सेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार -भाग ७ (अंतिम)

Secularism एक सर्वंकष विचार

(परम-मित्र दिवाळीअंक 2006)





ले. अरविंद बाळ





सेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार - भाग १




सेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार -भाग २



सेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार -भाग ३


सेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार -भाग ४

सेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार -भाग ५
सेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार -भाग ६


समारोप - एक स्वप्न

या निबंधाचा समारोप एका स्वप्नानेच करावा असा वाटत. Secularism च्या प्रकाशात राष्ट्रवाद आणि हिंदुत्व याचा विचार केला. त्यासंदर्भात मुसलमानांची आणि हिंदूची मानसिकता पण पाहिल्या. त्यातून शास्त्रीय निष्कर्ष पुढे अंधार किंवा पुन्हा एखादे यादवी युध्द असाच निघतो. त्याऐवजी एखादे स्वप्न पाहायला काय हरकत आहे ?

अंततो गत्व हिंदू काय किंवा मुसलमान काय, सर्व मुळात माणसेच असतात. त्यामुळे ती जशी स्खलनशीस असूं शकतात तशीच उत्थानशीलही असूं शकतात. मग त्यांच्या मानसिकतेत बदल घडवून एक एकात्म सामर्थ्यशाली राष्ट्र घडवण्याचे स्वप्न का पाहू नये ? त्याकरिता प्रयत्नांची दिशा का ठरवू नये ?

सर्व हिंदूंचं, केवळ हिंदू या समान आधारावर एक राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. वास्तविक भारतात जात,वंश, भाषा इत्यादी अनेक मुद्यांवर अनेक राष्टके अस्तित्वात आहेत हे वास्तव आहे. डॉ. आंबेडकर म्हणाले होते,"मला मुळात मातृभूमीच नाही". भटक्या जमाती गुन्हेगार जमाती, वनवासी विशेषत: उत्तर पूर्वेकडील नागा, मिझो, इत्यादी जमाती यांना एकराष्ट्रीयत्वांत गुंफण्याचे प्रयत्न आपण करतोच ना? मग मुसलमानांच्याच अराष्ट्रीय प्रवृत्तीला एवढं घाबरुन जायचे काय कारण आहे ?

शांतपणे विचार केला तर सर्व हिंदूंचं असं तरी एकात्म राष्ट्र आहे कां ? पूर्वी कधी होते कां ? भावना उद्दिपीत करण्यासाठी, "गेल्या 5000 वर्षापासूनची आमची संस्कृति" वगैरे म्हणांव पण तो काही इतिहास नव्हे. किंबहुना एकत्वाची भावना नसल्यामुळे तर सर्व परकीय आक्रमणं यशस्वी झाली. मग जर कुणी हिंदुंचं म्हणून एक हिंदुराष्ट्र बनवण्याचे प्रयत्न करतो तर सर्व भारतीयांचच असं विशेषत: मुसलमानांसह, एक राष्ट्र बनवण्याचा विचारही का करु नये ?

राष्ट्र याची व्याख्या "एकत्र, एकत्वाने राहू इच्छिणारे अनेक लोकसमूह" अशी आपण पाहिली. राष्ट्रनिर्मितीच्या प्रयत्नात इतिहासातील अनेक दुख:द अपमानाच्या जखमा विसराव्या लागतात. निवडकपणे काही ऐतिहासिक प्रसंग विसरावे लागतात, वेचून काही समन्वयाच्या घटना प्रकाशमान कराव्या लागतात. योजना पूर्वकपणे काही मिथ्थकं निर्माणही करावी लागतात. सगळाच इतिहास घडला तसा सांगून जगातंल कोणतच राष्ट्र निर्माण करता येणार आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे.

