सेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार - भाग १

(परम-मित्र दिवाळीअंक 2006)

Secularism एक सर्वंकष विचार

ले. अरविंद बाळ
लेखकाविषयी प्रास्ताविक इथे केले आहे

Secularism ची व्युत्पत्ति, अर्थ आणि इतिहास

Secularism हा विषय म्हटंल तर चाऊन चोथा झालेला आहे. पण मला वाटत त्याचा खरा “ag” अजूनहि नीटसा कळलेला नाही. त्यातला “ag” कोणता आणि “चोथा” कोणता हे समजून घेणे आजहि आवश्यक आहे.

विनोबाजींनी त्यांच्या “विचारपोथी” निवेदनांत म्हटले आहे. “ह्या विचारांना पूर्वश्रुतींचे आलंबन तर आहेच, तथापि ते आपल्या परी निरालंबहि आहेत” .

मी येथे जे विचार मांडणार आहे, तसे विचार पूर्वी कोणी मांडलेच नाहीत असा माझा दावा नाही. पण मला त्यापेक्षां काहींतरी नवीन सांगायच आहे म्हणून तर हा लेखनाचा प्रपंच.

Secularism यांचे शब्दकोशीय अर्थ अगदी स्पष्ट आहेत. सर्वच अर्थांमधील किमान समानता “धर्मनिरपेक्ष इहवाद” अशी आहे.

Secularism हा शब्द याच स्वरुपांत 150 वर्षापूर्वी - नेमकेपणाने 1851 मध्ये प्रथम वापरला गेला. The Reasoner या जर्नलच्या 25 जून 1851 च्या अंकात Secularism हा शब्द वापरला गेला आणि अर्थ तिथेच “Which can be tested in this life” असा सांगितलाही गेला.

या शब्दाची व्युत्पत्ती लॅटिन Seculum म्हणजे काळ, युग - या शब्दांतून आहे. मुळांत काळाशी संबंधित या शब्दाची व्याप्ती अवकाशाशी जोडली गेली. म्हणजे मुळांत “अद्यवाद” अशा अर्थांतून “इहवाद” असा याचा अर्थ झाला. म्हणून Secularism याचं शब्दकोशीय भाषांतर Pertaining to temporal and wordly matters असंच आहे. म्हणजे “आजचे” आणि “इथले” प्रश्न याविषयी जो वाद चर्चा करतो तो Secularism.

मग Secularism या संकल्पनेचा “धर्म”संकल्पनेशी संबंधच का आणि कसा आला? कारण “धर्म” आजच्या आणि इथल्या प्रश्नांवर जेव्हा चर्चा करु लागतो, धर्माज्ञा देऊं लागतो तेव्हा”धर्म” आणि Secularism परस्पर विरोधात उभे राहतात. कारण Secularism च्या मते ऐहिकाचा प्रांत हा धर्मांचा प्रांत नाही.

“धर्मा” चे ऐहिक आणि पारलौकिक असे दोन भाग असतात. ( ही समजूत ही कशी चुकीची आहे, हे पुढे दाखविण्यात येईल) शिवाय “धर्माचा” जो तत्वज्ञानीय भाग असतो तोहि पारलौकिकातच मोडण्याची चुकीची प्रथा आहे.

Secularism ला “धर्मा” च्या पारलौकिक आणि तत्वज्ञान/अध्यात्म यांच्याविषयी काही देणघेण नसतं. प्रश्न फक्त “धर्मा” च्या ऐहिक अंगाविषयीच असतो. आणि “धर्मा” ने ऐहिकाविषयी काही उहापोह करुं नये, आज्ञा तर देऊच नयेत अशी अगदी माफक आणि नम्र अपेक्षा Secularism ची आहे.

इथे प्रथम “धर्म” शब्दाचा नेमका अर्थ समजून घेणं आवश्यक आहे. कारण Secularism प्रमाणेच “धर्म” या शब्दाच्या अर्थावर बराच घोळ माजवला जातो. काही जणांचा प्रामाणिक गैरसमजाने तर कांही जणांचा खोडसाळपणे. Secularism चा मुख्यत: इहवाद आणि जास्त स्पष्टीकरणासाठी “धर्मनिरपेक्ष इहवाद” हा अर्थ समजून घेतला की Secularism ला विरोध करण प्रतिगामीपणांच ठरत. म्हणून “धर्म” म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय ? मातृधर्म, शेजारधर्म, धर्मशाळा वगैरे शब्दांतला “धर्म” ही तुम्हाला मान्य नाही कां ? असा प्रतिप्रश्न विचारला जातो. म्हणून आतां धर्माचा अर्थ समजून घेण आवश्यक आहे.

