विचार आणि चमत्कार.

लोक नेहमीच चमत्कारावर विश्वास ठेवतात .का ते कळत नाही. थोर समाजसुधारकांचे विचार एकवेळ लोकांना पटणार नाहीत पण एखाध्या बुवाबापुने काही चमत्कार केला किंवा त्याच्या चमत्काराविषयी कळले की लागलीच काहीही विचार न करता त्या बुवाबापुचे भक्त बनायचे. बिचारे समाजसुधारक त्यांना आपले विचार लोकांना सांगताना नाकीनऊ येतात. काही जण त्यांना वेड्यात काढतात काहींना त्यांचे विचार पटतात पण उशिरा. तो पर्यंत हे समाजसुधारक काळाच्या पडधाआड गेलेले असतात. हल्ली समाजसुधारक दिसतच नाही.चमत्कारीक बुवाबापू मात्र दिसतात. म्हणूनच वाटते बुवा,बापू होणे सोपे पण समाजसुधारक होणे सर्वात कठीण काम. तिथे अ. नि‌. स. वाले अधूनमधून लढताना दिसतात त्यांच म्हणा ऐकतय तरी कोण. लोकांना अंधश्रद्धेबाबत काही समजावयाला गेल्यास लोक त्याला श्रद्धेचे गोंडस रुप देऊन मोकळे होतात. नेहमी विचार करतो की चमत्कारात काय एवढी मोठी शक्ती आहे की जी समाजसुधारकांच्या विचारात नाही . आपण म्हणतो हे शतक विज्ञानाचे आहे उच्च तंत्रज्ञानाचे आहे कशावरून हे सारे आपण म्हणतो निरनिराळे शोध लागले म्हणून का. हल्ली पालख्यांचे पेव फुटले आहेत लोक दुरवर चालत जातात . का जातात ते कळत नाही पण जातात हे नक्की. हल्ली देवदर्शनालाही पायी चालत जाण्याचे स्तोम वाढले आहे. काही महीन्यांपुर्वी अमिताभ बच्चन कुटूंबियांसोबत जाऊन आला. तेव्हा वाटते याला प्रचिती आली वाटते. म्हणजे हे सर्व खोट नाही खर आहे . नंतर कळते भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. इथे ज्याला त्याला काहीही करण्याचा अधिकार आहे. टिका करण्याचा सुद्धा अधिकार आहे.

आपला

कॉ.विकि

लेखनविषय: दुवे:

Comments

सहीच!

इथे ज्याला त्याला काहीही करण्याचा अधिकार आहे.

हा हा हा!

हे सहीच!

आपला
गुंडोपंत

विचार आणि चमत्कार

मराठी अआमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी से |
***********************************
श्री.विकी यांनी अगदी योग्य असा चर्चाविषय प्रस्तुत केला आहे. यावर लौकरच विस्तृत प्रतिसाद लिहिण्याचा मानस आहे. विषय जिव्हाळ्याचा आहे. सदस्यांनी आपापली मते मांडावी अशी विनंती आहे.
....यनावाला.

प्रतिसाद

आपला प्रतिसाद लवकरात लवकर यावा ही ईच्छा!
आपला
कॉ.विकि

खुप मोठा आवाका असे वाटते आहे

विकी,
उत्तम विषय,
पण या लेखा साठी विषयाचा खुप मोठा आवाका घेतला गेला आहे की काय असे वाटते आहे.
...काय एवढी मोठी शक्ती आहे की जी समाजसुधारकांच्या विचारात नाही .

यांत अनेक सुधारक येतील. म्हणजे मला असं म्हणायचे आहे की, संतती नियमन, लैंगिक शिक्षण यावर काम करणार्‍या सुधारकांना समाजाने 'इतर' समाज सुधारकांपेक्षा वेगळे वागवले आहे. आजही वेश्यांसाठी काम करणार्‍यांना वेगळी वागणूक मी पाहिली आहे.
आज तात्यांनी बार बालांवर लेख लिहायला सुद्धा उपक्रमासारख्या विचार प्रवर्तक स्थळावर वाद झाला. त्यामुळे फक्त देव व अंधश्रद्धा असा विषय की श्रद्धा, अंधश्रद्धा व सुधारक असा विषय या चर्चेचा आहे (किवा तत्सम जे काही असेल ते!)मुळ प्रस्तावात जरा विस्ताराने स्पष्ट व्हायला हवा होता असे मला वाटते.

