जिना भिनले


प्रास्ताविक


आंतरजालावरील उपक्रम या संकेतस्थळाविषयी मी जेव्हा जालाबाहेरील लोकांशी चर्चा करत असतो त्यावेळी त्यांना मराठी संकेतस्थळाविषयी उत्सुकता तर असतेच पण येथील चर्चांविषयी एक आकर्षणही असत. असेच आमचे एक ज्येष्ठ मित्र श्री अरविंद बाळ यांचे लेखन हे जालाबाहेरील वर्तुळात असते. गप्पांमधुन ते भरभरुन बोलतात पण लिखाणाबाबत जरा उदासीनच. अरविंद बाळ हे B.E. (Civil) व्यवसायाने सिव्हिल इंजीनिअर . या क्षेत्रातील कंपन्यातून नोकरी व नोकरीनिमित्त भारतभर प्रवास. तीन वर्षे इराकमधे वास्तव्य. निवृत्ती सन 2000 घेतल्यावर पुण्यात कर्वेनगरला स्थायिक. ज्ञानप्रबोधिनीशी राष्ट्रवाद विचार मंडळापुरताच संबंध.मुस्लिम सत्यशोधक मंडळाशी कायम संपर्क व त्याचे एक हितचिंतक. Pakistan India Peoples Forum for Peace & Democracy च्या पुणे शाखेचे सभासद.त्यांचे काही लेख अंतर्नाद, परममित्र इत्यादीतून प्रसिध्द. झाले आहेत. अनेक विचारसरणींच्या बैठकांना ते नेहमी जातात. जसवंतसिंहांच्या निमित्ताने जिना हा विषय सध्या चर्चेत असतो. त्यांच्या कडे परवा अशीच एक चक्कर मारली तेव्हा त्यांचा परममित्र या मासिका साठी लिहिलेला लेख व इतर अनेक लेख उकरुन काढले. उपक्रमासाठी त्यांचे लेख चर्चेला घेत आहे.

(परममित्र - मे, जून 2006)

जिना भिनले
ले. अरविंद बाळ


‘कायदे आझम’ हे जिनांच चरित्र येणार येणार म्हणून गाजलेलं पुस्तक प्रसिध्द झालं. पुस्तक प्रसिध्दीच्या थोडयाच अगोदर ‘Pakistan India Peoples forum for Peace & Democracy’ या संस्थेच्या वतीने एक चर्चासत्र दि. 25 ऑगस्ट 2005 झालं. त्यामध्ये आनंद हर्डीकर यांनी भारताची फाळणी आणि जिना यावर त्यांचे विचार मांडले होते. शिवाय नंतर राष्ट्रवाद विचार मंडळांत पण याच विषयावर 28 सप्टेंबरला ज्ञानप्रबोधिनीत त्यांचं भाषण आयोजित केलेलं होतं. त्यामुळे पुस्तकात काय पध्दतीची वैचारिक मांडणी असणार याची पूर्वकल्पना होती.

तरी पुस्तक वाचून झाल्यावर इतर अनेक चर्चाविषयांसंबंधी सहमत असूनही जिनांविषयी म्हणजे त्यांच्या ‘Secularism’(धर्मनिरपेक्ष इहवाद) विषयी आणि ‘Nationalism’ राष्ट्रवादाविषयी इतका अशास्त्रीय विचार का, ते मात्र कळलं नाही.