धर्म या शब्दाचे अमर कोशातील अर्थ.
श्लोक 146 - पुण्य श्रेयस, सुकृत वृष = चार अर्थ म्हणजे पर्यायी शब्द दिले आहेत.
(वृष म्हणजे शंकराचा नंदी - शक्ति आणि नीतीचा द्योतक)
श्लोक 174 - वैदिक विधी -
श्लोक 1347 नानार्थविभाग - यांत धर्म =पुण्य, न्याय, स्वभावाचार (Natural Properties) सोमप असे चार पर्यायी शब्द दिलेले आहेत.

हे सर्वच अर्थ Religion ही संकल्पना येण्यापूर्वीचे आहेत. कारण अमरसिंह, अमरकोशाचा रचयिता - याचा काळ इ.स.पूर्व पहिलं शतक ते इ.स.चं तिसर शतक असा आहे. म्हणजे औपचारिक Religions ख्रिश्चन, इस्लाम व शिख यांच्या स्थापने पूर्वींचा किंवा भारतांत आगमनापूर्वीचा आहे. निदान अमरसिंहाला माहिती होण्यापूर्वीचा आहे. त्यामुळे Religion याला पर्यायवाचक शब्द काय वापरावा हे आता आपणच ठरवायच आहे. Monier Williams याच्या कोशांत Religion याला “धर्म” असाच शब्द आहे. Religion याअर्थी “धर्म” शब्द वापरणं हेच मला श्रेयस्कर वाटत. कारण तोच प्रचारांतील शब्द आहे. संदर्भानुसार दुसरे अर्थ समजू शकतात. Religion या शब्दांच भाषांतर पंथ, संपद्राय, उपासनापध्दती असं करांव असा काहींचा (म्हणजे कांही हिंदूचा) आग्रह असतो. कारण “धर्म” ही संकल्पना फारच उच्च दर्जाची आहे असा त्यांचा दावा असतो.

“पाणी” या मराठी शब्दाला संस्कृतमध्ये 27 प्रतिशब्द आहेत. (अमर कोश- श्लोक 257 आणि 258) आणि दूध या शब्दाला तीन प्रतिशब्द आहेत.(श्लोक 937) हे तीन शब्द आहेत, दुग्धं, क्षीरं आणि पयस्. त्यातील गमतीचा भाग असा की पाणी याच्यासाठीच्या 27 शब्दात क्षीर आणि पयस् हे दोन शब्दही आहेत. मग जेव्हा आपण “नीरक्षीर विवेक” असा शब्द वापरतो तेव्हा येथे क्षीर या शब्दाचा अर्थ दूध असाच घेतो, पाणी असा नाही. संदर्भावरुन आपण एवढा “विवेक” करतो की नीरक्षीरविवेक म्हणजे पाणी आणि पाणी यातील भेद समजणे असा नसून पाणी आणि दूध हे वेगवेगळे करु शकणारी तर्कबुध्दी.

आपण जर असा “नीरक्षीरविवेक” करु शकतो तर मातृधर्म, शेजारधर्म, धर्मशाला, धर्मकाटा यातील “धर्म” शब्दाचा अर्थ कर्तव्य, सदाचार, नीती असा आहे हे समजू शकत नाहीं कां ? धर्मनिरपेक्ष इहवाद या शब्दातील धर्म याचा अर्थ Religion एवढयाचपुरता आहे हे लक्षात येऊ शकत नाही कां ?

पण जाणून बूजून एखादी गोष्ट लक्षांत घ्यायचीच नसेल, घोटाळे माजवायचेच असतील तर हिंदुधर्माभिमानी हे असे व्यर्थ श्लेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

वास्तविक Religion याच्या पंथ, संप्रदाय अशा भाषांतराला आक्षेप घेण्याच कारण नाही. पण वरवर वाटतं तेवढं हे म्हणणं निरुपद्रवी नाही. कारण हिंदू धर्माभिमान्यांना त्यातून अनुसिध्दांत असा मांडायचा असतो की इस्लाम,ख्रिश्चन आदि Religions हे केवळ पंथ, संप्रदाय उपासनापध्दती आहेत (mere religions) . फक्त सनातन हिंदू धर्मच, “धर्म” या पदवीला पात्र आहे. म्हणजे Secularism ला पंथनिरपेक्ष म्हणा म्हणजे आपोआपच त्यांतून सनातन हिंदू धर्म वगळला जाईल.

