श्रद्धा-अंधश्रद्धा............ समालोचन !!

अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याच्या बाबतीत सर्वात प्रथम प्रश्न उभा रहतो तो म्हणजे "अंधश्रद्धा" या शब्दाबाबत. समितिने रुढ केलेला "अंधश्रद्धा" हा शब्दच मुळात चुकीचा आहे . "पराकोटीचा विश्वास म्हणजे श्रद्धा होय"! म्हणजे "श्रद्धा" हा "विश्वासाच्या" वरिष्ठ पातळीवरील घटक आहे ! मग तो "अंध" कसा असु शकतो ? आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रद्धेशिवाय कोणताही मणुष्य जगुच शकत नाही. "श्रद्धा" ही संकल्पना फक्त "ईश्वर व भक्त" या दोघांपुरतीच मर्यादीत नाही, तर नित्याच्या जिवनामध्ये प्रत्येक व्यक्तीकडुन नेहमी वापरात आणली जाते . एखाद्या पतीचा जर असा विश्वास असेल की माझी बायको ही पतिव्रता आहे ! ती मला सोडुन दुस-या कोणाचाही विचार करत नाही तर हा त्या पतीचा पत्नी बाबत असलेला विश्वास म्हणजेच त्या पतीची "श्रद्धा" होय, आता तो पती आपली श्रद्धा सिद्ध करून दाखवु शकत नाही म्हणुन काही ती "अंधश्रद्धा" ठरते का ?

