मी व माझा देव - ग्रंथ परिचय

ग्रंथ परिचय :- मी आणि माझा देव

''देवांनाही साडेसाती चुकली नाही तिथं तुम्ही आम्ही कोण?`` असं ज्योतिषी महाराज जेव्हा जातकाला सांगतात तेव्हा देवही आपल्याच पंक्तीला आहेत याचं समाधान त्याला मिळतं. या देवाचा शोध हा अनादिकालापासून चालत आलेला आहे. अनंत काळापर्यंत चालू रहाण्याची शक्यता नाकारता येत नाही. देव या संकल्पनेचा मागोवा वेळोवेळी वेगवेगळया काळाच्या टप्प्यावर घेतला गेलेला आहे. तुमचा देवावर विश्वास आहे का? असा प्रश्न भल्याभल्यांना बुचकळयात, संभ्रमात, चिंतनात टाकतो. मग तुम्हाला कोणता देव अभिप्रेत आहे? अशा प्रतिप्रश्नाने उसंत मिळते. मी आणि माझा देव या प्रा. वि. शं चौघुले संपादित पुस्तकात आपल्याला वेगवेगळया क्षेत्रातील दिग्गज लोकांचा देव वाचायला मिळतो. १५ लेख व ६ मुलाखतींमध्ये हा देव प्रकट होतो. प्रा. चौघुल्यांनी या लोकांना लिहिते बोलते करुन त्यांच्या भावविश्वालाच हात घातला आहे. समीक्षक असलेल्या चौघुल्यांनी ही कलाकृती समीक्षेच्या माध्यमातून न आणता संपादनाच्या माध्यमातून आणली आहे.

देव या संकल्पनेची मांडणी करताना प्रत्येकाने आपली मानसिक जडणघडण कशी बनत गेली याची चर्चा केली आहे. प्रत्येकाच्या भावविश्वात ही संकल्पना कशी साकार होत गेली याचे विश्लेषण आहे. निर्गुण निराकार, सगुण साकार, भक्तवत्सल करुणाघन अशा वेगवेगळया संकल्पना यात दिसतात. के. ज. पुरोहितांनी देवाचं अस्तित्व नाकारण्याचा मला अधिकार आहे असे सांगून जिथं देव ही एक सांस्कृतिक सवय आहे तिथं त्यांनी विरोध केला नाही. केशव मेश्राम यांनी देव या संकल्पनेचं अस्तित्व धर्माच्या मातीतच रुजले असल्याचे सांगून विषमता निर्माण करणारी ही संकल्पना खोटी आणि त्याज्य ठरविली आहे. दि.य देशपांडे यांनी आपण शुद्ध निरिश्वरवादी असल्याचे सांगून श्रद्धा व अज्ञेयवाद यांचे तात्विकदृष्टया खंडन केले आहे. विश्वास पाटील यांचा देव जगलाच नाही. तर वि.गो. कुलकर्ण्यांचा देव सत् चित् आनंद रूपात आहे. यशवंत देवांच देवाच्यात डोकावणं चालूच आहे. न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा देव आचरणाला महत्व देणारा आहे. फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांचा देव सखा, सहचर आणि पिता आहे.यशवंत पाठकांनी सुंदर जगणे यातच देवत्व शोधलं आहे. डॉ. नितू मांडके यांचा सश्रद्ध आणि प्रयत्नवादी दृष्टिकोणात देव आहे. डॉ. शेखर आंबर्डेकरांची देवभक्ती म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा. डॉ. वि.ना.श्रीखंडे यांनी रूग्णालाच देव मानले आहे. प्रमिला दंडवत्यांनी राजकारण्यांनी देव धर्मात विकृती आणली आहे असे सांगून स्वत: जरी देव मानत नसल्या तरी इतरांच्या सश्रद्धतेचा ते आदर करतात. डॉ. अनिल अवचटांनी चांगला माणूस हा आस्तिक नास्तिक कसाही असू शकतो हे त्यांच्या खास शैलीत चित्रण केले आहे. मी नास्तिक ही नाही व आस्तिकही नाही असे समन्वयवादी उत्तर ते देतात. कुणी त्याला पलायवाद म्हटलं तर ते हसतात व म्हणतात 'तसं समजा`. राम शेवाळकरांना जडवाद्यांची उठवळ उत्तरे पटत नाहीत. जीवजगतामध्ये बुद्धी ही सर्वश्रेष्ठ शक्ती असली तरी तिच्याद्वारे सर्व कूटस्थळांचा उलगडा करण्याचा दावा बाळगणे हे त्यांना निर्ढावलेल्या ऋणाईताने सावकारालाच कर्ज पुरवठा करण्याचा आव आणण्यासारखे वाटते.