“धर्म” हा शब्द आणि त्याच्या व्याख्या रामायण महाभारतातील श्लोकांवरुन घेतल्या जातात. पण तेव्हा Religion ही संकल्पनाच नव्हती. Religion या संकल्पनेला भारतीय भाषांतून संप्रदाय, पंथ, पूजापध्दती, अशा शब्दांची योजना झाली असती तर प्रश्नच आला नसता पण. Religion या अर्थी “धर्म” असाच शब्द वापरण्याची प्रथा सुरु झाल्यावर आता धर्म म्हणजे Religion नव्हे किंवा Religion म्हणजे धर्म नव्हे असं म्हणण्याचा हट्ट धरु नये. कारण त्यातून काहींच साधत नाही. “धर्म” हा शब्द काही वेगळया अर्थाने वापरण्याचा हट्टच असेल तर भारतीय भाषांतूनहि Secularism प्रमाणे Religion हा शब्द जशाच्या तसा वापरावा. इंग्रजीत नाही का Yoga (योगा या चुकीच्या उच्चारासह) Mantra (पुन्हा मंत्रा हा चुकीचा उच्चार) Guru, Avatar असे संस्कृत शब्द वापरीत ?

“धर्म” या शब्दांच महात्म्य सांगण्यासाठी वारंवार सांगण्यात येणारे श्लोक असे.
1. न वै राज्यं न राजासीत न च दण्डयो न दाण्डिक :/
धर्मेणैव प्रजा: सर्वा: रक्षन्ति स्म परस्परम् // (महाभारत शान्तिपर्व 59/14)
2. धारणात् धर्मम् इत्याहु: धर्मो धारयंते प्रजा /
य: स्याद् धारणसंयुक्त: स धर्म इती निश्यय: //(महाभारत-कर्णपर्व 49-50)
3. आहारनिद्राभयमैथुनं च सामान्यमेतद् पशुभिर्नराणाम् /
धर्मो हि तेषामाधिको विशेषो धर्मेण हीना: पशुभि: समाना :/(चाणक्यनिति)

धर्म म्हणजे नीती, सदाचार, उच्च मानवीय कर्तव्य अशा अर्थी “धर्म” हा शब्द या व अशा श्लोकांतून आलेला आहे. पण तो Religion नव्हे आणि हिंदू Religion पुरता तर नव्हेच नव्हे. हे सर्व श्लोक अखिल मानवजातीला लागू होणारे आहेत आणि आपापल्या जागी योग्यहि आहेत. पण त्याचा हिंदू धर्माच्या गौरवाकरता दुरुपयोग मात्र करुं नये.

पण धर्म नुसत्या “धार्मिकते” शी कधीच थांबत नाही. एका बाजूने धर्मभोळेपणा तर दुस-या बाजूने धर्मांधता अशा कातरीत नेहमीच धर्म अडकतो. धर्मभोळेपणाने माणसं स्वत:चाच नाश करतात, धर्मांधतेने माणसं क्रूर बनतात आणि परधमर्मिंयांची हिंसा करतात. लुळयापांगळया, निरुपद्रवी धार्मिकतेला विचारतो कोण ? धर्माचा तिढा हा असा चमत्कारीक आहे.

निरपेक्ष म्हणजे “विरहित” नव्हे पण तसा गैरसमज पसरविला जातो. धर्म म्हणजे निति-सदाचार आणि निरपेक्ष म्हणजे विरहित आणि म्हणून धर्मनिरपेक्ष = नितिविरहित म्हणजे दुराचारी अशी अनर्थमालिका कधी अडाणीपणआने तर कधी खोडसाळपणे चालवली जाते.

वास्तविक “निरपेक्षता” या शब्दांत कसलाही अनादर नाही. गणिताच्या भाषेत “अचल घटक” दाखवण्यासाठी हा शब्द वापरला जातो. म्हणजे “धर्म” ही संकल्पना आणि “इहवाद” ही संकल्पना परस्परावलंबी नाहीत. म्हणजे दोन्ही कल्पना स्वतंत्र आहेत. म्हणजे “इहवाद” जसा धर्मनिरपेक्ष आहे, तसाच “धर्म” पण इहवाद निरपेक्ष असायला हवा. पण दुदैवाने “धर्म” इहवाद निरपेक्ष राहात नाही, हीच मोठी समस्या आहे.

म्हणून इहवादांच धर्माशी भांडण नाही, धर्मांच इहवादाशी भांडण आहे, हे समजून घेणं आवश्यक आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

सेक्युलॅरीझम आणि सुडोसेक्युलॅरीझम

चांगला विषय आहे. माहीती आणि माहीतीचे काही विश्लेषण यात मात्र जरा गोंधळ वाटला.

