विवेकवाद

आस्तिक
जगातील बहुसंख्य लोकांची ईश्वरावर श्रद्धा असते.जगनिर्माता आणि जगन्नियंता असा कोणी आहे . त्याच्या आज्ञेने सर्व काही घडते असे ते मानतात.
.......देवात्‌ विश्वस्य जननं ,देवो विश्वस्य पालक:।
........विश्वस्य विलयो देवे, देवो विश्वस्य कारणम्‌ ॥

यद्भयात्‌ वहति पवन:, सूर्यस्तपति यद्भयात्‌
भीतो यस्मात्‍ दहत्यग्नि: स देव: शरणं मम ॥

अशी त्यांची धारणा असते.आत्मा, मरणोत्तर जीवन,स्वर्ग, नरक,मोक्ष यांवर त्यांचा विश्वास असतो.त्यांना आस्तिक,ईशरवादी, धार्मिक असे म्हणतात.
नास्तिक
या उलट ईश्वराचे असित्व न मानणारे काही असतात. त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे.(सर्वाधिक कॅनडात ४१% असे वाचले.) " सर्व विश्व निसर्ग नियमांनी बद्ध आहे .माणसाला हे नियम शोधता येतात.वैज्ञानिक हे सर्वात विश्वसनीय ज्ञान होय."अशी त्यांची धारणा असते.ते धार्मिक नसतात.त्यांना नास्तिक, निरीश्वरवादी,बुद्धिप्रामाण्यवादी, विवेकवादी असे म्हणतात.

विवेकवादी विचारसरणी
**माणसाला उपजत बुद्धी असते.कुतूहल असते.निरीक्षणाची आवड असते.त्यातून अनुभव मिळतो.त्यावर तर्क बुद्धीने विचार करून ज्ञान मिळते.ते ज्ञानेंद्रियांद्वारेच मिळूशकते.अतीन्द्रियज्ञान,दृष्टान्त, साक्षात्कार, या गोष्टी विवेकवादात नाहीत.
** आपले डोळे आणि मन उघडे ठेवावे.श्रद्धा आणि भावना यांत वाहून जाऊं नये.निरीक्षण करावे.तर्क बुद्धीने विचार करावा. मगच सत्यासत्य ठरवावे.वैज्ञानिकांची मते ग्राह्य मानावी.
** विवेकवाद वस्तुनिष्ठ आहे. विवेवादी तत्त्वे कोणालाही तपासता येतात.प्रत्येक विधानामागे पुरेसा तर्क असतो.म्हणून ही तर्क शुद्ध विचारसरणी आहे.
**विवेकवादी विचार पूर्णतया इहलौकिक असतात.विवेकवाद परलोक मानत नाही.मरणापूर्वी जे घडते तेच अर्थपूर्ण असू शकते. मरणोत्तर जीवन नसतेच.असा हा अनुभवाधारित विचार आहे.
**धर्म ,राष्ट्र,वंश,जात,भेदांवर माणसा माणसात भिंती उभ्या करणार्‍या भावूक कोत्या निष्ठा विवेकवादाला मान्य नाहीत.
**....."शूर अम्ही सरदार अम्हांला काय कुणाची भीती.
..........देव, देश अन धर्मापायी शीर घेतलं हाती."

असले मारण्या मरण्याचे उदात्तीकरण विवेकवादी व्यक्तीला प्रभावित करू शकत नाही.त्या पेक्षा आपण एकमेकांशी जुळवून घेऊन,समाजत सुधारण घडवून,गुण्यागोविंदाने राहायला हवे.
**अंधश्रद्धा,पूर्वग्रह,हेकट मनोवृत्ती,अनाठायीं आत्मगौरव या प्रवृत्ती विवेकवादात बसत नाहीत.
**......"अहा कटकटा हे ओखटे। इये मृत्युलोकीचे उफराटे।
............येथ अर्जुना जरी अवचटे। जन्मलासी तू॥
...........तरी झडझडोनी वाईला नीघ।..
..................."(ज्ञाने. अ.९,ओ.५१५)
असली पारमार्थिक पलायनवादी वृत्ती विवेकवादाला मान्य नाही.
आपणा सर्वांना या मृत्युलोकातच राहायचे आहे.इथले जीवन अधिक सुखी, आनंदी आणि उन्नत करायचे आहे.
** विवेकवादी जीवन म्हणजे प्रेमभावाने उद्युक्त झालेले आणि बुद्धीचे मार्गदर्शन लाभलेले सुजाण,सुसंस्कृत जीवन.

लेखनविषय: दुवे:

Comments

सर्वाधिक नास्तिक

या दुव्याप्रमाणे स्वीडन, व्हिएतनाम वगैरे देशांमध्ये क्यानडापेक्षाही जास्त नास्तिक आहेत असे दिसते. http://www.adherents.com/largecom/com_atheist.html

लेखातील विचारांशी सहमत आहे मात्र तरी माझे स्वतःचे विचार अथेइस्ट ऐवजी अग्नॉस्टिक स्वरुपाचे आहेत. देव आहे की नाही अशी शंका मनात येत राहते. ठामपणे कोणतीही भूमिका घेणे शक्य होत नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

बरे झाले..

मी देखील तुमच्या सारखाच आहे आजानुकर्ण. एकदम अग्नॉस्टिक! कोणतीही ठाम भूमिका घेणे शक्य होत नाही. आणि याची मला बरीच खंत वाटत असे. मात्र आता थोडे बरे वाटत आहे. :-)

-सौरभदा

====================

Tell the truth and then run.
-Proverb

थोडासा कमी श्रद्धाळू

या "विवेकवाद" नावाच्या विचारसरणीबाबतचा व्याख्यात्मक लेख आवडला.

या व्याख्येआधी लेखकाचे अभ्यासपूर्ण लेखन उपक्रम संस्थळावर वाचलेले आहे. संतसाहित्याबद्दल व्यासंग आणि प्रेम हे विवेकवादाच्या व्याख्येशी विसंगत नाही हे स्पष्ट आहे. समग्र विचार करता, वरची व्याख्या एकांगी, पूर्वीच्या विचारवंतांची हेटाळणी करणारी वाटत नाही. (चर्चिलची खालील उक्ती लागू नाही, असे माझे मत आहे.)

मी स्वतःला थोडा या लेखातील व्याख्येपेक्षा कमी श्रद्धाळू मानतो. (म्हणजे वैज्ञानिकांचे म्हणणे मला पटल्याशिवाय ग्राह्य धरत नाही, वगैरे.)

म्हणजे

मी स्वतःला थोडा या लेखातील व्याख्येपेक्षा कमी श्रद्धाळू मानतो. (म्हणजे वैज्ञानिकांचे म्हणणे मला पटल्याशिवाय ग्राह्य धरत नाही, वगैरे.)

याचा अर्थ "कमी श्रद्धाळू" आहात असा होतो का "अंध श्रद्धाळू" नाही आहात असा होतो? जर कमी श्रद्धाळू असाल तर कधी कधी वैज्ञानिकांवर त्यांचे म्हणणे पटले नाही तरी विश्वास ठेवाल :-)

समग्र विचार करता, वरची व्याख्या एकांगी, पूर्वीच्या विचारवंतांची हेटाळणी करणारी वाटत नाही. (चर्चिलची खालील उक्ती लागू नाही, असे माझे मत आहे.)

एकांगी वाटायचे आणि चर्चिलचे उदाहरण देण्याचे कारण इतकेच की "काही विवेकवादी सुवचने" या त्यांच्या लेखात जे काही म्हणले आहे ते आत्तापरत विवेकवाद म्हणून मूळ लेखात म्हणले आहे: (कंसातील वाक्ये माझी आहेत)

  • मला सर्वसामान्य समज ( कॉमनसेन्स ) आहे म्हणून माझा देवावर विश्वास नाही. बसूच शकत नाही. (ह्याचा उलट अर्थ असा की - एखाद्याच्या देवावर विश्वास आहे, म्हणजे त्याला कॉमनसेन्स नाही, तो विवेकवादी नाही)
  • अज्ञान नसेल तर देव नाहीच. (म्हणजे देव मानणारा अज्ञानी आहे - अर्थात तो विवेकनहीन आहे)
  • ईश्वर अनादि अनन्त आहे कारण माणसाचा मूर्खपणा अमर्याद आहे. (म्हणजे फक्त ईश्वर न मानणारा त्या संदर्भात शहाणा / विवेकवादी असतो)
  • (त्यांच्याच एका प्रतिसादातील वाक्यः) ... यासाठी लहानपणापासून झालेल्या देवाविषयीच्या संस्कारांचे ओझे डोक्यावरून उतरवून ठेवून शुद्धबुद्धीने विचार करावा. (म्हणजे देवाविषयी संस्कार ठेवणे हे शुद्धबुद्धीचे लक्षण नाही)

