सेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार -भाग ६


Secularism एक सर्वंकष विचार

(परम-मित्र दिवाळीअंक 2006)
ले. अरविंद बाळ
सेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार - भाग १सेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार -भाग २


सेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार -भाग ३

सेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार -भाग ४
सेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार -भाग ५


हिंदूत्व

"हिंदुत्व" हा शब्दच ब-याच जणांसाठी Red rag ठरतो आणि शिंग रोखून लोक धावूनच येतात. अगदी मोजके हिंदुत्त्ववादी (खऱ्या किंवा चुकीच्या अर्थाने) सोडले तर उरलेले बहुतांश हिंदू आणि सर्वांशाने सगळेच हिद्वेतर एक प्रतिगामी कल्पना म्हणून टीका तरी करतात किंवा दुर्लक्ष, उपहास, टवाळी यापैकी जमेल ते आपापल्या प्रकृतिप्रमाणे करतात.

म्हणून "हिंदूत्व" समजावून देण एक अवघड गोष्ट आहे.

श्री. शेषराव मोरे, ड़ॉ. स.ह.देशपांडे अशा अनेकांनी हिंदुत्व या संकल्पनेवर खूप विचार करुन विस्ताराने लिहिलेले आहे. तरीही या निबंधामध्ये फक्त Secularism च्या संदर्भात मला पुन्हा कांही लिहायचं आहे.

हिंदुत्व ही संकल्पना सावरकरांनी विस्ताराने आणि शास्त्रशुध्दपणे प्रथम 1923 साली मांडली. नंतर डॉ. हेडगेवार यांनी हिंदुसंघटनेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. आज हिंदुत्व हे सावरकरांच हिंदुत्व आणि संघांच हिंदुत्व अशा दोन प्रणालीत ओळखलं जातं.

सावरकर आणि हेडगेवार यांनी प्रतिपादलेले हिंदुत्व ही एक पूर्णपणे Secular म्हणजे धर्मनिरपेक्ष इहवादी संकल्पना आहे. ती नुसतीच धर्मनिरपेक्ष नाही तर हिंदुधर्मनिरपेक्ष आणि हिंदू धर्मांतील ऐहिक पारलौकिक आणि आध्यातिक तत्वज्ञान निरपेक्ष पण आहे. कशी ते आतां पाहूं.

एका अनुष्टुप छंदातील श्लोकांत व्याख्या करुन सावरकरांनी थोडीशी चूकच केली आहे.जरी उण्यापुऱ्या 100 पानी पुस्तकांत ही कल्पना त्यांनी विषद केली असली तरी पितृभू, पूण्यभू शब्दांनी हिंदुत्वाचा पिच्छा कधीच सोडला नाही. त्या शब्दांच्या सर्व अर्थच्छटा समजावून सांगता सांगता अनेक विद्वान थकून गेले आहेत. म्हणून परिभाषेच्या गुतांवळयांत न अडकता आणि सावरकर-निरपेक्षपणे सुध्दां ही संकल्पना समजून घेणं आवश्यक आहे.

हिंदुत्वाचा उगम हा स्वतंत्र नसून ती एक प्रतिक्रिया स्वरुप आणि एक तत्कालीन गरज म्हणून मांडावी लागलेली कल्पना आहे. ज्या पध्दतीने हिंदू लोकांवर मुसलमानांची आणि काही प्रमाणांत ख्रिश्चनांची धर्म (Religion) म्हणून आक्रमणं होत राहिली तेव्हा हिंदुत्वाची स्वसंरक्षणात्मक मांडणी करणे अपरिहार्यच होते.

सावरकरांनी हिंदुत्वाची व्याख्या करताना हिंदुत्वातून मुसलमान गळावेत असं जणूं ठरवूनच "पुण्यभू" हा शब्द वापरला आहे. पण त्यामुळे एक महत्वाचा घोटाळा मात्र झाला आहे. त्यांत इस्लामला विरोध एक असहिष्णु तत्वज्ञान म्हणून न होता एक परकीय धर्म म्हणून झाला आहे. पण खरं म्हणजे इस्लामला विरोध त्या धर्माची शिकवण मानवताविरोधी आहे म्हणून व्हायला हवी होती. कारण महंमदाचा जन्म अरबस्तानांत मक्केला होण्याऐवजी अगदी पुण्यांतील सदाशिव पेठेतील एखाद्या ब्राह्मणाच्या घरांत झाला असता आणि त्याला त्या अशाच आयती पर्वतीवर बसून अल्लाकडून आल्या असत्या तरीही त्या गर्हणीयच ठरल्या असत्या. म्हणजे मुसलमानांचं श्रध्दास्थान हे भारताबाहेर आहे हा मुद्दा गौण असून, त्या धर्मालाच मानवतावादी, उदारमतवादी, लोकांचा एक परमतअसहिष्णु विचारसरणी म्हणूनच विरोध होण नैसर्गिक होत. म्हणून पुण्यभू हा मुद्दाच नसून हिंदूना काफीर म्हणून मानणारा धर्म कुठेहि जन्मला तरी त्याची प्रतिक्रिया म्हणून हिंदुत्वाचा उगम अटळच होता. सावरकरांनी तशी मांडणी करायला हवी होती.