फाळणीची सर्वच प्रक्रिया क्लेशकारकच होती आणि त्यावेळी झालेल्या हिंसाचारामुळे भावना उद्दीपित होऊन त्यावेळच्या राजकारणांतील व्यक्तींविषयी समतोल मूल्यमापन करणं अनेकांना अवघड जातं हे खरं आहे. आनंद हर्डीकर यांनी अनेक पुस्तकं, मासिकं आणि तत्कालीन नियतकालिंक वाचून फार मोठा व्यासंगिक अभ्यास केला आणि मोठया प्रमाणात आपला तोल जाऊ न देण्यात ते यशस्वी झाले आहेत. फाळणीची घटना हा एक दु:खद आणि टळू शकणारा अपघात होता असा एकदा समज झाल्यावर या दुर्घटनेला जबाबदार कोण याची शोधाशोध अनेकांनी केली आहे. डॉ. राममनोहर लोहिया यांनीसुध्दा त्यांच्या पुस्तकाला ‘Guilty men of partition’ असंच नाव दिलं आहे. एकदा गुन्हा घडला की, गुन्हेगार शोधणं हे आलंच. पण 1906 ते 1947 या 40-41 वर्षातच फाळणीची बीजं शोधणं हे इतिहासाचं पूर्ण आकलन न झाल्याचं लक्षण आहे. फाळणीची प्रक्रिया यापूर्वी अनेक शतके चालूच होती. यामुळे 15 ऑगस्ट 1947 ला फाळणी टळली असती तरी पुढील काही वर्षात ती झाली असती. त्यामुळे फाळणीचे गुन्हेगार म्हणून हिंदूत्तववादी म्हणजे विशेषत: सावरकर (ज्यांना श्री. हर्डीकर नुसते बॅरिस्टर म्हणतात) कॉग्रेंस म्हणजे मुख्यत: गांधीजी आणि नेहरु, पटेल, राजगोपालाचारी, मौलाना आझाद असे प्रमुख नेते आणि मुस्लीम लीग म्हणजे मुख्यत: जिना यांना आरोपीच्या पिंज-यात उभे करतात आणि मग जिना सर्व पुराव्यानिशी निर्दोष सुटतात आणि खरी जबाबदारी असमंजस (स्वातंत्र्यवीर ?) सावरकर आणि दुराग्रही (महात्मा ?) गांधीजी आणि गतानुगतिक नेहरु, पटेल हेच मुख्यत: या दुर्घटनेला जबाबदार ठरतात.

असं होण्याचं मुख्य कारण जिना हे प्रथमपासूनच इहवादी (Secular या शब्दाची आनंद हर्डीकर यांनी केलेलं हे भाषांतर अपुरं आहे. Secularism ची संकल्पना स्पष्ट होण्यासाठी धर्मनिरपेक्ष हे विशेषण इहवाद याच्यामागे लावणं आवश्यक आहे. ) आणि राष्ट्रीय होते हा आनंद हर्डीकर यांचा गैरसमज, हे आहे.

जिना Secular होते म्हणजे नेमके कसे होते ? वैयक्तिक जीवनात धर्माज्ञा उल्लंघून किंवा त्यांची पर्वा न करता मद्यसेवन व अभक्ष्य भक्षण (म्हणजे Ham Pork) करणं म्हणजे इहवादी असणं नाही. जिनाच काय असे अनेक पाश्चिमात्य जीवनशैली अंगीकारलेले बरेच रईस मुसलमान तसे वागत. म्हणजे ते Secular ठरत नाहीत. तसेच हिंदू आणि मुसलमान या दोन समाजांना दोन Communities म्हणणं, दोन जमाती म्हणणं यामुळेही एख़ादी व्यक्ती राष्ट्रवादी ठरत नाही. पण या अत्यंत मूलभूत संकल्पनांविषयी गैरसमज असल्यामुळेच आनंद हर्डीकर जिनांना तसं प्रमाणपत्र देऊन टाकतात. एवढंच नव्हे तर हिंदुत्ववाद्यांच्या असमंजसपणामुळे व गांधीजींच्या आडमुठया आत्मकेंद्री स्वभावामुळे बिचा-या जिनांना आपला Secularism आणि हिंदू समाजाबरोबरचा एकात्म राष्ट्रवाद सोडणं भाग पडंल अशी आनंद हर्डीकर यांची मांडणी आहे.

प्रथम जिनांच्या Secularism विषयी पाहू. लोकांचा रोष सहन करुनही सावकारांनी हिंदूंच्या अडाणी, धार्मिक समजुतीवर घणाघाती हल्ले केले. आपापले धर्मग्रंथ आता बासनांत गुंडाळून ठेवून अद्दयावत वैज्ञानिक शास्त्रांप्रमाणे वागा, असा सल्ला दिला. (केवळ हिंदूनाच नाही, तर मुसलमानांना पण) अस्पृश्यता घालविण्यासाठी गांधीजींनी प्रयत्नांची शर्थ केली. स्त्रियांना घरातून बाहेर काढून राजकारणाच्या मध्यभागी उभं केलं. जिनांनी मुसलमानांना असले उपदेश कधी केले आहेत ? हमीद दलवाई इतका तर सोडाच पण मुसलमानांच्या धर्मसुधारणेकरता साधे मामुली प्रयत्नही त्यांनी कधी केले नाहीत. वैयक्तिक जीवनातील त्यांची चैनबाजी ही ते Secular असल्याचे लक्षणे नसून उपभोगवादाची लक्षणे आहेत.

