आजचा सुधारक मासिकाचा अंधश्रद्धा विशेषांक
आजचा सुधारक’ या विवेकवादी वैचारिक मासिकाचा अंधश्रद्धा विशेषांक’ येत्या एप्रिल मध्ये प्रसिद्ध होत आहे. या अंकाचे अतिथी संपादकत्व मला मिळाले होते.
या अंकात अंधश्रद्धांधा वैचारिक आणि ऐतिहासिक वेध घेतला आहे. याशिवाय फलज्योतिष्य, मंत्र मांत्रिक, चमत्कार, भूतयोनी आदिंचा समावेश यात आहे. होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी, चिनी, चुंबकचिकित्सा अशा भिन्न वैद्यक परंपरा, मिथ्याविज्ञाने, आधुनिक अंधश्रद्धा, धार्मिक अंधश्रद्धा आदिंवर येथे लिखाण आहे.
सर्वसामान्य लोकांचा श्रद्धा व अंधश्रद्धांना नेमका काय प्रतिसाद असतो हे जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केले गेले. असे सर्वेक्षण महाराष्ट्रात वा भारतात पहिल्यांदाच घेतले असावे. या सर्वेक्षणात लोकांचा देवाबद्दलच्या कल्पना, मंत्र, चमत्कार, आयुर्वेद यावर प्रश्न विचारले होते. समाजातील विविध थरातील जवळपास अडीचशे लोकांनी सर्वेक्षणात आपले मत नोंदवले.
हे जग देवाने निर्माण केले, आपली प्रार्थना देव ऐकतो व त्याचे फळ देतो, देव प्रत्येक घटनेवर नियंत्रण ठेऊन असतो. या तीन विधानांवर विश्वास दर्श्ववणार्यांथची संख्या जवळ पास 70 टक्के होती. माहित नाही वा मत नाही सांगणारे साधारण 12 टक्के होते. तर अविश्वास दर्शवणारे जवळपास 15 टक्के होते. हे आकडे काही प्रगत देशापेशांसारखेच असावे. मंत्र, चमत्कार आणि फलज्योतिष्य यावर विश्वास दर्शवणारे केवळ 30 टक्के लोक होते. या संबंधी माहित नाही, मत नाही म्हणणारे 20 टक्के होते. तर अविश्वास दाखवणारे लोक निम्याहून अधिक होते.
लोकांची सामाजिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी काही प्रश्न विचारले होते, त्यानुसार वय, शिक्षण व उत्पन्न गट यावरील माहिती लोकांनी दिली. वय व उत्पन्न गटातील भिन्नतेने फारसे मत बदलत नाही असे कळले. मात्र शिक्षण वाढल्यावर लोकांचा कल श्रद्धा ठेवण्याकडे कमी झुकतो असे लक्षात आले.
अधिक खालील तक्त्यावरून हे स्पष्ट होईल.
(पूर्व परिक्षण पाहिल्यानंतर हे ल्क्षात येते की तक्ता नीटसा येत नाही.)
प्र 1 प्र 2 प्र 3 प्र 4 प्र 5 प्र 6 प्र 7 प्र 8
अ 37 28 26 16 12 8 8 27
ब 16 25 18 12 14 21 22 41
क 15 13 16 26 16 14 14 19
ड 13 13 16 22 23 24 28 7
इ 16 17 21 19 34 32 26 6
फ 3 4 3 4 1 2 1
विचारलेले प्रश्न व उत्तरे
खालील विधानावर पुढील पर्याय सांगा. अ- पूर्ण विश्वास, ब – विश्वास, क- मत नाही, ड- अविश्वास, इ – पूर्ण अविश्वास, फ- चुकीचा प्रश्न
प्र 1. हे जग देवाने निर्माण केले
प्र 2 आपली प्रार्थना देव ऐकतो व त्याचे फळ देतो
प्र 3 देव प्रत्येक घटनेवर नियंत्रण ठेऊन असतो.
प्र 4 पुराणकाळी मानव आजच्यापेक्षा जास्त प्रगत होता
प्र 5 मंत्रामध्ये भलेबुरे करायची शक्ति असते
प्र 6. काहीजणांकडे चमत्कार करण्याची शक्ति असते.
प्र 7 जन्मवेळेनुसार केलेल्या कुंडलीकडे वा हाताच्या रेषांकडे बघून जाणकार मंडळी तंतोतंत भविष्य सांगतात.
प्र. 8 आयुर्वेद हे संपूर्ण विज्ञान आहे.
Comments
पूर्ण विश्वास आणि विश्वास
अ. पूर्ण विश्वास आणि ब. विश्वास यांत फरक काय? (असाच प्रश्न अविश्वास आणि पूर्ण अविश्वासासाठी) उत्तरे देताना हा फरक कळावा म्हणून प्रश्न विचारत आहे. अन्यथा, विश्वास पानिपतावर मेला अशीच धारणा आहे. - ह. घ्या.
फरक विश्वासाच्या दर्जाचा
अडीचशे पैकी एकानेही असा प्रश्न विचारला नव्हता. बरेचसे लोक अ ऐवजी ब उत्तर देताना कमी डचमळले. हे डचमळणे या उत्तरात नोंद झाले आहे.
एक आठवण म्हणजे. सुरुवातीला फ हा पर्याय नव्हता. पहिल्या एकदोन प्रतिसादात तो घालावा लागला. आणि ते योग्य ही होते असे मला नंतर जाणवले.
प्रमोद
फरक
बहुधा पूर्ण विश्वास = मला महिती आहे
विश्वास = मला वाटते
तसेच उलट असावे.
हे पर्याय बहुतेक स्ट्राँगली ऍग्री , ऍग्री, डोन्ट नो, डिसऍग्री आणि स्ट्राँगली डिसऍग्री यांचे रूपांतर आहे.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
छान सर्वेक्षण
एक सूचना अशी करेन की हा (की ही?) विदा आलेखस्वरूपात मांडावा. मी प्रयत्न केला पण एक्सेलमध्ये एकच एक ओळ चिकटते. विशेष करून दोन गोष्टी पहायला आवडतील.
१. प्रत्येक प्रश्नासाठी उत्तरांचं विभाजन (क्ष अक्ष अ, ब, क इ) यातून कशावर अधिक व कशावर कमी विश्वास आहे हे दिसेल.
२. प्रत्येक पर्यायासाठी सर्व प्रश्नांना मिळून एकंदरीत उत्तरं किती आली आहेत यांचा आलेख (क्ष अक्ष अ, ब, क इ). यातून एकंदरीतच विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती दिसेल.
हेच प्रश्न दर वर्षी विचारले तर २ मध्ये जे बदल होतील त्यावरून एकंदरीत जनमताविषयी काही निष्कर्ष काढता येतील.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
तक्ता
येथे तक्ता एचटीएमएल मध्ये
आलेख
धनंजयनी तक्ता दिल्यावर आलेख करणं खूपच सोपं झालं. (खरं तर ते ४८ आकडे लिहून काढण्याचा मी आळस करत होतो..) आलेखातून खूप रोचक चित्र दृष्टीला पडतं. अ, ब, क, ड, ई, फ हे चढत्या क्रमाने नास्तिक, चार्वाकीय, अंधश्रद्धाहीनता, श्रद्धाहीनतेकडे जाणारे पर्याय आहेत. त्यातला फ हा पर्याय कदाचित ईच्या पलिकडचा असेल, कदाचित प्रश्नाविषयीच्या असंदिग्धतेमुळे आलेला असू शकेल. तूर्तास आलेखात तो ठेवलेला आहे.
पहिले तीन प्रश्न देवाविषयी आहेत. त्यांची उत्तरं सर्वसाधारणपणे सारखी दिसतात. म्हणून ती एकत्रितपणे मांडलेली आहे. त्यावरून दिसतं की बहुमताचा देवावर, देवाच्या करणीवर विश्वास आहे. यातही प्रश्न क्रमांकाबरोबर विश्वास (थोडासा) कमी कमी होत जाताना दिसतो.
