विवेकवाद

आस्तिक
जगातील बहुसंख्य लोकांची ईश्वरावर श्रद्धा असते.जगनिर्माता आणि जगन्नियंता असा कोणी आहे . त्याच्या आज्ञेने सर्व काही घडते असे ते मानतात.
.......देवात्‌ विश्वस्य जननं ,देवो विश्वस्य पालक:।
........विश्वस्य विलयो देवे, देवो विश्वस्य कारणम्‌ ॥

यद्भयात्‌ वहति पवन:, सूर्यस्तपति यद्भयात्‌
भीतो यस्मात्‍ दहत्यग्नि: स देव: शरणं मम ॥

अशी त्यांची धारणा असते.आत्मा, मरणोत्तर जीवन,स्वर्ग, नरक,मोक्ष यांवर त्यांचा विश्वास असतो.त्यांना आस्तिक,ईशरवादी, धार्मिक असे म्हणतात.
नास्तिक
या उलट ईश्वराचे असित्व न मानणारे काही असतात. त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे.(सर्वाधिक कॅनडात ४१% असे वाचले.) " सर्व विश्व निसर्ग नियमांनी बद्ध आहे .माणसाला हे नियम शोधता येतात.वैज्ञानिक हे सर्वात विश्वसनीय ज्ञान होय."अशी त्यांची धारणा असते.ते धार्मिक नसतात.त्यांना नास्तिक, निरीश्वरवादी,बुद्धिप्रामाण्यवादी, विवेकवादी असे म्हणतात.

विवेकवादी विचारसरणी
**माणसाला उपजत बुद्धी असते.कुतूहल असते.निरीक्षणाची आवड असते.त्यातून अनुभव मिळतो.त्यावर तर्क बुद्धीने विचार करून ज्ञान मिळते.ते ज्ञानेंद्रियांद्वारेच मिळूशकते.अतीन्द्रियज्ञान,दृष्टान्त, साक्षात्कार, या गोष्टी विवेकवादात नाहीत.
** आपले डोळे आणि मन उघडे ठेवावे.श्रद्धा आणि भावना यांत वाहून जाऊं नये.निरीक्षण करावे.तर्क बुद्धीने विचार करावा. मगच सत्यासत्य ठरवावे.वैज्ञानिकांची मते ग्राह्य मानावी.
** विवेकवाद वस्तुनिष्ठ आहे. विवेवादी तत्त्वे कोणालाही तपासता येतात.प्रत्येक विधानामागे पुरेसा तर्क असतो.म्हणून ही तर्क शुद्ध विचारसरणी आहे.
**विवेकवादी विचार पूर्णतया इहलौकिक असतात.विवेकवाद परलोक मानत नाही.मरणापूर्वी जे घडते तेच अर्थपूर्ण असू शकते. मरणोत्तर जीवन नसतेच.असा हा अनुभवाधारित विचार आहे.
**धर्म ,राष्ट्र,वंश,जात,भेदांवर माणसा माणसात भिंती उभ्या करणार्‍या भावूक कोत्या निष्ठा विवेकवादाला मान्य नाहीत.
**....."शूर अम्ही सरदार अम्हांला काय कुणाची भीती.
..........देव, देश अन धर्मापायी शीर घेतलं हाती."

असले मारण्या मरण्याचे उदात्तीकरण विवेकवादी व्यक्तीला प्रभावित करू शकत नाही.त्या पेक्षा आपण एकमेकांशी जुळवून घेऊन,समाजत सुधारण घडवून,गुण्यागोविंदाने राहायला हवे.
**अंधश्रद्धा,पूर्वग्रह,हेकट मनोवृत्ती,अनाठायीं आत्मगौरव या प्रवृत्ती विवेकवादात बसत नाहीत.
**......"अहा कटकटा हे ओखटे। इये मृत्युलोकीचे उफराटे।
............येथ अर्जुना जरी अवचटे। जन्मलासी तू॥
...........तरी झडझडोनी वाईला नीघ।..
..................."(ज्ञाने. अ.९,ओ.५१५)
असली पारमार्थिक पलायनवादी वृत्ती विवेकवादाला मान्य नाही.
आपणा सर्वांना या मृत्युलोकातच राहायचे आहे.इथले जीवन अधिक सुखी, आनंदी आणि उन्नत करायचे आहे.
** विवेकवादी जीवन म्हणजे प्रेमभावाने उद्युक्त झालेले आणि बुद्धीचे मार्गदर्शन लाभलेले सुजाण,सुसंस्कृत जीवन.

लेखनविषय: दुवे:

Comments

मूळ अर्थ आणि रूढ अर्थ

मराठी असे आमुची मायबोली
***********************************
श्री.शरद यांनी 'आस्तिक,नास्तिक' शब्दांचे दिलेले मूळ अर्थ योग्यच आहेत. पण कालौघांत काही शब्दांचे मूळ अर्थ बदलतात.'विवेकवाद' लेखात आस्तिक ,नास्तिक शब्द सद्यः प्रचलित अर्थाने योजले आहेत.त्यांच्या अर्थांविषयी कुणाच्याही मनात संदेह नसावा.

खरा नास्तिक?

श्री. यनावाला म्हणतात तसला खरा विवेकवादी सापडणे अशक्यप्राय आहे.
जो कधी 'अरे माझ्या देवा', 'देवजाणे ', 'दैवी देणगी', 'देवाघरी गेला', 'देवाची मर्जी' हे शब्द उच्चारत नाही तो खरा विवेकवादी. ज्याचा 'बाप्तिस्मा' झालेला नाही, ज्याच्या लग्नात पाद्री नव्हता, जो मेल्यावर स्वत:ला जाळण्याऐवजी लास्ट जज्‌मेन्टची वाट पहात थडग्यात झोपून रहात नाही, जो अमेरिकेत राहून कामकाजाच्या पहिल्या दिवशी जी प्लेज ऑफ़ ऍलिजिअन्स घेतो त्यावेळी त्यातले 'वन नेशन अन्डर गॉड' हे शब्द उच्चारत नाही‌, तो नास्तिक. ज्याने शाळेत सक्तीने किंवा शाळेबाहेर मर्जीने बायबल वाचलेले नाही असा ख्रिश्चन सापडणे कठीण. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष दर वर्षी १२ फ़ेब्रुवारीच्या आसपासच्या पवित्र रविवारी चर्चमध्ये जाऊन काही विधी करतात, त्यांना विवेकी म्हणावे? कुठल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुले प्रार्थनेत 'थॅंक यू गॉड फ़ॉर एव्हरीथिंग' म्हणत नाहीत? अमेरिकन शाळांमधून लहान लहान मुलांना सक्तीने बायबल शिकवले जाते, थोडासा विरोध आहे तो एन्‌सीबीसीपीएस पुरस्कृत बायबलच्या स्वरूपाला, बायबलला नाही! भारताचे राष्ट्रगीत, जर पंचम जॉर्जला उद्देशून नसेल तर ते, देवाला उद्देशून आहे. वन्दे मातरम्‌मध्येसुद्धा मातृभूमीला देव समजून नमस्कार केलेला आहे(मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव, अतिथीदेवो भव---तैत्तरीय उपनिषद-१.११ अनुवाक ११).
संशोधनसंस्थेतच काय पण आमच्या मामलेदार कचेरीतल्या गोदामभर कागदपत्रात किंवा संदर्भ ग्रंथाच्या कपाटात ऋग्वेद सापडणार नाही, तेंव्हा प्रयोगशाळेत धार्मिक ग्रंथ नसतील तर त्याचे काय एवढे कौतुक?
आता सांगा, खरा यनापुरस्कृत विवेकवादी कुठे सापडेल?--वाचक्‍नवी

हाहा :))

प्रतिसाद आवडला.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मस्त प्रतिसाद

आवडला.

नी र वर्‍हाडपांडे

नी र वर्‍हाडपांडे यांचे

विवेकवाद

या पुस्तकातील वाक्य

दोन प्रकारचे विवेकवाद

विवेकवाद हा शब्द इंग्रजीतल्या rationalism या शब्दाला प्रतिशब्द म्हणुन वापरण्यात येतो. पण rationalism या इंग्रजी शब्दाचे दोन अगदी वेगळे अर्थ होतात. त्यामुळे काही लोकांचा घोटाळा होतो. पाश्चात्य तत्त्वज्ञानामध्ये rationalism म्हणजे विचारवाद व empiricism म्हणजे अनुभववाद असे दोन वाद आहेत. Rationalism चे हेगल सारखे आत्यंतिक प्रवर्तक असे मानतात की केवळ तर्काने सर्व जगाचे ज्ञान होउ शकते. एखाद्या माणसाला अमर्याद बुद्धी असेल तर तो केवळ विचार करुन सर्व जगाच्या स्वरुपाचे ज्ञान करुन घेउ शकेल.याच्या उलट empiricism चे आत्यंतिक् प्रवर्तक असे मानतात कि केवळ तर्काने ज्ञान होउ शकत नाही. जगाच्या स्वरुपाचे ज्ञान व्हायला अनुभव आवश्यक् आहे.
----------------------------------------------------------------------
आजच्या सुधारक चे संस्थापक दि. य देशपांडे हे विवेकवाद हाच शब्द वापरत. बुद्धीप्रामाण्यवाद म्हणले की कोणाची बुद्धी प्रमाण मानायची?
विवेकवादात सुद्धा विवेक म्हणजे काय? कोणाचा विवेक प्रमाण मानायचा? हे प्रश्न उपस्थित होतातच्.