आपला
गुंडोपंत

गुंडोपंत

आपण या विषयात रस घेतल्याबद्दल धन्यवाद.
या सर्व गोष्टींमागे बरीचशी मानसिक कारणे असू शकतात. उदा. भीती(ही काढून टाकण्यासाठी आपण बुवा बापूकडे जातो आणि त्यांच्या अधीन होत जातो.त्यानंतर नवीन भिती निर्माण होते कि या बुवाबापुंस सोडल्यास आपल परत काहीतरी होऊ शकते.)दुबळ्या मनाची माणसे अशी असू शकतात.
समाजसुधारकांविषयी काय बोलायचे ते १९व्या २० व्या शतकात होऊन गेले.त्यांचे विचार आपण शाळा,महाविधालयात शिकलो आणि विसरूनही गेलो(फार मोठी शोकांतिका).
आपला
कॉ.विकि

बुवा-बापूंचा सुळसुळाट म्हणजेच धर्माला आलेली ग्लानी

विषयाची व्याप्ती मोठी आहे, हे मान्य. म्हणून एक उपविषय घेतला आहे. हे बुवा आणि बापू कुठून येतात, आणि कसे काय "महत्पदाला" पोचतात? ह्याचे कारण स्पष्ट आहे. घाबरून अध्यात्म करणा-या लोकांचा देश झाला आहे. विज्ञानयुग वगैरे म्हणतात, पण निखालस विज्ञान असे करणारे किती आहेत? तंत्रज्ञान म्हणजे विज्ञान नव्हे. फोन बनवणा-या कंपनीने आपला "हस्तसंच" चाकूने उघडून एकदोन "फीचर्स" उडवली, दोनतीन नवीन घातली, शिवून टाकला आणि नवीन म्हणून बाजारात विकायला काढला, ह्याला विज्ञान म्हणत नाहीत. पण असल्या फालतू गोष्टीचे वारेमाप कौतुक आपण आजकाल करतो. तिच्यात काहीतरी नवीन शोध आहे, असं समजतो. येनकेनप्रकारेण पैसे करणा-या माणसाचे तर आपण भक्तच बनलो आहोत. पण ते सरळ कबूल करण्याइतके उच्चभ्रू मराठी लोक तरी अजून बेरड झालेले नाहीत. म्हणून लक्ष्मीला सरस्वतीचा मुखवटा चढवतात. पैसेवाल्या माणसाकडे नक्की काहीतरी विद्या आहे अशी आवई उठवतात. मग ती टेक्निकल विद्या असो, मार्केटिंगची असो, आणखी कसली असो. (खरी ती शंभरात एखाद्याला असली तर.) ह्या वृत्तीचा नीचांक म्हणजे आपल्या घरात पैसा आला तो आपणच "गुरू" असल्यामुळे, ही समजूत. ही merit आणि talent ची घाणेरडी भाषा आपण जागतिकीकरणामुळे शिकलो. पण भाषा अगदी वरवर बदलली आहे. "अरे पैसे सगळेच खातात, आम्ही का बावळटपणे मागे रहायचं", हे त्या भाषेचं मूळ स्वरूप अबाधित आहे. म्हणून साले अध्यात्म करतात. आलेला पैसा कधी जाईल ह्या चिंतेने बुवाच्या मागे लागणं हे अध्यात्म नव्हे, हे ह्यांना समजू नये? असे बुडणारे लोक सर्वत्र दिसणे ह्यालाच धर्मग्लानी असे आपल्या पूर्वजांनी म्हटले. ह्या बापू लोकांना तरी दोष का द्यावा? दुस-याच्या जीवावर श्रीमंत होऊन "स्वबळे केले" म्हणून मिरवणा-या समाजाचा तो अपरिहार्य घटक आहे. चौरभटभांडचेटनटविट ह्या प्रभामंडळात त्यांना जागा द्या.

वा

घाबरून अध्यात्म करणा-या लोकांचा देश झाला आहे.
ही merit आणि talent ची घाणेरडी भाषा आपण जागतिकीकरणामुळे शिकलो.
आलेला पैसा कधी जाईल ह्या चिंतेने बुवाच्या मागे लागणं हे अध्यात्म नव्हे, हे ह्यांना समजू नये? असे बुडणारे लोक सर्वत्र दिसणे ह्यालाच धर्मग्लानी असे आपल्या पूर्वजांनी म्हटले.

वाहवा ! फार मस्त !
-- लिखाळ.

जय स्वावलंबन ! कष्ट करा ... कष्ट करा !!

जगन्नाथ

आपल्या उपविषयाशी मी सहमत.
आपला
कॉ.विकि

अंनिस

अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही 'अंनिस' या लघुरुपाने ओळखली जाते. समितीचा दृष्टीकोन व इतर माहिती साठी इथे भेटा.