नक्किच नाही ... परंतु समिती वाल्यानी अशाच काहीशा प्रकारची "अंधश्रद्धेची" व्याख्या केलेली आहे ! "कार्यकारणभाव स्तरावर सिद्ध करण्यास असमर्थ असणारी गोष्ट म्हणजे ’अंधश्रधा’ होय "! वरील उदाहरणा मध्ये पती आपल्या पत्नि बाबतच्या विश्वासास सिद्ध करू शकत नाही म्हणुन तो पती "अंधश्रधाळू" ठरतो का ? तसेच प्रेम, वात्सल्य, भावणा, राग, द्वेष, मत्सर ईत्यादी भावना कार्यकारणभाव स्तरावर कशा काय सिद्ध होवु शकतात ? म्हणुन या गोष्टी सुद्धा अंधश्रद्धा माणायच्या काय ?
तसेच "वैज्ञानिक दृष्टीकोणस्तरावर सिद्ध करण्यास असमर्थ असणारी गोष्ट म्हणजे अंधश्रद्धा" ! आता प्रश्न उभा राहतो की जर एखादी गोष्ट सिद्ध करण्यास विज्ञान असमर्थ असेल तर ती गोष्ट अंधश्रद्धा माणायची का ?? ईथे दोष कोणाचा ? तर एखादी गोष्ट सिद्ध करण्यास असमर्थ असणा-या विज्ञानाचा आहे ! कारण ती गोष्ट विज्ञान सिद्ध करू शकत नाही ! उदा पती व पत्नी यांच्या मधिल प्रेम विज्ञान सिद्ध करू शकत नाही तेव्हा दोष कोणाचा ? पती-पत्नीचे प्रेम सिद्ध करण्यास असमर्थ असणा-या विज्ञानाचा की त्या दोघा पति-पत्निंचा ?? (...हा आता समिती वाल्यांच्या बाबतीत जरा विचारच करावा लागेल )
तसेच श्रद्धा ही वैयक्तीक बाब आहे ! एखाद्याच्या दृष्टीने "मुर्तीपूजा" ही श्रद्धा असेल तर दुस-याच्या दृष्टिने "नामजप" ही श्रद्धा असु शकेल, आता दुस-या श्रद्धेला "अंधश्रधा" म्हणुन हिनवण्याच्या कोणाला काय अधिकार ?
वर संगितल्या प्रमाणे प्रत्येक मणुष्य हा श्रद्धाळू असतो ! देवाची भक्ती करणारा भक्त जसा श्रद्धाळू आहे तसेच समितिवाले सुद्धा श्रद्धाळू आहेत, फरक फक्त एवढाच आहे की भक्ताची श्रद्धा ही निर्गुण ईश्ववारावर निस्वार्थ आहे तर समिति वाल्यांची श्रद्धा ही सोनिया गांधी, शरद पवार आदींवर स्वत:चा स्वर्थ पाहणारी आहे .
समितीवाल्यानी "अंधश्रद्धेच्या" केलेल्या व्याख्येप्रमाणे गेल्यास ........ समितिवाले आपल्या पत्नीवर विश्वास ठेवतात ही त्यांची अंधश्रद्धा ठरते, समितिवाले एक-मेकांवर विश्वास ठेवतात ही सुद्धा अंधश्रद्धा ठरते, समितीवाल्यांना असे वटते की हा कायदा संमत होईल तर ती ही अंधश्रद्धाच ठरते, ईतकेच नव्हे तर समितीवाल्यांचा विज्ञानावर असलेला फाजील विश्वास देखिल अंधश्रद्धा ठरतो ! मी तर म्हणेन की "अंधश्रद्धा निर्मुलन समिती" हीच एक अंधश्रद्धा अहे त्याचेच खरे निर्मुलन व्हायला हवे !
शेवटी येवढाच निष्कर्श निघतो की समितीने "श्रद्धा" व "अंधश्रद्धा" या शब्दांची योग्य व सर्वमाण्य व्याख्या जोपर्यंत करत नाही तो पर्यंत समितीला "श्रद्धा व अंधश्रद्धा" या विशयांवर बोलण्याचा अधिकार नाही !
श्रद्धा : "श्रद्धा" या शब्दाची व्यख्या सामुहीक स्तरावर करता येत नाही कारण श्रद्धा ही व्यक्तीसापेक्ष संकल्पना आहे म्हणजे श्रद्धा ही प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत असते. त्यामुळे श्रद्धा या संकल्पनेची व्याख्या करताना वैयक्तीक स्तरावरच करावी लागते. श्रद्धा या शब्दाची व्याख्या करताना असे म्हणता येईल की ....."एखादी गोष्ट सिद्ध करण्यास असमर्थ आहे(म्हणजे एखादी गोष्ट सिद्ध करता येत नाही) तसेच तीच गोष्ट असिद्ध करण्यास देखिल असमर्थ आहे (म्हणजे तिच गोष्ट असिद्ध देखिल करता येत नाही ! त्या गोष्टीचे अस्तित्व नाही हे सिद्ध नाही हेही सिद्ध करता येत नाही) तरीही एखाद्याचा त्या गोष्टीवर ’विश्वास’ असतो तेव्हा त्या गोष्टीवर त्या व्यक्तीची ’श्रद्धा’ आहे असे म्हणता येते". याच्या स्पष्टीकरणासाठी एक उदाहरण घेवू.. समजा एक ’अ’ नावाची व्यक्ती आहे, व तीचे ’ब’ या(काल्पनीक) संकल्पनेवर विश्वास आहे, अशा परिस्थितित ’ब’ ही संकल्पना ’अ’ या व्यक्तीला सिद्ध करता येत नाही, तसेच ’ब’ ही संकल्पना खोटी आहे हे कोणत्या ही त्रयस्थ व्यक्तीला असिद्ध देखिल करता येत नाही , अशावेळी ’अ’ या व्यक्तीचा ’ब’ या संकल्पनेबाबतचा ’विश्वास’ म्हणजेच "श्रद्धा" होय ! आणखी एक उदाहरण घेऊ ! एक व्यक्ती आहे व तिचा ईश्वरावर ’विश्वास’ आहे .. आता जर कोणी त्याला असे म्हटले की ’ईश्वर नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही ! तुझा ईश्वर सिद्ध करून दाखव !’ तर त्या व्यक्तीला ’ईश्वर’ आहे हे सिद्ध करता येणारच नाही, त्याचप्रमाणे ’ईश्वर अस्तित्वात नाही ’ असेही कोणी ठामपणे सांगू शकत नाही म्हणजे ’ईश्वर’ आहे हे जसे सिद्ध करता येत नही तसेच ’ईश्वर नाही’ हे देखिल सिद्ध करता येत नाही अशा परिस्थित त्या व्यक्तीचा ’ईश्वरा’ बद्दल असलेला ’विश्वास’ म्हणजेच "श्रद्धा" होय !
अंधश्रद्धा : "अंधश्रद्धा’ या सांकल्पनेची व्यख्या करताना असे म्हणता येईल .." एखादी गोष्ट सिद्ध करण्यास असमर्थ आहे(म्हणजे एखादी गोष्ट सिद्ध करता येत नाही) व तिच गोष्ट असिद्ध करता येते (म्हणजे त्या गोष्टीचे अस्तित्व नाही हे सिद्ध नाही हे सिद्ध करता येते) तरीही एखाद्याचा त्या गोष्टीवर विश्वास असेल तर ती त्या व्यक्तीची ’अंधश्रद्धा’ होय !". येथे एक उदाहरण घेवू .. समजा एखादी व्यक्ती जर असे म्हणत असेल की "ज्या अर्थी तारेतील विज दिसत नाही त्या अर्थी ’विज’ नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही" व याबद्दल त्याचा पुर्ण विश्वास असेल (केवळ उदाहरण म्हणुन) ! अशा परिस्थितीत ती व्यक्ती आपले म्हणने सिद्ध करू शकत नाही म्हणजे त्याच्या ’विज नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही’ या म्हणन्याला काहीही आधार नाही , तसेच त्या व्यक्तीचे म्हणने असिद्ध करता येते म्हणजे ’तारेत विज असते’ हे आपण सप्रमाण सिद्ध करू शकतो ! अशा परिस्थितीत त्या व्यक्तीची ’विजे’च्या संदर्भात "अंधश्रद्धा" बाळगुन आहे असे म्हणता येईल ! आणखी एक उदाहरण घेवु म्हणजे "अंधश्रद्धा" ही संकल्पना स्पष्ट होईल ! समजा ’एका वड्यात भुत आहे’ असा ’अ’ या व्यक्तीचा समज आहे ! ’त्या वाड्यात भुत आहे ’ हे तो सिद्ध करु शकत नाही ! त्याचप्रमाणे ’वाड्यात भुत नाही’ हे सिद्ध करता येत असेल, (म्हणजे त्या व्यक्तीचा समज असिद्ध करता येत असेल) तर अशा परिस्थित ’अ’ या व्यक्तीने ’वाड्यात भुत आहे ’ असा दाखवलेला ’विश्वास’ म्हणजेच "अंधश्रद्धा" होय !
विश्वास : "विश्वास" या संकल्पनेची व्यख्या करताना असे आपल्याला म्हणता येईल ..."एखादी गोष्ट सिद्ध करण्यास समर्थ आहे (म्हणजे एखाद्या गोष्टीचे अस्तित्व आहे हे सिद्ध सप्रमाण करता येते)" तसेच ती गोष्ट असिद्ध आहे हे सिद्ध करता येत नाही (म्हणजे ती गोष्ट अस्तित्वात नही हे सिद्ध करता येत नही) , अशा परिस्थितित एखाद्य व्यक्तीचा त्या गोष्टीबाबत असलेला भरवसा म्हणजेच "विश्वास" होय ! उदा.. समजा एखाद्या व्यक्तीचा असा विश्वास असेल की ’अ’ ही यक्ती ही निर्व्यसनी आहे व हे ती व्यक्ती सप्रमाण सिद्ध करु शकते पण ’अ’ व्यक्ती निर्व्यसनी नाही हे कोणीही सिद्ध करू शकत नसेल तर त्याव्यक्तीचा ’अ’ या व्यक्तीवर असलेला भरवसा म्हणजेच "विश्वास" होय !