प्रकाश घाटपांडे

आइनस्टाइन,देव आणि धर्म

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
विवेकवाद च. प्र. वरील प्रतिसादात श्री. विकास यांनी अल्बर्ट आइन्स्टाइन यांना धार्मिक म्हटले आहे.आइन्स्टाइन यांच्या हयातीतच त्यांना काहींनी धार्मिकांच्या पंक्तीत बसविले होते.या विषयींचा सविस्तर ऊहापोह रिचर्ड डॉकिन्स यांच्या ’द गॉड डिल्यूजन’ या पुस्तकात (प्रकरण:१) आहे.त्यातील अल्पभागाचे लिप्यंतर:
********************************
आइन्स्टाइन
”इट वॉज, ऑफ़कोर्स, अ लाय व्हाट यू रेड अबाउट माय रिलीजिअस कन्व्हिक्शन्स.अ लाय व्हिच इज बिइंग सिस्टिमॅटिकलि रिपीटेड.आय (आइनस्टाइन) डू नॉट बिलिव्ह इन अ पर्सनल गॉड."
...................................................................
ऍन अमेरिकन रोमन कॅथॉलिक लॉयर, रोट टु आइन्स्टाइन:
"वुई डीपली रिग्रेट दॅट यू मेड युवर स्टेटमेंट इन व्हिच यू रिडिक्यूल द आयडिया ऑफ़ पर्सनल गॉड .
इन द पास्ट टेन ईयर्स नथिंग हॅझ बीन सो कॅल्क्युलेटेड टु मेक पीपल थिंक दॅट हिटलर हॅड सम रीझन टु एक्पेल् द ज्यूज फ़्रॉम जर्मनी ऍज युवर स्टेटमेंट.आय से दॅट युवर स्टेटमेंट कॉंन्सिट्युटस यू ऍज वन ऑफ़ द ग्रेटेस्ट्स सौर्सेस ऑफ़ डिस्कॉर्ड इन अमेरिका.
................................................................................................
फ़ौण्डर ऑफ़ द कॅव्हलरी टॅबरनॅकल असोशिएशनइन ओक्लाहामा, रोट:
"प्रोफ़ेसर आइनस्टाइन, वुई विल नॉट गिव्ह अप अवर बिलीफ़ इन अवर गॉड. इफ़ यू डू नॉट बिलीव्ह इन द गॉड ऑफ़ द पीपल ऑफ़ धिस नेशन, गो बॅक व्हेअर यू केम फ़्रॉम.प्रोफ़ेसर आइनस्टाइन, एव्हरी ख्रिश्चन इन अमेरिका वुईल इमीजिएटली रिप्लाय टु यू " टेक युवर क्रेझी, फ़ॅलॅशिअस थिअरी ऑफ़ इव्होल्यूशन & गो बॅक टु जर्मनी व्हेअर यू केम फ़्रॉम., ऑर स्टॉप ट्राइंग टु ब्रेक डाऊन द फ़ेथ ऑफ़ पीपल हू गेव्ह यू अ वेलकम व्हेन यू वेअर फ़ोर्स्ड टु फ़्ली युवर नेटिव्ह लॅण्ड"
********************************************************************
देव आणि धर्म यांच्या विषयी आइनस्टाईनयांचे काही विचार:

*धर्मसंस्थांनी विज्ञानाला नेहमीच विरोध केला आहे.विज्ञानभक्तांचा छळ केला आहे.
........................................................................................................................
*कार्यकारणभावाचा नियम संपूर्ण विश्वाला निरपवादपणे लागू होतो असा दृढ विश्वास असलेली व्यक्ती; नैसर्गिक घटनांच्या प्रवाहात ढवळाढवळ करणार्‍या देवाची संकल्पना क्षणभरही मान्य करणार नाही.
....................................................................................................
शिक्षेची भीती आणि मरणोत्तर बक्षिसाची आशा यांच्या जोरावर माणसावर नियंत्रण ठेवण्याची गरज पडली तर ते माणसालाच कमीपणा आणणारे ठरेल.
*******************************************************************

क्या बात है!

मस्त!


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आइनस्टाईन

आता आपण आइनस्टाईन मधे आणलाच तर बघूया काय तो म्हणतो ते: ( हे सांगायचे कारण देव आहे का नाही हा मुद्दा नाही. त्यातील कोण बरोबर हा तर त्याहून नाही. कोणी काय मनात ठेवावे हा ज्याचा त्याचा प्रश्न - ज्प् पर्यंत मला कोणी मी काय या संदर्भात करावे ते सांगायला येत नाही अथवा रीडीक्यूल करत नाही. उद्देश फक्त इतकाच की विज्ञाननिष्ठांची विज्ञानावर निष्ठा असूनही देव समजण्यात त्यांना कमी पणा वाटत नाही, लाज वाटत नाही आणि त्यांच्या कार्याच्या आड येत नाही).

Whoever undertakes to set himself up as a judge of Truth and Knowledge is shipwrecked by the laughter of the Gods.
At any rate, I am convinced that He [God] does not play dice. - In a letter to Max Born, 1926
आणि हे अजून एकच...
"Science without religion is lame; religion without science is blind."

आता नॅशनल जिऑग्राफिक मधील "इव्हॉल्यूशन आणि रिलीजन कॅन को एक्झिस्ट" हा लेख पहा. लेखक कोण आहे? "Joel Primack has a long and distinguished career as an astrophysicist. A University of California, Santa Cruz, professor, he co-developed the cold dark matter theory that seeks to explain the formation and structure of the universe." आता हा माणूस काय अविवेकी आहे कारण तो तुमच्या व्याख्येप्रमाणे नास्तिक आहे?

माझा परत परत इतकाच मुद्दा आहे. जी काही तुमची कारणे असतील ती असोत पण माणसे श्रद्ध ठेवतात का नाही यावरून असे लेबलींग करणे, त्यांचे वर्गीकरण करणे आणि त्यातून कळत नकळत तुच्छ भाव दाखवणे, यात तुम्हाला खरेच बुद्धीवाद दिसतो?

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

वैश्विक धार्मिक जाणीव

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
आइन्स्टाइन यांची काही धर्मविषयक विधाने श्री. विकास यांनी उद्‌धृत केली आहेत. त्या संदर्भात:
..............................................................................................................
आइन्स्टाइन यांच्या "धर्म आणि विज्ञान" या विषयावरील एका लेखाचे श्री. चिंतामणी देशमुख यांनी केलेले मराठी भाषांतर ’आजचा सुधारक(नोव्हें.२००५)’ या अंकात प्रसिद्ध झाले आहे.त्यातील काही भाग खाली दिला आहे..या लेखनावरून आइन्स्टाइन यांना अभिप्रेत असलेला धर्म कोणता याची कल्पना येऊ शकते.
.......................................

....".धर्मसंस्थांनी विज्ञानाला नेहमीच विरोध केला. विज्ञान भक्तांचा छळ केला. पण मी मात्र असे ठामपणे मानतो की वैज्ञानिक संशोधनामागची सर्वांत प्रबळ आणि उच्च दर्जाची प्रेरणा ही वैश्विक धर्माची आहे.
शुद्ध तात्त्विक पातळीवरचे वैज्ञानिक संशोधन करण्यासाठी प्रचंड प्रयत्‍न आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण समर्पणाची भावना लागते.
अवकाशातील ग्रह- तार्‍यांच्या हालचाली मागची तत्त्वे उलगडून दाखविण्यासाठी केप्लर आणि न्यूटन यांनी कित्येक वर्षें एकांडेपणाने प्रचंड कष्ट उपसले. सत्य जाणून घेण्याची केव्हढी अनावर ओढ! विश्वव्यवहार विशिष्ट नियमांनुसारच चालत असणार या विषयी केव्हढा प्रगाढ विश्वास!!
अशा उच्चतम ध्येयांच्या साधनेसाठी लागणारी अंत:स्फूर्ती आणि वारंवार आलेल्या अपयशांनी खचून न जाता आपल्या उद्दिष्टांशी एकनिष्ठ राहाण्याची शक्ती या गोष्टींची कल्पना,केवळ अशा प्रकारच्या साधनेला आयुष्य वाहिलेल्यानांच येऊं शकेल.वैश्विक धार्मिक जाणिवेतूनच अशी मन:शक्ती प्राप्त होऊ शकते.
आजच्या या भोगवादी जगात खरोखरीची सखोल धार्मिकवृत्ती बाळगणारे लोक म्हणजे गंभीर संशोधनाला वाहून घेणारे वैज्ञानिकच होत.".....