पुण्यभूच्या अटीमुळे पारशी, ज्यू सुध्दा हिंदुत्वाच्या कक्षेबाहेर जातात याची सावरकरांना पण खंत होती. एकदा पुण्यभूचा निकष पत्करला की पारशी, ज्यू अहिंदू ठरण अपरिहार्य होतं.

म्हणून धर्म दृष्टया कोण हिंदू ठरतो आणि कोण अहिंदू याची व्याख्या न करता, राष्ट्रीय समाज कोणता, तर मुख्यत : हिंदू आणि जे जे धार्मिक दृष्टया अहिंदू असतीलहि पण हिंदू समवेत एक राष्ट्रीयत्वांत, राष्ट्रीय एकात्मतेंत विलीन होणारे हिंद्वेतर समाज. अशी मांडणी करणं आवश्यक होतं.

तरीही सावरकरांच हिंदुत्व Secular होतं याविषयी शंका घ्यायला जागा नाही. किंबहुना सावरकरांचं हिंदुत्व काटेकोर टोकाचं Secular होतं म्हणूनच ते हिंदुप्रिय होऊं शकलं नाही. श्रुतिस्मृतिपुराणोक्ताची सावरकरांनी भरपूर टिंगल टवाळी करुन अद्ययावत विज्ञाननिष्ठेचा पुरस्कार केला. पंडित सातवळेकरांनी एकदा म्हटलं आहे की, ख्रिश्चन मिशनरीहि हिंदू देवांची जेवढी टिंगल करत नाहीत तेवढी सावरकर करतात. (अर्थात सावरकरांनी त्यांच्या कठोर तर्कवादी भूमिकेतून त्याला उत्तरही दिलं. मिशनऱ्यांनी ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी केलेली हिंदू देवतांची टिंगल आणि सुधारणेच्या भूमिकेंतून मी केलेली टीका यांतील अंतर ज्याना कळत नाही त्यांना "पंडित" तरी कसं म्हणावं ? ) मुद्दा एवढाच की सावरकरांच हिंदुत्व हिंदू धर्मातल्या कोणत्याहि धर्माज्ञांना ऐहिकांत लुडबुड करायला परवानगी देणारं नव्हते, म्हणजेच Secular होते.

डॉ. हेडगेवांरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 साली केली. त्या अगोदर ते क़ॉग्रेसच्या राजकारणांत सक्रीय होते. प्रथमपासूनच मुसलमानांच्या अराष्ट्रीय धर्मांध वागणुकीचा ते निषेध करीतच असत. पण खिलाफत चळवलीनंतर ते अतिशय अस्वस्थ होते. भारताच्या इतिहासाचा अभ्यास करुन हिंदूंचा असंघटितपणा कोणत्याहि आक्रमकाला यश मिळवून देण्याचे मुख्य कारण हे त्यांच्या लक्षांत आलं होत. तेव्हाच प्रसिध्द झालेलं सावरकरांच "हिंदूत्व" हे पुस्तक पण त्यांनी वाचलं होतं.

या सर्वांचा संकलित परिणाम म्हणून "रा.स्व.सं."ची स्थापना त्यांनी केली. सावरकरांच्या विचारसरणीपेक्षा डॉक्टरांच्या विचार सरणीत दोन महत्वाचे फरक दिसून येतात. एक सावरकरांना हिंदूच हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व स्वयंसिध्दच वाटत असावं. डॉक्टरांच निदान वेगळं होते. हिंदू या देशांतील एकमेव संघटित राष्ट्रीय समाज असायला हवा. तेच नैसर्गिक आहे. पण दुर्देवाने तो तसा नाही आणि पूर्वीहि नव्हता. म्हणून तर सर्व आक्रमक यशस्वी झाले. म्हणून जे असायला हवं पण नाही, ते साध्य करण्याकरिता हिंदूंच संघटित राष्ट्रीयत्व गृहित धरण्याऐवजी तस ते निर्माण करायला हवं असा ध्यास त्यानी घेतला आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.