अंनिस (आ व हि) सदस्य
प्रकाश घाटपांडे

धूर्त आणि लबाड लोक (|)

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
............समाजातील बहुसंख्य माणसे ही गतानुगतिक असतात. म्हणजे ती स्वतःच्या बुद्धीने ,स्वतंत्रपणे विचार करू शकत नाहीत. (तेवढा वेळ आणि शांतताही नसते.तसेच ' संस्कार ' या नावाखाली "असे कर. नाहीतर देवबाप्पा शिक्षा देईल.देवबाप्पा तमुक करील."अशा सांगण्यामुळे विचारशक्तीचे खच्चीकरण लहानपणीच झालेले असते.) इतर चार लोक करतात तसेच आपण करतात.एखादी गोष्ट कुणितरी सांगितली,वृत्तपत्रात आली,टी.व्ही. वर दाखवली की त्यांना ती खरीच वाटते. त्यावर ते विश्वास ठेवतात. स्वतः विचार करण्याची सवयच नसते.
...........थोडक्यात म्हणजे बहुसंख्य माणसे भोळसट असतात. त्यांच्या या मनोवृत्तीचा गैर फायदा घेऊन स्वार्थ साधणारे काही लोक समाजात असतातच.ते धूर्त आणि चाणाक्ष असतात.बोलण्यात पटाईत असतात.त्यांचे व्यक्तिमत्व सुद्धा वरपांगी सोज्ज्वळ दिसते.त्यांना पुराणांतील भाकडकथांचे दाखले पाठ असतात.गीतेतील काही श्लोक मुखोद्गत असतात. संस्कृत वचने माहीत असतात.या सगळ्याच उपयोग ते भोळसट लोकांना फसविण्यासाठी करतात.
...........कांहीजण आपल्याला दैवीशक्ती प्राप्त झाली आहे ;दिव्य दृष्टी लाभली आहे असे भासवून गुरू, बुवा,महाराज,आनंद, बापू अशी नावे घेऊन अनेकांना आपल्या भजनी लावतात. त्यांना लुबाडणे हाच त्यांचा हेतू असतो.
...........काहीजण भविष्य कथनाचा धंदा करतात; काही एकमुखी रुद्राक्षांच्या माळा अवाच्या सवा किमतीला विकतात;काही भौमितिक आकृतीत निरर्थक अक्षरे लिहिलेला तीन रु. किंमतीचा तांब्याचा पत्रा ,"श्रीयंत्र,सर्वमंगल सिद्धयंत्र,इ." नावे देऊन पाचशे रुपयांना खपवतात.काहीजण तुमच्या सर्व समस्या वास्तुशास्त्राधारे दूर करण्यास सदैव सिद्ध असतात.फेंगशुई,स्फटिकाचे शिवलिंग,पिरॅमिड,टॅरोकार्ड,अंकशास्त्र,हस्तसामुद्रिक अशी अनेकानेक साधने घेऊन हे लबाड लोक सदैव तुमच्या सेवेस (म्हणजे तुम्हाला लुबाडण्यास) तत्पर असतात. आपल्या देशात सद्ध्या अंधश्रद्धांचा महापूर आला आहे तो अशा हितसंबंधी लबाडांमुळे. ....(पुढे चालू: ||)

सुक्याबरोबर ओलेही जळते

विकि -

बुवाबाजीस आमचा ठाम विरोध आहे, त्याची टिंगलटवाळी आणि निंदानालस्ती करावी तितकी थोडीच आहे. पण देवदर्शनाला पायी चालत जाण्याच्या प्रथेवर आमचे भन्नाट प्रेम आहे. आयुष्यात कधीतरी एखाद्या वारीचा -- पंढरपूरच असायला पाहिजे असे नाही -- अनुभव घ्यायची जबरदस्त इच्छा खूप वर्षांपासून आहे.

(पदयात्री) एकलव्य

मला वाटतं पंढरपुरच्या वारीबद्द्ल नसावे...

हल्ली अंगारकीच्या आदल्या दिवशी रात्रीपासून उपनगरातून लोक सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पायी चालत जातात त्याविषयी विकि असे म्हणाले असावेत. नाहीतरी हे खुळ दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे असे मलाही प्रकर्षाने ते जाणवले आहे. पण जाऊ दे झालं सोडून देतो(आपला मराठी माणूस आहे असे समजून!! च्या चालीवर)! उगीच कुणाच्या भावना का दुखवा(ह्या हल्ली उठसुठ दुखावल्या जातात असे निरीक्षणाला आले आहे)!त्यातून तंगड्या त्यांच्याच दुखतील!
पण काही म्हणा! हल्ली देवांचेही मार्केटींग करावे लागते आणि त्याचे ठळक उदाहरण म्हणून थेट सिद्धिविनायकाकडे बोट दाखवता येईल. अमिताभ बच्चन त्याच्या दर्शनाला पायी गेला म्हणून मग इतर लोकही त्याची नक्कल करू लागले. म्हणजे इथेही महत्व सिद्धिविनायकापेक्षा अमिताभला आहे.( अमिताभ त्याला मानतो त्याअर्थी तो महान असलाच पाहिजे!!!!!)