धर्म आणि नीतिमत्ता

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
.आपल्या प्रतिसादात श्री. नवीन यांनी लिहिले आहे:
. आता बेकायदेशीर/अनैतिक मानल्या जाणार्‍या बर्‍याच गोष्टी न घडण्यासाठी कायद्याच्या बडग्यापेक्षा धर्माच्या नियमातून बनलेली नैतिकतेची चौकट हे एकमेव कारण आहे.


श्री.आ’कर्ण यांनी याच मताची री ओढली आहे. त्या संदर्भात:-------
.........................................................................................................

* आपल्या देशात मंदिरांची संख्या वाढत आहे काय?
होय. निश्चितच. आधीच अनेक देवळे असताना ग्रामीण तसेच शहरी भागांत नवनवीन देवळे उभी राहात आहेत. रस्त्यावर ,फ़ुटपाथवर सुद्धा देवळे आहेत. जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार होतो आहे.देवळे आणि देवस्थानांची उत्पन्ने भरमसाट वाढत आहेत.
* आपल्या देशात धार्मिकांची संख्या वाढत आहे काय?
शिवरात्रीला शंकर, एकादशीला विठ्ठल, अंगारकीला गणपती,दत्तजयंतीला दत्त, रामनवमीला श्रीराम,अशा अनेक देवांपुढे भक्तांच्या लांबच लांब रांगा लागतात.शिवाय तिरुपती बालाजी, सिद्धिविनायक या देवांच्या दर्शनासाठी कायमच रांगा असतात. या देवस्थानांचे उत्पन्न कित्येक हजार कोटी रुपये आहे.
*आपल्या देशात धार्मिक उत्सव मोठ्याप्रमाणात साजरे होतात काय?
हा काय प्रश्न झाला? तुम्ही टीव्ही पाहात नाही काय? अहो आपल्या देशात धार्मिक उत्सव फार म्हणजे फारच मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. गणेशोत्सव, नवरात्र, दहिहंडी,होळी,दसरा, असे अनेक उत्सव आहेतच. शिवाय प्रकटदिन,पालख्या, वार्‍या,रथ, पादुका, मिरवणुका इ, कार्यक्रम असतात.सत्यनारायण पूजा हा आणखी एक प्रकार.वर्षभर धार्मिक उत्सव चालूच असतात.
हल्ली तर अशा धार्मिक उत्सवांनी उच्छाद मांडला आहे.आपल्या देशात देव आणि धार्मिकता या गोष्टी उदंड आहेत.
असे असताना:
** आपल्या देशात सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे .जो तो पैशांसाठी दुसर्‍याला फ़सवायला टपलेला आहे.भेसळ, बनावट औषधे,खोटेपणा सगळीकडे आहे.
**आपल्याकडे एडस्‌ग्रस्त,एच्‌आय्‌व्ही + यांची संख्या भयावह आहे. या रोगांचे मुख्य कारण व्यभिचार हेच आहे.
**आपल्याकडे लैंगिक गुन्हे,बालिकांवरील अत्याचार यांचे प्रमाण वाढते आहे.
** बहुतेक आश्रम/मठ यांतील बाबा, बुवा,महाराज, बापू हे बलात्कारटू असतात हे वारंवार सिद्ध झाले आहे.
**पूर्वी आचार्य अत्रे यांनी सत्य घटनांवर आधारित असे "बुवा तेथे बाया” हे नाटक लिहून जनजागृती केली होती. पण भोळसट धार्मिक अजून बुवांच्या मागे आहेतच.
म्हणजे एकीकडे धार्मिकतेला ऊत आला आहे. तर दुसरीकडे हे असले प्रकार वाढत आहेत.
.......आता या दोन गोष्टींची सांगड कशी घालायची? यावरून निष्कर्ष कोणता काढायचा? धर्म आणि नीतिमत्ता यांचा काही संबंध दाखविता येतो का?

जगाला प्रेम अर्पावे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे

या श्री.सर्किट यांच्या विचाराशी मी सर्वभावे सहमत आहे.

प्रेम?

प्रेम ही संज्ञा वस्तुनिष्ठ आहे?
बुद्धीपामाण्यवादींनी निर्णय घेताना बुद्धीऐवजी प्रेमाला महत्व देणे विवेकी वाटते का याविषयी खुलासा करावा

माझ्यामते प्रेम आहे आणि प्रेम आणि बुद्धीमध्ये प्रेम जिंकतं तेव्हा बरंय बॉ आस्तिक आहोत... ;)

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

हेही बरोबर आहे पण ...

तुम्ही दिलेल्या समस्या वास्तविक आहेत आणि या समस्या भारतात दिवसेंदिवस वाढत आहेत हे खरेच आहे. पण समाजात यापैकी कोणताही गुन्हा न केलेले लोक आहेत आणि गुन्हेगारांची संख्या एकूण लोकसंख्येच्या मानाने अजूनही कमी आहे. गुन्हेगार नसलेले बहुसंख्य लोक लौकिकार्थाने आस्तिक आहेत. आणि त्यांना गुन्हा करण्यापासून रोखून धरणारी जी काही नैतिकतेची चौकट आहे ती त्यांनी विचारपूर्वक स्वीकारली नसून धार्मिक समजुतींमुळे आहे (सर्वांना लागू नाही!). समजा जर ही चौकट नाहीशी झाली तर अश्या लोकांना नैतिकतेसाठी काही कारणच उरणार नाही. (कायद्याची आणि इतर अपायकारक परिणामांची भीती वगळता.) मग गुन्हेगारांची संख्या आता आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने वाढेल इतकेच मला म्हणायचे आहे.

म्हणून वैचारिक आणि सामाजिक जाणीव प्रगल्भ झाल्याशिवाय धर्माची चौकट मोडणे सामजिक स्वास्थ्यासाठी चांगले नाही असे मला वाटते. बुद्धिप्रामाण्यवाद्यांनी हळुहळू, अस्तिकवाद्यांच्या कलाने घेऊन ही मानसिक तयारी करून घ्यावी.

नावडलेला प्रतिसाद

[१] गुन्हेगार नसलेले बहुसंख्य लोक लौकिकार्थाने आस्तिक आहेत.

[२] गुन्हेगार असलेले बहुसंख्य लोकही लौकिकार्थाने आस्तिक आहेत. ही दोन्ही वाक्ये एकमेकांइतकीच अर्थशून्य आहेत.

जोडून कुठली वाक्ये अर्थपूर्ण असती? जर [३] लौकिकार्थाने आस्तिक नसलेले लोक बहुसंख्य प्रमाणात गुन्हेगार असते, किंवा [४] गुन्हेगार असलेले बहुसंख्य लोक लौकिक अर्थाने आस्तिक नसले, तर तुमचे मत पटण्यासारखे असते.
मग तुम्हाला म्हणता आले असते, की आस्तिक्याने (साधारणपणे) नैतिक अधिष्ठान येते, जे आस्तिक्य नसल्याने येत नाही.

माझ्या अनुभवात : लौकिकार्थाने आस्तिक नसलेले लोकही बहुसंख्य प्रमाणत गुन्हेगार नसतात. नैतिकतेचा लौकिक-अर्थाने-आस्तिक्याशी बळेच संबंध लावून लौकिक-अर्थाने-आस्तिक नसलेल्यांची निष्कारण नालस्ती केली जाते आहे, म्हणून मला वरील प्रतिसाद नावडलेला आहे.

समांतर वाद देतो : हा खरा वाद आहे - माझ्या एका शेजार्‍याने (अत्यंक सौम्य आवाजात, प्रेमळपणे) पण जवळपास याच शब्दांत मला सांगितलेला आहे. हा कल्पनाविलास नव्हे.
अमेरिकेत गुन्हेगार नसलेले बहुसंख्य लोक प्रोटेस्टंट ख्रिस्ती आहेत.
या लोकांना गुन्हा करण्यापासून रोखून धरणारी चौकट त्यांनी विचारपूर्वक स्वीकारलेली प्रोटेस्टंट धार्मिक समजूत होय. समजा ही चौकट नाहिशी झाली तर अशा लोकांना नैतिकतेसाठी काही कारणच उरणार नाही. (नरकात आणि अखंड पाप-दंडाची भीती ही कुठल्याही कायद्याच्या भीतीपेक्षा अधिक मूलभूत चौकट देतो. बौद्धधर्मात वगैरे अशी कुठली संकल्पना नाही म्हणे. माझ्या शेजार्‍याने अभ्यास केलेल्यापैकी [!] फक्त प्रोटेस्टंट धर्मात[च] अशी चौकट आहे.) प्रोटेस्टंट धर्म नसता गुन्हेगारांची संख्या आता आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पट वाढेल इतकेच... वगैरे, वगैरे.