लेखनविषय: दुवे:

Comments

तर्क

चांगला तर्क. वालावलकर सर आणि इतर प्रतिवाद करतीलच. तेंव्हा तयार रहा.
(श्रद्धाळू) शरद

लेख आवडला

नमस्कार,

आपण केलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा आणि विश्वास ह्यांच्या व्याख्या अगदी योग्य वाटल्या. केवळ कुतूहल म्हणून एक प्रश्न : मागच्या महिन्यात लोकमत मध्ये आलेल्या "दाभोळकर-अभ्यंकर" वादावरून आपल्याला हा विषय सुचला का ? आपल्याकडे त्याची इ-कॉपी आहे का ? मला वाचायला आवडेल. मी खूप दिवसांपासून जालावर लोकमत मधील तो लेख शोधत आहे.

चर्चेसाठी उत्तम विषय निवडल्याबद्दल आपले अभिनंदन !

प्राची.

@ प्राची जोशी

हा ले़ख मी या चर्चे च्या आगोदर् लिहीलेला आहे . सदर् चर्चा मी पाहीलेली अथवा वाचलेली नाही

कुमार केतकर

हॅहॅहॅहॅ!

णमस्कार,

भारीच विणोदी लेख आहे की हो. समितीवाल्यांवर झाडलेल्या आरोपांच्या फैरी जबरा आहेत. त्या सिद्ध करण्याची गरजच नाही कारण त्या सिद्ध कशा करणार? हे आरोप हीच एक श्रद्धा असावी.

समिति वाल्यांची श्रद्धा ही सोनिया गांधी, शरद पवार आदींवर स्वत:चा स्वर्थ पाहणारी आहे .

कुमार केतकर समितीवाले का हो?

तेवढं जरा मणुष्य, अंधश्रधा, सर्वमाण्य शब्दांचं काहीतरी करा हो.

- राजीव.

अस्तित्व आणि कार्यकारणभाव यांच्यात गफलत

"अस्तित्व नाही" या प्रमेयाला कुठलीच सिद्धता नाही. सिद्धता शब्दच येथे अप्रस्तुत आहे. तसे बघता "अस्तित्व आहे" या प्रमेयाला सुद्धा तार्किक सिद्धता नाही, फक्त अनुभव/निरीक्षणसिद्धता असू शकते.

("अप्रस्तुत" म्हणजे काय? जसे म्हणणे की "गायकाचा आवाज तपकिरी आहे" - ध्वनिगुण आणि रंगत्व यांचा मेळ अप्रस्तुत आहे. त्याच प्रकारे नास्तित्व आणि सिद्धासिद्धत्व यांचा मेळ अप्रस्तुत आहे. लेखक "अस्तित्व नाही" असे सिद्ध/असिद्ध असलेल्या कुठल्याही गोष्टीचे उदाहरण देऊ शकतात का?)

- - -

"कार्यकारणभाव सांगता येत नाही" ही बाब मात्र एक कस (टेस्ट प्रोसीजर) आहे.