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================

सही!

म्हणजे इथेही महत्व सिद्धिविनायकापेक्षा अमिताभला आहे.( अमिताभ त्याला मानतो त्याअर्थी तो महान असलाच पाहिजे!!!!!)


हे सही!

देव हे जगात प्रॉडक्ट म्हणून विकली गेलेली पहिली कल्पना आहे.
मग पुढे त्याचे डयव्हर्सीफिकेशन झाले...;)

आपला
गुंडोपंत

हेच!

देव ह्या उत्पादनाची निर्मिती संस्था ब्राह्मणांनी चांगली सांभाळली आहे,

हे लिहिणारच होतो पण वेळच मिळाला नाही...
अगदी माझ्या मनातले शब्द लिहिलेत.. :)

आणी हे सर्व धर्मांना लागू आहे बरं! ;)

आपला
गुंडोपंत

हे भारीये!

हे ऑर्गनाईझ्ड आणी अनऑर्गनाईझ्ड हे वर्गिकरण लैच भारिये!
युयुत्सुराव, आपल्याला तर पटलं!

यामुळे
ऑर्गनाईझ्ड धर्म अनऑर्गनाईझ्ड धर्मांचा कसा फायदा घेतात
आणी
काही वेळा त्याच मुद्द्यावर हतबल होतात

यावर पण एक् मस्त चर्च होऊ शकेल.

आपला
गुंडोपंत

लोकभ्रम

लोक नेहमीच चमत्कारावर विश्वास ठेवतात .का ते कळत नाही.

या विषयावर 'लोकभ्रम' हे रा.ज.गोखले यांचे १९३५ सालतील दुर्मीळ पुस्तकाबाबत लवकरच परिचय टाकतो आहे.
प्रकाश घाटपांडे

अंधश्रद्धा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
अंधश्रद्धाविरुद्ध लिहावे तेवढे थोडॅच.एखाद्या अवैज्ञानिक गोष्टीवर एकदा श्रद्धा बसली की ती जाणे दुरापास्तच. आपण मानतो ते खोटे आहे हे स्पष्ट दिसत असले तरी माणसाची अंधश्रद्धा ढळत नाही. याचे एक उदाहरण असे:
......गझनीच्या महमुदाने सोमनाथाची मूर्ती फोडली हे सर्वज्ञात आहे.त्याने जेव्हा ते मंदिर पाहिले तेव्हा तिथल्या वैभवाने तो चकित झाला.पुरुषभर उंचीच्या चांदीच्या समया,सोन्याने मढविलेल्या आणि हिरे माणकांनी सजविलेल्या सुंदर मूर्ती पाहून त्याचे डोळे फिरले. "ही सारी दौलत आम्ही लुटणार " असे त्याने तिथेच जाहीर केले.तेव्हा त्याठिकाणी असलेले भक्तगण हसले. ते म्हणाले,"हे जागृत देवस्थान आहे. सोमनाथाचा प्रभाव फार मोठा आहे. तो देवच तुला शासन करील."
......दुसर्‍या दिवशी शस्त्रसज्ज अशा पंचवीस तीस सैनिकांसह गझनी घोड्यावरून आला.ते नंग्या तलवारी परजीत मंदिरात घुसले.गझनीने स्वहस्ते मूर्ती फोडली.सैनिकांनी सर्व संपत्ती लुटली.तिथे असलेले भक्त आणि पुजारी केवळ बघत राहिले. देवाचा चमत्कार दिसेल यावर त्यांचा दृढ विश्वास होता. प्रतिकाराचा प्रश्नच नव्हता. देवाने काहीच प्रभाव दाखवला नाही .पण देवाच्या सामर्थ्याविषयी कोणाच्याही मनात शंका उत्पन्न झाली नाही. केवढी ही अढळ श्रद्धा! धन्य धन्य ते परम भक्त ! त्यांच्या वंशजांची संख्या आज फार मोठी आहे.
.......ही ऐतिहासिक घटना आहे. ती सत्य आहे. या घटनेवर तर्कशुद्ध विचार केला तर काय निष्कर्ष निघतो? सोमनाथाची मूर्ती फोडली तरी भंजकाला काहीच झाले नाही.ज्या शिवमूर्तीची वेदोक्त मंत्रोच्चारांनी प्राणप्रतिष्ठा झाली होती अशा देवाचा काहीच प्रभाव पडला नाही.त्या अर्थी देवाच्या मूर्तीत काही सामर्थ्य नसते.म्हणजे वरळीचा सिद्धिविनायक, ठिकठिकाणचे अष्ट विनायक, पुण्याचा दगडूशेट गणपती, तिरुपतीचा बालाजी या आणि इतर सगळ्या मूर्ती म्हणजे निर्जीव बाहुल्या आहेत. त्या कुणाचेही काही बरे अथवा वाईत करू शकत नाहीत. त्यांच्या दर्शनासाठी रांगा लावणे हास्यास्पद आहे.असाच तर्कसंगत निष्कर्ष निघतो.डोक्यावरील पूर्वसंस्कारांचे ओझे फेकून देऊन स्वच्छ बुद्धीने विचार केला तर हे कोणालाही पटेल. पण अंधश्रद्धा अढळ असतात. त्या माणसाला विचार करू देतच नाहीत. ही देवस्थाने आणि तिथे जाणारे भक्त यांच्या संरक्षणासाठी शासनाला केवढी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवावी लागते.! यावरून निर्जीव देव स्व्तःचे रक्षण करू शकत नाही हे स्पष्ट दिसते. तरी भक्तांना तो सर्वशक्तिमानच वाटतो. केवढी ही दृढ श्रद्धा !
.......बहुसंख्य लोकांना बाहुल्यांचे प्रचंड आकर्षण आहे.प्रत्येक धार्मिक उत्सव म्हणजे "हा खेळ बाहुल्यांचा" असतो.मग तो गणपती उत्सव असो ,नवरात्र असो,दूर्गापूजा असो की जगन्नाथाची रथयात्रा असो. हा खेळ कधी संपणारा नव्हे. कारण त्याला अंधश्रद्धांचा बळकट पाया आहे.
.........यनावाला.

