सेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार - भाग २

Secularism एक सर्वंकष विचार

(परम-मित्र दिवाळीअंक 2006)
ले. अरविंद बाळ
सेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार - भाग १

Secularism चे चुकीचे लावलेले अर्थ

काही काही व्यक्तींच्या नशिबांत जसे गैरसमजच लिहिलेले असतात (उदाहरणार्थ सावरकर) तसेच कांही शब्द पण असंच कमनशीब घेऊन जन्माला येतात. Secularism हा तसा शब्द आहे. सरळ, स्वच्छ, एकमेवाद्वितीय असा अर्थ असणा-या या शद्वाचे चुकीचे अर्र्थ काढून “अनर्थ” च फार माजवला गेला आहे.

Secularism च्या अनेक चुकीच्या अर्थांमध्ये सगळयांत महत्वाचा “सर्वधर्मसमभाव”. हा नुसत्या घोटाळयाचाच नव्हे तर धोक्याचा अर्थ आहे. सर्वच धर्मांना समान लेखणं म्हणजे Secularism नव्हे. कारण धर्माचा ऐहिकामध्ये हस्तक्षेप नसावा याचा आणि सर्वधर्मसमभावाचा दूरान्वयानेहि संबंध नाही.

सर्व धर्मांविषयी समान दूरस्थता असाही एक अर्थ काढला जातो. तोही बरोबर नाही. सर्वच धर्मांना समान परकेपणाने किंवा आपलेपणाने सुध्दा वागवण्यांत अनेक धर्मांची बऱ्या वाईटपणांत तुलना करण्यांच टाळण्याची सावधानता आहे. पण हा Secularism नव्हे. हे फार तर मतलबी धोरण म्हणता येईल.

सर्वधर्मसमभाव या शब्दांतील “g_” या शब्दामुळे कदाचित समान अनादर असाही अर्थ निघू शकेल. तसा अनवस्थाप्रसंग येऊ नये म्हणून “सर्वधर्मसमादरभाव” असा शब्द सुचवला गेला आहे. एकतर हा Secularism चा अर्थ नव्हे. शिवाय सर्वच धर्माविषयी भरपूर अज्ञान असल्याशिवाय अनेकानेक धर्मांतील प्रत्येक धर्माला समान आदर देणं केवळ अशक्य आहे. सर्वच धर्मांची चिकित्सा करणं हा एक स्वतंत्र विषय आहे. अशा चिकित्सेनंतर वेगवेगळया निकषांवर सर्व धर्मांना वेगवेगळे गुण मिळाले आणि एखादा धर्म सर्वश्रेष्ठ ठरवता आला. तरी त्या सर्वश्रेष्ठ धर्मालाहि ऐहिकात आज्ञा सोडण्याची परवानगी Secularism देऊ शकत नाही. हे सर्व धर्माभिमान्यानी नीट समजून घेणं आवश्यक आहे.

आणखी एक विचार वारंवार मांडला जातो. “ज्या देशांत अनेक धर्माचे लोक राहतात अशा देशाला Secular रहांण आवश्यक आहे.” Secularism चा अर्थ न कळल्याची ही अगदी (Confirmatory Test) निश्चिती परिक्षा आणि त्याचा, नापास-अनुत्तीर्ण, असा निकाल आहे. एखाद्या देशांत एकाच धर्माचे, त्याच्या एकाच उपपंथाचे लोक जरी 100 टक्के असले तरीही तो देश Secular राहिलाच पाहिजे. कारण अशा धर्मानेहि ऐहिकात हस्तक्षेप केल्यावर काय परिणाम होतात याला अनेक इस्लामी देश साक्ष आहेत.

लेखनविषय: दुवे:

Comments

योग्य

एकदम योग्य विवेचन. विशेषतः सर्मधर्मसमभाव म्हणजे सेक्युलरिझम नाही हे.