पतीला आपल्या पत्नीबद्दल विश्वास का वाटतो, याबद्दल कार्यकारणभाव सांगता येतो, वगैरे. (पतीला अन्य स्त्रीबद्दल विश्वास वाटत नाही, पत्नी या स्त्रीबद्दल वाटतो, कारण पत्नीशी चांगली ओळख आहे, वगैरे.) याचा अस्तित्वाशी संबंध नाही. पण लेखक कदाचित मला विचारतील "ही तरी अंततोगत्वा सिद्धता आहे काय?"

थोड्या विचाराअंती लेखक जाणतील की या अशा बाबतीत "सिद्धता" म्हणजे शक्याशक्यतेचे गणित. हा विचार न्यायव्यवस्थेत झालेला आपण बघतो-ऐकतोच. उदाहरणार्थ [१] अमुक एका व्यक्तीने चोरी केलीच आहे की नाही, [२] अमुक घराची मालकी या फिर्यादीची की त्या प्रतिवादीची... यांच्यापैकी कुठल्याच गोष्टी अंततोगत्वा सिद्ध होऊ शकत नाहीत. (म्हणजे : [१] चोरी : ज्या व्यक्तीकडे मुद्देमाल सापडतो, त्याला तो कोणीतरी दिला असेल, कोणालाच माहीत नसलेल्या जुळ्या भावाने चोरी केली असेल, साक्षीदाराला दृष्टिभ्रम झाला असेल; [२] घराची मालकी : ज्या माणसाकडे खरेदीखत आहे, त्याला त्याच्या विक्रेत्याने खोटे खत दिले आहे, आणि खर्‍या मालकाचे जुने खरेदीखत पानशेतच्या पुरात वाहून गेले आहे... इत्यादि) अशा परिस्थितीतही सामान्य आयुष्यात आपण काही गोष्टी जवळजवळ सिद्ध असल्यासारख्या मानतो. इतकेच काय अशा परिस्थितीत निर्णय "मी म्हणतो म्हणून" असा कोणी न करता कमी-अधिक शक्यता कसली ते पडताळून व्हावा, असे कित्येकांचे मत असते. म्हणजे मुद्देमाल ज्याच्याकडे सापडला त्याच्याकडून परत मिळावा, ज्याच्याकडे खरेदीखत आहे, त्याला घर मिळावे, वगैरे. (लेखकाचे मत काय आहे? पूर्ण सिद्धता झाल्याशिवाय घराची मालकी कोणालाच मिळू नये, की आहे तितक्या पुराव्यांनिशी खटला निकालात लावावा?)

म्हणजे कार्यकारणभावाची सिद्धता साधारण इतपतच अपेक्षित आहे.

- - -

अस्तित्व आणि न-अस्तित्व या गोष्टींचा सिद्धतेशी काही संबंध नाही.
कार्यकारणभावाचा कस सांगितला आहे. (मला तार्किक दृष्ट्या "कार्यकारणभाव" म्हणजे काय ते माहीत नाही, पण व्यावहारिक दृष्ट्या या शब्दाच्या वापराची काही उदाहरणे माहीत आहेत.) पण "कार्यकारणभाव" शब्दाचा अर्थ "अस्तित्व" असा नाही.
कुठलीच गोष्ट अंततोगत्वा सिद्ध करता येत नाही. त्यामुळे "सिद्ध"चा कायदेशीर अर्थ "अंततोगत्वा सिद्ध" नव्हे, तर "कामचलाऊ सिद्ध" असा आहे.

"कामचलाऊ सिद्ध" मध्ये "मी बायकोला ओळखतो" इतपत कार्यकारणभाव पुरतो.
पण चीनमधील सू-ची-कू हा व्यक्ती जर ओळखीचा नसेल, तर सू-ची-कूचे कोणाबरोबर लफडे आहेच किंवा नाहीच असे ठाम मत म्हणजे बहुधा अंधश्रद्धा ठरावी.

- - -

वरील प्रतिसाद केवळ तर्क/कायदा/अस्तित्व/कार्यकारणभाव याबाबत आहे. याबाबत लेखात गफलत झाली आहे, असे मला वाटते.

बाकी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कुठल्या राजकीय पुढार्‍यांशी मेतकूट आहे, हे मला माहीत नाही. त्यामुळे लेखाचा तो भाग एक गमतीदार बातमी अथवा कयास असे समजून मी वाचला.

थोडक्यात

शेवटी येवढाच निष्कर्श निघतो की समितीने "श्रद्धा" व "अंधश्रद्धा" या शब्दांची योग्य व सर्वमाण्य व्याख्या जोपर्यंत करत नाही तो पर्यंत समितीला "श्रद्धा व अंधश्रद्धा" या विशयांवर बोलण्याचा अधिकार नाही !