विवाहाच्या वेळी त्यांनी आपल्या प्रेयसीचं प्रथम धर्मांतर करुन, तिला मुसलमान करुन घेऊन नंतर तिच्याशी काझीमार्फत निकाह लावला. माझी प्रेयसी पारशी राहील असा आग्रह त्यांनी धरला असता तर त्यांना मुसलमानांच नेतृत्व कधी करता आलं नसतं याची त्यांना कल्पना होती. स्वत:च्या नेतृत्वासाठी लियाकत अली सारख्या धर्मांध मुसलमान नेत्याशी आणि मुल्ला-मौलवीशी हातमिळवणी करायला ते नेहमीच तयार असत.

आनंद हर्डीकर यांनी डॉ. आंबेडकरांच्या Thoughts on Pakistan या पुस्तकाचा अनेक वेळा उल्लेख केला आहे. त्या अर्थी त्यांनी या पुस्तकाचा बारकाईने अभ्यास केला असणार हे उघड आहे. तरीही राष्ट्र (Nation) राष्ट्रीयत्व (Nationality) राष्ट्रवाद (Nationalism) या संकल्पनांची नेमकी उकल त्यांना झाली नसावी असं वाटतं. राष्ट्र हे काही समाजाच्या सहअस्तित्वातून बनत नाही. हिंदू आणि मुसलमान हे दोन भिन्न समाज Longing to belong together अशा एकराष्ट्रीयत्वाच्या बंधनात कधीच बांधले गेले नव्हते हेच डॉ. आंबेडकरांनी अगदी सप्रमाण सिध्द केलेलं आहे. इस्लामचा धर्म म्हणून अभ्यास आणि त्यातून निर्माण होणारी मुसलमानांची मानसिकता याचा सर्वांगीण परामर्श डॉ. आंबेडकरांनी या पुस्तकात घेतला आहे, तरीही जिना राष्ट्रीय विचारसरणीचे होते असं म्हणत राहणं हे एकूण या संकल्पनेविषयींच घोर अज्ञान उघड करणं आहे.

आनंद हर्डीकर जिनांच्या जीवनाचे तीन भाग पाडतात. 1906 ते 1920 कट्टर राष्ट्रीय, 1920 ते 1938 फुटीरतेकडे प्रवास आणि 1938 ते पाकिस्तानच्या निर्मितीपर्यंतचा सुडाने पेटून पाकिस्तान निर्मितीसाठी केलेला बेबंद प्रवास.

पहिल्या कालखंडात जिना राष्ट्रीय होते म्हणजे त्यांनी राष्ट्रीयतेसाठी नेमकं काय केलं तर 1916 च्या लखनौ करारात मुसलमानांसाठी प्रमाणापेक्षा जास्त जागा मिळवल्या.राजकीय सौदेबाजी म्हणजे राष्ट्रीयत्व नव्हे एकात्मराष्ट्रीयता तर नव्हेच नव्हे. आणि टिळकांसाठी बिनाफींच वकीलपत्र घेणं, न्यायमूर्ती दावरांच्या प्रतिपादनाचे वाभाडे काढणं ही बॅरिस्टरी बुध्दीची धार होती. यातून राष्ट्रीयता सिध्द होत नाही.