थोडे शब्दाच्या इतिहासाबद्दल

जॉर्ज होलीयोक ने सेक्युलॅरीझम शद्ब तयार करण्याआधी त्याला ब्लास्फेमीमुळे तुरूंगवास झाला होता. त्यानंतर "एथीझम" हा शब्द नकारार्थी वाटल्याने त्याने हा शब्द वापरला पण नंतरच्या काळात त्याने ऍग्नॉस्टीक हा शब्द पसंत केला. (विकी संदर्भ)

थोडे सेक्युलॅरिझम आणि त्या शब्दाचे/चळवळीचे मूळ असलेल्या पाश्चात्य जगताच्या इतिहासाबाबत थोडक्यात

ख्रिश्चन जगतात पोपच्या सत्तेने राजसत्तेत सातत्याने ढवळाढवळ केली. त्यातून संपूर्ण युरोप ढवळून निघाला होता. अर्थात हे मी आधीच्या काळातील बोलत आहे. त्यातूनच ख्रिश्चॅनिटीमधे ब्रिटीश राणीने प्रोटेस्टंट पंथ तयार केला. तरी देखील एकंदरीत युरोपिअन इतिहास पहाता ख्रिश्चन धर्माची राजसत्तेवरील पकड होतीच. नंतर मात्र कारणे वेगवेगळी असली तरी फ्रेंच राज्यक्रांती आणि नंतरच्या औद्योगीक क्रांतीनंतर ती पकड सैल झाली आणि हळू हळू लोकशाहीच्या तत्वामधे झिडकारण्यात आली. (मुस्लीम जगातपण तसेच होते पण तेथे सुधारणावादी चळवळीच होऊ शकल्या नाहीत. अपवादः टर्की, नंतरच्या काळात सद्दामचा इराक). "सेक्युलॅरिझम" शब्द आणि कृती म्हणून त्याचेच एका अर्थी (चांगल्याअर्थी) टोक आहे. म्हणूनच अमेरिकेसकट पाश्चात्य जगतात आजही सेक्युलॅरिझम म्हणल्यावर "चर्च इज सेपरेट दॅन स्टेट" असे म्हणले जाते.

आता भारताविषयी थोडक्यात
अधुनिक भारतास आधी सेक्युलर करण्याची आकांक्षा ही २६ जाने १९३० सालच्या संपुर्णस्वातंत्र्याच्या ठरावापासून आहे आणि नंतर १९५० साली प्रजासत्ताक केले तेंव्हाही ठेवण्यात आली. आणिबाणीच्या काळात १९७६ साली त्याला घटनेत स्थान दिले गेले. मात्र सेक्युलॅरीझम शब्दाची व्याख्या कायद्यात घालण्याचा प्रयत्न जेंव्हा जनता सरकारने केला तेंव्हा त्याच काँग्रेसने (ज्यांनी तो ७६ साली घटनेत घातला) त्याला विरोध केला आणि आजतागायत त्या शब्दाची घटनेनुसार काहीच व्याख्या नाही.

मग नक्की आपण सेक्युलर आहोत म्हणजे काय आहोत? चर्च (धर्मस्थळे) इज सेपरेट दॅन स्टेट? ते असू कदाचीत पण मग जनतेच्या पैशाने कुठल्याच धार्मिक विधीस मदत मिळता कामा नये? तसे होते का? तर नाही हे स्पष्ट उत्तर आहे. धर्माधारीत किति गोष्टी आपण सरकारी पातळीवर करतो हे बघण्यासारखे ठरेल.

मग अजून एक प्रश्न पडतो की वरील लेखात उर्धृत केलेले इहवादी (सेक्युलॅरीस्ट) हे आजतागायत प्रथम सरकार सेक्युलर करण्याच्या मागे का लागले नाहीत? त्याची औपचारीक व्याख्या करण्याचा का हट्ट त्यांनी धरला नाही? सरकारी पैसे जेंव्हा धार्मिक गोष्टींसाठी प्रत्यक्ष (म्हणजे सुरक्षा यंत्रणा आणि नागरी सेवा सोडून) अनुदान म्हणून दिले जातात तेंव्हा ते काही का बोलत नाहीत? त्या उलट हिंदूंना विशेष करुन सेक्युलॅरिझमचे धडे का पढवले जातात?

तात्पर्य, वरील लेखातील, "म्हणून इहवादांच धर्माशी भांडण नाही, धर्मांच इहवादाशी भांडण आहे, हे समजून घेणं आवश्यक आहे." हे वाक्य वास्तवात उलट आहे. इहवादास धर्माचे आणि ते ही सिलेक्टीव्हली पडले आहे असे भारतात दिसते. म्हणूनच अशा इहवाद्यांना सुडोसेक्युलॅरीस्ट म्हणले जाते आणि अशांच्या बुद्धीभेदामुळे आजच्या परीस्थितीस आपण आलो आहोत असे वाटते.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

वा!