थोडक्यात आम्ही आमच्या श्रद्धेची चिकित्सा करणार नाही व तुम्हालाही ती करु देणार नाही असा सुर आहे. हा सुर पुर्वीपासुनच आहे. समिती अस्तित्वात नव्हती तेव्हापासुन. आम्हीच खरे धर्मश्रद्धा हा नरेंद्र दाभोलकरांचा लेख इथेच वाचा
या पुर्वी या विषयावर् प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे उपक्रमावर झालेल्या काही चर्चा
१) धर्म देवाने निर्माण केला काय?
२) विवेकवाद
३) विज्ञानाबाबत माझी पुर्वपीठिका
४) विचार आणि चमत्कार
५) श्रद्धेचे मार्केटिंग
६) नवा ब्रिटिश कायदा
सुरज महाजन यांच्या सदस्यत्वाचा कालावधी पहाता सध्या एवढे पुरेसे आहे

प्रकाश घाटपांडे

अंधश्रद्धा

मी अंधश्रद्धेचे एक सोपे डेफिनिशन कुठेतरी वाचले आहे.
श्रद्धेमध्ये कर्मकांड अंर्तभूत केले गेले की त्याची अंधश्रद्धा होते.
मला तरी हे फार पटले आहे. बघा विचार करा.
चन्द्रशेखर

खरा प्रश्न

श्रद्धा अंधश्रद्धेचे हे समालोचन जरा अधिक प्रमाण भाषेत व लेखनाच्या नियमानुसार झाले असते तर बुद्धीभेद करण्याच्या प्रयत्नात लेखक यशस्वी होऊ शकले असते. पण विवेकी लोकांचे सुदैव म्हणा की हा लेख वाचतांना जी कसरत करावी लागते त्यातून लेखकाला काय म्हणायचे आहे हे समजण्याआगोदर हसू, चीड, कीव, आश्चर्य अशा अनेक भावना मनात येऊन जातात. असो. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचेच निर्मुलन आवश्यक आहे असे लेखक महाशय म्हणतात. या अंधश्रद्धा निर्मुलन समितीने आतापर्यंत किती लोकांची आयुष्ये उद्ध्वस्त केली आहेत ते तरी यांनी आधी सांगायला हवे होते. दूसरी गोष्ट कुणाच्या श्रद्धेला हिणवण्याचा समितीला काय अधिकार या प्रश्नामागे -कुणाच्या भोळेपणामुळे कुणाचे पोट भरत असेल तर, आयते गुलाम मिळत असतील तर समितीच्या पोटात का दूखते- असा कंसातला प्रश्न असल्याचे माझे स्पष्ट मत आहे. ईश्वरावर श्रद्धा ठेऊन कुणाचे भले होवो न होवो निदान त्याची लुबाडणूक तरी व्हायला नको असे मला वाटते. पण कुणी लुबाडला गेला म्हणजे लुबाडणारा फायद्यात असतोच आणि त्याला श्रद्धा हवीच असते. त्यामूळे श्रद्धाळू लोकांचेही व्यवस्थित रित्या स्तर पडतात. बाहेरून दर्शन घेणा-यापेक्षा मूर्तीला मस्तकाभिषेक घालणारा (अर्थात योग्य त्या भावाने (!)) हा जास्त श्रद्धाळू असतो हे ओघाने आलेच. लेखकाला एक गोष्ट विचारावीशी वाटते ती म्हणजे नरबळी देणे, गळ टोचणे, देवाला मुलगी सोडून देणे, बोकड, कोंबडे कापणे, चेटूक करणा-या तथाकथित महिलांची विवस्र धिंड काढणे अथवा त्यांना दगडाने ठेचून मारणे, सत्यनारायणाची पूजा घालून भरभक्कम शिधा पूजा-याला देणे, मुहूर्त टळला म्हणून महत्त्वाची कामे पूढे ढकलणे अथवा टाळणे ह्या सगळ्या गोष्टी श्रद्धा विषय आहेत आणि यात कुणाही विवेकी माणसाने दखल द्यायला नको असे लेखकाचे मत आहे का. प्रश्न फक्त ईश्वरावरच्या श्रद्धेचा नाही तर त्यापायी चालणा-या अनाचाराचाही आहे. लेखक गंभीर चर्चाविषय मांडण्याचा आव आणता आणता समितीवाल्यांच्या बायकांनाही आपल्या लेखणीने कुत्सितपणाने टोचून आले. मी स्वतः समितीवाला नाही. स्वतःच्या पत्नीवर विश्वास ठेवणे, एकमेकांवर विश्वास ठेवणे, अंधश्रद्धा निर्मुलन कायदा संमत होईल यावर विश्वास ठेवणे, विज्ञानावर विश्वास ठेवणे या सगळ्या अंधश्रद्धा असतील असोत बापूडे काही लोक आंधळे. निदान जगाने कायम मुर्ख रहावे आणि आम्ही कायम त्यांच्या ताटातले एवढेच काय तर त्यांच्या मढ्याच्या टाळूवरचे देखील लोणी खाऊन मस्त रहावे असा श्रद्धाळू विचार तरी हे लोक करत नाहीत. अजून एक बाब ,शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या बरोबरच म.फुले, प्रबोधनकार ठाकरे, लोकहितवादी यांच्यावरही समितीवाल्यांची श्रद्धा असल्याची नवीन माहिती माझ्याकडे आहे. या उप्पर स्वतःचा स्वार्थ पहाणारी श्रद्धा कुठली हे आता वेगळ्या शब्दात सांगायची आवश्यकता नसावी.

