सेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार - भाग ३

Secularism एक सर्वंकष विचार

(परम-मित्र दिवाळीअंक 2006)

ले. अरविंद बाळ

सेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार - भाग १
सेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार -भाग २

Secularism शी गल्लत होणा-या दुस-या संकल्पना

Secularism शी गल्लत होऊं शकणा-या दुस-या कांहीं संकल्पना पण इथे स्पष्ट करणं आवश्यक आहे.

Liberalism उदारमतवाद म्हणजे जणू काही Secularism अशी एक विचित्र कल्पना अनेकांच्या मनांत असते. कारण धर्मनिष्ठपणे ऐहिक जीवन जगणारे अनेक लोक उदारमतवादी असूं शकतात. म्हणजे ते “मी पण Secular रहात नाही आणि तूं पण राहूं नकोस” असे उदारमतवादी असूं शकतात.

धर्मसहिष्णुता,विशेषत: परधर्मसहिष्णुता म्हणजे Secularism नव्हे. परस्परांनी एकमेकांच्या धर्मांना ऐहिकात घोळ घालायला परवानगी देणं म्हणजे परधर्मसहिष्णुता. याला Secularism कसं म्हणता येईल ? आपापसांतील धार्मिक सद्भाव हा स्वतंत्ररित्या सद्गुण असूं शकेल पण तो Secularism नव्हे. हिंदूंना कोणी Secularism शिकवण्याची गरज नाही असं एक खरं म्हणजे उध्दट मत मांडलं जातं. कारण फक्त हिंदूच Secular असू शकतात आणि पूर्वापार होतेच असंहि अभिनिवेशाने सांगितल जातं. वास्तविक हिंदूनी नेहमीच परधर्मीय आक्रमणे सहन केली एवढच वास्तव आहे. हा Secularism नव्हे.

सर्वच धर्मांची मूलतत्वे सारखीच आहेत. सर्व धर्म शांतीचाच पुरस्कार करतात. कोणताच धर्म दहशतवाद शिकवत नाही. अलीकडच्या जागतिक दहशतवादाच्या वातावरणांत असं म्हणण्याची एक रुढ प्रथा आहे, फॅशनच आहे. त्यामुळे आपण उदारमतवादी आणि Secular ठरतो असा एक गैरसमज होतो. वास्तविक हे एक तद्दन बाष्कळ विधान आहे. सर्व धर्म खरंच एकच तत्व सांगणारे, शांतता प्रेमी असते तर जगाचा इतिहास बदलला असता. सर्वच धर्मांची “मूलतत्वे” (?) सारखी असती तर मी हिंदू,मुसलमान, ख्रिश्चन वगैरे आहे या म्हणण्याला काही अर्थच उरत नाही. मग मी सकाळी हिंदू, दुपारी मुसलमान आणि रात्री ख्रिश्चन असू शकतो. शंभर वर्षापूर्वी गोपाळराव जोशी नामें एका अवलियाने “धर्म” या कल्पनेचं वैय्यर्थ्य दाखवण्याकरिता, खरं म्हणजे टिंगल करण्याकरिता हा प्रयोग करुन दाखवला होता.

तात्पर्य असं की सर्व धर्माचं कोडकौतुक करणे ही धर्मसहिष्णुता नव्हे, सर्वधर्मसमभाव नव्हे आणि Secularism तर नव्हेच नव्हे.

अलीकडे Multiculturalism बहुसंस्कृतिवादांच फार कौतुक चालू असतं. दोन भिन्न संस्कृतींच सहअस्तित्वच नव्हे तर परस्परांकडून चांगल्या गोष्टी आपल्याशा करण ही एक चांगली वृत्ती आहे. पण संस्कृति म्हणजे धर्म नव्हे हे लक्षांत ठेवणं आवश्यक आहे. तसच सपशेल असंस्कृतपणा सुध्दा एक वेगळी संस्कृति म्हणून आदरणीय ठरता कामा नये. Multiculturalism म्हणजे Secularism नव्हे.