अजून पण खणत बसलो तर अजूनपण खजीना मिळेल. हे सर्व, मी काय म्हणले ते तुम्हाला मान्य व्हायलाच हवे म्हणून दाखवत नाही. ह्यात श्री. यनावालांसंदर्भात व्यक्तिगत टिका अथवा अनादर करायचा पण उद्देश नाही. पण माझ्या परीने मी देखील बुद्धीवादी आहे त्यामुळे जे पटत नाही ते का पटत नाही ते स्पष्ट करतो. जर त्यातून एखादी माझी चूक असेल तर ती मान्य करायला पण तयारी आहे. पण जे पटत नाही ते सांगाणे पण अयोग्य समजत नाही. अर्थात तुमचे तुम्ही योग्य वाटेल तो विचार करा. तसा विचार माझ्या विरुद्ध असला तरी मी तुम्हाला अविवेकी म्हणणार नाही आणि स्वतःला पण अविवेकी समजणार नाही :-)

द्विमान पद्धती मानणारे-न-मानणारे १० प्रकारचे लोक :-)

याचा अर्थ "कमी श्रद्धाळू" आहात असा होतो का "अंध श्रद्धाळू" नाही आहात असा होतो? जर कमी श्रद्धाळू असाल तर कधी कधी वैज्ञानिकांवर त्यांचे म्हणणे पटले नाही तरी विश्वास ठेवाल :-)

पटलेले आणि न-पटलेले विचार (ही द्विमान-१० टोके) यांच्यावेगळा तिसरा (द्विमान-११वा) पर्यायही असतो - जे तपासण्यासाठी मला वेळ मिळालेला नाही असे विचार. अशा ठिकाणी जर वेळेची कमतरता असेल, तर गरज असल्यास ते निष्कर्ष वापरतो. न तपासलेले विचारांच्या बाबतीत ज्यांचा कामचलाऊ उपयोग आता करायचा आहे आणि ज्यांचा आता कुठलाच उपयोग नाही असे द्विमान-१० प्रकार पडतात. ज्यांचा आता कामचलाऊ उपयोग करायचा नाही, त्यांच्या बाबत मी पूर्णपणे उदासीन आहे. उदाहरणार्थ : येशूने पाण्यास आशीर्वाद देऊन त्याचे द्राक्षासव बनवले का? त्यामुळे माझे वर्तन मुळीच बदलणार नसेल तर "हे पटले किंवा नाही" यांच्यापैकी मी कुठलाही पर्याय निवडणार नाही. (तेवढ्यावरून येशूची पूजा वगैरे करायची असेल, वेळ आणि पैसा खर्च होणार असेल तर बात वेगळी आहे. तशी वेळ आलीच तर अभ्यास करून कुठलातरी पर्याय निवडेन. सर्वधर्मसमभावासाठी ख्रिस्ती नसलेले उदाहरण : चाललेल्या भिंतीपुढे दक्षिणा टाकायची वेळ तर पर्याय निवडेन, तोवर नाही.)

पण कधीकधी न तपासलेल्या विचारांबद्दल लगेच काय करण्याची वेळ येते.
उदाहरणार्थ : आजवर "भूखंडांची हालचाल" [कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट] याविषयी मूळ विदा मी कधीच तपासला नाही. बहुतेक पुढेही वेळ मिळणार नाही. त्याबाबतीत वैज्ञानिक सांगतात की झालेच तर कॅलिफोर्नियात भूकंप होतात/होतील, मेरीलँडमध्ये फारसे होत नाहीत. गणित न तपासताही कॅलिफोर्नियात जर घर घेतले, तर भूकंप विमा काढेन, मेरिलँडमध्ये काढणार नाही. तत्त्वतः मात्र तो विदा तपासेपर्यंत "तो निष्कर्ष पटला आहे" असे मानणार नाही, आणि उलट विदा मिळाल्यास तो निष्कर्ष अमान्य करेन. मात्र या क्षणी माझे कार्य बघून "मला निष्कर्ष पटला" असेच भासेल.

किंवा दुसरे उदाहरण रासायनिक अणुसिद्धांताचे. त्याचे गणित थोडेफार तपासले आहे. त्यामुळे "अणू आहेत" हे अनुमान मला ठीक वाटते. तरी प्रत्यक्ष अनुभवांशी (नवीन प्रयोगांशी) तफावत आली तर ते अनुमान टाकून देईन. तोवर मात्र "अणू आहेत" असे गृहीत धरून व्यवहार करीन.

अशा गोष्टी मानल्यामुळे मी केवळ "व्याख्येपेक्षा कमी श्रद्धाळू" (तरी त्या मर्यादित कामचलाऊ प्रमाणात श्रद्धाळू) असे म्हटले आहे.

प्रत्यक्ष अनुभव, अनुमान, आणि उपमान उपलब्ध नसल्यास कामचलाऊ बाबतीत "शब्द" वापरण्यास हरकत नसावी. "कोणाचा शब्द" वगैरे निकष मी अन्यत्र सांगितलेले आहेत. प्रत्यक्ष, अनुमान, किंवा अनुमान उपलब्ध असल्यास शब्द टाकून ती सबळ प्रमाणे वापरतो. त्यामुळे माझी मर्यादित श्रद्धा तात्त्विक नाही, कामचालाऊच आहे (तरी मुळीच नाही असे नाही.) माझी काही दृढ श्रद्धाही आहे, ती काय ते अन्यत्र सांगितले आहे.

एकदम मान्य!

संपूर्ण प्रतिसाद एकदम मान्य!

खुलाशा बद्दल धन्यवाद (आणि त्यामुळे मला कमीत कमी वेळात प्रतिसाद टंकता आल्याबद्दल ही! :))

तरी देखील

सर्व प्रथम या प्रस्तावात असे गृतीत धरले आहे की सर्व निरीश्वरवादी विवेकी असतात. आता हे विधान विवेकी समजावे का अविवेकी हा पण चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. माझ्यामते हे विधान अविवेकी आहे कारण त्यात एकेरी आणि टोकाची (हेकट मनोवृत्ती?) तसेच मला वाटते तेच खरे असे म्हणणारी विचारसरणी आहे.

जगात जे काही चांगले घडले ते केवळ नास्तिकांमुळे घडले असे म्हणायला वाव नाही - सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे कम्यूनिझम - जो निरीश्वरवादावरच उभा राहीला. अधुनीक जगातील अनेक दुर्दैवी गोष्टींना तो कारणीभूत ठरला.

जगात सर्वत्रच कदाचीत बहुसंख्येनेपण म्हणता येतील असे आस्तिकच असतील की ज्यांनी इश्वरावरील वैयक्तिक श्रद्धा ढळू न देता, धर्म मानत अनेक सामाजीक, वैज्ञानिक, आर्थिक आणि राजकीय कामे केली. अगदी स्थलकालसंबंधात विविध बदल घडवून आणले. जग अधुनीकपण केले.

त्यात अगदी भागवत धर्म म्हणून पुढे आणणारे पाया रचणारे ज्ञानेश्वर आणि पुढचा समाजातील विविध स्तरातील संतसंप्रदाय पण येतो आणि कळस करणारे तुकोबा पण असतात. तसेच लिओनार्डो दा विन्ची येतो, आईनस्टाईन येतो आणि अजून खूपजण येतात. या संर्वानी अस्तिकपणाला कमी लेखले नाही आणि तरी देखील जग बदलून दाखवले.

शिवाजी तर काय, "हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा" असेच म्हणाले. पण असे दिसतयं तुमच्या विवेकवादाप्रमाणे त्याने औरंगझेब, अफझलखान, शाहीस्तेखान यांना विवेक दाखवून त्याने, "आपण एकमेकांशी जुळवून घेऊन,समाजत सुधारण घडवून,गुण्यागोविंदाने राहायला हवे" असेच त्यांना सांगायला हवे. कदाचीत औरंगजेबाने / अफझलखानाने त्याला "निशाना करण्याऐवजी" "निशाने मोघल" वगैरे किताब तयार करून दिला असता आणि सर्व गुण्याविवेकाने राहीले असते (गोविंदा हा शब्द देवधर्माशी संबंधीत असल्याने तो बदलला!) .

जी गीता ही रणातून पळ काढणार्‍या अर्जूनाला लढ म्हणत स्वतःला कुलसंहात केल्याबद्दल शिव्याशाप पण बसू शकतात ही कल्पना असून देखील सांगीतली, त्या गीतेच्या टिकेतील कुठल्यातरी चार ओळी संदर्भहीन देयच्या आणि त्याला पलायनवाद म्हणायचे...

पण सांगून काय उपयोग?

म्हणून म्हणतो, छान आहे. चालूंदेत!

पण पुढे असेही म्हणावेसे वाटते, "देवा असले आंधळे विवेकी करण्यापेक्षा मला डोळस अविवेकी कर... त्याने माझ्या हातून उगाच कुणाच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा काहीतरी चांगले काम, किमान तुझ्या पोटच्या प्रेमानेतरी होईल..."

शिवराय/पेशवे

शिवाजीराजे हे धर्माने हिंदू असले तरी राजकारणाच्या दृष्टीने त्यांची वृत्ती सर्वस्वी मुसलमानाची होती असे वाक्य कुरुंदकर किंवा शेजवलकरांच्या पुस्तकात वाचले आहे. या वाक्याचा अर्थ असा की शिवरायांच्या पूर्वीचे हिंदू राजे (साधारण शिवरायांपूर्वी ३०० वर्ष व त्यापेक्षाही मागे) हे देवदेवतांचे अवडंबर माजवून कर्मकांडाला प्रोत्साहन देणारे होते. राजाचे राज्यकारभाराचे/प्रजेच्या संरक्षणाचे कार्य दुर्लक्षित करून 'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' वगैरे वृत्तीचे उपासक होते. ही वृत्ती रूढ अर्थाने धार्मिक, आस्तिक असली तरी अविवेकी आहे.