प्रश्न ४ हा पुराणकालीन प्रगतीविषयी होता. फ पर्यायाकडे तूर्तास दुर्लक्ष केलं तरी बहुमताने लोक ते अमान्य करतात असं दिसतं.
प्रश्न ५,६,७ हे सर्वसाधारणपणे मंत्रशक्ती, मनुष्याच्या चमत्कारशक्तीविषयी, किंवा भविष्य जाणण्याच्या क्षमतेची चिकित्सा करणारे होते. त्यात तीनही बाबतीत अधिकाधिक अविश्वासाकडे कल दिसतो.
प्रश्न ८ हा आयुर्वेद विज्ञान असण्याविषयी होता. त्याला बहुमताचा पाठिंबा दिसतो.
थोडक्यात सांगायचं झालं, तर
देव या कल्पनेवर, त्याच्या विश्वनिर्मिती व नियंत्रणशक्तीवर विश्वास आहे, पण ज्योतिषाने विधिलिखित जाणणं, मंत्र तंत्र वा चमत्काराने ते बदलणं असली माणसाची शक्ती झूठ. पूर्वजांनी जे संशोधन व प्रमाद-प्रयासावर आधारित वैद्यकशास्त्र निर्माण केलं त्यावर विश्वास आहे, पण त्यांची एकंदरीत वैज्ञानिक प्रगती आजच्यापेक्षा जास्त होती हे मान्य नाही.
वा, बरीच चांगली परिस्थिती वाटते.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
केवळ या सर्वेक्षणावरून?
केवळ या सर्वेक्षणावरून निष्कर्षापर्यंत पोहोचणे खरे मानायचे का? शिक्षण वाढल्यावर लोकांच्या अंगी एक हुशारी, लबाडी (स्मार्टनेस म्हणा हवं तर) येत असावी. एक उदाहरण सांगायचे तर -
एक जुने उपक्रमी दुसर्या एका संकेतस्थळावर पूर्वी असे काही बोलून गेले होते (शब्द जसेच्या तसे नाहीत परंतु मथितार्थ जसाच्या तसा आहे) -
इथे संकेतस्थळावर येऊन मी देव-देवता या संकल्पना झूठ आहोत म्हणून सांगतो आणि श्रद्धांवर प्रहार करतो परंतु माझ्या घरी माझा व्यवहार असा असेलच असे नाही. मी गेले कित्येक शनिवार शनिमहात्म्य वाचतो, घरी सत्यनारायणाच्या पूजा घालतो, गणपती आणतो.
उपक्रमासारख्या संकेतस्थळावर राहून आतापर्यंत अनेकांच्या लक्षात आले असेल की श्रद्धांचा विषय सुरु झाला की गप्प बसावे अन्यथा बहुसंख्यांच्या री मध्ये री ओढावी. इतर काही नाही तरी शिक्षण इतकी अक्कल देते असे वाटते.
प्रामाणिकपणा
बहुतेककरून सर्वेक्षण निनावी पद्धतीने केले होते. म्हणून प्रामाणिक झाले असावे असे वाटते. पण केवळ शिक्षणानेच माणूस लबाड होतो असे का म्हणावेसे बाटते?
प्रमोद
अंदाज
हा अंदाज झाला. :-) आपल्याला प्रश्न का विचारले आहेत याचा अंदाज समोरच्याला आला तर तो सावध उत्तरे देण्याची शक्यता आहे.
केवळ शिक्षणाने असे म्हटलेले नाही परंतु शिक्षणाने माणसाच्या अंगी स्मार्टनेस (त्याला लबाडी हा शब्द साजेसा नसावा) येतो. तोच स्मार्टनेस अनुभवा(च्या शिक्षणा)नेही येतोच.
रोचक सर्वेक्षण
श्री सहस्रबुद्धे, सर्वेक्षण व त्यातून मिळालेली आकडेवारी रोचक आहे. परंतु प्रियालीतै यांच्याप्रमाणेच मला विश्वास-पूर्ण विश्वास, अविश्वास-पूर्ण अविश्वास हे थोडेसे त्रासदायक वाटते. असे पर्याय देण्यामागे काही खास कारण होते का?
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.
चांगला प्रकल्प पण
हा प्रकल्प नक्कीच चांगला आहे. फक्त सर्वेक्षणात अंधश्रद्धांच्या पंगतीत आयुर्वेदाला बसवलेले रुचले नाही. याचा अर्थ आयुर्वेदात भोंदूगिरी करणारे नाहीत असे म्हणायचे नाही आहे, पण म्हणून त्याचे जे काही वैद्यकीय मूळ आहे ते जर कोणी मानले तर त्यात अंधश्रद्धाळूपणा कसा काय ठरेल? बर मग तसे सर्वेक्षण चुंबकचिकित्सा वगैरेचे का केले गेले नाही? जर आयुर्वेद ही अंधश्रद्धा वाटत असेल तर बीएएमएस ही शैक्षणिक पदवी देण्याविरुद्ध कोणी कधी बोलले आहे का? दुसरा भाग म्हणजे पाश्चिमात्य वैद्यकीय पद्धतीत काहीच चुका नाहीत का / होत नाही का?
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
समांतर
आयुर्वेदला थेट अंधश्रद्धा असे म्हणवण्यास तज्ञ धजावणार नाहीत. पण यात पर्यायी वैद्यकिय उपचार पद्धतीत भारतात आयुर्वेद हे अग्रक्रमावर आहे.
आमचे मत विचाराल तर उपचार होणे महत्वाचे.(विशेषतः ग्रामीण भागात) ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मांत्रिकाकडे जाउ नका कोणत्या तोंडाने म्हणणार.
प्रकाश घाटपांडे
तुलना
आयुर्वेदिक उपचार वैज्ञानिक उपचारांपेक्षा कमस्सल असल्याची बाब सरकारने रुग्णांना सांगितलेली नाही. अशा परिस्थितीत रुग्णांनी आयुर्वेदिक उपचार घेतल्यास ती रुग्णांची फसवणूक ठरेल ना? त्यांना केवळ नगाला नग दिसतो. आयुर्वेदिक उपचार वैज्ञानिक उपचारांपेक्षा कमस्सल असल्याची बाब माहिती असलेल्यांनी आयुर्वेदिक उपचार घेण्याचे ठरविल्यास तो त्यांचा वैयक्तिक निर्णय राहील.
सहमत
विकास यांच्याशी सहमत आहे.
काही वेळा काही लोक स्वतःला पुरोगामी म्हणवण्याच्या नादात देशी ते सर्व गौण असे मानूनच चालू लागतात की काय असे मला वाटले.
ख्रिश्चन धर्मात संत बन(व)ण्यासाठी चमत्कार व्हावा लागतोच!
आणि चर्च हे संतपण आणि चमत्कार खरा आहे असे मानूनच देते.
येथे अंधश्रद्धा नसते असे काही लोकांना वाटत असावे असो, आपला आपला विषय...
सुधारक सारखी मासिके असा विषय सोडून देतात, कधीच चर्चेत घेत नाहीत हे पाहून मला गंमत वाटते.
हे विषय चर्चेत येवूच नयेत यासाठी काही विशिष्ट मासिकांना / संपादकांना काही विशिष्ट धर्माच्या खास व्यक्तींकडून यात काही आर्थिक लाभ असावा का? अशी भाबडी शंकाही मला येऊन जाते. असे कदाचित काही नसेलही.
त्यापेक्षा जीवाचीच भीती मोठी असावी, म्हणून जेथे मऊ लागते तेथेच खणायचे असे धोरण असावे असे वाटते.
असो,
हे विषय चर्चेत नाहीत हे मात्र खरे!
आपला
गुंडोपंत
नेमके काय?
सुधारक सारखी मासिके असा विषय सोडून देतात, कधीच चर्चेत घेत नाहीत हे पाहून मला गंमत वाटते.