आणखी एक अशास्त्रीय टूम काढली जाते. Secularism चा अर्थ भारतीय संदर्भात वेगळा करायला हवा असं मांडलं जातं. कारण भारतीय संस्कृतीचा इतिहास आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा इतिहास वेगळा आहे. तिकडे चर्चने राजसत्तेत नुसती ढवळाढवळच केली नाही तर चक्क राजसत्ताच हातात घेतली. म्हणून राजसत्ता आणि धर्मसत्ता वेगळया करण्यासाठी Secularism आणावा लागला. भारतांत धर्माने राजसत्तेची हाव कधीच धरली नव्हती म्हणून Secularism या संकल्पनेची तशी आवश्यकताच भारतात नाही.

या विचारसरणीतून इतिहासाचं अज्ञान तर दिसतंच पण एक प्रकारचा मानभावीपणा, स्वयंगौरव दिसून येतो. एकीकडे भारतांत धर्माने राजसत्ता ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला नाही असं म्हणायच तर पुन्हा राजदंडापेक्षा धर्मदंडच भारतात वरिष्ठ राहिला होता हेही अभिमानाने सांगायच. सगळाच घोळ. यांच मूळ कारण आम्ही भारतीय खर म्हणजे सनातन धर्मीय - इतर पाश्चिमात्य लोकांपेक्षा आणि धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहोत, हा वृथाभिमान. त्यामुळे अशा श्रेष्ठ धर्माचा इहवादांतील अधिकार अमान्य करायला अशा लोकांच मनच धजावत नाही.

सगळयांत मोठी घोटाळयाची संकल्पना अशी आहे. राजकारणात Secular पार्टीज आणि Communal पार्टीज असं विभाजन केलं जातं. याचा अर्थ Secular आणि Communal हे विरोधार्थी शब्द आहेत असा कांही तरी गैरसमज दिसतो.

Communalism ही एक वेगळीच संकल्पना आहे. आपापल्या Commune वरील निष्ठा, ही इतर सर्व निष्ठांहून श्रेष्ठ वाटणं हा Communalism. हा लोकसमूह भाषा, जात,वंश अशा कोणत्याही आधारावर बनला असला तरी त्या लोकसमूहाच्या लाभाकरिता इतर लोकसमूहांच्या न्याय्य हक्कांची पायमल्ली करणं हे Communalism म्हणजे जमातवाद या मुळे घडत.

वयम् पंचाधिक शतम् हा जातीयवादाचा मूलमंत्र आहे. हे विधान अनेकांना धक्कादायक वाटेल. पण महाभारत असं सांगतं की दुर्योधनाची बाजू अन्याय्य असूनही कौरव आपले भाऊ लागतात म्हणून बाहेरच्या पक्षाची बाजू न्याय्य असली तरी आपण आपल्या भावांच्या बाजूने लढाईत उतरलं पाहिजे असं “जातीय” तत्वज्ञान धर्मराज युधिष्ठिरांना मांडलं. हाच तो भांजा भतीजा वाद.

त्यामुळे पूर्णपणे Secular व्यक्ती ही Communal असू शकते. धर्माची ऐहिकातील लुडबुड न मानणारी व्यक्ती स्वधर्मीयांच्या ऐहिक भरभराटीकरिता परधर्मियांच्या विरोधात अन्यायच नव्हे तर हिंसक पध्दतीने उभी राहू शकते. यांच उत्तम उदाहरण कायदे आझम जीना हे आहे. जिना हे आपल्या व्यक्तिगत जीवनात Secular विचारसरणीचे असूनहि जातीयवादी तत्वज्ञानामुळे मुसलमानांच्या ऐहिक लाभाकरिता झटत राहिले. आणि त्यासाठी Direct Action म्हणजे हिंसेलाहि समर्थन देऊ लागले.