बुद्धिभेद?

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. बाबासाहेब जगताप यांनी मांडलेले विचार योग्यच आहेत. मात्र "हे समालोचन प्रमाण भाषेत व लेखनाच्या नियमानुसार झाले असते तर बुद्धीभेद करण्याच्या प्रयत्नात लेखक यशस्वी होऊ शकले असते."
हे श्री.जगताप यांचे म्हणणे मुळीच पटणारे नाही. त्यांनी असे लिहावे याचे आश्चर्यच वाटते.या लिखाणात थोडेतरी काही तर्कसंगत आहे काय?

एक प्रयत्न

'या लिखाणात थोडेतरी काही तर्कसंगत आहे काय?' हे म्हणणे समजण्यासारखे (आणि पटण्यासारखे) आहे. परंतु त्या निष्कर्षाप्रत येण्यासाठी मुळात जे काही लिहिलेले आहे ते संपूर्ण वाचणे - किंवा शक्य तितके वाचण्याचा प्रयत्न करणे - आवश्यक आहे, असे वाटते. परंतु त्यापूर्वीच जर प्रमाणभाषेचे आणि लेखननियमांचे सातत्याने आणि कोणत्याही नियमांस न धरून (continuous and totally haphazard अशा अर्थी) उल्लंघन होताना दिसले, तर (माझ्यासहित) अनेक वाचकांची पुढे वाचण्याची इच्छा मरून गेल्याने लेखकाचा बुद्धिभेद करण्याचा उद्देश (असल्यास) सफल होऊ शकत नाही; उलटपक्षी लेखनातील मुद्द्यांत दम नसला, तरी प्रमाणभाषेशी आणि लेखननियमांशी सुसंगत लेखन केल्यास अनेक वाचक केवळ त्यावर भाळून जाऊन केवळ त्या आधारावर अशा लेखनात मांडलेले मत अथवा (अ)विचार अधिक चिकित्सा न करता ग्राह्य धरण्याची शक्यता खूपच असते, या अर्थी श्री. बाबासाहेब जगताप यांचे म्हणणेही पटण्यासारखे आहे.

थोडक्यात, Presentation counts, आणि शोधल्यास याच्या दुरुपयोगाची अनेक उदाहरणे सापडण्यास अडचण येऊ नये, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

सुंदर प्रतिसाद

श्री बाबासाहेब जगताप यांचा प्रतिसाद नेमका आहे.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात तात्विक दृष्ट्या फारसा फरक नसेल, दोघांचाही गैरफायदा उचलणे चुकीचे आहे. माझ्या माहितीप्रमाणे महात्मा फुले, महर्षी कर्वे आदि लोकांनी त्या प्रवृत्तीविरुद्ध लढा दिला. कोणी कोणावर विश्वास ठेवावा किंवा ठेऊ नये यावर कायदा करता येत नाही. त्याचा गैरफायदा घेऊन लुबाडणूक होत असेल, किंवा त्यामुळे समाजाचे (गैरफायदा घेणारा सोडून इतरांचे) नुकसान होत असेल, तर ते थांबवण्याचा प्रयत्न करता येतो. अंनिसवाल्यांचे प्रयत्न त्याच दिशेने असावेत. मी अद्याप प्रत्यक्षात कोणाला भेटलो नसल्याने ही कदाचित माझी अंधश्रध्दा असेल. पण त्यामुळे मला फायदा किंवा नुकसान यापैकी कांहीच होत नसल्यामुळे याचा छडा लावण्याचा प्रयत्न मी करत नाही.

कोणावर किती विश्वास ठेवावा हे परिस्थितीनुसार ठरते. त्यासाठी एक उदाहरण देत आहे. समजा, मला एक अनोळखी गृहस्थ भेटले, त्यांनी मला जे सांगितले आणि त्यावर माझ्या मनातल्या प्रतिक्रिया कशा आहेत ते पाहू.
१. आज खूप छान हवा आहे. .... आहेच. मलाही ते दिसते आहे. ... पूर्ण विश्वास
२. माझे नांव कुलकर्णी ... असेल, मी कांही त्यांचे ओळखपत्र मागणार नाही. .. थोडा विश्वास
३. मी दादरला राहतो. ... असेल, मी त्याचे रेशनकार्ड मागणार नाही. .. थोडा विश्वास
४. आज मला पैशाची गरज आहे ... असेल. पण हे मला कशाला सांगतो आहे? .. थोडा अविश्वास
५. तुम्ही फार चांगले आहात, लोकांना मदत करता असे ऐकले आहे. .. मस्का कां मारतो आहे? .. थोडा अधिक अविश्वास
६. तुम्ही मला १००० रुपये द्याल का? मी उद्या परत करेन ... संशय येईल.
७. माझा भाऊ कोट्याधीश आहे. .... संशय वाढेल.
८. तो टाटा कंपनीचा मालक आहे. .... खात्रीने तो खोटे बोलत आहे.
९. तो मेहरबान झाला तर तुम्हाला मोठे कंत्राट देईल. ... सपशेल खोटे, शिवाय मी कंत्राटदार नाही, त्यामुळे खरे असले तरी मला त्याचा फायदा नाही.
१०. तुम्ही मला पैसे दिले नाहीत तर तुमचेच नुकसान होईल. ... धमकी देतोस? चालता हो.

