्सिकोच्या उपकथानकाचा प्रक्षेप केला असेल, तर तो प्रक्षेप कमीतकमी ~५०० इ.स.पूर्व किंवा आधी करावा लागेल, असे म्हणायचे होते.

माँतेझूमाचा किल्ला

छायाचित्र सुरेख.

दुसर्‍या छायाचित्रात दोन भिंतींमध्ये खूपच कमी जागा दिसते. (जिथे पाटावरवंटा ठेवला आहे तो भाग).

अवांतर -आपल्या पाट्यापेक्षा हे डिजाइन चांगले आहे - चटणी वाटली तर सांडणार नाही असा विचार मनात आला!! पण मला वाटते पाट्यावरवंट्यापेक्षा खलबत्त्यासारखा उपयोग करत असावेत. म्हणजे ठेचा करायला!!

झकास लेख !

उपयोगाच्या साधनाकडे पाहण्याची दृष्टी आवडली.
खलबत्त्याच्या ऐवजी........पाटावरवंटाच ठिक आहे. चटणी सांडू नये,त्यासाठी डिझाइनची कल्पना आवडली.

चित्रे आणि माहितीने हा भागही झकास झालाय.नॅवाहो जमातीची आणि विविध घरांची माहिती आवडली. हा घरांचा प्रवास असाच भारतीय घरांकडे घेऊन या !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त

छान चित्रे आहेत. या किल्ल्यात जाण्यासाठी वाट कुठून आहे?
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

माहिती

दोन्ही भाग आताच वाचले.
ही जरा वेगळ्या विषयांवरची माहिती वाचून चांगले वाटले.
खरोखर जर आपणास वेळ असल्यास पूर्ण जगातल्या घरांबद्दल वाचायला आवडेल. (मला भूगोलाच्या पुस्तकातली फक्त इग्लू आणि ट्युपिक घरे आठवतायत!)

मी गमभन शब्दसंपदा कधीकधी वापरते.

आभार

खरोखर जर आपणास वेळ असल्यास पूर्ण जगातल्या घरांबद्दल वाचायला आवडेल.

"वेळ असल्यास" हेच महत्त्वाचे. आता सध्यातरी जे हाती घेतले आहे ते इकडेतिकडे फार न बघता (टंगळमंगळ न करता) पूर्ण करायचे एवढेच ठरवले आहे. पण विषय सुचवल्याबद्दल धन्यवाद. खरे तर मला भारतातील घरांवरही लिहायचे आहे, पण त्यासाठी खरे तर भारत दर्शन केले पाहिजे.

सुंदर

सुंदर लेख. वाचताना मजा आली. नंदनची छायाचित्रेही मस्त आहेत. अमेरिकेत इतक्या विविध जमाती आहेत याची कल्पना नव्हती.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

हो आहेत ना,

अमेरिकेत अनेक जमाती होत्या. लेखात उल्लेख झाला आहे त्याहूनही अधिक.

nativeamericans.com

सर्वांचे आभार

प्रतिक्रिया आणि सुचवण्यांबद्दल सर्वांचे खूप आभार.

चित्रा

जबरदस्त!

फारच सुरेख झाला आहे लेख. पु. ले. शु.
-(पुढिल लेखांच्या प्रतिक्षेत ) ऋषिकेश

 
^ वर