गरुडध्वज शिलालेख, विष्णू आणि वासुदेव भाग-२

गरुडध्वजाचे ऐतिहासिक महत्त्व -

धर्मेतिहासाच्या दृष्टीने हा स्तंभ काही महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकतो.

  1. या स्तंभावर गरुड अंकित आहे. गरुड हे विष्णूचे वाहन मानलेले असल्याने त्याकाळी (इ.स.पू.२०० ते १५०) वैष्णव धर्माला ऊर्जितवस्था प्राप्त झालेली होती हे स्पष्ट होते. गरुड हा विष्णूचे प्रतिक म्हणून घेतलेला आहे.
  2. या स्तंभावरील लेखाच्या पहिल्याच पंक्तीत 'गरुडध्वज अयं कारिते' असे म्हटलेले असल्याने हा स्तंभ वैष्णव धर्माच्या विशेष प्रयोजनानेच स्थापित केलेला आहे हे स्पष्ट होते.
  3. या लेखात वैष्णवांचे आराध्य दैवत वासुदेव याचा नावाने उल्लेख आहे. पाणिनी, पातंजली यांनी वासुदेव या नावाचा देव असल्याचे उल्लेख केले आहेत.मेगास्थिनस (इ.स.पू. ३५०-२९०) यानेही मथुरेला शौरसेनी लोकांच्या 'वासुदेवकृष्ण' (हेरिक्लीज) उपासनेचा उल्लेख केलेला आहे.
  4. वासुदेवाला 'देवदेवस' म्हणजे देवांचा देव / प्रमुख देव असे संबोधले आहे. म्हणजे येथे वैष्णव देवतेला अधिक महत्त्व दिले गेले आहे.
  5. कृष्णाला 'वासुदेव' या नावाने संबोधून त्याच्या बाळलीलांपेक्षा मोठेपणातील प्रगल्भ राज्यकर्त्या भूमिकेवर जास्त भर दिलेला आहे.
  6. विदिशा हे महत्त्वाचे वैष्णव केंद्र होते असे स्तंभावरील 'इयं' (इथे) या शब्दाने दिसते.
  7. हेलिओडॉरसला 'भागवत' म्हणजे (कृष्ण) भगवानाचा भक्त असे संबोधले आहे. एका यवन राजाचा यवन दूत वैष्णव भागवत धर्माचा अनुयायी होता असे दिसते.याचा अर्थ परदेशीय लोकांमध्येही वैष्णव धर्माचा प्रसार झाला होता.
  8. राजा अंतलिकित (जो ऍन्टीअल्काईडस असावा असे मानले जाते) हा तक्षशिलेत राज्य करत होता. त्याच्या राज्यातील त्याचा यवन दूत ज्याअर्थी हा वैष्णव धर्मस्तंभ विदिशेला येऊन स्थापन करतो त्याअर्थी
  9. अंतलिकिताचाही वैष्णव धर्माला पाठिंबा नपेक्षा संमती असावी. मथुरा आणि आसपासचा प्रदेश यांबरोबरच उत्तर पश्चिमेच्या यवन राज्यांतही वैष्णव धर्माचा प्रसार झालेला असावा. परंतु उल्लेखनीय गोष्ट अशी की या यवनी राज्याच्या भागात वैष्णव धर्माची महती दर्शवणारा एकही पुरावा सापडत नाही.
  10. या लेखाच्या दुसर्‍या भागात स्वर्गात जाण्यासाठी ज्या तीन मार्गांचा उल्लेख आहे ते महाभारत (दमस्त्यागोऽ प्रमादश्च एतेष्वमृतमहितम् - ५/४३/२२) आणि भग्वदगीतेतून (१६/१-३) घेतलेले आहेत. याचा अर्थ तोवर या ग्रंथांचे प्रमाणत्व प्रस्थापित होऊन यवनांपर्यंतही पोचलेले होते.

वैदिक देवता विष्णू , वासुदेवकृष्णाचे उन्नयन आणि वैष्णव धर्माचा विकास

या स्तंभावरील लेखाच्या अनुषंगाने आपण वैष्णव धर्म, त्यातील भगवान श्रीकृष्णाचे स्थान आणि या धर्माचा सार्वत्रिक विकास यांबद्दल विचार करू शकतो.

दैवतशास्त्राचे एक महत्त्वाचे भाष्यकार श्री. रा.चिं.ढेरे यांनी अनेक स्थानिक वीरपुरुषांचे उन्नयन कसे झाले आहे आणि त्यांना वेदातील उल्लेखांचे वेष्टन चढवून त्यांचे हिंदू धर्मात महत्त्वाची देवता म्हणून प्रस्थापन कसे झाले आहे हे सप्रमाण दाखवलेच आहे.
या विषयावर अनेक संशोधकांनी आपापली मते मांडली आहेत. त्यांच्यात तात्त्विक मतभेद दिसले तरी स्थानिक महत्त्वाच्या व्यक्ती आणि प्रथा यांचे हिंदू धर्मात सामिलीकरण झालेले आहे आणि ढेरे यांच्या भाषेत त्या देवतेचा संस्कृत 'पावित्र्यव्यूह' नंतर रचला गेला आहे.
मल्लारी/खंडोबा, बिरोबा, विट्ठल, तिरुमलै श्रीनिवास, अय्यप्पा स्वामी स्कंद, ज्येष्ठा लक्ष्मी या अर्वाचिन देवतांबरोबरच गणपती सारख्या प्राचिन देवतेचेही लोकदेवता स्वरूपापासून वैदिक देवता/अवतार असे उन्नयन झालेले आहे हे आपण जाणतोच.
श्रीकृष्णही याला अपवाद नाही.

प्रचलित विद्वत्विचारानुसार वैष्णव धर्माची उत्पत्ती नारायण नामक 'अऋग्वेदिक' देवतेपासून झाली असावी. या देवतेला यजुर्वेदात वैदिक देवतांमध्ये महत्त्वाचे स्थान मिळाले. यालाच आदिपुरुष ही उपाधी लाभली. या नारायणाच्या संप्रदायाला भागवत धर्म असे नाव मिळाले.
या भागवत देवतेप्रित्यर्थ पंचरात्र सत्र केले जात असे ज्यातून पंचरात्र संप्रदाय निर्माण झाला.

ऋग्वेदात उल्लेख असणारा विष्णू हा इंद्र या सर्वात महत्त्वाच्या देवतेचा सहायक देव होता. त्याचे स्थान इंद्रापेक्षा कितीतरी खाली होते, तो या भागवत धर्मात समाविष्ट होऊन नारायणाशी तादात्म्य पावला. नारायण भगवान विष्णूच्या संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि वसुदेव या चार प्रकट रूपांपैकी वसुदेव या रूपाचा विकास महत्त्वाचा आहे. इंद्राच्या प्रमुख सहायकांना 'वसु' असे म्हटले जाते. 'वसु' हे नाव वस्तीचे द्योतक आहे. वस्ती करून राहाणार्‍यांचा देव तो वसुदेव असे म्हणता येते.

वसुदेव हा यदु, अंधक आणि वृष्णी या गोपालक कुळांचा पूर्वापार देव होता. ही गोपालक कुले राजसत्ताधारक होती. याच गोपालक कुलांच्या राज्यातील महत्वाची राजघराण्यात जन्मलेली (राजा शूरसेनाचा पुत्र) आणि नंतर मथुरेचा राजा झालेली व्यक्ती म्हणजे 'वसुदेव' - ज्याचे नाव या देवतेच्याच नावावरून दिले गेले.
त्यातूनच वसुदेवाचा पुत्र वासुदेवकृष्ण याचे उत्थान होऊन तोही या गोपालक कुलांमध्ये पूजनीय बनला. तसेच पाणिनीच्या अष्टाध्यायीतील एका सूत्रात 'ऋष्यन्धक वृष्णि कुरुम्यश्र' (४/४/९८) असा उल्लेख आहे. पातंजलीने त्याचे विवरण देताना अंधक आणि वृष्णी वासुदेवाची पूजा करत असत असे म्हटले आहे.
याचाच अर्थ असा की इ.स.पू. ४५० मध्ये 'कृष्णवासुदेव' याची प्रस्थापना यमुना आणि (लुप्त?) सरस्वती यांच्या आसपासच्या राज्यांमध्ये प्रमुख दैवत म्हणून झालेली होती. परंतु याचाच एक वेगळा अर्थ असाही निघतो की हा भूभाग सोडला तर वासुदेव कृष्ण (पाणिनी रहात असलेल्या) गांधारसारख्या नैऋत्य राज्यांमध्ये झालेला नसावा. अन्यथा पाणिनीने वासुदेवाचा 'वेगळ्या राज्यातील' लोकांचा देव असा उल्लेख केला बनसता. इ.स.पू. तिसर्‍या शतकात या दैवताची स्थिती काय होती ते कळत नाही. कारण त्याबद्दल पुरावे उपलब्ध नाहीत. परंतु यमुनेच्या काठावरील मथुरा आणि कृष्णपुर (?) येथे वसणार्‍या शौरसेनी लोकांच्या देवतेचे मेगास्थेनिसने (इ.स.पू. ३५० ते २९०) केलेले वर्णन 'हेराक्लीज' असे आहे. याचे मूर्तीस्वरूप हातात 'गो-यष्टी धारण केलेला बाळकृष्ण' असे भासते. यावरून असा निष्कर्ष काढता येतो की या नंतरच्या शतकातही कृष्णाची पूजा अतित्वात राहिली असावी.

बेसनगर गरुडध्वज लेख हा त्यानंतरचा (इ.स. पू. २००) पुरावा आहे. हा पुरावा असे दर्शवतो की भागवत-वैष्णव धर्म भारताच्या आणखी मोठ्या भागात पसरला होता. आता तो मध्यभारतातील विदिशेपासून वायव्येच्या तक्षशिलेपर्यंत पसरला होता. परदेशांतून आलेल्या यवनांवरही या धर्माचा प्रभाव पडलेला होता.तोवर महाभारत, भग्वद्गीता या ग्रंथांचा जनांमध्ये प्रसार होऊन त्यांना जनमान्यता मिळालेली होती. महाभारतातील वचने स्तंभांवर कोरली जाण्याइतपत महत्त्वाची ठरलेली होती. यापूर्वी दोनशे वर्षे पाणिनीच्या काळी कृष्णाबरोबरच अर्जुन हाही दैवतीकरणाच्या मार्गावर होता. या दोहोंचीही पूजा या (कृष्ण-अर्जुन) संप्रदायात होत असे. परंतु नंतरच्या काळात अर्जुन देव बनून राहिला नाही.
या गरुडध्वजाने हेही सिद्ध होते की या काळापर्यंत नारायण - विष्णू - कृष्ण यांची ऐक्यप्रक्रिया पूर्ण झालेली होती आणि वासुदेव हाच विष्णू ही वैष्णवांची भूमिका सिद्ध झालेली होती. त्यामुळे अपरिहार्यपणे अर्जुनाचे देवत्व गळून पदले.

असे असले तरी इ.स. पू. १५० पर्यंत भारताच्या इतर नैऋत्य, पूर्व आणि दक्षिण भागात वैष्णव धर्म अस्तित्वात होता असे मानायला जागा नाही. याचे एक कारण असे असावे की हा गरुडध्वज असलेली विदिशा ही शुंग हिंदू घराण्यातील भागभद्राकडे होती. पूर्व भागात बौद्ध आणि जैन धर्मानुयायी राजांच्या राजवटी अजूनही अस्तित्वात होत्या. तर नैऋत्य-दक्षिणेला परकीय क्षत्रप राज्ये होती. नहपान या क्षत्रपाचे हिंदूकरण सुरू झालेले असले तरी पूर्ण झालेले नव्हते. अंदाजे ५० वर्षांनंतर दक्षिणेला सातवाहन (सातकर्णी ) यांची सत्ता स्थिरावली तेव्हापर्यंत ते हिंदू असूनही नारायणाची संकर्षण-वासुदेव ही रूपे कृष्णाशी एकरूप समजत नव्हते असे दिसते.

वैष्णव धर्मियांनी हिंदू धर्माच्या राजरक्षणाचे दक्षिण-पूर्वेकडील पुनरुत्थान झाल्यावर हळूहळू स्थानिक लोकांचे महत्त्वाचे दैवत =विष्णू(=कृष्ण /विष्णूचे अन्य अवतार) या सूत्रानुसार पुराणांत त्यांची वैदिकता प्रस्थापित करून विष्णू हे दैवत अधिकाधिक लोखाभिमुख केले आणि वैष्णव धर्माची पताका भारतातच नव्हे तर कंबोडियापर्यंत फडकवली.

त्याबद्दल जमले तर नंतर कधीतरी...

Comments

दुरुस्ती

परंतु याचाच एक वेगळा अर्थ असाही निघतो की हा भूभाग सोडला तर वासुदेव कृष्ण (पाणिनी रहात असलेल्या) गांधारसारख्या नैऋत्य राज्यांमध्ये झालेला नसावा.
हे वाक्य -परंतु याचाच एक वेगळा अर्थ असाही निघतो की हा भूभाग सोडला तर वासुदेव कृष्ण याचा एक देव म्हणून प्रसार (पाणिनी रहात असलेल्या) गांधारसारख्या नैऋत्य राज्यांमध्ये झालेला नसावा. - असे वाचावे.
क्षमस्व!