Theocracy आणि State Religion

या दोन कल्पनांमध्ये देखील गल्लत केली जाते. Theocracy म्हणजे धर्मसत्ता. ज्या राज्यांत राजकीय सत्ता थेट धर्मगुरुंच्या हातांत असते ते Theocratic State धर्मशाही. जिथे राज्याला (State) अधिकृत धर्म असतो ते राज्य Theocratic नव्हे. म्हणजे "धर्माचं राज्य" आणि "राज्याचा धर्म" या दोन वेगळया संकल्पना आहेत. एखाद्या राज्याला अधिकृत धर्म असुनहि त्या धर्माच्या धर्माज्ञा ऐहिकांत पाळल्या जात असतीलच असं नाही. औपचारिकपणे इस्लामिक देशांच्या संघटनेतील अनेक देश शरीयाप्रमाणे राज्य कारभार करतात असं नाही. म्हणजे कमी जास्त प्रमाणांत ते Secular आहेत. जगांत व्हॅटिकन एवढा एकच देश Theocratic State म्हणजे धर्मसत्ताक देश आहे.

Secularism चा नेमका अर्थ समजला की कोणते वादग्रस्त प्रश्न आणि मुद्दे हे Secular आहेत आणि कोणते नाहीत हे लक्षात येईल. सोमनाथ मंदिराचा जीर्णोध्दार किंवा बाबरी मशीद राममंदिर प्रकरण हे प्रश्न Secular की Non Secular.? भारताच्या राष्ट्रपतींनी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोध्दाराला उपस्थित रहाणं हे भारताच्या Secularism च्या विरोधांत गेलं कां ? भारतीय जनता पक्षासारख्या राजकीय पक्षाने बाबरी मशिदीचा प्रश्न (तिथल राममंदिर तोडून तिथे बाबराने मशीद बांधली हे गृहित धरुन हा मुद्दा विचारांत घेतला आहे) उपस्थित करणं हे राज्यघटनेच्या दृष्टीने Non Secular किंवा अगदी anti-secular होत कां ?

Secularism म्हणजे इहवाद- धर्मनिरपेक्ष इहवाद-धर्मांज्ञांची ऐहिकातील लुडबुड अमान्य करणं - हे मनांत स्वच्छपणे सप्ष्ट असेल तर वरील दोन्ही मुद्दे इहवादी आहेत हे लक्षांत यांव. Secularism ला अशा प्रश्नांनी बाधा येत नाही.

हा मुद्दा थोडा अधीक स्पष्ट करणं आवश्यक आहे. ज्यावेळी एखाद्या देशाचं दुस-या देशावर आक्रमण होतं तेव्हा विजयाच्या खुणा म्हणून ज्याप्रमाणे विजयस्तंभ बांधले जातात तसंच धर्र्मोन्मादाने शत्रूच्या धर्माची पवित्र स्थानं नष्टही केली जातात. परकीय आक्रमण हटवल्यावर अशा धर्मस्थळांची पुन्हा उभारणी करणं म्हणजे केवळ आक्रमणाच्या खुणा नष्ट करणं एवढंच प्रयोजन असतं. हा साधा राजकीय व्यवहार असतो, कोणत्या धर्माज्ञेचे पालन नसते. ऐहिकांतील आक्रमणांच ऐहिकांतील निराकरण असतं. म्हणून अशी कृती पूर्णत: Secular समजायला हवी. Gate Way of India समोरचा पंचम जॉर्जचा पुतळा उठवून तिथे शिवाजीमहाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारणं ही कृति जशी नैसर्गिक आणि Secular असते, अगदी त्याप्रमाणेच मंदीर पाडून उभारलेल्या मशिदीचं पुन्हा मंदीर बनवणं ही कृति पण पूर्णपणे Secular आहे.

अर्थात एक मुद्दा इथे लक्षांत ठेवणं आवश्यक आहे. अशी कृती ही लाक्षणिक असावी धार्मिक उन्मादातून प्रतिशोध म्हणून नसावी, एक निर्विकारपणे पार पाडलेलं केवळ कर्तव्य असावं. म्हणून असं मंदीर भव्य दिव्य असण्याची आवश्यकता नाही. सोमनाथ मंदिराचा जीर्णोध्दार जरी Secular असला तरी शिवलिंगाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी राष्ट्रपतींनी एखादा विद्वान तर्कतीर्थ (लक्ष्मण - शास्त्री जोशी सारखा) शोधणं हे कृत्य मात्र Secular नव्हे.