परंतु ही व्याख्या राज्य/शासनसंस्था आणि धार्मिक गोष्टी यांच्या संबंधाविषयी आहे. जेव्हा एखाद्या माणसाने सेक्युलर असावे म्हणजे काय असा प्रश्न निर्माण झाला तर त्यावेळी सर्वधर्मदूरस्थता असा अर्थ कदाचित म्हणता येईल.
(देवळात नवसही बोलतो आणि दर्ग्यावर चादरही चढवतो अशा माणसाला सर्वधर्मसमभावी म्हणता येईल पण सेक्युलर म्हणता येणार नाही)

शिवाय सर्वच धर्माविषयी भरपूर अज्ञान असल्याशिवाय अनेकानेक धर्मांतील प्रत्येक धर्माला समान आदर देणं केवळ अशक्य आहे
धर्मांची बऱ्या वाईटपणांत तुलना करण्यांच टाळण्याची सावधानता आहे

या दोन्ही गोष्टी एकच आहेत. सर्वधर्मांनी सारखीच तत्त्वे सांगितली आहेत असे म्हणणे म्हणजे कुठल्याच धर्माने खरेतर काहीच सांगितले नाही असे अप्रत्यक्षपणे म्हणण्यासारखे आहे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

मूलगामी विवेचन

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.प्रकाश घाटपांडे यांनी सेक्युलॅरिझम चे उत्तम मूलगामी विवेचन केले आहे. सर्वधर्मसमभाव म्हणजे सेक्युलॅरिझम् नव्हेच. सर्वधर्मअभाव म्हणजे सेक्युलॅरिझम असे म्हणणे अधिक योग्य ठरेल!!

चांगले पण..

या भागातील विवेचन नक्कीच चांगले आहे पण अपूर्ण वाटले. कदाचीत पुढच्या भागात ते अधिक पुढे जाऊ शकते...

सर्वधर्मांनी सारखीच तत्त्वे सांगितली आहेत असे म्हणणे म्हणजे कुठल्याच धर्माने खरेतर काहीच सांगितले नाही असे अप्रत्यक्षपणे म्हणण्यासारखे आहे.

ह्या वरील वाक्याच्या संदर्भात कुरंदकरांचे म्हणणे होते की जेंव्हा गांधीजींनी सर्वधर्म सारखे आहेत असे म्हणले तेंव्हा वास्तवीक कुठलाच धर्म काही सांगत नाही असे म्हणायचे होते. पुढे त्यांचे असेही म्हणणे होते की घटनेने नेहरूंना (आणि अर्थातच नंतरच्या सर्वच सत्ताधार्‍यांना) सर्व धर्मांपासून फारकत घेयला सांगितली होती.

वरील वाक्यांतील पहीला भाग हा धर्ममार्तंडांसाठीचा प्रश्न आहे. त्यामुळे जो पर्यंत राष्ट्राचा कायदा आणि सुव्यवस्था पाळत त्यांना जे काही करायचे असेल ते करूंदेत. तो पर्यंत, स्वतःच्या घरात कोणी कसे वागावे ह्यात जशी सरकारची अथवा शेजार्‍यांची ढवळाढवळ चालू शकत नाही तसेच झाले.

मात्र जो दुसरा भाग आहे तो सरकारशी निगडीत आहे. मनुस्मृती अथवा इतर हिंदू रुढी काय म्हणते, शरिया मधे काय म्हणले आहे, बायबलचे काय म्हणणे आहे आदींची सरकारने काळजी करण्याची गरज नाही.