वरील नवीन यांनी दिलेल्या वादात आणि माझ्या शेजार्‍याने मोठ्या दयाळूपणे सांगितलेल्या या "प्रोटेस्टंट" वादात काय फरक आहे? मला तरी माझ्या शेजार्‍याचे म्हणणे अतिशय अपमानकारक वाटले. त्याला नरकाच्या भीतीच्या चौकटीशिवाय सदाचार पाळता येत नसेल, म्हणजे त्या विशिष्ट चौकटीशिवाय सदाचार पाळता येत नाही, ही बाकी सर्व लोकांविषयी एक हीन भावना आहे.

"गुन्हेगारी वाढेल" हा आरोप बेजबाबदार वाटतो. माझ्या शेजार्‍याने जर मला दाखवून दिले असते, की अनंत नरक न मानणारे लोक [प्रोटेस्टंट/अनंत नरक मानणार्‍या लोकांपेक्षा अधिक] दुराचारी असतात, तर मी त्याच्या म्हणण्याला काही थोडा मान देईन. त्याच प्रकारे, नवीन यांनी "लौकिक अर्थाने आस्तिक नसलेले लोक" अधिक दुराचारी असतात, असे दाखवले तर त्यांचे म्हणणे मानण्यास तयार आहे.

नवीन म्हणतातच :
> (सर्वांना लागू नाही!)
हे "लागू नसलेले सर्व" जर "लौकिक अर्थाने आस्तिक" नसलेल्यांपैकी बहुसंख्य असतील, तर "याच चौकटी"ची ऐशीतैशी. "सदाचारासाठी याच चौकटीची गरज आहे" असे म्हणायचे असेल, तर "लौकिक अर्थाने आस्तिक्याशिवाय सदाचार बाळगणारे" अपवादाने असतात, असे दाखवून द्यावे.

नैतिकतेचा संबंध

नैतिकतेचा लौकिक-अर्थाने-आस्तिक्याशी बळेच संबंध लावून लौकिक-अर्थाने-आस्तिक नसलेल्यांची निष्कारण नालस्ती केली जाते आहे, म्हणून मला वरील प्रतिसाद नावडलेला आहे.

मला आस्तिक/नास्तिक कोणाचीही नालस्ती करायची नाही. कृपया माझ्या प्रतिसादातील पुढील वाक्ये पाहावीत.

गुन्हेगार नसलेले बहुसंख्य लोक लौकिकार्थाने आस्तिक आहेत. आणि त्यांना गुन्हा करण्यापासून रोखून धरणारी जी काही नैतिकतेची चौकट आहे ती त्यांनी विचारपूर्वक स्वीकारली नसून धार्मिक समजुतींमुळे आहे (सर्वांना लागू नाही!).

पहिले वाक्य माझ्या समजुतीप्रमाणे भारतासाठी खरे असावे. (खरे नसल्यास 'बहुसंख्य लोक' च्या जागी 'जे लोक' घालून वाचावे, त्याने फारसा फरक पडू नये.)
दुसर्‍या वाक्यातून पुढील दोन अर्थ निघतात -
१. काही आस्तिक लोक धार्मिक समजुतींमुळे नैतिकतेची चौकट कदाचित अजाणतेपणी (धर्माचे नियम म्हणून) पाळत असतात.
२. काही आस्तिक लोकांनी ही नैतिक चौकट विचारपूर्वक स्वीकारली असते.

(यातून पुढे धर्माची चौकट नष्ट झाली तर पहिल्या प्रकारच्या लोकांना नैतिकतेसाठी काही कारणच उरणार नाही, दुसर्‍या प्रकारचे लोकांनी नैतिकतेची चौकट विचारपूर्वक स्वीकारली असल्याने ते कदाचित तश्या परिस्थितीतही नैतिक राहतील इ.इ. सदर प्रतिसादात अवांतर)

यातून कुठेही नास्तिक लोक नैतिक नसतात असा अर्थ निघेल असे वाटत नाही.

माझ्या प्रतिसादातील पुढील वाक्यांवरून अधिक स्पष्टता येईल असे वाटते

म्हणून वैचारिक आणि सामाजिक जाणीव प्रगल्भ झाल्याशिवाय धर्माची चौकट मोडणे सामजिक स्वास्थ्यासाठी चांगले नाही असे मला वाटते.

अशी जाणीव नसलेली आस्तिक व्यक्ती कदाचित 'कर्माचे फळ मिळतेच' आणि 'देव सगळे पाहत आहे' या कारणाने काही गुन्हा करणार नाहीत.
अशी जाणीव नसलेल्या नास्तिक व्यक्तीस अश्या कोणत्याही कारणाच्या अभावाने गुन्हा न करण्याला (कायद्याची आणि इतर अपायकारक परिणामांची भीती वगळता) काहीच कारण राहणार नाही.
यातून वैचारिक आणि सामाजिक जाणीव प्रगल्भ असलेल्या नास्तिक व्यक्ती नैतिकतेची चौकट मानतील असाही अर्थ काढता येतो.

तात्पर्य - या चर्चेतील माझ्या पहिल्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे "विवेक अस्तिक आणि नास्तिक अश्या दोन्ही प्रकारच्या माणसांकडे असू किंवा नसू शकतो." त्याचप्रमाणे "नैतिकता आस्तिक आणि नास्तिक अश्या दोन्ही प्रकारच्या लोकांकडे असू किंवा नसू शकते" असे माझे मानणे आहे.

अनैतिकतेचा संबंध

(खालील युक्तिवाद वरील युक्तिवादाइतकाच तर्कदुष्ट आहे. पण मुद्दे [तपशील-फॅक्ट्स] तितकेच खरे आहेत, आणि युक्तिवादाचे शब्द अक्षरशः वरून उतरवलेले आहेत.)
------------
गुन्हेगार असलेले बहुसंख्य लोक लौकिकार्थाने आस्तिक आहेत. आणि त्यांना गुन्हा करण्यापासून रोखून न धरणारी जी काही कमकुवत नैतिकतेची चौकट आहे ती त्यांनी विचारपूर्वक स्वीकारली नसून धार्मिक समजुतींमुळे आहे (सर्वांना लागू नाही!).

पहिले वाक्य माझ्या समजुतीप्रमाणे भारतासाठी खरे असावे. (खरे नसल्यास 'बहुसंख्य लोक' च्या जागी 'जे लोक' घालून वाचावे, त्याने फारसा फरक पडू नये.)

दुसर्‍या वाक्यातून पुढील दोन अर्थ निघतात -
१. काही आस्तिक लोक धार्मिक समजुतींमुळे कमकुवत नैतिकतेची चौकट कदाचित अजाणतेपणी (धर्माचे नियम म्हणून) पाळत असतात. (उदाहरणार्थ सुनेला सती पाठवताना ते धार्मिक कर्तव्य असल्याचे मानत असतील.)
२. काही आस्तिक लोकांनी ही कमकुवत नैतिक चौकट विचारपूर्वक स्वीकारली असते. (तिरुपती बालाजीला आपल्या व्यवहारात भागीदार मानणारा अफरातफर करणारा व्यापारी.)

(यातून पुढे धर्माची चौकट नष्ट झाली तर पहिल्या प्रकारच्या लोकांना त्या विशिष्ट अनैतिकतेसाठी काही कारणच उरणार नाही, दुसर्‍या प्रकारचे लोकांनी कमकुवत नैतिकतेची चौकट विचारपूर्वक स्वीकारली असल्याने ते कदाचित तश्या परिस्थितीतही अनैतिक राहतील इ.इ. सदर प्रतिसादात अवांतर)

यातून कुठेही नास्तिक लोक अनैतिक नसतात असा अर्थ निघेल असे वाटत नाही. (हे वाक्य तर्कदुष्ट आहे, किंवा असंदर्भ आहे.)

पुढील वाक्यांवरून अधिक स्पष्टता येईल असे वाटते

म्हणून वैचारिक आणि सामाजिक जाणीव प्रगल्भ झाल्याशिवाय धर्माची चौकट जोडणे सामजिक स्वास्थ्यासाठी चांगले नाही असे मला वाटते.