काय भारी प्रतिवाद केला हो 'त्या' विचाराचा.
संपलाच तो लेखताअणि त्याचा वाद फक्त एका प्रतिसादात!
मानलेच!

बाकी येता जाता हिंदु हिंदु म्हणून झोडपणे सोपेच आहे. सेक्युलॅरिटी इतकी महत्वाची वाटत असेल तर असेल तर इतर कट्टर धर्मांवर लिहुन दाखवा म्हणा असा लेख... तेथे खरी गरज आहे प्रबोधनाची

हिंदु बिचारे फतवे काढत नाहीत आणि सगळे ऐकुन घेतात ना....

आपला
गुंडोपंत

हेच ते प्रश्न

मग अजून एक प्रश्न पडतो की वरील लेखात उर्धृत केलेले इहवादी (सेक्युलॅरीस्ट) हे आजतागायत प्रथम सरकार सेक्युलर करण्याच्या मागे का लागले नाहीत? त्याची औपचारीक व्याख्या करण्याचा का हट्ट त्यांनी धरला नाही? सरकारी पैसे जेंव्हा धार्मिक गोष्टींसाठी प्रत्यक्ष (म्हणजे सुरक्षा यंत्रणा आणि नागरी सेवा सोडून) अनुदान म्हणून दिले जातात तेंव्हा ते काही का बोलत नाहीत? त्या उलट हिंदूंना विशेष करुन सेक्युलॅरिझमचे धडे का पढवले जातात?

हेच ते प्रश्न ज्यावरुन चर्चा / वादविवाद होणे अपेक्षित आहे. पुढील भागात धरमनिरपेक्षता व सर्वधर्मसमभाव याची चर्चा केली आहे
प्रकाश घाटपांडे

काल्पनिक

>>बाकी येता जाता हिंदु हिंदु म्हणून झोडपणे सोपेच आहे. सेक्युलॅरिटी इतकी महत्वाची वाटत असेल तर असेल तर इतर कट्टर धर्मांवर लिहुन दाखवा म्हणा असा लेख

>>त्या उलट हिंदूंना विशेष करुन सेक्युलॅरिझमचे धडे का पढवले जातात

याचे उत्तर पूर्वी देऊन झालेले आहे.
कोणताही सेक्युलरवादी माणूस हिंदू धर्म वाईट आहे आणि अमका दुसरा धर्म चांगला आहे असे म्हटल्याचे मी तरी ऐकलेले नाही. तसे कोणी म्हणत असेल त्याला सेक्युलर समजण्याचे / म्हणण्याचे काही कारण नाही.

असे असले तरी हिंदू सेक्युलरवादी माणूस हा प्रामुख्याने हिंदू लोकांमधील अनिष्ट रूढींवर टीका हल्ला करतो. यातल्या काही रूढी धर्मात कोडिफाय झालेल्या आहेत ही आनुषंगिक बाब आहे. या रूढी हिंदू धर्मात नसत्या तरी त्यावर टीका केलीच असती. उदाहरणार्थ पाठीतून हूक घालून टांगून घेणे वगैरे रूढी कोडिफाईड नाहीत तरी त्या टीकेस पात्र आहेत. (आम्ही ३१ डिसेंबरला दारू पिणे व न्यू इअर साजरे करणे ही पण रूढीच समजतो आणि त्यावरही टीकाच करतो. म्हणजे दारू पिण्यावर टीका नव्हे तर ३१ डिसेंबर आहे म्हणून दारू पिण्यावर टीका करतो).

दुसरे म्हणजे मी ज्या समाजात राहतो त्यातल्याच रूढी मला माहिती असतात. आणि नेहमी त्या जवळून पाहिल्यामुळे त्यातले बारकावे समजलेले असतात आणि त्यातला अन्यायमूलक भाग किंवा अनिष्ट भाग कळतो. तसे दुसर्‍या समाजातले बारकावे माहिती नसतात. म्हणून मी मुख्यत्वे माझ्या समाजातल्या अनिष्ट प्रथांबद्दलच बोलणार. असगर अली इंजिनिअर हे बोहरा समाजातल्या रूढींविषयीच बोलणार आणि तसलिमा नसरीन या बांगला देशातल्या मुसलमानांनी केलेल्या अन्यायाविषयीच 'लज्जा' कादंबरीत बोलणार.