या उलट शिवरायांनी असे कोणत्या देवाचे अवडंबर माजवून एखाद्या देवाची ब्रँड अँबॅसिडरशिप केली नाही. किंबहुना भवानीमातेने तलवार दिली आणि हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा ही दोन उदाहरणे सोडल्यास ( अगदी बाबासाहेब पुरंदर्‍यांच्याही ) संपूर्ण शिवचरित्रात त्यांच्या देवदेवतांच्या उदोउदो करण्याच्या प्रसंगांचे वर्णन नाही. आता भवानीमातेची तलवार हे एक चमत्काराचे उदाहरण आहे. ज्याबात भरपूर लेखन 'खट्टामीठा" या ब्लॉगावर वाचायला मिळेल. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा हे वाक्य शिवरायांनी म्हटले त्याचे कारण ज्यांच्यासाठी हे वाक्य म्हटले ते लोक धार्मिक वृत्तीचे होते. त्यांचे मन वळवण्यासाठी, 'मी करत असलेले कार्य हे देवाचेच आहे' हे म्हणणे योग्य आहे. किंबहुना शिवाजीराजे तेवढे धूर्त होते. अफजलखानाच्या प्रसंगात शिवरायांनी अफजलखानाला मिठी मारली हे अर्धवट सांगितल्याने जसे पूर्ण चित्र स्पष्ट होत नाही तसेच 'हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा' हे वाक्य त्या संदर्भात ध्यानात घ्यावे असे वाटते. त्यामुळे शिवरायांचे वागणे हे संपूर्ण विवेकी होते असे कोणीही मान्य करील.

याउलट अविवेकी वागण्याचे क्लासिक उदाहरण म्हणजे पानिपतच्या युद्धातील व नंतरच्या काळातील पेशवे. ज्या माणसाला अफगाणिस्तानचा शिवाजी असे शेजवलकर गौरवतात त्या अहमदशाह अब्दालीशी लढण्यासाठी बाजारबुणगे आणि बायकापोरे नेणारे पेशवे हे अविवेकी. ही सगळी 'फौज' नेण्याचे कारण त्यांना काशीयात्रेचे पुण्य घडेल, गंगेत डुबकी मारता येईल. विधीयाग करता येतील. हे सगळे करत बसले आणि महिनाभर उशीरा पानिपतावर पोचले. ही वृत्ती अविवेकी. इंग्रज आल्यानंतर संपूर्ण पुण्याला जानवी बांधा म्हणजे साहेब घाबरून पळून जाईल असे म्हणणारा दुसरा बाजीराव अविवेकी.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सुंदर प्रतिसाद

विचार करण्यास उद्युक्त करणारा प्रतिसाद.

लोकांच्या भावना न दुखावता त्यांचा आपल्या कार्यात योग्य वापर करून घेण्याची कला शिवाजी महाराजांना साधली होती असे वाटते. 'भवानी तलवार' कल्पनेमुळे शिवाजी महाराजांच्या कार्याला 'दैवी साथ' असल्याची लोकांची भावना झाली असणे साहजिक आहे. हाच तर्क 'राज्य व्हावे ही श्रींची इच्छा' लाही लागू होतो.

पानिपतच्या पराभवाची कारणे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
वा! श्री. आ'कर्ण यांनी फारच छान विश्लेषण केले आहे.पूर्वी शाळेत असताना इतिहासाच्या प्रश्नपत्रिकेत "पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव का झाला?'' असा प्रश्न असायचा."मराठी सैन्याला वेळेवर रसद पोचली नाही." असे आम्ही त्याचे उत्तर लिहायचो. ही रसदीची समस्या निर्माण का झाली ते पुस्तकात नव्हते. शिक्षकांनीही कधी सांगितले नाही. आज आ'कर्णांनी अगदी बरोबर सांगितले.

भरकटलेला प्रतिसाद

मूळ लेखातील वाक्य होते:
**....."शूर अम्ही सरदार अम्हांला काय कुणाची भीती.
..........देव, देश अन धर्मापायी शीर घेतलं हाती."
असले मारण्या मरण्याचे उदात्तीकरण विवेकवादी व्यक्तीला प्रभावित करू शकत नाही.त्या पेक्षा आपण एकमेकांशी जुळवून घेऊन,समाजत सुधारण घडवून,गुण्यागोविंदाने राहायला हवे.

(ते गाणे आठवणी प्रमाणे नेताजी पालकर म्हणतो ज्याला शिवाजी महाराज परत हिंदू करून घेतात...) त्या संदर्भात माझ्या प्रतिसादात मी शिवाजी महाराजांचा उल्लेख केला की त्यांच्या देवधर्म मानण्याने त्यांचा विवेकवाद कमी झाला नाही. त्यावर देवाच्या ब्रँड अँबेसेडरशिप वगैरे म्हणण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही. कारण वरील मूळ वाक्य आणि एकूणच देव-धर्म मानण्यावर जे काही मूळ लेखात लिहीले आहे ते वाचल्यास शिवाजी त्या लेखानुसार अविवेकवादीच ठरतो. या उलट आपण पण म्हणल्याप्रमाणे, "...किंबहुना शिवाजीराजे तेवढे धूर्त होते...." आणि हेच मला देखील म्हणायचे होते. थोडक्यात विवेकवाद या लेखातील गाभा हा आस्तिक समजणार्‍या वृत्तींना आकसाने पहाणारा होता. - इतका की त्यात "सब घोडे बारा टक्के" प्रमाणे कुणीही आस्तिक हा अ-विवेकी ठरतो. मला वाटते आपल्यास ते मान्य नसावे, पण आपला वरील प्रतिसाद वाचल्यावर जरा गोंधळ आहे असे वाटले...

याउलट अविवेकी वागण्याचे क्लासिक उदाहरण म्हणजे पानिपतच्या युद्धातील व नंतरच्या काळातील पेशवे. ज्या माणसाला अफगाणिस्तानचा शिवाजी असे शेजवलकर गौरवतात त्या अहमदशाह अब्दालीशी लढण्यासाठी बाजारबुणगे आणि बायकापोरे नेणारे पेशवे हे अविवेकी. ही सगळी 'फौज' नेण्याचे कारण त्यांना काशीयात्रेचे पुण्य घडेल, गंगेत डुबकी मारता येईल. विधीयाग करता येतील. हे सगळे करत बसले आणि महिनाभर उशीरा पानिपतावर पोचले. ही वृत्ती अविवेकी. इंग्रज आल्यानंतर संपूर्ण पुण्याला जानवी बांधा म्हणजे साहेब घाबरून पळून जाईल असे म्हणणारा दुसरा बाजीराव अविवेकी.

अर्थातच! त्याला कोण नाही म्हणतयं? पण हे मूळ विषयाशी अवांतर वाटले आणि अनावश्यक वाटले. यात शिवाजी आणि दुसर्‍या बाजीरावाची आपण केलेली तुलना, ती ही आपल्यासारख्या व्यक्तीकडून तर अजूनही दुर्दैवी वाटली. पुढे काही लिहीण्याआधी अजून एक गोष्ट सांगतो - रामशास्त्री प्रभूण्यांनी न्यायमुर्तीपद स्विकारल्यावर ते माधवराव पेशव्यांना भेटायला गेले. त्यांची पूजा अर्चा चालू असल्याने त्यांना वेळ लागला. जेंव्हा ते बाहेर रामशास्त्र्यांना भेटायला आले तेंव्हा रामशास्त्र्यांनी माधवरावांना खडसावले की, "पूजाअर्चाच करायची असेल तर आपण राज्यकारभाराची वस्त्रे बाजूला ठेवू आणि काशीला जाऊन बसू" . माधवराव ते ऐकणार्‍यातील होते. पुढे सगळी बोंब झाली. पण त्यात म्हणजे उत्तर पेशवाईत नसलेला विवेकवाद अथवा त्या आधी म्हणजे पेशवाई येण्या आधी शिवाजींच्या वंशजांनी जी काही अंतर्गत बंडाळी केली त्यात नसलेला विवेकवाद यात देवधर्मापेक्षा - स्वार्थ आणि दिशाहीन वर्तन होते. तसाच विवेकवादाचा अभाव हा जाधव-भोसल्यांनी जे एकमेकांना परकीयाच्या दरबारात सरदारकी करताना मारले त्यात होता. त्यात देव-धर्म नव्हताच. ते जिजाबाईला समजले आणि शिवाजीने ते नुसतेच समजून घेतले नाही तर त्यातील तो स्वामिनिष्ठेचा दुर्गूण दूरदर्शीपणे स्वतःच्या पाठीराख्यांमधीलही काढून न भूतो न भविष्यती असा पराक्रम केला. असो. हा अवांतर प्रतिसाद द्यावा लागला कारण शिवाजी आणि दुसर्‍या बाजीरावाची विनाकारण तुलना... शिवाजीची कोणी चूक सांगितली तरी जसा तो महान होणार नाही तसेच दुसर्‍या बाजीरावाचे कोणी काही गूण सांगीतले तरी तो महान होणार नाही. एकाने आयुष्यात कधी घ्यावी लागलेली माघार पण यशस्वी करून दाखवली तर दुसर्‍याने कुठला पराक्रमच गाजवला नाही. एक धार्मिक असूनही, देव-धर्म मानत असूनही आजही महानायक आहे तर दुसरा धार्मिक होता का नाही ते माहीत नाही पण काही असले तरी नालायकच होता...