हे विषय चर्चेत येवूच नयेत यासाठी काही विशिष्ट मासिकांना / संपादकांना काही विशिष्ट धर्माच्या खास व्यक्तींकडून यात काही आर्थिक लाभ असावा का? अशी भाबडी शंकाही मला येऊन जाते. असे कदाचित काही नसेलही.
त्यापेक्षा जीवाचीच भीती मोठी असावी, म्हणून जेथे मऊ लागते तेथेच खणायचे असे धोरण असावे असे वाटते.
मला हे कळले नाही.
नेमका कुठला विषय चर्चेस घेतला नाही? म्हणजे कुठला लेख/चर्चेचा प्रस्ताव 'आजचा सुधारक' ला पाठवला आणि तो त्यांनी नामंजूर केला?
साधारण पणे ज्याला ज्याचे ज्ञान त्यावर तो लिहितो. या असलेल्या ज्ञानात सर्वसमावेशकता नसणे हा काही धोरणीपणा नसतो.
मला असे वाटते की या अंकात (एप्रिलच्या) बहुतेक सर्व धर्म/संस्कृतींचा उल्लेख येत गेला आहे. उणीव भासल्यास जरुर कळवा
प्रमोद
बदनाम हुवे तो क्या हुवा?...
आजचा सुधारकच्या जून २०१० च्या अंकात कार्यकारी संपादकांनी गुंडोपंतांचा वरील प्रतिसाद जसाच्या तसा उद्धृत केला असून तो उच्च पातळीच्या अविवेकाचे एक उदाहरण असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.
आयुर्वेद
सर्वेक्षणाच्या प्रश्नांबरोबर आयुर्वेद का घातला हे मलाही पडलेले कोडे आहे. कदाचित 'संपूर्ण विज्ञान' हा त्यातला भाग सर्वेक्षण करणार्यांना अंधश्रद्धा म्हणून अपेक्षित असेल.
आयुर्वेद हे 'संपूर्ण विज्ञान' असल्याची समजूत अनेकदा वृत्तपत्रीय लिखाणात आयुर्वेदासंबंधी जे छापून येते त्यांतून बनवली जाते. उदा. ऍलोपथी वरवर उपचार करते, लक्षणांना सप्रेस करते उलट आयुर्वेद मूळ कारणावर उपचार करतो वगैरे. अनेकदा लेख लिहिणारे आयुर्वेदाबरोबरच अध्यात्मादि गोष्टी लिहितात. तसेच गेल्या काही काळात उगवलेल्या 'उपचार केंद्रांच्या' जाहिरातींमध्ये 'अनुभव' या नावाखाली काही सुरस आणि चमत्कारिक कथा छापलेल्या असतात. अशा स्वरूपाचे अनुभवकथन सहसा बुवा-बाबांच्या भक्तांनी चालवलेल्या मासिकांतून आपल्याला वाचायला मिळतात. (असे अनुभव काही चॅनेलवरून इव्हॅन्जलिस्ट लोकांकडूनसुद्धा पहायला मिळतात). या अनुभवांत जनरली आधुनिक विज्ञानाला अजून दुर्धर असणार्या रोग्यांची बरे वाटल्याची कथने असतात. त्यामुळे आयुर्वेद हे आधुनिक विज्ञानाच्या पुढे गेलेले असल्याचा भास निर्माण केलेला/झालेला असतो. या कारणांमुळेही सर्वेक्षकांनी आयुर्वेदाचा समावेश केला असू शकेल.
सर्वेक्षणातील इतर विषयांसारखा आयुर्वेद हा विषय उघड श्रद्धेचा नाही. कारण त्याचे फॉर्मल ज्ञान उपलब्ध आहे. आणि बर्याच प्रमाणात कृती आणि परिणाम वस्तुनिष्ठ आहेत. म्हणजे व्यक्तिनिष्ठ नाहीत.
तरीही आयुर्वेद हा विषय सामान्यांत (आणि प्रॅक्टिशनर कम्युनिटीतही) काहीसा श्रद्धेकडे झुकलेला आहे असे वाटते. त्याची मला वाटणारी काही कारणे
काही बाबतीत आयुर्वेदातल्या संकल्पना आधुनिक विज्ञानापेक्षा वेगळ्या आहेत. तसेच गेल्या काही शतकात मिळालेल्या ज्ञानाच्या अभावी उपचारांमध्ये ज्या त्रुटी असतील त्या घालवायला हव्या. परंतु याची गरजच नाही असा दृष्टीकोन दिसतो.
तसेच अमुक एक औषधाचा अमूक रोगावर उपयोग होतो हे व्हॅलिडेट केलेले नसते. (म्हणजे जुन्या काळी ते व्हॅलिडेट केले असेल तरी त्याचा विदा आज उपलब्ध नाही). त्यामुळे ते विदा गोळा करून पुन्हा वॅलिडेट करायला हवे. परंतु आयुर्वेद वापरणार्यांना हे मान्य नसते. आधुनिक विज्ञानाची तत्त्वे आयुर्वेदाला लागू करता येणार नाहीत असा दावा ते करतात.
(एका आयुर्वेदिक औषधे बनवणार्या उद्योजकाने सांगितलेली माहिती. जर एखादे नवीन औषध बाजारात आणायचे असेल तर त्याची सरकारी परवानगी मिळवण्यासाठी त्या औषधाचा उल्लेख ग्रंथात आहे एवढे दाखवावे लागते. त्याची टॉक्सिसिटी टेस्ट वगैरे करून ते वापरास सुरक्षित असल्याचे सिद्ध करावे लागत नाही. हा ग्रंथप्रामाण्याचाच प्रकार दिसतो).
आयुर्वेदिक औषधांचे साईड इफेक्ट नसतात हा एक असाच समज श्रद्धा या स्वरूपात सामान्यांमध्ये पसरलेला आहे.
डिस्क्लेमर १ : मी आयुर्वेदिक डॉक्टर नाही त्यामुळे या माहितीत काही चुका असू शकतात.
डिस्क्लेमर २ : हा प्रतिसाद विकास यांना नाही. आयुर्वेदाचा समावेश अंधश्रद्धांच्या यादीत करू नये असे माझेही त्यांच्यासारखेच मत आहे.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
आयुर्वेद
कदाचित 'संपूर्ण विज्ञान' हा त्यातला भाग सर्वेक्षण करणार्यांना अंधश्रद्धा म्हणून अपेक्षित असेल.
बरोबर.
या सोबत. आयुर्वेदाविषयी एकंदर माहिती फार कमी असते असा माझा अनुभव आहे. त्यामुळे यावरील उत्तर इतर उत्तरांपेक्षा वेगळे असले पाहिजे अशी अपेक्षा होती. मनापासून आणि मनमोकळेपणाने प्रतिसाद मिळतो आहे का? हे तपासण्यासाठीही या प्रश्नाचा उपयोग होता.
या उत्तरांचा Cross analysis करायचा मी प्रयत्न अजून केला नाही. म्हणजे १-२-३ प्रश्नांची ड-ई उत्तर देणार्यांचा इतर प्रश्नांना काय प्रतिसाद असतो हे शोधले नाही. वरवर पाहिले तेव्हा असे दिसले की आयुर्वेदाबद्दल त्यांची उत्तरे अ ब अशीपण आहेत. (Vice versa सुद्धा).
निदान व उपचार असे कुठल्याही वैद्यकशाखेचे दोन भाग केले जाऊ शकतात. यातील निदानाचा भाग आयुर्वेदात नाडी,कफ वात पित्त प्रकृती/रस अशा संकल्पनांचा आहे. आयुर्वेदातील औषधे काही योग्य असतील काही अयोग्य (त्यांची यादी बरीच मोठी आहे). जी योग्य ठरली त्यांचा वापर आधुनिक वैद्यकशास्त्रात (ऍलोपथी हा होमिओपथी वाल्यांनी वापरलेला शब्द आहे) होतोच आहे. (असे मला वाटते नक्की संदर्भ नाही.)