अर्थांत हेही लक्षात ठेवणं आवश्यक आहे की राममंदीर बांधण म्हणजे रामचरित्र आदर्श मानणं नव्हे. राममंदीर बांधणा-यांना पत्नीच्या चारित्र्याचा संशय येऊन तिला अग्निदिव्य करायला लावण्याचा अधिकार मिळत नाही. आधुनिक रामालाही कोणा परिटाच्या भाषणामुळे आपल्या असहाय्य पत्नीला जंगलात सोडण्याचा अधिकार मिळणार नाही. त्यालाही I.P.C & Cr.P.C. लागूच होईल.

आणि इहवाद याचा अर्थ चंगळवाद असा करुन इहवादाला विराध करणं अशी आणखी एक शक्कल लढवली जाते. वास्तविक इहवाद हा मानवीय सर्व नीतीकल्पना आणि सदाचाराचे, सभ्याचाराचे सर्व नियम पाळण्याला बांधील असतो. किंबहुना Ethics & Morality are secular subjects हा तत्वज्ञानाला मान्य झालेला सिध्दान्त आहे.

उलट धर्माज्ञा (सर्वच धर्मांच्या) माणसाना अनैतिकतेकडे झुकवतात, अशी टोकाची भूमिका घेण्यांच कारण नाही. सर्वच धर्मांतून कमी जास्त प्रमाणांत मानवते विरुध्द, विशेषत : स्त्रियांविरुध्द अनेक धर्माज्ञा दिलेल्या आहेत. हे वास्तव मात्र लक्षांत घेणे जरुर आहे. म्हणजे निदान नैतिकतेसाठी तरी इहवादाची आवश्यकता पटावी.

Secularism चा आर्थिक धोरणांशी कांही संबंध नाही हे पण स्पष्टपणे मांडणे आवश्यक आहे. आर्थिक दृष्टया उजव्या विचारसरणीचे लोक Secular असू शकत नाहीत असाहि एक गैरसमज खोडसाळपणे पसरविला जातो. डावे पुरोगामी म्हणजेच Secular असं एक चुकींच समीकरण मांडलं जातं. मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता हा Secular असू शकत नाही, हा काय खुळेपणा आहे ? Secularism अर्थनीतीनिरपेक्ष असं तत्व आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

तात्पर्य...

लेखमालेतील सर्व लेख वाचत आहे आणि जसजशी पाने पुढे जात आहेत तसतसे लेखकाला काय म्हणायचे हे समजले असे वाटते... पुढचे पान वाचे पर्यंत :-)

गेल्या दोन भागात (आणि इतरत्रही कायम) मी जो सेक्युलॅरीझमचा संबंध नक्की कशाशी लावावा यावरून बोलत आहे त्या संदर्भात या भागातील विचार मिळते-जुळते आहेत असे वाटले....

एकीकडे भारतांत धर्माने राजसत्ता ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला नाही असं म्हणायच तर पुन्हा राजदंडापेक्षा धर्मदंडच भारतात वरिष्ठ राहिला होता हेही अभिमानाने सांगायच.
ह्याचा संदर्भ किमान या भागाततरी समजला नाही. भारतात धर्मदंड श्रेष्ठ असे ऐतिहासीक उदाहरणांमधे तरी केवळ अशोकाच्या वेळेस झाले असे म्हणता येईल. बाकी इतर वेळेस राजगुरू जरी असले तरी त्यांनी धर्मापेक्षा निती (राजनिती आणि समाजनिती)ना अनुसरूनच सल्ले दिले असावेत असे वाटते. त्यामुळे जे युरोपात घडले तसे घडल्याचे आत्ता तरी समान उदाहरण आठवत नाही...