या लेखाचा पहिला भाग येथे वाचावा -
गरुडध्वज शीलालेख, विष्णू आणि वासुदेव भाग-१

स्तंभ

विसूनाना
आपण अतिशय महत्वाची माहिती या लेखात देत आहात असे दिसते. पण ती सांगण्याची पद्धत थोडी सोपी करू शकाल का? एकदम संदर्भ लागत नाही व गोंधळ होतो आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

पास

दोन्ही धागे प्रियाली यांच्याकडे पास.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

हे बरे नाही

दोन्ही धागे प्रियाली यांच्याकडे पास.

माझा नेटवावर सप्ताहाखेरीस मंदावलेला असतो त्यामुळे हे पास केल्याची जबाबदारी टाळते आहे. ;-)

असो पण आताच वाचायला घेतले धागे. विसुनानांनी माहितीचा खजिना समोर ठेवला आहे. सविस्तर प्रतिसाद नंतर.

लेख समजवून देण्या/घेण्याचा एक फुटकळ प्रयत्न

मौर्य घराण्याने अशोकाच्या काळात बौद्ध धर्म स्वीकारल्यावर कालांतराने मौर्य घराण्याची राजसत्ता खिळखिळीत होऊ लागली. अशातच बृहद्रथ या शेवटच्या मौर्यराजाची सत्ता उलथवून पुश्यमित्र शुंगाने आपली सत्ता प्रस्थापित केली. शुंग सत्ताकाळात भारतातून हळूहळू बौद्ध धर्माचे उच्चाटन होत गेले आणि हिंदू (वैष्णव) धर्माची पुनर्स्थापना झाली. बौद्ध धर्म गांधार, बॅक्ट्रिया वगैरे प्रांतांपुरता सिमित झाला.

शुंग घराण्यातील एक राजा भागभद्र (यालाच इतरत्र भद्रक असेही म्हटले जाते) याच्या काळात शुंगांची मूळ राजधानी पाटलीपुत्र असली तरी विदिशेतून कारभाराची सूत्रे हलवणे सुरु झाले. भागभद्राचा काळ इ.स.पूर्व ११० मानला जातो. याच्या राज्यकाळात हेलिऑडॉरसचा खांब रोवला गेला. त्याची माहिती पुढे येईलच.

भागभद्राच्या काळातच तक्षशिलेवर अंतलिकित या इंडो-ग्रीक राजाचे राज्य होते. गांधारातील हे राज्य बौद्धधर्मीय होते. या राजाविषयी फारशी माहिती नसली तरी याच्या राजदूताने शुंग राजासाठी तयार केलेला स्तंभ पाहता दोन्ही देशांत सौहार्दाचे संबंध होते असे मानण्यास जागा आहे. हेलिऑडॉरस याने स्थापना केलेल्या या स्तंभावर पुढील मजकूर आढळतो.

महाराज अंतलिकित यांचा राजदूत दियसपुत्र हेलिओडोरस नावाच्या भवगद्भक्ताने, काशी-राजकन्येचा पुत्र, त्राता भगभद्र याच्या राज्याच्या चौदाव्या वर्षी इथे हा देवांचा देव वासुदेव याचा गरुडध्वज उभारला. (संदर्भः हेलिऑडॉरस पिलर)

या लेखावरून पुढील गोष्टी लक्षात येतातः

१. गरुडध्वजः या स्तंभावर गरुड अंकित आहे. गरुडाचा उल्लेख महाभारतात येतो. विनतेच्या पोटी जन्म घेणारा गरुड हे विष्णूचे वाहन कसा झाला त्याची कथा आदिपर्वात आहे. त्यानंतर यादवांच्या/ कृष्णाच्या ध्वजावर गरुडचिन्ह असल्याचा उल्लेखही येतो. कृष्ण आणि गरुडाचा संबंध असा लागतो. भगभद्राच्या काळात (इ.स.पू.२०० ते १५०) वैष्णव धर्माला ऊर्जितवस्था प्राप्त झालेली होती हे या ध्वजावरून स्पष्ट होते. या स्तंभावरील लेखाच्या पहिल्याच पंक्तीत 'गरुडध्वज अयं कारिते' असे म्हटलेले असल्याने हा स्तंभ वैष्णव धर्माच्या विशेष प्रयोजनानेच स्थापित केलेला आहे हे स्पष्ट होते.

२. वासुदेवः या लेखात वैष्णवांचे आराध्य दैवत वासुदेव याच्या नावाचा उल्लेख आहे. वासुदेव हे कृष्णाचे नाव (वसुदेवपुत्र) हे सर्वश्रुत आहेच. अष्टवसुंची कथा महाभारतात शंतनु आणि गंगेचे पुत्र म्हणून येते. नववा वसु भीष्म. वसुंना इंद्राचे सहाय्यक मानले जाते. (विसुनानांनी म्हटले आहे की वसुदेव हा यदु, अंधक आणि वृष्णी या गोपालक कुळांचा पूर्वापार देव होता. त्याबद्दल मला विशेष माहिती नसल्याने येथे उहापोह करत नाही.) हा यदु, अंधक आणि वृष्णी या गोपालक कुळांचा पूर्वापार देव होता. पुढे वसुदेवपुत्र वासुदेव (कृष्ण) हा या कुलांचा देव झाला असावा. (गोवर्धनाच्या गोष्टीतूनही इंद्राचे प्रस्थ कमी होऊन वैष्णव धर्म वाढीला लागल्याचे सूतोवाच असावे.)या स्तंभावर वासुदेवाला देवांचा देव मानून सर्वोच्चपद बहाल केलेले आहे. विदिशा ही हिंदू राजांची राजधानी असल्याने ते वैष्णव केंद्र होते असे स्तंहावरील 'इथे' या शब्दाच्या उल्लेखाने दिसून येते. हेलिओडॉरसला 'भागवत' म्हणजे (कृष्ण) भगवानाचा भक्त असे संबोधले आहे. एका यवन राजाचा यवन दूत वैष्णव भागवत धर्माचा अनुयायी होता असे दिसते.याचा अर्थ गांधारात वैष्णव धर्माचा प्रसार झाला होता असे म्हणण्यास जागा आहे. गांधारातील बौद्ध राजा अंतलिकितानेही वैष्णव धर्माला मान्यता दिली असावी असे वाटते. भागवत धर्माच्या दोन शाखा होत्या असे कळते. यापैकी एक शाखा बाळकृष्णाच्या लीलांना मानणारी तर दुसरी शाखा गोपाळ याला मानणारी. स्तंभावर कृष्णाला 'वासुदेव' या नावाने संबोधून त्याच्या बाळलीलांपेक्षा मोठेपणातील प्रगल्भ राज्यकर्त्या भूमिकेवर जास्त भर दिलेला आहे.

परंतु उल्लेखनीय गोष्ट अशी की या यवनी राज्याच्या भागात वैष्णव धर्माची महती दर्शवणारा एकही पुरावा सापडत नाही.

चंद्रगुप्ताच्या दरबारातील मेगॅस्थेनिसने इंडिका या आपल्या ग्रंथात भारतीय लोक, जमाती आणि राज्यांबद्दल विवेचन केलेले आहे. त्यात त्याने शौरसेनी या हरे-कृष्णाला पुजणार्‍या जमातीचा उल्लेख केला आहे. मेगॅस्थेनिस जरी याला हेरॅकेलिज म्हणत असला तरी हर्क्युलिसशी कृष्णाची सांगड घालून अलेक्झांडरला कृष्णाचा वंशज सांगण्याचे प्रयत्न पूर्वीही झालेले आहेत.

३. लेखाचा उर्वरित भाग : या लेखाच्या दुसर्‍या भागात स्वर्गात जाण्यासाठी ज्या तीन मार्गांचा उल्लेख आहे ते महाभारत (दमस्त्यागोऽ
प्रमादश्च एतेष्वमृतमहितम् - ५/४३/२२) आणि भग्वदगीतेतून (१६/१-३) घेतलेले आहेत. याचा अर्थ तोवर या ग्रंथांचे प्रमाणत्व प्रस्थापित होऊन यवनांपर्यंतही पोचलेले होते.

----------------

काही महत्त्वाची वाक्ये मला या लेखात मला जाणवली - एकंदरीत लेख खूप आवडला. नवी माहिती मिळाली.

१. यवनी राज्याच्या भागात वैष्णव धर्माची महती दर्शवणारा एकही पुरावा सापडत नाही.
२. महाभारताचा प्रसार निश्चितच या काळाच्या पूर्वी झाला परंतु मेगॅस्थेनिसच्या काळातही वैष्णव धर्म अस्तित्वात होता.

---------------

लेखात काही गोष्टी अतिशय त्रोटक स्वरूपात येतात. पाणिनी आणि पतंजली यांनी वासुदेव या नावाचा देव असल्याचे उल्लेख केले आहेत ते नेमके कोठे/ कसे आणि कोणत्या संदर्भात ते कळत नाही. मेगॅस्थेनिसने हे उल्लेख इंडिकात केलेले आहेत. विकीनुसार पाणिनी इ.स.पूर्व ४०० म्हणजे सदर राज्यांच्या आधी सुमारे २००-२५० वर्षे तर पतंजली अदमासे या राजांच्या राज्यकाळात आढळतो. पाणिनीने भागवत् धर्माचा किंवा कृष्णाला मानणार्‍या धर्माचा (का कल्टचा?) उल्लेख केला असल्यास आणि मेगॅस्थेनिसनेही तसाच उल्लेख केला असल्यास आणि या लेखात कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही उल्लेख असल्यास वैष्णव धर्म इ.स.पूर्व ४०० वगैरे आधीच रूजला असल्याचे ध्यानात येते. महाभारताच्या रचनेचा काळ शोधण्यासाठी हे संदर्भ महत्त्वाचे वाटले.

अंदाजे ५० वर्षांनंतर दक्षिणेला सातवाहन (सातकर्णी ) यांची सत्ता स्थिरावली तेव्हापर्यंत ते हिंदू असूनही नारायणाची संकर्षण-वासुदेव ही रूपे कृष्णाशी एकरूप समजत नव्हते असे दिसते.

वरील वाक्य देखील त्रोटक आहे. अधिक माहिती असल्यास कृपया पुरवावी.

आता समजले

प्रियालीचा प्रतिसाद वाचल्यानंतर विसूनानांचा लेख नीट समजला. फारच रोचक माहिती आहे. धन्यवाद विसूनाना व प्रियाली

चन्द्रशेखर

चांगली माहिती

या शिलालेखाची ओळख/अनुवाद करून दिल्याबद्दल धन्यवाद.
स्वतःहून हा शिलालेख फक्त एका घटनेवर आधारित आहे. मात्र त्यामुळे निघणारा अर्थ बर्‍यापैकी व्यापक आहे. विश्लेषण आवडले.

अर्थातच काही प्रश्न उभे राहतात.

वैदिक काळी वासुदेव-कृष्ण हे लोकदेवत आणि विष्णू (वेदातील एक दुय्यम देव.) यांचे एकत्रिकरण होणे हे समजले. पण राम हा त्याभागातील एक तेवढाच लोकप्रीय देव (परत वैष्णव) त्याची सांगड कधी होते?

कृष्ण कथेत कालयवन येतो. याची काही सांगड निघते का? का हा कालयवन प्रक्षिप्त भाग आहे?

'वासुदेव' हे पूर्वापार असलेले महत्वाचे नाव असे इरावती कर्वे (?) यांचे मत होते. 'पौंड्र वासुदेवाचा' कृष्णाने वध केला कारण तो वासुदेवासारखा वावरत असे. यावरून हे मत होते. याचा अर्थ वासुदेव हा सर्वात जुना लोकदेव - कृष्ण (ऐतिहासिक पात्र) त्यास जोडला गेला आणि त्यात विष्णू जोडला गेला.

एखाद्या शिलालेखामुळे काही माहिती मिळते पण आज अस्तित्वात (सापडले गेले नसणे, नष्ट होणे इत्यादी) शिलालेख नाहीत (काही भागात) म्हणून तिकडे हा पंथ नव्हता हे म्हणणे धाडसाचे ठरत नाही का?

प्रमोद

धन्यवाद

अत्यंत त्रोटकपणे लिहिलेल्या या लेखाचे वाचन करणार्‍या सर्व वाचकांचे आभार.

प्रियाली यांना लेखाचे 'वाचनीय' सुलभीकरण केल्याबद्दल विशेष धन्यवाद.

पाणिनी आणि पतंजली यांनी वासुदेव या नावाचा देव असल्याचे उल्लेख केले आहेत ते नेमके कोठे/ कसे आणि कोणत्या संदर्भात ते कळत नाही.

-याबद्दल लवकरच माहिती देतो.

महाभारताच्या रचनेचा काळ शोधण्यासाठी हे संदर्भ महत्त्वाचे वाटले.