दुसरा मुद्दा Secularism चा डॉक्टर हेडगेवार सावरकरांच्या इतकेच कट्टर Secularist होते. म्हणून डॉक्टरांनीही संघात हिंदू धर्मातील धार्मिक प्रतिगामित्वाला कुठेच स्थान दिलं नाही. पण सावरकरांप्रमाणे हिंदूंच्या धार्मिक अंधश्रध्दांवर पुस्तकी झोड न उठवता इतर सर्व कार्यक्रमाप्रमाणे याहि बाबतीत संघाच्या कार्यक्रमांतून प्रत्यक्षपणे पण हळुवारपणे तेच काम केंल.

सावरकरांच हिंदुत्व आणि ड़ॉ. हेडगेवारानी पुस्तक वा प्रबंध न लिहिता पण संघाद्वारे मांडलेलें हिंदुत्व ही दोन्ही मुख्य हिंदुत्ववादी तत्वज्ञाने Secular च होती हे यावरुन लक्षांत येईल.

त्यावेळच्या काँग्रेसचा आणि नंतरच्या डाव्या पुरोगामी पक्षांचा मुख्य आक्षेप असा होता आणि आहे की हिंदुत्व ही जर इतकी निखालस Secular संकल्पना आहे तर या पक्षांत वा संघटनेत मुसलमानांना प्रवेश का नसावा ? याचं उत्तर Secularism आणि राष्ट्रीयत्व या मुद्यावरच्या उहापोहात आलं आहे. प्रश्न राष्ट्रीय एकात्मता "वाटण्याचा" आहे, "मानण्याचा" नाही. मुख्य अडचण "इस्लाम" च्या तत्वज्ञानाची आहे, मुसलमानांच्या फुटकळ वागणुकीची नाही. मुसलमानांची सार्वत्रिक मानसिकता जोपर्यंत बदलत नाही. (हमीद दलवाईसारखे सन्माननीय अपवाद जे प्रभावी ठरले नाहीत, ते सोडून) तोपर्यंत हिंदुत्वाची मांडणी होती तशीच रहाणार आणि "हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व" हा सिध्दान्तही राहणार.

हिंदुत्वाची संकल्पना कितीही धर्मनिरपेक्ष इहवादी असली तरी हिंदूची मानसिकता हा स्वतंत्र विषय आहे. हिंदुत्व ही एक वैचारिक मांडणी आहे पण हिंदूंची मानसिकता हे एक वास्तव आहे. जसाजसा विचार करावा तितकं हिंदू मानसिकतेचं गारुड समजून घेणं जास्त जास्तच अवघड आणि जटिल होऊन बसत. हिंदू मानसिकता हे एक गहनतेंत गुंडाळून जटिलतेत जखडलेलं आणि कूटपात्रांत लपलेल अतर्क्य कोड आहे. हिंदूंचा इतिहास वाचला की विकृति हाच त्याचा स्थायीभाव असावा अशी शंका येते. कोणत्याही प्रसंगात इतर समाजाची जशी नैसर्गिक प्रतिक्रिया असूं शकते त्याहून विपरीत अशी हिंदूची प्रतिक्रिया असते. गेली अनेक शतकं आक्रमकांचा मार खाऊनहि त्यांतून कांहीही न शिकता अजूनही आत्मनाशाची एक अनाकलनीय असोशी बाळगणारा दुसरा मानवी समाज पृथ्वीच्या पाठीवर कोठेंही सापडणार नाही.

आणि म्हणूनच हिंदुत्वाची तर्कशुध्द इहवादी चळवळ सावरकरांचं त्या काळांतील आक्रमक नेतृत्व लाभूनहि आणि संघाची चिकाटी असूनहि हिंदूंच्या समाजात मूळ धरु शकली नाही. खरे हिंदू ह्रदय सम्राट महात्मा गांधीच का होऊं शकले हे मग कोडंच रहात नाही. कारण हिंदूच्या या मानसिकतेचं खरं प्रतिबिंब गांधीजीच्यांच विचार सरणीत आणि प्रत्यक्ष वागणुकीत दिसतं.

लेखनविषय: दुवे:
 
^ वर