आयुर्वेदात काय संशोधन होऊ शकते? आपली निदान पद्धती बदलल्यावर त्यास आयुर्वेद म्हणता येईल का? नवीन औषधे तयार करण्याची/तपासण्याची एक पद्धत आध्नुनिक वैद्यकशास्त्रात आहे. या पद्धतीचा अवलंब केला तर आयुर्वेद व आधुनिक वैद्यकशास्त्रात काही फरक राहील का?
याचा अर्थ आयुर्वेदातले ज्ञान कवडीमोलाचे आहे असा नाही.
प्रमोद
प्रमोद
संपूर्ण विज्ञान
कदाचित 'संपूर्ण विज्ञान' हा त्यातला भाग सर्वेक्षण करणार्यांना अंधश्रद्धा म्हणून अपेक्षित असेल.
बरोबर.
मग प्लासिबो इफेक्ट हे अधुनिक विज्ञान वापरते म्हणून त्याची विभागणी पण अंधश्रद्धेत करणार का? अंधश्रद्धा ठरवताना केवळ अधुनिक विज्ञान हाच काय तो संदर्भ असणार का? इतके अधुनिक विज्ञान आणि त्याची परीभाषा/पद्धती ही परीपूर्ण अथवा संपूर्ण आहे का? मला नाही वाटत. तसे डोळस वैज्ञानिक देखील म्हणणार नाहीत. आणि त्यात काहीच गैर नाही. मात्र तसे समजून, इतर पद्धतींना त्या अधुनिक विज्ञानात बसत नाहीत म्हणून अंधश्रद्धेत मोडणे हे मला पटले नाही. हीच एक अधुनिक विज्ञानाबद्दलची अंधश्रद्धा वाटली. (मला अधुनिक विज्ञान मान्यच आहे पण डोळसपणे, केवळ ते अधुनिक आहे म्हणून नाही).
यातील निदानाचा भाग आयुर्वेदात नाडी,कफ वात पित्त प्रकृती/रस अशा संकल्पनांचा आहे.
मग काय बिघडले? निदान आहे ना? का डॉक्टरांकडे गेला सर्दी-पडसे झाले म्हणून आणि मग एका बाटलीत लाल औषध देऊन दिवसातून तीन वेळा घ्यायला सांगितले आणि तिसर्या दिवशी सर्दी गेली की ती माझ्या औषधाने असे म्हणले आहे?
आयुर्वेदात काय संशोधन होऊ शकते?
येथे नजर फिरवली तर समजेल की विविध प्रकाराने भरपूर संशोधन कायमच चालत आले आहे.
त्या व्यतिरीक्त खालच्या प्रतिसादातील दुवे पण पहाण्यासारखे आहेतच.
या पद्धतीचा अवलंब केला तर आयुर्वेद व आधुनिक वैद्यकशास्त्रात काही फरक राहील का?
आपणच म्हणल्याप्रमाणे योग्य वाटलेल्या आयुर्वेदीक औषधांचा वापर अधुनिक वैद्यकशास्त्रात होतच आहे. तरीपण अधुनिक वैद्यकशास्त्र अधुनिकच राहते ना? का ते आयुर्वेदीक होते?
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
अधु आणि आधुनिक
आधुनिक विज्ञान असा कोणी प्राणी नाही. विज्ञान एकच असते. हे विधान थोडेसे एकम् सत किंवा एकेश्वरवादी धर्माचे वाटत असले तरी खरे आहे.
औषधांच्या परिणाम-मापनादरम्यान प्लासिबो इफेक्ट चा वापर होणार नाही याची विज्ञान काळजी घेते. "विज्ञान प्लासिबो इफेक्ट वापरते" असे कोण म्हणते?
ही निव्वळ द्विरूक्ति आहे की (मनाने) आंधळे वैज्ञानिकसुद्धा असतात?
त्याला 'आयुर्वेदातील संशोधन' म्हणणे चूक आहे.
ते 'वैज्ञानिक औषध' ठरते.
येथे काही सापडले नाही
मग प्लासिबो इफेक्ट हे अधुनिक विज्ञान वापरते म्हणून त्याची विभागणी पण अंधश्रद्धेत करणार का?
एखादे विधान सत्य/असत्य शकते. असत्य विधानावरील विश्वास अंधश्रद्धा म्हणून गणला जाऊ शकतो. त्यासाठी पूर्ण शाखेस अंधश्रद्धा म्हणणे चुकीचे आहे.
प्लासेबो इफेक्टचा वापर अंधश्रद्ध आहे. असे काही माहिती नाही. जरा विशद करून सांगाल का?
सर्वेक्षणात वा माझ्या लेखात आयुर्वेदाला अंधश्रद्धा म्हणण्याचा उल्लेख नाही. आयुर्वेद हे पूर्ण विज्ञान नाही असा तो उल्लेख आहे.
तुम्ही दिलेल्या दुव्यात आयुर्वेदिक औषधांवर केलेले आधुनिक संशोधन दिसते. मात्र हे संशोधन आयुर्वेदातील नाही. म्हणजे या संशोधनाने आयुर्वेदात बदल अपेक्षित नाही तर आधुनिक वैद्यकशास्त्रात बदल अपेक्षित आहे. आयुर्वेदातील संशोधन आयुर्वेदात बदल घडवू बघेल. असे संशोधन होऊ शकते का? हा माझा प्रश्न आहे. मर्यादित अर्थात एखादा जुना ग्रंथ सापडणे त्यातील औषधांचा अर्थ समजणे असे संशोधन होऊ शकते. पण त्याशिवाय काय होऊ शकते?
माझ्या मते आयुर्वेदातील (आणि युनानी/चिनी वगैरे) कित्येक औषधे उपयुक्त आहेत/असतील. त्यामुळे आयुर्वेदातील औषधांवर आधुनिक अभ्यास होणे हे गरजेचे आहे. पण कित्येक औषधे टाकाऊ, आणि काही हानीकारकपण आहेत त्यांचे काय? तुम्हीच दिलेल्या दुव्यात याचा उल्लेख आहे!
प्रमोद
धन्यवाद
सत्य विधानावरील विश्वास अंधश्रद्धा म्हणून गणला जाऊ शकतो. त्यासाठी पूर्ण शाखेस अंधश्रद्धा म्हणणे चुकीचे आहे.
अगदी बरोबर! तेच आयुर्वेदासंदर्भात मला म्हणायचे आहे.
प्लासेबो इफेक्टचा वापर अंधश्रद्ध आहे. असे काही माहिती नाही. जरा विशद करून सांगाल का?
थोडक्यात एक उदाहरण म्हणून एका शोधनिबंधातील उतारा खाली देतो. त्यावरून मला काय म्हणायचे ते समजेल असे वाटते:
Superstition may have a similar influence on health as the placebo effect, in which patients’ health improves after a dummy treatment because of their expectations or belief.
सर्वेक्षणात वा माझ्या लेखात आयुर्वेदाला अंधश्रद्धा म्हणण्याचा उल्लेख नाही.
आपल्या, "सर्वसामान्य लोकांचा श्रद्धा व अंधश्रद्धांना नेमका काय प्रतिसाद असतो हे जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केले गेले." या वाक्यावरून आणि त्या सर्वेक्षणात आयुर्वेदाला पाहून, माझा (तसेच इतरांचा पण असावा) असा समज झाला की आपण आयुर्वेदाला पण अंधश्रद्धा म्हणत आहात म्हणून. आपले तसे म्हणणे नाही असे आपले म्हणणे असले तर मग हा (जर असला तर) वाद मर्यादीत उरतो: या सर्वेक्षणात केवळ आयुर्वेदालाच का गोवण्यात आले आणि चुंबकचिकित्सा वगैरेना का नाही? असे काय स्पेशल त्यात आहे. बाकी पहील्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे, सर्वेक्षणाचा प्रकल्प नक्कीच चांगला आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन झालेच पाहीजे हेच माझे देखील मत आहे. थोडक्यात हे सर्वेक्षण सगळे जरी पटले तरी आयुर्वेदाच्या त्यातील उल्लेखाने, अंधश्रद्धेची नक्की आपल्या लेखी व्याख्या काय हेच समजेनासे झाले होते.