अंनिस

यनावालांची मांडणी आम्ही अंनिस च्या बौद्धिकात नेहमी करतो. पण मूर्ती पूजकांकडे एक् नेहमीचे उदाहरण् असते, एक् बादशाह् म्हणा वा राजा म्हणा मूर्तीपूजेचा विरोधक होता. मूर्तॉ म्हणजे नुसता दगड. फार तर दगडाचे चित्र. त्याच्याकडे एक साधू आला. मूर्तीपुजावर बौद्धीक झालेवर त्याने एक राजाची तसबीर / चित्र मागवली. ती हातात घेउन त्यावर तो थुंकला. सगळे जण चकित झाले.राजाला राग आला. तो साधु म्हणाला मी तर एका कागदाच्या तुकड्यावर थुंकलो आहे, राजावर थोडाच थुंकलो.

प्रकाश घाटपांडे

ही विवेकानंदाची गोष्ट

ही विवेकानंदांच्या बाबतीतील सत्यघटना आहे. फक्त ते यात थुंकले नाहीत. जेंव्हा अल्वार राज्याच्या महाराजाने त्यांना मुर्तीमधे खरेच देव असतो का अशी शंका घेतली तेंव्हा त्यांनी बाजुला बसलेल्या दिवाणाला त्या राजाचे समोर ठेवलेले तैलचित्र आणायला सांगीतले. त्याने आणल्यावर ते (विवेकानंद) म्हणाले की आता त्यावर थूंक. तो (आणि राजा) बावचळला. तेंव्हा ते म्हणाले की हा तरी खरा राजा कुठे आहे? जसे आपण या प्रतिमेमधे राजाचे रूप अनुभवून त्याला मान देतो त्याच प्रमाणे देवाचे आहे...

विवेकानंदांना एका पाश्चात्य पत्रकाराने एक पुस्तकाचे शिर्षक दाखवून मत विचारले. शिर्षक होते "God is nowhere" . त्यावर त्यांनी एक मधे रेघ ओढली आणि म्हणले आता काय दिसते? "God is now here". अर्थात हेच विवेकानंद आपल्याला ओरडून सांगत होते की आत्ताच्या हिंदू पिढीचा देव हा "फूटबॉल"च्या मैदानात आहे (बंगाल्यांनी त्याचा शब्दशः अर्थ घेतला असावा! ह.घ्या.) अर्थात हिंदू समाजाने तामसीकता काढून राजसीक होण्याची गरज आहे असे त्यांचे म्हणणे होते.