खरोखरच एकात्म असं एक तरी राष्ट्र राज्य पृथ्वीच्या पाठीवर कुठे अस्तित्वात असेल का ? जर असं आदर्श राष्ट्र कुठेच नसेल तर आपण तरी इतकं निराश आणि उदास व्हायच कारण आहे कां ? उलट परस्पर विरोधी असे लोक समूह एकत्र आणून त्यांना एक राष्ट्रीयत्वात गुंफल्याची उदाहरणे जगाच्या इतिहासात आहेत. आपण त्यावरुन धडा घेऊन काही करु शकणार नाही कां ?

भारतात हिंदू आणि मुसलमान यांच अनेक शतकांच शत्रुत्व असं सहजी विसरण शक्य नाही हे खर आहे. पण पुन्हा जखमांवरील खपल्या काढून त्या भळभळवण आवश्यक आहे कां?. जाणीवपूर्वक समन्वयांचं अभिनव तंत्र आणि एकात्मतेचा नवा मंत्र शोधून काढता येणारच नाही कां ?

हे केवळ भाबड स्वप्न नव्हे. याला एक पूर्वअट एवढीच आहे की अंर्तमनात इतिहासातील वास्तव लक्षात ठेवून नवीन मार्ग चोखाळायला हवेत. अनुनय हा जसा मार्ग नव्हे तसं सदैव तलवार उपसूनच चर्चा करणे हे ही उत्तर नव्हे.

अशा ध्येयासाठी अनेक मार्ग सुचवता येतील पण ते या समारोपाच्या आवाक्यात नाहीत. पण तरीही काही मार्ग सुचवावेसे वाटतात. 26 जानेवारी सारखे राष्ट्रीय उत्सव शक्तीप्रदर्शनाची परेड काढण्याऐवजी राष्ट्रीय एकात्मतेचे सण म्हणून साजरे करता येतील. वर वर दाखवला जातो तसा "वंदे मातरम्" ला मुसलमानांचा विरोध असतोच असं नाही. नुकताच पुण्यात एक सांघिक कार्यक्रम झाला ज्यात हिंदू मसुलमानांनी एकत्र वंदे मातरम गायलं. मुस्लीम सत्यशोधक मंडळासारख्या पुरोगामी विचारांच्या संघटनांना राष्ट्रीय मदत कर णे आवश्यक आहे. महाराष्ट्रापुरतं बोलायचे तर गीत रामायणा सारख्या सांस्कृतिक कार्यक्रमातही कधी मुसलमान गायक गायीका का दिसत नाहीत ? योजनापूर्वक असे कार्यक्रम घडवून आणायला हवेत. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफलखानाच्या कबरीच पुनरुज्जीवन करणं हे राष्ट्रीय एकात्मतेच्या विरोधात जातं असं वाटणारे मुसलमान युवक आहेत. पतीत पावन आणि बजरंग दलाच्या निर्दशनांऐवजी पूर्णत: मुसलमान युवकांचे पथक आपण निर्माण करु शकणार नाही कां? एकात्मता स्त्रोत्रात कबीराचे नांव घालणे हे अगदीच अपुरं आहे. अगदी शेरशहा सूरी पासून दाराशुखो, मकबुल शेरवानी, हमीद दलवाई पर्यंत अनेकांचा एकात्मते साठी उपयोग करणं आवश्यक आहे. काही तत्वे आणि काही प्रत्यक्ष चळवळी असा दुपदरी कार्यक्रम आखणे आवश्यक आहे.

हे सर्वच स्वप्नवत वाटणं साहजिकच आहे पण अशी स्वप्न आज पाहिली तरच ती उद्या प्रत्यक्षात येवू शकतील. सदैव वैराचा, विघटनाचा कोळसा उगाळत बसण्याऐवजी सहकाराचे वातावरण निर्माण करणे हा केवळ आदर्श वाद नव्हे तर ती एक आवश्यक गरज आहे. त्यासाठी प्रयत्नशील राहण्याखेरीज दुसरा उपाय नाही. आणि प्रयत्नांना यश येईल अशी माझी खात्री आहे.

अशा आशावादी सुरावर हा विचार शोध संपवतो.
(समाप्त)

लेखनविषय: दुवे:
 
^ वर