तुलना नाही उदाहरणे

दुसरा बाजीराव आणि शिवाजी यांची तुलना नाही. दोन स्वतंत्र उदाहरणे आहेत. पहिला बाजीराव वगळता इतर कोणत्याही पेशव्याचे शिवाजीसोबत नाव घ्यावे अशी परिस्थिती नाही. :)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

विवेकवाद

दुसरा बाजीराव आणि शिवाजी यांची तुलना नाही. दोन स्वतंत्र उदाहरणे आहेत. पहिला बाजीराव वगळता इतर कोणत्याही पेशव्याचे शिवाजीसोबत नाव घ्यावे अशी परिस्थिती नाही. :)

मूळ प्रतिसाद शिवाजीच्या धार्मिकपणा असून देखील विवेकासंदर्भात मर्यादीत होता. विषय विवेकवाद आहे शिवाजी आणि पेशव्यातील तुलना हा नाही. असला विषय काढून त्यात काही विवेक दिसत नाही, फक्त बरळल्या सारखे वाटते :-)

बरळणे नाही

शिवाजी तर काय, "हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा" असेच म्हणाले. पण असे दिसतयं तुमच्या विवेकवादाप्रमाणे त्याने औरंगझेब, अफझलखान, शाहीस्तेखान यांना विवेक दाखवून त्याने, "आपण एकमेकांशी जुळवून घेऊन,समाजत सुधारण घडवून,गुण्यागोविंदाने राहायला हवे" असेच त्यांना सांगायला हवे. कदाचीत औरंगजेबाने / अफझलखानाने त्याला "निशाना करण्याऐवजी" "निशाने मोघल" वगैरे किताब तयार करून दिला असता आणि सर्व गुण्याविवेकाने राहीले असते (गोविंदा हा शब्द देवधर्माशी संबंधीत असल्याने तो बदलला!) .

या मुद्यांचा प्रतिवाद करण्यासाठी दुसरे उदाहरण देणे आवश्यक होते. त्यामुळे ते पेशव्यांचे दिले. वालावलकर सरांनी इथे धार्मिक/आस्तिक व्यक्तीही संपूर्ण विवेकी असू शकते हे स्पष्टीकरण दिले आहे. 'विवेक' या शब्दाला मराठीत चिकटलेल्या इतर अर्थांमुळे हा सर्व गोंधळ झाला आहे. विवेकी ऐवजी बुद्धीप्रामाण्यवादी हाच शब्द योग्य आहे. :)

अवांतरः
शिवाजीचे राजकारण धार्मिक होते की नाही हा देखील वादाचा विषय आहे. अनेक विचारवंतांचे मत शिवाजीचे राजकारण हिंदू विरुद्ध मुस्लिम नसून उत्तर विरुद्ध दक्षिण असे होते. त्यामुळे दक्षिण दिग्विजय आधी करून तिथल्या शक्य तितक्या राजांशी (हिंदू वा मुसलमान) शिवाजीराजांनी समेट घडवून आणला. शिवाजीला त्याच्या कारकीर्दीत मुसलमानांइतकेच हिंदू राजांशी लढावे लागले. याउलट पेशव्यांनी शिवाजीच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याऐवजी बादशहाचे पंतप्रधान या पदात धन्यता मानली आणि शिवाजीच्या काळात असलेले दक्षिणाभिमुख राजकारण बदलून ते उत्तराभिमुख केले. ही फार मोठी घोडचूक होती.

हे फारच अवांतर बरळणे झाले. :) असो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

म्हणून

वालावलकर सरांनी इथे धार्मिक/आस्तिक व्यक्तीही संपूर्ण विवेकी असू शकते हे स्पष्टीकरण दिले आहे. 'विवेक' या शब्दाला मराठीत चिकटलेल्या इतर अर्थांमुळे हा सर्व गोंधळ झाला आहे. विवेकी ऐवजी बुद्धीप्रामाण्यवादी हाच शब्द योग्य आहे. :)

त्या स्पष्टीकरणाचा अभाव मूळ लेखात दिसला म्हणूनतर हा उहापोह "शूर आम्ही सरदार..." च्या संदर्भात मूळ प्रतिसादात केला.

शिवाजीचे राजकारण धार्मिक होते की नाही हा देखील वादाचा विषय आहे.

रोहीडेश्वराच्या पिंडीवर हिंदवी स्वराज्यस्थापनेची शपथ घेणारे शिवाजी महाराज देवधर्म मानत होते का नाही, संभाजी आग्र्याला मेला म्हणत त्याचे दिवस-श्राद्ध करणारे शिवाजी महाराज हे धार्मिक होते का नाही, हे श्री. यनावालांनी ज्या संदर्भात हा लेख लिहीला त्या संदर्भात विचार करा.

याउलट पेशव्यांनी शिवाजीच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याऐवजी बादशहाचे पंतप्रधान या पदात धन्यता मानली आणि शिवाजीच्या काळात असलेले दक्षिणाभिमुख राजकारण बदलून ते उत्तराभिमुख केले. ही फार मोठी घोडचूक होती.

परत मूळ विषयाला आणि माझ्या प्रतिसादासाठी अवांतर... पेशव्यांनी काय केले काय चुकले ह्यावर हवे असल्यास वेगळा लेख लिहा... कदाचीत त्यात माझ्या कडून प्रतिवाद होणार नाही कारण ते म्हणजे एकाच बाजूने दोघांनी टेनीस खेळण्यासारखे होईल. म्हणून येथे उगाच नसते संदर्भ देणे मात्र मला बरळणेच वाटते.

बाकी चालू दे...परंतु - अवांतर

रोहीडेश्वराच्या पिंडीवर हिंदवी स्वराज्यस्थापनेची शपथ घेणारे शिवाजी महाराज देवधर्म मानत होते का नाही, संभाजी आग्र्याला मेला म्हणत त्याचे दिवस-श्राद्ध करणारे शिवाजी महाराज हे धार्मिक होते का नाही, हे श्री. यनावालांनी ज्या संदर्भात हा लेख लिहीला त्या संदर्भात विचार करा.

देवळांत जाऊन शपथ घेऊन आपल्या स्वराज्याला श्रींचाच हातभार लागणार आहे अशी भोळ्याभाबड्या जनतेची समजूत करून देणे आणि आपला मुलगा जीवंत असतानाही खोटे बोलून त्याचे श्राद्ध घालून धर्माविरूद्ध "खोटी" कृती करणे कोणत्याही प्रकारे धार्मिक नाही. अशाप्रकारे देवा-धर्माविरुद्ध जाऊन राज्याच्या युवराजाचे श्राद्ध घालणे मोठ्या जिकिरीचे असावे. त्याचे प्रायश्चित्त महाराजांनी घेतले होते का काय न कळे.

परंतु, आग्र्याला आपले स्फटीक शिवलिंग घेऊन जाणारे आणि नियमित पूजाअर्चा करणारे, स्वराज्यस्थापनेसाठी शिवाचीच निवड करणारे, आई जगदंबा आणि शंकरावर अढळ श्रद्धा असणारे महाराज नास्तिक नक्कीच नव्हते. नास्तिकतेचा पुरस्कार करून त्यांना स्वराज्य स्थापन करता आले असते असे वाटत नाही.

चालु द्या !!!

महाराज नास्तिक नक्कीच नव्हते. नास्तिकतेचा पुरस्कार करून त्यांना स्वराज्य स्थापन करता आले असते असे वाटत नाही.

सहमत आहे.

-दिलीप बिरुटे
(देवधर्मवाला पण विवेकी )

टाळी

ते म्हणजे एकाच बाजूने दोघांनी टेनीस खेळण्यासारखे होईल

असे असेल तर द्या टाळी! :)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

विवेक

विवेक हा शब्द सापेक्षतावादी असावा असे मला वाटते. आस्तिक आणि नास्तिक दोघेही स्वतःला विवेकीच म्हणवून घेत असावेत.

वर विकास यांनी म्हटले तसेच,

जगात जे काही चांगले घडले ते केवळ नास्तिकांमुळे घडले असे म्हणायला वाव नाही

असे म्हणायला अद्याप वाव नक्कीच नाही आणि नास्तिकांमुळे असे काही घडणेही कठीण वाटते असे माझे वैयक्तिक मत आहे.

देव आहे का? असेल, मी पाहिला तर नक्की विश्वास ठेवेन अशी माझी विचारसरणीही मला विवेकीच वाटते.