असे म्हणतात की रामकृष्ण परमहंसांनी निर्वाणाआधी विवेकानंदांना ज्ञान दिल्यावर ते म्हणाले की मी जरी तुला ज्ञान दिले असले तरी त्याच्या आणि तुझ्या मनाच्या मधे एक "मायेचा पडदा" पण ठेवला आहे. कारण जर तो नसला, तर सर्व मिथ्येपण तुला कळेल आणि तुझ्या हातून इप्सित कार्य घडणार नाही. ही च कथा निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना सांगीतली म्हणून पण सांगीतली जाते. तात्पर्यः हिंदू धर्मातील मुर्ती पूजा, देव देवतांना जे महत्व आहे ते एक साधना करण्याचे साधन म्हणून आहे. जेव्हढे सध्याच्या संगणकीय जगात प्रत्येक "आयकॉन" चे असते तितकेच. आपण एखादा "आयकॉन" क्लि़क करतो, म्हणजे तो आयकॉन काहीच करत नाही पण त्यामागे त्या संदर्भात लिहीलेला "प्रोग्रॅम" काम करतो. (म्हणून रामदासांनी रामाचे नाव घेतले पण हनुमंताची देवळे काढली - कारण उद्देश बलोपासना हा होता). ज्याला त्याची (आयकॉनची) गरज नसते तो/ती कमांड लाईनवर पण काम करू शकतात. दुर्दैवाने मधल्याकाळात ते तत्वज्ञान निरनिराळ्या कारणांनी लुप्त झाले आणि अंधश्रद्धा बोकाळली. का झाले हे अलीप्तपणे लिहीता येईल पण तो एक वेगळाच चर्चेचा विषय आहे, म्हणून इथेच थांबवतो.

सिल्व्हा माइंड कंट्रोल

या पुस्तकात वाचल्याचे स्मरते की मूर्तीत किंवा या देवस्थानांत काही जागृतपण नसते. पण वर्षानुवर्षे भक्तांच्या ज्या भक्तीभावाने केलेल्या प्रार्थना असतात त्यामुळे या वास्तूंत लहरी निर्माण झालेल्या असतात. आणि त्यामुळे फायदा होतो.
ज्या घरात भांडणे होत असतील, शिव्यागाळ होत असेल त्या घरात आपल्याला अस्वस्थ वाटतेच ना? मग ज्या मंदिरात प्रसन्न वातावरण असेल, उदबत्त्यांचा सुगंध दरवळत असेल, भक्तांच्या सुंदर चाली लावलेल्या चांगली शब्दरचना असलेल्या प्रार्थना सारख्या कानावर पडत असतील त्या देवळात देव जिवंत/जागृत झाल्यासारखे का वाटू नये?
माझे मत असे की ही जागृत देवस्थाने प्लॅसिबो असतात. माणसाच्या मनावर ती जागृत आहेत, तिथे काहीतरी पवित्र मंत्रोच्चारण चालू आहे याचा अनुकूल परीणाम होतो व त्याच्या हातून त्याचा उत्कर्ष होईल असे कार्य भविष्यकाळात घडते कारण मन शांत होते.
बाकी मी अंधश्रद्ध नाही, पण मानसिक आधार म्हणून मला देवावर श्रद्धा ठेवायची आहे. देव मला 'खाटल्यावरी' देणार नाही, पण 'आरामात खाटल्यावर बसून भविष्यात खाता येईल' इतके मिळवण्याची बुद्धी देईल.

प्लसीबो

ज्या घरात भांडणे होत असतील, शिव्यागाळ होत असेल त्या घरात आपल्याला अस्वस्थ वाटतेच ना

हो! शक्यता आहे.

ज्याप्रमाणे सुवर्णाभूषणांनी मढलेली देवाची मूर्ती, उदबत्त्या, धूप, फुले इ. इ. मुळे आपल्याला उल्हासित वाटते. (मला तरी वाटते बुवा.) चित्तवृत्ती आनंदीत होतात. ते चर्चमध्ये जाऊन कधीही वाटत नाही. विशेषतः येशूची क्रूसावर चढवलेली प्रतिमा, कोंदट वातावरण, शांतता, आजूबाजूला असणारे स्मशान यांनी एकप्रकारची भीती वाटते. परंतु एखाद्या ख्रिश्चनाला ते तसेच वाटत असावे का? हे मात्र कळत नाही. (त्यांना तसे वाटत नसावे असे वाटते.)

मला वाटते ही लहानपणापासून झालेली आपल्या मनाची जडणघडण असावी. आपलं ते आपल्याला प्रिय असते म्हणूनच चांगल्याचुंगल्या रेस्टॉरंट्सची पंचपक्वान्ने खाल्ली तरी काही दिवसांनी घरची वातड पोळीच बरी लागते असे असावे.