तुम्ही दिलेल्या दुव्यात आयुर्वेदिक औषधांवर केलेले आधुनिक संशोधन दिसते. मात्र हे संशोधन आयुर्वेदातील नाही.
असे दिसते आहे की आपल्याप्रश्नासंदर्भात मी वेगळा अर्थ घेतला आहे. तसे असल्यास क्षमस्व... "आयुर्वेदात काय संशोधन होऊ शकते?" या प्रश्नाचा मी अर्थ सरळ इतकाच घेतला की आयुर्वेदावर विविध संशोधन. मात्र "जुना ग्रंथ सापडणे आणि त्यावर संशोधन होणे" या एका उदाहरणाबद्दल बोलाल तर चरक संहीतेसंदर्भात अनेक ग्रंथ सापडू शकतील.
आपण म्हणता त्याशिवाय अधिक काय होऊ शकते? माझे उत्तर आहे जे काही आधुनिक संशोधन होत आहे त्यात आयुर्वेदाचे विश्लेषण होत आहे. जे योग्य वाटते ते राहत आहे तर अयोग्य आहे त्यावर जाहीर संशोधन होत आहे. दुसरे संशोधन हे विविध (आयुर्वेदीक पद्धतीने) विविध चाचण्या, अनुभव आदींचा विदा गोळा करणे आणि त्यावरून निष्कर्ष काढणे हा होऊ शकतो. दुर्दैवाने आयुर्वेदीक पद्धती ही पुर्वीच्या काही चुकीच्या परंपरांमधे अडकल्याने ज्ञान एका पिढीकडून दुसर्या पिढीत जाताना ते जाहीरपणे जात नाही असे वाटते. शिवाय कुणिही उठून (त्यात कधी कधी मेकॅनिकल इंजिनियर्स पण असू शकतात ;) ) आयुर्वेदावर उपचार सांगायला लागतो (जे होमिओपथीचे पण आहे) त्यामुळे जसे हवे तसे संशोधन होत नाही. अर्थात म्हणून आयुर्वेद हे अंधश्रद्धा ठरते हे मला तरी पटत नाही.
पण कित्येक औषधे टाकाऊ, आणि काही हानीकारकपण आहेत त्यांचे काय? तुम्हीच दिलेल्या दुव्यात याचा उल्लेख आहे!
अर्थातच! मी जाणूनबुजून तो दुवा दिला होता. माझे प्रतिसाद हे काही आयुर्वेदाची भलावण ती पण "अंध"पणे करण्यासाठी नाहीत. पण त्या टाकाऊ औषधांमुळे आयुर्वेद अंधश्रद्धा ठरत नाही हे देखील म्हणायचे होते.
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
वाद मिटला
आपले म्हणणे समजले. त्याचाशी बहुतांशी सहमत आहे.
'आयुर्वेदाला संपूर्ण विज्ञान आहे' आणि 'आयुर्वेद अंधश्रद्धा नाही' या दोन विधानात फरक आहे. या फरकामुळे गल्लत होते.
सर्वेक्षितांनी गल्लत केली का? मला वाटते केली नाही.
फक्त आयुर्वेदचा का? चुंबकचिकित्सा का नाही? अशा प्रश्नांना अंत नाही. कमी प्रश्न घ्यायचे ठरवल्यास काही तरी गाळावे लागते.
आयुर्वेदातील औषधांवर संशोधन व्हायला हवे. निदान पद्धतीवरपण व्हायला हवे. पण सरकार काय करते? तर ज्यांना डॉक्टर व्हायचे आहे पण गुणवत्ता नाही त्यांच्यासाठी एक पळवाट शोधून काढते आणि त्यांना आयुर्वेदाचार्य (होमिओपाथ, युनानी वैद्य) बनवते. ही मंडळी सर्रास आधुनिक वैद्यकाचा व्यवसाय करतात. एखाद्य हौशी वैधकापेक्षा हे जास्त हानीकारक आहे. हौशी वैद्यकाचा सल्ला घेणार्यांना तो व्यावसायिक व मान्यताप्राप्त नाही हे माहित असते. पण अशिक्षित लोकवस्तीत डॉक्टर पाट्या लावणारे वैधक हे नीटसे सांगत नाहीत. बहुतांशी फसवणूक करतात.
असे आयुर्वेदाचार्य आयुर्वेदावर संशोधन करू शकतील का? या उलट आयुर्वेदावर उत्कृष्ट संशोधन जेजे मधील आधुनिक वैद्यकातील डॉक्टरांनी केले. (शरयू रांगणेकर).
मी असे वाचले की इंग्लंड मधे होमिओपाथीचा व्यवसाय करण्यासाठी आधुनिक वैद्यकाची पदवी घेणे गरजेचे आहे. असेच आपल्या कडे व्हावे. बर्याच अंशी हा प्रश्न सुटेल.
प्रमोद
वादे वादे जायते तत्त्वबोधः
कृपया संदर्भ द्या. मला शंका असण्याचे कारण म्हणजे रिचर्ड डॉकिन्स यांनी एनेमीज ऑफ रीझन या माहितीपटात म्हटले आहे की "द homeopathic प्रोफेशन is unregulated बाय government. यू कॅन call yourself अ होमिओपॅथ विदाउट एनी qualification, ट्रेनिंग, ऑर इव्हन इन्शुरन्स, आफ्टर all, all यू आर doing is dishing अप water solution."
हे पान, तसेच, हे पानसुद्धा वाचनीय आहे.
होमिओपाथी
बर्याच वर्षांपूर्वी मी क्याम्पबेल यांचे पुस्तक वाचले होते.
ते इंग्लंड मधील होमिओपाथ आहेत. इंग्लंड मधे त्यांनी आधुनिक वैद्यकशास्त्राची पदवी घेतल्यानंतर त्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला होता.
यानंतर मला वैयक्तिक रित्या मिळालेली माहिती अशी.
१. वैधकीय व्यवसाय (मराठीत डॉक्टरकी) करण्यासाठी आधुनिक वैद्यकशास्त्राची पदवी आवश्यक आहे.
२. या पदवीधारकास कुठले औषध देतो यावर बंधन नाही. तो स्वतः कुठलाही पदार्थ औषध म्हणून देऊ शकतो. अर्थात त्यात बरेवाईट झाले तर जबाबदारी त्याची.
३. वैद्यक व्यवसायी अशा रितीने होमिओपाथीचे औषध देऊ शकतो.
यातील पळवाटा दोन. पहिली म्हणजे होमिओपाथीत औषध नसल्याने त्यास औषधोपचार न मानणे. आणि दुसरी म्हणजे यास व्यवसाय न म्हणता सल्ला/सेवा म्हणणे.
या दोन्हीत त्यास 'वैधकीय व्यवसाय' म्हणता येत नाही.
खालील दुव्यावर होमिओपाथीवर पुस्तक मिळते. पूर्वी ते नेटवर फुकट मिळायचे.
http://www.amazon.com/exec/obidos/ISBN=1847537375/roberttoddcarrolA/
प्रमोद
होमिओपॅथी
तेच पुस्तक ई स्वरूपातही आहे. मी ते वाचणार आहे.
आधुनिक वैद्यकशास्त्राची पदवी घेऊन होमिओपॅथीचे उपचार् करणार्या अजून एका डॉक्टरांच्या मुलाखतीची लिंक उपक्रमवर आहे.
ध चा मा
सहस्रबुद्धे म्हणाले
"असत्य विधानावरील विश्वास अंधश्रद्धा म्हणून गणला जाऊ शकतो. त्यासाठी पूर्ण शाखेस अंधश्रद्धा म्हणणे चुकीचे आहे."