गांधीजींच्या अहंकारी आणि कोणालाच जबाबदार नसणा-या नेतृत्वामुळे अनेक नेते दुखावले गेले. पण त्यांची उदाहरणं स्वत्व: आनंद हर्डीकर यांनीच दिली आहेत. त्यामुळे त्यातील कोण अराष्ट्रीय झाले. अनेक अपमान सहन करुनही डॉ. आंबेडकर अराष्ट्रीय का झाले नाहीत ? सुभाषचंद्र बोसांना अवमान होऊनही त्यांनी कॉग्रेंस सोडली पण राष्ट्रवाद सोडला नाही. मग जिनांना स्वत:च्या Kingsize ego स्वाभिमान दुखावला गेला म्हणून Direct Action थेटकरणीचं आवाहन करुन हिंसेचा आगडोंब उठवावासा का वाटला? याचं साधं स्पष्टीकरण असं आहे की हिंदूसमवेत एकराष्ट्रीयत्वात प्रेमानं राहावं अशी त्यांची मानसिकताच कधी नव्हती. जर हिंदू-मुसलमान यांच्यात एकात्मता नसेल तर ती निर्माण करण्याकरिता आपण झटांव, मुसलमानांना आधुनिक विचारसरणीला प्रवृत्त करावं असे त्यांनी कधी प्रयत्नच केलेले नाही. सदैव टर्रेबाजीने राहणारा हा बॅरिस्टर नेहमीच आत्ममग्न आणि आत्मकेंद्री होता आमि आत्माभिमानाला आव्हान मिळाल्यावर जर पराभव पत्करावा लागणार असेल तर देश सोडून इंग्लंडमध्ये Privy Council मधे गलेलठ्ठ प्रॅक्टीस करीत कोणीही राष्ट्रभक्त व्यक्ती 1930 ते 1935 अशी अटीतटीची साडेतीन ते चार वर्षे राहू शकली नसती आणि भारतात परत अले तेसुध्दा आपलं निरंकुश नेतृत्व मान्य होण्याची खात्री झाल्यावरच आणि तरीही हर्डीकर म्हणतात की, हिंदू-मुसलमान हा द्विराष्ट्रवाद प्रथम लाला लजपतराय यांनी मांडला, नंतर 1937 साली सावरकरांनी आणि सर्वात शेवटी जिनांनी. आणि असं असूनही सावरकर, श्यामाप्रसाद मुखर्जीसह सर्व हिंदुत्वनिष्ठांनी, हिंदी राष्ट्रवादाचे, प्रादेशिक राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते गांधीजी आणि सर्वच कॉँग्रेस पुढारी यांनी स्वतंत्ररित्या अनेक चुका केल्या, मुस्लीम लीगला आणि एकूणच मुसलमानांना हाताळताना तर घोडचुका किंवा हिमालयाएवढया चुका केल्या हे खरंच आहे. तो सगळा इतिहास आनंद हर्डीकर यांनी अतिशय समर्थपणे मांडला आहे. संघपरिवारातील हिंदुत्त्ववादी, हिंदू महासभा, आर्य समाज यातील हिंदुत्ववादी, कॉँग्रेसमधील प्रादेशिक राष्ट्रवादी या सर्वांनाच मुसलमानांच्या फुटीरतेचा मूळ स्त्रोत जो इस्लाम, त्याविषयी पूर्ण अज्ञान होतं आणि या अज्ञानांतून मूळ समस्याच न कळल्यामुळे सगळीच चुकीची उत्तरं देणं हे स्वाभाविक होतं. त्यामुळे पुढे जे घडणं अटळ होतं ते घडलं आणि भारताची अशी फाळणी झाली.

जिनांचं चरित्र लिहावं याकरिता तात्कालिक घडलेलं कारण अडवाणी यांचे पाकिस्तानातील जून 2005 मधील जिनासंबंधींचं भाषण आणि भारतात संघपरिवारच नव्हे, तर सगळयाच इतर पक्षांतून उठलेल्या तीव्र प्रतिक्रिया.

वास्तविक 11 ऑगस्ट 1947 चं जिनांचं पाकिस्तान घटना समितीपुढील भाषण हे संपूर्णत: Secular आहे यात शंकाच नाही. त्याचा उल्लेख करुन अडवाणी यांनी केलेली जिनास्तुती हा राजनीतीतील एक भीमटोला होता. (पण त्याचं आकलन किमान संघपरिवाराला होणं अशक्य होतं आणि त्यांनी अडवाणीविरुध्द झोडच उठवली गेली.) त्यामुळे जिनांचा पुनरभ्यास करुन त्यांचं चरित्र लिहायला आनंद हर्डीकर उद्युक्त झाले हे समर्पकच होतं.

पण त्या 11 ऑगस्टच्या भाषणामुळे पाकिस्तानातील कोणी फसले नाही. पण आनंद हर्डीकर मात्र फसले. म्हणून त्यानंतर जिनांना लगेच केलेली अनेक भाषणे आणि प्रत्यक्ष कृती त्यांच्या लक्षात आल्या नाहीत. गांधीजींच्या खुनानंतरच्या जिनांची प्रतिक्रिया त्याना विचारात घ्याव्याश्या वाटल्या नाहीत. त्यांच्या मनात जिना जे भिनले ते Secular आणि राष्ट्रवादी असे कायदे आझम म्हणूनच. म्हणून याला कोणी जिना स्तोत्र म्हणोत किंवा जिनांची आरती पण एक जिनांची ती आतली गाठ सोडली, तर त्या ऐतिहासिक महत्वाच्या काळातील सर्व व्यक्तींचं आणि घटनांचं मर्मदर्शी मूल्यमापन अतिशय व्यासंगपूर्णपणे चित्रण आनंद हर्डीकर यांच्या या पुस्तकात आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

आभार !

'कायदे आझम' हे माझंही आवडतं पुस्तक आहे. त्यातील जिना मला भावतात, भिनतात.
असो,अरविंद बाळांनी फार थोडक्यात विवेचन केले आहे असे वाटते. अरविंद बाळांचे मुद्दे कायदे आझमच्याच पुस्तकातील काही संदर्भानेच खोडता येतील असे मला वाटते.