-एकंदरीत महाभारताच्या रचनेचा कालच नव्हे तर 'हे युद्ध कधी झाले असावे?' याबद्दल काही भाकिते संशोधकांना महत्त्वाचे आहेत.
(एखाद्या वीराचे (वैष्णव/शैव) मूळ प्रवाहातील दैवतीकरण होण्याची आणि त्याची देव्हार्‍यात पूजा होऊ लागण्याची प्रक्रिया पाहिल्यास हा काळ कमीतकमी १०००-१५०० वर्षे मानण्यास हरकत नाही. उदा. रामानुजांनी (इ.स्.~११००) तिरुमलै वेंकटेश हा 'शिव' किंवा 'मणि(?) भद्र' नसून विष्णूच आहे हे सिद्ध करेपर्यंत त्याची सामान्य जनात एक देव म्हणून मान्यता झालेली होती. इ.स.~११०० मध्ये तो वैष्णवांना अधिकृतरित्या मिळाला. याचा अर्थ त्यापूर्वी कमीत कमी ५०० वर्षे तिरुमलै वर एक सामान्य जनांचे नांदते दैवत होते. लोकनायक -> महान राजा -> देव -> विष्णू/शिवाचा अवतार हा प्रवास व्हायला किमान २००० वर्षे लागत असावीत. हेच/असेच गणित विट्ठलाबाबत मांडता येते. महानुभाव पंथात (इ.स. १२६७) विट्ठलाचा श्रीकृष्णाशी संबंध नाकारलेला आहे. पण ज्ञानेश्वरांची (~इ.स. १२८५)विठाई-कृष्णाई -कान्हाई तीच आहे. त्यावेळी विट्ठल हा दैवत म्हणून प्रस्थापित झालेला असला तरी विष्णू म्हणून त्याची मान्यता संदेहास्पद होती. आजच्या लोकांसाठी विट्ठल नि:संदेहपणे कृष्ण/विष्णू आहे.
याचा अर्थ कृष्ण राजा ते पावित्र्यव्यूह (महाभारत) हा काल १००० वर्षे तर पावित्र्यव्यूह ते विष्णू हा काल आणखी १००० वर्षे मानता येईल. अर्थात् त्याचवेळी वैष्णवधर्म प्रस्थापित होत असल्याने हा काल थोडा लांबला असण्यची शक्यता आहे. इ.स. पूर्व १५० -२००० (-~२००) वर्षे = ~इ.स.पू. २३५० हा महाभारत घडले असण्याचा काल असू शकतो.)

अंदाजे ५० वर्षांनंतर दक्षिणेला सातवाहन (सातकर्णी ) यांची सत्ता स्थिरावली तेव्हापर्यंत ते हिंदू असूनही नारायणाची संकर्षण-वासुदेव ही रूपे कृष्णाशी एकरूप समजत नव्हते असे दिसते.

वरील वाक्य देखील त्रोटक आहे. अधिक माहिती असल्यास कृपया पुरवावी.

-अशी माहिती आहे. नाणेघाटातील (प्रथम?) सातकर्णीच्या बायकोने केलेल्या यज्ञात भित्तीपट कोरलेला आहे. संकर्षण, वासुदेव ही नावे वेगवेगळी आहेत पण श्रीकृष्णाचा उल्लेख नाही. तसेच संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि वासुदेव ही कृष्णपूर्व विष्णूची रूपे आहेत. कृष्णानंतर विष्णूचे 'वासुदेव' हेच रूप जास्तीत जास्त वापरले जाते. पुढेपुढे तर वासुदेवही मागे पडून केवळ कृष्णच उरलेला आहे.) याचा अर्थ इ.स्.पू. १०० पर्यंत कृष्णाला दक्षिणेत विष्णूरूप मान्यता नव्हती.

प्रमोद सहस्रबुद्धे -

पण राम हा त्याभागातील एक तेवढाच लोकप्रीय देव (परत वैष्णव) त्याची सांगड कधी होते?

-उत्तम प्रश्न. :) पण माझ्याकडे सध्यातरी त्याचे उत्तर नाही. :(

'वासुदेव' हे पूर्वापार असलेले महत्वाचे नाव असे इरावती कर्वे (?) यांचे मत होते. 'पौंड्र वासुदेवाचा' कृष्णाने वध केला कारण तो वासुदेवासारखा वावरत असे. यावरून हे मत होते. याचा अर्थ वासुदेव हा सर्वात जुना लोकदेव - कृष्ण (ऐतिहासिक पात्र) त्यास जोडला गेला आणि त्यात विष्णू जोडला गेला.

-सहमत आहे. या मताला वरील स्तंभलेखाने भौतिक पुरावा मिळतो.

पटले नाही

विसूनाना लेखात म्हणतात की
अंतलिकिताचाही वैष्णव धर्माला पाठिंबा नपेक्षा संमती असावी. मथुरा आणि आसपासचा प्रदेश यांबरोबरच उत्तर पश्चिमेच्या यवन राज्यांतही वैष्णव धर्माचा प्रसार झालेला असावा.
हा निष्कर्ष विसूनानांनी कसा काढला ते समजत नाही. अमेरिकेत अनेक ठिकाणी जैन किंवा हिंदू मंदिरे आहेत. याचा अर्थ अमेरिकेचा हिंदू किंवा जैन धर्माला पाठिंबा आहे असा होत नाही. याचा अर्थ, अंतलिकिताच्या राज्यात वैष्णव धर्मिय कोठे ना कोठे होते व राजाने त्यांना आपल्या धर्माप्रमाणे एक स्तंभ उभारण्यास परवानगी दिली एवढाच काढणे शक्य होईल.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

तसा निष्कर्ष काढण्याला वाव आहे

ही वाक्ये पहा -

7.हेलिओडॉरसला 'भागवत' म्हणजे (कृष्ण) भगवानाचा भक्त असे संबोधले आहे. एका यवन राजाचा ('अंतलिकितस' चा दूत) यवन दूत वैष्णव भागवत धर्माचा अनुयायी होता असे दिसते.

तसेच प्रियाली यांच्या प्रतिसादातली वाक्ये (जी मलाही अभिप्रेत आहेत.)-

बृहद्रथ या शेवटच्या मौर्यराजाची सत्ता उलथवून पुश्यमित्र शुंगाने आपली सत्ता प्रस्थापित केली. शुंग सत्ताकाळात भारतातून हळूहळू बौद्ध धर्माचे उच्चाटन होत गेले आणि हिंदू (वैष्णव) धर्माची पुनर्स्थापना झाली. बौद्ध धर्म गांधार, बॅक्ट्रिया वगैरे प्रांतांपुरता सिमित झाला.

महाराज अंतलिकित यांचा राजदूत दियसपुत्र हेलिओडोरस नावाच्या भवगद्भक्ताने, काशी-राजकन्येचा पुत्र, त्राता भगभद्र याच्या राज्याच्या चौदाव्या वर्षी इथे हा देवांचा देव वासुदेव याचा गरुडध्वज उभारला.

स्पष्टीकरणार्थ -
मौर्य घराण्यात चंद्रगुप्त, अशोक इ. महान राजे होऊन गेले. अशोकाने बौद्ध धर्म स्विकारल्याचे सर्वविदित आहे. परंतु त्यानंतर गादीवर आलेले मौर्य राजे कधी-कधी जैनधर्मियही होते. त्या घराण्यातील शेवटच्या चार -पाच भ्रष्ट राजांच्या काळात मौर्य साम्राज्याची अनेक शकले झालेली होती. तसेच यवन क्षत्रपांनी त्याचे लचके तोडलेले होते. अशा अनागोंदीच्या काळात पुष्यमित्र शुंग (या हिन्दू ब्राह्मण) या सेनापतीने पाटलीपुत्रात उठाव करून मौर्य घराण्याकडून सत्ता हिसकावून घेतली. त्यानंतर पाटलीपुत्रावर पुनः हिंदू धर्माची सत्ता आली. काशीपुत्र भगभद्र हा शुंग घराण्यातील राजा मध्यभारतातील विदिशा येथून राज्य करत असावा. (किंवा विदिशाच्या भूभागावर त्याचे राज्य होते.) या भगभद्र राजाचा उल्लेख स्तंभावरील लेखात तक्षशीलेचा यवन (बौद्ध?) राजा अंतलिकित याचा 'त्राता' (त्रातारः) आणि जवळचा मित्र (उपान्तात् सकाशं ) असा झालेला आहे. कदाचित कोणत्यातरी युद्धात अंतलिकिताला साह्य/उपकार करून त्याने ही मैत्री संपादलेली असावी.
अशा परिस्थितीत अंतलिकिताला शुंग भगभद्राचा धर्म - जो हिंदू वैष्णव होता - त्याला मान्यता/संमती द्यावी लागली असावी. नाहीतर (त्याच्या यवन दूत) हेलिओडोरसने त्याच्या नावाचा उल्लेख करून हा वैष्णव धर्माची महती दर्शवणारा स्तंभ उभारला नसता आणि स्वतःला भगवद्भक्त (भागवत) म्हणवले नसते.

शिलालेखावरील वाक्य

सम्राट अशोकाच्या सर्व शिलालेखांच्यावर देवाना प्रिय असलेला(येथे याचा अर्थ बुद्धाला प्रिय असलेला असा घ्यायचा का ते मला ठाऊक नाही) असा उल्लेख अशोकाबद्दल आहे म्हणजे तो काही प्रत्यक्षात देवाना प्रिय नव्हता किंवा बुद्ध आणि अशोक यांच्या कालातील अंतर बघता बुद्धालाही प्रिय असणे शक्य नाही. त्यामुळे एवढेच म्हणता ये ईल की हे एक संबोधन असावे. त्याचप्रमाणे हेलिओडॉरसला 'भागवत' म्हणजे (कृष्ण) भगवानाचा भक्त असे संबोधले आहे.याचा अर्थ तो तसा होता असे म्हणणे कितपत योग्य होईल? ते बहुदा संबोधन असावे.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

ते केवळ विशेषण असते तर -

ते केवळ विशेषण असते तर त्याने आपल्या नावे हा देवांचा देव वासुदेव याचा गरुडध्वज इथे का उभा केला असता? (इतर पुरावे - जसे जवळपास सापडलेल्या मंदिराचे भग्नावशेष - यावरून विदिशा हे भागवत धर्माचे महत्त्वाचे स्थान होते.)
'देवानां प्रियः' असे लिहिलेले लेख हे कोणत्याही धर्माची गुढी नाहीत. पण गरुडध्वज आणि त्याच्यावरील वासुदेवाचा उल्लेख हा वैष्णव धर्माबद्दलच आहे.

तरी असेही म्हणतो की हे सर्व पुरातत्त्वीय पुराव्यावरून केलेले तर्क आहेत. उद्या हेलिओडोरसचा किंवा अंतलिकिताचा इतरत्र 'भागवत्धर्मद्वेष्टा' असा उल्लेख आढळला तर त्या पुराव्यानुसार काही वेगळा तर्क करता येईल.

देवानां प्रिय

तो काही प्रत्यक्षात देवाना प्रिय नव्हता किंवा बुद्ध आणि अशोक यांच्या कालातील अंतर बघता बुद्धालाही प्रिय असणे शक्य नाही.

राजा हा ईश्वराचाच अंश आहे या समजूतीतून राजाला विशेषणे दिलेली दिसतात. लोकांचा ग्रह वरील असल्यास राजा देवांना प्रिय आहे हे संबोधन सत्य आहे.

फरक लक्षात घ्यावा

पाठिंबा म्हणण्यापेक्षा इतर धर्मांना संरक्षण होते असेही म्हणता येईल. अमेरिकेबाबतही असेच म्हणता येईल. सौदीमध्ये खुलेआम मंदिरे किंवा आरत्या म्हणता येत नसतील कदाचित परंतु सहिष्णु राज्यांत/ देशांत इतर धर्मांना संरक्षण असते तसेच येथेही म्हणता येईल. मौर्यांच्या राज्यात बौद्ध धर्म स्वीकारल्यावरही जैन आणि हिंदू धर्माला संरक्षण होते. (प्रजेने बौद्ध धर्म स्वीकारावा अशी त्यांच्यावर सक्ती नसावी परंतु अमिष असू शकेल. मौर्यांच्या राज्यात हिंदू धर्माचे जाणूनबुजून उच्चाटन केलेले दिसत नाही. तो नंतरच्या काळात झालाही असेल आणि याचा परिपाक म्हणून सत्ता उलथली असेल. पुश्यमित्र हा बौद्ध मौर्यांचा हिंदू सेनापती होता. चू. भू. द्या. घ्या.)

परंतु शुंगांचे असे नाही. पुष्यमित्र शुंगाने बौद्ध धर्माचे उच्चाटन करून हिंदू धर्म पुनर्प्रस्थापित केला. हे करताना त्याने बौद्धधर्मीयांवर अत्याचार केल्याचे बौद्ध साहित्यात म्हटले आहे.

याचा अर्थ, अंतलिकिताच्या राज्यात वैष्णव धर्मिय कोठे ना कोठे होते व राजाने त्यांना आपल्या धर्माप्रमाणे एक स्तंभ उभारण्यास परवानगी दिली एवढाच काढणे शक्य होईल.