अशी जाणीव नसलेली आस्तिक व्यक्ती कदाचित 'कर्माचे फळ मिळतेच' आणि 'देव सगळे पाहत आहे' (म्हणजे सती पाठवणे किंवा तिरुपती बालाजीला अफरातफरीतली खंडणी देणे ही कर्मे, देव ही कर्मे पाहात आहे) या कारणाने ते ते गुन्हे करत राहातील.
अशी जाणीव नसलेल्या नास्तिक व्यक्तीस अश्या कोणत्याही कारणाच्या अभावाने हे गुन्हे करण्याला (म्हणजे सुनेला सती पाठवणे, किंवा तिरुपती बालाजीला अफरातफरीत भागीदार करण्याला) काहीच कारण राहणार नाही.
यातून वैचारिक आणि सामाजिक जाणीव प्रगल्भ असलेल्या नास्तिक व्यक्ती कमकुवत नैतिकतेची चौकट मानतील असाही अर्थ काढता येतो. (पूर्णपणे तर्कदुष्ट वाक्य.)
---
या वरील परिच्छेदात तुमच्या प्रतिसादातल्या शब्दांची आदलाबदल केली आहे. त्याचा आचरटपणा स्पष्ट असला तरीही युक्तिवाद तंतोतंत वरीलप्रमाणेच आहे हे लक्षात यावे. आचरटपणामुळे तर्क नेमका कुठे दुष्ट होतो, तो डोळ्यासमोर लगेच येते. हा युक्तिवाद जितका दुष्ट तितकाच वरील युक्तिवाद तर्कदुष्ट आहे.

"सामान्य माणसे प्रगल्भ नसतात", "नास्तिकास नैतिक वागण्यासाठी विशेष प्रगल्भ असावे लागते, बाकीच्या 'सामान्यां'इतके प्रगल्भ असून पुरत नाही", अशी काही गृहीतके आहेत किंवा निष्कर्ष निघतात. म्हणजे नैतिक नास्तिकतेसाठी जणूकाही खास बुद्धिमत्ता सिद्ध असावी लागते... ही 'सामान्यां'ची हेटाळणी आहे, किंवा नास्तिकांकडून असामान्य असण्याची अन्याय्य अपेक्षा आहे.

"अप्रगल्भ=सामान्य मतीचे नास्तिक अनैतिक असतात" असा तुमच्याकडे अनुभव असेल तर अर्थातच तुमची तशी अपेक्षा असणे योग्यच आहे. पण हे माझ्या अनुभवाच्या विपरित आहे.

समजुतीत बदल

आता आस्तिक असलेल्या सर्व लोकांनी देव आणि धर्म मानणे (आहे त्या मानसिक/वैचारिक स्थितीत) सोडून दिले तर एकंदर समाजावर (नैतिकता, गुन्हेगारी इ. बाबतीत) काही बदल होण्याची शक्यता आहे का? असल्यास काय बदल होतील आणि का?

अ हा एक आस्तिक व्यापारी आहे आणि ब हा नास्तिक व्यापारी आहे. हे दोघेही सारख्याच प्रकारचा व्यापार करतात. आपण विकत असलेल्या मालात भेसळ केल्यास अधिक फायदा होऊ शकतो असे दोघांनाही समजले तर अ आणि ब यांना तसे करण्यापासून परावृत्त करू शकणारे फॅक्टर कोणते असू शकतील असे तुम्हाला वाटते?

याविषयी तुमच्या युक्तिवादानुसार/मान्यतेनुसार मते दिल्यास माझ्या समजुतीत बदल करता येईल.

धनंजयराव,

नवीन यांच्या प्रतिसादातले मला सर्वात महत्त्वाचे वाटलेले वाक्य हे:

म्हणून वैचारिक आणि सामाजिक जाणीव प्रगल्भ झाल्याशिवाय धर्माची चौकट मोडणे सामजिक स्वास्थ्यासाठी चांगले नाही असे मला वाटते. बुद्धिप्रामाण्यवाद्यांनी हळुहळू, अस्तिकवाद्यांच्या कलाने घेऊन ही मानसिक तयारी करून घ्यावी.

माणसाने केलेल्या कायद्यांपेक्षा देवाच्या कायद्यांना महत्त्व देणारे लोक जास्त आहेत. यासाठी विदा द्यावासा लागू नये.
गुन्हेगार असलेले बहुसंख्य लोकही लौकिकार्थाने आस्तिक आहेत असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या गुन्हेगारांना कायद्याची तर सोडाच पण धर्माने घालून दिलेल्या - खरे बोला, गुन्हा करू नका, पाप करू नका वगैरे नियमांची - अजिबात भीती नाही. त्यामुळे त्यांचे आस्तिक्य हे खोटे आहे. खर्‍या अर्थाने त्यांचाही देवावर/धर्मावर विश्वास नाही. मात्र केलेल्या कृत्याची मनामध्ये बोच जाणवत असल्याने त्यांना पश्चाताप व्यक्त करावासा वाटतो. याउलट अनेक 'आस्तिक' लोक गुन्हा करत नाहीत याचे कारण त्यांना देवाचे अस्तित्व, धार्मिक कायदा मान्य आहे. जजमेंट डे च्या दिवशी / चित्रगुप्तासमोर या सर्व गोष्टींचा हिशेब आपल्याला द्यावा लागणार याचे भय वाटून ते गुन्हा करत नाहीत.

मात्र पर्याय उभा न राहता, ज्यांच्यासाठी हे सर्व आहे त्यांची बौद्धिक, मानसिक क्षमता बुद्धिप्रामाण्यवादक्षम नसताना ही चौकटच नाहीशी झाली तर अनागोंदी माजेल असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सोपा विदा/कठिण विदा

काही विदा जमा करणे सोपे आहे, अर्थातच मान्य आहे. पण कुठलाही निष्कर्ष काढण्यासाठी पूर्ण विदा लागतो.

तक्ता १

* ईश्वराचा कायदा मानणारे लोक मानवाचा कायदा मानणारे लोक
गुन्हा न करणारे लोक
गुन्हा करणारे लोक

येथे 'अ'>'ब' हे मला अर्थातच मान्य आहे. हा विदा माझ्या अनुभवातला आहे. पण तसेच 'क'>'ड' असे असल्यामुळे कुठलाच निष्कर्ष निघत नाही.
निष्कर्ष काढण्यासाठी
'अ'>>'ब' पण फक्त 'क'>'ड' असे असेल तर काही म्हणता येते. पण त्यासाठी जास्त काळजीपूर्वक विदा गोळा करावा लागतो.

तक्ता २

* ईश्वराचा कायदा मानणारे लोक मानवाचा कायदा मानणारे लोक
काळे डोळे असलेले लोक
निळे डोळे असलेले लोक

येथेही 'अ'>'ब' हे आपल्या सर्वांच्या अनुभवात आहे. म्हणून काही डोळ्यांच्या रंगाचा "कुठला कायदा मानतो"शी संबंध मानणे योग्य नव्हे.

आता तुम्ही म्हणता की गुन्हा (?आस्तिकतेच्या चौकटीत "पाप"?) करणारा व्यक्ती खरा आस्तिक असूच शकत नाही. म्हणजे तुम्ही म्हणता की तक्ता १ मध्ये 'क'=०
हे खरे असल्यास आस्तिक्याचा आणि नैतिकतेचा संबंध लागू शकतो. मान्य.

पण तसे असल्यास मी असे म्हणतो की त्या तक्त्यात ख्रिस्ती लोकांत येशू, हिंदूंमध्ये काही संत, असे सोडले, तर "पाप" न करणारा कोणी सापडणारच नाही. म्हणजे 'अ'=०. वेश्येवर दगड टाकण्याच्या गोष्टीत येशूने गावातल्या लोकांना म्हटले - "फक्त स्वतः पाप न केलेल्या व्यक्तीलाच दगड मारण्याचा अधिकार मिळतो" आणि कोणीच दगड मारू शकला नाही. हिंदू धर्मातही मनुस्मृतीत दिलेल्या पापांची यादी बघता "पाप न केलेला" कोणी सापडणार नाही. (त्यांच्या येशूसारखे आपले संत अपवादात्मक.) काही नाही तर दररोज धरणीमातेला लाथा घालण्याचे पाप तरी लागतेच.

ठीक आहे, असे म्हणू की फक्त दंडनीय गुन्हे हेच खरे पाप. फक्त तशीच पापे "धर्माची चौकट मोडणारी" म्हणून मोजायची. असे केल्यास कुठली पापे दंडनीय हे पूर्णपणे मानवी कायदे होतात.

मला वाटते, "जो गुन्हे करत नाही, आणि शिवाय देव मानतो, तोच आस्तिक" अशी व्याख्या या ठिकाणी योग्य नाही. नाहीतर मग "जो गुन्हे करत नाही, आणि शिवाय देव मानत नाही, तोच नास्तिक" अशी व्याख्याही ग्राह्य मानावी लागेल.