तिसरे म्हणजे प्रत्येकच रूढी वाईट आहे म्हणून ती बंद करा असे सेक्युलरवादी लोक म्हणत नाहीत. होळीच्या दिवशी होळी पेटवण्यास किंवा धुळवडीला रासायनिक रंग खेळण्यास विरोध होतो तसा पुरणपोळी खाण्यास होत नाही.

धनंजय यांनी केव्हातरी लिहिल्याप्रमाणे 'सेक्युलरिझम म्हणजे फक्त हिंदू धर्मावर टीका' या काल्पनिक राक्षसाशी' लढले जात आहे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

सेक्युलॅरिझम

सहमत!

प्रथम आपण आपल्या घरातल्या कचर्‍याचा ढीग हलवून घर स्वच्छ ठेऊ या. नंतर इतरांच्या घरातील कचर्‍याचा विचार करू या!

म्हणजे इतर धर्म नाहीतच?

म्हणजे इतर धर्म भारतात नाहीतच?
काहीतरीच लॉजिक!

याचाच तर काही लोक फायदा घेत राहतात.

आपला
गुंडोपंत

इतर धर्म

भारतात इतर धर्म आहेतच पण त्यातल्या गोष्टी मला (किंवा माझ्यासारख्या हिंदू इतरांना) डिटेलमध्ये माहिती नसतात.
इतकेच कशाला हिंदूंमधील रूढींपैकीसुद्धा मला जास्त डिटेलमध्ये कोकणस्थ ब्राह्मणांच्या रूढी जितक्या माहिती आहेत तितक्या धनगरांच्या/आगर्‍यांच्या/कोळ्यांच्या/लेवा पाटील समाजाच्या माहिती नाहीत. म्हणून माझ्या टीकेत प्रामुख्याने कोकणस्थ ब्राह्मणांच्याच रूढी असणार, धनगरांच्या नसणार. इतर धर्मच कशाला मी हिंदूंमधल्याही ब्राह्मणांच्याच रूढीविषयी जास्त बोलतो-लिहितो. पण म्हणजे मला फक्त कोकणस्थांच्याच रूढी खटकतात आणि इतरांच्या नाही असे नाही. आगरकर किंवा सावरकर यांनीही जे काही रूढीभंजक लिखाण केले आहे ते प्रामुख्याने ब्राह्मण समाजाविषयीच आहे. काही प्रमाणात ब्राह्मण रूढींच्या नावाखाली लबाडीने इतर समाजाची लूट करतात त्याविषयी लिहिले आहे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

सुधारणा..

म्हणून माझ्या टीकेत प्रामुख्याने कोकणस्थ ब्राह्मणांच्याच रूढी असणार,

सुधारणा ही त्या त्या समाजात राहून करायची असते. अर्थात जर कोकणस्थांच्या रुढींवर टिका करायची असेल तर ती त्यांच्या संमेलनात, वार्तापत्रात वगैरे करणे इष्ट. इतरत्र (जिथे, या उदाहरणात कोकणस्थच नाहीत तर सर्वच आहेत अशा ठिकाणी) अशी टिका करणे (कुठल्याही एका समाजाची) म्हणजे उगाच डोक्यात नसलेल्या फुटी पाडण्याचा प्रकार आहे असे वाटते.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

अर्थाचा अनर्थ

*बरीच वर्षे परदेशात राहिल्यामुळे विकास यांना मराठी लेखनातला मतितार्थ पटकन लक्षात येत नाही असे दिसते.*

मी ज्या रूढींवर टीका करतो त्या प्रामुख्याने कोकणस्थांविषयी असतात या वाक्याचा अर्थ मी कोकणस्थ आणि इतर यांच्यात फूट पाडण्यासाठी लिहितो आहे असा विकास यांनी का लावला ते समजत नाही. मला त्या रूढींची जास्त माहिती असल्याने माझ्या टीकेत त्या जास्त प्रमाणात सापडणार हे साहजिक आहे एवढेच मला म्हणायचे आहे. अमुक समाजातली रूढी वाईट आणि तमूक समाजातली चांगली असे मी कुठेही सुचवलेले नाही.

सुधारणा ही त्या त्या समाजात राहून करायची असते असे विकास यांनी म्हटल्यावर हिंदूंनी हिंदूंच्याच समाजाची सुधारणा करायची इतरांच्या उचापती करायच्या नाहीत हे उघड आहे. मग सेक्युलॅरिझमचे धडे आम्ही स्युडोसेक्युलरिस्ट हिंदूंनाच का देतो असे का विचारायचे?

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

अर्थ

मी ज्या रूढींवर टीका करतो त्या प्रामुख्याने कोकणस्थांविषयी असतात या वाक्याचा अर्थ मी कोकणस्थ आणि इतर यांच्यात फूट पाडण्यासाठी लिहितो आहे असा विकास यांनी का लावला ते समजत नाही.