हे असे झालेले नाही. अंतलिकिताने स्तंभ उभारण्यास परवानगी दिलेली नाही. परवानगी दिली असल्यास ती भद्रकाने दिली. अंतलिकिताने आपला दूत विदिशेला (जी हिंदू राजाची राजधानी आहे) पाठवला आणि काही राजकीय हेतूने स्तंभ तेथे रोवला. हा राजकीय हेतू दोन राज्यांत सौहार्दपूर्ण संबंध वाढवणे/ शुंग राजाने अंतलिकिताला केलेली मदत किंवा अंतलिकिताला आपल्या अंकित करणे/ अंतलिकिताने मांडलिकत्व स्वीकारणे असा होऊ शकतो.

जेव्हा परक्या राजाकडे राजदूत पाठवला जातो तेव्हा तो असाच निवडला जातो की ज्याला परक्या राजाविषयी/ राज्याविषयी आणि संस्कृतीविषयी माहिती आहे. त्यानुसार हेलिऑडॉरस वैष्णव असणे शक्य आहे आणि त्याचा भागवत् असा उल्लेख शिलालेखात आहे.

माहितीपूर्ण

मूळ शिलालेख, आणि त्या अनुषंगाने उत्तम माहिती दिल्याबाबत धन्यवाद.
- - -
(पाणिनीय उल्लेख : तांत्रिक आहे.)
येथे "भक्ति" म्हणजे "भजन करणे" किंवा "सेवा करणे" या अर्थाने "भक्ति"संप्रदायांना ओळखण्याची शब्दरूपे पाणिनीने दिलेली आहेत. तिथे हे सूत्र सापडते :
४.३.९८ वासुदेवार्जुनाभ्यां वुन् ।
वासुदेवाच्या भक्तांसाठी "वासुदेवक" आणि अर्जुनाच्या भक्तांसाठी "अर्जुनक".
यांच्या उच्चारात जोर शेवटच्या अक्षरावर येत नाही. वासुदेवक. र्जुनक
येथे थोडी गुंतागुंत येते. गोत्रापत्याचा सेवक, आणि क्षत्रियाचा सेवक, यांच्यासाठी पाणिनीने वेगळा नियम लगेच पुढे सांगितलेला आहे. "वसुदेवाचे गोत्रापत्य जो वासुदेव, त्याचा सेवक" तोसुद्धा "वासुदेवक" असतो, पण त्याचा उच्चार पहिल्या अक्षरावर आघात देऊन होतो. वासुदेवक, असा, म्हणजे वरच्यापेक्षा वेगळा नाही.
त्याच नियमानुसार अर्जुन नावाच्या क्षत्रियाचा सेवक "र्जुनक", येथे पहिले अक्षर "आ" आहे, हेसुद्धा विशेष.
ही दोन्ही रूपे वैकल्पिक आहेत. वासुदेवः, आर्जुनः, वासुदेवीयः, आर्जुनीयः वगैरे रूपेही दिसतात.
"वासुदेवक" रूप जसेच्यातसे उच्चारानिशी नाहीतरी विकल्पाने दिसत असताना पाणिनीने ते वेगळे ४.३.९८ या सूत्रात काय म्हणून सांगितले? त्याचे कारण व्याख्याकार सांगतात : "वासुदेवक" आणि "अर्जुनक" हे देवताविशेषांच्या भक्तांबद्दल शब्द आहेत. या संदर्भात रूपे वैकल्पिक नाहीत. व्याख्याकार म्हणजे पतंजली वगैरे. अजून पतंजलीच्या महाभाष्यातला हा उतारा तपासलेला नाही. वरील स्पष्टीकरण "काशिका" या व्याख्याग्रंथातले आहे. परंतु स्पष्टीकरणाचा स्रोत पतंजलीच.

- - -

माहितीपूर्ण प्रतिसाद

"वासुदेवक" रूप जसेच्यातसे उच्चारानिशी नाहीतरी विकल्पाने दिसत असताना पाणिनीने ते वेगळे ४.३.९८ या सूत्रात काय म्हणून सांगितले? त्याचे कारण व्याख्याकार सांगतात : "वासुदेवक" आणि "अर्जुनक" हे देवताविशेषांच्या भक्तांबद्दल शब्द आहेत

.
-हा मुद्दा लेखातील पाणिनीच्या काळी 'वासुदेवाचे भक्त' अस्तित्वात होते या मताला पुष्टी देतो असे वाटते.
संदर्भ दिल्याबद्दल आभारी आहे. कदाचित पतंजलीने अंधक-वृष्णी यांचा उल्लेखही या अनुषंगाने भाष्यात केला असावा.
मूळ पतंजलीने काय लिहिले आहे तेही कळवल्यास आणखी आभारी राहीन.

भगवान आणि हिंदुशाही

दुर्गाबाईंशी ऐसपैस गप्पा या पुस्तकात बाई म्हणतात की भगवान हा शब्द प्रथमतः गौतम बुद्धाच्या संदर्भात वापरला गेला. त्याआधी वैष्णव देवांना भगवान ही उपाधी लावली जात नसे. यावरून भागवत् धर्माची पताका बुद्धानंतर रोवली गेली असे विधान करता येईल का?

गांधारात हिंदु देवतांच्या मूर्ती आढळत नाहीत या वाक्यावर अधिक शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु फारसे हाती लागले नाही. वैष्णव धर्म प्रस्थापित होण्याआधी शिवाची किंवा दुय्यम देवतांची पूजा होत असे का ते ही कळले नाही. परंतु याचा अर्थ गांधारात हिंदु देवता आढळत नाहीत असा नाही. कदाचित, ज्या प्रकारे बौद्ध लेणी खणली गेली तसा प्रयत्न हिंदु देवतांसाठी झाला नसावा कारण मुख्य धर्म बौद्ध होता.

गांधार या विकी लेखावर बुद्धाच्या सर्व मूर्ती पहिल्या शतकापासून पुढे दिसतात. गांधारात त्या सुमारास हिंदु मूर्तीही आहेत. परंतु त्या हिंदुशाही दरम्यान कोरल्या/ घडवल्या गेल्या असतील असे मानण्यास जागा आहे.

मध्यंतरी इंडिएनापोलिस आर्ट म्युझियममध्ये गांधारातील पहिल्या शतकातील उजव्या सोंडेचा गणेश आढळला. विष्णूचे दशावतारही आढळले. इतरत्रही गांधारातील हिंदू देवांच्या मूर्ती असणे शक्य आहे.

DSC00369

गणपती गांधारातील?

गणपतीच्या गांधारातील मूर्तीबाबत 'लोकदैवतांचे विश्व' या रा.चिं.ढेरेलिखित पुस्तकात उल्लेख आहे. वर तुम्ही दिलेल्या फोटोत तीच मूर्ती असण्याची शक्यता आहे.
या मूर्तीमुळे गणपती देवतेची उपासना आणखी मागे जाते असे ते म्हणतात. (या देवतेचे नावही 'पील' या (फारसी?) शब्दावरून आलेले आहे की पील हा शब्द भारतातून फारसीत गेला?)

आणखी माहिती -
रा.चिं.ढेरे म्हणतात -
"हाल सातवाहनाच्या 'गाथासप्तशती'मध्ये गणेशाचा निर्देश असूनही गणेशोपासना सातवाहन काळाइतकी प्राचीन नाही असे म्हटले जात होते. परंतु आता ख्रिस्तपूर्व वाङ्मयीन आणि पुरातत्वीय प्रमाणांनीच गणेशोपासनेची प्राचीनता सिद्ध होत आहे."
"ह्यू-एन्-त्संग सध्या काफिरीस्तान नावाने ओळखल्या जाणार्‍या भागात असलेल्या कपिशा नगरीत काही महिने राहिला होता. त्याने प्रत्यक्ष निरीक्षणातून अशी माहिती दिली आहे की हत्तीच्या स्वरूपात नांदणारा 'पिलुसार' नावाचा देव कापिशीवासियांचा प्रमुख देव असून तो नगराच्या उत्तारेस असलेल्या 'पिलुसार' नावाच्याच पर्वतावर रहात आहे." - (इ.स्.~६००)
तसेच या कालातील (अफगाणिस्तानात सापडलेल्या) गणेश मूर्तीचे पुरावेही ढेरे देतात.पिलुसार नावाचे केरळमधील गणेशाच्या 'पिळ्ळैयार' या नावाशी साधर्म्य ते नमूद करतात. पुढे -

"परंतु ह्यू-एन्-त्संगच्या माहितीस अत्यंत प्रबळ आणि प्राचीन पुरावा खुद्द कपिशा नगरीतच उपलब्ध झालेला आहे. कपिशा येथील पुरातत्त्वीय पाहाणीत आणि उत्खननात काही विशिष्ट प्रकारची नाणी उपलब्ध झालेली आहेत. त्या नाण्यांवर उजवीकडे एका पुरुष दैवताची आकृती सिंहासनाधिष्ठीत दाखवली असून, डाव्या बाजूला हत्तीचे शीर आणि वरच्या बाजूस डोंगर व 'कवि(पि)शि ये नगरदेवता' अशी अक्षरे खरोष्टी लिपीत आहेत. ही नाणी ग्रीक राजा युक्रेडायटीस याची असून त्याचा मान्य राज्यकाळ ख्रिस्तपूर्व १७१-१५० असा आहे. अर्थातच युक्रेडायटीसला ज्याअर्थी स्थानिक नगरदेवतेला आपल्या नाण्यांवर अंकित करावे लागले, त्याअर्थी ती तेथील लोकांची त्याहूनही पुरातन अशी लोकप्रिय देवता असली पाहिजे, हे उघड आहे."
"या भागात (कपिशा - पुष्करावती - गांधार) अलेक्झांडरच्या काळी (ख्रिस्तपूर्व चौथे शतक) हस्तिक नावाची जमात रहात होती आणि अलेक्झांडरच्या स्वारीच्या वेळी पुष्करावती या हस्तिकांच्या नगरीत हस्ति नावाचाच राजा होता असे समकालीन ग्रीक इतिहासकारांच्या साक्षीवरून दिसून येते.".
इ.इ.

प्रियाली यांच्याकडून इंडिएनापोलिस आर्ट म्युझियममधल्या गणेशाबद्दल अधिक माहितीची अपेक्षा.

(अधिक संदर्भ -
Ganesh: studies of an Asian god By Robert L. Brown
http://en.wikipedia.org/wiki/Hashtnagar
http://jainology.blogspot.com/2007/11/ganesh-grama-devata.html)

फारशी माहिती नाही

प्रियाली यांच्याकडून इंडिएनापोलिस आर्ट म्युझियममधल्या गणेशाबद्दल अधिक माहितीची अपेक्षा.

फारशी माहिती नव्हती. :-( गणपती गांधारातील असून हजार-बाराशे वर्षे जुना आहे एवढेच लिहिले होते. त्यावरून तो हिंदुशाहीतील असावा असा अंदाज मी बांधते.

श्रीलंकेतील प्राचीन गणपतीबद्दल कालच वाचले.

गणेशाच्या माहितीबद्दल धन्यवाद.

माहिती वेगळीच

आणि उत्तम.

उद्यापर्यंत जमेल तशी अधिक माहिती देईन, प्रश्न विचारेन.

श्रीकृष्ण - कुरुंदकरांच्या नजरेतून

नरहर कुरुंदकरांचे म्हणणे असे आहे की -
कंसाचे वडील उग्रसेन ही केवळ व्यक्ती नसून राज्यपद्धती आहे - भारतातील प्राचीन गणतंत्र. यात कृष्ण हा वसुदेवाचा मुलगा. वसुदेव हा उग्रसेनाचा मंत्री.
भारतीय उपखंडात गोधनाशी संबंधित व्यवसाय असलेले जे गणतंत्र मथुरेच्या भागात होते त्याला जरासंधामुळे धक्का बसला. जरासंधाने तेथे राजेशाही आणण्यासाठी कंसाला आपल्या मुली देऊन आपल्या बाजूला करून घेतले. पुढे जरासंधांचे उच्चाटन करण्यासाठी श्रीकृष्ण मागे लागला त्याचे कारण गणतंत्राची पुन्हा स्थापना करण्यासाठी. जरासंधाचे साम्राज्य विस्ताराचे धोरण असल्याने कृष्णाला त्याच्या राजधानीपासून दूर असे द्वारकेला स्थानांतर करावे लागले. कृष्णाशी संबंधित सर्व गोष्टींचा अतिशय वेगळा अर्थ लावण्याचे काम कुरुंदकरांनी केले आहे.

शूरसेन हा या कुळातील राजा (किंवा महाजनपदातील नेता) इ. स.पूर्वी सहावे शतकात होता. ह्याचे उल्लेख बौद्ध नोंदींमध्ये तसेच ग्रीक नोंदीमध्ये आले असल्याचे विकीवरून कळते.

याचा अर्थ महाभारत रचण्याचा काळ हा इ.स.पूर्व सहाव्या शतकानंतर असावा असे धरता येऊ शकते का? महाजनपदे अस्तित्वात होती, त्यांच्यात भांडणे असणे शक्य आहेच.