बाकी वरील भागात सेक्यूलॅरिझम म्हणजे अमुक असू शकते अथवा तमुक म्हणजे नसते यावरून बरेच चर्विचर्वण झालेले आहे. जर इतके गोंधळ वाटणारी परीस्थिती एका शब्दाचा अर्थ लावण्यातच (आचरण दूर राहूंदेत) समर्थक आणि विरोधकांमधे असली तर त्या शब्दाची गरजच काय आहे? माझे सतत म्हणणे आहे की भारतात सरकार सेक्युलॅरिझम नीट पाळत नाही पण सोयीस्कर (राजकीय) फायद्यासाठी जास्त करून निव्वळ शब्द म्हणूनच वापरला जातो. हे जर विधान मान्य केले तर लक्षात काय येते? की जे काही जनकल्याणाचे विविध निर्णय (कायदा, प्रकल्प, योजना - सगळेच काही) झाले आहे ते सेक्युलॅरीझममुळे झालेलेच नाही... मग कशाला त्या शब्दावरून आटापिटा करत वापरायचा प्रयत्न करायचा? जर वरील विधान मान्य नसेल तर नक्की आजपर्यंत केवळ सेक्युलॅरीझम मुळे काय झाले हे समजून घेयला आवडेल जे सेक्युलॅरीझमच्या अभावात भारतात घडू शकले नसते.

पुन्हा असे पहा की मी सेक्युलॅरिझमशी प्रामाणिक आहे, पण भारताशी मात्र नाही, तर त्या सेक्युलॅरीझमचा उपयोग काय? माझ्या लेखी राष्ट्रनिष्ठा ही इतर कुठल्याही वैचारीक निष्ठांपेक्षा महत्वाची आहे. अपवाद फक्त मानवी मुल्ये. म्हणजे असे की जर घटनेने/कायद्याने मानवी मुल्ये पायदळी तुडवली तर मी त्या घटनेच्या/कायद्याच्या (पर्यायाने म्हणून राष्ट्राच्या पण म्हणता येईल) विरोधात आहे. जर राजकीय व्यक्तीने तसे केले असले तर मतपेटी आहेच...

तात्पर्य, मी सेक्युलर आहे का हिंदू आहे का मुसलमान आहे का अजून कोणी हे महत्वाचे नसून, स्वतःला, कर्तव्य पाळण्याच्या दृष्टिकोनातून, "मी भारतीय आहे," असे समजतो का नाही हेच महत्वाचे राहते...

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

सेक्युलरिझम

जेव्हा एखाद्या लेखाचे भाग१, २, ३ असे भाग थोड्याथोड्या अंतराने येतात तेव्हा आधीच्या भागावरील प्रतिक्रियांचे प्रतिबिंब/ दखल पुढच्या भागात घेतली जाईल अशी अपेक्षा निर्माण होते. परंतु घाटपांडे हे उपक्रमी नसलेल्या दुसर्‍या कुणाचा तरी लेख येथे थोडा थोडा टाकत आहेत त्यामुळे वरील अपेक्षा पूर्ण होत नाही. इथे विकास व(व म्हणजे विरुद्ध नाही) इतर काही यांच्यातच चर्चा होत राहणार. त्यामुळे घाटपांडे यांनी सगळे भाग एकदमच टाकले तर बरे.

>>भारतात सरकार सेक्युलॅरिझम नीट पाळत नाही पण सोयीस्कर (राजकीय) फायद्यासाठी जास्त करून निव्वळ शब्द म्हणूनच वापरला जातो. हे जर विधान मान्य केले तर लक्षात काय येते? की जे काही जनकल्याणाचे विविध निर्णय (कायदा, प्रकल्प, योजना - सगळेच काही) झाले आहे ते सेक्युलॅरीझममुळे झालेलेच नाही...

यातला पहिला भाग आणि शेवटचा भाग याचा काय संबंध आहे हे लक्षात येत नाही. पहिला भाग मान्य आहे पण प्रकल्प- योजना वगैरे सेक्युलरिझममुळे झाले नाही म्हणजे काय? सगळ्या योजना धार्मिक निकषावर आखल्या आहे असे म्हणायचे आहे की या योजनांचा आणि सेक्युलरिझमचा संबंध नाही असे म्हणायचे आहे?