तुम्ही कोकणस्थ म्हणालात म्हणून मी कोकणस्थ म्हणले - एक उदाहरण म्हणून. तुम्हाला व्यक्तीगत नाही, तसा उद्देशही नव्हता. तुम्ही मराठा, कायस्थ, अथवा इतर जातींचे नाव, इतकेच काय धर्मीय म्हणजे मुसलमान म्हणला असतात्त तर तसे म्हणले असते.

सुधारणा ही त्या त्या समाजात राहून करायची असते असे विकास यांनी म्हटल्यावर हिंदूंनी हिंदूंच्याच समाजाची सुधारणा करायची इतरांच्या उचापती करायच्या नाहीत हे उघड आहे. मग सेक्युलॅरिझमचे धडे आम्ही स्युडोसेक्युलरिस्ट हिंदूंनाच का देतो असे का विचारायचे?

याचे उत्तर दोन भागात द्यावे लागत आहे....

(१) हिंदू म्हणून हिंदू धर्मीयात राहून (परत येथे "हिंदू" हे उदाहरण म्हणून घेऊ शकता) सुधारणा करणे हा एक भाग झाला. त्याचा आणि सेक्युलॅरीझमचा काहीच संबंध नाही. "मी हिंदू" आहे मला कळते की काही अनिष्ठ रूढी "माझ्या धर्मात" आल्या आहेत, त्या असता कामा नयेत असे "मला वाटते" म्हणून मी त्यासाठी मी त्या समाजातील "धर्ममार्तंड" अथवा (चांगल्या अर्थाने) "गुरू/पंडीत/महाराज" यांच्याशी चर्चा करून एकीकडे आणि/अथवा दुसरीकडे जनतेशी संपर्क करत ते बदलण्याचा प्रयत्न करेन. याची, आत्ता आठवत असलेली तीन दिशांची तीन उदाहरणे देतो:

पहीले गाडगेमहाराजांचे - धोंड्याला देव कसले म्हणता? म्हणत महाराष्ट्रातील हिंदू धर्मीयांत एक वेगळाच दृष्टीकोन दिला. उप-उदाहारण म्हणून, अत्र्यांनी जेंव्हा त्यांच्याबद्दल प्रथम ऐकले तेंव्हा ऐकीव माहीतीवरच (कुठल्या संदर्भाने ते माहीत नाही, पण) टिका करणारे लेखन केले. मात्र ते जेंव्हा समोरासमोर भेटले आणि त्यांना ही काय चीज आहे हे कळले तेंव्हा "आम्ही चुकलो" असे मनमोकळे जाहीर लिहून सातत्याने त्यांना पाठींबा देत राहीले. वास्तवीक गाडगे महाराजांनी हिंदू धर्मावर कोरडेच ओढले पण त्यांना कोणी सुडो अथवा भोंदू बाबा म्हणले नाही. किंबहूना त्यांना आजही संत म्हणले जाते.

दुसरे उदाहरण हे मर्यादीत अर्थानेअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे. उद्देश नक्कीच चांगला. अनेक अनिष्ठ प्रथा बंद करण्यासाठी जनजागृतीचे काम केले. तरी देखील मर्यादीत अर्थाने अशासाठी कारण त्यात सरकारला जेंव्हा गुंतवण्याचा प्रयत्न होतो तेथे चुकते. तुर्तास इतकेच.

तिसरे उदाहरण हे संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवळकर गुरूजींचे. १९६४ साली (विहींप स्थापनेच्या आधी) त्यांनी हिंदू धर्मातील अनिष्ठ रुढी आणि विविध पांथिक श्रद्धांच्या आधारावर फूट पडू नये म्हणू स्वामी चिन्मयानंद, चारी शंकराचार्य, जैन मुनी, बौद्ध आदी अनेकांना एकाच व्यासपिठावर आणले. अनेक चर्चांनंतर सर्वांनी ठराव करून आम्ही जातीभेद पाळणार नाही असे प्रथमच कागदावर मान्य केले.

वरील तिन्ही उदाहरणात कोणीच पूर्ण यशस्वी झालेले दिसणार नाही, प्रत्येकचे ध्येय/उद्दीष्टे वेगवेगळी असतील पण एक समान धागा हा हिंदू धर्मात चांगले बदल घडवून आणणे हा आहे. आणि गाडगे महाराज, गोळवळकर गुरूजी आणि काही अंशी अनिस यांनी स्वतः हिंदूधर्मीयात राहून आणि बरोबर काम केले.