मला तरी असे वाटते की अश्रद्ध(?) असण्यापेक्षा कशावरतरी श्रद्धा ठेवून काम करणे त्या मनुष्याची कार्यक्षमता, कार्यशीलता वाढवते. (देवावर नाही तर आईवडिलांवर श्रद्धाही असतेच.) त्यामुळे त्यात अंधश्रद्ध असे काही नाही.

अनुचे म्हणणे बरेचसे पटण्यासारखेच आहे.

श्रद्धा?

प्रत्येक श्रध्दा ही अंधच आस्ते. अंधश्रद्धा म्हणणे म्हणजे पिवळा पितांबर म्हट्ल्यासरखे आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हनजे श्रद्धा. श्रद्धा ही व्यक्तिसापेक्ष समाजसापेक्ष, काळ सापेक्ष, स्थळसापेक्ष असते.विधायक की विघातक हा खरा प्रश्न आहे? मनुष्य हा काही विवेकवादाचे प्रोग्रामिन्ग केलेला जैवरासायनिक यन्त्रमानव नव्हे. श्रद्धा ही माणसाला अत्मिक बळ देते. अंधश्रद्धा निर्मूलनावर आमची श्रद्धा आहे असे देखिल म्हणता येईल. सती जाणे हे त्या काळी धर्मश्रद्धाच होती. एका स्त्रीने पूजेत लॊर्ड बेंटीक्टचा शाळीग्राम ठेवला होता असे वाचल्याचे स्मरते.

प्रकाश घाटपांडे

एका जागृत देवस्थाचा जन्म

"एका जागृत देवस्थाचा जन्म" ही व्यंकटेश माडगुळकरांची कथा वाचली अथवा ऐकली आहेत का? त्यांच्या तोंडून (अर्थात टेप केलेली) ऐकण्यात मजा आहे. त्यांनी एकदा दूरदर्शनवर आविर्भाव करत सांगीतलेली ती गोष्ट पण आठवते.

थोडक्यात (जशी आठवते तशी)ः एका खेडेगावातली चार उनाड कार्टी एका माकडाला कारण नसताना दगड मारतात, ते बिचारे माकड दगडांचा मार खाऊन मरतं. त्यानंतर कुणाला तरी पश्चातबुद्धी होते की मारूती पण वानरच होता. मग ते घाबरून गावा बाहेर त्याला पुरतात आणि फुले वगैरे वाहतात. जाणारा-येणारा त्याकडे बघायला लागतो आनी नमस्कार करायला लागतो. मग कोणी तरी छोटे देऊळ बाजूनी बांधते व दरोज पुजा होवू लागते मग गावातल्या लोकांना वाटू लागते की या हनुमान मंदीरात पूजा केली की इच्छा पूर्ण होतात. बघता बघता ती बातमी पंचक्रोशीत पसरते आणि एका जागृत देवस्थानाचा जन्म होतो!
»

देवाची मूर्ती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
कोणतीही बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्ती कुठल्याही मूर्तीवर अथवा चित्रावर कधीही थुंकणार नाही. असला गलिच्छपणा तो साधूच करू जाणे. मात्र ती मूर्ती म्हणजे एक निर्जीव बाहुली आहे,तिच्यात तिळमात्र सामर्थ्य नाही ,असेच तो मानील. थुंकण्याविषयीचा युक्तिवाद केला आहे तो अगदीच भोंगळ आहे. ज्या राजाचे ते चित्र आहे तो राजा अस्तित्वात होता. देवमूर्तीविषयी तसे नाही.ते असो .कोण मोठी व्यक्ती काय म्हणाली, ग्रंथात काय लिहिले आहे याची उदाहरणे देणे म्हणजे शब्दप्रामाण्य मानणे होय.तर्कशास्त्रात ते मान्य नाही. जे बुद्धीला पटेल तेच खरे. सोरटी सोमनाथाच्या मूर्तीचे भंजन ही ऐतिहासिक सत्यघटना आहे.त्यावरून जे तर्कसंगत निष्कर्ष निघतात त्याचा प्रतिवाद कोण करू शकेल काय? बालपणापासून झालेले संस्कार एवढे तीव्र परिणामी असतात की गणपतीची मूर्ती म्हणजे मातीचीं निर्जीव बाहुली हे मानण्यास बहुतेक जण धजावत नाहीत; अगदी पटत असून सुद्धा. मग काहीतरी थुंकण्याच्या कथा सांगायच्या आणि 'जितं मया 'म्हणायचे !
..........यनावाला.
.......यनावाला.