माणसाची ऐहिक प्रगती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. विकास लिहितातः"जगात जे काही चांगले घडले ते केवळ नास्तिकांमुळे घडले असे म्हणायला वाव नाही ."
त्यावर प्रियाली म्हणतातः
"असे म्हणायला अद्याप वाव नक्कीच नाही आणि नास्तिकांमुळे असे काही घडणेही कठीण वाटते असे माझे वैयक्तिक मत आहे."
.........
**आजपर्यंत माणसाने विविधक्षेत्रांत--विषेशतः अंतराळ विज्ञानात-- आश्च्रर्यकारक प्रगती केली आहे.त्यासाठी वैज्ञानिकांनी अविरत परिश्रम करून मूलभूत संशोधन केले आहे.ते सर्व वस्तुनिष्ठ आणि ऐहिक आहे.देव,धर्म, परलोक इत्यादींशी त्याचा काडीमात्र संबंध नाही.
** जगातल्या कुठल्याही संशोधन प्रयोगशाळेच्या संदर्भ ग्रंथालयात कुठल्याही धर्मग्रंथाला, धार्मिक पुस्तकाला स्थान नाही.
**पृथ्वीवरील सजीव सृष्टीच्या निर्मितीविषयी कुठल्याही धर्मग्रंथातील माहिती ग्राह्य न मानता डार्विनचा उत्क्रांतिवादच जगभरातील अधिकृत शाळा कॉलेजांतून ज्ञान म्हणून शिकवला जातो.
**देव आणि धर्म यांनी माणसाच्या ऐहिक प्रगतीत काही मोलाची भर टाकली आहे असे वाटत नाही.
**धर्म आणि नीतिमत्ता यांचा काही संबंध आहे असेही दिसत नाही.
तरी या गोष्टींवर विचार व्हावा.

मूळ मुद्दा वेगळा आहे

**आजपर्यंत माणसाने विविधक्षेत्रांत--विषेशतः अंतराळ विज्ञानात-- आश्च्रर्यकारक प्रगती केली आहे.त्यासाठी वैज्ञानिकांनी अविरत परिश्रम करून मूलभूत संशोधन केले आहे.ते सर्व वस्तुनिष्ठ आणि ऐहिक आहे.देव,धर्म, परलोक इत्यादींशी त्याचा काडीमात्र संबंध नाही. ** जगातल्या कुठल्याही संशोधन प्रयोगशाळेच्या संदर्भ ग्रंथालयात कुठल्याही धर्मग्रंथाला, धार्मिक पुस्तकाला स्थान नाही.

संबंध आहे असे कोण म्हणतयं? विज्ञानात धार्मिक ज्ञान कोण आणते ? आणि असे कोण म्हणत आहे? माझा मुद्दा इतकाच आहे की अशी वैज्ञानीक माणसे देखील जीवनात कुठल्यान् कुठल्या प्रकारे इश्वर मानणारे असू शकतात आणि अशी अनेक उदाहरणे दिसतात. मात्र आपण मूळ मुद्दा ज्या प्रकारे मांडला आहे त्यातून जे उर्धृत होते ते असे की इश्वर मानणारे आस्तिक हे विवेकवादी नसतात...

**पृथ्वीवरील सजीव सृष्टीच्या निर्मितीविषयी कुठल्याही धर्मग्रंथातील माहिती ग्राह्य न मानता डार्विनचा उत्क्रांतिवादच जगभरातील अधिकृत शाळा कॉलेजांतून ज्ञान म्हणून शिकवला जातो.

आय विश हे खरे आहे :-( अमेरिकेत उत्क्रांतीवादाप्रमाणेच अनेक शाळात "इंटेलीजन्ट डिझाईन"च्या नावाखाली बायबलमधील सात दिवसात जग कसे तयार झाले आहे ते शिकवण्याचा घाट चालू आहे. त्याला "क्रिएशन सायन्स" असेही म्हणतात.

**देव आणि धर्म यांनी माणसाच्या ऐहिक प्रगतीत काही मोलाची भर टाकली आहे असे वाटत नाही.
तसे तुम्हाला वाटत नसेल. कम्यूनिस्टांनी देव-धर्म टाकून दिला म्हणून कोणची मोलाची भर टाकली बरं? या उलट ब्रिटनने तर स्वतःचे चर्च पण उभारले आणि ऐहीकता पण वाढवून दाखवली...

तरी या गोष्टींवर विचार व्हावा.

तेच मी ही म्हणतो.

धर्माची चौकट आवश्यक

बुद्धिप्रामाण्यवाद मला व्यक्तिशः बरोबर वाटत असला तरी सर्वांनी तो मानावा असे मी म्हणणार नाही. बुद्धिप्रामाण्यवाद खरोखर आचरणात आणण्यासाठी जी बौद्धिक/मानसिक पात्रता आवश्यक असेल ती सर्वांच्यात असेल अशी कल्पना करणे चुकीचे आहे.

तसेच धर्माच्या चौकटीचे पुढील फायदे आहेत असे मला वाटते

१. आता बेकायदेशीर/अनैतिक मानल्या जाणार्‍या बर्‍याच गोष्टी न घडण्यासाठी कायद्याच्या बडग्यापेक्षा धर्माच्या नियमातून बनलेली नैतिकतेची चौकट हे एकमेव कारण आहे. 'कर्माचे फळ मिळतेच' आणि 'देव सगळे पाहत आहे' इ. कल्पना याबाबतीत महत्वाच्या आहेत. बुद्धिप्रामाण्यवादात ही नैतिकतेची चौकट ठरवणे आणि मानणे हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि शिवाय 'नैतिकतेचे नियम पाळले पाहिजेत' या नियमाला काही 'वैज्ञानिक' आधार नसल्याने काही बुद्धिप्रामाण्यवादी (संबंधित जोखीमेची व्यवस्था करून) ही चौकट पूर्णपणे झुगारून देऊनही प्रामाणिक बुद्धिप्रामाण्यवादी राहू शकतात. असे झाले तर मग कायदा-सुव्यवस्थेचे काय होईल हे वेगळे सांगायला नको.

२. या जगाचा कारभार चालवणारी आणि सर्वांवर लक्ष ठेऊन असणारी एक sane शक्ती आहे ही भावना कित्येक लोकांना मानसिक आधार देते. वाढते मानसिक रोग, ताणतणाव यांच्या आजच्या काळात हा आधार ढासळला तर मोठ्या प्रमाणावर मानसिक रोगाच्या 'साथी'ला तोंड द्यावे लागेल.

त्यामुळे मला वाटते बुद्धिप्रामाण्यवाद्यांनी व्यापक सामाजिक हिताच्या दृष्टीने धर्मव्यवस्था मोडकळीस येईल असे काही करू नये पण त्याचबरोबर ज्या भ्रामक कल्पनांमुळे, अंधश्रद्धांमुळे समाजाचे नुकसान होत आहे त्या आधी काढून टाकण्यावर भर द्यावा असे माझे व्यक्तिगत मत आहे.

बरोबर

नवीनराव, सुरेख प्रतिसाद. वैयक्तिक स्तरावर नैतिकता पाळण्यासाठी धर्माची चौकट आवश्यक आहे. विशेषतः भारतासारख्या देशात जिथे हजारो वर्षांपासून धर्म आणि जात यांचे नियम हे प्रमाण मानले जात आहेत तिथे ही चौकट एक प्रकारचा कायदाच आहे.

त्यामुळे मला वाटते बुद्धिप्रामाण्यवाद्यांनी व्यापक सामाजिक हिताच्या दृष्टीने धर्मव्यवस्था मोडकळीस येईल असे काही करू नये पण त्याचबरोबर ज्या भ्रामक कल्पनांमुळे, अंधश्रद्धांमुळे समाजाचे नुकसान होत आहे त्या आधी काढून टाकण्यावर भर द्यावा असे माझे व्यक्तिगत मत आहे.

सहमत


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अंतराळ क्षेत्रातील प्रगती

आजपर्यंत माणसाने विविधक्षेत्रांत--विषेशतः अंतराळ विज्ञानात-- आश्च्रर्यकारक प्रगती केली आहे.त्यासाठी वैज्ञानिकांनी अविरत परिश्रम करून मूलभूत संशोधन केले आहे.ते सर्व वस्तुनिष्ठ आणि ऐहिक आहे.देव,धर्म, परलोक इत्यादींशी त्याचा काडीमात्र संबंध नाही.
जगातल्या कुठल्याही संशोधन प्रयोगशाळेच्या संदर्भ ग्रंथालयात कुठल्याही धर्मग्रंथाला, धार्मिक पुस्तकाला स्थान नाही.

हे खरे असावे परंतु अंतराळात जाणारी सुनीता विल्यम्स भगवद् गीतेची प्रत आणि गणपतीची मूर्ती बरोबर घेऊन गेली हे ही सत्यच नाही का? हे कसले हो शास्त्रज्ञ?

अंतराळात सोडलेली याने, उपग्रह इ. १३ तारखेला किंवा १३ (दुपारी १) वाजता सोडली वगैरे गेली आहेत का यावर अधिक माहिती नाही.

नासा

म्हणजे असे का?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

विवेक-वाद

"विवेकवाद : अत्यंत सार्थ नाव दिले आहे :) हा तर विवेक-वाद!!!!