मी स्वतःला हिंदू समजतो, पण मी तसे समजताना इतर धर्मांचा आणि धर्मियांचा अनादर करत नाही. त्यांच्या कडे जाणे झाले तर त्यांचे सण साजरे करताना त्यांच्या आनंदात त्यांच्या प्रथेने सहभागी होतो. माझा ख्रिश्चन मित्र गणपतीच्या वेळेस घरी येयचा आणि प्रसाद खायचा. तेच एका मुस्लीम सहकार्‍याविषयी... मग आम्ही सेक्युलर आहे का नाही चा प्रश्न येत नाही कारण आम्ही आमचे व्यक्तिगत स्वातंत्र्य हे दुसर्‍याच्या स्वातंत्र्यावर हल्ला न करता, दुसर्‍याच्या भावना न दुखावता, दुसर्‍याच्या श्रद्धांमुळे अथवा श्रद्धेच्या अभावामुळे त्यांना कमी अथवा जास्त न लेखता, उपभोगत आहोत. जर एखादा अश्रद्ध/निधर्मी/नास्तीक काही असेल, थोडक्यात अशा व्यक्तीने धर्म जोखड समजून झुगारलेला असेल आणि ती व्यक्ती जर त्यामुळे इतरांच्या श्रद्धा आणि भावनांवर टिका करत त्यांना हीन लेखत असेल तर अशी व्यक्ती, धर्मांध नसेल पण एकांगी विचाराची असल्याने सेक्युलर ठरू शकत नाही.

अर्थात माझे मत या पुढचे आहे, सेक्युलर ही व्यक्ती नसते, समाज नसतो तर त्याच्या मूलभूत संकल्पनेनुसार राष्ट्र ज्या पद्धतीने चालते ती पद्धती असते. राजकीय नेतृत्व आणि कायदा-सुव्यवस्थेचे हे कर्तव्य असते की व्यक्ती आणि समाजाला अशा (सेक्युलर) राष्ट्रामधे, राष्ट्राच्या घटनेशी बांधिलकी ठेवत, स्वतःची उन्नती करण्याची आणि स्वातंत्र्य उपभोगण्याची स्वातंत्र्यपद्धती उपलब्ध करून द्यावी.
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

पटले नाही

जर एखादा अश्रद्ध/निधर्मी/नास्तीक काही असेल, थोडक्यात अशा व्यक्तीने धर्म जोखड समजून झुगारलेला असेल आणि ती व्यक्ती जर त्यामुळे इतरांच्या श्रद्धा आणि भावनांवर टिका करत त्यांना हीन लेखत असेल तर अशी व्यक्ती, धर्मांध नसेल पण एकांगी विचाराची असल्याने सेक्युलर ठरू शकत नाही.

हे विधान अजिबात पटले नाही. एखाद्या व्यक्तीची श्रद्धा चुकीची असेल तर त्यावर टीका केल्याने टीका करणारी व्यक्ती एकांगी विचाराची कशी काय? रानडे, आगरकर, आंबेडकर यांच्यासह अनेकांनी वारंवार चुकीच्या श्रद्धांवर टीका केल्या आहेत. त्यांचे विचार एकांगी नव्हते हे काळाच्या ओघात सिद्ध झाले आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

फरक

रानडे, आगरकर, आंबेडकर यांच्यासह अनेकांनी वारंवार चुकीच्या श्रद्धांवर टीका केल्या आहेत. त्यांचे विचार एकांगी नव्हते हे काळाच्या ओघात सिद्ध झाले आहे.

वास्तवीक मी माझ्या वरील प्रतिसादात जी तीन टोकाची उदाहरणे म्हणून दिली त्यात तुम्ही म्हणलेली सर्व तसेच म. फुले आणि कर्वे (पिता-पुत्र), स्वा. सावरकर यांची पण नावे पण डोक्यात आली होती. पण ती सर्व उदाहरणे थोड्याफार फरकाने स्वातंत्र्यापुर्वीची होती आणि मी दिलेली ६० नंतरच्या दशकातील असल्याने त्यामानाने अधुनिक होती.