>>केवळ सेक्युलॅरीझम मुळेच काय झाले हे समजून घेयला आवडेल जे सेक्युलॅरीझमच्या अभावात भारतात घडू शकले नसते

युनिव्हर्सल ऍडल्ट फ्रॅन्चाइज आणि व्यक्तिगत कायदा सोडून* बाकीच्या कायद्यांबाबत समानता (याला अपवाद एकच...आर्थिक-आयकर संपत्तीकर या बाबीतही हिंदू अविभक्त कुटुंब नावाची खास सवलत देणे) या गोष्टी धर्म असलेल्या राज्यात होऊ शकल्या नसत्या.

*सेक्युलरिझमच्या चर्चेत व्यक्तिगत कायदा ही गोष्ट आवजून येतेच. त्यातही एक गैरसमज आढळतो. तो म्हणजे देशाचा असा काहीतरी व्यक्तिगत कायदा आहे आणि तो हिंदू समाजाला लागू आहे आणि इतर समाजाला मात्र वेगळा कायदा पाळण्याची मुभा आहे. खरी परिस्थिती अशी आहे की देशाचा (सर्वांना लागू असलेला) कायदा असा आहे की प्रत्येकाला त्याच्या धर्माप्रमाणे(या शब्दाबद्दल शंका आहे) व्यक्तिगत कायदा पाळण्याची मुभा आहे. त्यानुसार हिंदूंना हिंदूंचा (हिंदू रूढीपरंपरांवर आधारित)आणि इतरांना त्यांच त्यांचा व्यक्तिगत कायदा लागू आहे. स्वातंत्र्यानंतर हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसा कायदा वगैरे कायदे केले गेले. हे कायदे 'सरकार' नावाच्या बाह्य शक्तीने हिंदू समाजावर लादले असा काहीसा समज@ आहे तोही खरा नाही संसदेच्या हिंदू असलेल्या लोकप्रतिनिधींचा आणि हिंदू समाजातील जनमताचा रेटा असल्यामुळे सरकारने हे विधेयक संसदेत मांडले आणि संसदेतील तत्कालीन लोकप्रतिनिधींनी ते मंजूर केले म्हणून तो हिंदूंसाठीचा कायदा हिंदूंना लागू झाला.

@अशाच स्वरूपाचे मत- स्वातंत्र्य नाही म्हणून सुधारकांच्या गमजा चालू आहेत - २०व्या शतकाच्या सुरुवातीस संमतीवयाच्या कायद्याच्या निमित्ताने एका मोठ्या नेत्यानेही व्यक्त केले होते.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

एका बैठकीत

एका बैठकीत मोठा लेख वाचणे हे बर्‍याच आंतरजालीय लोकांना गैरसोयीचे वाटते. तसेच मुळ लेख हा
1) Secularism ची व्यत्पत्ति, अर्थ आणि इतिहास
2) Secularism चे चुकीचे लावलेले अर्थ.
3) Secularism शी गल्लत होणा-या दुस-या संकल्पना
4) Secularism आणि भारतीय राज्यघटना
5) Secularism आणि राष्ट्रवाद.
6) Secularism आणि हिंदुत्व
7) समारोप - एक स्वप्न

अशा सात भागात विभागलेला आहे. लोकांना हवे असल्यास उर्वरित भाग एकदम टाकतो. तसेच ले.अरविंद बाळ यांना उत्तरे देणे शक्य नसल्यास मी ती समन्वयित करतो.

प्रकाश घाटपांडे

भाग आणि एकदम

भाग असायला हरकत नाही. फक्त दोन भागांत २-३ दिवसांचे अंतर ठेवल्याने काही साधत नाही.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

संबंध नाही कारण...