एक संवाद

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"प्रत्येक माणसाची कशावर तरी श्रद्धा असतेच.श्रद्धेशिवाय माणूस जगूच शकत नाही."
"हा कुठला सिद्धान्त आहे काय? असल्यास तो चुकीचा आहे असे माझे ठाम मत आहे. बहुसंख्य माणसे श्रद्धाळू असतात हे खरे. पण त्यांनी श्रद्धा सोडून दिली तरी त्यामुळे ते मरणार नाहीत."
"तुमची कशावरच श्रद्धा नाही काय?"
"श्रद्धा शब्दाचा माझ्या समजुती प्रमाणे जो अर्थ आहे त्या अर्थाने माझी कोणत्याही गोष्टीवर श्रद्धा नाही."
" तुमच्या मते श्रद्धा म्हणजे काय?"
"जी गोष्ट प्रत्यक्ष अनुभवता येत नाही, अथवा जी सत्य असण्याची शक्यता तर्कशुद्ध युक्तिवादाने किंवा अधिकृत वैज्ञानिक ज्ञानसंचयाच्या आधारे सिद्ध करता येत नाही , अशी गोष्ट सत्य मानणे म्हणजे श्रद्धा होय."
"म्हणजे तुम्ही श्रद्धेचे अस्तित्वच मानत नाही काय?"
"हे पाहा मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. जगात बहुसंख्य व्यक्ती श्रद्धाळू आहेत.तेव्हा श्रद्धेचे अस्तित्व मान्य करावेच लागेल."
"श्रद्धा आहे हे तुम्हाला मान्य आहे. म्हणजे तुम्ही श्रद्धा मानता.त्याअर्थी तुम्ही श्रद्धाळू आहात. बघा! केले की नाही मी सिद्ध की प्रत्येक माणसाची कशावर तरी श्रद्धा असते ते?"
"(मनातल्या मनात)... आता याला काय म्हणावे? प्रकट काहीच न बोललेले बरे. बाबा रे, तू तालमीत जा.व्यायाम कर.झालेच तर मैदानावर जाऊन फूटबॉल खेळ. पण वादविवादाच्या फंदात पडू नकोस."

श्रद्धाविचार

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
(१)जी गोष्ट खरी असण्याची शक्यता आहे हे कोणत्याही तर्कशुद्ध युक्तिवादाने दाखवता येत नाही अशा गोष्टीवर दृढविश्वास ठेवणे म्हणजे श्रद्धा होय.उदा. "नवस केला तर देव आपल्या मनोकामना पूर्ण करतो.
(२) एखादी गोष्ट खोटी आहे हे पटत असूनही मनावरील पूर्वसंस्कारांमुळे ती खरी मानण्याचा हट्ट म्हणजे श्रद्धा होय.उदा."गणपतीला मोदक आवडतात."
(३)जेव्हढे तुमचे ज्ञान अधिक तेव्हढी तुमची श्रद्धा कमी.उदा. देवीरोगप्रतिबंधक लसीचा शोध.
(४)श्रद्धेमुळे तुमचे कोणतेही प्रश्न सुटत नाहीत. तुम्ही प्रश्न विचारणे सोडता एवढेच.
(५)एखाद्या गोष्टीवर माणसाची श्रद्धा असते त्यामागे कोणताही तर्कसंगत विचार नसतो.त्यामुळे तर्कशुद्ध युक्तिवाद करून त्याची ती श्रद्धा घालवणे अवघड असते.
(६)संगणकात विषाणू शिरला तर ते कार्यप्रणालीला कळत नाही.तसेच माणसाच्या मेंदूत अंधश्रद्धेने प्रवेश केला तरी त्याच्या मेंदूला ते समजत नाही. एवढेच नव्हे तर आपल्या डोक्यात कोणतीही अंधश्रद्धा नाही असेच तो ठासून सांगतो.
(७) प्रश्न:--"श्रद्धा" आणि "अंधश्रद्धा" यांत भेद (फ़रक) कोणता?
उत्तर:--पहिल्या शब्दापेक्षा दुसर्‍या शब्दात अधिक अक्षरे आहेत एव्हढाच.
(हे मी थोड्या व्यापक अर्थाने लिहिले आहे.श्री.प्रकाश घाटपांडे म्हणतात:"अंधश्रद्धा म्हणणे
हे ’गाईचे गोमूत्र’ म्हणण्यासारखे द्विरुक्तिपर आहे.ते एका अर्थी खरेच आहे. पण प्रचलित अर्थांचा विचार केला तर भेद सांगता येईल.)
९)श्रद्धा ही आनुवंशिक रोगासारखी मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होत असते. (कारण पिढान्‌ पिढ्या मागची पिढी पुढच्या पिढीवर श्रद्धांचे संस्कार करत असते.)
(१०)जेव्हा तुम्ही तर्कशुद्ध विचार करायला लागाल तेव्हा तुमची श्रद्धा पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडेल. (मात्र मानगुटीवर बसलेले पूर्व संस्कारांचे भूत आधी उतरले पाहिजे. )