आता माझे थोडे जर तर -
कृष्णाचे मूळ कुठचे हे बहुदा वृष्णी कूळ इथपर्यंत नक्की सांगता येऊ शकते असे वाटते. गणतंत्र मथुरेला होते. येथे वृष्णी कुळ अस्तित्त्वात होते ह्याबद्दल पुरावे आहेत. हे कूळ बहुदा चंद्रवंशीय समजले जाते. सूर्यवंशीय नाही. आता ययातीच्या देवयानीपासून झालेला यदू या मुलाची ही संतती असे समजले जाते. नहुषपुत्र ययाती हा ऋग्वेदात एक सूक्तकर्ता म्हणून येतो. म्हणजे ययाती हा ऋग्वेदापासून माहिती आहे. परंतु त्याची ब्राह्मण पत्नी देवयानी हिच्यापासून झालेल्या यदुची संतती क्षत्रिय आहे. हा सर्व भाग सोडून दिला तरी वृष्णिंचा काळ हा ऋग्वेद रचल्यानंतरचा असावा. कौटिल्य, पाणिनी आणि महाभारत सर्व वृष्णींचा उल्लेख करतात. महाभारतात त्यांना व्रात्य आणि कौटिल्य त्यांना संघ असे संबोधले आहे असे विकीवर आहे. यामुळे कृष्ण ज्या यादवांपैकी एक होता, ते एतद्देशीय असावेत. यात वृष्णींचे एक नाणे आहे त्यावर अर्धा सिंह आणि अर्धा हत्ती असलेले नाणे आहे. हत्ती ह्या प्राण्याचे महत्त्व भारतीय उपखंडातले असावे - बाहेर हा प्राणी नेहमीच्या पाहण्यातला नसावा.

@ प्रमोद सहस्त्रबुद्धे : @पौंड्र वासुदेव - तर याबद्दल कुरुंदकर म्हणतात - पौंड्र वासुदेवाला कृष्णाचा आक्षेप त्याला वासुदेव व्हायचे होते हा नाही. याचा आक्षेप अरण्यपर्वात १७-१८ व्या श्लोकात वर्णलेला आहे की "हा पौंड्र वासुदेव दुर्मती आहे, तो स्वतःला पुरुषोत्तम म्हणवतो, माझी चिन्हे धारण करतो. म्हणजे कृष्णाचा दावा आपण वासुदेव आहोत असा नसून परमेश्वर आहोत असा आहे. ... एकूण वासुदेव होण्याचा प्रयत्न करणे नामक प्रकरणच कल्पित आहे त्याला पुरावा नाही."

मित्रदत्ताची नाणी

मेगास्थेनिसने (इ.स.पू. ३५० ते २९०) केलेले वर्णन 'हेराक्लीज' असे आहे. याचे मूर्तीस्वरूप हातात 'गो-यष्टी धारण केलेला बाळकृष्ण' असे भासते.

मला आताच ब्रिटिश म्युजियममधल्या मित्रदत्ताच्या नाण्यांवर गो-यष्टी धारण केलेला बाळकृष्ण उर्फ हरेकृष्ण उर्फ हेराक्लिस आढळला. :-)

यावरून असा निष्कर्ष काढता येतो की या नंतरच्या शतकातही कृष्णाची पूजा अतित्वात राहिली असावी.

मित्रदत्त उर्फ मित्राडेटस् (काळ इ.स.पू.१७१ ते १३८)

मित्रदत

प्रियालीच्या प्रतिसादावरून मित्रदत वैष्णव होता असा निष्कर्ष विसूनाना काढण्याची शक्यता आहेच.

चन्द्रशेखर

खोडकरपणा

@चंद्रशेखर, असा निष्कर्ष मी काढणारा कोण? (म्या पामरे ऐसा निष्कर्ष कैसा काढावा?)
मिथ्राडेटस-१ बद्दल माझे वाचन नाही.

'हेलिओडॉरस हा भागवत होता' हे माझे स्वतंत्र मत नाही. ते साक्षेपी पुरालेखतत्त्वज्ञांचे मत आहे, जे मला पटते.
आणि जर आपल्याला अजूनही असे वाटत असेल की 'हेलिओडॉरस हा भागवत नव्हता' तर तुमच्याशी मी असहमत आहे.
मी कोणी इतिहासतज्ञ नाही. "महाजनौ येन गतः सः पंथः" - थोरामोठ्या इतिहासकारांनी अनेक मते आधीच व्यक्त केलेली आहेत.
माझी अवस्था "इतिहासकारांते वाट पुसतु" अशी आहे. आणि त्यांनी दाखवलेली योग्य वाट मला दिसेलच अशी खात्री (मी ज्ञानेश्वरही नसल्याने)
देता येत नाही. तेव्हा प्रत्येकाने आपला निष्कर्ष आपण काढावा हे बरे.
असो.
आपला खोडकरपणा आवडला.

मित्रदत्ताने वैष्णव असण्याची गरज नाही

गोयष्टी धारक हेराक्लिज मित्रदत्ताच्या नाण्यांवर दिसला म्हणून मित्रदत्ताने वैष्णव होण्याची गरज नाही. :-) त्या हेराक्लिजवरून चंद्रशेखर यांनी काढलेले अनुमान आणि माझे अनुमान निराळे आहे. माझे अनुमान असे -

मित्रदत्ताच्या राज्यात गोयष्टीधारक हेराक्लिजला विशेष महत्त्व असावे. नाण्यावरील त्याची मूर्ती एखादा प्रसंग दाखवते असे दिसत नसल्याने कदाचित एक पूजनिय देवता म्हणून हेराक्लिजला नाण्यावर स्थान मिळालेले असावे.

आता या हेराक्लिजची पार्श्वभूमी अलेक्झांडर पासून सुरू होते. ती अशी आहे की सिकंदर जेव्हा भारतात पोहोचला तेव्हा त्याच्या समोर अनेक प्रश्न उभे होते. त्याची सेना थकलेली होती. अलेक्झांडरने पर्शियन सैनिकांना सैन्यात भरती केल्याने, आपला पोशाख त्यांच्याप्रमाणे बदलल्याने आणि इतर अनेक कारणाने सेना त्याच्यावर रुष्ट होती. अलेक्झांडरला भारत, भारतातील परिस्थिती, हवामान-भूगोल याची फारच कमी माहिती होती. पुरु बरोबर झालेल्या युद्धात अलेक्झांडर जबर जखमी झाला होता. अशावेळी जास्तीत जास्त राजे युद्धाशिवाय शरणागती पत्करतील तर त्याच्या पथ्यावर पडणारे होते. यासाठी त्याने आपण परकीय नसून आपली मूळे एतद्देशीय आहेत असा समज पसरवण्यास सुरूवात केली. यासाठी हेराक्लीज आणि डिओनायसस या दोन देवतांचा वापर करण्यात आला. हेराक्लीज हा कृष्ण असून डिओनायसस हा शंकरस्वरूप असल्याचे अलेक्झांडरच्या गोटातून सांगण्यात आले. (हा शैव आणि वैष्णव या दोन्ही गटांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न असावा. [कंसातील टिप्पणी माझे मत]) (संदर्भः अरायन)

अलेक्झांडर हा झ्यूसपुत्र असल्याने तो कृष्णाच्याच परिवारातला असे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आणि हेराक्लिजला स्थानिक देवतेचे स्वरूप देण्याचाही. तोच हा गोयष्टीधारक हेराक्लिज असावा.

पुढे इंडो-ग्रीक राजांनी बौद्ध धर्म स्वीकारला तरी त्यांची जनता हिंदू धर्माचे पालन करत असणेही शक्य आहेच. सरसकट बौद्धकरण झाले नसावे. बौद्धधर्मीय राजांनी हिंदू धर्मीय प्रजेवर अत्याचार केले अशा नोंदीही नाहीत. अशात ग्रीक देवतेचे हिंदू स्वरूप मित्रदत्ताच्या नाण्यावर असण्यात काहीच वावगे वाटत नाही.

अनुमान

गोयष्टी धारक हेराक्लिज मित्रदत्ताच्या नाण्यांवर दिसला म्हणून मित्रदत्ताने वैष्णव होण्याची गरज नाही. :-) त्या हेराक्लिजवरून चंद्रशेखर यांनी काढलेले अनुमान आणि माझे अनुमान निराळे आहे.
प्रियाली म्हणते तसे कोणतेच अनुमान मी काढलेले नाही. माझा मुद्दा असा होता की एखाद्या पुरातन राजाच्या राज्यात त्या राज्यात रहाणार्‍या नागरिकांच्या धर्माशी संबंध जोडता येणे शक्य होईल अशी एखादी पुरातनवस्तू सापडली की लगेच ते राज्य व शासक हे दोन्ही त्या धर्माचे पुरस्कर्ते होते असे म्हणणे योग्य नाही. यासाठी बर्‍याच जास्त संशोधनाची आवश्यकता गरजेची वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

काही फुटकळ निरीक्षणे..

विसूनाना, प्रियाली, चंद्रशेखरजी आणि मित्रहो,
काही फुटकळ निरीक्षणे नोंदवतो. अर्थात ती अवांतर वाचनातून लक्षात राहिली असल्याने अपुरी (किंवा चुकीचीही) असू शकतील.

सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यावर मौर्य कुळातील मधले काही राजे जैनधर्मीय होते, याची निश्चित माहिती उपलब्ध आहे का? मगधाचा शेवटचा मौर्य सम्राट ब्रुहद्रथ हा बौद्ध होता. त्याचवेळी शेजारी कलिंगाच्या गादीवर असलेला खारवेल मात्र जैनधर्मीय होता. राजे जरी अहिंसेचा पुरस्कार करणारे असले तरी मगध आणि कलिंग या देशांनी सैन्य मात्र सुसज्ज राखले होते आणि ही सैन्ये वैदिक क्षात्रधर्माचे पालन करणारी होती. त्यावेळी या प्रदेशात एवढे राजकारण एकवटले होते, की मुत्सद्दीपणाची कमाल लागली होती. मगध राज्यावर कितीजणांचा डोळा होता ते पाहा.

सगळ्यात पहिले ग्रीक (त्या काळात परदेशातून आलेल्यांनाच यवन संबोधत असत. बौद्धांना यवन म्हटले जात नसे. पुढील काळात मुसलमानांसाठीही यवन ही संज्ञा वापरली गेली, पण अधिक अचूकपणे मुस्लिम आक्रमणकर्त्यांना म्लेंच्छ म्हणत असत.) ग्रीकांचा प्रमुख मिन्यांडर (मिलिंद) हा बौद्ध धर्माचा अभ्यासक या बुरख्याखाली मगधाचा घास घ्यायला टपून बसला होता. ब्रुहद्रथ हा हलक्या कानाचा आणि विलासात मग्न सम्राट होता. त्याला मिन्यांडरने एका रुपवान ग्रीक नर्तकीच्या नादाला लावले होते. ब्रुहद्रथ जरी सम्राट असला तरी मगधाचे प्रशासकीय निर्णय राजप्रतिनिधीं आणि मगधाच्या मांडलिक राजांचा समावेश असलेली संघटना म्हणजेच 'चंद्रगुप्तसभा' घेत असे आणि तो निर्णय मानणे सम्राटावर बंधनकारक असे. तर चंद्रगुप्ताच्या साम्राज्याचा आयता घास घेण्याची संधी मिन्यांडरला सोडायची नव्हती.

दुसरा बोका म्हणजे कलिंगराज खारवेल. मगध आणि कलिंगात कायम हिंसक संघर्ष होत असे. अशोकाच्या काळात तर कलिंगाची अख्खी सेनाच गारद झाली होती. ते जुने वैभव पुन्हा मिळवून देण्याची संधी खारवेल बघत होता. त्याला ऐतिहासिक सूड उगवायचा होता. पुष्यमित्राला हे माहित होते. खारवेलाने मगध राजकारणात हस्तक्षेप करावा आणि त्यायोगे ग्रीकांच्या हालचालींवर नजर ठेवणारी एक प्रबळ शक्ती असावी, म्हणून पुष्यमित्राने धूर्तपणे एक डाव खेळला. त्याने ठरवून एका हेराला अपमान करुन मगधाबाहेर हाकलून दिले. या हेराने खारवेलला जाऊन सांगितले, की कलिंगाच्या मालकीची असलेली भगवान तथागतांची रत्नजडीत प्रतिमा एका युद्धात मगधाने लुटून नेली आहे आणि ती अप्रतिम आहे. त्यामुळे खारवेलाने ती प्रतिमा आपल्या ताब्यात मिळावी म्हणून ब्रुहद्रथाशी बोलणी सुरु केली. यानिमित्ताने खारवेलचाही चंचुप्रवेश मगध राजकारणात झाला.

तिसरा बोका म्हणजे आंध्रराज शातकर्णी. हा जरी मगधापासून लांब असला तरी त्याला स्वतःच्या राज्याची सीमा उत्तरेत वाढवायची होती. त्यामुळे तो सावधपणे या राजकारणावर नजर ठेऊन बसला होता.