वाचकाला देवाविषयीच्या या सर्व कल्पना एकत्रित वाचायला मिळतात. अस्तिक, नास्तिक अज्ञेयवादी या सर्वामध्ये एक समान सर्वमान्य सूत्र आहे ते म्हणजे माणुसकी जतन करणे. तिथं ईश्वराचे अस्तित्व वा नस्तित्व आड येत नाही. देव नाकारणारा माणूस विवेकी असू शकतो व देव मानणारा माणूस हा अविवेकी असू शकतो. या देव मानणाऱ्या लोकांमध्ये धर्मांधता कुठेही आढळत नाही. प्रा.चौघुल्यांनी या पुस्तकाच्या निमित्ताने ईश्वर व धर्मविषयक विचारप्रक्रियेला चालना मिळावी अशी अपेक्षा बाळगली आहे ती नक्कीच फलदायी ठरेल अशी आशा वाटते. वाचकांच्याही ईश्वर विषयक असलेल्या कल्पनांची छाननी होईल. देवाच्या कल्पना या धर्म, संस्कृती यातूनच बऱ्याचशा साकारतात त्यामुळे आपल्या संस्कारांचे प्रतिबिंब देव या कल्पनेत दिसतं. धर्म, अध्यात्म, श्रद्धा, बुद्धीप्रमाण्य, तर्क, सदसदविवेकबुद्धी, तत्वज्ञान, अध्यात्म, अशा गुंफलेल्या शब्दात लोकांना भावलेला परमेश्वर हा वेचावा लागतो. 'परमेश्वराला रिटायर करा` असे म्हणणाऱ्या श्रीराम लागूंना काही लोकांनी ''अस्तित्वात नसलेल्या लोकांची रिटायरमेट कशी होईल? म्हणजे रिटायरमेंटसाठी का होईना तुम्ही परमेश्वर मानलाच की नाही?`` असा प्रतिप्रश्न करुन आत्मिक समाधान करुन घेतले होते. येथे मात्र लागूंचा समावेश नाही ही उणीव प्रकर्षाने जाणवते.

मी आणि माझा देव
संपादक:- वि.शं चौघुले
मॅजेस्टिक प्रकाशन
किंमत:- १७०/-
पृष्ठे :- २०४

Comments

वाचायला आवडेल

पुस्तक परिक्षणाबद्दल धन्यवाद! पुढच्या खेपेस नक्कीच घेऊन वाचीन! अवचटांचे " मी नास्तिक ही नाही व आस्तिकही नाही असे समन्वयवादी उत्तर ते देतात. " वाचताना कोणा एका (माहीत नसलेल्या) कवीने देवळासमोरून जाताना पटकन छातीला हात लावून नमस्कार करत पुढे जाणार्‍या वृत्तीवर मार्मिक ओळी लिहीलेल्या आठवल्या: (जशा आठवतात तशा)

देवळा समोरून जात असता थांबलो घटका दोन
कारण उद्या खरेच भेटला तर त्याने विचारू नये की, "आपण कोण?"

उपलब्धता

जर अशी पुस्तक डिजिटल स्वरुपात अनिवासी मराठी वाचकप्रेमींना लगेचच वाचायला मिळाली तर काय बहार येईल. कारण उत्साह असतानाच जर उपलब्धता झाली तर दमदार वाचन होते अन्यथा ते मागे पडते असा अनुभव आहे.
प्रकाश घाटपांडे

पुस्तक डिजिटल स्वरुपात

जर अशी पुस्तक डिजिटल स्वरुपात अनिवासी मराठी वाचकप्रेमींना लगेचच वाचायला मिळाली तर काय बहार येईल.

अगदी बरोबर आहे. त्यातले अर्थकारण कदाचीत असे प्रकल्प पुस्तकांमधे येण्याच्या मधे येत असावे. मराठी वृत्तपत्रे जालावर आल्यापासून "घार हिंडते आकाशी..." प्रमाणे खर्‍या अर्थाने होऊ लागले आहे.

वाचावे लागेल !

पुस्तक परिक्षण आवडले, आपण केलेल्या परिक्षणातून पुस्तकाची उत्सूकता लागली आहे.
देवाविषयीच्या कल्पना आणि त्याचा विचार न थांबणारा आहे त्यासाठी हे पुस्तक वाचावेच लागेल.
पुस्तकाची ओळख थोडक्यात आणि उत्तम करुन दिल्याबद्दल आपले अभिनंदन !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचेन

पुस्तक परिक्षण वाचले. "देवाविषयीच्या या सर्व कल्पना एकत्रित वाचायला मिळतात. " हे चांगले आहे.

पूर्वी दिसले पुस्तक की उचल आणि वाच असा प्रकार होता. हल्ली कोणाचेही (गंभीर) विचार वाचायच्या आधी असे वाटते की मला स्वतःला काय म्हणायचे आहे? यावर माझे मत काय आहे? माझे अनुभव काय आहेत? (देवाबद्दलचे नव्हे, नाहीतर सगळे माझ्या मागे लागायचे नक्की तू काय पाहिलेस म्हणून). ते (माझे मत) कोणाचे वाचल्याने फार बदलत असले तर मी नक्की काय आणि किती खोलवर विचार केला होता असले प्रश्न सुचतात. असले विचार केल्यामुळे आणि स्वतःत (नको इतके) गुरफटल्यामुळे पुस्तके वाचणे पूर्वीच्या मानाने कमी झाले आहे - ते बरोबर आहे असे म्हणायचे नाही (वाचाल तर वाचाल वगैरे सर्व माहिती आहे). पण स्वत:च्या अवांतर वाचनाची कमतरता जाणवते जेव्हा लोक इतर दहा लोकांच्या वचनांचा उल्लेख करतात आणि आपल्याला काही देता येत नाहीत तेव्हा! त्यामुळे तुम्ही उल्लेखलेले पुस्तक पुढच्या वेळी घेऊन नक्की वाचेन.

 
^ वर