तुम्ही त्यांना उद्धृत केले
"सत्य विधानावरील विश्वास अंधश्रद्धा म्हणून गणला जाऊ शकतो. त्यासाठी पूर्ण शाखेस अंधश्रद्धा म्हणणे चुकीचे आहे."
कॉपि पेस्ट
तुम्ही त्यांना उद्धृत केले: "सत्य विधानावरील विश्वास अंधश्रद्धा म्हणून गणला जाऊ शकतो. त्यासाठी पूर्ण शाखेस अंधश्रद्धा म्हणणे चुकीचे आहे."
चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. उंदराने निवडून चिकटवत असताना गोंधळ झाला. अर्थात एखाद्या प्रतिसादाच्या खाली प्रतिसाद आल्यावर मूळ प्रतिसादात दुरूस्ती करता येत नसल्याने येथे केवळ खुलाशाकरता लिहीत आहे.
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
एको देवो केशवो वा शिवः
तुम्ही सुधारकच्या अंधश्रद्धा विशेषांकातील (एप्रिल-मे २०१०) 'आरोग्य आणि अंधश्रद्धा' हा लेख वाचला आहे का? आयुर्वेदातल्या पाप्म रोगांची संकल्पना वस्तुनिष्ठ नाही. पुंसवन विधीचे काय? ग्रंथप्रमाण्य हे 'फॉर्मल ज्ञान' असते का? कफ, पित्त, वात, हे त्रिदोषही काल्पनिक आहेत.
म्हणजे त्यांपैकी किमान एक संकल्पना तरी चूक आहे ना?
मग त्यात आणि विज्ञानात फरक काय? त्याला आयुर्वेद का म्हणावे? तो काय थिसिअसचे जहाज आहे का?
आयुर्वेद
तुम्ही ऐकले नसेल हो!
अजून एक अशास्त्रीय पदवी सुरू झाली आहे.
पाश्चिमात्य वैद्यक म्हणजे तुम्हाला वैज्ञानिक वैद्यक अभिप्रेत आहे का? विज्ञानात चुका सापडल्या की सुधारल्या जातात.
उत्तर मिळालेच नाही
तुमच्या प्रतिप्रश्नात मूळ प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. :-(
आयुर्वेदाला अंधश्रद्धेच्या पंगतीत बसवलेले मी या सर्वेक्षणाच्या संदर्भातच पहील्यांदा पाहीले आहे. जर अनिस अथवा तत्सम कुणालाही आयुर्वेद अंधश्रद्धा वाटत असेल तर तसे स्पष्ट बोलले का जात नाही/गेले नाही? हा प्रश्न आहे. म्हणूनच पुढे त्या प्रतिसादात, "बर मग तसे सर्वेक्षण चुंबकचिकित्सा वगैरेचे का केले गेले नाही?" हा देखील प्रश्न विचारला होता.
आणि हो आयुर्वेदाला अशास्त्रीय पद्धती म्हणत नाहीत तर आल्टरनेटीव्ह मेडीसिन म्हणतात. आणि त्या नावाखाली तो विषय येथील अनेक विद्यापिठात तशा विषयांमधे शिकवलाही जातो. हा दुवा इतरांना या "शास्त्रा" बद्दल काय वाटते हे समजून घेयला उपयुक्त आहे.
पाश्चिमात्य वैद्यक म्हणजे तुम्हाला वैज्ञानिक वैद्यक अभिप्रेत आहे का? विज्ञानात चुका सापडल्या की सुधारल्या जातात.
आयुर्वेदात काहीच सुधारणा झाल्या नाहीत असे तुम्हाला म्हणायचे आहे का? तशी शास्त्राधारीत चर्चा नक्कीच व्हावी. त्याला कुठे नाही म्हणतोय? एकच उदाहरण म्हणून - हार्वर्ड विद्यापिठात तो विषय जसा आल्टरनेटीव्ह मेडीसिन मधे संदर्भ देऊन शिकवला जातो तसेच त्याच्यातील तृटींचा शास्त्रीय अभ्यास करून त्यावरही माहीती छापली जाते. नुसतेच सुपर्स्टीशन म्हणत दुर्लक्ष करत नाहीत. गेल्या वर्षी एका कार्यक्रमात हार्वडच्याच मेडीकल स्कूलमधील एका प्रथितयश डॉक्टर/प्राध्यापकाशी आयुर्वेदातील पार्यासंदर्भात चर्चा केली होती. त्याने देखील सरसकट आयुर्वेदाला चूक म्हणले नव्हते तर त्यात काळाच्या ओघात काही चुकीच्या पद्धती आल्या होत्या, पण त्या दूर करून आयुर्वेद वापरावे असेच त्याचे म्हणणे होते. आयुर्वेदातील काही खूप शिकलेल्या आणि प्रथितयश "वैद्यां"शी पण यावर जेंव्हा भेटलेत तेंव्हा चर्चा झाल्यात. यातील कोणीच आम्हीच फक्त ग्रेट असे म्हणले नाही. किंबहूना यातील कोणीच तात्काळ उपयासाठी अधुनिक औषधांपासून दूर रहायला देखील सांगितले नव्हते. (अर्थात मी ही केवळ चर्चा केली होती. त्यांचा संबंध काही सामाजीक कार्यक्रमात आला होता, अर्थात माझे काही संबंध नव्हते. :-) मी काही कुठल्या आयुर्वेदातील अथवा कुठल्याच औषधावर नव्हतो. आत्ता देखील मुद्दा हा आयुर्वेद कसे ग्रेट, हे दाखवण्याचा नाही, मात्र केवळ आयुर्वेदाला अंधश्रद्धेच्या नावाखाली आणताना नक्की काय विचार केला गेला, हे स्पष्ट करावे ह्यासाठीचा आहे.)
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
आल्टरनेटीव्ह मेडीसिन
अंनिसच्या एका अंकात टी. बी. खिलारे यांनी आयुर्वेदाविरुद्ध लिहिल्याचे स्मरते. कृपया कोणीतरी खात्री करावी.
चुंबकचिकित्सा करण्यास कायद्यानेच बंदी आहे. त्याविरुद्ध 'आवाज' उठविण्याची तातडी नाही. शिवाय, लोकप्रियतेचा विचार केल्यासही आयुर्वेदाविरुद्ध 'आवाज' उठविण्यास अग्रक्रम मिळेल.
“इफ एनी रेमेडी इज टेस्टेड अंडर कंट्रोल्ड scientific conditions and प्रूव्ड टु बी इफेक्टिव, इट विल cease टु बी alternative and विल simply बिकम मेडिसिन. So-called alternative मेडिसिन आयदर hasn’t बीन टेस्टेड or इट has failed इटस् टेस्टस्.” - रिचर्ड डॉकिन्स
हार्वर्ड मध्ये मठ्ठ लोक नसतात का?
damn: प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
लायकर्ट स्केल
वरील अ-ब-क-ड-इ हे "लायकर्ट स्केल" प्रमाणे असावेसे वाटते.
समजा "पूर्ण विश्वास"-"विश्वास"-"मत नाही"-"अविश्वास"-"पूर्ण अविश्वास" अशी पाच स्थाने असली :
- यात जर टोकांचे ढोबळ अर्थ विरोधी म्हणून लोकप्रसिद्ध असले, ([पूर्ण] विश्वास आणि [पूर्ण] अविश्वास, या विरोधी भावना आहेत)
- तर त्यातील टोके ही सर्वेक्षण-प्रतिसादकासाठी व्यक्तिसापेक्ष सर्वात टोकाच्या शक्यता असतात (पूर्ण विश्वास = म्हणजे प्रतिसादक व्यक्तिशः जास्तीत जास्त ठेवतो तितपत विश्वास, पूर्ण अविश्वास = म्हणजे प्रतिसादकाला व्यक्तिशः वाटू शकतो तितका जास्तीत जास्त अविश्वास)
- त्यातील मध्य हा "कुठचेही मत नाही" अशी बरोबर मधली स्थिती असते.
