भारतीय राजकारण्यांना उद्योगपतींना धडा शिकविणाऱ्या उधमसिंघ भगतसिंह ची खरी गरज आहे.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥

भगवान श्री कृष्ण यांनी अर्जुनाला युद्धाच्या रणांगणात भर युध्दामध्ये गीता सांगत आहेत. हे भारता(भरतवंशी अर्जुना), जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो. सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो.....
...आणि भगवंताच्या शब्दावर विश्वास ठेवून भारतीय जनता सामान्य माणूस महाभारत संपल्यावर आणि विशेषत: गेली ६३ वर्षे त्या भगवंताची वाट पाहत स्वातंत्र्यात कसेबसे दीवस कंठत आहे. पण आजच्या भारताची दुरवस्था पाहता भगवान अजून या देशाचा किती सत्यानाश होई पर्यंत प्रकट होण्याची वाट पाहणार आहे? हा प्रश्न निर्माण होतो.

आजचे शासनकर्ते पाहीले म्हणजे कोरव दुशासन कंस दुर्योधन या पेक्षा वेगळे असतील असे वाटत नाही.आणि तरीही भगवंत कोठे चिरनिद्रा घेत झोपले आहे समजत नाही..... की आज आपण अवतार घेतला तर हे आजचे शासनकर्ते मलाच गुन्हेगार म्हणून सिद्ध करून शिक्षा करतील या भीती मुळे नको तो अवतार असा विचार करून भगवंत चिरनिद्रा घेत असतील. अशी शंका भारताच्या सद्य दुरवस्थेस पाहून येते.
आज वर्तमानपत्रात ( लोकसत्ता ) संपादकांचा अग्रलेख वाचला. आता पंजाब मधील शेतकरी सुद्धा रासायनिक खते, पाण्याचा बेसुमार उपसा, यामुळे शेत जमिनीचा झालेला सत्यानाश आणि वर
अंगावर कर्जाचा डोंगर या भारतीय शेतकऱ्याला वर्षानुवर्षे पिडणाऱ्या त्रासा मुळे आत्महत्या करत आहे . हे वाचले, आणि २१व्या शतकाच्या गप्पा मारणाऱ्या आपल्या राजकारणी लोकांना याची लाज कशी वाटत हा प्रश्न ? मनात निर्माण झाला . पंजाब सारख्या सुजलाम सुफलाम ची ही दुरवस्था तर इतर राज्यातील शेतकऱ्यांची काय दुरावस्था असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. महाराष्ट्रात नेहमी प्रमाणे खते आणि बी-बियाणाचा तुटवडा सुरु झाला. ऐन पेरणीच्या वेळीच या वस्तू गडप होतात. दर वर्षी खता करता शेतकऱ्यांना लाठ्या खाव्या लागतात.सरकार, नोकरशाही , लोक प्रतिनिधी, राजकारणी शेतकऱ्यांचे मसीहा म्हणवून घेणारे काय झोप काढतात. मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यात खता साठी शेतकऱ्यांना पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाव्या लागत आहे. खत-बीबियाणे पुरवणे हा कांही फार मोठ्या आपत्ती व्यवस्थापनाचा प्रसंग नाही. एव्हडे साधे नियोजन यांना करता येत नाही तर खुर्ची वर राहण्याचा यांना काय अधिकार ? जनतेला २१व्या शतकात नेण्याची स्वप्ने दाखवून त्यांच्या जीवावर किती दीवस हे राजकारण करणार.

आज भ्रष्ट्राचाराच्या जाळ्यात नोकरशाही, शासनकर्ते राजकारणी पूर्णपणे अडकली आहेत.फक्त पंतप्रधान, अध्यक्ष प्रामाणिक आहेत म्हणून ढोल बडवण्यात अर्थ नाही. माणसाची किमत त्याच्या आसपास असणाऱ्या वावरणाऱ्या माणसा वरून त्याच्या मित्रा वरून ठरत असते . आणि यामुळे या पंतप्रधान, अध्यक्ष यांच्या भोवती जी भ्रष्ट्राचाराची भुतावळ फेर धरून नाचते, ते पाहीले की यांना स्वच्छ चारित्र्याचे म्हणणे सामाजिक,आर्थिक नित्तीमतेचा अपमान करणे होय. इंडियन मेडिकल असोसिअशन चा भ्रष्ट्र अध्यक्ष १२०० कोटी बेहिशोबी मालमत्ता जमा करतो पण यांना समजत नाही. कालच रेल बोर्डाच्या मुलाला एक एक परीक्षा पेपर ३.५ . ४ लाखाला विकल्या मुळे अटक झाली. रेल बोर्ड काय, मेडिकल असोसिअशन काय या सर्वांवर केंद्राचे सरळ नियंत्रण आहे. हे उच्चभ्रू लोक नेहमी मंत्री गणात वावरत असतात. CBI पासून ते सर्व यंत्रणा हाताशी असताना शासन , पक्ष प्रमुखास हे काळे कारनामे माहित नसतात हा सर्व प्रकार म्हणजे सो चुव्हे खाके बिल्ली चल्ली हज को असा आहे. जो पर्यंत हिशोब वर पोहचत होते मांजरा सारखे सर्व जण डोळे मिटून होते. लाच घेण्याच्या पैशाने कोट्टीच्या कोटी उड्डाणे पार केलीत तरी पण हे प्रामाणिक, स्वच्छ चारित्र्याचे म्हणून मिरवत असतात. यांचे चेले यांच्या आरत्या गातात मेरा देश महान म्हणत जय हो च्या घोषात सामान्य माणसाचा आवाज दाबून टाकतात.

भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्या वर भाषण ठोकताना लाचखोर , भ्रष्ट्र साठेबाजांना जाहीर फाशी देण्याचे भाषण ठोकले होते. आता बदललेला त्यांचा तरुण नेता तीच भाषा करतो पण यांनाच काय संसदेवर हल्ला करणाऱ्यांना, मुंबईवर हल्ला करणाऱ्यांना ,दंगलखोरांना सुद्धा फाशी देण्याची यांची हिम्मत होत नाही. एवढे हे षंढ झाले आहे.महात्म्याच्या अहिंसाच्या नसबंदीचे हे मोल आपण अजून किती दीवस चुकवणार? दुसऱ्या महायुद्धा नंतरच्या सर्वात मोठ्या भयानक, अंगावर काटे आणणाऱ्या अमानुष , मानवजातीस काळीमा फासणाऱ्या भोपाळ हत्त्याकांड कत्तलीस जबाबदार असणाऱ्यांना साधी शिक्षा ही होत नाही. बेशरमपनाच कळस म्हणजे या कत्तलीस जबाबदार असणाऱ्या कारखाना मालकास भारतातून पळून जाण्यास आमचे त्या वेळचे सर्वोच्च राजकारणी मदत करतात,ही गोष्ट जनते पासून लपवतात आणि पापाला वाचा फुटल्यावर बेशरमपणे कायदा सुव्यवस्था ,शांतता राखण्यासाठी त्या गुन्हेगारास पळून जावू दिले असे निर्लज्जपणे सांगतात. अमेरिकन सरकार, कंपनी या हत्त्याकांडा ला आम्ही जबाबदार नाही म्हणत हात वर करतात आणि आपले भ्रष्ट्र नेते यांचे तळवे चाटत डोवू DOW कंपनीला परत एक हत्त्याकांड करण्यास मुक्त परवाना देतात. त्याच बरोबर आपल्या फसलेल्या वीज नियोजनाच्या पापाची जबाबदारी न घेता, पाप न फेडता आण्विक वीज निर्मिती चे नवीन ढोल वाजवले जातात. अमेरिकन कंपन्यांच्या फायद्या साठी कारखान्याच्या सुरक्षिततेचे , दुर्घटनेच्या जबाबदारीचे, कोणतेही कायदे न करता भारतीय सामान्य जनतेला परत एका मृत्यू तांडवात ढकलले जात आहे.

आज भारतास भगतसिंह,आझाद,सुखदेव,राजगुरू , उधमसिंघ यांची गरज आहे. उधमसिंघ ज्याने इंग्लंड मध्ये जावून Scott ला मारून जालियानवाला बागेच्या हत्त्याकांडाचा बदला घेतला . आज अंडरसन भारतात येत नसेल अमेरिका त्यास संरक्षण देत असेल तर तेथे त्याच्या मायदेशात जावून ठार करून भोपाळवासियांना न्याय देणारा आणि भारतीय राजकारण्यांना उद्योगपतींना धडा शिकविणाऱ्या उधमसिंघ भगतसिंह ची खरी गरज आहे. आणि तोच धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥ म्हणणारा श्रीकृष्ण असेल

It Happens Only In India !!!! ?