माझेही मत बरेचसे विकास यांच्याप्राणेच आहे

सर्व प्रथम या प्रस्तावात असे गृहित धरले आहे की सर्व निरीश्वरवादी विवेकी असतात

सहमत. नास्तिक व्यक्ती विवेकी असते असे जर ठाम मत असेल (आणि दुर्दैवाने असे बर्‍याच जणांना वाटते)
तर कृपया पुनर्विचार करा.
आस्तिक विवेकी नसतात असे जर तुमचे मत असेल तर मास्त पूर्णपणे असहमत..

बाकी

विवेकवादी जीवन म्हणजे प्रेमभावाने उद्युक्त झालेले आणि बुद्धीचे मार्गदर्शन लाभलेले सुजाण,सुसंस्कृत जीवन.

" प्रेमभावाने उद्युक्त झालेले आणि बुद्धीचे मार्गदर्शन लाभलेले सुजाण,सुसंस्कृत जीवन" अनेक डोळस आस्तिक जगतात.. माझ्यामते तेही विवेकीच आहेत

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

बुद्धिप्रामाण्यवाद

मला वाटते तुम्ही उल्लेखलेल्या 'वादा'ला विवेकवादाऐवजी बुद्धिप्रामाण्यवाद म्हणावे. विवेक म्हणजे चांगले आणि वाइट (विचार/कर्म) यापैकी हेतुपूर्वक चांगले निवडणे (?). विवेक अस्तिक आणि नास्तिक अश्या दोन्ही प्रकारच्या माणसांकडे असू किंवा नसू शकतो. फरक इतकाच की अस्तिक माणूस प्रत्येक प्रसंगात बुद्धीलाच प्रमाण न मानता (बुद्धी, तर्काला कदाचित न पटणार्‍या) इतर गोष्टींना प्रमाण मानू शकतो.

हं

अस्तिक माणूस प्रत्येक प्रसंगात बुद्धीलाच प्रमाण न मानता (बुद्धी, तर्काला कदाचित न पटणार्‍या) इतर गोष्टींना प्रमाण मानू शकतो

गंमत आशी आहे की नास्तिक माणूसही बुद्धी-तर्काला न पटणार्‍या गोष्टींना प्रमाण मानु शकतो. माओ किंवा इतर कम्युनिस्ट नास्तिकांनी जे अत्याचार केले तो बुद्धीप्रामाण्यवाद (तर्कशुद्ध, बुद्धीला पटणारा) आहे का? नास्तिक मंडळी देवाची पूजा करत नसतील पण आपल्या नास्तिकत्वाची पुजाच करतात

करुणानीधींचे नाव विकीवरच्या राजकीय नास्तिकांच्या यादित वाचले आणि नास्तिकत्व आणि बुद्धीप्रामाण्याचा मेळ नाहि याची माची माझ्या आस्तिक मनाला खात्रीच पटली ;)

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

बरोबर आहे

गंमत आशी आहे की नास्तिक माणूसही बुद्धी-तर्काला न पटणार्‍या गोष्टींना प्रमाण मानु शकतो. माओ किंवा इतर कम्युनिस्ट नास्तिकांनी जे अत्याचार केले तो बुद्धीप्रामाण्यवाद (तर्कशुद्ध, बुद्धीला पटणारा) आहे का? नास्तिक मंडळी देवाची पूजा करत नसतील पण आपल्या नास्तिकत्वाची पुजाच करतात

अगदी बरोबर आहे. म्हणूनच मी लिहिले होते "विवेक अस्तिक आणि नास्तिक अश्या दोन्ही प्रकारच्या माणसांकडे असू किंवा नसू शकतो. "

माझे शेवटचे वाक्य कृपया असे वाचावे

बुद्धिप्रामाण्यवादी आणि अस्तिक लोकांमध्ये फरक इतकाच की अस्तिक माणूस प्रत्येक प्रसंगात बुद्धीलाच प्रमाण न मानता (बुद्धी, तर्काला कदाचित न पटणार्‍या) इतर गोष्टींना प्रमाण मानू शकतो.

रॅशनल

तुमचे बरोबर आहे. मात्र रॅशनलिझम या शब्दासाठी साधारणपणे विवेकवाद हाच शब्द प्रचलित आहे.
आस्तिक माणसे चांगले आणि वाईट यामध्ये फरक करताना वस्तुनिष्ठपणे विचार न करता, काही न पटणार्‍या गोष्टींचाही आधार घेतात आणि त्यामुळे त्यांची चांगल्या-वाईटात स्पष्टपणे योग्य फरक करु शकत नाहीत असे यनावालांचे म्हणणे आहे ते पटण्यासारखेच आहे.
धनंजयराव तर्कशास्त्राची उदाहरणे देतीलच पण यनावालांच्या म्हणण्याचे सार साधारण असे असावे:
१. सर्वच आस्तिक माणसे सर्वच प्रसंगात अविवेकी नसतात.
२. मात्र आस्तिक (इर्रॅशनल या अर्थाने) माणसे वैज्ञानिक बुद्धीला न पटणार्‍या गोष्टींचा आधार घेत असल्याने अनेक प्रसंगी वस्तुनिष्ठ विचार करू शकत नाहीत. त्याअर्थाने ते अविवेकी आहेत.
३. नास्तिक माणसे केवळ बुद्धीला आणि तर्काला वैज्ञानिक दृष्टीने पटणार्‍या गोष्टींचाच आधार घेत असतात त्यामुळे ते अधिक वस्तुनिष्ठ विचार करू शकतात.म्हणून केवळ ते विवेकी.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पटले नाहि.

नास्तिक माणसे केवळ बुद्धीला आणि तर्काला वैज्ञानिक दृष्टीने पटणार्‍या गोष्टींचाआधार घेत असतात

पटले नाहि.
नास्तिक केवळ बुद्धीला आणि तर्काला न पटणार्‍या काहि "दैवी" गोष्टींचा आधार घेत नसतील पण ते (त्यांतिल काहि) त्यांच्या अव्यवहार्य विचारसरणीचा (जी ते ती बरोबर आहे असे मानुन चालतात) आधार घेऊ शकतात. विशेषतः अश्यावेळी जेव्हा देव नाहि हे सिद्ध करायचे असते. त्या आटापिट्यात अनेकदा विवेक गमावून बसतात :).
तेव्हा नास्तिकही कधीकधी ज्या गोष्टींचा आधार घेतात त्या दैवी नसल्या तरी वैज्ञानिक अथवा वस्तुनिष्ठ असतीलच असे नाहि.

माझ्या मते, नास्तिकांतही (आस्तिकांप्रमाणे)आंधळे आणि डोळस असे दोन प्रकार आहेत. आंधळे नास्तिकत्व अथवा आस्तिकत्व म्हणजे अविवेक असे म्हणता येईल

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

विचारसरणी

येथे थोडीशी गल्लत होत आहे.
येथे विवेकवादाला विरोध करणारे, नास्तिक लोक = कम्युनिस्ट किंवा द्रमुक असे सोपे समीकरण मांडून त्यांची विचारसरणी पक्षी कम्युनिझम जगात अयशस्वी ठरल्याने ती अव्यवहार्य आहे असे मानत आहेत. येथे माझ्यासमोर उदाहरणे आहेत ती श्रीराम लागू, पु.ल.देशपांडे वगैरे परिचित नास्तिकांची. देव आहे किंवा नाही हे दुसर्‍याला सिध्द करून दाखवल्याने काहीच होत नाही. तुम्हाला स्वत:ला जर ती गोष्ट पटत असेल तर तुम्ही दुसर्‍यांना सांगू शकता मात्र त्याची बळजबरी करू शकत नाही. यनावाला यांचा सूर लेखात पूर्णपणे त्यांचे मत मांडणारा, अनाग्रही आणि सौम्य आहे. त्यांची मते परखड असली तरी सर्वांनी तीच मानावीत असे त्यांचे म्हणणे आहे हे मला जाणवले नाही.

कम्युनिस्ट स्वतःला नास्तिक म्हणवत असले तरी ते एका अर्थाने पोथीबंद आहेत असे माझ्या त्यांच्याबाबतच्या मर्यादित वाचनावरून आणि निरीक्षणावरून जाणवते. मात्र ते स्वत:ला नास्तिक/विवेकवादी म्हणवतात म्हणून सर्व विवेकवादी हे तसेच असतील असे म्हणणे चुकीचे आहे. (हे साधारण हिंदुत्त्ववाद्यांप्रमाणेच झाले. शिवसेना/बजरंग दल यांना अभिप्रेत असलेला हिंदुत्त्ववाद मला मान्य नाही. हिंदू धर्माला, हिंदू देवांना शिव्या देऊन, त्यांचे अस्तित्त्व अमान्य करूनही मी हिंदूच राहू शकतो ही कल्पना मला फार आकर्षक वाटते.हे इतर धर्मांमध्ये शक्य नाही. कमल हसनचा दशावतारम पाहिला का? शैव लोकांनी विष्णूचे आणि वैष्णवांनी शिवाचे अस्तित्त्व अमान्य केले. एका अर्थाने दोन्ही देव आहेतही आणि नाहीतही. ज्याला जे पाहिजे ते घ्या. ;) शंकराचार्य सुद्धा हिंदू आणि चार्वाक सुद्धा हिंदू. किंबहुना हिंदूधर्माचा लवचिकपणा त्यातून दिसतो. मात्र हिंदूद्रोही वगैरे नवीन शब्दांचा शोध लावून स्वतःला हिंदुत्त्ववादी म्हणवणारे हे पक्ष एकंदर हिंदुत्त्वाचीच बदनामी करत आहेत तसेच कम्युनिष्टांचेही आहे.) द्रमुकबाबतही तसेच म्हणता येईल. पेरियार यांना कळघमच्या काळात अभिप्रेत असलेला निरीश्वरवाद आणि अण्णा दुराई यांनी काही देवांना दिलेली 'सवलत' यामध्ये विरोधाभास आहे. पुढे द्रमुकच्या काही मंत्र्यांनी ज्या देवांना तमिळ कळते त्यांनीच तमिळनाडूमध्ये रहावे असा फतवा काढल्यानंतर द्रमुकला देवाचे अस्तित्त्व मान्य आहे हे स्पष्टपणे दिसते. त्यामुळे त्यांची नास्तिकवादाची झूल हा खरा विवेकवाद नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

असेच

येथे विवेकवादाला विरोध करणारे

विरोध विवेकवादाला नसून केवळ नास्तिकच विवेकवादी आहेत या धारणेला आहे.