या स्थितीत मगधाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सावध असलेल्या काही व्यक्ती होत्या. त्या म्हणजे राजगुरु पतंजली, सेनापती पुष्यमित्र, त्याचा मुलगा अग्निमित्र आणि नातू वसुमित्र. पुष्यमित्र हा वृद्ध होता. त्याने सम्राट ब्रुहद्रथाला अंगाखांद्यावर खेळवले होते. त्याने अनेकवेळेला ब्रुहद्रथाला धोक्याचे इशारे दिले आणि ग्रीकांच्या कच्छपि न लागण्यास सांगितले, पण ब्रुहद्रथ इतका वेड्यासारखा वागत होता, की मगधाचे स्वातंत्र्य संपणार हे दिसून येत होते. पुष्यमित्राने ठरवून आणि स्वतःच्या स्वार्थासाठी ब्रुहद्रथाला मारले नाही. वार्षिक सैन्य संचलनात (चतुरंग दळाचे व मगध सामर्थ्याचे प्रदर्शन) सम्राट ब्रुहद्रथ अगदीच वेड्यासारखा वागला. त्याने सर्व सैनिकांना हत्यारे गंगेत विसर्जित करुन आणि मुंडण करुन भिक्षू बनण्याचे आवाहन केले. सैन्य काही बौद्ध नव्हते. त्यांना क्षत्रियधर्माची निंदा सहन झाली नाही आणि ते बिथरले. त्यानंतर ग्रीक यवनीच्या नादाने ब्रुहद्रथाने राज्यकारभार चालवणे सुरु केले. हा चंद्रगुप्त सभेचा अपमान होता. सम्राटाच्या देशद्रोही वर्तनावर निर्णय घेण्यासाठी चंद्रगुप्त सभेची बैठक झाली त्यातही ब्रुहद्रथाने चक्क ही सभा कायमसाठी विसर्जित करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे चंद्रगुप्त सभेने एकमताने कौल दिला, की 'सेनापतीने या जुलमी आणि देशद्रोही राजाचा वध करावा.' पुष्यमित्राला ती आज्ञा अमलात आणावी लागली.

दरम्यानच्या काळात पुष्यमित्राचा मोठा नातू सुमित्र हाही ग्रीक यवनीच्या आणि ब्रुहद्रथाच्या नादी लागून वाया गेला आणि एका हल्ल्यात मारला गेला. या खुनाखुनीच्या राजकारणाने रागावून आणि मुलगा गेल्याच्या दु:खाने निराश होऊन पुष्यमित्राचा मुलगा अग्निमित्र हा आपल्या मालव राज्यात निघून गेला. ब्रुहद्रथ निपुत्रिक असल्याने मगधाला वारस नव्हता आणि पुष्यमित्र वृद्ध असल्याने त्याला सम्राट होण्यात रस नव्हता. त्यामुळे पुष्यमित्राचा तरुण नातू वसुमित्र हा मगधाचा सम्राट झाला. अशारीतीने मौर्य घराणे जाऊन त्याजागी शुंग घराण्याची सत्ता आली. हे सत्तांतर मगधाला अनुकूल ठरले कारण वसुमित्राने लगेचच अश्वमेध् यज्ञ केला आणि खारवेल तसेच शातकर्णीला युद्धात हरवून मगधाचा दरारा पुन्हा स्थापित केला.

पुष्यमित्र वैदिक धर्माचा पुरस्कर्ता होता खरा आणि बौद्ध धर्माची अवनती मगधाच्या स्वातंत्र्याचा घास घेणार, हे त्याला दिसत होते. त्यामुळे त्याने क्रांती घडवली ती खरे तर मगधाच्या हितासाठी. वैदिक धर्माची पुनर्स्थापना वगैरे हेतू त्याला अभिप्रेत नव्हता. पुढे ते आपोआपच घडले. (त्या काळात हिंदू हा शब्दप्रयोग नव्हता. तो बर्‍याच नंतर रुढ झाला. त्यावेळी वैदिक धर्म म्हणले जात असे.)

धन्यवाद

पुष्यमित्राबद्दल माहितीसाठी धन्यवाद. हे संदर्भ तुम्हाला कोठे मिळाले त्याबद्दल आठवते का काही? मला पुष्यमित्राबद्दल माहिती फार पूर्वी (कॉलेजातील लायब्ररीत) एका बौद्ध साहित्यातून मिळाली होती परंतु बौद्ध साहित्यात पुष्यमित्राला बराच दोष दिल्याने आणि पुढे तो अतिशयोक्त असल्याची टीका वाचल्याने खरी गोष्ट कळत नाही.

पुष्यमित्र वैदिक धर्माचा पुरस्कर्ता होता खरा आणि बौद्ध धर्माची अवनती मगधाच्या स्वातंत्र्याचा घास घेणार, हे त्याला दिसत होते. त्यामुळे त्याने क्रांती घडवली ती खरे तर मगधाच्या हितासाठी. वैदिक धर्माची पुनर्स्थापना वगैरे हेतू त्याला अभिप्रेत नव्हता. पुढे ते आपोआपच घडले.

हे आपोआप कसे घडले हाच प्रश्न आहे कारण भारतातून बौद्ध धर्म सुदूर गांधार, तिबेट, बॅक्ट्रिया, श्रीलंका, आग्नेय आशिया वगैरे मध्ये पसरला. वायव्य भाग सोडता इतर देशांत तो आजही आढळतो. वायव्येला नष्ट झाल्याचे कारण इस्लाम परंतु भारतात त्याचे समूळ उच्चाटन व्हावे अशी परिस्थिती आपोआप आली असावी असे वाटत नाही. पुष्यमित्राने असे केले नाही तर हे उच्चाटन कोणी व का केले असा प्रश्न पडतो.

शुंग राज्यकाळ इतका मोठा नाही की तो भारतातील बौद्ध धर्माचे समूळ उच्चाटन करू शकेल आणि शुंगांनंतरही अतिशय प्रबळ असे बौद्ध राजे होऊन गेले (उदा. कनिष्क आणि हर्षवर्धन) तरीही बौद्ध धर्माला अशी अवकळा येण्याचे कारण हिंदू धर्माने आवळलेले आपले पाश असावेत. याकाळात हिंदू धर्म कर्मठ झाला, त्याने बौद्ध धर्मातून प्रतिके स्वीकारली आणि शेवटी बुद्धाला विष्णूचाच अवतार करून बौद्ध धर्माला तिलांजली देण्यास मदत केली असावी. चू. भू.द्या.घ्या.

त्या काळात हिंदू हा शब्दप्रयोग नव्हता. तो बर्‍याच नंतर रुढ झाला. त्यावेळी वैदिक धर्म म्हणले जात असे.

हे बरोबर आहे. मला वरचे प्रतिसाद लिहिताना स्वतःलाच हा शब्द खटकत होता पण वैदिक धर्म हा शब्द वेळीच आठवला नाही.

अवांतरः बौद्ध धर्माची परिस्थिती गेल्या शतकात कशी होती त्याबद्दल धर्मानंद कोसंबींची टिप्पणी कालच वाचली. खरेतर या विषयावर नवी चर्चा सुरु करायला पाहिजे पण येथेच देते.

मला वाटले बुद्धगया बौद्धांच्या ताब्यात आहे. पण येथे वेगळाच प्रकार दिसून आला. मठांत शिरल्याबरोबर बाहेरच्या बाजूला बैल, उंट, घोडे वगैरे जनावरे बांधलेली होती. आत जाऊन पाहतो, तो एका बाजूस देवीची मूर्ती होती व तिची त्यावेळी शंखानादयुक्त पूजा सुरू होती. महंताचे मुख्य शिष्य देवीच्या शेजारी ओसरीवर हुक्का पीत बसले होते.

बौद्ध धर्माचा उत्कर्ष आणि र्‍हास्...

This comment has been moved here.

अभ्यासपूर्ण लेख

लेख आवडला. या धाग्यावरची चर्चा खरोखरच अतिशय अभ्यासपूर्ण व उपक्रमच्या दर्जाला साजेशी झाली आहे. या इतिहासा संबंधी जास्त माहिती नसल्याने मला फारसे काही लिहिता आले नाही. वाचनालयातून पुस्तके आणून या कालाबद्दल वाचन केले पाहिजे असे वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

चर्चेत मोलाची भर

या प्रतिसादाने चर्चेत मोलाची भर घातली आहे. (फुटकळ निरीक्षणे नव्हेत.)
फक्त काही संदर्भ दिले असते तर आणखी चांगले झाले असते.योगप्रभू यांच्याकडून संदर्भांची आणि अधिक माहितीची अपेक्षा.

आणखी काही माहिती-
१. पुष्यमित्र शुंग हा मगधाचा राजा झाला तरी त्याच्या राज्यकालातील शीलालेखात त्याचा उल्लेख 'सेनापती' असाच आढळतो. (संदर्भ -'भारतीय पुरालेखोंका अध्ययन' हेच डॉ. शिवस्वरूप सहाय यांचे पुस्तक) (शंका - असे का असावे?)
२. संप्रति हा अशोकाचा नातू जैन होता. त्याला जैन अशोक असेही म्हटले जाते. (संदर्भ - पूर्वीचे वाचन आणि विकी)
त्याचा उत्तराधिकारी शालिशुक हाही जैन होता.
३.

अशावेळी जास्तीत जास्त राजे युद्धाशिवाय शरणागती पत्करतील तर त्याच्या पथ्यावर पडणारे होते. यासाठी त्याने आपण परकीय नसून आपली मूळे एतद्देशीय आहेत असा समज पसरवण्यास सुरूवात केली. यासाठी हेराक्लीज आणि डिओनायसस या दोन देवतांचा वापर करण्यात आला. हेराक्लीज हा कृष्ण असून डिओनायसस हा शंकरस्वरूप असल्याचे अलेक्झांडरच्या गोटातून सांगण्यात आले

. +

ग्रीकांचा प्रमुख मिन्यांडर (मिलिंद) हा बौद्ध धर्माचा अभ्यासक या बुरख्याखाली मगधाचा घास घ्यायला टपून बसला होता

.-
या प्रियाली यांच्या वरीलपैकी एका प्रतिसादावरून आणि योगप्रभूंच्या मिन्यांडरवरील मतावरून असे वाटते की -
यवन क्षत्रप किंवा बाल्हिक (बॅक्ट्रियन) राजांनी येथील जनतेस गाफिल ठेवून निर्वेधपणे राज्य करण्यासाठी आपण बौद्ध असल्याची भूमका सामान्य जनतेत उठवली असावी. मिन्यांडरची खरोष्टी लिपीतली नाणी (एतद्देशियांना समजणारी लिपी) जरी त्याचा 'महाराजस धर्मिकस' असा उल्लेख करून त्याच्या बौद्ध निष्ठेची ग्वाही देत असली तरी ग्रीक लिपीत असलेल्या नाण्यावरील अथेना,निकी/नाइकी या देवतांचे छाप त्याची ग्रीक देवतांशीही असलेली जवळीक दाखवतात. (हे मत योग्य असावे का? )
४. विदिशा येथील शुंग घराण्याच्या राज्याला कालिदासाच्या 'मालविकाग्निमित्र' या नाटकानेही आधार मिळतो. या नाटकातील नायक 'अग्निमित्र' हा पुष्यमित्राचा मुलगा अग्निमित्र होय. ही कथा घडते तेव्हा अग्निमित्र विदिशेचा राज्यपाल असतो.

(- याला म्हणतात फुटकळ निरीक्षणे... :))

पुष्यमित्र सम्राट का झाला नाही?