अवांतर

९)श्रद्धा ही आनुवंशिक रोगासारखी मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होत असते. (कारण पिढान्‌ पिढ्या मागची पिढी पुढच्या पिढीवर श्रद्धांचे संस्कार करत असते.)

यावरून "Life is a sexually transmitted disease and the mortality rate is one hundred percent." या उद्धृताची, का कोण जाणे, पण आठवण झाली.

बाकी चालू द्या.

सश्रद्धता

श्रद्धा -अंधश्रद्धा यांचा विचार करताना खरा प्रश्न येतो ते विधायक अथवा विघातक श्रद्धा याचा. ज्या श्रद्धा बाळगल्याने समाजाचे काही नुकसान होत नाही अशा श्रद्धा बाळगल्यास त्यास हरकत नसते. (अर्थात तात्विक पातळीवर वाद-संवाद घडताना त्याला देखील हरकत असते असे मात्र आढळते). धनलालसेने नरबळी, नवसापोटी प्राणीहत्या, धार्मिक श्रद्धेतुन केलेले शोषण या विघातक श्रद्धेपोटी घडलेल्या गोष्टी मात्र समाजाला मागे नेणार्‍या असतात. सश्रद्ध माणुस म्हणेल कि माझी देवावर श्रद्धा आहे.देवाला वाईट गोष्टी आवडत नाही म्हणुन मी ते करणार नाही. अश्रद्ध / नास्तिक म्हणेल वाईट गोष्टी करणे माझ्या विवेकात बसत नाही म्हणून मी ते करणार नाही. दोन्ही लोकांनी केलेली / न केलेली कृती एकच असु शकते.
प्रकाश घाटपांडे

सहमत

सहमत आहे. इथे डॉ. अभय बंग यांचे विचार रोचक वाटतात.

"उपासनेसोबत येणार्‍या कर्मकांड व विधींचा मला तिटकाराच होता. माझ्या दृष्टीने ती विचारहीन अंधश्रद्धा होती. आणि राशनॅलिटी हे माझं जणू सर्वोच्च मूल्य होतं. जी गोष्ट राशनल नाही - ती मला खालच्या पातळीची वाटायची. कसले हे विधी - पानं, फुलं, तांदूळ, दिवा अमकं नि ढमकं!

या माझ्या समजुतीला हळूहळू प्रश्न पडायला लागले आहेत. ही अंधश्रद्धा की प्रतीक पूजा? स्वतःच्या मनातील विचार व भावनांना माणसांनी प्रतीकांच्या रूपात प्रकट करणं मला त्याज्य होतं का? कितीतरी आधुनिक प्रतीकं मी स्वीकारतच होतो की! हायड्रोजनला H हे प्रतीक वापरून मी रसायनशास्त्र शिकलो होतो. 'H' म्हणजे प्रत्यक्ष हायड्रोजन वायू नाही हे माहीत व मान्य असूनही H ला प्रतीक म्हणून वापरत होतो व सर्व रासायनिक समीकरणं प्रतीकांच्या मार्फत बरोबर सुटत होती. शब्द व भाषेचा पूर्ण प्रांत केवळ प्रतीकांचाच नाही का? झेंडा हे राष्ट्राचं प्रतीक मी मान्य करत होतो, मग विश्वाचं प्रतीक म्हणून मूर्ती किंवा फूल स्वीकारणं मला का तर्कदुष्ट वाटत होतं? प्रतीक हे मूळ सत्य नाही, हे भान ठेवून प्रतीकं स्वीकारायला हरकत नव्हती. ते भान सुटलं तर मात्र आंधळी मूर्तीपूजा सुरू होते. गणपतीला दूध पाजणं सुरू होतं, पुतळे उभे करणं व तोडणं सुरू होतं. पण मूर्तीमध्ये विश्वाला बघणं हा भाव साधत असेल तर प्रतीक म्हणून, साधन म्हणून मूर्ती मला स्वीकारार्ह वाटायला लागली. संस्कृतीने निर्माण केलेली ही मोठी भावगम्य युक्ती आहे असं वाटायला लागलं."

-- डॉ. अभय बंग, माझा साक्षात्कारी हृदयरोग.

----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson

उत्तम परिच्छेद.

उत्तम परिच्छेद.
हा परिच्छेद नास्तिक अंधश्रद्धाळू व आस्तिक अंधश्रद्धाळू दोघांसाठी मननीय आहे. इथे दिल्याबद्दल आभार

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

 
^ वर