हा युक्तिवाद बघा की माझ्या जातीतले कोणीही गुन्हे करत नाहीत. आणि जर गुन्हे करत असतील तर ते माझ्या जातीतले नाहीच मुळी. (पूर्णपणे विनोद नव्हे. "आमच्या जातीतले लोक अधिक सचोटीचे असतात, आम्हाला अफरातफर करता येतच नाही" असे आमच्या कुटुंबात म्हटलेले मी ऐकले आहे. आणि "अमुक काकूचा मुलगा..." असे उदाहरण दिले की म्हणतात - "त्याला कॉलेजात सिंध्यांची/गुजरात्यांची/मारवाड्यांची वाईट संगत लागली." म्हणजे मुले चांगली वागली तर घराण्याच्या चांगल्या वळणामुळे, वाईट वागली तर बाहेरचे वाईट वळण लागले.) तसे परजातीतही प्रगल्भ नैतिक लोक असतील म्हणा. पण नैतिकतेला माझ्या जातीचे अधिष्ठान मिळते, त्याचा फायदा का न घ्यावा. हा त्याच प्रकारचा युक्तिवाद आहे.

हाच विदा

हाच विदा कायदा शब्द वापरण्या ऐवजी फायदा शब्द वापरुन पहावा.
प्रकाश घाटपांडे

खरा विवेकवादी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. वाचक्नवी लिहितात:
जो कधी 'अरे माझ्या देवा', 'देवजाणे ', 'दैवी देणगी', 'देवाघरी गेला', 'देवाची मर्जी' हे शब्द उच्चारत नाही तो खरा विवेकवादी.
शिव!शिव! शिव!! काय हे ? अहो अशा कर्मकांडी निषेधाज्ञा पाळायच्या तर विवेकवादात काय अर्थ राहील? इथे विचारसरणी महत्त्वाची.मी प्रसंगी :"अरे देवा!, रामा रामा!, देवमाणूस आहे." असे बोलतो.तेव्हा माझा विवेकवाद संपुष्टात येतो का? पूर्वी मिशनरी लोक विहीरीत पाव टाकत. कुणी हिंदू ते पाणी प्याला की तो बाटला असे मानत.असला वेडगळपणा विवेकवादात बसत नाही.
...सोवळे नेसून, जानवे घालून मी गणपतीची पूजा केली आहे.भटजी सांगतील तशी गंघ फुले वाहिली आहेत.(वडील आजारी असताना) . तसेच नाती बरोबर खेळताना तिच्या बाहुलीला, खेळातील तपास्कोपने तपासून,औषध लिहून दिले आहे.(उच्चार येत नसल्याने ’ज्याने तपासतात तो तपास्कोप’ असा शब्द तिनेच शोधला आहे.).
तर विवेकवाद ही व्यावहा्रिक विचारसरणी आहे.व्यवहारात अशा गोष्टी घडतातच.त्याने विचारसरणीला बाधा येत नाही.

थोडक्यात काय..

विचारसरणी विवेकवादी हवी, आचारसरणी कशी का असेना!
देवळे, धार्मिक समजले जाणारे उत्सव(राखी, गोविंदा. गणपती, नवरात्र, आणि आता छट्‌पूजा, कडवाचौथ, होली) आणि बुवाबाया वाढत चालले आहेत ही गोष्ट खरी आहे. पण हे सर्व कोण करते? राजकारणी, भ्रष्टाचारी, नवश्रीमंत आणि पीडित. आमच्या नातेवाईक आणि मित्रांच्या याद्या बनवून शोध घेण्याचा प्रयत्‍न केला. काय मिळावे? आमचे वडील किंवा सासू-सासरे कधीही नियमितपणे देवळात जात नसत. घरात 'केली तर केली नाही तर राहिली' अशी देवपूजा होती. आईने उतारवयात 'त्या निमित्ताने फिरणे होते म्हणून' रोज संध्याकाळी देवळात जायला आणि कीर्तन-प्रवचन ऐकून यायला सुरुवात केली होती. बारा चतुर्थ्या, दोन एकादश्या आणि महाशिवरात्र सर्वच करीत, अजूनही आमच्यापैकी काहीजण करतात. सणाच्या दिवशी साग्रसंगीत देवपूजा असते. देवाला नमस्कार केल्यानंतर लहानपणी चांगली बुद्धी मागत असू आता काहीच मागत नाही. फारतर माझ्यामुळे इतरांना त्रास होऊ नये अशी इच्छा मनातल्या मनात व्यक्त केली की नमस्कार संपला.
आमच्या नातेवाईकात खूप देवदेव आणि व्रतवैकल्ये करणार्‍या एका बाईची मुलगी असाध्य रोगाने आजारी असते. सारखे ज्योतिषांकडे जाणारे गृहस्थ नोकरीत आहेत आणि खूप पैसा खातात आणि काही धोका नाही ना हे जाणून घ्यायला त्यांना सल्ला लागतो. आमचे एक परिचित आता ७८ वर्षांचे आहेत आणि पत्‍नी ७२. ते नियमितपणे देवळांत आणि बुवांकडे जातात. मला वाटते म्हातारपणातील फावल्या वेळचा छंद. आमच्यातला एकही सरळमार्गी कुठल्याही धार्मिक उत्सवात धांगडधिंगा करायला गेल्याचे ऐकिवात नाही. अगदी तरुण मुलेसुद्धा.
मग मला प्रश्न पडतो की ह्या नवनव्या देवळांचे आश्रयदाते कोण? मला वाटते की काही थोडे स्वार्थी लोक पैसा मिळवण्याकरिता किंवा बेकायदेशीररीत्या मिळवलेले पैसे खर्च करण्यासाठी हे धंदे करत असावेत. लोक अजिबात धार्मिक होत चाललेले नाहीत.--वाचक्‍नवी

अपराधांचे परिमार्जन

मला वाटते की काही थोडे स्वार्थी लोक पैसा मिळवण्याकरिता किंवा बेकायदेशीररीत्या मिळवलेले पैसे खर्च करण्यासाठी हे धंदे करत असावेत. लोक अजिबात धार्मिक होत चाललेले नाहीत.

हम्म! आपले अपराध ईश्वराचरणी वहायचे. लोक धार्मिक होत आहेत असे मलाही वाटत नाही.

भागिदार

हम्म! आपले अपराध ईश्वराचरणी वहायचे. लोक धार्मिक होत आहेत असे मलाही वाटत नाही.

अगदी मान्य! तेच माझे म्हणणे आहे.

बाकी एक मजेशीर गोष्ट एकून आहे - आपल्याकडे बरेचसे उद्योग "तिरूपती बालाजीस"एक शष्ठांश का असाच काहीसा धंद्यातील भागिदार म्हणून दाखवतात आणि तसे दाखवणे कायद्यात बसते असे ऐकून आहे! तसे केले म्हणजे नक्की काय होते ते माहीत नाही. म्हणजे ते काय तितका नफा देवस्थानास देतात का स्वतःवरील कर कमी करायला सरळ सरळ वापरतात... देव जाणे :-)

असे असल्यास

उदा. अब्दुल करीम तेलगीने एखाद्या देवाला भागीदार म्हणून दाखवले असेल तर देवाला अटक कशी करायची हे देवच जाणे :)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

विचार आणि आचार

मराठी असे आमुची मायबोली |
***********************************
श्री.वाचक्नवी आपल्या प्रतिसादात लिहितातः
"...विचारसरणी विवेकवादी हवी.आचारसरणी कशी का असेना!".
या संदर्भातः
बाहुलीला तपासणे हा जसा खेळ ,तद्वतच देवपूजा करणे हा सुद्धा केवळ खेळच.मी नाही म्हटले तर ,बरे नसतानाही,वडील स्नान करून पूजेला बसतील. त्यांना त्रास होईल . या विचाराने मी पूजेला बसलो. यात विवेकवादी विचारसरणीशी मुळीच प्रतारणा नाही. किंबहुना अशा प्रसंगी पूजेला न बसणे हे अविवेकी ठरले असते.
विवेकवादासाठी नियमावली आणि आज्ञावलीची कोणतीही पोथी नसते.प्रत्येकाने सारासार विचार करून वागावे अशी अपेक्षा असते.

आम्हीसुद्धा..

आम्हीसुद्धा दुसर्‍याच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून देवपूजा करतो, देवळांत जातो, सत्यनारायण घालतो, भटजींनी म्हणायला सांगितलेले मंत्र म्हणतो. दुसर्‍याला निष्कारण काळजी करायला लागू नये म्हणून भुते असू शकतील अशा ठिकाणी रात्री बेरात्री जात नाही. सार्वजनिक गणपतिउत्सवाची वर्गणी देतो. काशी, मथुरा, गया, रामेश्वर, मदुराई इत्यादी गावांच्या सहलीला जातो, तिथेतिथे देवापुढे पैसे ठेवतो आणि तिथल्या गोरगरिबांना दान करतो. असे केल्याने आमचा पुण्यसंचय वाढल्यास आमची काही हरकत नसते, पण निदान आपल्या हातून काही वाईट घडत नाही अशी आमची श्रद्धा असते. विवेकवादी माणूस श्रद्धावान असायला काही हरकत नसावी अशी आमची समजूत आहे!--वाचक्‍नवी

विवेकवादी कसं व्हायचं?