चुकीच्या श्रद्धांवर टिका करणे हे अनिस पण करते आणि माझा त्यांच्याशी त्यांच्या काही बाबतीत कार्यपद्धतीवरून वाद असला तरी त्या कामाला मी एकांगी म्हणले नाही तर रानडे, आगरकर, आंबेडकरांना मी कसे एकांगी म्हणेन? या तीनच नावांचा तुर्तास विचार केला तर काय आढळते? रानडे हे कदाचीत सुधारक म्हणून यातील सर्वात ज्येष्ठ (सुरवातीचे या अर्थी) असल्याने ते खूपच मृदू होते आणि स्वाचरणात / स्वाध्याय पण कमी होते. आगरकर टोकाचे परखड होते पण तरी देखील मला आठवते त्याप्रमाणे त्यांनी देखील श्रद्धांवरती घाव घातला नाही तर रुढी, परंपरा, व्यक्तीस्वातंत्र्यावर भर दिला. आंबेडकरांनी तर काय आलेल्या वाईट आणि दुर्दैवी अनुभवांमुळे, "मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही" असे म्हणले. मात्र ते वास्तवात आणताना, स्वतः आणि स्वतःबरोबर स्वतःच्या समर्थकांच्या श्रद्धांवर घाव घातला नाही, त्यांना सश्रद्ध असणे हेच चूक असे सांगितले नाही तर भारतात पाळेमुळे असलेल्या बौद्ध धर्मात धर्मांतर केले. ते करताना देखील हिंदू धर्माशी जवळचा असल्याने मी बौद्ध धर्म स्विकारत आहे अशा अर्थाचे त्यांचे लेखन वाचल्याचे आठवते. थोडक्यात या सर्वांनी धर्मात राहून समाज पुढे नेण्यासाठी धर्म ठेवतच धर्मात सुधारणा घडवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा अर्थाचे अमेरिकन ख्रिश्चन संप्रदायात पण उदाहरण आहे: युनेटेरीयन युनिव्हर्सॅलीस्ट असे त्यांना म्हणतात. त्यांचे काम हे एका अर्थी रानड्यांच्या प्रार्थना समाजाच्या जवळचे आहे.

माझा मुद्दा आहे, जो स्वतःला अश्रद्ध/निधर्मी/नास्तीक अशा अधुनिक व्यक्तींसंदर्भात. तसे असण्यात काहीच गैर नाही. मात्र नेहमी नसले तरी, बर्‍याचदा अशा व्यक्तींना/समुहाला कुठेतरी अहंगड असतो की आम्हीच शहाणे. तुम्ही शहाणे तर शहाणे, ते तुमच्यापाशी.... तो शहाणपणा सिद्ध करायला इतरांच्या श्रद्धांवर वाटेल तशी टिका करायची म्हणजे, "आमचा धर्म तुमच्या धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, तेंव्हा त्यात या, आत्ता एकत्र राहू नंतर स्वर्गसूखपण मिळेल", असे म्हणण्यासारखेच आहे. हा एक प्रकारचे proselytize करण्यातलाच प्रकार आहे, जो सेक्युलर नसून एका अर्थी स्वधर्मप्रचार आहे. या संदर्भात माझा वरील प्रतिसाद होता...

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

अधिक थोडेसे...

कुरंदकरांचे म्हणणे होते की जेंव्हा गांधीजींनी सर्वधर्म सारखे आहेत असे म्हणले तेंव्हा वास्तवीक कुठलाच धर्म काही सांगत नाही असे म्हणायचे होते.

कुरुंदकर म्हणतात - प्रथमदर्शनी पाहताना गांधीजींसारखा माणुस सर्वधर्माचा पुजक असा दिसतो, मात्र बारकाईने पाहताना तोच सर्वधर्माचा पुजक नसुन तोच धर्माचा सगळ्यांत मोठा शत्रु असतो, हे दिसु लागते. जो संत असतो, तो मुलतः धर्माचा शत्रु असतो. जगातले सगळेच खरेखुरे संत शेवटी धर्माचे शत्रु असतात्.

थोडे वेगळे वाटते

कुरंदकरांचे पुस्तकातील वाक्य जसेच्या तसे quote केल्याबद्दल धन्यवाद!

जगातले सगळेच खरेखुरे संत शेवटी धर्माचे शत्रु असतात्.

त्या संदर्भात मला थोडे वेगळे वाटते की संत हे "प्रस्थापित विरोधी" असतात. अर्थात प्रत्येक प्रस्थापित-विरोधी हा संत असतो असा याचा अर्थ नाही! :-)

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

 
^ वर