- स्थान क्र. दोन आणि चार टोकापेक्षा कमी, आणि मध्यभागापेक्षा एकीकडे झुकलेले असे मत असते. अर्थात टोकाची भावना व्यक्तिसापेक्ष टोकाची भावना असते.
कलांबद्दल (ऍटिट्यूड बद्दल) मतचाचणी ही जात्याच व्यक्तिसापेक्ष असते. व्यक्तिसापेक्ष असतात म्हणून माहितीशून्य मात्र नसतात. जोवर लोकप्रसिद्ध अर्थांनी समाजात संदेशन होते, संवाद खुंटण्याइतकी व्यक्तिसापेक्षता नसते, तोवर तितपत अर्थ अशा सर्वेक्षणांना असतो.
कित्येकदा टोकाची भावना प्रत्येक व्यक्तीची वेगळी असू शकते. म्हणजे व्यक्तिगत टोकाचा विश्वास असला तर एखादा व्यक्ती कड्यावरून उडी मारेल, पण अगदी टोकाचा विश्वास असल्यास दुसरा व्यक्ती फारफारतर एक लाखाची जोखीमच पत्करेल, त्याहून अधिक नाही.
टोकाची वागणूक जरी वेगळी असली तरी मध्यबिंदू ("मत नाही") हा तितका व्यक्तिसापेक्ष नसतो. अशा परिस्थितीत अ+ब = मत नसण्यापेक्षा अधिक विश्वास; ड+इ = मत नसण्यापेक्षा अधिक अविश्वास, असे वर्गीकरण बर्यापैकी व्यक्ति-निरपेक्ष असते.
विश्वास/ सहमती
पर्याय लायकर्ट स्केलप्रमाणे असल्यास त्यात थोडा बदल करून अधिकाधिक व्यक्ति-निरपेक्षता येण्यासाठी 'त्यात विधानाशी पूर्ण सहमत, काहीसा/शी सहमत, उदासिन, काहीसा/ शी सहमत, पूर्ण असहमत' असे पर्याय योग्य ठरले असते काय? 'विश्वास' या शब्दामुळे उत्तर देतांना गोंधळ होण्याची शक्यता आहे. उदा. 'हे जग देवाने निर्माण केले आहे' यावर 'क्ष'चा पूर्ण अविश्वास आहे पण 'क्ष' विधानाशी काहीसा सहमत आहे म्हणजे हे विश्व निर्माण करण्यात आले आहे पण जग देवानेच निर्माण केले आहे याशी असहमत आहे.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.
हा हा हा हा
'हे जग देवाने निर्माण केले आहे' यावर 'क्ष'चा पूर्ण अविश्वास आहे पण 'क्ष' विधानाशी काहीसा सहमत आहे म्हणजे हे विश्व निर्माण करण्यात आले आहे पण जग देवानेच निर्माण केले आहे याशी असहमत आहे.
प्रश्नकर्ताः भारताचे राष्ट्रपिता कोण?
उमेदवारः सोनिया गांधी
प्रश्नकर्ताः उत्तरातील सोनिया चूक परंतु गांधी बरोबर. त्यामुळे तुम्हाला अर्धे गुण देण्यात येत आहेत.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
चांगला प्रयत्न
फलज्योतिषाच्या वैज्ञानिक चाचणीची आठवण झाली. या अगोदर खरोखरच तसे काही प्रयत्न झाले नाहीत का? याविषयी कोणी माहिती दिल्यास आवडेल. यानिमित्ताने गूढचिकित्सामंडळ ची आठवण येते
जेव्हा सर्वेक्षण मान्य करायचे नसते त्यावेळी विदा कमी होता, विश्वासार्ह पद्धत नव्हती असे आक्षेप येणार. ११० कोटींच्या भारतात २५० साईज सॅम्पल पुरेसे आहे का? हा प्रश्न विचारला जाणार.
राजेश व धनंजय यांच्या प्रतिक्रिया जाणुन घ्यायला आवडेल
प्रकाश घाटपांडे
खोडूनच काढायचे झाले तर
बरोबर. याचसह, हा विदा महाराष्ट्रातील सर्व थरांतून गोळा केला असे सांगितल्यावर नंतर वय, शिक्षण आणि उत्त्पन्न हे वर्गीकरण दाखवलेले आहे परंतु शहरी-ग्रामीण, शहरी झाल्यास शहरातील नेमक्या कोणत्या विभागातून, जाती-जमाती, इतर धर्म वगैरे जमेस धरले आहेत की नाही हे कळत नाही. एकंदरीत प्रश्नांचा कल पाहता इतर धर्मीय २५० मध्ये समाविष्ट नसावेत अशी शंका येते.
असो. चिकित्सेत कोणत्या अडचणी येतात आणि एखादी गोष्ट मानायची नसेल तर अनेक खुसपटे कशी काढता येतात हे सहज दाखवता येते असे दिसले. :-)
प्रश्न योग्य आहेत
मात्र प्रश्न नेमका हा नाही.
(११० कोटींच्या भारतात १०९.९९९९९९९ कोटींचे सर्वेक्षण केले, तरी टक्केवारीबाबत पूर्ण निश्चितता येणार नाही. कारण शेवटच्या राहिलेल्या व्यक्तीच्या मताबद्दल आपल्याला माहीत नसते.)
१००% नसलेल्या कुठल्याही सर्वेक्षणात दोन प्रकारचे दोष येऊ शकतात.
संभाव्य दोष प्रकार १) कुठल्याही एका बाजूला कल नसूनही निश्चितता नसणे (अनबायस्ड इम्प्रेसिशन)
जर जनतेमधील निवडलेले लोक कोण आणि सोडलेले लोक कोण, याचा विचारलेल्या प्रश्नाशी पूर्वसंबंध नसला, तर प्रत्येक निवडलेला व्यक्ती "त्याच्यासारख्या व्यक्तींचे" प्रतिनिधित्व करतो. मात्र हे प्रतिनिधित्व माहितीच्या दृष्टीने अपूर्ण असते, त्यामुळे खरी टक्केवारी सँपलमधील टक्केवारीपेक्षा अधिकही असू शकते, किंवा कमीही असू शकते. इथे सँपल साइझचा मुद्दा उत्पन्न होतो. जितके सँपल लहान तितके कमी-अधिकच्या अनिश्चिततेचे क्षेत्र मोठे. (अनिश्चिततेचे क्षेत्र जितके कमी तितके बरे.) सँपलची निवड खरोखर रँडम असेल, तर २५०च्या सँपलने मिळालेली टक्केवारी कितपत अनिश्चित असेल? ९५% निश्चिती इतकी हवी असेल, तर त्याचे क्षेत्र साधारणपणे +-४ ते ७% इतके असेल. उदाहरणार्थ सँपलमध्ये कसलीतरी टक्केवारी ५०% असली, तर ज्या जनसमूहातून ते सँपल घेतले त्याची टक्केवारी ४३-५७ टक्के अशा क्षेत्रात असू शकेल. दुसरी कसली टक्केवारी सँपलमध्ये १०% असेल, तर जनसमूहात त्याची टक्केवारी ८-१२ टक्के अशा क्षेत्रात असू शकेल.
या गणितात जनसमूहाची लोकसंख्या ११० लाख की ११० कोटी या संख्येचा नगण्य फरक पडतो.