-----

(२) सुधारणांचा दुसरा भाग जो आहे तो सेक्युलॅरीझमशी निगडीत आहे. सेक्युलॅरीझम हा शब्द एका धर्माशी संबंधीत नसून राष्ट्राशी आणि त्यातील जनतेशी समानतेने संबंधीत असावा. त्यात जनतेने धर्म कसे पाळावे हे पहाण्यापेक्षा सरकारी निर्णयांमधे आणि पर्यायाने राजकीय क्षेत्रात धर्माचे स्थान नसावे ह्या संदर्भात ते कार्य असावे. कुरंदकरांच्या म्हणण्यानुसार, सेक्युलॅरीझम म्हणजे सर्वधर्मांना स्वातंत्र्य नसून सर्वांना धर्माबाबतचे स्वातंत्र्य आहे. मात्र जो पर्यंत धर्माचे चष्मे हे सरकार ठेवते, तो पर्यंत आपण सेक्युलर राष्ट्र ठरतच नाही. हा मुद्दा राजकारणात केवळ १९९३ नंतर (रामजन्मभूमी) आलेला नाही, की त्या आधी १९८५ सालानंतरचा (शहाबानो) नाही, तर तो अधुनिक राष्ट्रनिर्मितीपासूनचा आहे. थोडक्यात आपण परीणामांवर बोलत आहोत पण मूळावर घाव घालायला तयार नाही कारण त्यात मतपेट्यांचे राजकारण आहे...

मात्र याबद्दल आधीच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे सेक्युलर चळवळी बोलत नाहीत. ज्या शब्दाचा मूळ संदर्भ हा धर्म- राज्य आणि सरकार संबंधाशी आहे त्याबद्दल न बोलता, त्यात सुधारणांची मागणी न करता केवळ त्याचा उपयोग जेंव्हा एखाद्या धर्मातील इतिहासजमा झालेल्या घटना आणि दुर्घटनांशी लावत समाजावर कोरडे ओढण्यासाठी केला जातो तेंव्हा त्यात नुसता सेक्युलॅरिझम हा शब्द राहत नाही तर त्या आधी "सुडो" हे पण लावावेच लागते.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

हल्ला आणि व्याख्या

असे असले तरी हिंदू सेक्युलरवादी माणूस हा प्रामुख्याने हिंदू लोकांमधील अनिष्ट रूढींवर टीका हल्ला करतो.

मूळ लेखातील खालील वाक्य हे नक्की कोणत्या अनिष्ट रुढींवर टिका हल्ला करत आहेत?

वास्तविक Religion याच्या पंथ, संप्रदाय अशा भाषांतराला आक्षेप घेण्याच कारण नाही. पण वरवर वाटतं तेवढं हे म्हणणं निरुपद्रवी नाही. कारण हिंदू धर्माभिमान्यांना त्यातून अनुसिध्दांत असा मांडायचा असतो की इस्लाम,ख्रिश्चन आदि Religions हे केवळ पंथ, संप्रदाय उपासनापध्दती आहेत (mere religions) .

माझे वरील हे वाक्यः "त्या उलट हिंदूंना विशेष करुन सेक्युलॅरिझमचे धडे का पढवले जातात" त्याला उद्देशून आहे.

रुढींवर टिका करायची आहे ना? अवश्य करा. मी (सेक्यूलर आहे का नाही ते माहीत नाही) पण करतोच. होळी झाले अथवा अगदी मोठे अथवा पेंट केलेले गणपती झाले मला देखील मान्य नसतात. सुरवात जातीभेद पाळण्यावरून करा. पण दिसते काय तर जातीभेदांपेक्षा जातीवरून नावे ठेवली जातात. तसे करणारे सेक्यूलर असतील नसतील पण तसे करणार्‍यांना कधी सेक्युलर्स विरोध पण करत नाहीत. हे एक उदाहरण आहे...

बाकी सेक्यूलॅरीझमची व्याख्या काय (अगदी कायदेशीर नाही पण तुम्हाला वाटणारी) आणि ती भारतात न करण्याचा जो भोंदूपणा स्वत:ला सेक्यूलर म्हणवून घेतात त्याबद्दल काय म्हणणे आहे हे देखील समजून घेयला आवडेल. (शेवटचा भाग मी तुम्हाला/ लेखकाला उद्देशून म्हणत नाही आहे, पण जे सेक्युलॅरीझमचे नेतृत्व करतात/नेते मानले जातात त्यांच्या संदर्भात म्हणत आहे). एकदा व्याख्या ठरवली की पुढे बाकीचे चर्चीणे सोपे जाईल...

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

 
^ वर