खुपच अभ्यासपुर्ण व रंगतदार चर्चा चालू आहे. दुर्दैवाने माझे या विषयातील वाचन कमी असल्याने कळण्यास थोडे कठीण जात आहे. असो. या अज्ञानातूनच काही प्रश्न मनात आले. मुद्दे मूळ चर्चेशी विसंगत असल्यास कृपया दूर्लक्ष करावे.

इश्वराचे अस्तित्व नाकारायचे किंवा नास्तिक व्हायचे किंवा विवेकवादी व्हायचे म्हणजे:

१) कुटूंबातील व नात्यातील कोणत्याही धार्मिक समारंभात सहभागी व्हायचे नाही.
२) धर्म व देव देवतांशी संबंधित वाचन करायचे नाही, चित्रपट, नाटक पहायचे नाहीत, गाणी ऐकायची नाहीत.
३) तुम्हाला शास्त्रीय / लोक संगीत ऐकणे सोडून द्यावे लागेल, कारण बहुतेक रचना देव धर्मावर आधारित आहेत.
४) शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, लो. टिळक, सावरकर किंवा अगदी गांधीजीही, इत्यादी आयकॉन्स विसरावे लागतील. कारण हे सर्व इश्वराचे अस्तित्व मानणारे होते.
५) संत व संत साहित्याकडे पाठ फिरवावी लागेल.
६) प्राचीन मंदिरं, गड, किल्ले, लेणी, विहार इत्यादी ठिकाणी जाणे सोडून द्यावे लागेल.
...असेच ना?

आता मला सांगा नास्तिक व्हायचं ठरवलं तर जीवन नीरस होण्याची शक्यता वाटत नाही का? कारण एखादी गोष्ट पाळायची ठरवली तर ती रिलिजीअसली (सॉरी निष्ठेने) पाळली पाहिजे नाही का? गरज पडेल तेंव्हा सोवळे नेसून पुजा करणे किंवा कानांना व मनाला बरे वाटते म्हणून गीत रामायण ऐकणे, आवश्यकता पडल्यास संत रचनांचे दाखले देणे, अशा गोष्टींनी विवेकवाद बुडणार नाही का? (हा प्रश्न उपरोधाने नाही तर उत्सुकतेने विचारला आहे.)

जयेश

माझे मत - सारांश

तुमचे मुद्दे चुकीचे आहेत. :)

१) कुटूंबातील व नात्यातील कोणत्याही धार्मिक समारंभात सहभागी व्हायचे नाही.
व्हायचे. मात्र त्याआधी त्यांना त्या धार्मिक समारंभाचे निरर्थकत्व पटवून देण्याचा प्रयत्न करावा. जर त्यांनी सांगितलेला या समारंभाचा अर्थ तुम्हाला पटला तर सोन्याहून पिवळे. :) मात्र कुटुंब आणि नातेसंबंध हे तुमच्या वैयक्तिक प्रेफरन्सेसपेक्षा महत्त्वाचे आहेत हे विसरू नये.

२) धर्म व देव देवतांशी संबंधित वाचन करायचे नाही, चित्रपट, नाटक पहायचे नाहीत, गाणी ऐकायची नाहीत.
वाचन करायचे. त्याशिवाय 'तिथे' काय सांगितले आहे आणि ते कसे निरर्थक/सार्थ आहे हे कळणार नाही. संत तुकाराम, लॉर्ड ऑफ द रिंग्ज, पॅशन ऑफ द ख्राईस्ट हे आमचे अतिशय आवडते चित्रपट आहेत. मात्र हे चित्रपट पाहिल्याने विवेकवादाशी प्रतारणा होईल असे नाही.

३) तुम्हाला शास्त्रीय / लोक संगीत ऐकणे सोडून द्यावे लागेल, कारण बहुतेक रचना देव धर्मावर आधारित आहेत.
नाही. वरील प्रमाणेच.

४) शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, लो. टिळक, सावरकर किंवा अगदी गांधीजीही, इत्यादी आयकॉन्स विसरावे लागतील. कारण हे सर्व इश्वराचे अस्तित्व मानणारे होते.
नो.

५) संत व संत साहित्याकडे पाठ फिरवावी लागेल.
नेव्हर

६) प्राचीन मंदिरं, गड, किल्ले, लेणी, विहार इत्यादी ठिकाणी जाणे सोडून द्यावे लागेल.
ही ठिकाणे पाहिल्याशिवाय त्यांचा आनंद कसा काय लुटता येणार?

विवेकवादी व्हायचे म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी व्हायचे. एखादी गोष्ट जर तुमच्या बुद्धीला, तर्काला पटत असेल (मग ती गोष्ट देव देखील असो) तर ती मान्य करणे म्हणजे विवेकवाद. :)

मात्र एखादी गोष्ट बुद्धीला पटवून घेण्यासाठी कोणतेही पूर्वग्रह नकोत. सूर्योदय होणे व सूर्यास्त होणे यासारख्या गोष्टींचे शास्त्रीय स्पष्टीकरण वाचल्यानंतर ती गोष्ट तुमच्या बुद्धीला पटायला हवी. मात्र हे वाचले तरीही तरीही 'देवबाप्पा अंधार करतो' हे कवटाळून बसणे म्हणजे अविवेकी वृत्ती.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

लेखापेक्षा वेगळी व्याख्या

मला वाटते की ईश्वराचे अस्तित्व नाकारण्याची तुमची ६-कलमी व्याख्या लेखातील व्याख्येपेक्षा वेगळी आहे.

अर्थात तशी व्याख्या करण्याचा तुमचा अधिकार आहे. पण ती व्याख्या एक वेगळी संकल्पना आहे, आणि लेखाच्या संदर्भात येते असे मला वाटत नाही.

माझ्या ओळखीच्या लोकांत बघता तुमच्या व्याखेतील सहा कलमे कोणालाच लागू होत नाहीत. (इथे कलम ४ "देशातल्या थोर ऐतिहासिक विभूती" असे बदलून घेतले आहे.) त्या अर्थी तुमच्या व्याख्येप्रमाणे बहुधा माझ्या ओळखीतले कोणीच "ईश्वराचे अस्तित्व नाकारत नाहीत किंवा नास्तिक नाहीत किंवा विवेकवादी नाहीत". तुमच्या व्याख्येप्रमाणे ते जर तसे असते, तर सहा कलमे [किंवा बहुतेक कलमे तरी] त्यांना लागू असती. तुमच्या ओळखीत तरी असे कोणी आहे का?

असे कोणी ६-कलमी आपल्या कोणाच्या ओळखीचे नसेलच, तर तशी व्याख्या करण्यात, तशी संकल्पना सांगण्यात, काय हशील आहे?

वरील लेखात दिलेल्या व्याख्येप्रमाणे वागणारे लोक मात्र वावरताना सापडण्याची शक्यता आहे. तसे काही लोक माझ्या ओळखीचे आहेत. त्यामुळे लेखातील व्याख्येचा काही उपयोग होऊ शकतो असे मला वाटते.

गैरसमज

कदाचित आपला गैरसमज झालेला दिसतो.
नास्तिकतेची ६ कलमी व्याख्या करण्याचा माझा प्रयत्न नव्हता. लिहिताना सहाच मुद्दे सुचले म्हणून तेव्हढे लिहिले. वरील ६ गोष्टी करणे म्हणजे नास्तिक (किंवा विवेकवादी) होणे असे मला म्हणायचे नाही. माझा मुद्दा हा होता की एखाद्याने नास्तिक (किंवा विवेकवादी) व्हायचे ठरविले तर त्यास या सर्व (किंवा याला अनुसरून अधिक) कृती करणे भाग आहे का?

तुम्ही एकदा नास्तिक (किंवा विवेकवादी) विचारसरणी अंगिकारली की इश्वरावर श्रद्धा ठेवणार्‍या व्यक्तिस (इथे मुद्दा ४ प्रमाणे देशातल्या थोर ऐतिहासिक विभूतींना) फॉलो करणे (मानणे) चुकीचे नाही का?

माझा मुद्दा नास्तिकते संदर्भात होता. लेखात नास्तिकता म्हणजेच विवेकवाद आहे असे कुठे तरी वाचल्यासारखे वाटले किंवा असा माझा गैरसमज झाला होता, परंतु आजानुकर्णाने म्हटल्याप्रमाणे "विवेकवादी व्हायचे म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी व्हायचे. एखादी गोष्ट जर तुमच्या बुद्धीला, तर्काला पटत असेल (मग ती गोष्ट देव देखील असो) तर ती मान्य करणे म्हणजे विवेकवाद. :)"

असे असेल तर माझे प्रश्न निकालात निघतात.

जयेश

माझ्या मते -

माझा मुद्दा हा होता की एखाद्याने नास्तिक (किंवा विवेकवादी) व्हायचे ठरविले तर त्यास या सर्व (किंवा याला अनुसरून अधिक) कृती करणे भाग आहे का?