.Thanks & regard,

Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

Comments

आळशाच्या तोंडावरचे जांभूळ

ठणठणपाळजी,
आपला समाज इतका सुस्त झाला आहे, की 'आळशाच्या तोंडावर जांभूळ ठेवले तरी तो म्हणतो, जरा आत ढकला ना' अशी अवस्था आहे. निवडणुकीच्या वेळी बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावायचा नाही आणि मग निवडून आलेले घाणेरडे टोणगे उरावर बसले, की पाच वर्षे हाय हाय करत बसायचे, या मनोवृत्तीला काय म्हणावे बरे? मला तर वाटते, की एकतर लोकशाहीची किंमत आपल्याला समजलेली नाही किंवा 'ठेविले अनंते तैसेचि राहावे' या आत्ममग्नतेतून बाहेरच यायचे नाही. ब्रिटनची लोकशाही जास्त मुरलेली आहे. दुसरे महायुद्ध जिंकून देणार्‍या चर्चिलला नंतरच्या निवडणुकीत ब्रिटीश मतदार सहजतेने घरी बसवतात. अकरा वर्षे 'पोलादी महिला' म्हणून पंतप्रधान राहिलेल्या मार्गारेट थॅचर एकेदिवशी आपणहून सत्ता सोडतात आणि दुसर्‍या दिवसापासून बाजारात पिशवी घेऊन सहजतेने भाजी आणायला जातात. तिथेही लोक त्यांना 'हाय मॅगी' एवढेच अभिवादन करून आपल्या कामाकडे वळतात. खरंच कौतुक आहे. हे चित्र दिसलंय का कधी आपल्याकडे?
तुमच्या लेखनातून पराभूत मानसिकतेचा पारंपरिक भारतीय सूर आळवला गेला आहे. समाज म्हणून आपली ताकद ओळखायची नाही आणि 'कृष्णदेवा जन्म घ्या हो आता' असा धावा करत बसायचे. कृष्ण कशाला धावून येईल आपल्या मदतीला? तोही निराश झाला असेल. ज्या समाजाला आपणहून जागरूक राहायचे नाही त्याच्या मदतीला त्याने तरी का धावायचे? नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राजकारणी आणि जनतेच्या निर्लज्जपणाचा कळस झाला आहे. महाराष्ट्र काही मागास राज्य नाही आणि इथल्या मतदारांना अशिक्षित म्हणता येत नाही तरीही घराणेशाहीचा विजय होतो. नवरा-बायको-मुलगा-मुलगी-पुतण्या-भाचा सगळेजण विविध पदांवर सत्ता उपभोगू लागतात. यांच्या जहागिर्‍या तयार होतात आणि दुसरीकडे लाखो शेतकरी कर्जाच्या बोजाखाली आत्महत्या करतात.
समाजात चीड आणि उद्रेक निर्माण होत नाही तोवर क्रांतिकारक जन्माला येत नाहीत. याबाबतीत तुमची भावनाविवशता मौजेची वाटते. तरीपण तुमचा टाहो सत्याच्या कसोटीवर घासून बघूया.
१) भारतात फ्रेंच राज्यक्रांती होणार नाही. फ्रेंच राज्यक्रांती मध्यमवर्गाने घडवली होती. भारतातील् मध्यमवर्ग आत्मतृप्त आणि चंगळवादात गुरफटलेला आहे.
२) भारतात रशियन क्रांती होणार नाही कारण गरीब शेतकरी व कामगार हा वर्ग मोडून पडला आहे.
३) भारतात हिटलरसारखा हुकूमशहा होणार नाही कारण ते आपल्या लोकशाही तत्वाच्या विरुद्ध आहे आणि आपल्याला कुणालाच तसे होणे आवडणार नाही.
४) भारतीय समाज एकजिनसी नाही. विविध जाती-धर्माच्या गुंत्यात, स्वार्थ आणि भ्रष्टाचाराच्या दलदलीत तो एकदिश (युनिडायरेक्शनल) नाही तर विकेंद्रित (स्कॅटर्ड) वाटचाल करतो आहे. म्हणजेच सामाजिक क्रांतीलाही पोषक स्थिती नाही.

मग बदल घडवण्यासाठी काय काय करता येईल? उपक्रमी मित्र यावर का बोलत नाहीत? की हा विषय याआधी चर्वण करून झाला आहे?

याने काय साध्य झाले?

भारतीय राजकारण्यांना उद्योगपतींना धडा शिकविणाऱ्या उधमसिंघ भगतसिंह ची खरी गरज आहे
भगतसिंग आणि उधमसिंग यांच्या शौर्याबद्दल माझ्या मनात आदरभाव आहे आणि मला त्यांचा अभिमानही वाटतो. पण दोन चार ब्रिटिश अधिकार्‍यांची हत्या झाल्याने इतर ब्रिटिशांना धडा मिळाला आणि तो शिकल्यामुळे दुसरा कोणीही इंग्रज अधिकारी व्हायला तयार झाला नाही असे काही घडले नाही. भारतीय राजकारणी, उद्योगपती वगैरेंच्या बाबतीत ते घडेल असे आपल्याला कां वाटते? समजा तसे झाले आणि राजकारणी व उद्योगपती नाहीसे होऊन गेले तर देशाचा कारभार आपल्या आप व्यवस्थितपणे चालणार आहे काय?