एक तर पुष्यमित्र हा विश्वासघातकी नव्हता. तो मौर्य घराण्याशी एकनिष्ठ होता. त्याच्यावर सेनापती म्हणून मगध राज्याच्या रक्षणाची जबाबदारी होती. ती त्याने शेवटपर्यंत निभावली. ब्रुहद्र्थाला मारायचे आणि सत्ता हस्तगत करायची, हेही त्याचे ध्येय नव्हते. ब्रुहद्रथाला त्याने लहानपणापासून अंगाखांद्यावर खेळवले होते. त्यामुळे मगधाचा सम्राट व्यसनांच्या आणि भोगांच्या मागे लागून अंतिमतः ग्रीकांच्या कुटील डावाला बळी पडणार आणि मगध साम्राज्याचा नाश होणार या काळजीने पुष्यमित्र व्यथित होता. त्याने सम्राट ब्रुहद्रथाला वारंवार धोक्याचे इशारे दिले होते, पण ब्रुहद्रथ बेफाम झाला होता. अखेर त्याने नको ती चूक केली. अगदी सम्राट अशोकापासून मौर्य घराण्यातील अनेक राजांचा धर्म बौद्ध किंवा जैन असला तरी या राजांनी राज्यसंरक्षणासाठी सैन्य सज्ज ठेवले होते. त्याचप्रमाणे जनतेच्या धर्मात ढवळाढवळ केली नव्हती. ब्रुहद्रथाने मगधाच्या सैन्यालाच बौद्ध होण्याचे आवाहन केले आणि शस्त्रे गंगेत बुडवून पिवळ्या छाट्या परिधान करुन सैनिकांनी भिक्षू व्हावे, अशी बडबड केली. शस्त्रांची निंदा क्षत्रिय सहन करत नाहीत त्यामुळे सैन्य बिथरले, पण सेनापती असलेल्या पुष्यमित्राने त्यांना आवरले. यानंतर ब्रुहद्रथाच्या देशद्रोही वर्तनावर निर्णय घेण्यासाठी चंद्रगुप्तसभा बोलवण्यात आली. ही चंद्रगुप्तसभा अगदी चंद्रगुप्ताच्या काळापासून रुढ झाली होती. सम्राटाने सर्वांच्या सहमतीने निर्णय घ्यावा म्हणून चाणक्यानेच या राजप्रतिनिधी सभेची घडी बसवून दिली होती. ही प्राचीन परंपरा असलेली प्रतिनिधी सभा विसर्जित करण्याचे ब्रुहद्रथाने जाहीर केले. त्याने सभेबाबत तुच्छतेचे उद्गार काढले त्यामुळे या सभेचे जवळपास ३००-४०० सदस्य संतप्त झाले आणि त्यांनी एकमुखाने 'या जुलमी राजाचा वध करा' असा आदेश सेनापती पुष्यमित्राला दिला. पुष्यमित्राने या अंतिम क्षणीही ब्रुहद्रथाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ब्रुहद्रथ माफी मागायला तयार नव्हता. पुष्यमित्राला नाईलाजाने तो आदेश अमलात आणावा लागला कारण तोसुद्धा अखेर मगधाचा सेवक होता. खरे तर पुष्यमित्र या वेळेस वृद्ध झाला होता. त्याचा मुलगा अग्निमित्र हा प्रौढ म्हणजे पस्तिशीच्या पुढचा तर नातू वसुमित्र हा कोवळा म्हणजे १६-१७ वर्षांचा होता. या वयात पुष्यमित्राला सम्राट होण्याची लालसा नव्हती.
ब्रुहद्रथाच्या मृत्यूनंतर तो निपुत्रिक असल्याने चंद्रगुप्त सभेने पुष्यमित्राला सम्राट होण्याची विनंती केली, पण आपण सेनापती आहोत आणि सेनापतीच राहू, असे त्याने निक्षून सांगितले. म्हणून त्याजागी वसुमित्राची निवड झाली. मगधातील राजकारणाला कंटाळून अग्निमित्र आणि त्याची पत्नी धारिणी हे मालव राज्यात (माळवा) राजधानी विदिशा (उज्जैन) येथे निघून गेले. त्यांना वसुमित्रालाही बरोबर न्यायचे होते, परंतु पुष्यमित्र व महामुनी पतंजली यांनी धारिणीची समजूत काढली. वसुमित्र सम्राट झाल्यावर मगध सैन्यासह दिग्विजय करायला गेला. त्याने युद्धात विजयश्री मिळवल्यावर आणि मगधच्या शत्रूंचा बंदोबस्त झाल्यावर मगच पुष्यमित्राने वानप्रस्थाश्रम स्वीकारला आणि तो मरेपर्यंत मातृभूमी मगधातच राहिला.

माझे मत

यवन क्षत्रप किंवा बाल्हिक (बॅक्ट्रियन) राजांनी येथील जनतेस गाफिल ठेवून निर्वेधपणे राज्य करण्यासाठी आपण बौद्ध असल्याची भूमका सामान्य जनतेत उठवली असावी. मिन्यांडरची खरोष्टी लिपीतली नाणी (एतद्देशियांना समजणारी लिपी) जरी त्याचा 'महाराजस धर्मिकस' असा उल्लेख करून त्याच्या बौद्ध निष्ठेची ग्वाही देत असली तरी ग्रीक लिपीत असलेल्या नाण्यावरील अथेना,निकी/नाइकी या देवतांचे छाप त्याची ग्रीक देवतांशीही असलेली जवळीक दाखवतात. (हे मत योग्य असावे का? )

असे नसावे. या राजांनी बौद्ध धर्म स्वीकारला असावा परंतु त्यांची जनता ही बौद्ध आणि वैदिक धर्म मानणारी होती. यवन/ग्रीक हे आधीपासूनच मूर्तीपूजा करणारे. आपल्या संस्कृतीचा प्रचंड अभिमान असणारे. ते अचानक आपली संस्कृती सोडून देतील असे वाटत नाही. त्यांनी दोन्ही संस्कृतींचा मिलाफ करून आम्हीही तुमच्यातलेच असे सांगण्याचा प्रयत्न केला असावा. तसे केल्याने एका वेगळ्या वंशाच्या, धर्माच्या आणि आचारांच्या जनतेवर राज्य करणे सुकर झाले असावे. चू. भू. दे. घे.

म्हणजे जवळजवळ तसेच

त्यांनी दोन्ही संस्कृतींचा मिलाफ करून आम्हीही तुमच्यातलेच असे सांगण्याचा प्रयत्न केला असावा. तसे केल्याने एका वेगळ्या वंशाच्या, धर्माच्या आणि आचारांच्या जनतेवर राज्य करणे सुकर झाले असावे.-

-कदाचित त्यांनी (नागसेनासारख्या बौद्ध धर्मपंडिताला हाताशी धरून/ त्याला संतुष्ट करून) 'आम्ही तुमच्यातलेच' असे दाखवण्याचा प्रयत्न केला. - त्यामुळे जनतेस गाफिल ठेवून निर्वेधपणे राज्य करता आले असावे - वेगळ्या शब्दात - राज्य करणे सुकर झाले असावे.

सूकरमद्दव

बौद्ध धर्मात मांसभक्षणाला परवानगी नव्हती, असे वाटत नाही.

स्वतः बुद्धाचे महानिर्वाण होण्यास शिळे मांस खाण्यातून झालेला अतिसार कारणीभूत असल्याचे मी कुठेतरी वाचले होते.

-असेच म्हणतो.पण शिळे मांस नव्हे - तर एक विशेष पदार्थ - "सूकरमद्दव" - हा लेख खूप माहितीप्रद आहे. (नव्हे, ती लेखमालाच माहितीप्रद आहे.)

तरीही -

बहीण-भावाचा संभोग त्यांना चालू शके. मद्यसेवन, मांसभक्षण या तर काय, रोजच्याच गोष्टी होत्या. चोरी करणे, लूटमार करणे यात काहीच वावगे नव्हते, खोटे बोलणेही सर्रास चाले

-असे मीही कोठेतरी वाचले आहे. (कदाचित नंतरच्या वैदिक/ब्राह्मिक हिंदूंनी या गोष्टी पसरवल्या असतील.)(राम व सीता हे भाऊबहिण -एकमेकांशी विवाहबद्ध होते असे उल्लेख बौद्ध रामायणात आढळतात. पहा - रिडल्स ऑफ हिंदुइझम, डॉ. आंबेडकर)

+१

बुद्धाच्या आहाराबद्दल दुर्गाबाईंनी लिहिलेले मीही वाचले आहे.

शिळे मांस नव्हे - तर एक विशेष पदार्थ - "सूकरमद्दव" - हा लेख खूप माहितीप्रद आहे. (नव्हे, ती लेखमालाच माहितीप्रद आहे.)

+१. मस्तच आहे मालिका.

लेख आणि प्रतिसाद माहितीपूर्ण

विसुनाना, चर्चाप्रस्ताव आणि प्रतिसादातील माहिती उपक्रमाचा दर्जा उंचावणारी आहे. काही प्रतिसादात काही लेखन संदर्भ आले असते तर बरे राहीले असते, असे वाटले. संदर्भ असले की पुस्तके उचकता येतात.
आणि मूख्य माहिती शोधण्यास मदत होते.

-दिलीप बिरुटे

धर्म

वरील चर्चा (मुख्यतः योगप्रभू - विसुनाना -प्रियाली ) उद्बोधक वाटली.

मात्र अनेक मुद्दे पटले नाहीत. मुळात योगप्रभूंचे लिखाण एका कादंबरीवर आधारित असल्याने थोडे अतिरंजित वाटले.

कित्येकदा इतिहासात एका दोन वाक्येच मिळतात. (उदा. गरुडध्वज हा शिलालेख.) अशा एकदोन वाक्यावरून अंदाज बांधावे थोडेफार परिस्थितीचे रिकन्स्ट्र्क्शन करावे हे साहजिक आहे. त्याचवेळा मूळ स्रोतांना बाधा येत नाही हे बघितले जाते. चांगले इतिहासकार त्याला आपला 'कयास' (सत्य नाही) असे संबोधतात. कादंबरीत कयास हा सत्यासारखा लिहिला जातो . (चांगल्या कादंबरीत त्यावर तळटीपातून टिप्पणी केली जाते ती गोष्ट वेगळी.

योगप्रभूंना मिळालेली कादंबरी (फार वाचनीय वाटते आहे. मिळवण्याचे प्रयत्न करीन.) ही कदाचित पूर्णपणे इतिहासाला धरून आणि कुठले अंदाज आणि कुठच्या साठी पुरावा आहे हे स्पष्ट करून लिहिली गेली असेल. मात्र पुष्यमित्र राजा होता. त्याने बृहद्रथाला मारले. (तो स्वत:ला सेनापती असे म्हणवत असण्याचा पुरावा आहे. पण त्यानंतर त्याची मुले राज्यकारभार करू लागली. त्याने ब्रुहद्रथाच्या वंशातला अजून कोणाला राजा म्हणून आणले नाही.) बौद्ध वाङ्मयात या राजाविरुद्ध बरेच लिहिले आहे. या तीन पुराव्यांवरून मला कादंबरीतील मांडणी पटली नाही. चंद्रगुप्त सभा, राजाचा बदफैलीपणा (राजे सरळमार्गी असणे हे जवळपास अपवादात्मक असावे. असे माझे मत आहे.), सैन्याचे वैदिक क्षत्रीय असणे (ब्राह्मण सेनापती असताना.) यांच्या मागे काही पुरावा आहे का याचा शोध घेणे गरजेचे आहे.

अवांतरः अशीच एक मांडणी हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद (का प्रह्लाद?) यांच्यात केली जाते. हिरण्यकश्यपू देव मानत नव्हता (?). नरसिंहाने त्याला मारले. त्यानंतर प्रल्हाद राजा झाला. यातील चमत्काराची घटना (नरसिंहाने हिरण्यकश्यपूस मारले) काढली तर. माझा कयास असा होतो की प्रल्हादाने हिरण्यकश्यपूस मारले व तो राजा झाला. गोष्टीत हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्याचे प्रयत्न (होळी चा चमत्कार), त्याने नास्तिक (?) वा विष्णूला न मानणे यात तथ्य असेल किंवा नाही सांगता येत नाही.

आता धर्माबद्दल. माझ्या वाचनात असे आले होते की स्वतः चंद्रगुप्त सरतेशेवटी जैन झाला होता. (ही जैन कथा आहे.) मुळात बुद्धाच्या काळी संसारी माणसाने हा मार्ग चोखाळायचा काही मार्ग होता का? का बुद्धाचा संघ हा केवळ सर्वसंगपरित्याग केलेल्या लोकांसाठीच होता. (माझ्या मते तसा होता.) जो संघातील भिख्खुंना मानतो आदरसत्कार करतो तो बौद्ध / जो कधीतरी संघात जाऊन भिख्खु व्हायची आस धरतो तो बौद्ध. अशी व्याख्या (कदाचित योग्य असेल) केली तर प्रजा बौद्ध होती अथवा नव्हती असा अर्थ होईल. पण ही संज्ञा तयार व्हायला वेळ लागेल असे मला वाटते. या करिता प्रजेला आपले रितीरिवाज टाकावे लागतात. एक उदाहरण म्हणून पौर्तुगिजांनी गोव्यातील धर्मपरिवर्तनाचे देता येईल. ख्रिश्चन धर्म स्वीकारलेली प्रजा कित्येक हिंदू रिवाज पाळायची (अ.का.प्रियोळकरांच्या पुस्तकात हे मी वाचले आहे.). हे बंद होण्यासाठी अगदी साध्या साध्या रिती गुन्हे म्हणून पोर्तुगिजांनी नोंदवले होते. (त्यांची मोठी यादी पुस्तकात आहे. ) हे एवढ्या काळजीपूर्वक केले नाही तर दोन धर्मात फरक करणे कठीण जाते. आजही जैन धर्मातील लोक कित्येक हिंदू देवतांची पूजा करताना दिसतात. बौद्धांची गोष्ट अजून वेगळी नाही. थायलंड मध्ये गणपती दैवत दिसणे नवीन नाही. भारतात तर बुद्धाला हिंदू केले गेले. (त्यांची धर्मस्थळे ब्राह्मणांच्या ताब्यात आहेत्.) ज्या एकसंघ रितीने मुख्यतः कॅथॉलिक धर्म आहे (सर्व नेमणुका, संपत्ती एकत्रित पणे केली जाते.) त्या एकसंध रितीने भारतातील धर्म अस्तित्वात नव्हते (जाती संस्था मात्र एकसंघ असाव्यात.). कदाचित आताही नाहीत. अशा वेळी धार्मिक संघर्षाच्या चश्म्यातून या इतिहासाला पाहता येईल का?