बाकी वर म्हणालात तेच सांगतो आहे.. विवेकवाद आणि आस्तिकत्व -नास्तिकत्वाचा थेट संबंध जोडू नये इतकेच म्हणणे होते.. वरील प्रतिक्रियांवरून काहि आस्तिक व काहि नास्तिक हे अविवेकी आहेत.. तेव्हा असे जनरलायझेशन करता येणार नाही इतकेच.

पुन्हा एकदा गेल्या प्रतिसादातील वाक्य उद्धृत करतो:

आंधळे नास्तिकत्व अथवा आस्तिकत्व म्हणजे अविवेक असे म्हणता येईल

किंवा डोळस आस्तिकत्व/नास्तिकत्व म्हणजे विवेकवाद.. काय म्हणता?

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

अरे हृषिकेश

अरे ऋषीकेश,

तू आस्तिक आहेस म्हणून तू अविवेकी आहेस असे म्हणायचे नाही. :)

विवेक या शब्दाला मराठीत अभिप्रेत असलेल्या व्यवहारातील बहुधा नैतिक-अनैतिकतेच्या छटा मूळ इंग्रजी 'रॅशनल' या शब्दाला नाहीत. किंबहुना मराठीत रॅशनलचा अर्थ वेगळा आहे असे दिसते. तो नवीन यांनी म्हटल्याप्रमाणे बुद्धीप्रामाण्यवादी असाच आहे. मात्र अनेक वर्षे रॅशनल साठी विवेकी असाच शब्द मराठीत प्रचलित आहे.
एक अतिसोपे उदा देतो:

मी अभ्यास करून पास होईन = रॅशनल.
माझा देव आहे. मी त्याची भक्ती करतो तो मला पास करील = इर्रॅशनल.

तू कसा विचार करतोस ;)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

:)

मी असा विचार करतो:
माझा देव आहे आणि मी अभ्यास करेन. पण पास होणे न होणे हे केवळ माझ्या हातात नाहि (समजा पेपर गहाळ झाला/ पाणी सांडले/ शाई पसरली तर्? ;) )
आता हे रॅशनल/इर्रॅशनल अश्या प्रोबॅबल टर्मस तुम्ही ठरवा बॉ.. हे आहे हे असं आहे :)
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

विवेके.अविवेक

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"नास्तिक वादाला निरीश्वरवाद, विवेकवाद.. असेही म्हणतात." या विधानाचा अर्थ "आस्तिक माणसे अविवेकी(प्रचलित अर्थाने) असतात असा मुळीच नाही. कित्येक आस्तिक विवेकी,सदाचरणी,सज्जन असतात.ते सुसंस्कृत,सुजाण जीवन जगत असतात. तसेच काही नास्तिक अविवेकी असू शकतात.श्री.आ'कर्ण म्हणतात त्याप्रमाणे 'रॅशनॅलिझम' या शब्दासाठी हा शब्द योजला जातो. तो सार्थही आहे.पण त्यावरून तर्कशास्त्रानुसार आस्तिक =अविवेकी असा निष्कर्ष निघत नाही .

लेबल

यनावाला यांचा सूर लेखात पूर्णपणे त्यांचे मत मांडणारा, अनाग्रही आणि सौम्य आहे. त्यांची मते परखड असली तरी सर्वांनी तीच मानावीत असे त्यांचे म्हणणे आहे हे मला जाणवले नाही.

जर नुसते परखड असते तर समजू शकलो असतो, पण येथे नास्तिक हेच बुद्धीप्रामाण्यवादी आहेत, विवेकी आहेत असा सूर. धर्म मानणारे अर्थातच अविवेकी. बरं हे अर्थातच फक्त हिंदूंच्या बाबतीत - वास्तवीक कोणी नास्तिकाने फक्त एकाच धर्मातील व्यक्तींबद्दल बोलणे योग्य नाही. हे म्हणजे अरुंधती रॉयने तिची मते व्यक्त केली आणि ती मला पटत नाहीत, तत्वात बसत नाहीत म्हणून तीच्यावर देशद्रोही असण्यावरून खटला भरण्याचा प्रकार झाला..

असे लेबल लावणे, ते ही सातत्याने एकाच संकेतस्थळावर विविध लेखात, हे अनाग्रही समजायचे की सौम्य?

मला उगाचच चर्चिलचे वाक्य आठवते, "A fanatic is one who can't change his mind and won't change the subject." :-)

हा प्रतिसाद पहावा

हा प्रतिसाद पहावा म्हणजे शंकानिरसन होईल.

विवेके.अविवेक
प्रेषक यनावाला (शनि, 08/23/2008 - 21:53)

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"नास्तिक वादाला निरीश्वरवाद, विवेकवाद.. असेही म्हणतात." या विधानाचा अर्थ "आस्तिक माणसे अविवेकी(प्रचलित अर्थाने) असतात असा मुळीच नाही. कित्येक आस्तिक विवेकी,सदाचरणी,सज्जन असतात.ते सुसंस्कृत,सुजाण जीवन जगत असतात. तसेच काही नास्तिक अविवेकी असू शकतात.श्री.आ'कर्ण म्हणतात त्याप्रमाणे 'रॅशनॅलिझम' या शब्दासाठी हा शब्द योजला जातो. तो सार्थही आहे.पण त्यावरून तर्कशास्त्रानुसार आस्तिक =अविवेकी असा निष्कर्ष निघत नाही .


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वृथापवाद

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.विकास लिहितातः"पण येथे नास्तिक हेच बुद्धीप्रामाण्यवादी आहेत, विवेकी आहेत असा सूर. धर्म मानणारे अर्थातच अविवेकी. बरं हे अर्थातच फक्त हिंदूंच्या बाबतीत - वास्तवीक कोणी नास्तिकाने फक्त एकाच धर्मातील व्यक्तींबद्दल बोलणे योग्य नाही."
......
श्री. विकास यांचा हा असा समज का व्हावा नकळे.असे निष्कर्ष त्यांनी माझ्या कोणत्या विधानांवरून काढले? धर्म म्हणजे हिंदुधर्म असे माझ्या मनात कधीही नव्हते.
''बरं हे अर्थातच फक्त हिंदूंच्या बाबतीत''
छे! छे!! असे मुळीच नाही.धर्म म्हणजे जगातील सर्व धर्मच.

सहमत आहे

वालावलकर यांनी याआधी या विषयावर दिलेली सुवचने पाहता, त्यांच्या लेखनात कधीही विशिष्ट (हिंदू) धर्मावर रोख आहे हे वाटले नाही. प्रस्तुत लेखातही तसे नाही. उपक्रमावर सर्वांना परिचित वाटतील अशी उदाहरणे त्यांनी दिली आहेत.

उदा. तेव्हाचे सुवचन पहा:

जॉर्ज बुश सांगतात की ते प्रत्येक दिवशी देवाशी बोलतात आणि त्यामुळे ख्रिश्चन लोकांना ते(बुश ) प्रिय आहेत."मी माझ्या हेअरड्रायर मधून देवाशी संवाद साधतो." असे जर बुश म्हणाले तर लोक त्यांना वेड्यांत काढतील. मला समजत नाही की हेअरड्रायरच्या उल्लेखाने बुश यांचे विधान अधिक वेडसरपणाचे कसे काय ठरते?

मात्र आता बराक ओबामा खिशात हनुमानाची मूर्ती घेऊन हिंडतो, त्याच्यावर टीका केली तर ती कोणत्या धर्मावर टीका ? (हिंदू की ख्रिश्चन) यावर आम्ही विचार करत आहोत ;)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वृथा?

श्री.विकास लिहितातः"पण येथे नास्तिक हेच बुद्धीप्रामाण्यवादी आहेत, विवेकी आहेत असा सूर. धर्म मानणारे अर्थातच अविवेकी.... श्री. विकास यांचा हा असा समज का व्हावा नकळे.असे निष्कर्ष त्यांनी माझ्या कोणत्या विधानांवरून काढले?