म्हातारी मेल्याचे दु:ख नाही

देवावर किंवा कशावर तरी श्रद्धा असणे हे प्लॅसिबो इफेक्ट् सारखे काम करते हे मान्य. पण ते ज्यांना त्याची जाणीव आहे अशांनी तरी त्याला उत्तेजन देऊ नये.

पण पुढे जाऊन आमच्या घराचे रक्षणकर्ते अमूक बाबा आहेत, मग त्यांचे जे काही लाड करावे लागतील ते-ते सर्व आम्ही करू कारण आमची श्रद्धा आहे. मग त्या बाबांचा कंपू तयार होणार. मग तुम्ही तिथे त्यांचे परम भक्त् होणार. मग तुमच्या अतिरंजित कथा बाबांच्या चरित्रग्रंथात येणार. त्यावर तुमच्यासारखेच लोक विश्वास ठेवणार इ.इ......

हे जे स्तोम माजवले जाते -ते नको आहे.
आपणच जर श्रद्धा ठेवल्याने माणसाचे भले होते असे मान्य केले तर मग काळ सोकावणारच.

याहीपुढे जाऊन

पुढे जाऊन आमच्या घराचे रक्षणकर्ते अमूक बाबा आहेत, मग त्यांचे जे काही लाड करावे लागतील ते-ते सर्व आम्ही करू कारण आमची श्रद्धा आहे. मग त्या बाबांचा कंपू तयार होणार. मग तुम्ही तिथे त्यांचे परम भक्त् होणार. मग तुमच्या अतिरंजित कथा बाबांच्या चरित्रग्रंथात येणार.

हे तर खूपच पुढचे झाले. मला वाटते लहान गोष्टींतून माणसाने आपली सोडवणूक केली पाहिजे. उदा.

१. मंगळवार म्हणजे गणपतीला गेलेच पाहिजे, जावे त्यात गैर नाही, सातत्य माणसाला शिस्तबद्ध बनवते. परंतु अपरिहार्य कारणामुळे ते शक्य नसल्यास स्वतःला अपराधी मानू नये. आपण चुकलो हे वाटणे सोडावे.

२. अमुक देव नवसाला पावतो आणि माझ्या गल्लीतला शेंदूर फासलेला देव पावत नाही अशी श्रद्धा सोडणे. उदा. सिद्धीविनायकाच्या रांगेत उभे असलेले भक्तगण.

३. काही गोष्टी जसे मांसाहार केला आता देवादरबारी जाण्याने पाप लागेल इ. इ. गोष्टींपासून सोडवणूक करणे.

इ. इ. मला वाटते अंधश्रद्धा यात असते.

श्रद्धा ही असतेच असे वाटते मान्य करा किंवा नका करू आणि काळही इथून नाहीतर तिथून सोकावतच राहतो, हे ही मान्य करावेच लागते.

अत्यंत सहमत

मी देवळात कधीच जात नाही. मत्स्याहार आणि मांसाहार मला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपल्या या मतांशी मी अत्यंत (सहर्ष) सहमत आहे. ;);)

हे आवडले

३. काही गोष्टी जसे मांसाहार केला आता देवादरबारी जाण्याने पाप लागेल इ. इ. गोष्टींपासून सोडवणूक करणे.

जर मांसाहार वाईट असता तर देवाने मांसाची निर्मिती केली नसती ना... :)

प्रथा अशी न्यारी

प्रथा अशी न्यारी या उत्तम कांबळे यांच्या पुस्तकात काळूबाई, मरीआई,बिरोबा, मांगोबा अशा नामावलीतील काही देवांना (म्हणजे देवात पण वर्णश्रेष्ठता) जत्रेत नैवेद्याला दारुची चतकोर बाटली (भरलेली) व सामीष लागते. दुसरा नैवेद्य चालत नाही .अशा प्रथांची जंत्रीच आहे. उत्तम कांबळे सकाळच्या नाशिक आवृत्तीचे संपादक आहेत. तळागाळातून वरती आलेला माणूस.

प्रकाश घाटपांडे

गौरीला

गणपती गौरीच्या काळात गौरीलाही कोळंबीचा नैवेद्य दाखवला जातो काही समाजांत.

मुख्य म्हणजे राम-कृष्ण हे मृगया करणारे क्षत्रिय देव, त्यांना मांसाहार वर्ज्य असण्याचे कारण काय?

असो. अशा चर्चा मनोगतावर बक्कळ झाल्या आहेत. सारांश - माणसाने आपल्याला वाटते ते करावे. अमुक केल्याने तमुक होईल असे सांगून इतरांचे नुकसान करू नये, त्यांना फुकट भीती घालू नये इतकेच.

आभार

प्रतिसाद लिहील्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपुर्वक आभार
आपला
कॉ.विकि

 
^ वर