संभाव्य दोष प्रकार २) सँपल खरोखर रँडम नसणे. निवडपद्धतीचा जर प्रश्नाच्या उत्तराशी पूर्वसंबंध असेल तर सँपलमधील टक्केवारी खर्या टक्केवारीपेक्षा त्या पूर्वसंबंधांच्या दिशेने कललेली असेल. (बायस)
स्पष्ट उदाहरणार्थ मराठी संकेतस्थळावर कौल घेतला की "तुम्ही मराठी संकेतस्थळ वापरता का?" तर प्रश्नाच्या "होय" उत्तराशी निवडपद्धतीचा पूर्वसंबंध आहे. त्यामुळे सँपलमध्ये "हो" म्हणणार्यांची टक्केवारी जनसामान्यातील टक्केवारीपेक्षा अधिक असेल. याचा "सँपल साइझ"शी थेट संबंध लागत नाही. सँपल साइझ खूप प्रचंड असले तरी कल दुष्परिणाम करायचा तो करतोच.
निवडपद्धतीमधील चूक नेहमीच इतकी सुस्पष्ट नसते. समजा सेल फोन वापरून सर्वेक्षण केले, "तुमच्या आंगणात रांगोळी काढतात काय?" तर आपल्याला खरोखर माहीत नसते - "सँपलमध्ये निवड होण्यासाठी सेलफोन उपलब्ध पाहिजे, खरे - पण त्याचा रांगोळी असण्याशी पूर्वसंबंध आहे काय?" असा पूर्वसंबंध नसला, तर बायस नाही. असा पूर्वसंबंध असल्यास बायस आहे. अशा परिस्थितीमध्ये मर्यादित विधान करणे बरे : "सेल फोन वर उत्तर देणार्यांपैकी क्ष% लोकांच्या आंगणात रांगोळी असते - अनिश्चिततेचे क्षेत्र य%-ज्ञ%"
येथे मात्र जनसमूहाच्या लोकसंख्येचा आडसंबंध येतो. जनसमूह मोठा आणि विखुरलेला असेल, तर त्याच्या प्रत्येक व्यक्तीला सँपलमध्ये येण्याची शक्यता नसते. उदाहरणार्थ : अरुणाचल प्रदेशातल्या एखाद्या दुर्गम भागातल्या शेतकरीसुद्धा सँपलमध्ये येणे शक्य होते का? जे निवडीच्या बाहेर होते त्याचा प्रश्नाच्या उत्तराशी पूर्वसंबंध लागतो का?
अशा परिस्थितीत सँपल कसे निवडले त्याबद्दल माहिती तळटीपांमध्ये किंवा अहवालाच्या परिशिष्टात देणे आवश्यक असते.
उदाहरणार्थ माझ्या वैद्यकीय निबंधात अशी काहीशी टीप असते :
अमुक शहरात, सन १९क्षक्ष ते २०क्षक्ष काळात, अमुक १० इस्पितळांत हृदयविकाराच्या झटक्याने दाखल झालेल्या पेशंटपैकीच सँपल आहे. (अशा हजारो रुग्णांपैकी निवडले फक्त १००, पण त्या हजारोंपैकी कोणीही निवडले जायची शक्यता होती, हे अध्याहृत.) त्यातही ज्यांना सर्वेक्षण समजावून सांगता आले, आणि ज्यांनी उत्तरे देण्याची अनुमती दिली, त्यांनाच निवडलेले आहे.
.
- अमुक शहर हे अन्य शहरांपेक्षा वेगळे आहे, विशेषतः वाचकाला रस आहे त्या शहरापेक्षा वेगळे आहे, आणि त्याचा दिलेल्या उत्तराशी पूर्वसंबंध आहे
- १९क्षक्ष ते २०क्षक्ष हा काळ आजच्या काळापेक्षा खूप वेगळा आहे, आणि त्याचा दिलेल्या उत्तराशी पूर्वसंबंध आहे
- ती दहा इस्पितळे अन्य इस्पितळांपेक्षा खूप वेगळी आहेत आणि त्याचा दिलेल्या उत्तराशी पूर्वसंबंध आहे
- इस्पितळात दाखल झालेले लोक हे इस्पितळात दाखल होण्यापूर्वीच झटक्यात मरून जाणार्या लोकांपेक्षा खूप वेगळे आहेत, आणि त्याचा दिलेल्या उत्तराशी पूर्वसंबंध आहे...
- अनुमती देणारे खूप वेगळे...
.
हे सर्व निर्णय वाचकाने करायचे असतात.
.
अर्थातच लेखक म्हणून मी मत सांगेन की माझ्या सर्वेक्षणाचे निकाल अमुकतमुक मर्यादेपर्यंत अन्य रुग्णांना लागू आहेत. आणि या सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीचा त्या मर्यादेतील रुग्णांच्या उपचारासाठी भविष्यात उपयोग व्हावा. (कारण असा उपयोग होत नसला तर सर्वेक्षण प्रसिद्ध करण्याचे माझे प्रयोजन फार कमी होते.)
.
काही माहिती
प्र१ उत्तर ई
प्र २ उत्तर अ किंवा ब
प्र ३ उत्तर ड किंवा ई
संदर्भ मी व माझा देव
नुसार असु शकते
प्रकाश घाटपांडे
सर्वेक्षणाच्या मर्यादा
धनंजय आणि राजेश यांनी चांगलाच हातभार लावला. आलेखाची कल्पना मला सुचली नव्हती.
एकंदर ११ प्रस्न विचारले होते. शेवटचे तीन प्रश्न उत्पन्न, शिक्षण आणि वयावर आधारित होते. त्यावरून थोडी अधिक आकडेवारी मांडता येते.
विश्वास शब्दाऐवजी सहमत शब्द जास्त योग्य आहे हे मान्य करतो.
हे सर्वेक्षण अचानक झाले. म्हणजे विचार बरेच दिवस होता पण हिम्मत होत नव्हती. म्हणजे कुणाच्या भावनेला धक्का पोचेल का असे वाटत होते. पहिला प्रयोग कार्यालयात केला. तेव्हा मला न जुमानता सहकार्यांनी आपली मते मांडल्यावर तो दुणावला. आपसूक सहभागी होणारे मिळत गेले. मी फक्त लक्ष एव्हडेच ठेवले की कुठल्याही कल असलेल्या संघटनेतील (आस्तिक/नास्तिक) एकगठ्ठा मते येऊ नयेत.
नेमकी निवड वगैरे प्रकार करता आला नाही. (असे सर्वेक्षण बरेच महागडे होऊ शकते.) प्रयत्न केला की वय-शिक्षण-उत्पन्नावर विविधता मिळावी. लिंग व धर्मावर जोर दिला नाही. प्रश्न मराठीत असल्याने मुस्लिम ख्रिश्चन कमी होते. (नव्हतेच असे नाही.) पुरुषांचे प्रमाण त्यामानाने थोडे फार जास्तच असावे. सर्वेक्षण महाराष्ट्रभ्रर केले नाही. ते मुख्यतः मुंबईत आणि आसपास झाले. एका नेट सर्वेक्षणाची योजना केली गेली. त्यात साधारण सत्तर प्रतिसाद आले.
उत्तरांचे प्र्माण सारखे येत आहे असे वाटल्यावर अधिक नोंदणी केली नाही. अर्थात हे काही सर्वेक्षणाच्या विश्वासार्हतेचे लक्षण आहे असे म्हणता येणार नाही.
प्रमोद
अभिनंदन
सर्वेक्षण करून विदा जाहिर केल्याबद्द्ल अभिनंदन
शिवाय सर्वेक्षणाच्या मर्यादा मान्य करूनही जो आलेख मिळत आहे तो माझ्या आजपर्यंतच्या (आप्त, मित्र, परिचित यांच्याशी बोलण्यातून आलेल्या) अनुभवांशी मिळताजुळता आहे. पुनश्च अभिनंदन
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
असेच म्हणतो.
सर्वेक्षण करून विदा जाहिर केल्याबद्द्ल अभिनंदन
-दिलीप बिरुटे
[जग देवाने निर्माण केले यावर विश्वास असलेला]
डिव्हाईन अंडरस्टॅडींग
Divine understanding
हा दीपक रानडे ह्यांनी लिहिलेला लेख ह्या विषयावर चर्चा करण्यास उपयोगी पडू शकेल.