>>भारतात सरकार सेक्युलॅरिझम नीट पाळत नाही पण सोयीस्कर (राजकीय) फायद्यासाठी जास्त करून निव्वळ शब्द म्हणूनच वापरला जातो. हे जर विधान मान्य केले तर लक्षात काय येते? की जे काही जनकल्याणाचे विविध निर्णय (कायदा, प्रकल्प, योजना - सगळेच काही) झाले आहे ते सेक्युलॅरीझममुळे झालेलेच नाही... :(माझा मूळ प्रतिसाद)

यातला पहिला भाग आणि शेवटचा भाग याचा काय संबंध आहे हे लक्षात येत नाही. पहिला भाग मान्य आहे पण प्रकल्प- योजना वगैरे सेक्युलरिझममुळे झाले नाही म्हणजे काय? सगळ्या योजना धार्मिक निकषावर आखल्या आहे असे म्हणायचे आहे की या योजनांचा आणि सेक्युलरिझमचा संबंध नाही असे म्हणायचे आहे? .... युनिव्हर्सल ऍडल्ट फ्रॅन्चाइज आणि व्यक्तिगत कायदा सोडून* बाकीच्या कायद्यांबाबत समानता (याला अपवाद एकच...आर्थिक-आयकर संपत्तीकर या बाबीतही हिंदू अविभक्त कुटुंब नावाची खास सवलत देणे) या गोष्टी धर्म असलेल्या राज्यात होऊ शकल्या नसत्या.

सर्वप्रथम "धर्म असलेल्या राज्यात" म्हणजे "राज्यात धर्मच नको" असे म्हणायचे आहे का? तसे असल्यास वेगळाच वाद आहे. :-) मात्र तुर्तास या वाक्प्रयोगाचा मी असा अर्थ घेत आहे, की आपल्याला म्हणायचे आहे "जे राज्य धर्माच्या (रिलीजन) आधारे चालते."
मी माझ्या या अथवा इतरत्र कुठल्याच प्रतिसादात राज्य हे धर्माने चालावे असे म्हणले नाही. किंबहूना अशोकाचा आणि त्यानंतरच्या १-२ पिढ्यांचा अपवाद सोडल्यास भारतवर्षास कधीच अधिकृत धर्म नव्हता असे माझे म्हणणे आहे आणि ते तसेच असायला हवे.

भारतसरकारने ज्या काही गोष्टी केल्या त्यातील सर्वच गोष्टी हे आम्ही सेक्युलर आहोत असे म्हणायच्या ऐवजी आम्ही भारतीय आहोत इतके म्हणून देखील करता येऊ शकतात. म्हणून या योजनांचा आणि सेक्युलॅरीझमचा काहीच संबंध नाही असे म्हणायचे आहे. आत्ता या संदर्भात सकारात्मक उदाहरणे आठवत नाहीत. पण तशी नसलेली उदाहरणे:

  1. एक सुवर्णमंदीरा संदर्भातील ऑपरेशन ब्लू स्टार आणि ब्लॅक थंडर.
  2. रुपकंवर सती प्रकरणात राजकारण्यासकट झालेला खटला. जरी त्यात ते सुटले असले तरी ते कायद्याने आरोप सिद्ध करता आले नाहीत म्हणून, धर्मामुळे नाही.
  3. हजरत बाल प्रकरणात अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी केलेला मशिदीवरील हल्ला.
  4. अक्षरधाम मंदीरात अतिरेकी घुसलेले असताना मंदीरावर केलेला हल्ला.
  5. आंध्रमधे (नक्कि कुठे ते माहीत नाही पण) धरणाच्या जमिनी खाली येत असलेली काही देवळे इतरत्र पुर्नस्थापीत केली.
  6. पंढरपूरच्या विठ्ठल मंदीरावर तसेच प्रभादेवीच्या सिद्धीविनायकाच्या ट्रस्ट वर असलेले सरकारी वजन. (अधिक माहीती: "अंतुल्यांच्या साडूच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी, सिद्धीविनायका तूच सिद्ध हो" अशा अर्थाचा रविवारचा दृष्टीक्षेप माधव गडकर्‍यांनी लिहीला, त्यांना त्याबद्दल विधानसभेत हक्कभंगाला तोंड द्यावे लागले होते!)