कायदे आझमची मिपावर आम्ही आठवण केलीच होती.

असो, घाटपांडे साहेब अरविंद बाळांचा लेख इथे दिल्याबद्दल आभार...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चर्चा

पुन्हा एकदा कायदेआझम असा बाळांचा एक लेख नंतर टाकत आहे.
प्रकाश घाटपांडे

नक्की टाका !

>>पुन्हा एकदा कायदेआझम असा बाळांचा एक लेख नंतर टाकत आहे.

नक्की टाका. तो पर्यंत कायदे आझमच्या पुस्तकातील काही पानांचे कोपरे दुमडून ठेवतो.
(वेळ मिळाल्यावर त्यातील काही संदर्भ इथे खरडीन)

-दिलीप बिरुटे
(बीझी)

संघपरिवार एवढा मठ्ठ आहे काय?

वास्तविक 11 ऑगस्ट 1947 चं जिनांचं पाकिस्तान घटना समितीपुढील भाषण हे संपूर्णत: Secular आहे यात शंकाच नाही. त्याचा उल्लेख करुन अडवाणी यांनी केलेली जिनास्तुती हा राजनीतीतील एक भीमटोला होता. (पण त्याचं आकलन किमान संघपरिवाराला होणं अशक्य होतं आणि त्यांनी अडवाणीविरुध्द झोडच उठवली गेली.)

इथे बाळांनी संघपरिवाराच्या आकलनक्षमतेबद्दल शंका उपस्थित केली आहे. संघपरिवार काय खरंच एवढा मठ्ठ आहे? की सारे आपली सोय बघत आहेत. असो.

सगळी तथ्ये लोकांसमोर आहेत. ह्या अशा पुस्तकांचे प्रयोजन काय ते कळले नाही. पांडित्याचे प्रदर्शन की स्पिनडॉक्टरगिरी की अर्थार्जन? असो. काहीही असो, गांधी-जिना-नेहरू-पटेल गेले, पण अनेकांच्या चरितार्थाची सोय करून गेले. अन्नदाता सुखी भव!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अर्थार्जन

पांडित्याचे प्रदर्शन की स्पिनडॉक्टरगिरी की अर्थार्जन?
पुस्तक औट ऑफ प्रिंट असल्याचे वाचले. सहा आवृत्या खपल्या! ऑनलाइन बुकिंगही फुल्ल आहे.

----
"ज्यूलिया रॉबर्टस की मां स्पिलबर्ग को ऐसे बोल सकती है क्या?"

पटले नाही

ह्या अशा पुस्तकांचे प्रयोजन काय ते कळले नाही. पांडित्याचे प्रदर्शन की स्पिनडॉक्टरगिरी की अर्थार्जन?

स्पिनडॉक्टरगिरीबद्दलचा आपला आक्षेप समजू शकतो, परंतु पांडित्याचे प्रदर्शन आणि अर्थार्जन या दोन हेतूंमध्ये नेमके काय आक्षेपार्ह आहे ते कळले नाही.

धन्यवाद

पांडित्याचे प्रदर्शन आणि अर्थार्जन या दोन हेतूंमध्ये नेमके काय आक्षेपार्ह आहे ते कळले नाही.

धन्यवाद. तुम्हाला वरील दोन हेतू आक्षेपार्ह वाटत नाही हे कळले. सदस्यांना ह्या हेतूंबद्दल काय वाटते, हेच मला जाणून घ्यायचे आहे. वरील दोन हेतू आक्षेपार्ह आहेत, असे मी अद्याप जाहीररीत्या म्हटलेले नाही. खऱ्या पांडित्याला प्रदर्शनाची गरज नसते, आणि लक्ष्मीपेक्षा सरस्वती श्रेष्ठ अशी टाळ्याघेऊ छापील वाक्येही मी अजून फेकलेली नाहीत.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

इतिहासाचे पुनर्मापन

अश्याप्रकारच्या लेखनाने बाकी काही नाही तरी भरपूर चर्चा होतात, इतिहासाचे पुनर्मापन, पुनर्लोकन होते. हेही नसे थोडके. ( त्यातून कोण किती शिकतं तो भाग वेगळा.)

मात्र या राजकारणी लोकांचा असे लेखन करण्याचा उद्देश साधा व सरळ नक्की नाही. ( काय असेल बरं ?)
सत्ता, पैसा व प्रसिध्दी (आणखी काय!)

................
(वरच्या चोंड्याच्या फाळणीविरूध्द सुध्दा भांडणारा)
कोकणी शेतकरी

 
^ वर