आता या चर्चेतील मूळ लेखातील नास्तिक शब्दाचा अर्थ सांगातानाचे वाक्य पहा:

या उलट ईश्वराचे असित्व न मानणारे काही असतात...." सर्व विश्व निसर्ग नियमांनी बद्ध आहे .माणसाला हे नियम शोधता येतात.वैज्ञानिक हे सर्वात विश्वसनीय ज्ञान होय."अशी त्यांची धारणा असते.ते धार्मिक नसतात.त्यांना नास्तिक, निरीश्वरवादी, बुद्धिप्रामाण्यवादी, विवेकवादी असे म्हणतात.

त्या आधी आस्तिक शब्दाचा अर्थ सांगताना ते म्हणतातः

जगातील बहुसंख्य लोकांची ईश्वरावर श्रद्धा असते.जगनिर्माता आणि जगन्नियंता असा कोणी आहे . त्याच्या आज्ञेने सर्व काही घडते असे ते मानतात....आत्मा, मरणोत्तर जीवन,स्वर्ग, नरक,मोक्ष यांवर त्यांचा विश्वास असतो.त्यांना आस्तिक,ईशरवादी, धार्मिक असे म्हणतात.

याचाच उलट अर्थ काय होतो? जे आस्तिक असतात ते बुद्धिप्रामाण्यवादी, विवेकवादी नसतात.

गंमत म्हणजे ते पुढे (मूळ लेखात) आपण असे देखील म्हणतात की, " मरणोत्तर जीवन नसतेच. असा हा अनुभवाधारित विचार आहे."

मरणानंतर जीवन नसतेच असा कुठल्या मेलेल्या माणसाने अनुभवकथन करून सांगीतले? यात मी मरणोत्तर जीवन आहे अथवा नाही या संबंधात बोलत नाही आहे तर "अनुभवाधारीत" कशाला म्हणायचे आणि मग त्यात विवेकवाद सांगायचे ह्या संदर्भात बोलत आहे.

धर्म म्हणजे हिंदुधर्म असे माझ्या मनात कधीही नव्हते. ''बरं हे अर्थातच फक्त हिंदूंच्या बाबतीत'' छे! छे!! असे मुळीच नाही.धर्म म्हणजे जगातील सर्व धर्मच.

वरील स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद!

असो.

वाक्य असे हवे.

बुद्धिप्रामाण्यवादी आणि अस्तिक लोकांमध्ये फरक इतकाच की अस्तिक माणूस प्रत्येक प्रसंगात बुद्धीलाच प्रमाण न मानता (बुद्धी, तर्काला कदाचित न पटणार्‍या) इतर गोष्टींना प्रमाण मानू शकतो.
हे वाक्य असे हवे होते असे मला वाटते.--
बुद्धिप्रामाण्यवादी आणि आस्तिक लोकांमध्ये फरक इतकाच की आस्तिक माणूस प्रत्येक प्रसंगात बुद्धीलाच प्रमाण न मानता (बुद्धी किंवा तर्काला कदाचित न पटणार्‍या) इतर गोष्टींनाही, तशीच गरज असेल तर, प्रमाण मानू शकतो. आणि यातच त्याची महानता असते.-वाचक्‍नवी

कळले नाही

बुद्धिप्रामाण्यवादी आणि आस्तिक लोकांमध्ये फरक इतकाच की आस्तिक माणूस प्रत्येक प्रसंगात बुद्धीलाच प्रमाण न मानता (बुद्धी किंवा तर्काला कदाचित न पटणार्‍या) इतर गोष्टींनाही, तशीच गरज असेल तर, प्रमाण मानू शकतो.

'गरज असेल तर' मधून काय सांगायचे आहे कळले नाही.

आणि यातच त्याची महानता असते.-वाचक्‍नवी

यात महानतेचा कसा काय संबंध आहे?

अवांतर - अस्तिक की आस्तिक? असा प्रश्न पडला होता पण शोध घेतल्यावर कळले की 'आस्तिक' असा शब्द आहे.

वृथारोप

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.विकासराव उगीचच रागावतात.पाहा हं.
आस्तिकः यांना आस्तिक्यवादी, ईश्वरवादी,धार्मिक असे म्हणतात.
नास्तिकः यांना निरीश्वरवादी,बुद्धिप्रामाण्यवादी,विवेकवादी असे म्हणतात.
ही दोन विधाने आहेत. या विधानांवरून पुढील निष्कर्ष निघतातः
* जे नास्तिक आहेत त्यांना ईश्वरवादी, धार्मिक, असे म्हणत नाहीत.
* जे आस्तिक आहेत त्यांना बुद्धिप्रामाण्यवादी,विवेकवादी म्हणत नाहीत..याचा अर्थ ते विवेकी (शब्दार्थाने) नसतात असे नाही.
इथे बुद्धिप्रामाण्यवादी,विवेकवादी या केवळ संज्ञा आहेत.
आस्तिकांना विवेकवादी म्हटले जात नाही इतकेच.ते (शब्दार्थाने) विवेकी असतील अथवा नसतील.
तद्वतच नास्तिकांना विवेकवादी अशी संज्ञा आहे. शब्दार्थाचा विचार करता ते विवेकी असतील अथवा नसतील

कोण म्हणते?

सर्वप्रथम मी काही रागवलो वगैरे नाही... पण एखादे मत पटले नाही तर मान्य कसे करू? मग परत तुम्हीच म्हणाल की मी अविवेकी आहे म्हणून (ह.घ्या.) :-)

नास्तिकः यांना निरीश्वरवादी,बुद्धिप्रामाण्यवादी,विवेकवादी असे म्हणतात.

ह्या संदर्भात एक प्रश्नः असे म्हणतात म्हणजे नक्की कोण म्हणते?

मग आपण वर दिलेल्या स्पष्टीकरणाच्या संदर्भात अजानूकर्णाचे खालील वाक्य आपल्याला मान्य आहे का?


विवेकवादी व्हायचे म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी व्हायचे. एखादी गोष्ट जर तुमच्या बुद्धीला, तर्काला पटत असेल (मग ती गोष्ट देव देखील असो) तर ती मान्य करणे म्हणजे विवेकवाद. :)

आस्तिक

अस्तिक एका पुराणातील व्यक्तीचे नाव होते. देव किंवा परलोक मानणारा या अर्थी आस्तिक हाच शब्द आहे.
गरज असेल तर याकरिता की, केवळ तर्काने आणि बुद्धीने वागून दुसर्‍याच्या भावनांना ठेच पोचण्याची शक्यता असेल किंवा अशीच काही गरज भासत असेल तर...
महानता यासाठी की, वेळप्रसंगी तो स्वत:च्या मतांचा अनावश्यक दुराग्रह न बाळगता समाजाचे नुकसान होणार नाही अशा रीतीने समाजाशी जुळवून घेतो. -वाचक्‍नवी

आस्तिक/आस्तीक

शरद
आस्तिक
माझ्या माहितीप्रमाणॆ आस्तिक याचे अर्थ पुढीलप्रमाणे :
१] नरकाचे भय बाळगणारा [तत्वप्रकाशिका],
२] परलोकादिकांचे अस्तित्व मानणारा [न्यायकोश],
३] वेदांचे प्रामाण्य मानणारा [दर्शनांच्या संदर्भात,आस्तिक दर्शने..१]पूर्व मिमांसा, २] उत्तर मिमांसा[वेदांत], ३] सांख्य, ४] योग, ५] न्याय, ६] वैशेषिक.
यात कोठेही ईश्वराचा संबंध दिसत नाही.

आस्तीक
जरत्कारू ऋषींचा मुलगा आस्तीक. अस्तिक नव्हे. यानेच जनमेजयाच्या यज्ञात सर्प कुळ वाचविले.
कोणी जाणकार इतर माहिती देऊ शकेल ? [दुरुस्त करेल ?]
समित्पाणी

आस्तिक आणि अस्तिक

दोनदा छापला गेला म्हणून प्र.का.टा. आ.--वाचक्‍नवी

आस्तिक आणि अस्तिक

आस्तिकाचे वर दिलेले अर्थ अगदी बरोबर आहेत. त्याकाळी देव नावाची माणसे होती पण देव म्हणजे अतिमानवी शक्ती ही कल्पनाच नव्हती.
आस्तिक हा वासुकीच्या जरत्कारुनामक बहिणीचा मुलगा. तिच्या नवर्‍याचे नावही जरत्कारु. आस्तिकाने वासुकीच्या विनंतीमुळे जनमेजयाचा सर्पयज्ञ थांबवला.
अस्तिक ऊर्फ हरिमेध हे नाव स्कंदपुराणात तुलसीमाहात्म्याच्या संदर्भात आले आहे. सर्पयज्ञाशी या अस्तिकाचा काही संबंध नाही.

ऍझटेक

प. वि. वर्तकांच्या मते हे आस्तिक ऋषी नागांना, सापांना घेऊन पुढे पाताळात म्हणजे द. अमेरिकेत गेले आणि ऍझटेक या नावाने प्रसिद्ध पावले. :-)

हे वर्तकांचे मत - प्रियालीचे मुळीच नाही.

 
^ वर