सर्व किंवा बहुतेक तरी. मान्य. पण या कृती कुठल्या आहेत? तुम्ही दिलेली ६ उदाहरणे तर नक्कीच नाहीत. लेखात काही कृतींची उदाहरणे दिली आहेत. त्या, म्हणजे लेखातील (बहुतेक) कृती आचरणात आणाव्यात असे लेख लिहिणार्‍याचे मत आहे.

तुम्ही एकदा नास्तिक (किंवा विवेकवादी) विचारसरणी अंगिकारली की इश्वरावर श्रद्धा ठेवणार्‍या व्यक्तिस (इथे मुद्दा ४ प्रमाणे देशातल्या थोर ऐतिहासिक विभूतींना) फॉलो करणे (मानणे) चुकीचे नाही का?

वरील लेख वाचून तरी असे वाटत नाही. मी ख्रिस्ती धर्म अजूनतरी अंगीकारलेला नाही (बहुधा "ख्रिस्ती धर्म मानत नाही" म्हटले तरी चालेल), पण काही ख्रिस्ती मार्गदर्शकांचे म्हणणे जरूर मानतो (ठळक उदाहरण : गळ्यात क्रूस घातलेला वाहातुक नियंत्रक पोलीस; आदरणीय उदाहरण : माझ्या ख्रिस्ती शाळाशिक्षिकेने शिकवलेले गणित). अशा प्रकारे वागणारे माझे कित्येक (म्हणजे ~१००%) मित्र आहेत. त्यामुळे अमुक-तमुक मानत नसल्यामुळे महान विभूतींच्या आपल्याला लागू वर्तनाचे अनुकरण करणे मला मुळीच चुकीचे वाटत नाही. ख्रिस्त/आकाशातला बाप/पवित्र आत्मा त्रिकुटाला न मानणारा ख्रिस्ती शिक्षकाकडून गणित आदराने शिकू शकतो, त्याच प्रमाणे देव न मानणारा लोकमान्य टिळकांकडून मुत्सद्दी समाजनेतृत्व शिकू शकतो.

आजानुकर्ण यांचे म्हणणे ठीकच आहे. पण तुमचे प्रश्न बहुधा नास्तिकतेलाही लागू नाहीत, असे मला वाटते. अधिक स्पष्टीकरण लेखाचे लेखकच देऊ शकतील. खुद्द मला "देव आहे की नाही" याविषयी सध्या तरी काहीच कुतूहल नाही. (कारण 'देव' शब्दाचा अर्थ प्रत्येक जण काहीतरी वेगळाच सांगतो. कुठल्याही एका व्यक्तीने व्याख्या देऊन विचारता, मी बहुधा त्या व्याख्येबद्दल स्वतःचे मत देऊ शकेन. म्हणजे कोणी म्हणते "अरे, देव म्हणजे आई!" - असे असल्यास "मला आई आहे", वगैरे उत्तर मी सहज देऊ शकेन.) त्यामुळे मला आस्तिक किंवा नास्तिक म्हणणार ते मला माहीत नाही. मी अज्ञेयवादीही नाही, कारण अज्ञेयवादी व्यक्तीला याविषयी कुतूहल असते. त्यामुळे नास्तिकतेबद्दल स्वतःच्या वतीने उत्तर देण्यास मी असमर्थ आहे.

उच्च

कारण 'देव' शब्दाचा अर्थ प्रत्येक जण काहीतरी वेगळाच सांगतो. कुठल्याही एका व्यक्तीने व्याख्या देऊन विचारता, मी बहुधा त्या व्याख्येबद्दल स्वतःचे मत देऊ शकेन. म्हणजे कोणी म्हणते "अरे, देव म्हणजे आई!" - असे असल्यास "मला आई आहे", वगैरे उत्तर मी सहज देऊ शकेन

हा फारच उच्च दर्जाची कोटी होती. खो खो हसलो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सारांश सांगा राव आता !!!

विवेक : 'वि' उपसर्गयुक्त 'विच' धातुचा अर्थ आहे. दोन गोष्टीमधील फरक करणे. त्यापासून विवेक शब्द बनला आहे. चांगले आणि वाईट वेगळे करणे, सत आणि अस्त वेगळे करणे म्हणजे विवेक.

धार्मिक माणसे विज्ञानवादी माणसे विवेकी असू शकतात, असे असतांना वरील चर्चेतील सारांश आम्हाला काही उमजत नाही, तेव्हा सारांश टाका राव कोणी तरी, नव्या पानावर !!!

धन्यवाद

मराठी असे आमुची मायबोली |
***********************************
** "विवेकवाद’ या चर्चा प्रस्तावावर अनेक सदस्यांनी आपले विचार मांडले.सर्वांना धन्यवाद!
**श्री.विकास हे अगदी लक्षपूर्वक वाचन करतात असे दिसते.प्रस्तावातील एखादे विधान तर्कशुद्धते पासून जरा ढळले तरी ते त्यांच्या काकदृष्टीतून निसटत नाही.त्यांचे वाचन समृद्ध आहे.व्यासंग मोठा आहे. त्यामुळे त्यांचे विस्तृत प्रतिसाद लक्षवेधक असतात.
**श्री. आजानुकर्ण,श्री.ॠषीकेश ,श्री. नवीन, श्री.जयेश यांचे प्रतिसाद उत्स्फूर्त वाचनीय आहेत.
** एखाद्याच्या मताचे खंडन करण्यासाठी त्याचीच विधाने वापरण्याची श्री. धनंजय यांची पद्धत अभिवनच आहे.(मला तरी).त्यामुळे विधाने किती दक्षतापूर्वक करायला हवीत याचा धडा मिळतो. अन्यथा(योग्य दक्षतेच्या अभावी) आपलीच विधाने आपल्या घशात जायची.
**श्री. विकास यांनी मला दुराग्रही स्वमतांध (फ़ॅनॅटिक) ठरविले आहे.त्यामुळे अंतर्मुख होऊन माझ्या मताभिव्यक्तीच्या पद्धतीवर मला पुनर्विचार करणे प्राप्त आहे.

*****

खुलासा

श्री. यनावाला,

आपण वरील प्रतिसादात म्हणले आहे की, "श्री. विकास यांनी मला दुराग्रही स्वमतांध (फ़ॅनॅटिक) ठरविले आहे.त्यामुळे अंतर्मुख होऊन माझ्या मताभिव्यक्तीच्या पद्धतीवर मला पुनर्विचार करणे प्राप्त आहे."

सर्व प्रथम मला आपल्याला अथवा येथील इतर कुणालाही "ब्रँड" करण्याचा उद्देश नाही. धनंजयला दिलेल्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे मला आपला अनादर करण्याचा उद्देश नकळत पण नव्हता. तरी देखील माझ्यामुळे आपल्याला असे वाटले ह्या बद्दल मी आपली मनापासून माफी मागतो. तरी देखील कृपया खालील उद्देश वाचावात ही विनंती. (हा काही माझा बचाव नाही!)

आपण जेंव्हा काही लिहीतो, विशेष करून सामाजीक विषयांवर तेंव्हा आपण नकळत कुणाला उगाचच लेबल/ब्रँड करत नाही आहोत ना हे समजून लिहावे असे मला कायम वाटते. मी देखील तसे कायम करू शकत नसलो तरी शक्य तितका मी कायम प्रयत्न करत असतो. आपल्याला कदाचीत आश्चर्य वाटेल पण धर्म पाळायला मला आवडत असला तरी मी रुढार्थाने रीलीजियस नाही आणि त्या अर्थी आपले आणि माझे व्यक्तिगत विचार करण्याच्या पद्धतीत फार फरक नाही.

तरी देखील एखादी व्यक्ती/समाज जेव्हा इतरांना त्रास न देता धार्मिक (रीलीजियस) असते तेंव्हा केवळ तेथे अनाठायी बुद्धीवाद आणून त्यांना नकळत अविवेकी ठरवणे (मला माहीत आहे की तुमच्या डोक्यात तसे नव्हते ते!) हे अयोग्य वाटते. त्या संदर्भात मी मुद्दामून चर्चिलचे वाक्य आणि मागच्या चर्चेत त्याच अर्थी लिहीले, ज्याचा अर्थ, "आपण पण स्वमतांध आहात असा होऊ शकतो. " मात्र " तसे आहात असे मला म्हणायचे नव्हते"

समर्थ रामदासांचे एक वाक्य आहे, "स्वतःशी चिमुटा घेतला, तेणे जीव कासाविस झाला, आपुल्यावरूनी दुसर्‍यासी वोळखावे". जर काही उद्देश असला तर असा चिमुटा घेणे इतकाच काय तो होता!

माझ्यामुळे त्रास झाला असल्यास परत एकदा क्षमस्व!

 
^ वर