दुरगामी परिणाम । सहमत

भगतसिंग वगैरेंच्या शौर्याने तात्कालिन परिणाम झाले नसले तरीही भारतीय समाजाच्या मानसिकतेत स्वातंत्र्यलढ्याबद्दल आत्मविश्वासाचे प्रमाण निश्चितच वाढले असणार.

प्रस्तुत लेखात मांडलेल्या समस्यांसाठी अशी कृत्ये फायदेशीर (तात्कालीन व दुरगामी) ठरू शकतील का या साशंकतेशी सहमत आहे.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

ह्म्म्म्

योगप्रभूंच्या म्हणण्याशी सहमत आहे. पण पुढे जाऊन मी काही म्हणू इच्छितो.

१) भारतात फ्रेंच राज्यक्रांती होणार नाही. फ्रेंच राज्यक्रांती मध्यमवर्गाने घडवली होती. भारतातील् मध्यमवर्ग आत्मतृप्त आणि चंगळवादात गुरफटलेला आहे.

एवढेच नाही तर दुसरा कोणी काहीही आंदोलन करू पहात असेल तर "कोणतेही आंदोलन हे समाजविकासाच्या विरोधी असते" असा बुद्धिभेद करण्यात मध्यमवर्ग आघाडीवर आहे.

२) भारतात रशियन क्रांती होणार नाही कारण गरीब शेतकरी व कामगार हा वर्ग मोडून पडला आहे.

कुठलीही क्रांती मध्यमवर्गच करीत असतो. १७-१८ व्या शतकातली भांडवलशाही क्रांतीही तत्कालीन मध्यमवर्गानेच केली होती तसेच रशियन क्रांतीबाबतही आहे. क्रांती करणारा लेनिन व त्याचे साथी मध्यमवर्गीयच होते. पण मध्यमवर्गच उदासीन झाल्यामुळे क्रांती होत नाही.

आणि उद्योगपतींना धडा वगैरे शिकवण्याच्या कसल्या गोष्टी करता? उद्योगपती हेच देशाच्या विकासाचे प्राईम मूव्हर असतात असे आपल्याला समाजधुरीणांकडून गेली १८ वर्षे ११ महिने सांगितले जात नाहीये का? उलट त्यांना त्यांच्या (नफा कमावण्याच्या) उद्योगात सरकारी नियंत्रणांचा जाच नसावा असेही आपण ऐकत आलो आहोत.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

बदल

देशातील अनेक क्षेत्रात क्रांतीकारक बदल होण्याची आवश्यकता आहे, हे मान्य. हे बदल एकदम घडण्यासाठी क्रांती व्हावी ही अपेक्षा मात्र अवास्तव आहे. सकारात्मक बदलांकडेही लक्ष दिले जावे (उदा. माहितीचा अधिकार) व तशाप्रकारचे बदल व्हावेत दबावगट निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा ठेवणे योग्य आहे.

@नितिन थत्ते

उद्योगपती हेच देशाच्या विकासाचे प्राईम मूव्हर असतात असे आपल्याला समाजधुरीणांकडून गेली १८ वर्षे ११ महिने सांगितले जात नाहीये का? उलट त्यांना त्यांच्या (नफा कमावण्याच्या) उद्योगात सरकारी नियंत्रणांचा जाच नसावा असेही आपण ऐकत आलो आहोत.

या नफा कमावण्याच्या उद्योगात नियमन कमी झाल्याने विकासदर वाढला आहे. दारिद्र्यरेषेखाली असलेल्या लोकांची संख्या कमी होत आहे. 'नफा कमावण्याच्या' उद्योगात नियंत्रण कमी करण्याचे धोरण बर्‍याच अंशी यशस्वी ठरले आहे. (उदा. देशात पसरलेले फोनचे जाळे. ) योग्य ठिकाणी नियंत्रण असावे व उद्योग कमीत कमी नियंत्रणासाठी प्रयत्नशील असतील हे खरेच आहे. असे प्रयत्न व व्यापक सामाजिक हित यांच्यातील संघर्ष (समाजधुरीण कुठलेही विचार मांडत असले तरीही) नेहमीच होत राहणार.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

अभिप्राय

नक्षल् क्रान्ति करतिल् का

 
^ वर