आशा करतो की यातून समजेल की यात कुठेही आम्ही सेक्युलर आहोत म्हणून केले गेले नाही तर सरकारी अधिकार (एक शेवटचे उदाहरण सोडल्यास) चांगल्या अर्थी वापरल्याने केले गेले. म्हणून म्हणत आहे की स्वतःला केवळ सेक्युलर राष्ट्र कशाला म्हणायचे आणि त्या शब्दाच्या अर्थात गोंधळ घालत बसायचे?

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

फारच जड...

आयला, आपल्याने इतके जड शब्द झेपत नाही बॉ.. शब्दांच्या तडा़ख्यापासून दूर राहून नुसत्या शुद्ध कल्पना मांडल्या तर कसं?
लोक समाजात राहातात. सरकार स्थापन करतात. समाज सुव्यवस्थित चालवण्यासाठी त्यांनी काही गोष्टी करणं आवश्यक आहे (कर भरणं, खुना़खुनी न करणं , दुसर्‍याच्या स्वातंत्र्यावर गदा न आणणं - भारतीय घटनेत लिहिलेल्या गोष्टी). पण लोक असे विचित्र आहेत की या पलिकडेही खूप गोष्टी करत असतात (मंदिरात जाणं, गळ्यात क्रूस घालणं, निराकार परमतत्त्वावर विश्वास ठेवणं वगैरे) व त्यांचा समाज चालवण्यासाठी काहीही वाईट परिणाम होत नाही, झाला तर (कदाचित) फायदाच होतो. सारख्या विचार/आचारप्रणाली असलेल्यांचे गट आहेत - त्यांना आतले व बाहेरचे लोक धर्म, पंथ, जात असलं काहीतरी म्हणतात व नक्की कुठचा शब्द लागू याबाबत वाद घालत बसतात.

शेवटी या "पल्याडल्या" गोष्टी कोणिही काही का करेना जोपर्यंत अल्याडल्या गोष्टी मोठ्या प्रमाणात पाळतात तोपर्यंत त्यांना त्या करू द्याव्यात. एका विशिष्ट गटाला त्या गोष्टींबद्दल शिक्षा किंवा बक्षिस देऊ नये. माझ्या मते हा सेक्युलरीजम. हे गट "धर्मा"धारितच असले पाहिजेत असं नाही.

वरील निकषांवर लेखातल्या काही गोष्टी उतरत नाहीत.

Gate Way of India समोरचा पंचम जॉर्जचा पुतळा उठवून तिथे शिवाजीमहाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारणं ही कृति जशी नैसर्गिक आणि Secular असते, अगदी त्याप्रमाणेच मंदीर पाडून उभारलेल्या मशिदीचं पुन्हा मंदीर बनवणं ही कृति पण पूर्णपणे Secular आहे.

पंचम जॉर्ज वा त्याचा "गट" - ब्रिटिश सत्ता - यांना भारतीय घटनेने कुठचेही अधिकार दिलेले नाहीत. याउलट मंदीर व मशीद पवित्र मानणार्‍या गटांना दुसर्‍याच्या स्वातंत्र्यावर गदा न आणण्याचं बंधन व स्वतःचं स्वातंत्र्य जपण्याचे अधिकार दिलेले आहेत. या दोन गोष्टींची तुलना होऊ शकत नाही. बाबराच्या काळात असल्या गोष्टी चालायच्या हे ठीक आहे, पण कुठेतरी रेषा आखायलाच हवी.

आधीच्या लेखांमधे वा प्रतिक्रियांमध्ये हिंदु सेक्युलर आहेत की नाहीत अशी चर्चा वाचल्याचं आठवतं... हिंदुंनी आपल्याच गटाचे उपगट करून त्यांचे मानवी हक्क शतकानुशतकं पायदळी तुडवले... कसं म्हणायचं हो त्यांना सेक्युलर? वरच्या उदाहरणाप्रमाणे त्या गटांनी आता त्याचा बदला घेणं योग्य होईल का?

राजेश

 
^ वर