हल्लीच्या काळातील लिंगायत व रामकृष्णांचा धर्म (का कल्ट ) यांना कुठे घालावे हा प्रश्न कदाचित बुद्धकाळातील बौद्ध धर्माबद्दल विचारता येईल. या दोन्हीतील काही पुढार्‍यांचे मत आहे की ते हिंदू नाहीत. भविष्यकाळात त्यांचा र्‍हास वा हिंदू धर्माचा र्‍हास झाला तर आपण आजच्या काळातल्या संघर्षाने तो झाला असे म्हणण्यासारखे होईल. (आ़ज हिंदू-लिंगायत वा हिंदू -रामकृष्णी संघर्ष जाणवत नाही)

वरील विवेचन हे कयासात्मक आहे. पण विरुद्ध पुरावा मिळेस्तोवर कदाचित मी तो धरून ठेवेन.

प्रमोद

एक फरक

वरील बरेचसे विवेचन पटण्यासारखे आहे परंतु

हल्लीच्या काळातील लिंगायत व रामकृष्णांचा धर्म (का कल्ट ) यांना कुठे घालावे हा प्रश्न कदाचित बुद्धकाळातील बौद्ध धर्माबद्दल विचारता येईल.

हे तितकेसे पटले नाही. याचे कारण बौद्ध धर्म हा झपाट्याने पसरला होता. तसेच तो अनेक शासनकर्त्यांनी स्वीकारला होता. अशोकाच्या शिलालेखांनुसार या धर्माचे पालन व्हावे अशी अपेक्षा दिसते. बौद्ध धर्म अशाच झपाट्याने वायव्येला आणि आग्नेयेला पसरला. पैकी वायव्येचे काय झाले हे सांगायला नको आणि आग्नेयेत तो अद्यापही टिकून आहे. त्यामु़ळे लिंगायत आणि इतर कल्ट्सशी बौद्धधर्माची समान तुलना होत नाही असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.

मान्य

तुमचा मुद्दा (बुद्ध धर्माच्या व्यापकतेबद्दलचा) हा मान्य आहे. बुद्ध धर्माची व लिंगायतांची (जरी त्यांची लोकसंख्या भरपूर आहे.) तुलना होणार नाही.

त्याकाळी बुद्ध धर्म आणि हिंदू धर्म हे दोन्ही आज ज्या स्वरूपात धर्म बघतो, तसे ते होते का? त्यांच्यात संघर्ष झाला. (संघर्ष हा शब्द मला हिंसायुक्त वाटतो.) या इंटरप्रिटेशन साठी मला आक्षेप आहे. आज लिंगायत आणि हिंदू यात संघर्ष जाणवत नाही. या हेतूने लिंगायत धर्माचा माझा उल्लेख होता. ज्यावेळी बौध्द धर्म झपाट्याने प्रसरत होता त्याच वेळी वासुदेवाचा वैष्णव धर्म हा देखिल प्रसवत होता. (हा धर्म आज आपण वेगळा मानत नाही ही गोष्ट वेगळी.) वैदिक (यज्ञयाग) - वैष्णव वा वैष्णव - बौद्ध अशा संघर्षांबद्दल कोणी बोलत नाही. तसेच लिंगायत - हिंदू संघर्षाचे आहे. असे काहीसे हे म्हणणे आहे.

प्रमोद

प्रमोदजी मी पुरेसे स्पष्ट केले आहे की...

प्रमोदजी,
मी दिलेली फूटकळ माहिती अवांतर वाचनातून संकलित असल्याने अपुरी (अगर चुकीची म्हणजे मांडणी चुकलेली) वाटण्याची शक्यता आहे, हे मी पहिल्या प्रतिसादाच्या सुरवातीलाच स्पष्ट केले आहे. आपणास माझे लेखन एका कादंबरीवर आधारलेले असल्याने अतिरंजित वाटले असेल, पण ते कपोलकल्पित नाही एवढे निश्चित कारण ऐतिहासिक कादंबरीत २० टक्के भाग काल्पनिक असला तरी उरलेला ८० टक्के भाग इतिहासाच्या भक्कम पुराव्यावर आधारित लागतो आणि अभ्यासाची ही शिस्त कादंबरीकारालाही पाळावी लागते. असो. काही नवी आणि रंजक माहिती देण्याचा माझा उद्देश होता. मी कादंबर्‍यांना प्रमाण मानत नाही, पण जंत्रीवजा आणि सैद्धांतिक पुस्तकांपेक्षा तो विशिष्ट काळ डोळ्यापुढे उभे करणारे लेखन मला आवडते, हे पण नमूद केले आहेच.

ब्रुहद्रथ हा निपुत्रिक होता आणि तरुण वयात त्याचा वध झाला. तोच मौर्य कुळाचा अखेरचा एकमेव वारस असेल तर त्याच्या वंशातील अजुन कोणाला राजा म्हणून आणणार?
म्हणजे मगधाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व सर्वोच्च मानून राजसभेने सत्ता शुंग घराण्याकडे सोपवली असेल तर त्यात पुष्यमित्र दोषी कसा ठरतो? बौद्ध साहित्यात त्याच्याविरुद्ध वाईट लिहिले आहे म्हणजे तो वाईट होता का? इंटरप्रिटेशनचे स्वातंत्र्य दोन्ही बाजूला आहे.

पुष्यमित्राविषयी जाणून घेण्यासाठी इतिहासाची (पुरावासिद्ध) पुस्तके पाया आहेतच, पण त्याचबरोबर
१) भाऊ धर्माधिकारी यांची कादंबरी (तर्काधारे दुवे सांधण्यासाठी)
२) चाणक्याचे अर्थशास्त्र (मगधाची प्रशासनव्यवस्था समजून घेण्यासाठी)
३) मुद्राराक्षस नाटक (मौर्यकालीन संबोधने, राजकारण, भाषा व संस्कृती समजण्यासाठी)
४) मालविका-अग्निमित्र नाटक (पुष्यमित्राची जवळची नाती समजण्यासाठी)
५) सावरकरांचे 'सहा सोनेरी पाने' हे पुस्तक (सर्वसाधारण वाचनासाठी)
६) बौद्ध साहित्य (विरोधी दृष्टीकोन समजण्यासाठी)

ही साधनेही काळजीपूर्वक अवलोकन करणे महत्त्वाचे ठरेल. त्यानंतर मग कुठे आपण सहमत-असहमत होऊ शकू, असे आपले मला वाटते. (चु. भू. दे. घे.)

दत्तक

तुम्ही दिलेल्या प्रतिसादात तृटी होत्या असे म्हणण्याचा माझा उद्देश नव्हता. तर कादंबरीतील अतिरंजितता कितपत ग्राह्य. कादंबरीत ८० टक्के २० टक्के अशी विभागणी मात्र मला मान्य नाही. इतिहासातील चार दोन वाक्ये
(जशी गरुडध्वज शिलालेखातील वाक्ये.) हे कादंबरीचे बीज असू शकते. आणि १० टक्के ऐतिहासिकता ९० टक्के काल्पनिकता इत्यादी राहू शकते. मराठी नाटक/कादंबरीतील घरगुती संवाद हे जवळपास इतिहासाधारित नसतात पण त्यातील ८०-९० टक्के जागा व्यापतात हे त्यातले एक उदाहरण.

राजा निपुत्रिक निवर्तला म्हणजे त्याच्या घराण्यातले (वंशातले हा माझा शब्द प्रयोग) मूल दत्तक/वारस म्हणून पुढे आणणे हे इतिहासात बरेचदा घडते. (माधवरावा नंतर नारायणराव व त्यानंतर सवाई माधवराव नंतर राघोबा, तसेच दुसर्‍या शिवाजी नंतर, शाहू नंतर, सयाजी गायकवाड, यशवंतराव होळकर इत्यादी.). सेवकाने परिस्थितीचा फायदा न घेण्यासाठी हे नियम आपसूक झालेले असावेत. (इंग्लंडचा राजा निपुत्रिक निवर्तल्यावर वा कुठला अमीर निवर्तल्यावर त्याच्या घराण्यातला वारस कसा शोधायचा यावर काटेकोर नियम आहेत.) आपल्या गोष्टीत ब्रुहद्रथ हा पिढीजात राजा होता. त्यामुळे मौर्य घराण्याशी संबंधित कोणीच नव्हता हे पटण्यासारखे नाही (कदाचित खरे असेल पण तसा शोध घेतला आणि कोणी मिळाले नाही याचा ऐतिहासिक पुरावा लागेल.)

तुम्ही दिलेल्या पुस्तकांपैकी चाणक्याचे अर्थशास्त्र, मुद्राराक्षस, सहासोनेरी पाने ही पुस्तके माझ्या वाचनातली आहे. इतर पुस्तके बघावी/वाचावी म्हणतो.

चंद्रगुप्त सभा यावर कुठे माहिती मिळेल? (अर्थशास्त्र वा मुद्राराक्षसात मला ती आढळली नाही.) कारण इतिहासाचा अन्वयार्थ लावताना तो एक कच्चा दुवा वाटतो. (पुष्यमित्र अगदीच साधा भोळा वाटतो.)

अवांतरः नाना फडणवीसाने (जो वयाने मोठा होता.) बारभाई (सभे) नुसार सवाई माधवरावाच्या लहानपणी राज्यकारभार पाहिला. सवाई माधवराव वेडा होता. वेडाच्या भरात आत्महत्या करून मेला. निपुत्रिक होता. म्हणून नाना फडणवीसाने त्यानंतर राज्य केले. हे पुष्यमित्र (नाना) ब्रुहद्रथ (स.मा.) गोष्टीला जोडणारे उदाहरण वाटते ना.

प्रमोद

कृपया लक्षात घ्यावे

ऐतिहासिक कादंबरी नेहमीच अतिरंजित असते, असे नाही. त्यापूर्वीची पायरी म्हणजे ती रंजक, कल्पनारम्य आणि संवादात्मक असते. मी पुन्हा एकवार स्पष्ट करु इच्छितो, की कादंबरीकार वर्णनात कल्पनास्वातंत्र्य घेत असले तरी कादंबरीचा मूळ पाया हा अस्सल ऐतिहासिक साधनांवरच आधारलेला लागतो. तेथे बनवाबनवी चालत नाही. केवळ दोन वाक्यांच्या नोंदीवर कादंबरीचा डोलारा उभारणे केवळ अशक्य असते. वानगीदाखल आपण मराठीतील गाजलेल्या कादंबर्‍यांचे उदाहरण घेऊया. रणजित देसाईंनी 'स्वामी' आणि 'श्रीमान योगी' या कादंबर्‍या लिहिण्यापूर्वी मराठा दप्तरातील कागदपत्रांचा अभ्यास आणि त्याविषयी इतिहासकारांशी चर्चा केली होती. कादंबर्‍या सिद्ध झाल्यावर त्यातील त्रुटी समीक्षकांनी दाखवून दिल्या असतील, पण कल्पनारम्यतेवर आक्षेप घेतलेला नाही (माधवराव पेशब्यांच्या पदरी असलेले श्रीपती-मैना हे सेवक जोडपे किंवा शिवाजी महाराजांच्या खास सेवेत असलेला महादेव अंगरक्षक किंवा मनोहारी दासी हा लेखकाचा कल्पनाविलास असू शकेल पण पेशवे अथवा महाराजांनी उघडलेल्या मोहिमांच्या तारखा आणि तपशिलात घोळ घालून कसा चालेल? एका विशिष्ट तारखेला महाराज हैदराबाद मुक्कामी असतील तर कादंबरीत ते त्यावेळी सातारा किल्ल्यावर आजारी पडल्याचे दाखवता येणार नाही. यासाठीच घडलेल्या घटनांचा इतिहासाने नमूद केलेला सुसंगत क्रम समोर ठेवावा लागतो.

बरे प्रत्येक वेळी अशा त्रुटी केवळ इतिहासकारांनाच उमगतात, असे नाही. सर्वसामान्य वाचकही त्यावर आक्षेप घेऊ शकतो. प्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर यांनी याचा किस्सा एकदा सांगितला होता. एक ऐतिहासिक कथा फुलवताना लेखकाने पेशवे पती-पत्नीमधील एक प्रेमाचा प्रसंग वर्णन केला होता आणि पत्नी पतीच्या घनदाट केसात बोटे फिरवत गूजगोष्टी करते, असे दाखवले होते. त्यावर चाणाक्ष वाचकांनी आक्षेप घेतला. पेशवे जर शेंडी व घेर्‍याखेरीज बाकी डोक्याचा तुळतुळीत गोटा करत असतील तर घनदाट केस कुठून आले? अशी शंका वाचकांनी विचारली. म्हणजे बघा. तपशील जाणून घेतल्याखेरीज केलेले सैल लेखन कसे अंगाशी येते ते.

(ना. सं. इनामदार यांच्या ऐतिहासिक कादंबर्‍यांवर सेतु माधवराव पगडी यांनी केलेली टीका मी वाचली आहे. पण मला ती वाजवीपेक्षा अधिक कठोर वाटते. इनामदारांनी कादंबर्‍यात मूळ इतिहासाचा पाया पार कोसळवून टाकला आणि स्वतःचा नवाच इतिहास निर्माण केला, असे पगडींनाही म्हणता आले नसते.)

बौद्ध धर्माचा ऱहास

This comment has been moved here.

 
^ वर